काकड: (कंकर, कुकड हिं.कैकर, घोगर क.आरनेल्ली, बळगी लॅ.गॅरुगा पिनॅटा कुल-बर्सेरेसी). हा सु.१०-१५. मी.उंचीचा मोठा पानझडी वृक्ष भारतात बहुतेक सर्वत्र मिश्र पानझडी जंगलांत (कोकण दख्खन, यमुना ते ब्रह्मदेश आणि दक्षिणेस निलगिरीपर्यंत), अंदमानात आणि कोको बेटांत आढळतो. तो मूळचा इंडो-मलायातील आहे. गॅरुगा हे वंशवाचक लॅटिन नाव तेलुगू नावावरुन घेतले असून पिनॅटा हे जातिवाचक नाव विषमदली पिच्छाकृती (पिसासारख्या) संयुक्त पानाला अनुलक्षून आहे. ही झाडे कधीकधी रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरिता लावतात. घेर सु.१.६ मी. साल जाड, नरम, आतून लालसर व बाहेरुन तपकीरी किंवा करडी व तुकडयांनी सोलून निघणारी पाने मोठी, ५०-४० सेंमी. लांब असून थंडीत गळण्यापूर्वी  लाल होतात. दले सहा किंवा अधिक जोडया व एक दल जास्त असून शेवटी त्यावर लाल गाठी येतात. फुले लहान, पिवळट, उन्हाळयाच्या आरंभी, फांद्यांच्या टोकास, संयुक्त परिमंजऱ्यांवर येतात. त्यांची रचना व इतर शारीरिक लक्षणे बर्सेरेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), लहान (१५-२० मिमी.), गोलसर, प्रथम हिरवे, शेवटी पिवळे किंवा काळे एकबीजी अष्ठिका (बाठ) एक ते पाच बीजे सपक्ष. कच्ची फळे आंबट असून त्यांचे लोणचे करुन खातात. साल, लाल पाने व गाठी ही कातडी कमावण्यास वापरतात. लाकूड तांबूस व कठीण मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन व बहुधा गर्द रंगाचे लाकूड) लहान, तांबूस तपकिरी, रसकाष्ठ (काष्ठमय वनस्पतीमध्ये जलीय विद्राव वाहून नेणाऱ्या पेशी समूहाच्या म्हणजे प्रकाष्ठाच्या सर्व पृष्ठभागावर नव्याने तयार झालेला व्दितीयक काष्ठाचा थर) मोठे व पांढरे लाकडास कीड लागते. लाकूड जळणास व फळ्या, पेट्या, पेन्सिली, होडगी, आगकाड्या, कागद इत्यादींसाठी वापरतात. पाने गुरांना चारतात. फळे दीपक (भूक वाढविणारी) पानांचा रस मधाबरोबर दम्यावर देतात खोडाचा रस काही नेत्रविकारांवर गुणकारी.

काकड : (१) पान, (२) फुलोरा, (३) फळे

महाजन, श्री. द.