औषधनिर्मिति : पुरातन कालापासून निरनिराळे रोग, आजार, जखमा इ. बरे करण्यासाठी औषधांचा वापर करण्यात येत आहे. ही औषधे पूर्वी प्रामुख्याने वनस्पतिज व प्राणिज असून क्वचित प्रसंगी खनिज असत. ही औषधे सामान्यत: रोगाचे निदान केल्यानंतर वैद्य स्वत: तयार करून देत. औषधे तयार करून ठेवणे, साठविणे व टिकविणे ह्या गोष्टी अवघड असल्याने पूर्वी रोगनिदान झाल्यावरच औषधे तयार करून देण्यात येत. औषधे साठवून व टिकवून ठेवण्याची क्रिया माहीत झाल्यावर तयार औषधांचा जलद वापर करता येऊ लागला. अशा रीतीने मोठ्या प्रमाणावर औषधनिर्मिती होऊ लागली. प्रस्तुत लेखात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पध्दतींनी तयार करण्यात येणाऱ्या औषधनिर्मितीसंबंधीचे विवरण केले आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी इ. पध्दतींत औषधे तयार करण्याच्या येथे उल्लेखिलेल्या व्यतिरिक्त इतर विविध पध्दतीही आहेत. [→ औषधिकल्प बाराक्षार युनानी वैद्यक होमिओपॅथी].
इतिहास : पाश्चात्त्य देशांत सोळाव्या शतकापूर्वी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेली औषधी वस्तू दळून ती आवश्यक तितकी बारीक करीत असत. औषधांतील क्रियाशील घटकाची संहती (प्रमाण) व शुध्दता अधिक असणे आवश्यक आहे असे आढळून आल्यानंतर इतर प्रक्रियांचा वापर करण्यात येऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पाश्चर इत्यादींच्या सूक्ष्मजीवशास्त्रविषयक शोधांमुळे औषधनिर्मितीसाठी शास्त्रज्ञांचे लक्ष सूक्ष्मजैव पदार्थांवर (सूक्ष्मजीवांपासून मिळालेल्या पदार्थांवर) केंद्रित झाले. त्याच सुमारास काही रसायनेही औषधे म्हणून वापरात होती. त्यांचा पुरवठा प्रामुख्याने जर्मनीकडून होत असे. पण पहिल्या महायुध्दात तो पुरवठा बंद झाल्याने रसायन निर्मितीचे कारखाने इतर देशांत निघाले. विसाव्या शतकात औषधनिर्मितीत बरीच प्रगती होऊन जंतुनाशके, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, विविध प्रकारची प्रारणे (तंरगरूपी ऊर्जा) इत्यादींचा औषधोपचारासाठी उपयोग करण्यात येऊ लागला. तसेच औषधनिर्मिती यांत्रिक पध्दतीने केली जाऊन औषध पुरवठा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
एकोणिसाव्या शतकापर्यंत औषध पुरवठा हा वैयक्तिकरीत्या होत होता. ह्याच सुमारास औषधनिर्मितीवरील सरकारी बंधने, वाहतुकीच्या साधनांतील प्रगती, संदेशवहनाच्या सोई, पेटंट [→ एकस्व] व बोधचिन्ह यांबाबत संरक्षण इत्यादींमुळे यूरोप खंडात बऱ्याच औषधनिर्मितीच्या कंपन्या स्थापन झाल्या. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतही त्यांना अशाच सवलती मिळाल्याने ह्या कंपन्यांनी आपले उत्पादन तेथे सुरू केले. विल्यम एस्. मेरेल अँड कं. (१८२८), फ्रेडरिक स्टर्नस कं. (१८५५), ई. आर्. स्क्विब ऍ़ंड सन्स (१८५७), शार्प अँड डोहमे (१८६०), पार्क, डेव्हिस अँड कं. (१८६६) इ. प्रसिद्ध कंपन्यांची स्थापना याच काळात झाली.
वैद्यांनी लिहून दिलेल्या सूचनांनुसार औषधे बनवून व ती वापरण्यास योग्य आहेत असा अभिप्राय त्यांच्याकडून घेऊन मगच ती विकण्याची प्रथा प्रथम फ्रेडरिक स्टर्नस कंपनीने १८७६ मध्ये सुरू केली. नंतर बहुतेक सर्व कंपन्यांनी ही प्रथा प्रचारात आणली. याच प्रथेनुसार अशा औषधांची निर्मिती बहुतांशी करतात. मानकीकरणाचे (प्रमाणित स्वरूपात निर्मिती करण्याचे) तत्त्व प्रथम १८७९ मध्ये वापरण्यात आले. निर्मितीची गुणवत्ता अगोदर ठरविणे व तयार केलेल्या औषधींची ह्या मानक गुणवत्तेबरोबर रासायनिक पद्धतीने तुलना करणे या पध्दतीचा वापर प्रथम पार्क, डेव्हिस अँड कंपनीने केला. १८९४ मध्ये त्याच कंपनीने शरीरक्रिया आमापन पध्दतीचा (शरीरक्रियेवर औषधाच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून औषधाची परिणामकारक मात्रा ठरविण्याच्या पध्दतीचा) वापर केला [→ आमापन, जैव]. ज्या औषधांची रासायनिक पद्धतीने तुलना करता येत नव्हती ती या पद्धतीने तपासली जाऊ लागली. तसेच जैव पदार्थांच्या निर्मितीतही पार्क, डेव्हिस अँड कंपनी शार्प अँड डोहमे या कंपन्या अग्रेसर व आद्य होत्या. एकेकाळी विस्कळित स्वरूपात असलेल्या औषधनिर्मितीचे आज एका सुसंघटित, सुव्यवस्थित, सुस्थापित व जटिल अशा उद्योगधंद्यात रूपांतर झाले आहे.
औषधांचे प्रकार : आज मिळणाऱ्या तयार औषधांत दोन प्रकारची औषधे आहेत. एक प्रकार म्हणजे वैद्यांच्या सूचनांनुसार तयार केलेली औषधे व दुसरा सामान्य मलमे, बाम, डोकेदुखीवरील गोळ्या यांसारखी नित्य वापरातील औषधे. औषधांच्या विविध प्रकारांमुळे, त्यांसंबंधीच्या ज्ञानाचा प्रसार वाढल्यामुळे व ती वापरल्याने येणाऱ्या अनुभवामुळे दुसऱ्या प्रकारची औषधे सर्व बंधने सांभाळून तयार केली जातात. ही औषधे विविध कंपन्यांच्या संशोधन विभागांच्या सल्ल्यानुसार किंवा जुन्या अनुभवसिद्ध सूत्रांवरून तयार केली जातात.
आज बाजारात मिळणाऱ्या औषधांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल : (१) वनस्पतिज, (२) प्राणिज, (३) खनिज, (४) प्रतिजैव, (५) जैव पदार्थ (बायालॉजिकल्स), (६) संश्लेषित.
वनस्पतिज औषधे : बऱ्याच वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असलेले घटक असतात. या घटकांचा औषध म्हणून फार पूर्वीपासून उपयोग करण्यात येत आहे. आयुर्वेदात अशा प्रकारची विविध औषधे तयार करण्याच्या पद्धतींचे वर्णन दिलेले आहे. पाश्चात्य देशांत गेलेन या ग्रीक वैद्यांनी दुसऱ्या शतकात प्रथमच अशी औषधे तयार करण्याचे सविस्तर वर्णन केले. अशा औषधांना पाश्चात्त्य देशांत ‘गेलेनिकल्स’ म्हणतात. वनस्पतींमधील औषधी द्रव्ये पुढील प्रकारांनी वेगळी करतात :
(अ) पाण्यातील काढे (इन्फ्युजन्स) : औषधी वनस्पतींचे बारीक बारीक तुकडे करून ते सु. १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवतात. मिश्रण ढवळल्यास वनस्पतींतील औषधी द्रव्ये पाण्यात लवकर विरघळतात. नंतर मिश्रण कापडातून गाळतात. हे काढे ताबडतोब उपयोगात आणावयाचे असतात.
(आ) अल्कोहॉलातील विद्राव (टिंक्चर) : वनस्पतींमधील औषधी द्रव्ये अल्कोहॉलात जलद विरघळतात व ती स्थिर राहतात. बरीचशी औषधे पाणीमिश्रित अल्कोहॉलामध्ये तयार करतात. साधारणपणे ४५ टक्के अल्कोहॉलयुक्त औषधांना ‘टिंक्चर’ म्हणतात. ती कमी संहतीचे विद्राव तयार करून किंवा अल्कोहॉलात भिजवून किंवा परिगलन पध्दतीने (गाळणाऱ्या माध्यमातून विद्राव हळूहळू जाऊ देण्याच्या पध्दतीने) तयार करतात. प्रथम बनविलेल्या टिंक्चरापासून त्यांची संहती कमी करून काही टिंक्चरे बनवितात. टिंक्चर नक्स व्होमिका, टिंक्चर कॉल्चिकम इ. टिंक्चरे या पध्दतीने तयार करतात.
काष्ठौषधींचे ठराविक सूक्ष्मतेचे चूर्ण करून, ते अल्कोहॉलामध्ये सु. आठ दिवस ठेवतात, हा काल औषधाच्या प्रकारानुसार कमीअधिक असू शकतो. मिश्रण अधूनमधून ढवळावे लागते. या काळात औषधिद्रव्ये अल्कोहॉलात उतरतात. नंतर ते मिश्रण गाळून घेतात व भिजलेले चूर्ण दाबून त्यातील उरलेला द्रव काढून घेऊन पहिल्यात मिसळतात. यात कमी झालेल्या अल्कोहॉलाची (आधारद्रव्याची) भरपाई करीत नाहीत. या पध्दतीने टिंक्चर ऑरेंज, टिंक्चर कॅप्सिकम इ. टिंक्चरे बनवितात. यास अल्कोहॉलात भिजवून (मॅसरेशन) टिंक्चरे तयार करण्याची पध्दत म्हणतात.
आणखी एक प्रकाराची टिंक्चरे बनविताना वरीलप्रमाणे चूर्ण करून ते प्रथम अल्कोहॉलात भिजवितात, नंतर चाळणीने चाळून ते जास्त अल्कोहॉलात चार तासांपर्यंत भिजत ठेवतात. नंतर हे फुगलेले चूर्ण कल्हई असलेल्या तांब्याच्या भांड्यात थरांच्या स्वरूपात दाबून बसवितात. भांड्याच्या दुसऱ्या टोकास असलेल्या काथ्याच्या बोळ्यामुळे हे चूर्ण भांड्याबाहेर जाऊ शकत नाही. शेवटच्या थरावर गाळण-कागद ठेवून त्यावर स्वच्छ वाळूचे दडपण ठेवतात. नंतर त्यावर अल्कोहॉल हळूहळू ओततात. यावेळी खालची तोटी उघडी ठेवतात. त्यामुळे भांड्यातील हवा निघून जाते. अल्कोहॉल खाली येऊ लागताच तोटी बंद करतात. वाळूवर अल्कोहॉल दिसेपर्यंत ते ओततात. भांडे झाकून २४ तास तसेच ठेवतात व नंतर तोटी उघडून विद्राव थेंब थेंब काढण्यास सुरुवात करतात. भांड्यातील अल्कोहॉल कमी होताच त्यात ते परत घालतात. परिगलन पूर्ण झाले की नाही ते रासायनिक पध्दतीने पाहतात. परिगलन पूर्ण झाल्यास अल्कोहॉल घालण्याचे बंद करतात व भांड्यातील सर्व विद्राव काढून घेतात. चूर्णात राहिलेला विद्राव घाणीच्या साहाय्याने काढून घेऊन तो पहिल्यात मिसळतात. या पध्दतीने टिंक्चर बेलॅडोना, टिंक्चर डिजिटॅलीस इ. टिंक्चरे बनवितात.
(इ) अर्क : अर्काचे द्रव अर्क व शुष्क अर्क असे २ प्रकार आहेत. द्रव अर्क परिगलनाने टिंक्चर तयार करण्याच्या पध्दतीप्रमाणेच बनवितात. पण त्यात टिंक्चरांपेक्षा औषधिद्रव्यांचे प्रमाण अधिक असावे लागते. त्यासाठी आधारासाठी वापरलेल्या विद्रावकानुसार (विरघळविणाऱ्या पदार्थानुसार) त्यातील आधार कमी करतात. पाणी असल्यास वाफेने विद्राव उकळून व अल्कोहॉल असल्यास ऊर्ध्वपातनाने (वाफ थंड करून द्रवरूपात वेगळी करण्याच्या क्रियेने) तो कमी करतात. काही वेळा पहिला अर्क तसाच ठेवून नंतर काढलेले अर्क आटवून पहिल्यात मिसळतात. बेलॅडोना, कॉल्चिसीन, इपेकॅक इ. द्रव अर्क या पध्दतीने बनवितात. शुष्क अर्क बनविण्याच्या परिगलन पध्दतीत ७० – ८० टक्के अल्कोहॉल आधार म्हणून वापरतात. द्रव अर्क दाबाखाली उष्णतेने आटवितात व त्यातील औषधिद्रव्यांचे प्रमाण योग्य आहे की नाही हे पाहून ते पूर्ण सुकवून चूर्ण करतात. बेलॅडोना, नक्स व्होमिका इ. शुष्क अर्क या पध्दतींनी बनवितात. वर उल्लेख केलेल्या पध्दतींशिवाय वनस्पतींची चूर्णे फक्त पाण्यात उकळवून व आटवून माल्टासारखे अर्क तयार केले जातात.
रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबर वनस्पतींमधील मूळ औषधिद्रव्यांसंबंधी संशोधन सुरू झाले. वनस्पतींतील औषधिद्रव्ये वेगळी करून त्यांचे रासायनिक स्वरूप व गुणधर्म शोधून काढण्यात आले. अशी द्रव्ये संश्लेषणाने (घटक द्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीतीने) तयार करण्यात आली, पण वनस्पतींपासून मिळणाऱ्या द्रव्यांपेक्षा संश्लेषिल द्रव्ये महाग असल्याने ही द्रव्ये अद्यापि वनस्पतींपासूनच बनवितात. वनस्पतींपासून मिळणाऱ्या काही औषधिद्रव्यांची नावे व उपयोग कोष्टक क्र. १ मध्ये पुढे दिले आहेत.
प्राणिज औषधे : खाटिकखान्यात मारलेल्या प्राण्यांच्या शरीरातील यकृत, विविध ग्रंथी, हृदय-स्नायू तसेच या भागांपासून काही माशांपासून तेले, अर्क इ. औषधिद्रव्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. यासाठी निष्कर्षण (अर्क काढण्याच्या) पध्दतीचा उपयोग करतात. या पध्दतीने अ आणि ड जीवनसत्त्वे, लिव्हर-एक्स्ट्रॅक्ट (यकृतसार), हेपारीन, काही अंत:क्षेपणे (इंजेक्शने), ग्रंथींपासून हॉर्मोने इ. औषधिद्रव्ये मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात.
कोष्टक क्र. १. वनस्पतींपासून मिळणारी औषधिद्रव्ये व त्यांचे उपयोग |
|||
वनस्पतीचे नाव |
वनस्पतीच्या कोणत्या भागापासून औषधिद्रव्ये काढतात. |
मिळणारी औषधिद्रव्ये |
उपयोग |
सिंकोना |
साल |
क्विनीन, क्विनीडीन, क्विनोटॉक्सिन, सिंकोनीन, सिंकोनिडीन व इतर ३० अल्कलॉइडे. |
हिवतापविरोधी औषध, शक्तिवर्धक. |
काजरा (नक्स व्होमिका) |
बी |
स्ट्रिक्नीन, ब्रुसीन. |
अग्निमांद्य, कीटकनाशक. |
अफू |
कच्चे फळ |
मॉर्फीन, स्यूडोमॉर्फीन, कोडीन, थेबाइन, पॅपॅव्हरीन, नार्कोटीन, नार्सीन आणि इतर १६ अल्कलॉइडे. |
झोप व गुंगी आणण्यासाठी, खोकला, अंगग्रहरोधक (स्नायूंच्या आकुंचनास रोध करणारी). |
गिरबूटी (इंडियन बेलॅडोना) |
पाने, मुळे |
हायसायमीन, ॲट्रोपीन |
अंगग्रहरोधक, आवरोधक, डोळ्याची बाहुली रुंदावणारे. |
धोतरा (दतुरा स्ट्रामोनियम |
पाने, बी |
हायसायमीन, ॲट्रोपीन |
अंगग्रहरोधक, आवरोधक, डोळ्याची बाहुली रुंदावणारे. |
खोरासनी ओवा (हायसायमस नायगर) |
मुळे |
हायसायमीन |
अंगग्रहरोधक, आवरोधक, डोळ्याची बाहुली रुंदावणारे. |
इपेकॅक (सेफिलिस इपेकॅक्युन्हा) |
वाळलेली मूलक्षोडे व मुळे |
एमिटीन, सेफालीन व इतर अल्कलॉइडे. |
आवरोधक, मूत्रल, भूक वाढविण्यासाठी, कफनाशक |
गांजा (कॅनबिस सटिव्हा) |
फुलोरा, पाने |
भांग, चरस इ. मादक पदार्थ (कॅनबिनॉल, टेट्राहायड्रोकॅनबिनॉल इत्यादी). |
झोप व गुंगी आणण्यासाठी, वेदनाशाम. |
अरगट (क्लॅव्हिसेप्स पुर्पुरिया) |
जालाश्म |
अरगटामीन, अरगक्रिस्टीन, अरगसीन, अरगकोनीन इ. अल्कलॉइडे. |
गर्भाशय संकोचक, अर्धशिशी, डोकेदुखी, संधिज्वर. |
डिजिटॅलीस (डिजिटॅलीस पुर्पुरिया) |
वाळलेली पाने |
डिजिटॉक्सिन, जीटॉक्सिन, डिजॉक्सिन आणि काही ग्लायकोसाइडे. |
शक्तिवर्धक, ह्रदयसंकोचन वाढविण्यासाठी. |
अस्मानिया (एफेड्रा जिरार्डिआना) |
देठे |
एफेड्रीन |
ह्रदयउत्तेजक, दमाशामक. |
सर्पगंधा (रॉव्होल्फिया सर्पेंटिना) |
वाळलेली मुळे व साल |
रेसरपीन, अजमसलन, सर्पेंटिन |
शामक व संमोहक, रक्तदाब निरोधक. |
डाळिंब |
मुळे |
पेलेटिअरीन |
फीतकृमिनाशक. |
कोका (एरिथ्रोझायलॉन कोका) |
पाने |
कोकेन, सिन्नमाइलकोकेन इ. अल्कलॉइडे. |
स्थानिक संवेदनाहारक. |
काळा दाणा (आयपोमिया हेडेरॅसिया) |
वाळलेल्या बिया |
फायसोस्टिग्मीन |
डोळ्याची बाहुली आकुंचित करणारे. |
जाबोरंडी |
पाने |
पिलोकारपीन |
डोळ्याची बाहुली रुंदावणारे |
चहा डायास्कोरिया वंशातील |
पाने |
कॅफीन |
उत्तेजक |
पेपरमिंट (मेंथा पायपेरेटा |
पाने व खोड |
मेंथॉल |
सर्दी, डोकेदुखी, मूत्रल. |
किरमाणी ओवा (आर्टेमिसिया मॅरिटिमा) |
पाने व फुले |
सँटोनीन |
जंतनाशक. |
मोरी नावाच्या माशाच्या यकृतात असणारे तेल निष्कर्षण करून काढतात. या तेलात अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. यीस्ट व काही बुरशी यांमध्ये सापडणारे अरगस्टेरॉल हे रसायन वेगळे करून त्यावर जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांची विक्रिया करून ड२ जीवनसत्त्व तयार करतात. लोकरीतील चरबी किंवा जनावराच्या मणक्यातील कोलेस्टेरॉल हे रसायन अलग करून त्यावर काही रासायनिक प्रक्रिया करून ड३ जीवनसत्त्व तयार करतात.
खाण्यासाठी मारण्यात आलेल्या प्राण्यांच्या, तसेच शार्क, कॉड इ. माशांच्या यकृताचे बारीक बारीक तुकडे करून ते ८०० से. ला चार तासांपर्यंत पाण्यात ठेवतात. नंतर ते गाळून मिळालेला विद्राव आटवितात, या रीतीने मिळालेल्या विद्रावाचा टॉनिक (शक्तिवर्धक) म्हणून पंडुरोगात (ॲनिमियात) उपयोग करतात. ह्या विद्रावात अल्कोहॉल मिसळून व त्यातून प्रथिने काढून टाकून राहिलेल्या भागाचे शुद्धीकरण करून अंत:क्षेपणे तयार करतात. हेपारीन हे गाईचे यकृत व फुप्फुसे यांपासून बनवितात. त्याचा उपयोग रक्ताधानात (शिरेतून रक्त देण्याच्या क्रियेत) सायट्रेटाऐवजी करतात.
खाटिकखान्यात मारलेल्या प्राण्यांच्या शरीरातील ग्रंथींपासून इन्शुलीन, ऑक्सिटोसीन, व्हॅसोप्रेसीन, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोने (एसीटीएच), लिंग हॉर्मोने, ॲड्रेनल कॉर्टेक्स हॉर्मोने इ. हॉर्मोने अंत:क्षेपणांच्या स्वरूपात तयार करतात [→ ग्रंथिद्रव्य उत्पादने].
हृदय-स्नायूंचे अर्क हे भ्रूणावस्थेतील गाईच्या वासराच्या हृदयापासून तयार करतात. त्याचा उपयोग हृद्शूल (हृदयातील तीव्र वेदना), हायपर कोरेस्टेरोलेमिया (रक्तामध्ये कोलेस्टेरॉल या पदार्थांचा जादा साठा होणे), कार्डियाक अरिथमिया (हृदयाच्या ठोक्यांचा अनियमितपणा) या विकारांत करतात.
खनिज औषधे : बऱ्याच खनिज द्रव्यांचा किंवा त्यापासून बनविलेल्या कार्बनी व अकार्बनी संयुगांचा उपयोग औषधे म्हणून पूर्वीपासून करण्यात आला आहे. सामान्यत: तांबे, चांदी, सोने, शिसे, लोह, जस्त, गंधक, पारा यांची कार्बनी-अकार्बनी संयुगे तसेच चिकणमाती, संगजिरे, कॅल्शियम फॉस्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट इ. संयुगांचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
संश्लेषित औषधे : काही नैसर्गिक औषधिद्रव्ये दुर्मिळ झाल्याने ती संश्लेषणाने तयार करण्यात येऊ लागली. विसाव्या शतकात विशेषत: १९४० नंतर अशी बरीच औषधे संश्लेषण पद्धतींनी तयार करण्यात आली. ती नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या औषधिद्रव्यांपेक्षा स्वस्त व वापरण्यास सोईची असल्याने त्यांचा वापर फार जलद झाला. संमोहके, वेदनाशामके, ज्वरशामके, शायके (गुंगी आणणारी), मूत्रले (लघवीचे प्रमाण वाढविणारी), हिवतापविरोधी औषधे इ. विविध प्रकारची औषधे हल्ली संश्लेषणाने तयार केली जातात.
प्रतिजैव औषधे : दुसऱ्या महायुध्दानंतर प्रतिजैव पदार्थांविषयीची माहिती, त्यांची निर्मिती व उपयोग यांसंबंधी मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. सध्या जास्त प्रमाणात वापरात असलेली प्रतिजैव औषधे म्हणजे पेनिसिलीन, स्टेप्टोमायसीन, ऑरिओमायसीन, क्लोरोमायसेटीन, टेरामायसीन इ. औषधे मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात. ही औषधे तयार करताना सामान्यत: किण्वन (सूक्ष्मजीवांच्या क्रियेने आंबविणे), गाळण, निष्कर्षण व शुद्धीकरण या प्रक्रियांचा उपयोग केला जातो [→ प्रतिजैव पदार्थ].
जैव पदार्थ : प्राणी, सूक्ष्मजंतू किंवा व्हायरस यांच्यापासून मिळविण्यात येणाऱ्या पदार्थांचा उपयोग चिकित्सक (उपचारांकरिता), प्रतिबंधक किंवा नैदानिक (निदान करण्यासाठी) म्हणून करतात. टॉक्सिने (विषे), प्रतिटॉक्सिने (प्रतिविषे), टॉक्साइडे (विषारी पदार्थांवर प्रक्रिया करून मिळालेले व विषारीपण कमी झालेले पदार्थ), सूक्ष्मजीव व व्हायरस यांच्यापासून तयार केलेल्या लशी, ॲलरजिने (ज्यांच्यामुळे ॲलर्जी होते असे पदार्थ) व रक्तापासून मिळविलेल्या पदार्थांना जैव पदार्थ असे म्हणतात. ज्यांच्यापासून असे पदार्थ तयार करण्यात येतात, अशा सूक्ष्मजंतूंचे संवर्धन (वाढ) तसेच काही प्राण्यांची पैदास काही संस्था करतात. संवर्धन केलेल्या सूक्ष्मजंतूंचे परिरक्षण करण्यासाठी शीत-शुष्क (गोठणबिंदूच्या खाली थंड करून कोरड्या करण्याच्या) पद्धतीचा उपयोग करतात [→ जैव पदार्थ].
औषधांची प्रचलित स्वरूपे : सध्या उपलब्ध असलेली औषधिद्रव्ये जवळजवळ पन्नासाहून अधिक विविध स्वरूपात वापरली जातात. चपटी गोळी, गोल गोळी, चूषिका, पूड, जिलेटीनवेष्ट (कॅपसूल), एलिक्झिर, अर्क, द्रव अर्क, टिंक्चर, पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांचे मिश्रण), निलंबने (द्रवात लोंबकळणाऱ्या घन कणांच्या स्वरूपाचे), विद्राव, धावन (लोशन), पाक (सायरप), मिश्रणे, अंत:क्षेपणे, फवारे, वातविलेप (श्वसनाद्वारे आत घेण्यासाठी सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतर करता येणारा विद्राव), मलमे, अंत:स्थापित घन पदार्थ इ. विविध स्वरूपे जास्त प्रमाणात वापरली जातात.
गोळी : सूक्ष्म स्थितीतील चूर्ण, स्फटिक किंवा कण, दाबाने एकत्र करण्यात येऊन तयार झालेल्या आकारास गोळी म्हणतात. सामान्यत: चपटी गोळी (टॅबलेट), गोळी (पिल) व चूषिका (लोझेंज, ट्रोके, पॅस्टिल) हे प्रकार मात्रेची अचूकता, औषधिद्रव्यांची स्थिरता, घेण्याची सुलभता इ. गुणांमुळे जास्त प्रमाणात वापरले जातात. गोळ्या ह्या लहान व गोलसर किंवा अंडाकृती आकाराच्या असून त्यांचा मध्यभाग कठीण, मृदू किंवा चूर्णरूपी असतो. यांवर साखरेचे किंवा चॉकोलेटचे वेष्टन असते. चूषिका ह्या तोंडात ठेवून चघळावयाच्या गोळ्या असून त्या तोंडात ठेवताच हळूहळू विरघळतात व त्यांतील औषधिद्रव्ये शरीरात भिनतात. सर्व प्रकारच्या गोळ्या तयार करताना त्यांमध्ये औषधिद्रव्ये त्यांच्या मात्रेचे परिमाण कमी करण्यासाठी लॅक्टोज, केओलीन, साखर इ. विरलके ( औषधांचे परिणाम कमी करणारे पदार्थ), साखर, ग्लुकोज विद्राव, जिलेटीन, डिंक, पाणी इ. बंधके (घटक पदार्थ एकत्र जोडणारे पदार्थ), रंग, स्वादयुक्त पदार्थ इ. पदार्थ वापरतात. ही सर्व द्रव्ये एकत्र करून नुसत्या दाबाने किंवा साच्यात दाबून गोळ्या तयार करतात. ह्या वेष्टनरहित किंवा वेष्टित असतात. वेष्टनरहित गोळ्यांत चूषिका, पॅलेट इ. गोळ्यांचे प्रकार येतात. वेष्टित गोळ्यांना साखर, सेल्युलोज, इतर शुष्क पदार्थ (अनेक थरांतील) इत्यादींचे वेष्टन असते. काही गोळ्या अंत:क्षेपणासाठी तयार करतात. त्या निर्जंतुक स्थितीत बनवितात.
जिलेटीनवेष्ट (कॅपसूल) : गोळ्यांच्या खालोखाल हा प्रकार वापरला जातो. यामध्ये बंधक वापरत नाहीत. याचे कडक जिलेटीनवेष्ट व मृदू जिलटीनवेष्ट असे दोन प्रकार आहेत. कडक जिलेटीनवेष्ट दोन भागांत तयार करतात. एक भाग दुसऱ्या भागावर सरकवून बसवितात. हा प्रकार अगोदर तयार करून नंतर त्यात औषधिद्रव्ये भरतात. मृदू जिलेटीनवेष्ट बनविताना ग्लिसरीन व जिलेटीन वापरतात. वाळल्यावरही त्यात आकार्यता (आकार धारण करण्याची क्षमता) असते. हा प्रकार आधी करीत नाहीत, तर औषधिद्रव्ये तयार करताना त्याचा एक भाग म्हणून तयार करतात. दोन्ही प्रकारातील जिलेटीनवेष्टनात घनरूप किंवा द्रवरूप औषधिद्रव्य भरतात. जिलेटिनाचे वेष्टन विरघळून जाते व मग औषधिद्रव्य शरीरात पसरते.
द्रव औषधे : यांमध्ये विद्राव, पाक, एलिक्झिर, निलंबने, पायसे इ. औषधी प्रकारांचा समावेश होतो. एलिक्झिर म्हणजे जलअल्कोहॉलीय विद्रावातील गोड व स्वादिष्ट पदार्थयुक्त औषधिद्रव्य. याचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारात स्वाद व वाहक यांचा वापर केलेला असतो, तर दुसऱ्या प्रकारात औषधिद्रव्याचे प्रमाण जास्त असते. अर्क हे नैसर्गिक (वनस्पती व प्राणी) साधन-सामग्रीपासून विद्रावकांच्या साहाय्याने बनवितात. अर्क व अकार्बनी संयुगे यांच्यापासून अल्कोहॉलाच्या साहाय्याने टिंक्चरे तयार करतात. एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन विद्रावांपैकी जेव्हा एका विद्रावाचे अतिसूक्ष्म थेंब दुसऱ्या विद्रावाला पूर्णपणे व्यापतात तेव्हा तयार होणाऱ्या नव्या विद्रावाला पायस म्हणतात. यासाठी पायसीकारक वापरतात. पायसे कातडीवर लावण्यासाठी वापरतात. अविद्राव्य पदार्थांच्या निलंबन (लोंबकळत असलेल्या) स्वरूपातील घट्ट जलीय मिश्रणास धावन म्हणतात. कायम स्वरूपाच्या धावनासाठी निलंबनकारक किंवा पृष्ठ क्रियाकारक (द्रवांच्या पृष्ठताणात बदल घडवून आणणारे पदार्थ) वापरतात. ही शरीरास बाहेरून लावतात. घन, द्रव किंवा वायू स्वरूपातील, अतिसूक्ष्म कणांच्या विसरणास (दोन पदार्थांचे रेणू एकमेकांच्या मोकळ्या जागेत जाऊन आपोआप मिसळण्याच्या क्रियेस) निलंबन म्हणतात. ह्यातील विसरण कायम स्वरूपाचे नसते. स्थिर ठेवल्यास कण निवळतात व निलंबनासाठी ते परत हलवावे लागते. औषधी विद्राव हे औषधिद्रव्य व इतर पदार्थ पाण्यात किंवा योग्य अशा दुसऱ्या विद्रावकात विरघळवून तयार करतात. तयार झालेल्या विद्रावाची विद्रावकाशी विक्रिया होणार नाही असा विद्रावक निवडतात. ते पोटात घेण्यासाठी व बाहेरून लावण्यासाठी वापरतात. साखरेच्या संहत विद्रावात औषधिद्रव्य तसेच स्वाद व वासयुक्त पदार्थ घालून तयार केलेल्या विद्रावास पाक असे म्हणतात.
काचेचे अस्तर लावलेल्या किंवा निष्कलंक पोलादी (स्टेनलेस स्टीलच्या) पात्रात वरील प्रकार तयार करतात. पट्टगाळणीतून दाबाखाली विद्राव गाळून घेऊन ते टाकीत ठेवतात व योग्यवेळी भरण्यासाठी घेतात. यावेळी काही भागाचे विश्लेषण करतात व त्याच्या भौतिकीय वैशिष्ट्यांचे नियंत्रण करतात. सर्व प्रकारांत योग्य परिरक्षक पदार्थ घालून बुरशींची व सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते. काही वेळा ते निर्जंतुक करतात. निलंबने व पायसे बनविण्याच्या पद्धती वरीलप्रमाणेच असून साध्या मिश्रणाचे विसरण करून मग ते कलिल चक्कीतून (पायस वा खळ यांसारख्या पदार्थांचे अतिसूक्ष्म कण करणाऱ्या चक्कीतून) नेतात किंवा श्राव्यातीत ध्वनीचा (ऐकू येणाऱ्या ध्वनीच्या कंप्रतेपेक्षा म्हणजे दर सेकंदास होणाऱ्या कंपन संख्येपेक्षा अधिक कंप्रता असणाऱ्या ध्वनीचा) उपयोग करतात.
मलमे: अर्धघन व स्निग्ध स्वरूपातील औषधिद्रव्ये. ही बाह्य उपचारांसाठी वापरतात. हल्ली मलमांमध्ये काही औषधी क्रीमांचाही अंतर्भाव केला जातो. मलमासाठी पेट्रोलॅटम (खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून मिळणारा जेलीसारखा पदार्थ) हा पदार्थ आधार पदार्थ म्हणून वापरतात. हा पदार्थ प्रथम वितळवितात व त्यात औषधिद्रव्ये घालून थंड करतात व नंतर विशिष्ट चक्क्यांत (रोलर, उच्चगती, कलिल इ. चक्क्यांत) दळून डब्यांत भरतात.
अंत:स्थापित घन पदार्थ : गुदमार्ग, योनिमार्ग व मूत्रमार्ग यांच्यामध्ये ठेवावयाचा औषधी घन पदार्थ. हे पदार्थ शरीराच्या तापमानाला वितळतात व त्यांतील औषधांचे कार्य सुरू होते. कोकोबटर, खोबरेल तेलाचे बरेच अनुजात (एका संयुगापासून बनलेली दुसरी संयुगे), पॉलिएथिलीन ग्लायकॉल यांसारखे शरीर तापमानाला वितळणारे पदार्थ आधार म्हणून वापरतात. ते प्रथम वितळवून त्यांत औषधिद्रव्य मिसळतात व ते पूर्वी थंड केलेल्या साच्यात ओततात. हे यंत्राने किंवा हाताने तयार केले जातात.
वातविलेप : कलिल (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेले विशिष्ट प्रकारचे मिश्रण) स्वरूपातील अतिसूक्ष्म द्रव किंवा घन औषधाच्या कणांचे वायूत किंवा वायुवेष्टित स्वरूपात अपस्करण (विखुरणे) म्हणजे वातविलेप होय. यासाठी वापरण्यात येणाऱ्या पात्रातील पदार्थ द्रवरूप किंवा संपीडित (दाबयुक्त) वायूमुळे बाहेर पडतात. हे पदार्थ हुंगण्यासाठी व नाकाघशात फवारण्यासाठी वापरतात. प्ल्युओरीनयुक्त हायड्रोकार्बने यासाठी परिचालक (पुढे ढकलणारा) पदार्थ म्हणून वापरतात. परिचालक व औषधिद्रव्य यांचे मिश्रण एकदम थंड करून बाष्पदाब कमी करतात. नंतर हा विद्राव योग्य भांड्यात भरतात व झडपा बसवून भांडे बंद करतात. सामान्यत: सर्व प्रक्रिया निरार्द्र (बाष्परहित) स्थितीत करतात. दोषयुक्त भांडी शोधून काढण्यासाठी ती पाण्यात ठेवतात.
डोळ्यांची मलमे व विद्राव : डोळ्यांसाठी वापरावयाची मलमे बहुधा मऊ पॅराफिनामध्येच बनवितात. औषधिद्रव्यांची चूर्णे अतिसूक्ष्म असावी लागतात. पॅराफीन १५००से. तापमानाला तापवून जंतुरहित करतात. नंतर मिश्रण भांड्यात गाळून घेतात. द्रव स्थितीत असतानाच त्याच्यात अतिसूक्ष्म चूर्ण टाकून ढवळतात. घन स्थिती प्राप्त होऊ लागताच ढवळणे बंद करतात. संपूर्ण गोठलेले मलम यंत्राच्या साहाय्याने निर्जंतुक केलेल्या नळ्यांत भरतात. डोळ्यांत टाकावयाचे विद्राव जंतुरहित असावे लागतात. ते बनविण्याच्या पद्धती अंत:क्षेपणे बनविण्यासारख्याच आहेत.
अंत:क्षेपणे : औषधिद्रव्यांचा परिणाम त्वरित व्हावा म्हणून ती द्रवरूपात पिचकारीच्या साहाय्याने प्राणिमात्रांच्या शरीरात टोचतात. ह्या औषधी प्रकारांना अंत:क्षेपणे म्हणतात. ती अधस्त्वचीय (त्वचेखाली), आंतरस्नायू (स्नायूंत टोचून), आंतरनीला (नीलेत टोचून), अंत:पुर्यदरी (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या थरात टोचून), आंतर आवरणीय (इंद्रियांवरील आवरणांत टोचून) इ. मार्गांनी देतात. त्यांची सूत्रे ती देण्याच्या मार्गांवर अवलंबून असतात. ज्या मार्गांसाठी अंत:क्षेपण तयार केलेले असेल त्या मार्गाने ते न दिल्यास जीविताला धोका संभवतो.
जलीय अंत:क्षेपणे : औषधिद्रव्यांचे ताज्या ऊर्ध्वपातित पाण्यात विद्राव करतात. ह्यांत वापरावयाचे पाणी अतिशुद्ध व पायरोजेनरहित (शरीरात अंत:क्षेपित केले असता शरीराचे तापमान वाढविणाऱ्या सूक्ष्मजीवजन्य विषारी पदार्थांनी युक्त नसलेले) असावे लागते. काचेच्या किंवा कागदाच्या गाळणीतून स्वच्छ शिश्यांत किंवा कुप्यांत ते यंत्राने भरतात. कुप्या ज्योतीने बंद करतात, तर शिश्या रबराच्या बुचाने वा झाकणाने बंद करतात. वाफेच्या सान्निध्याने १२०० से. तापमानाला अर्धा तासपर्यंत ठेवून त्यांतील रोगजंतूंचा नाश करतात. ग्लुकोज-सलाइन व कॅल्शियम ग्लुकोनेट ह्या पद्धतीने बनवितात.
जी द्रव्ये उष्ण तापमानात अस्थिर असतात अशा द्रव्यांचे विद्राव काचेच्या किंवा ॲस्बेस्टसच्या गाळणीतून गाळून रोगजंतुरहित करतात. ह्या विद्रावात पूतिरोधके (पू तयार करणाऱ्या सूक्ष्मजंतूंची वाढ खुंटविणारे किंवा त्यांचा नाश करणारे पदार्थ) टाकावी लागतात. विद्रावाच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्व वस्तू निर्जंतुक कराव्या लागतात. विद्राव कुप्यांमध्ये किंवा शिश्यांमध्ये रोगजंतुरहित वातावरणात भरावे लागतात. जीवनसत्त्वांची अंत:क्षेपणे ह्या पद्धतीने बनवितात.
तेलात बनविलेली अंत:क्षेपणे : तिळाचे तेल, भुईमूगाचे तेल, सरकीचे तेल, एथिल ओलिएट इ. तेले, अ जीवनसत्त्व, ड जीवनसत्त्व, प्रोकेन पेनिसिलीन, लिंग हॉर्मोने इत्यादींची अंत:क्षेपणे बनविण्यासाठी वापरतात. तेले १५०0से. तापमानाला एका तासाहून अधिक काळपर्यंत तापवून जंतुरहित करतात. नंतर जंतुरहित औषधिद्रव्ये त्यांत मिसळवून गाळतात व ते जंतुरहित बाटल्यांतून भरतात. पेनिसिलीन तेलामध्ये विरघळत नसल्यामुळे त्याचा विद्राव गाळता येत नाही व म्हणून हे अंत:क्षेपण बनविण्यास अधिक काळजी घ्यावी लागते.
कोरडी अंत:क्षेपणे : प्रतिजैव द्रव्ये पाण्याच्या सान्निध्यात बराच वेळ ठेवल्यास त्यांचे औषधी गुणधर्म नाहीसे होतात म्हणून ही द्रव्ये कोरड्या स्थितीत भरून विकतात. ह्यांच्या सूत्रांमधील सर्व द्रव्ये चाळणीतून चाळतात. नंतर दळण यंत्रांनी अतिसूक्ष्म कण बनवून मिश्रणभांड्यात त्यांचे मिश्रण करून जंतुरहित जागेत यंत्राच्या साहाय्याने बाटल्यांत भरतात. या बाटल्या रबराच्या बुचांनी बंद करून ॲल्युमिनियमाच्या झाकणांनी बंद करतात. निर्जंतुकीकरणाची कोणतीही पद्धत ह्या अंत:क्षेपणांना वापरता येत नाही, म्हणून सर्व द्रव्ये, सर्व उपकरणे व वातावरण मूलत:च जंतुरहित असावी लागतात. अती कोरड्या हवेतच ह्या प्रक्रिया करावयाच्या असतात.
शीत-शुष्क पद्धतीने बनविलेली अंत:क्षेपणे : यांत औषधिद्रव्ये पाण्यात विरघळवून गाळण्याने जंतुरहित करून बाटल्यांतून भरतात. तापमान ००से. खाली उतरवून आतील विद्राव गोठवितात. या गोठवलेल्या स्थितीत बाष्पीभवनाने पाणी काढून टाकतात. कोरड्या झालेल्या द्रव्यांच्या बाटल्यांना बुचे व ॲल्युमिनियमाची झाकणे लावून बंद करतात. निर्जलीकृत मानवी रक्तद्रव ह्या पद्धतीनेच बनवितात. अंत:क्षेपणामध्ये वापरावयासाठी लागणारी काही प्रतिजैव द्रव्ये ह्या पद्धतीनेच जंतुरहित करतात.
औषधांचे धारक, भरणक्रिया व आवेष्टन : पूड, गोळ्या, वड्या, जिलेटीनवेष्ट, द्रव इ. स्वरूपांत औषधे बाजारात मिळतात. औषध कोणत्याही स्वरूपात असले तरी ते तयार करताना ज्याप्रमाणे सर्व संबंधित सामग्री अगदी स्वच्छ व निर्जंतुक करून वापरावी लागते त्याचप्रमाणे औषध ज्या धारकातून विक्रीला पाठवावयाचे तो तसाच स्वच्छ व निर्जंतुक केलेला असला पाहिजे.
धारकांचे प्रकार : काचेचे धारक बहुतेक बाटल्यांच्या स्वरूपात असतात. औषध पातळ अगर घट्ट असेल त्याप्रमाणे बाटलीचे तोंड लहान वा मोठे ठेवतात. औषध पिठाच्या किंवा दाणेदार स्वरूपात असल्यास त्यासाठी बरण्याच वापरण्याची पद्धत आहे.
धारकाच्या काचेचे तिच्या अम्ल- व क्षार-रोधी (अल्कली-रोधी) शक्ती वगैरे गुणधर्मांवरून चार प्रकार केले जातात. साध्या (सोडा-लाइम) काचेच्या मानाने बोरोसिलिकेट काचेवर जलीय विद्रावांचा परिणाम बराच कमी होतो. प्रकाशाचा परिणाम ज्या औषधांवर होतो त्यांच्यासाठी तपकीरी रंगाच्या काचेच्या बाटल्या वापरतात. बाटल्यांचा सर्वसाधारण आवडता आकार म्हणजे चौकोनी. या आकारात त्यांच्या साठवणाला व वाहतुकीला कमीत कमी जागा लागते. बनावटीच्या दृष्टीने मात्र गोल आकार सोईचा असतो. धारकाचे आकारमान (घनफळ) आतील औषधाच्या मानाने फार मोठे असता कामा नये. पण औषध हलवून घ्यायचे असेल, तर हलविण्यासाठी आत जरूर तेवढी रिकामी जागा राहील एवढे आकारमान मोठे असले पाहिजे.
बाटलीच्या तोंडावर, एवढेच नव्हे तर बाटलीच्या मानेवरही, बाटली बनवतानाच बाहेरून आटे केलेले असतात. आट्यावर ऊष्मादृढ (उष्णतेने घट्ट होणाऱ्या) प्लॅस्टिकची बुचे बसवतात. पण अशी बुचे गळबंद नसतात. गळबंदीसाठी बुचाला आतून वायसर घातलेला असतो. हा पुठ्ठ्याचा किंवा भेंडाच्या बुचाचा करतात पण द्रवाच्या बाजूला प्लॅस्टिक, मेण किंवा तसाच दुसरा एखादा पदार्थ लावलेला कागद, प्लॅस्टिक किंवा अपाय न करणाऱ्या धातूच्या वर्खाचा (अतिशय पातळ पत्र्याऱ्याचा) तुकडा बसवतात. वायसर आकाराने जरा मोठा असतो व दाबून बसवला की सहसा पडत नाही. पॉलिएथिलीन व व्हिनिलाइट यांचे वायसर सध्या जास्त प्रचारात येत आहेत. याच पदार्थांचे पेल्याच्या आकाराचे व बाटलीच्या तोंडातून आत जाणारे पण बाटलीच्या तोंडाच्या कडेवर बसणारा काळ असलेले वायसरही प्रचारात आले आहेत. हे वापरले तर फिरकीच्या बुचांना आतून निराळे वायसर लावावे लागत नाहीत. जेव्हा औषधे परदेशात किंवा दूर अंतरावर पाठवावयाची असतात तेव्हा बाटलीला एक भेंडाचे बूच जादा आत दाबतात.
पत्र्याची पण गळा असलेली बुचेही औषधांच्या धारकासाठी वापरात आली आहेत. मुळात यांना बिनकाठाच्या पंचपात्रीचा आकार असतो. वरीलपैकी एखाद्या प्रकारचा वायसर घालून तो बाटलीच्या मळसूत्री तोंडावर ठेवतात व बाटली यंत्रात ठेवून त्या बुचावर दाब देउन आट्याच्या आकाराचे रूळ फिरवतात.त्यामुळे बुचावर बाटलीत बसणारे आटे तयार होतात, खालच्या बाजूने पत्रा वळवला जाऊन बूच न निघण्यासारखे बसते व खालच्या कडेच्या थोडे वर पत्र्याऱ्यावर एक अर्धवट चीर पाडली जाते. बूच उलटे फिरविले असता या चिरेवर बुचाचा पत्रा कापला जाऊन वरचा भाग वरपर्यंत फिरविता यावा व बाटलीचे तोंड मोकळे व्हावे असा या रचनेत उद्देश असतो. पण या बुचासाठी विशिष्ट धातूचा, विशिष्ट जाडीचा व गुणधर्मांचा पत्रा लागतो व आटे घडविणारे यंत्रही सुस्थितीत असावे लागते. तसे नसल्यास बूच चिरेवर फाटत नाही व आटे मात्र खराब होतात. ही बुचे धारकातील पदार्थात कोणालाही ढवळाढवळ न करू देणारी अशी असतात. अशी पत्र्याऱ्याची बुचे प्रचारात येण्यापूर्वी साधे भेंडाचे बूच किंवा वरील प्रकारचे ऊष्मादृढ प्लॅस्टिकचे आट्याचे बूच बाटलीला लावून त्यावरून सुरकुत्या पाडलेल्या (क्रेप) कागदाची एक टोपी चिकट पदार्थाने घट्ट बसवीत असत. ती एकदा काढली, तर लगेच समजून येत असे व त्यामुळे बाटलीतील पदार्थात ढवळाढवळ किंवा भेसळ करणे शक्य होत नसे. अजूनही अशा कागदी टोप्या काही प्रमाणात प्रचारात आहेत.
अंत:क्षेपणासाठी वापरावयाच्या शिश्या व कुप्या चांगल्या प्रतीच्या रोधक बोरोसिलिकेट काचेच्या करतात. या काचेवर आतील विद्रावाचा परिणाम बऱ्याच कमी प्रमाणात होतो व निर्जंतुकीकरणात वापरावयाच्या तापमानात व दाबात ती वेडीवाकडी होत नाही. अंत:क्षेपणांच्या शिश्या व कुप्या हवाबंद कराव्या लागतात. कुपीतील अंत:क्षेप्यद्रव्य एका वेळेपुरते सुईने काढून घेतले तरी उरलेले निर्जंतुकच राहावे अशा तऱ्हेचे कुपीला बूच लावावे लागते. सामान्यत: हे योग्य प्रकारच्या रबराचे असते (सुईने औषध काढून घेतल्यावर भोक पुन्हा आपोआप बंद व्हावे म्हणून), त्याला व कुपीला मिळून एक ॲल्युमिनियमाच्या पातळ पत्र्याऱ्याचे कडे दाबून घट्ट बसविलेले असते. त्यामुळे औषध काढून घेताना व घेतल्यावरही बूच सैल न पडल्याने त्याचे निर्जंतुकत्व बिघडत नाही.
अंगाला चोळण्याची किंवा नाक, डोळे यांना लावण्याची मलमे व लापशीसारखी (पेस्टसारखी) औषधे नरम पत्र्याऱ्याच्या नळ्यांतून विकण्याची पद्धत बरीच जुनी आहे. नळ्यांसाठी ॲल्युमिनियम व कथिल वापरतात. पुष्कळदा कथिलात थोड्या प्रमाणात तांबे किंवा अन्य धातू काठिण्य आणण्यासाठी मिसळतात. नळ्या वापरताना आतील पदार्थाचा पत्र्याऱ्यावर किंवा उलटही, काही विपरित परिणाम होईल की काय याचा विचार करावा लागतो. जर तशी शक्यता भासली तर पत्र्याऱ्याला आतून तसा परिणाम टाळू शकणाऱ्या पदार्थाचा लेप देतात. नळ्यांची बुचे पूर्वी धातूची करीत पण दुसऱ्या महायुध्दानंतर ती सर्रास प्लॅस्टिकची करतात. नळीला बूच लावूनच औषध नळीत भरतात व टोकाचा पत्रा दुमडून ते बंद करतात. ही क्रिया हाताने किंवा यंत्राने करता येते.
कोरड्या पुडीसाठी सामान्यत: बाटल्या वापरतात, पण फार मोठी राशी असेल तर काचेच्या बरण्या किंवा पत्र्याऱ्याचे डबे वापरतात. काही वेळा याच कामासाठी वनस्पती धाग्यांच्या पुठ्ठ्याचेही डबे वापरले जातात. त्यांचे तळ व झाकणे ही मात्र पत्र्याऱ्याचीच करावी लागतात. काचेचे व पत्र्याऱ्याचे धारक हवाबंद करता येतात तसे हे पुठ्ठ्याचे धारक मात्र हवाबंद करता येत नाहीत.
गोळ्या, वड्या इ. एका दुहेरी कागदाच्या किंवा नरम धातूच्या वर्खाच्या पानाने वेष्टित करणे रूढ झाले आहे. काही वेळा एक किंवा दोन्ही कागद सेलोफेनचे (पारदर्शक) असतात. दुसऱ्या एखाद्या प्रकारचे पण अपारदर्शक कागद वापरले तरी ते निर्जंतुक व त्यांतून हवेतील जलांश आतील औषधापर्यंत पोहोचणार नाही अशा तऱ्हेने केलेले असतात. अशा एका पानात सामान्यत: दहा वड्या किंवा गोळ्या इ. भरलेल्या असतात. या पद्धतीचा फायदा म्हणजे जरूर नसताना पुष्कळ वड्या (५० – १०० ची बाटली) घ्याव्या लागत नाहीत व गुण आल्यानंतर उरलेल्या (बाटली घेतल्यास) फुकट जाण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय बाटलीतील गोळ्या काढून घेताना त्यांचा हवेशी थोडाफार संपर्क येतो व काही कालाने गोळ्या फुकट जाण्याचा संभव असतो. वरील प्रकारच्या पानातील गोळ्या किंवा वड्या वापरताना एका वेळी एकच वापरता येते व पानातील इतर गोळ्यांचा हवेशी संबंधच येत नाही. वड्या-गोळ्या पानात भरण्याचे काम यंत्रावर होते. जो भाग वड्यांशिवाय मोकळा असतो तेथे गोंद किंवा अन्य चिकट पदार्थ लावला जातो. तसेच योग्य ठिकाणी वड्या ठेवल्या जातात व वर दुसरा कागद यंत्रावर दाबला जातो. या क्रियेत वडी अगदी कमीत कमी जागेत हवाबंद स्थितीत ठेवली जाते. औषधासंबंधीची आवश्यक ती माहिती पानावरच किंवा ती पाने एका पुठ्ठ्याच्या उघड्या पाकिटात घालून त्यावर ही माहिती छापतात [→ आवेष्टन].
भरणक्रिया : औषध धारकात भरण्यापूर्वी धारक स्वच्छ करून घ्यावे लागतात. याबद्दलचे नियम कडक व काटेकोर केलेले असतात. औषध घेणाऱ्या रोग्याच्या संरक्षणासाठीच नव्हे तर धारकात अगदी किंचित जरी सदोष (बाह्य) पदार्थ राहिला, तरी तो सबंध पदार्थांच्या नाशास कारणीभूत ठरू शकतो. म्हणून औषधनिर्मात्याच्या हितासाठीही हे नियम आवश्यक आहेत. पोटात घ्यावयाच्या औषधांच्या बाटल्या वगैरे त्यांत औषध भरण्यापूर्वी अम्ल, क्षार वगैरेंनी धुतल्यावर साध्या पाण्याने पुन्हा धुतात व मग गरम हवेने वाळवतात. अंत:क्षेपणे भरावयाच्या शिश्या, कुप्या वरीलप्रमाणे स्वच्छ केल्यावरही पायरोजेनरहित पाण्याने धुवून मग वाळवतात. इतर प्रकारचे धारकही दाबयुक्त गरम हवा इ. योग्य पद्धतींनी स्वच्छ करून घ्यावे लागतात.
द्रव औषध बाटल्यांत भरण्याच्या यंत्रांच्या पुढील जाती आहेत : निर्वात, गुरुत्व, वक्रनलिका, वजन व व्याप (घनफळ). पण यांपैकी दोन वा अधिकांची मिश्र पद्धती व्यवहारात जास्त करून वापरावी लागते. यांत्रिक रीतीने धारक भरण्याच्या दोन पद्धती आहेत. तोंड खाली करून व तोंड वर ठेवून. पहिली पद्धत मलमासारख्या घट्ट औषधासाठी व दुसरी पातळ पदार्थांसाठी योग्य असते. ज्या ठिकाणी औषधाचे महोत्पादन करण्यात येते तेथे यांत्रिक वाहकावर साखळीपद्धतीने अथपासून इतिपर्यंत सर्व क्रिया स्वयंचलित होण्याची व्यवस्था असते.
कोरडी औषधे भरण्याची यंत्रे वजन, व्याप अथवा गणन यांवर आधारलेली असतात. वजन पद्धती पीठ किंवा दाणेदार औषधांसाठी, व्याप पद्धती सहज सरकणाऱ्या दाण्यांसाठी व तिसरी पद्धती गोळ्यांसाठी व वड्यांसाठी (बाटलीत किंवा डबीत भरताना) वापरतात. औषध भरून झाल्यावर धारकाच्या तोंडापासची मोकळी जागा निर्जंतुक कापसाने भरून काढतात. औषधाला चमत्कारिक अप्रिय वास येत असेल तर तो लपविण्यासाठी या कापसावर व्हॅनिला किंवा दुसरा एखादा सुगंधी पदार्थ थेंबभर टाकतात.
लेबल लावणे व आवेष्टन : औषध अधिनियमानुसार प्रत्येक पेटंट औषधाच्या धारकावर म्हणजे ज्यात प्रत्यक्ष औषध आहे त्यावर (बाटली, डबी, पान वगैरे), तसेच ती बाटली जर कागदाच्या खोक्यात घातलेली असेल तर त्यावरही, जरूर ती सर्व माहिती दिलेले लेबल लावले पाहिजे. घाऊक विक्रीच्या मोठ्या खोक्यावर मात्र असे लेबल लावले नाही तरी चालते. तेथे फक्त औषधाचे नाव व उत्पादकाचे नाव व पत्ता दिल्यास पुरते. लेबलावर पुढील माहिती असणे आवश्यक असते : (१) औषधाचे नाव (मोठ्या अक्षरात), (२) औषधाचे वजन व व्याप, (३) त्यातील घटकांची नावे, गुणवत्ता किंवा शक्तिदर्शक अक्षरे वा खुणा व तयार औषधाच्या प्रती एककात त्याचे वजन वा व्याप, (४) घ्यावयाचे प्रमाण व पद्धती, (५) उत्पादकाचे नाव व पत्ता, (६) उत्पादनाचा परवाना क्रमांक, (७) उत्पादनाचा गट क्रमांक (असल्यास), (८) उत्पादनाचा महिना व वर्ष आणि (९) सुस्थितीची मुदत (महिना व वर्ष). वड्यांच्या वगैरे पानावरही माहिती छापावी लागते. तेथे निराळे लेबल लावावे लागत नाही. विषारी पदार्थ असल्यास ‘विष’ असे ठळक जागी लाल शाईने छापावे लागते. तसेच त्यात धोका गर्भित असल्यास ‘धोकादायक, फक्त वैद्याच्या सल्ल्यानुसार वापरणे’ असेही छापावे लागते. औषध बाहेरून लावावयाचे असल्यास ‘फक्त बाहेरून लावण्यासाठी’ असेही छापायला हवे.
मॉर्फीन वगैरे गुंगी आणणारी औषधे, तसेच झोप आणणारी औषधे आणि अंत:क्षेपणे ही वैद्याने आपल्या सहीशिक्क्याने लिहून दिले तरच ती गिऱ्हाइकाला विकण्याची परवानगी असते.
तपासणी : औषध त्याच्या धारकात (बाटलीत वगैरे) भरून झाल्यावर ते विक्रीसाठी बाहेर पाठविण्याआधी त्याची तपासणी व्हावी लागते. वरच्या दर्जाच्या व मोठ्या उत्पादक कंपन्यांत तपासणी करणारा एक स्वतंत्र विभागच असतो. कारखान्यात तयार होणारा पदार्थ हा माणसांना द्यावयाचा असल्यामुळे त्याचा माणसाच्या जिवाशीच प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळे या तपासणीला फार महत्त्व असते. अंत:क्षेपणांच्या बाबतीत तर या क्रियेला आणखीनच जास्त महत्त्व येते कारण ते सरळ रक्तातच जाऊन भिनायचे असते. ही तपासणी औषधाच्या सुरक्षितता, गुणवत्तेची श्रेणी आणि शुद्धता व स्वच्छता या गुणांच्या बाबतीत जशी होते तशीच धारक बंद करण्याची योजना, लेबल, आवेष्टन या बाबतींतही होते. या तपासणीत संबंधित अधिनियमातील कलमांचे पालन पूर्णपणे झाले आहे की नाही हेही पाहिले जाते.
अंत:क्षेपणांच्या शिश्या भरून त्यांची तोंडे ज्वालेने मुद्रित केल्यानंतर पुन्हा गळतीसाठी त्यांची तपासणी होते. बऱ्याचशा शिश्या एका भांड्यात ठेऊन त्यांच्या वरपर्यंत येईल इतके त्यात पाणी घालतात व भांडे एका ऑटोक्लेव्हमध्ये (विशिष्ट दाबपात्रात) ठेवतात. मग या पाण्यात एक रंगीत विद्राव सोडतात व ऑटोक्लेव्ह बंद करून त्यात दाब असलेली हवा सोडतात. जर एखाद्या शिशीचे मुद्रण पक्के झालेले नसेल तर तीत रंग शिरतो व पुढील तपासणीत ती सदोष असल्याचे चटकन समजू शकते.
अशा तऱ्हेच्या तपशीलवार तपासणीत अधिनियमानुसार औषधांची निर्मिती, धारक धुलाई व निर्जंतुकीकरण, लेबल लावणे, आवेष्टन इ. झाली आहेत याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच ती विक्रीसाठी पाठविता येतात.
नियंत्रण : तयार होणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्ता, दर्जा व समानता या गुणांना औषध उद्योगात अनन्यसाधारण महत्त्व येते. एकच उत्पादक कंपनी अनेक प्रकारची (शेकड्यांनी मोजता येण्याइतकी) औषधे तयार करीत असते. एखाद्या औषधाच्या बाबतीत सुध्दा जर थोडासा व कोठेतरी आळस व हलगर्जीपणा झाला किंवा एखादे परीक्षण राहून गेले व तयार औषध तसेच पुढे पाठवले गेले तर त्याचे भयंकर परिणाम होण्याचा संभव असतो. ही जबाबदारी ओळखून सर्व मोठे औषध उत्पादक नियंत्रणासाठी खास यंत्रणा बाळगतात. औषध कारखान्यातील नियंत्रणाचे तीन भाग होतात. उत्पादन चालू असतानाचे, प्रयोगशालेय व आवेष्टनातील. यांशिवाय सरकारी कायद्याचे नियंत्रण असतेच.
उत्पादन चालू असतानाचे नियंत्रण : निरनिराळ्या उत्पादन कंपन्यांत या नियंत्रणाच्या पद्धतीत थोडाफार फरक असण्याचा संभव असतो. पण पुढे दिलेली पद्धती ही एक सर्वसाधारण नमुना म्हणून समजता येईल. प्रथम कंपनीचा योजना विभाग संचालक मंडळाच्या अनुमतीने अमुक एक औषध बनवावे असे ठरवतो. या निर्णयानुसार एक आदेश तयार करण्यात येतो. त्यात खुणेचा अंक, औषधाचे नाव, औषधातील घटकांची नावे, वर्णन, राशी, विनिर्देश (विशिष्ट अपेक्षित गुणवत्तेचा निर्देश), ते बनविण्याच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन आणि त्यासाठी लागणारी सामग्री व यंत्रे या सर्वांबद्दल पूर्ण माहिती असते. तसेच तयार औषधांची गुणवत्ता, रंग, विशिष्ट गुरुत्व यांचीही नोंद केलेली असते. हा आदेश नियंत्रक विभागाकडे जाऊन तेथून तो कारखान्यात पोहोचल्यावर तेथील सूत्रांची हालचाल सुरू होते. कच्चा माल मागविणे, त्याची तपासणी, यंत्रसामग्रीची जुळवाजुळव व उत्पादन पद्धतीचा अभ्यास या गोष्टी हाती घेऊन उत्पादनाला सुरुवात केली जाते. औषध तयार होत असतानाच वेळोवेळी त्याची तपासणी व परीक्षणे केली जातात. कारखान्यातील उत्पादन तयार झाल्यावर कारखान्यात वेळोवेळी नोंदलेला तपशील नियंत्रक विभागाकडे आदेशासह पाठवितात. तेथे तपशिलाचा व आदेशाचा तुलनात्मक अभ्यास करून कच्चा माल, बनावट, वेळोवेळीच्या परीक्षणांचा अहवाल ही सर्व समाधानकारक ठरल्यास तयार केलेली औषधराशी आवेष्टनासाठी पुढे पाठविण्यास संमती दिली जाते.
प्रयोगशालेय नियंत्रण : या नियंत्रणात औषधी व जैव पदार्थासाठी लागणाऱ्या रासायनिक, भौतिक, सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि जीवविज्ञानीय परीक्षांचा समावेश होतो. या नियंत्रणात परीक्षणासाठी नमुने घेण्याच्या पद्धतीला अतिशय महत्त्व असते. नमुने कसे घ्यावेत यासंबंधी नियम केलेले आहेत व त्याबरहुकूम ते घ्यावे लागतात. प्रयोगशालेय काऱ्यातून पुढील चार प्रकारची माहिती मिळू शकते : (१) कच्च्या मालाचे विश्लेषण यावरून त्याची ग्राह्याग्राह्यता ठरविता येते, (२) औषध तयार होत असताना वेळोवेळी घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीवरून विधीवर नियंत्रण ठेवता येते, (३) पदार्थ तयार झाल्यावर त्याचे विश्लेषण यावरून गुणवत्ता निश्चिती आणि (४) नव्या औषधांना उपयुक्त अशी वैश्लेषिक प्रमाणे आणि पद्धती.
प्रयोगशाळेतील कामाच्या बाबतीत ठराविक कामासाठी ठराविक माणसे तयार करणे फायदेशीर होते. ती माणसे त्या प्रकारच्या कामात तरबेज बनतात व कामाला थोडा वेळ पुरतो. pH मापक [→ पीएच मूल्य ], श्यानतामापक [→श्यानता ], वर्णमापक [→ वर्णमापन ], वर्णपट प्रकाशमापक [→ प्रकाशमापन ], वर्चस्मापी अनुमापक [→ अनुमापन ] वगैरे अनेक उपकरणे विश्लेषण काऱ्यात वापरली जातात व ती वापरण्याचा सराव असलेली माणसे जर ती वापरतील तर चुकीचा संभव कमी होतो व कार्यवेळही वाचतो.
औषधी व जैव द्रव्ये तयार होऊन ती पुढे विक्रीला पाठविण्यापूर्वी शक्ती, अभिज्ञान, सुरक्षितता, निर्जंतुकत्व व शुद्धी यांच्या बद्दलच्या त्यांच्या प्रत्येक गटाच्या परीक्षा घेणे आवश्यक असते. या परीक्षा जंतुशास्त्रीय व जैव प्रयोगशाळांमार्फत घेतल्या जातात. जैव पदार्थांची उपयुक्त कालमऱ्यादा पदार्थांनुसार निरनिराळ्या पद्धतींनी येथेच निश्चित केली जाते. ही कालमऱ्यादा निश्चित करणे फार महत्त्वाचे असते. कारण ती औषधाच्या आवेष्टनावर अधिनियमानुसार दिलीच पाहिजे. गटाचे नमुने प्रयोगशाळेत संग्रहित करूनही ठेवतात. ठराविक कालाने त्यांची परीक्षा करून निष्पत्तीची (मिळालेल्या माहितीची) नोंद करून ठेवली तर भविष्यात या माहितीचा प्रसंगविशेषी उपयोग होऊ शकतो.
आवेष्टन नियंत्रण : औषधाच्या राशीच्या सर्व तऱ्हेच्या परीक्षा होऊन औषध विकण्यास योग्य असल्याचे त्यावर शिक्कामोर्तब झाले की, ते आवेष्टन खात्यात पाठविले जाते. तत्पूर्वी त्याला एक खुणेचा अंक दिला जातो व तत्संबंधी सर्व व्यवहारांत तो वापरतात. यामुळे पुढे कुठे घोटाळा होत नाही. मग आवेष्टन विभागात त्या अंकावर जरूर तेवढेच धारक, धारक बंद करण्याची बुचे, टोप्या वगैरे, लेबले, कागदाची खोकी, बाहेरगावी पाठविण्याची पुठ्ठ्याची व लाकडाची खोकी इ. माल मागवतात. या विभागातील निरीक्षक धारकातील औषधाचे वजन, व्याप वा संख्या (गोळ्या, वड्या) आणि लेबलावरील खुणेचा अंक ही वेळोवेळी तपासून लेबल व औषध एकच असल्याची खात्री करून घेतात. आवेष्टनाचे काम पुरे झाल्यावर औषधाची राशी व तयार झालेले धारक यांचा व तसेच धारक, टोप्या वगैरेंचा मेळ बसतो की नाही ते पाहतात. यामुळे लेबल एक व औषध दुसरेच असे होण्याचा धोका टाळला जातो.
सांख्यिकीय नियंत्रण : गुणवत्ता नियंत्रणाचा उपयोग इतर उद्योगांत रूढ झालेला असला तरी औषध उद्योगात त्याचा शिरकाव अलीकडेच झाला आहे. या तंत्राचा उपयोग (१) अधिक प्रातिनिधिक नमुने मिळविण्याची पद्धती योजून कच्च्या मालाचे अधिक चांगल्या प्रकारे मूल्यन करणे व (२) उत्पादन विधीतील काही प्रक्रियांचे अधिक बारकाईने नियंत्रण करणे, या दोन गोष्टींसाठी करण्यात येत आहे. दोन्ही बाबतींत संभाव्यतेचे नियम आधारभूत असतात व त्यांच्या मदतीने एखाद्या मापनीय घटकाच्या उच्च व नीच मऱ्यादा अशा तऱ्हेने ठरविता येतात की, त्यांमध्ये योग्य तऱ्हेने चालणाऱ्या एखाद्या यंत्राच्या प्रदानाचा (बाहेर पडणाऱ्या उत्पादनाचा) कोणताही भाग बसू शकेल. कच्च्या मालाचे नमुने घेण्याची पद्धती ठरविण्यासाठी आलेल्या गटाची राशी व तो नापंसत ठरविण्याच्या अटी ही प्रथम निश्चित कराव्या लागतात. हे ठरविले म्हणजे तपासणीसाठी ही किती नमुने घेतले पाहिजेत व आलेला मालाचा गट नापसंत म्हणून परत करण्याला जास्तीत जास्त किती नमुने नापास ठरले पाहिजेत हे नमुनातंत्राच्या प्रमाण कोष्टकावरून चटकन काढता येते.
वड्या पाडणे, त्यावर वेष्टन चढविणे, शिश्या भरणे किंवा जिलेटीनवेष्ट बनविणे यांसारख्या पुनरावृत्तीच्या क्रियांसंबंधात पहिली गोष्ट म्हणजे जी जी फरक घडवणारी ज्ञात कारणे असतील ती दूर करणे. असे केल्यावर मग उत्पादित वस्तूतील फरक केवळ आकस्मिक कारणांनीच उत्पन्न होऊ शकेल पण यंत्राच्या प्रदानाला त्याच वेळी संभाव्यतेचे नियम लागू शकतील. मग मोजावयाच्या अभिलक्षणाचे (राशीचे) सरासरी नियंत्रण आलेख व मऱ्यादा आलेख काढता येतात. जर नमुने तपासता तपासता या राशीचे मूल्य सरासरीच्यापेक्षा दूर अथवा मऱ्यादांच्या बाहेर गेलेले आढळले, तर अपात्र पदार्थ उत्पादित होत आहे हे समजून येते व लगेच सुधारणा करण्याचे उपाय योजता येतात. अप्रमाण वा अपात्र पदार्थ बनू लागला आहे हे विधीत बिघाड झाल्यापासून शक्य तितक्या लवकर ध्यानात येणे याला औषध निर्मितीत खूपच महत्त्व असते. कारण तेथे तयार होत असलेल्या पदार्थांची राशी मोठी असते व त्याची किंमतही बरीच असते. पण सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण पद्धती सर्वच औषध उद्योगीय नियंत्रणासाठी लावता येत नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून या उद्योगात ही पद्धती चालू पद्धतींच्या ऐवजी न वापरता त्यांना पूरक म्हणूनच वापरण्याची प्रवृत्ती आहे. [ → गुणवत्ता नियंत्रण ] .
कायद्याचे (शासकीय) नियंत्रण : औषधांचा संबंध माणसांशी व प्राण्यांशी येत असल्यामुळे त्यांच्या उत्पादकांनी कितीही काळजी घेतली, तरी त्याबाबतीत शासनावरील जबाबदारी ही मुख्य असते. त्यामुळेच सर्व देशाला लागू असणारा असा एकच केंद्र सरकारचा कायदा भारतात केला गेला. या कायद्याची कार्यवाही काही अंशी केंद्राकडे आहे व दैनंदिन कार्यवाही व प्रशासन राज्यांकडे सोपवलेली आहेत. भारतातील औषधींची आयात, निर्मिती, वितरण व विक्री यांचे नियमन सन १९४० चे क्र. २३ च्या औषधी अधिनियमांनी प्रथम करण्यात आले. तांत्रिक कारणासाठी या मूळ अधिनियमात १९५५ व१९६० या साली दुरुस्त्या झाल्या. या अधिनियमान्वये एक तांत्रिक सल्लागार मंडळ अस्तित्वात आणले गेले. तसेच या अधिनियमात (अ) औषधिद्रव्ये व निर्मिती, (आ) आयात, (इ) पेटंट व स्वत: बनवलेले औषध, (ई) प्रमाण गुणवत्ता आणि (उ) खोट्या छापाचे औषध म्हणजे काय यांच्या व्याख्या व स्पष्टीकरणे दिलेली आहेत.
यातील तरतुदीनुसार केंद्राने एक केंद्रीय औषधीय प्रयोगशाळा कलकत्ता येथे स्थापन केलेली आहे. तसेच राज्याराज्यांतूनही वैश्लेषिक प्रयोगशाळा काढलेल्या असून त्यांवर शासकीय विश्लेषक नेमलेले आहेत. या प्रयोगशाळांच्या अहवालांना कायदेशीर रीत्या ग्राह्य मानण्यात येते. तसेच या अधिनियमाखाली नेमण्यात आलेल्या औषधिनिरीक्षकांना पुढील अधिकार दिलेले आहेत : (अ) जेथे औषधनिर्मिती होते अशा कोणत्याही जागेची तपासणी करणे व काही औषधांच्या बाबतीत यंत्रसामग्री, उत्पादनविधी आणि प्रमाणीकरण व परीक्षण यांची साधने, या सर्वांची तपासणी करणे (आ) तयार होत असलेल्या, विक्री होत असलेल्या, साठवलेल्या, वितरित होत असलेल्या किंवा विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या औषधांचा नमुना घेणे (इ) एखाद्या जागेत गुन्हा घडला आहे किंवा घडत आहे असे त्याला वाटल्यास त्या जागेत शिरणे व तेथील झडती घेणे, तसेच त्या औषधाची विक्री न करण्याचा हुकूम किंवा जरूर वाटल्यास तो साठाच ताब्यात घेणे (ई) कोर्टात खटले भरणे वगैरे.
अधिनियमातील अधिकारांनी व त्यातील तरतुदींच्या आधारावर केंद्र सरकारने अधिनियमांच्या कार्यवाहीसाठी तपशीलवार नियमावली केली आहे. त्यात औषध उत्पादनाचा, विक्रीचा, आयातीचा परवाना व त्यासाठी करावयाचा अर्ज यांसंबंधी सर्व तपशील आहे. त्याचप्रमाणे कुठची औषधे विषारी आहेत, कुठची धोक्याची समजायची, ती कोणाला तयार करता येतील, कोणाला जवळ बाळगता व विकता येतील, कोणाला विकत घेता येतील, अशा औषधांच्या तपासणीबद्दल इ. पुष्कळ गोष्टी तपशीलवार नमूद केलेल्या आहेत.
दुसऱ्या महायुध्दाच्या सुरुवातीपर्यंत भारतात औषधांचे उत्पादन फारच थोडे होत होते व जे होत होते ते बव्हंशी आर्यौषधींचेच होते. पाश्चात्त्य वैद्यकातील औषधे आयातच होत असत. त्यामुळे औषधी अधिनियमांच्या उद्देशात आयातीचा प्रथम व नंतरच निर्मितीचा उल्लेख आला आहे, पण आता ती स्थिती राहिलेली नाही. देशांतर्गत पाश्चात्य औषधांचेही उत्पादन खूप वाढले आहे. [→ औषध व सौंदर्यप्रसाधान अधिनियम ].
संशोधन : विविध रोगांवरील नवी अधिक परिणामकारक औषधे तयार करण्यासाठी अनेक औषध कंपन्यांमार्फत संशोधन करण्यात येत आहे. आयुर्वेदी, युनानी इ. जुन्या पद्धतींनी औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांनी अशा प्रकारचे फारसे संशोधन केलेले नाही. पाश्चात्त्य देशांत एकंदर औषध विक्रीच्या सु. १०%किंवा अधिकही रक्कम नवी औषधे शोधून काढण्यावर खर्च होत असावी असा अंदाज आहे. भारतात लखनऊ येथील सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट या सरकारी संस्थेमार्फत वनस्पतिज औषधांचा अभ्यास, काही विशिष्ट रोगांचा जीवरासायनिक अभ्यास करून त्यांवरील उपचारासाठी नवीन रासायनिक द्रव्याचे संश्लेषण व अभिकल्प (आराखडा) करणे, नवीन प्रतिजैव पदार्थांचा शोध लावणे, औषधांचे मानकीकरण करणे इ. कार्य करण्यात येते.
नव्या संशोधनाची योजना आखल्यापासून तो ते औषध बाजारात येण्यास पाच-सहा वर्षे लागतात असा अमेरिकेतील अनुभव आहे. इष्ट गुणधर्म असलेले औषध (रासायनिक संयुग) सापडेपर्यंत सरासरीने ५,००० संयुगे तरी हाताळावी लागतात व काही औषधांपायी काही कोटी रुपयेही संशोधनार्थ खर्च होतात. नव्या औषधांचा शोध केवळ सांघिक प्रयत्नानेच शक्य असतो व त्यासाठी गणित व भौतिकी यांसारख्या सैध्दांतिक विषयांतील तज्ञांपासून तो रसायनशास्त्रज्ञ, औषधिशास्त्रज्ञ, वैद्य यांसारख्या अनुप्रयुक्त (व्यावहारिक) विषयांतील तज्ञांपर्यंत अशा दोन्ही प्रकारच्या तज्ञांची मदत घ्यावी लागते. अशा या अवाढव्य खर्च व व्यापामुळे औषध कंपन्यांचे लक्ष साधारणत: नेहमी येणाऱ्या दुखण्यांवरील नवनवी औषधे शोधून काढण्याकडे विशेष असते, कारण अशाच औषधांचा खप जास्त होतो. पण क्वचित होणाऱ्या रोगावरील औषधेही संशोधिली गेली आहेत. अर्थात ही औषधे त्यामानाने महाग विकली जातात.
नवे औषध तयार होईपर्यंतच्या संशोधनाचे पुढीलप्रमाणे निरनिराळे भाग पडतात : (१) रासायनिक, (२) सूक्ष्मजीववैज्ञानिक, (३) जीववैज्ञानिक, (४) औषधशास्त्रीय संशोधन आणि विकास व (५) वैद्यकीय संशोधन.
रासायनिक संशोधन : यात कार्बनी-, जीव-, भौतिक- आणि वैश्लेषिक-रसायनशास्त्रज्ञांचा संबंध येतो. पहिला तज्ञ नैसर्गिक द्रव्यातील संभाव्य उपयुक्ततेचा घटक वेगळा करतो किंवा कृत्रिमरीत्या तयार करतो. या दुसऱ्या, संश्लेषण प्रयत्नात अंत:स्फूर्ती, आधीच ज्ञात झालेली नैसर्गिक किंवा संश्लेषित संयुगे आणि विशेषकरून जीवरसायनशास्त्रज्ञ व औषधिशास्त्रज्ञ यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनांचा बराच उपयोग होतो. संशोधनात सापडलेले एखादे संयुग अचानकपणे दुसऱ्याच कुठल्यातरी रोगांवर उपयुक्त ठरल्याचाही काही ठिकाणी अनुभव आलेला आहे. जीवरसायनशास्त्रज्ञांची एक तुकडी शरीरातील निरनिराळी एंझाइमे आणि शरीरातील इंद्रियांच्या निरनिराळ्या क्रियांचा त्यांवर होणारा परिणाम यांसारख्या मूलभूत स्वरूपाच्या अभ्यासात गुंतलेली असेल तर दुसरी तुकडी ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचे समूह) आणि निरनिराळी इंद्रिये यांच्यात औषधाचे शोषण, पचन व त्यांतून उत्सर्जन कसे होते याच्या अभ्यासात गुंतलेली असेल. औषध शरीराला उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने त्याची रासायनिक संरचना कशी असावी हे समजण्यास या काऱ्याचा उपयोग होण्याचा संभव असतो.
भौतिकीय रसायनशास्त्रज्ञाचे काम म्हटले म्हणजे मुख्यत: शरीरातील औषधाचा शोषण वर्णपट [→ वैश्लेषिक रसायनशास्त्र] अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन [→ अनुस्पंदन] प्रकाशीय वलनात्मक अपस्करण (एखाद्या पदार्थातून उदा., क्वार्ट्झमधून जाणाऱ्या विशिष्ट पातळीत कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाच्या पातळीचे होणारे वलन त्याच्या तरंगलांबीनुसार बदलणे), क्ष-किरण विवर्तन (पारदर्शक किंवा अपारदर्शक पदार्थाच्या कडेवरून किरणांचे त्याच्या छायेमध्ये वळणे) इत्यादींचे मापन करणे हे होय. या मापनांमुळे औषधिद्रव्याची जटिल रासायनिक संरचना निश्चित करता येते व जीववैज्ञानिकदृष्ट्या अगदी भिन्नभिन्न प्रकारचे परिणाम करू शकणारे बहुरूपी व विविध आकाराचे स्फटिक त्या द्रव्यात आहेत की नाही हेही काढता येते. तसेच औषधाच्या स्वतंत्र व जल विद्रावातील स्थैऱ्याच्या परीक्षणाशीही त्याचा संबंध येतो. वैश्लेषिक रसायनशास्त्रज्ञांचे काम मुख्यत: इतर तज्ञांनी पाठविलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करून रेणुभार तसेच मूलद्रव्ये व प्रतिष्ठापित (एका अणूंच्या वा रेणूंच्या गटाच्या ठिकाणी स्थापना झालेला दुसऱ्या अणूंचा वा रेणूंचा) गट यांचे परिमाणात्मक (वजनाच्या दृष्टीने) विश्लेषण यांची माहिती तयार करणे हे असते. या माहितीमुळे तयार केलेल्या औषधाची रासायनिक संरचना ठरविण्यास मदत होते.
सूक्ष्मजीववैज्ञानिक संशोधन : याचे पुढीलप्रमाणे पाच भाग पडतात : (१) प्रतिजैव पदार्थांचा शोध, मूल्यन व उत्पादन (२) लशींचे आणि प्रतिरक्षक जैव पदार्थांचे मूल्यन व उत्पादन (३) ॲमिनो अम्ले, जीवनसत्त्वे, वाढ घडवणारे खास घटक यांसारख्या सूक्ष्मजीवजन्य अन्नपूरकांचे उत्पादन (४) संभाव्य औषधी उपयुक्ततेच्या कार्बनी संयुगांचे परिवर्तन आणि (५) औषधिक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने कार्यकारी अशा सूक्ष्मजैव द्रव्यांचा शोध. या सर्व प्रकारच्या संशोधनात सूक्ष्मजीववैज्ञानिकांना जंतुशास्त्रज्ञ, आनुवंशिकीविज्ञ, कवकशास्त्रज्ञ, जीवरसायशास्त्रज्ञ आणि कार्बनी रसायनशास्त्रज्ञ यांचीही मदत घ्यावी लागते. उदा., एखादा नवा प्रतिजैव पदार्थ शोधताना जंतुशास्त्रज्ञ व जीवरसायनशास्त्रज्ञ निरनिराळ्या किण्वांपासून (आंबविण्याची क्रिया घडवून आणणाऱ्या पदार्थांपासून) संहत द्रव्ये प्रथम तयार करतील, मग जंतुशास्त्रज्ञ निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत प्राण्यांवर होणारे त्यांचे परिणाम तपासतील. तसेच या काऱ्यात औषधिक्रियावैज्ञानिक व विकृतीवैज्ञानिकही (रोगाचा उद्गम, स्वरूप व प्रसार यांचा अभ्यास करणारे तज्ञही) सहभागी राहतील. जर यातून काही उपयोगी द्रव्य असल्याचे आढळले तर मग रसायनशास्त्रज्ञ ते द्रव्य शुद्ध व सक्रिय रूपात मिळविण्याचा प्रयत्न करतील, ते मिळाल्यावर त्याची संरचना समजावून घेईल व त्यापासून उपयुक्त साधिते आणि अन्य समानधर्मी अनुरूप द्रव्ये शोधील. हे प्रयत्न चालू असताना जीवरसायनशास्त्रज्ञ ते द्रव्य शरीरात कशा प्रकारे कार्य करते हे समजून घेण्यात प्रयत्नशील राहतील. जर या द्रव्याची रचना अतिशय क्लिष्ट वाटली (बहुतेक प्रतिजैव पदार्थ क्लिष्ट रचनेचे असतात) तर मग आनुवंशिकीविज्ञांच्या मदतीने प्रतिजैव पदार्थ नि:सृत करणाऱ्या (बाहेर टाकणाऱ्या) सूक्ष्मजंतूंची नवी संवर्धने तयार करावी लागतात. अशा तऱ्हेने एका औषधिद्रव्याचा शोध काढण्यासाठी ४0 – ५0 शास्त्रज्ञ तरी काम करीत असावे लागतात. याशिवाय रोग्यावरील परीक्षा व तत्पूर्वीची औषधिक्रियावैज्ञानिक चाचणीही करावी लागते.
जीववैज्ञानिक संशोधन : नवे औषध रोग्यांना देऊन त्याची चाचणी व मूल्यन करण्याच्या काऱ्यात औषधिक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र, कार्बनी व भौतिकीय रसायनशास्त्र, प्राणिविज्ञान, जंतुशास्त्र इत्यादींतील तज्ञांची जरूरी असते. उंदीर, कुत्रे, माकडे वगैरे प्रयोगशालेय प्राण्यांवर नव्या औषधाच्या होणाऱ्या प्रतिक्रिया अभ्यासल्या जातात. तसेच उपयुक्त ठरू शकण्याचा संभव असलेल्या प्रतिजंतुक, प्रतिव्हायरल (व्हायरस या सूक्ष्मजीवाची क्रिया कमी करणारे किंवा पूर्णपणे नष्ट करणारे पदार्थ) वगैरे द्रव्यांचे परीक्षण करण्यासाठी बऱ्याच जातींच्या सूक्ष्मजंतूंवर प्रयोग केले जातात. या सर्व चाचण्यांत हे नवे औषध समाधानकारक आहे असे आढळल्यास त्याच्या विषद्रव्य उत्पन्न करण्याच्या गुणाची चाचणी करण्यात येते व सर्व दृष्टींनी योग्य अशी त्याची मात्रा ठरविण्यात येते.
निर्मितीविषयक संशोधन : औषध उत्पादकावर औषध जास्तीत जास्त काल मूळ स्वरूपात टिकेल, ते रोग्याला रुचेल व वैद्याला पटेल अशा स्वरूपात गिऱ्हाइकाला देण्याची जबाबदारी असते. या क्रियेत भौतिकीय-, कार्बनी- व जीवरसायनशास्त्र यांचा संबंध येतो व औषधे बनविण्याची कलाही उत्पादकाला चांगली अवगत असावी लागते. औषधात घालावयाच्या भरीच्या घटकांचा परिणामाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मूळ घटकावर अनिष्ट परिणाम होता कामा नये. औषध द्रव, पूड, गोळ्या, वड्या वगैरे कोठल्याही रूपात दिले तरी ते ठराविक कालानंतर रक्तात शिरले पाहिजे व जरूर तितका वेळ त्याची रक्तातील प्रमाणाची पातळीही कायम ठेवण्याचा त्यात गुण असला पाहिजे.
वैद्यकीय संशोधन : नवे औषध रोगपरिहारासाठी चालू शकेल व त्यात विषद्रव्य उत्पन्न करण्याचा गुण नाही याबद्दल वर दिग्दर्शित केलेल्या संशोधनाने व प्रयोगांनी खात्री झाल्यावर ते औषध माणसांना देऊन त्याची चाचणी घेण्यालायक होते. अशा चाचण्यांसाठी औषध उत्पादक कंपनीत नेमलेले संशोधक वैद्य रुग्णालयातील वैद्यांशी संपर्क साधतात व त्यांच्या मदतीने व त्यांच्या देखरेखीखाली रुग्णांना औषध देण्यात येते. या प्रयोगात रुग्णाचे वय, वजन, उंची, लिंग व त्याच्या विकृतीची इत्थंभूत माहिती नोंदून ठेवतात. तसेच औषधाची मात्रा, दिवसातील पुनरावृत्ती व किती दिवस दिले, परिणाम काय दिसून आले, चांगले व वाईट याचीही अगदी तपशीलवार माहिती नोंदून ठेवतात.या शेवटच्या संशोधनात जर औषध पूर्ण गुणकारी व एरव्ही निरुपद्रवी असल्याचे आढळले तर त्याचे उत्पादन होऊन ते बाजारात येते. बाजारात आल्यानंतरही औषध कंपनीचे वैद्य ते औषध वापरणाऱ्या वैद्याशी संपर्क साधून त्याच्याबद्दलचा त्यांचा अभिप्राय समजावून घेतात व जरूर पडल्यास त्या औषधाबद्दल पुनर्विचार करण्याची शिफारस करतात.
विधिविकास : नव्या औषधाचे उत्पादन हे प्रथम अर्थातच लहान प्रमाणावर होते. ते सर्व कसोट्यांना उतरून ग्राह्य ठरले की, मग पुढची पायरी म्हणजे त्या औषधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे. संशोधनांतर्गत उत्पादन संशोधन प्रयोगशाळेतच करतात. ते करताना कोणता तरी उत्पादन विधी निश्चित केलेला असतोच. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर औषधाचे उत्पादन करावयाचे ठरते तेव्हा हीच पद्धत त्या प्रमाणात लागू पडेल की नाही याचा विचार करावा लागतो. कारण विधीचे असे रूपांतर करताना काही अडचणी उत्पन्न होण्याचा संभव असतो व त्यांचे निराकरण करण्यासाठी चाचणी सामग्रीच्या मदतीने जरा थोड्या मोठ्या प्रमाणावर तो विधी वापरण्याचे प्रयोग करावे लागतात. प्रयोगशालेय काऱ्यात पदार्थांच्या राशी लहान प्रमाणावर असतात व त्यामुळे pH मूल्य, तापमान, दाब, प्रवाहवेग इ. विधीतल्या चलांतील (बदलत्या राशींतील) विषमतेचे संक्रमण चटकन होत असल्यामुळे विधिनियंत्रण फारसे कठीण जात नाही. पण तेच मोठ्या प्रमाणावरील क्रियांतील आकस्मिक बिघाडांबद्दल काहीच आगाऊ कल्पना करता येत नाही. पुष्कळ औषधांची रेणवीय रचना अतिशय क्लिष्ट असते व म्हणून त्यांची निर्मिती दहा ते वीस किंवा प्रसंगी अधिकही, अगदी स्वतंत्र अशा टप्प्यांतच करावी लागते.
मध्यम शक्तीच्या सामग्रीने, योजलेल्या मोठ्या सामग्रीच्या अभिकल्पाबद्दल व तसेच प्रत्यक्ष विधीबद्दलही जास्त स्पष्ट कल्पना येऊ शकते. अर्थात, नवीन विधीत पूर्वीच्यापेक्षा वेगळेपणा किती आहे, विकासाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे ज्ञान, अनुभव व कर्तृत्व, सामग्रीची अंदाजे किंमत व तिच्यातून घ्यावयाच्या उत्पादनाचे प्रमाण आणि ही चाचणी करायला जो वेळ लागेल तेवढा काल, उत्पादन उशीरा झाले तरी चालेल की नाही या सर्व गोष्टी विचारात घेऊनच या मध्यम शक्तीच्या सामग्रीचा प्रयोग करावयाचा की नाही हे ठरवावे लागते. अशा चाचणी सामग्रीच्या मदतीने प्रयोगावस्थेत वापरलेल्या विधीतील चल राशींबद्दल त्या चुकून आल्या आहेत की सकारण आहेत हे ठरविता येते. हा निर्णय करताना सांख्यिकीतील नमुने घेण्याच्या व विश्लेषण पद्धतींचा चांगला उपयोग होतो. या शास्त्राचा उपयोग केल्याने प्रयोगांची संख्या कमी होते आणि मापन उपकरणे कुठे घालावी, नियंत्रण कुठे करावे, व उत्पाद्य पदार्थाची प्रत काय असावी हेही समजण्यास मदत होते [→गुणवत्ता नियंत्रण ].
औषधनिर्मितीत तयार करावयाच्या पदार्थांचे दोन मुख्य वर्ग आहेत. एक संकेंद्रणाने (आवश्यक त्या पदार्थांची संहती वाढविण्याने) मिळणाऱ्यांंचा व दुसरा संश्लेषणाने मिळणाऱ्यांचा. हे बनविण्याच्या पद्धती अगदी भिन्न असल्यामुळे त्यांसंबंधीच्या विधीविकासाच्या दिशाही अगदी निराळ्या होतात. पहिल्या वर्गातील द्रव्य मिळविताना सुरुवातीची राशी (द्रव, विद्राव) मोठी असते व त्यात नको असलेलेही काही घटक असतात. जसजशी राशी बाष्पीभवन वगैरे क्रियांनी कमी करीत जावे तसतसा तिच्यातील एक एक अनावश्यक घटक बाहेर पडत जातो व राशीही लहान होत जाते. शेवटी राशी अगदी लहान होऊन हवा असलेला पदार्थ तेवढाच शिल्लक उरतो. याउलट संश्लेषण ही मिळवणीची आणि परिवर्तनाची क्रिया असून तिच्यात निरनिराळे विक्रिया प्रवर्तित करणारे घटक एका ठराविक अनुक्रमाने व ठराविक परिस्थितीत एका ठिकाणी आणून मध्यस्थ द्रव्ये बनविली जातात आणि मग शेवटी त्यांतून आपणास हवा असलेला पदार्थ मिळतो.
संकेंद्रण व संश्लेषण या दोन क्रिया भिन्न असल्याने त्यांना लागणारी सामग्री बरीच वेगवेगळी असते व जेथे मुख्यत: विधीसंबंधीच संशोधन चालते तेथे या काऱ्यासाठी दोन निरनिराळे विभाग ठेवण्याची पद्धती आहे. तरीपण सामान्यत: या वेगळाल्या विधींचे त्यातील घटक क्रियांच्या (बाष्पीभवन, ऊर्ध्वपातन, अधिशोषण म्हणजे एखाद्या पदार्थांच्या पृष्ठभागावर शोषून घेण्याची क्रिया इ. क्रियांच्या) साहाय्याने किंवा घटक प्रक्रियांच्या (एस्टरीकरण, नायट्रीकरण, हायड्रोजनीकरण इ.) साहाय्याने वर्णन करणे शक्य असते आणि म्हणून चाचणी सामग्री बनविताना ती निरनिराळ्या क्रिया-प्रक्रियांसाठी उपयोगी पडेल ही दृष्टी ठेवून बनवितात. तसेच तिच्या बाबतीत कार्यक्षमतेपेक्षा हरकामीपणाला जास्त महत्त्व देतात. संश्लेषणात्मक कार्य करणाऱ्या एखाद्या नमुनेदार चाचणी सामग्रीत पुढील भागांचा समावेश असू शकेल : अंतर्दाबाचे विक्रियक (विक्रिया ज्यात घडते असे पात्र) व त्यात निरनिराळ्या वेगाच्या ढवळ्या (द्रव ढवळणारी साधने), बाष्पीभवन पात्रे, दाब व तापमान यांच्या काही सीमांत कार्य करू शकणारे संघनक (बाष्पाचे द्रव व घन स्थितीत रूपांतर करणारे पात्र), चोषण गाळण्या व दाब गाळणी, काही अवयव (भाग) बाजूला काढता येतील असे विभाजक स्तंभ, निर्वात शुष्कक, केंद्रोत्सारक (केंद्रापासून दूर नेण्याच्या प्रेरणेचा उपयोग करणारे पात्र), साठवण्याच्या टाक्या, विद्रावणक (पदार्थ विरघळविण्याचे पात्र), निष्कर्षण (पदार्थ वेगळे करण्यास लागणारे पात्र) साहित्य, चक्रीय आणि केंद्रोत्सारी पंप, स्फटिकीकरण व इतर क्रियांसाठी दुहेरी वेष्टनाची पात्रे.
संकेंद्रण विधीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिजैवांची निर्मिती. प्रतिजैव पदार्थ निर्माण करणारे सूक्ष्मजंतूंचे प्रकार जरी पुष्कळ असले तरी त्यांच्या संवर्धनाच्या पद्धती व त्यांच्यापासून सक्रिय द्रव्य मिळविण्याच्या पद्धती या सामान्यत: सारख्याच असतात. जरूर त्या कवकाची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीची) किंवा सूक्ष्मजंतूंच्या जातीची, खास संवर्धन माध्यम वापरून संवर्धित किण्व क्रमाक्रमाने मोठाल्या टाक्यांत वाढवीत नेऊन अनुकूलतम सीमा गाठता येते. या द्रवात निलंबित असलेले कण, उदा., कवकजाल, गाळणीने काढून टाकतात व मग राहिलेल्या शुद्ध द्रवातून योग्य विद्रावणकाच्या साहाय्याने प्रतिजैव द्रव्य काढता येते नंतर रंजकनाशन व केंद्रोत्सारण या क्रिया जरूर पडल्यास करून शेवटी बाष्पीभवनाने पाहिजे असलेले सक्रिय द्रव्य चूर्ण किंवा स्फटिकांच्या रूपात मिळते. अर्थात यानंतरही त्याचे शुद्धीकरण करावे लागतेच.
नव्या औषधांचा विकास व विक्री : काही कारणाने किंवा कसल्यातरी अवलोकनाने कल्पना येऊन एखाद्या औषध उत्पादकाने सर्व तऱ्हेच्या चाचण्या व परीक्षा यांत पात्र ठरलेले एक नवे औषध बनविल्यावर त्याचा विकास करणे व विक्रीकडे लक्ष देणे ही पुढची पायरी असते. अशा विकासाचे क्षेत्र, त्याची पद्धती व त्यात लक्ष घालणारे मनुष्यबळ यांबाबतीत निरनिराळ्या कंपन्यांत फरक असणारच. पण सामान्यत: सर्व ठिकाणी लागू पडेल असा या विकासाचा मूलभूत आराखडा असतोच व त्याचा विचार करणे शक्य आहे.
विकासाच्या सर्व कक्षांतील कार्यक्रमांचा समन्वय करणे आवश्यक असते व त्यासाठी रुग्णालयातील अवलोकन व तपासणी, संशोधन, उत्पादन, नियंत्रण, माल मिळविणे, बाजाराची पहाणी, विक्री, विक्रीवाढ आणि कायद्याचा सल्ला या विभागांच्या मुख्यांची मिळून एक समिती नेमतात. ही समिती जरूर लागेल तेव्हा इतरांचीही मदत घेते.
औषध उत्पादकाच्या सर्व प्रकारच्या काऱ्यात नव्या औषधाचा बाजारात प्रसार करणे हा जरी शेवटचा टप्पा असला, तरी औषधाची कल्पना येऊन ते तयार होईपर्यंत मधील सर्व टप्प्यांत त्याच्यावर बाजारातील एकूण परिस्थितीचा परिणाम होत असतो. कारण उघडच आहे की, कंपनीच्या मालाचा खप झाला तरच फायदा होणार व लोकांना माल आवडला तरच त्याचा खप होणार. याकरिता औषध निर्मात्याला त्याच्या मालाच्या गिऱ्हाइकाला काय हवे असते, त्याच्या सवयी, चालीरीती, प्रवृत्ती, खाणेपिणे आणि त्याला कशा तऱ्हेची औषधे आवडतात याबद्दल संपूर्ण माहिती काढणे व असणे जरूरीचे असते. गिऱ्हाईक साधारणत: स्वत:च जाऊन जी खरेदी करते अशी पेटंट औषधे तयार करताना या माहितीचा उपयोग चांगला होतो. फक्त वैद्याच्या सहीनेच मिळणाऱ्या औषधांच्या बाबतीत मात्र या माहितीचा सरळ उपयोग होत नाही. जी औषधे लोकांना दुकानात जाऊन सरळ विकत घेता येतात त्यांवर अधिनियमान्वये त्याबद्दल पुरेशी माहिती द्यावी लागते. औषध केव्हा घ्यावे, किती घ्यावे, दिवसातून किती वेळा घ्यावे वगैरे त्यावर असल्यामुळे माणूस शक्यतो अशी औषधे घेण्याकडे प्रथम वळतो व त्यामुळेच त्यांचा खप वैद्यकीय औषधांच्यापेक्षा कितीतरी पट जास्त असतो, उदा., जीवनसत्त्वे, शक्तिवर्धके, मलमे, बाम इत्यादी.
लोकांत पेटंट औषधांचा प्रसार करण्याचे मुख्य साधन म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके, रेडिओ इ. सर्वसामान्य माध्यमांद्वारे त्यांची जाहिरात करणे. पण वैद्यकीय औषधांची जाहिरात, अशा तऱ्हेने करून चालत नाही. त्यांचा प्रसार वैद्यांच्यामार्फतच व्हावा लागतो. पेटंट औषधांच्या बाबतीतही बऱ्याच कंपन्या या पद्धतीचा वापर करतात. या औषधांसंबंधी प्रथम जरूर ती माहिती छापून औषधाला जोडावी लागते. या माहितीच्या आधारे कंपनीचा प्रतिनिधी वैद्यांना औषधाबद्दल माहिती देतो व बहुतेक वेळा औषधांचा नमुना देऊन त्याच्या उपयुक्ततेबद्दल चाचणी करण्यास सांगतो. अशा तऱ्हेने हे औषध वैद्यांपर्यंत जाऊन पोहोचते व त्यांची खात्री पटल्यावर ते रोग्याला विकत घेण्यासाठी ते लिहून देतात किंवा स्वत:ही वापरू लागतात. या औषधांच्या जाहिराती वैद्यकीय, औषधिक्रियावैज्ञानिक वगैरे अधिकृत शास्त्रीय नियतकालिकांतही देण्याची पद्धत आहे. वैद्यकीय किंवा पेटंट औषधे प्रसृत करण्याची दुसरी एक पद्धती म्हणजे नोंदलेल्या (अधिकृत) वैद्यांच्याकडे नव्या औषधासंबंधीचे वाङ्मय घरी (किंवा दवाखान्यातही) पाठविणे. घरी डाकेने पत्ररूपात आलेल्या या वाङ्मयाकडे वैद्य फुरसतीने जरा जास्त बारकाईने पाहणे शक्य असते, त्यामुळे या पद्धतीचा बऱ्याच कंपन्या पुष्कळ उपयोग करतात. आपल्या उत्पादनांचा प्रसार करण्याच्या बाबतीत औषध उद्योगातील कंपन्यांनी जी पायरी गाठली आहे तिथपर्यंत दुसऱ्या कोणत्याही उद्योगातील व्यावसायिक पोहोचलेले नाहीत असे दिसून येते.
औषधनिर्मिती कंपन्यांच्या संघटना व वाङ्मय : औषधनिर्मितीत आज अमेरिकेची संयुक्त संस्थाने अग्रेसर असून त्याच्या खालोखाल ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड, रशिया आणि जपान यांचा क्रम लागतो. औषधनिर्मितीतील या पुढारलेल्या राष्ट्रांत निर्मिती कंपन्यांच्या निरनिराळ्या संघटना स्थापण्यात आलेल्या असून त्यांच्यातर्फे औषधनिर्मितीतील प्रगतीची माहिती देणारी पत्रके प्रसिद्ध होतात.
भारतातही औषधनिर्मिती कंपन्यांच्या संघटना असून त्यांच्यामार्फत काही माहितीपत्रके प्रसिद्ध होतात. सरकारी संस्था तसेच काही मोठ्या कंपन्या स्वत:ही अशीच माहितीपत्रके प्रसिद्ध करतात. केंद्र सरकारच्या डेव्हलपमेंट कौन्सिल (ड्रग्ज ॲड फार्मास्युटिकल्स) तर्फे इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, मुंबई येथील इंडियन फार्मास्युटिकल ॲसोसिएशन तर्फे इंडियन जर्नल ऑफ फार्मसी, पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायॉटिक्स लि. तर्फे हिंदुस्थान अँटिबायॉटिक्स बुलेटिन, मुंबई येथील टेक्निकल प्रेस पब्लिकेशन्स तर्फेकेमिकल एज ऑफ इंडिया, मुंबई येथे जर्नल ऑफ इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री, दिल्ली येथे द ईस्टर्न फार्मासिस्ट, दिल्ली येथील इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट ॲसोसिएशन तर्फे इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसी, कलकत्ता येथील ॲसोसिएशन ऑफ इंडियन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स तर्फे जर्नल ऑफ इंडियन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स इ. महत्त्वाची पत्रके भारतात प्रसिद्ध होतात.
भारतीय उद्योग : आधुनिक औषधांचा वापर भारतात सु. १०० वर्षांपूर्वी सुरू झाला. नाडुवट्टम (तामिळनाडू) व मुंगपू (बंगाल) येथे १८७१ मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर क्विनीन तयार करण्याचे कारखाने निघाले. हे कारखाने म्हणजे भारतीय औषधनिर्मितीची सुरुवात होती. १९०१ मध्ये बेंगॉल केमिकल ॲड फार्मास्युटिकल वर्क्स लि. ही कंपनी कलकत्ता येथे व १९०५ मध्ये अलेंबिक केमिकल वर्क्स लि. ही बडोदा येथे स्थापन झाली.
पहिल्या महायुध्दात औषधांची आयात करण्यावर बंधने घालण्यात आली. त्यामुळे बऱ्याच औषधनिर्मिती कंपन्या त्या सुमारास स्थापल्या गेल्या. या संस्था प्रामुख्याने वनस्पतिज औषधे व जैव पदार्थांची निर्मिती करीत. हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई किंग इन्स्टिट्यूट, मद्रास व सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, कसौली या संस्था याच काळात निघाल्या. पहिल्या महायुध्दानंतर कॅफीन व शुध्दिहरके यांचे उत्पादन सुरू झाले. दुसऱ्या महायुध्दात या धंद्याची आणखी प्रगती झाली. या काळात अल्कलॉइडे, ग्रंथिद्रव्य उत्पादने, रासायनिक औषधे इ. औषधांची निर्मिती सुरू झाली. १९३९ मध्ये भारताची औषधाची गरज, देशात तयार होणाऱ्या औषधांकडून फक्त १३ टक्के भागविली जात असे, ती १९४३ मध्ये ७० % पर्यंत गेली.
यानंतर भारतीय कंपन्यांना औषधनिर्मितीत परदेशी औषधनिर्मिती कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली. संश्लेषित सल्फा औषधे, प्रतिजैव औषधे इ. अधिक परिणामकारक औषधांची आयात सुरू झाल्याने, काही जुन्या औषधांची निर्मिती थांबविणे भाग पडले. यासाठी भारत सरकारने या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी एक मंडळ नेमले. त्या मंडळाच्या अहवालानुसार धंद्याचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक वाटले. १९५३ मध्ये फार्मास्युटिकल एन्क्वायरी कमिटीने धंद्याची पाहणी केली, बहुतेक कंपन्या सर्वसामान्य औषधे बनवीत, तसेच आयात केलेल्या संश्लेषित रसायनांपासून गोळ्या, द्रव औषधे इ. औषधे बनवीत असे कमिटीला आढळून आले. मूलभूत रसायनांपासून औषधे बनविण्यात यावीत व देशात तयार होत असलेली औषधे बाहेरून आयात करण्यास बंदी घालावी असे कमिटीने सुचविले.
पहिल्या पंचवार्षिक योजनेत केंद्र सरकारने पुण्याजवळ पिंपरी येथे युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना व अंटा या जागतिक संस्थांच्या सहकाऱ्याने हिंदुस्थान अँटिबायॉटिक्स लि. या संस्थेची स्थापना केली. आयात करण्यात आलेल्या कच्च्या व अर्धप्रक्रियीत मालापासून प्रतिजैव व इतर औषधे यांनी निर्मिती करणारे बरेच खाजगी कारखाने याच वेळी निघाले. तथापि देशांत तयार होणाऱ्या औषधांपेक्षा त्यांची गरज जास्त असल्याने सदर औषधांची आयातही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असे.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत व नंतर या धंद्याची बरीच वाढ झाली. रशियाच्या सहकाऱ्याने ऋषिकेश येथे प्रतिजैव औषधनिर्मितीचा एक व सनतनगर (हैदराबादजवळ) येथे संश्लेषित औषधनिर्मितीचा एक असे दोन सरकारी क्षेत्रातील कारखाने सुरू करण्यात आले, तसेच महाराष्ट्रातील रासायनी (पनवेलजवळील आपटा खराडा) येथे प. जर्मनीतील औषधनिर्मिती संस्थांच्या सहकाऱ्याने औषधांसाठी आवश्यक असणाऱ्या रसायनांच्या निर्मितीचा कारखाना सरकारी क्षेत्रात निघाला. याशिवाय खाजगी क्षेत्रात निर्मिती करीत असलेल्या संस्थांनी आपली निर्मिती अधिक व्यापक केली, तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंग्लंड, स्वित्झर्लंड, प. जर्मनी व इटली येथील औषधनिर्मिती कंपन्यांच्या सहकार्याने बऱ्याच नवीन संस्था निघाल्या.
सध्या १२५ हून जास्त मोठ्या व २,५०० हून जास्त लहान कंपन्या मिळून एकूण २,८०० कंपन्या औषधनिर्मिती करतात. सरकारी क्षेत्रातील मेडिकल स्टोअर्स, डेपो, मुंबई व मद्रास गव्हर्नमेंट ओपियम अँड अल्कलॉइड वर्क्स, गाझीपूर (उ. प्रदेश) हिंदुस्थान अँटिबायॉटिक्स लि., पिंपरी (महाराष्ट्र) सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, कसौली बी.सी.जी. व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट, मद्रास या केंद्र सरकारतर्फे व राज्य सरकारतर्फे गव्हर्नमेंट क्विनीन फॅक्टरीज, मुंगपू (प. बंगाल), अन्नमलाई व नाडुवट्टम (तमिळनाडू), शार्कमाशापासून यकृततेल काढण्याचे कारखाने मुंबई, कोझीकोडे व त्रिवेंद्रम येथे व विविध ठिकाणी लस व रक्तरस यांची निर्मिती करण्यात येते. खाजगी क्षेत्रातील ३० हून मोठे कारखाने परदेशी सहकार्याने गोळ्या, अंत:क्षेपणे, मलमे इ. प्रकार आयात कच्च्या मालापासून तयार करतात, तर काही थोड्या संस्था मूळ रसायनांपासून औषधांची निर्मिती करतात.
कोष्टक क्र. २. औषधिद्रव्यांचे भारतातील वार्षिक उत्पादन |
||||
एकक |
१९५६ |
१९६० |
१९६५ |
|
प्रतिजैव पदार्थ |
||||
पेनिसिलीन |
मि. यू. |
१४⋅०९ |
३९⋅७० |
१०२⋅७ |
स्ट्रेप्टोमायसीन |
टन |
— |
— |
१००⋅७ |
क्लोरँफिनिकॉल |
टन |
२⋅१६ |
३⋅८२ |
२९⋅३८ |
टेट्रासायक्लिन |
टन |
— |
— |
२१⋅७९ |
सल्फा औषधे – |
टन |
९८⋅६ |
१३०⋅२ |
२३४⋅६ |
क्षयविरोधी औषधे |
||||
पीएएस आणि तत्सम द्रव्ये |
टन |
९⋅३८ |
८४⋅१६ |
३२६⋅७ |
आयएनएएच |
टन |
४ |
२९⋅१० |
५७⋅०५ |
अतिसारविरोधक औषधे – |
||||
आयडोक्लोरो आणि डायआयडो-ऑक्सिक्विकोलीन |
टन |
२१⋅७९ |
२१⋅६६ |
६९⋅८ |
महारोगविरोधी औषधे – |
||||
डीडीएस वगैरे |
टन |
१०⋅८६ |
७⋅४ |
३⋅५६ |
हिवतापविरोधक कृत्रिम औषधे |
||||
क्लोरोक्वीन, ॲमोडियाक्वीन |
टन |
— |
— |
१३⋅३१ |
बधिरता आणणारी औषधे |
||||
प्रोकेन |
टन |
— |
— |
४९⋅१७ |
झायलोकेन |
किग्रॅ. |
— |
— |
४४८ |
जीवनसत्वे – |
||||
अ जीवनसत्वे |
मि.मे.यू. |
— |
१४⋅५ |
१३⋅५ |
ब१२ जीवनसत्व |
टन |
— |
५⋅२ |
४३⋅७ |
क जीवनसत्व |
टन |
— |
— |
९३⋅७९ |
नियासिनामाइड |
टन |
— |
— |
५७⋅४७ |
वनस्पतिज द्रव्ये |
||||
क्विनीन |
टन |
— |
९९⋅२९ |
४७⋅८ |
स्ट्रिक्नीन, ब्रूसीन |
टन |
९⋅४८ |
१४⋅३२ |
२१⋅३ |
एमेटीन |
किग्रॅ |
— |
१८८ |
२७८ |
कॅफीन |
टन |
४⋅१५ |
१२⋅६७ |
१५⋅२ |
अफूतील अल्कलॉइडे |
किग्रॅ. |
१,३२५ |
३,५६४ |
३,०६५ |
इतर द्रव्ये |
||||
ॲस्पिरीन |
टन |
— |
७६⋅४६ |
४१३⋅४ |
कॅल्शियम ग्लुकोनेट |
टन |
१७⋅५२ |
६१⋅४१ |
१३०⋅१३ |
मधुमेहरोधक औषधे |
||||
क्लोरोप्रोप्रामाइड |
टन |
— |
०⋅३ |
१८⋅५५ |
इन्शुलीन अंतःक्षेपण |
मि.मे.यू. |
— |
— |
४४४.९३ |
कोष्टक क्र. ३. भारतातून निर्यात होणारी औषधिद्रव्ये (लक्ष रुपये) |
|||||
१९६२ – ६३ |
१९६३ – ६४ |
१९६४ – ६५ |
१९६५ – ६६ |
१९६६ – ६७ |
|
सिंकोनाच्या सालीपासून बनविलेले क्विनीन व अन्य तत्सम द्रव्ये |
१४⋅७ |
१०⋅४ |
४६⋅८ |
१०९⋅९ |
१८७⋅५ |
कुचल्याच्या बियांपासून बनविलेले स्ट्रिक्वीन व ब्रूसीन |
९⋅४ |
१०⋅५ |
१२⋅२ |
१९⋅५ |
४१⋅२ |
अन्य वनस्पतींपासून बनविलेली औषधे |
२ |
२ |
१२⋅५ |
४⋅५ |
४⋅४ |
रासायनिक औषधिद्रव्ये व वेगवेगळे औषधी प्रकार |
९० |
९५⋅२ |
१४०⋅४ |
१५५⋅८ |
११७ |
वनस्पती द्रव्ये |
१५१ |
२३१ |
२९८ |
२९८ |
३९७ |
एकूण |
२६७ |
३४९ |
५१० |
५८८ |
७४७ |
लहान संस्था गेलेनिकल औषधांची निर्मिती करतात. असे कारखाने देशभर पसरले आहेत. काही लहान कारखाने मोठ्या कारखान्यांसाठी शक्तिवर्धक औषधे, जीवनसत्त्वे इं. औषधांची निर्मिती करतात.
भारतातील औषधनिर्माण संस्थेचे १९६२ मध्ये ५६० दशलक्ष रुपये भांडवल होते तर १९६७ मध्ये ते १,५००दशलक्ष रुपये झाले. या कारखान्यांतून ४०,०००कामगार काम करीत असून त्यांपैकी जवळजवळ ४,००० कामगार तांत्रिक विषयांत तज्ञ आहेत. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांतील संशोधनावरील खर्च सध्या १५ दशलक्ष रुपयांच्या आसपास आहे. भारतामध्ये तयार होणाऱ्या औषधांची आकडेवारी कोष्टक क्र. २मध्ये मागे दिली आहे.
दुसऱ्या महायुध्दापर्यंत आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीची औषधे भारतात आयात होत होती. वीस वर्षांनंतर तीच औषधिद्रव्ये व औषधी प्रकार भारतातून निऱ्यात होत आहेत. (पहा : कोष्टक क्र. ३).
औषधी वनस्पतींत असणारी मूळ औषधिद्रव्ये त्यांच्यापासून निराळी करून त्यांची निऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेअखेर क्विनीन व त्यापासून बनविलेली अन्य द्रव्ये ह्यांच्या निऱ्यातीत ६२–६३ च्या निर्यातीपेक्षा ६५–६६ साली ७ पटींनी वाढ झाली व ६६–६७ साली ही वाढ १३ पटींनी होऊन एकंदर औषधी निर्यातीपेक्षा ५० टक्के निऱ्यात ह्या द्रव्यांची आहे. त्याचप्रमाणे स्ट्रिक्नीन व ब्रूसीन ह्यांच्या निऱ्यातीत दुप्पट वाढ होऊन ६६–६७ साली ही वाढ ४.५ पटींनी झाली व एकंदर निऱ्यातीत ह्याचा वाटा १० टक्के आहे.
पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळात वरील सर्व औषधांची निऱ्यात फारच कमी प्रमाणावर होत होती व पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात ती जवळजवळ नव्हतीच. १९५८–५९ साली ८८⋅८ लक्ष रु., १९५९–६० साली ९५⋅९ लक्ष रु., १९६०–६१ साली १०८⋅९ लक्ष रु. व १९६१–६२ साली १११⋅३ लक्ष रु. किंमतीच्या औषधांची निर्यात करण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात ह्यांच्या निऱ्यातीत वाढ होऊन १९६५–६६ साली ती तीन कोटींपर्यंत गेली व १९६६–६७ साली ३⋅६८ कोटी झाली व ती १९६२–६३ सालांच्या तिप्पट आहे.
कोष्टक क्र. ४. भारतातून निरनिराळ्या देशांना १९६५ – ६६ मध्ये झालेली औषधांची निर्यात. |
|
देशाचे नाव |
लक्ष रुपये |
प. जर्मनी |
५९⋅८२ |
युनायटेड किंग्डम |
५०⋅५५ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
३५⋅८७ |
सोव्हिएट रशिया |
९⋅६० |
भारतात तयार होणाऱ्या औषधिद्रव्यांचा व औषधी प्रकारांचा दर्जा प्रगत पाश्चात्त्य राष्ट्रांत होणाऱ्या औषधांइतकाच आहे व त्यामुळेच अशी प्रगत राष्ट्रे भारतातील औषधिद्रव्ये व औषधांची आयात करू लागली आहेत, ही गोष्टक क्र. ४ वरून दिसून येते.
औषधी वनस्पती जशाच्या तशा स्वरूपातसुध्दा फार मोठ्या प्रमाणावर निऱ्यात केल्या जातात. प्रतिवर्षी ही निऱ्यात २ ते ३ कोटी रुपयांपर्यंत होत असून १९६६–६७ साली ही निऱ्यात ४ कोटी रुपयांची झाली. त्यापैकी १⋅७ कोटी रुपयांची निऱ्यात केवळ इसबगोलाची आहे. ह्याच्या खालोखाल सोनामुखीची निऱ्यात ३३ लक्ष रुपयांची, सिंकोना, काजरा, सर्पगंधा इत्यादींची २० लक्ष रुपयांची व अन्य औषध वनस्पतींची निऱ्यात १.८ कोटी रुपये झाली. ह्याशिवाय बरीचशी निऱ्यात बाष्पनशील तेलांचीही होत असून तिचा समावेश वरील कोष्टकात केलेला नाही.
पहा : औषध औषधिकल्प.
संदर्भ : 1. Cook, F. E. Martin, E. W. Remington’s Pharmaceutical Science, Easton (U. S. A.), 1965.
2. Deno, Rowe Brodie,The Profession of Pharmacy. 1959.
3. Development Council (Drugs and Pharmaceuticals) Indian Pharmaceutical Industry, 1965 &1965.
4. Survey by I. C. M. A. Indian Chemical and Pharmaceutical Industry, 1963.
काळे, व. र. मिठारी, भू. चिं. ओगले, कृ. ह.
“