कॅसाइट : मेसोपोटेमियातील प्राचीन एलामाइट जमातींपैकी एक प्रसिद्ध सत्ताधारी जमात. इ.स.पू.सु. १८००ते १२०० ह्या दरम्यान ह्या लोकांनी प्राचीन बॅबिलोनिया, त्याचे सपाट मैदान, उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश इ. मुलूख व्यापून तिथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या सत्तास्थापनेची निश्चित तारीख ज्ञात नाही तथापि अलीकडे उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून असे दिसते की, इ.स.पू.१७८० मध्ये त्यांनी बॅबिलनवर हल्ला केला व सर्व बॅबिलोनियन साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. त्यंनी ॲमोराइट सत्ता नष्ट करुन बेंबिलोनियावर सु. चारशे वर्षे राज्य केले. कॅसाइट लोक हे टॉलेमीने उल्लेखिलेल्या कोसियनांशी सदृश असावेत किंवा प्राचीन ग्रीक लेखक ज्यांना किसिअन म्हणून संबोधितात, तेच हे लोक असावेत. त्यांचा आर्यांशी सतत संबंध आल्यामुळे त्यांची भाषा, नावे, धर्मकल्पना इत्यादिकांत आर्यघटक दिसतात, परंतु ते आर्य नसावेत. इ.स.पू.१६५० च्या सुमारास ते बॅबिलनच्या पूर्वभागात रहात असावेत आणि इ.स.पू.१५९५ मध्ये हिटाइटांच्या आक्रमणामुळे जेव्हा ॲमोराइट सत्ता नष्ट झाली, तेव्हा त्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन बॅबिलन जिंकले व ते सबंध साम्राज्य पादाक्रांत केले. गन्डाश हा त्यांच्यातील पहिला ज्ञात राजा होय. त्याच्यानंतर इ.स.पू.११५० पर्यंत कॅसाइटांमध्ये जवळजवळ छत्तीस प्रसिद्ध राजे झाले. काहींच्या मते ह्यांची सत्ता सु. सहाशे वर्षे होती तथापि आधुनिक संशोधनानुसार हा काळ चारशे वर्षांचा समजण्यात येतो. कॅसाइट राजांपैकी पहिला व तिसरा बुर्नबुरिॲश, कशहिलिश,तिसरा कुरिग्लझु हे राजे विशेष प्रसिद्ध पावले. कॅसाइट राजांपैकी बहुतेक राजांनी आपली सत्ता टिकविण्यासाठी प्रथम ईजिप्त व ॲसिरिया या दोन सत्तांशी मैत्री केली व तेथील राजघराण्यांशी लग्नसंबंध जोडले परंतु ॲसिरियाचे बळ जसे वाढत गेले, तसे त्यांनी ॲसिरियाविरुद्ध ईजिप्त व हिटाइट ह्यांच्याशी संधान बांधले. काही काळ हा सत्तासमतोल टिकून राहिला. पण पुढे इजिप्त व हिटाइट हयांची सत्ता कमजोर होत होती, तर ॲसिरियाबरोबर एनलिल-नदिन ह्याच्या कारकीर्दीत इ.स.पू. ११५० मध्ये कॅसाइटांचे राज्य संपुष्टात आले. तथापि इसवी सनाच्या सुरुवातीपर्यंत कॅसाइट लोकांचा संचार मेसोपोटेमियातील प्रदेशात कुठे ना कुठे तरी चालू होता.
हयांनी घोडे व रथ यांचा युद्धात वापर करन लष्करी वर्चस्व स्थापन केले. कदाचित घोड्यांचा वापर करणारे हेच मेसोपोटेमियातील पहिले लोक असावेत. लष्करी सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी जिंकलेल्या लोकांच्याच देवदेवताचं उपासना सुरु केली त्यांच्या मंदिरांना मोठमोठया देणग्या दिल्या आणि सामान्य लोक व पुरोहितवर्ग हया दोघांना त्यांनी संतुष्ट ठेवले. पूर्वी प्रचलित नसलेली, जहागिरी देण्याची प्रथा प्रथमच त्यांनी चालू करुन नवीन सरंजामशाही अंमलात आणली. राजसत्तेच्या आर्थिक स्थैर्यास हया सरंजामीपद्धतीचा फार उपयोग झाला, साहजिकच समाजास स्थैर्य प्राप्त झाले. सांस्कृतिक क्षेत्रात कॅसाइट लोकांनी फारशी प्रगती केलेली दिसत नाही. प्रांरभी कॅसाइटानी क्यूनिफार्म लिपीत लिहिण्याचा प्रयत्न केला, तरी पुढे त्यांनी बॅबिलोनियन भाषाच मुख्यत्वे राजभाषा म्हणून स्वीकारली. अमार्ना व बोगाझकई येथील मृत्पात्रे, तसेच ईजिप्तमधील शिलालेख यांवरुन त्यांच्या राजकीय हालचालीसंबधी बरीच माहिती मिळते. शिवाय निप्पूर येथील मंदिराच्या दप्तरखान्यात सापडलेल मृत्पात्रांवरुन त्यांच्या अतंर्गत कारभारविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांत करआकारणी व वसूली पद्धत. जहागिरी व न्यायनिवाडे यांच्या पद्धती,तसेच देवस्थानांची व्यवस्था इत्यादीविषंयी तपशीलावर माहिती मिळते. प्रत्येक राजाच्या राज्याभिषेकापासून त्याच्या कारकीर्दीची कालगणना करण्याची पद्धत हयांनी अंमलात आणली होती.
कॅसाइट लोकांत पुरोहितवर्ग व देवस्थान हयांना थोडेबहुत महत्व असले, तरी त्यांचे समाजात प्राबल्य नव्हते. मार्डूक, एनलिल, इश्तार या देवतांनाच महत्वाचे स्थान होते. त्यंनी पूर्वीच्या लोकांचीच कथापुराणे पतकरली. अनेक मंदिराची वा झिगूरातांची त्यांनी बांधणी केली, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला असला, तरी वास्तू व शिल्प हयांबाबतीत त्यांनी प्रगती केलेली आढळत नाही. कॅसाइट कलेचे फारसे नमुने उपलब्ध नाहीत, झिलईंची भांडी, पूजाअर्चेच्या वेळी वापरावयाचे काही साहित्य व दंडगोल मुद्रा हेच काय ते हयांचे कलापूर्ण अवशेष आता पर्यंत सापडले आहेत. याशिवाय सीमांत दगडांवरील शिल्पातील चिन्हे, पंखाचा सूर्य, स्फिक्स हयांच्या काही आकृत्या आढळतात. त्या सर्वाची शैली ईजिप्त संस्कृतीसारखी दिसते. स्वतंत्र असे कॅसाइट वाङ्मय अद्यापि उपलब्ध झालेले नाही.
माटे, म. श्री.