कॅस्पियन समुद्र : यूरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील, जगातील सर्वांत मोठा अंतर्देशीय समुद्र किंवा खारे सरोवर. विस्तार सु.३७०उ.ते ४७०पू. ते ५५० पू. क्षेत्रफळ सु ३,९८,८२१ चौ.किमी. जलवाहन क्षेत्र ३७,४७,४१० चौ.किमी. दक्षिणोत्तर लांबी १,२०८ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी १६१ ते ४३४ किमी. याचा आकार इंग्रजी एस् अक्षरासारखा असून कॉकेशस पर्वत व मध्य आशियातील उंचवट्याचा भाग ह्यांमधील आरालो कॅस्पियन हया नावाने पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या सखल प्रदेशाचाच हा भाग आहे. ह्याच्या पृष्ठाची पातळी सरासरी समुद्रसपाटीच्या खाली २८ मी. आहे. टान्स-कॉकेशियामधील कास्पी लोकांवरुन याला पूर्वी कॅस्पियन मेअर म्हणत. कॅस्पियन समुद्राला उत्तरेच्या बाजूकडून व्होल्गा, उरल, एंबा, तेरेक व कूमा नद्या येऊन मिळतात. त्यांच्या त्रिभूज प्रदेशांमुळे कॅस्पियन समुद्राचा उत्तरेकडील भाग बराच उथळ बनला आहे. मध्य व दक्षिण भाग सरासरी अनुक्रमे २१३ मी. व ३०५ मी. आणि जास्तीत जास्त अनुक्रमे ७९० मी. व ९८० मी. खोल आहे. कॅस्पियन समुद्राच्या एकंदर ६,४४१ किमी. लांबीच्या किनाऱ्यापैकी ५,३९४ किमी. भाग रशियाच्या, तर फक्त १,०४७ किमी. लांबीचा दक्षिणेकडील भाग इराणच्या ताब्यात आहे. रशियाच्या आंतरप्रांतीय वाहतुकीकरिता कॅस्पियनचा फार उपयोग होतो. बाकू, ॲस्टाखान, क्रॅस्नोव्हाट्स्क ही रशियातील बंदरे व पहलवी आणि बंदरशाह ही इराणी बंदरे विशेष महत्त्वाची समजली जातात. कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेकडील उथळ भागात स्टर्जन, हेरिंग,कार्प,सॅमन इ. मासे विपुल मिळतात. सीलही काही प्रमाणात मिळतो. कॅस्पियन समुद्राच्या पाण्याची क्षारता दर हजारी फक्त तेराच आहे, तर महासागरातील पाण्याची क्षारांत सल्फेटसचे प्रमाण फक्त १० टक्केच आढळते. पूर्वेकडील कांरा बोआझ आखातात ग्लॉबर्स सॉल्ट, मीठ व इतर क्षार मिळतात. येथे क्षारता हजारी १८० असते. कॅस्पियन समुद्राची पातळी अलीकडे खाली जात असल्याने मच्छीमारीच्या उत्पादनावर त्याचा दृश्य परिणाम होऊ लागला आहे. उपाय म्हणून अमुदर्याचा प्रवाह वळवून कॅस्पियनमध्ये नेण्याची योजना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इराणी आखातातून, इराणमार्गे रशियाला युद्धसामग्री पोहोचविण्यासाठी कॅस्पियन समुद्रावरील इराणी व रशियन बंदरांचा फार उपयोग झाला.
लिमये, दि. ह.
“