कांटेमीर, डीमीट्रीये: (२६ ऑक्टोबर १६७३—२१ ऑगस्ट १७२३). रुमानियन लेखक. पूर्व रुमानियाच्या मॉल्डेव्हिया प्रांताचा राजा कॉन्स्टांटीन कांटेमीर ह्याचा पुत्र. जन्म फलच (रुमानिया) येथे. शिक्षण कॉन्स्टॅंटिनोपल येथे. रशिया आणि तुर्कस्तान यांच्या युद्धात `पीटर दी ग्रेट’ ची बाजू घेतल्यामुळे `पीटर दी ग्रंट’ पराभूत होताच त्याला रशियात पळून जावे लागले (१७११). त्यानंतर तो रशियातच स्थायिक झाला. `पीटर दी ग्रेट’ ह्यांनी `इंपीरिअल चान्सलर’ म्हणून त्याची नेमणूक केली. त्याचे बरेचसे लेखनकार्य रशियातच झाले.

Historia incrementorum atque decrementorum aulae Othomanicae (१७१६, इं.भा.हिस्टरी ऑफ द ग्रोथ अँड डिके ऑफ द ऑथमन एम्पायर, दोड खंड, १७३४-३५) हा त्याचा विशेष ख्यातनाम ग्रंथ. त्याखेरीज Hronicul vechimii a Romano-Moldo-Vlahilor हा मॉल्डो-वॉलेकियाचा पहिला चिकित्सक इतिहास, Descriptio Moldaviae (१७१५) हा मॉल्डेव्हियाची भौगोलिक, आर्थिक आणि मानवजातिविषयक माहिती देणारा ग्रंथ, Divan हा तात्त्विक ग्रंथ आदी लेखन त्याने केले. रुमानियन अकादमीने Operele Principelui D.Cantemir या नावाने त्याचे ग्रंथ संकलित स्वरुपात प्रसिद्ध केले आहेत (१८७२). त्याला अकरा भाषा अवगत होत्या. विज्ञानाबद्दल त्याला आस्था होती. बर्लिनच्या अकादमीवर तो निवडून गेला होता. तो एक संगीतकारही होता. तुर्की संगीतावर पहिला ग्रंथ त्याने लिहिला. कारकॉफ (रशिया) येथे तो निवर्तला.

कुलकर्णी, अ. र.