टाटा घराणे : भारतातील लोखंड व पोलाद उद्योगाचा पाया घालणारे, तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीकरिता कापडगिरण्या, जलविद्युत्‌प्रकल्प उभारणारे जगप्रसिद्ध कारखानदार, व्यापारी, दानशूर व देशभक्त घराणे.

टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी, त्यांचे दोन सुपुत्र सर दोराबजी व सर रतनजी आणि जमशेटजींचे पुतणे जहांगीर रतनजी दादाभाई (जे. आर. डी) हे या घराण्यातील धडाडीचे, कल्पक व दीर्घोद्योगी असे कर्ते पुरुष होत. एकाच घराण्यातील तीन कर्तबगार पिढ्यांनी घडवून आणलेला देशाचा प्रचंड औद्योगिक विकास, ही एक अनन्यसाधारण वस्तुस्थिती होय.

टाटा घराण्याचे कर्तबगार चतुष्टय संस्थापक

जमशेटजी                     दोराबाजी                  रतनजी            जे. आर. डी.

टाटा उद्योगाचे आद्य प्रवर्तक जमशेटजी नसरवानजी (३ मार्च १८३९–१९ मे १९०४) यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे एका पारशी घराण्यात झाला. जमशेटजींच्या वडिलांची मुंबईत व्यापारी पेढी होती. वयाच्या तेराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईस आले. १८५६–५८ या काळात त्यांनी एल्‌फिन्स्टन कॉलेजमधून शिक्षण घेतले. रामकृष्ण गोपाळ भांडारकर व दिनशा वाच्छा हे जमशेटजींचे सहाध्यायी होते. १८५८ मध्ये जमशेटजी एल्‌फिन्स्टनमधून ‘ग्रीन स्कॉलर’ (पदवीप्राप्त) म्हणून उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेत असतानाच जमशेटजींचा करसेटजी डाबू या पारशी गृहस्थांच्या हीराबाई या कन्येशी विवाह झाला. दोराबजी (जन्म १८५९) व रतन (जन्म १८७१) हे त्यांचे पुत्र. १८५९ मध्ये जमशेटजी आपल्या वडिलांच्या व्यवसायात शिरले. याच सुमारास हाँगकाँगच्या ‘जमशेटजी ॲड अर्देशिर’ शाखेच्या व्यवहारात लक्ष घालण्यासाठी त्यांना हाँगकाँगला पाठविण्यात आले. तेथूनच पुढे ते शांघायला गेले व तेथे त्यांनी दुसरी शाखा उघडली. १८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर त्यांनी मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळे निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन तिचे कापडगिरणीत रूपांतर केले. तिचे ‘ॲलेक्झांड्रा मिल’ असे नामकरण करून त्यांनी आपल्या औद्योगिक कारकीर्दीस प्रारंभ केला. या पहिल्याच उपक्रमामुळे जमशेटजींना कीर्ती व संपत्ती या दोहोंचाही लाभ झाला. जमशेटजींनी ही भरभराटीस आणलेली गिरणी विकून टाकली. यानंतर मोठ्या आकारामानाची कापडगिरणी स्थापण्याचा संकल्प सोडून ते कापडउद्योगाचे अधिक शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविण्याकरिता पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे फिरोजशहा मेहतांशी त्यांचा घनिष्ठ स्नेह जडला. १८७४ मध्ये भारतात परतल्यावर अनेक मित्रांचा विरोध असूनही जमशेटजींनी मुंबईऐवजी नागपूर येथे ‘एम्प्रेस मिल्स’ ही कापडगिरणी सुरू केली (१ जानेवारी १८७७) एम्प्रेस मिल्सच्या स्थापनेपासूनच जमशेटजींनी कामगारकल्याण योजना कार्यान्वित केल्या. कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन (१८८६) तिचे ‘स्वदेशी मिल्स’ मध्ये रूपांतर करून त्यांनी कापडधंद्याचा विस्तार केला. त्याच वर्षी जमशेटजींनी अहमदाबाद येथील ‘ॲडव्हान्स मिल्स’ ही कापडगिरणी भरभराटीस आणली. स्वदेशी मिल्स या गिरणीच्या रूपाने जमशेटजींची स्वदेशी चळवळीबद्दल वाटणारी आस्था प्रकट झाली, तर ॲडव्हान्स मिल्सच्या रूपाने त्यांचा कापडउद्योगातील आधुनिकीकरणाचा दृष्टिकोन दिसून आला. भारतीय कापडउद्योगाचे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय जमशेटजींना द्यावे लागते. त्याच्याच अनुषंगाने भारतात लांब धाग्याचा कापूस उत्पादनाकरिताही त्यांनी प्रयत्न केले.

जमशेटजींनी आपल्या कापडगिरण्यांचे व्यवस्थापन म्हणजे वित्तपुरवठा, यंत्रसामग्री, देखभाल आणि कामगारकल्याण इ. कार्यक्षम राखले होते. उद्योगधंद्यांतील सम्यक अर्थप्रबंधासाठी त्यांनी दाखविलेली योजकता व उपक्रमशीलता ही अनन्यसाधारण होती. परिणामतः त्यांनी प्रत्येक गिरणीतून तुलनेने अधिक नफा मिळवून दाखविला. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना, जमशेटजींनी ‘टाटा लोखंड व पोलाद कारखाना’, जमशेटपूर व ‘टाटा हायड्रो-इलेक्ट्रिक कंपनी’ या दोन प्रकल्पांचे आराखडे वा योजना तयार केल्या. नागपूर, मुंबई, अहमदाबाद येथील गिरण्यांतून त्यांनी प्रासंगिक अकुशल कामगारांचे कुशल कामगारवर्गात रूपांतर केले. त्यांच्या कल्याणार्थ अनेक गोष्टी केल्या. कामगारांना अद्ययावत यंत्रसामग्री हाताळण्याचे प्रशिक्षण दिले.

मुंबई शहरातील सुधारणांशी जमशेटजींचा संबंध १८६३ पासूनच होता. १८९० पासून त्यांनी मुंबईतील जमीनजुमल्यांच्या खरेदीस प्रारंभ केला. ते व त्यांचे कुटुंबीय एका वास्तूत बराच काळ कधीच राहिले नाहीत. वारंवार त्यांनी नवनवीन जमिनी खरेदी केल्या व त्यांवर इमारती बांधल्या. घरे बांधणे हा जमशेटजींचा एक आवडता छंद होता. त्यांनी मध्यमवर्गातील पारशी लोकांकरिताही घरे बांधली. शहरात उभारलेल्या अनेक भव्य इमारती म्हणजे टाटांच्या दानशूरत्वाचेच प्रतीक होय. पारशी जिमखाना उभारण्यात त्यांनी बरेच श्रम घेतले. १८९८ मध्ये ताजमहाल हॉटेलाचा शिलान्यास करण्यात आला. त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा यावा म्हणून जमशेटजींनी यूरोपात दौरा काढून तेथील हॉटेल व्यवसायाचा अभ्यास केला. १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू झाले.

जमशेटजींना ब्रिटिशांकित भारतातील सनदी नोकरवर्ग तयार करणारे शिक्षण प्रथमपासूनच आवडत नव्हते. तशातच ‘जर हिंदी विश्वविद्यालये ही केवळ परीक्षा घेणारी यंत्रे बनतील, तर उच्च शिक्षणाची वाढ हिंदुस्थानात होणे अशक्य आहे’, ह्या लॉर्ड रे यांच्या उद्‌गारांची भर पडली आणि या आक्षेपास उत्तर म्हणून जमशेटजींनी ‘भारतीय विज्ञान संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) काढण्याचे ठरविले. संशोधनपर व शास्त्रीय दृष्टी येण्यासाठी प्राध्यापक बरजोर पादशहा यांना परदेशांस पाठविले. त्यांनी सबंध यूरोप, अमेरिका यांमधील नामवंत शास्त्रज्ञांच्या गाठीभेटी घेऊन स्वदेशास परतल्यावर जमशेटजींना अहवाल दिला. अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स इन्स्टिट्यूट’ सारखी संस्था भारतात उभारावयाचे ठरले त्यासाठी जमशेटजींनी ३० लक्ष रु. काढून ठेवले. १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. ही एक जगद्‌विख्यात संस्था मानली जाते.

अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. बंगालमध्ये लोखंड आणि पोलाद यांच्या निर्मितीची आधुनिक पद्धतीनुसार शक्यता असल्याचा मेजर मॅहोन नावाच्या सरकारी अधिकाऱ्‍याचा अहवाल त्यांच्या वाचनात आला. त्यानुसार जमशेटजींनी शास्त्रीय ज्ञान संपादन करून संशोधन करविले आणि दोराबजी टाटा यांनी आपले भूवैज्ञानिक प्रमथनाथ बोस यांच्या साहाय्याने बंगालमध्ये लोखंडाच्या टेकडयांचा शोध लावला. याकरिता जमशेटजींनी स्वतःचे व लोकांचे मिळून १६·३ लक्ष पौंड भांडवल गुंतविले ते कमी पडू लागताच ग्वाल्हेरच्या महाराजांकडून त्यांना आणखी चार लक्ष पौंड मिळाले व या प्रचंड कामास प्रारंभ झाला. जमशेटजींनी भारताच्या बऱ्‍याच प्रदेशांची संशोधनपूर्ण पाहणी केली. शेवटी कोळसा व पाणी यांचे वैपुल्य असलेल्या बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील एक स्थान त्यांनी निवडून तेथे पोलादकारखाना उभारावयाचे ठरविले. पूर्वीचे साक्‌ची नावाचे खेडे जमशेटपूर शहर बनले व तेथे ‘द टाटा आयर्न अ‍ँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या कारखान्यात पार पाडल्या जातात. जगामधील प्रचंड व प्रगत लोखंड-पोलाद कारखान्यांमध्ये टिस्कोची गणना होते.

जमशेटजींनी दुसरी भव्य योजना म्हणजे पश्चिमी घाटामधून पडणाऱ्‍या प्रचंड जलप्रपातांपासून वीजनिर्मिती करणे, ही होय. त्यासाठी या प्रकल्पाची पायाभरणी मात्र ८ फेब्रुवारी १९११ रोजी झाली. फेब्रुवारी १९१५ पासून लोणावळा, वळवण, शिरोटा, ठोकरवाडी व मुळशी या पाच ठिकाणी असलेल्या धरणांच्या पाण्याचा उपयोग करून खोपोली, भिवपुरी व भिरा येथील वीजउत्पादन केंद्रे मुंबईला विजेचा पुरवठा करू लागली.

ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला. जो धंदा करावयाचा तो नाविन्यपूर्ण व त्यातील उत्पादन सफाईदार व पहिल्या दर्जाचे असले पाहिजे, या त्यांच्या ‘टाटा टच’ मुळे बाजारात ‘टाटा’ या नावाला फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

जमशेटजींनी आपल्या औद्योगिक ध्येयवादात स्वदेशाच्या आणि स्वकीयांच्या गरजांची जाणीव सतत राखली होती. त्यांनी दूरदृष्टीने टाटा सन्स लि. या  संस्थेची स्थापना करून (१८८७) तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा उद्योगसमूहातील विविध उद्योगांना आणि संस्थांना होणारा फायदा न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो.

भारतातील आधुनिक उद्योगधंद्यांचे प्रवर्तन जमशेटजींनी केले. ‘इतर पुढारलेल्या राष्ट्रांच्या बरोबरीने जर हिंदुस्थानला जावयाचे असेल, तर त्याचे औद्योगिक कार्यक्षेत्र विस्तृत झाले पाहिजे हिंदुस्थानची भौतिक उन्नती होण्याचा शक्य कोटीत असणारा मार्ग हाच आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. व्यवहारी दृष्टीबरोबरच कल्पकता, उपक्रमशीलता, समयोचितता, धाडसीपणा आणि निकोप व्यापारी दृष्टी ह्या गुणांमुळेच जमशेटजींना अपार यश लाभले. रूढ धंद्यांपेक्षा नवेनवे औद्योगिक क्षेत्र शोधण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.

राष्ट्रीय व आर्थिक पारतंत्र्याच्या काळात ‘स्वदेशी’च्या संकल्पनेला सिद्धीचे रूप देण्यात, देशातील नैसर्गिक साधनसामग्रीच्या शोधाकरीता व विकासाकरिता प्रचंड श्रम घेण्यात आणि वैज्ञानिक अन्वेषणाची प्रेरणा देण्यात जमशेटजी टाटा हे अग्रभागी होते. देशातील खनिजसंपत्तीचा शोध व विकास हा देशातील लोकांनीच देशी भांडवलाच्या साहाय्याने घडवून आणला पाहिजे, या मतावर जमशेटजींचा पूर्ण विश्वास होता. यशस्वी उद्योगपती तसेच व्यापारी असूनही त्यांचे औदार्य व दानशूरत्व अनन्यसाधारण होते. औद्योगिक क्रांतीच्या काही अनिष्ट परिणामांचेही त्यांना यथार्थ भान होते. त्यांपासून आपल्या कारखान्यांतील कामगारांना वाचविण्यासाठी कामगार-कल्याणाच्या अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या. ग्रंथ वाचणे व टिपणे काढणे, हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांच्या सर्व लहानमोठ्या औद्योगिक प्रकल्पांना त्या त्या उद्योगधंद्यातील अद्ययावत ज्ञानाचे अधिष्ठान होते. नाउहाइम (प. जर्मनी) येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. त्यांचे शव लंडनला नेण्यात येऊन २४ मे १९०४ रोजी पारशी धर्मानुसार ब्रुकवुड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्‌गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात सर दोराबजी व सर रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.

सर दोराबजी जमशेटजी टाटा : (२७ ऑगस्ट १८५९–३ जून १९३२). जमशेटजींचे ज्येष्ठ पुत्र. जन्म मुंबईस. वयाच्या सोळाव्या वर्षीच ते यूरोपात शिक्षणासाठी गेले. १८७६ मध्ये स्वदेशी परतल्यावर मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून ते बी.ए. झाले (१८८२). लहानपणापासून त्यांचा खेळाकडे, विशेषतः क्रिकेटकडे, विशेष ओढा होता. मर्दानी खेळांच्या आवडीमुळे मुंबईत अनेक व्यायामसंस्था सुरू करण्यात त्यांचा वाटा होता. वडिलांच्या कापसाच्या धंद्याचा विस्तार करून त्यांनी त्याच्या शाखा जगातील प्रमुख शहरांतून उघडल्या. टाटा लोखंड व पोलाद कारखाना, जमशेटपूर बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था व लोणावळा येथील टाटा इलेक्ट्रिक कंपनीज या कंपन्यांच्या उभारणींमध्ये दोराबजींचा पुढाकार होता. स्त्रीशिक्षणार्थही त्यांनी आर्थिक साहाय्य केले. १९१० साली त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘सर’ हा किताब मिळाला. १९१५ मध्ये भारतीय औद्योगिक परिषदेचे ते अध्यक्ष, तर १९१८ मध्ये नेमलेल्या भारतीय औद्योगिक आयोगाचे ते एक सभासद होते. दोराबजींनी भारताचे औद्योगिकीकरण साधण्याच्या दृष्टीने वडिलांनी सुचविलेल्या अनेक योजनांना मूर्त रूप दिले, त्याचबरोबर समाजसेवेचेही व्रत अखंडपणे चालविले. मेहेरबाई ह्या आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या स्मरणार्थ लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला (१९३२). त्याचा उद्देश रक्तार्बुदविषयक रोगासंबंधी अधिक संशोधन व साहाय्य करणे हा होता. शिक्षणाविषयी दोराबजींचा उदार दृष्टिकोन होता आणि अभियांत्रिकी व वैद्यकीय संशोधन यांमध्ये तर यांना अधिक रस होता. १९२० मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठास अभियांत्रिकी विभागातील प्रयोगशाळांच्या साधनसामग्रीसाठी २०,००० पौंडांची देणगी दिली. आयुष्याच्या अखेरीस दोराबजींनी आपली सारी संपत्ती आपल्या नावाने उभारलेल्या न्यासास सार्वजनिक कार्यार्थ दिली. १९४५ मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टजवळ सु. २० लक्ष पौंड रक्कम होती तीपैकी सु. आठ लक्ष पौंड रक्कम विविध दानकार्ये व टाटा मेमोरियल (कॅन्सर) हॉस्पिटल, टाटा समाजविज्ञान संस्था, टाटा मौलिक संशोधन संस्था इत्यादींसाठी खर्च करण्यात आली. एप्रिल १९३२ मध्ये दोराबजी धंद्यानिमित्त यूरोपला गेले. किसिंगन (प. जर्मनी) येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अवशेष इंग्लंडला नेण्यात येऊन ब्रुकबुड येथील पारशी कबरस्तानात आपल्या दिवंगत पत्नीशेजारी त्यांचे दफन करण्यात आले.

सर रतनजी जमशेटजी टाटा : (२० जानेवारी १८७१–५ सप्टेंबर १९१८). जमशेटजींच्या या द्वितीय मुलाचा जन्म मुंबईत झाला. वडिलांच्या सर्व परंपरा त्यांनीही पुढे चालविल्या. टिस्कोच्या स्थापनेत त्यांचाही मोठा वाटा होता. रतनजी यांचा बुद्धीमंतांकडे अधिक ओढा होता आणि कलाविषयांमध्ये त्यांना विशेष रस होता. मृत्यूनंतर त्यांचा मोठा कलावस्तुसंग्रह प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयास देण्यात आला. पाटलिपुत्राजवळील एका पुरातत्त्वीय संशोधन मोहिमेसाठी त्यांनी ७५,००० रु. दिले. रतनजींनी म. गांधींना द. आफ्रिकेच्या प्रचार दौऱ्‍यासाठी सव्वा लाख रु. दिले होते. नामदार गोखले यांच्या कार्याविषयी रतनजींना अपार श्रद्धा वाटत होती म्हणूनच अनेक वर्षे भारत सेवक समाजाला देणग्यांच्या रूपाने त्यांनी सतत मदत केली. दारिद्र्य व तदानुषंगिक सामाजिक समस्यांच्या अभ्यासाकरिता रतनजींनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲड पॉलिटिक्स’ या संस्थेत एक रतन टाटा निधी व अध्यासन स्थापन केले. रतनजींनाही ‘सर’ हा बहुमान लाभला. कॉर्नवॉल (इंग्लंड) येथे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी रतनजी निधन पावले. मृत्यूसमयी त्यांच्या नावे उभारण्यात आलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट या न्यासाकडे त्यांनी आपली सर्व वैयक्तिक संपत्ति दिली. त्या वेळी या न्यासाजवळ ८१ लक्ष रु. होते. ह्या न्यासाची बहुउद्देशीय कार्ये असून आतापर्यंत त्याने सु. दोन कोटी रुपयांचा विनियोग जनहितार्थ केला आहे त्यांपैकी जमशेटपूरच्या राष्ट्रीय धातुविज्ञान प्रयोगशाळेस ११·७५ लक्ष रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जे. आर. डी. टाटा) : (२९ जुलै १९०४–   ). जमशेटजींच्या चुलतभावाचे (रतनजी दादाभाई) पुत्र व टाटा उद्योगसमूहाचे सध्याचे अध्यक्ष (१९७६). त्यांचा जन्म पॅरिसला झाला. १९२२ मध्ये टाटा सन्स लि. मध्ये ते साहाय्यक होते. १९२६ मध्ये ते एक संचालक झाले. १९३८ मध्ये टाटा उद्योगांचे अध्यक्षपद लाभले. भारतीय विज्ञान संस्थेच्या विधिसभेचेही ते अध्यक्ष आहेत. भारतात विमानचालकाचा परवाना मिळविणारे पहिले मानकरी म्हणून ते सर्वश्रुत आहेत. ३ मे १९३० रोजी त्यांनी इंग्लंडला एकट्याने विमानोड्डाण केले. त्यांच्या प्रेरणेने १९३२ साली टाटा सन्स लि. चा एक विभाग म्हणून टाटा एअरलाइन्सची स्थापना करण्यात आली. कराची–मुंबई मार्गावरील पहिले उड्डाण स्वतः करून या कंपनीच्या कार्याचा त्यांनी श्रीगणेशा केला (ऑक्टोबर १९३२). १९४६ मध्ये स्थापन झालेल्या एअर इंडिया लिमिटेडचे व १९४८ मध्ये स्थापण्यात आलेल्या एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडचे ते अध्यक्ष होते. नागरी हवाई वाहतुकीच्या राष्ट्रीयीकरणापासून (ऑगस्ट १९५३) एअर इंडिया इंटरनॅशनल निगमाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच इंडियन एअरलाइन्स या अंतर्गत हवाई वाहतूक कंपनीचे ते सदस्य आहेत. भारतीय अणुऊर्जा आयोग, केंद्रीय सल्लागारी उद्योग परिषद, राष्ट्रीय अनुप्रयुक्त अर्थशास्त्र संशोधन परिषद यांचेही ते सदस्य आहेत. ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्‌स’ आणि ‘टाट एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष. १९४८ साली ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. मिलवॉकी (विस्कॉन्सिन) येथील ‘नॅशनल असोसिएशन ऑफ फोरमन’ या संस्थेने १९५३ मध्ये ‘इंटरनॅशनल मॅनेजमेंट मॅन’ (आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रवीण) म्हणून त्यांचा गौरव केला. ‘ऑफिसर ऑफ लीजन ऑफ ऑनर’ म्हणून फ्रान्स सरकारनेही त्यांचा बहुमान केला (१९५४). भारत सरकारने १९५५ साली त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. मद्रास मॅनेजमेंट असोसिएशनने १९६९ साली त्यांना बिझिनेस लीडरशिप पुरस्कार दिला. जे. आर. डीं.नीही १९४४ मध्ये आपल्या नावाचा एक न्यास उभारला आहे. जमशेटजी, दोराबजी, रतनजी या पूर्वसूरींच्या सगळ्या उत्तम गुणांचा परिपाक जे. आर. डी. टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय उद्योगधंद्यांची स्थिती व गरजा या स्वतंत्र भारतातील तशा स्थिति-गरजांपेक्षा वेगळ्या आहेत. या नव्या परिस्थितीची यथार्थ जाणीव ठेवून जे. आर. डीं.नी टाटा उद्योगधंद्यांचा कालोचित विकास साधण्याची दृष्टी ठेवली आहे. जमशेटजींची कल्पकता, उपक्रमशीलता, साहसीपणा आणि दोरबजी-रतनजींचे कलाविद्यांचे व क्रीडेचे प्रेम त्यांच्यात आढळून येते. त्यांमुळे एक संपन्न, पुरोगामी, कलाविद्याप्रेमी असा हा माणूस टाटा घराण्याला ललामभूत ठरला आहे.

टाटा उद्योगसमूह हा १९५० पासून भारतातील सर्वांत मोठा उद्योगसमूह म्हणून गणला जाऊ लागला. या समूहात कापड-वस्त्रे, पोलाद व वीज, कृषिअवजारे व सामग्री, रेल्वेडबे व एंजिने, डिझेल ट्रक व अन्य अवजड सामग्री, रसायने, सिमेंट, खाद्यतेले, साबण व प्रसाधनवस्तू, मनोरंजनात्मक व इलेक्ट्रॉनीय उपकरणे इ. विविध प्रकारचे उत्पादन होत असते. ह्यांशिवाय पर्यटन उद्योग, हॉटेल उद्योग व विमाव्यवसाय ह्यांमध्येही टाटांची यशस्वी वाटचाल आहे. टाटा उद्योगसमूहाची रूपरेषा तसेच टाटा न्यासांच्या विविधांगी समाजोपयोगी कार्याचे स्वरूप खालील तक्त्यावरून सुस्पष्ट होईल.

टाटा उद्योगसमूहाची रूपरेषा

क्र.

उद्योगाचे नाव

स्थापना

वर्ष

उत्पादन  प्रकार

कर्मचारी  संख्या

(१९७३)

नियंत्रक कंपनी :

(अ)         टाटा सन्स प्रा. लि [मूळ व्यापारी  पेढीचे(१८६८) रूपांतर करून बनलेलीसर्व टाटा उद्योगांची  नियंत्रक कंपनी].

(आ)       टाटा इंडस्ट्रीज प्रा. लि. (दुय्यम कंपनी). एकूण गुंतविलेले  भांडवल ४९८·७७ कोटी  रु. (३१ मार्च १९७३). स्थूल उत्पन्न (वार्षिक) ७६७·१५ कोटी रु.

१९१७

१९४५

एकूण     १,३८,१४२

कापड उद्योगसमूह : 

(अ)    द सेंट्रेल इंडियास्पिनिंग, वीव्हिंगॲड  मॅन्यु. कं. लि. (एम्प्रेस मिल्स, नागपूर). 

(आ)   द स्वदेशी  मिल्स कं. लि. मुंबई .

(इ)      द अहमदाबाद  ॲडव्हान्स मिल्स लि.,अहमदाबाद

(ई)        द टाटा मिल्स लि.,  मुंबई.

१८७४–७७

१८८६

१९०३

१९१३

कापड

७,३६९

४,८२०

३,६६१

५,४००

टाटा वीज कंपन्या (मुंबई) :

(अ)      द टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कं. लि.

(आ)    द आंध्र व्हॅली पॉवर सप्लाय कं. लि.

(इ)       द टाटा पॉवर  कं. लि.

१९१०

१९१६

१९१९

वीजउत्पादन

२,३२०

द इंडियन हॉटेल्स कं. लि.

(अ)      ताजमहाल हॉटेल व ताजमहाल इंटरकाँटिनेंटल, मुंबई.

(आ)    लेक पॅलेस हॉटेल, उदयपूर. 

(इ)       रामबाग पॅलेस हॉटेल, जयपूर.

(ई)       ताज कॉरोमांडल, मद्रास. 

(उ)      फोर्ट आग्वाद बीच  रिझॉर्ट, गोवा.

१९०२–०३

सेवा-उद्योग

१,२००

द टाटा आयर्न ॲड स्टील कं. लि. (टिस्को), जमशेटपूर.

१९०७

पत्रे, गज, रेल्वेचे रूळ, स्लीपर, फिशप्लेट, शेतीची अवजारे,रेल्वेचे आस, चाके, टायर, कांबी, बांधकाम सामग्री उपपदार्थ:  डामर, अमोनिया सल्फेट, बेन्झॉल, फेरोमँगॅनीज इत्यादी.

५६,९००

द टाटा ऑईल मिल्स कं. लि. (टॉम्को).  टाटापुरम्–कोचीन, मुंबई, कलकत्ता, गाझियाबाद  (उ.प्र.), मद्रास, कालिकत.   

१९१७

स्नानाचा आणि कपडे धुण्याचा साबण, प्रक्षालके, ग्लिसरिन,स्निग्धाम्ले, प्रसाधनसामग्री, वनस्पती तूप, खाद्यतेले, प्रथिने,प्रथिनयुक्त खाद्यान्ने, चहा, ओ-द-कोलोन.

४,७२३ 

युनिटाटा, एस्.डी. एन्.मलेशिया,   

} संयुक्त प्रकल्प

टांझानिया, सिंगापूर व क्कालालुंपुर.

टाटा प्रेस लि., मुंबई. (‘कमर्शियल प्रिंटिंग प्रेस’  या नावाने १८६२ साली  स्थापन झालेला छापखाना  टाटांनी १९३० मध्ये घेतला).

१९३०

टाटासमूहातील उद्योगांची विविध प्रकारची छपाई, तांत्रिक विषयांवरीलपुस्तके, कलाविषयांना वाहिलेले मार्ग  (त्रैमासिक).

५४५

द इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., मुंबई.  उपकंपन्या : 

(अ) द इंडियन स्टँडर्ड  मेटल कं.

(आ) इन्व्हेस्टा इंडस्ट्रियल  कॉर्पोरेशन लि.

१९३७

भांडवल गुंतवणूक कार्य.

४९


क्रमांक 

उद्योगाचे नाव

स्थापना

वर्ष

उत्पादन  प्रकार

कर्मचारी  संख्या (१९७३)

द असोशिएटेड बिल्डिंग कं. लि., मुंबई.  

१९२१

टाटा कंपन्यांच्या कार्यालयाचे बांधकाम.

१०

टाटा केमिकल्स लि. (टाटाकेम), मीठापूर (गुजरात राज्य).   

१९३९

 सोडा ॲश व सोडियम बायकार्बोनेट, कॉस्टिक सोडा, कीटकनाशके, आणि  कृषिरासायनिके, विविध प्रकारचे मीठ.

२,८००

११

द नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कं.लि.(नेल्को), मुंबई.

१९४०

मनोरंजनाची इलेक्ट्रॉनीय उपकरणे, औद्योगिक इलेक्ट्रॉनीय वस्तू, वैद्यकीय  इलेक्ट्रॉनीय उपकरणे.

१,१७०

१२

टाटा एंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कं. लि. (टेल्को),जमशेटपूर, पुणे. सिंगापूर  येथे संयुक्त प्रकल्प.

१९४५

ट्रक, उत्खनक, दाबयंत्रे व मुद्रा, यांत्रिक हत्यारे, डंपर्स, टिपर्स.

२५,१२७

१३

लॅक्मे लि., मुंबई. (टॉम्कोची पूर्णतः मालकीची उपकंपनी).

१९५२

उच्च दर्जाची सौंदर्यप्रसाधने, सुवासिक अत्तरे, वेषभूषा सामग्री.

३५२

१४

व्होल्टाज लि., मुंबई.(विपणन, अभियांत्रिकी व निर्मिती असेतीन विभाग असलेलीएक मोठी समाकलितउद्योगसंघटना).

१९५४

निर्मिती विभाग : वातानुकूलन व प्रशीतन संयंत्रे, खाणकामयंत्रे, फोर्कलिफ्ट ट्रक, पॉवरकपॅसिटर.

अभियांत्रिकी विभाग : सबंध कारखाना  वा प्रकल्प याची त्याच्या अभिकल्पासहउभारणी.

विपणन विभाग : वरील वस्तू व अन्य वस्तू  यांचे विपणन

७,३१७

१५

द इंडियन ट्यूब कंपनी लि.,कलकत्ता.

१९५४

कंटिन्युअस वेल्ड ट्यूब, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स वेल्ड ट्यूब, सीमलेस ट्यूब.

४,६४७

१६

ससून जे. डेव्हिड अँड कं.लि., मुंबई.

१९५६

भांडवल गुंतवणूक व्यवहार.

१७

१७

इंडस्ट्रियल परफ्यूम्स लि.,मुंबई.

१९५७

सुगंधी रसायने, सुवासिक संयुगे आणि  बाष्पनशील तेले.

१४२

१८

इंटरनॅशनल फिशरीज लि., मुंबई.

१९५७

गोठविलेली कोळंबी व अन्य प्रक्रियित खाद्यान्नांची निर्यात.

१९

टाटा सर्व्हिसेस लि., मुंबई.

१९५७

विविध सेवा.

३२९

२०

बेल्याहार रिफ्रॅक्टरीज लि., बेल्पाहार (ओरिसा), करुप्पूर  (सेलम जिल्हा) तमिळनाडू.

१९५८

तापसह माती, सिलिका व उत्तापसह विटा. 

२१

टाटा एक्स्पोर्ट्‌स लि., मुंबई.

१९६२

भारतातील सर्व प्रकारच्या उत्पादित मालाची-निर्यात  करणारी कंपनी. स्थापनेपासून १०० कोटी रुपयांहून अधिक निर्यात सिद्ध.

२२

टाटा–रॉबिन्स फ्रेझर लि., जमशेटपूर.

१९६२

सामग्री हाताळण्याची उपकरणे व यंत्रे.

७०९

२३

टाटा–फिन्‌ले लि., बंगलोर, अलाहाबाद, मुन्नार (केरळ).

१९६२

चहा, झटपट चहा.


क्रमांक 

उद्योगाचे नाव

स्थापना

वर्ष

उत्पादन  प्रकार

कर्मचारी  संख्या

(१९७३)

२४

टाटा मर्लिन अँड गेरिन लि.,मुंबई.

१९६४

विद्युत् स्विचगिर, ४०० व्होल्टपासून २,२०,००० व्होल्टपर्यंतची विद्युत् सामग्री व उपकरणे.

७२०

२५

कॉरोमांडल गार्मेट्स लि., मद्रास

१९६४

तयार कपडे.

२६

टाटा–योदोगावा लि. (टोयो),आदित्यपूर (बिहार).

१९६८

पोलाद, कागद व रबर उद्योगांसाठी  पोलादाचे रोल.

५५३

२७

कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,(टाटा सन्स प्रा. लि. चा एक विभाग).

१९६८

व्यवस्थापन आणि संगणक – सुविधांची उपलब्धता, आर्थिक  संशोधनकार्य, भांडवल गुंतवणूक व्यवहार.

८०

२८

टाटा कन्सल्टिंग एंजिनिअर्स, मुंबई.

१९६८

जल-औष्णिक-विद्युत् व आण्विक संयंत्रे, तसेच रसायन, खतनिर्मिती, औद्योगिक  प्रकल्पांचे अभिकल्प, अभ्यास अहवाल तयार करणे.

६८०

२९

टाटा–डिलवर्थ, सेकॉर्ड, मीघेर अँड असोसिएट्स, मुंबई.  

१९६९

प्रगत यांत्रिक व विद्युत् अभियांत्रिकी  क्षेत्रांतील कार्य.

३०

टाटा–मॅक्‌ग्रॉहिल पब्लिशिंग कं. मुंबई.

१९७०

विविध विषयांवरील शैक्षणिकपुस्तके.

३१

३१

टाटा लि. लंडन.

१९०७

टाटा कंपन्यांची विदेशीय प्रातिनिधिक संस्था.

३२

टाटा इंटरनॅशनल ए. जी., टाटा ए. जी. झूग, स्वित्झर्लंड (टाटा सन्स लि. ने स्थापिलेल्याकंपन्या).

उपकंपनी :

ऑरिटा कॉर्पोरेशन   

१९६१

भारताचे पारंपरिक पदार्थ, अर्धनिर्मित वस्तूआणि औद्योगिक माल यांच्या निर्यातीस चालना देण्याचे प्रमुख कार्य.

भारतीय स्त्रियांच्या विविध वेषभूषांचे व पोषाखांचे विपणन करणारी कंपनी.

३३

टाटा इन्कॉर्पोरेटेड, न्यूयॉर्क.

१९४५

टाटा कंपन्या व अन्य भारतीय कंपन्या यांचे अमेरिका व कॅनडा  यांमध्ये प्रतिनिधित्व करणारी संस्था. यंत्रसामग्री, कच्चा माल, तांत्रिक सहकार्य  संयुक्त उद्योग वगैरेंसंबंधीचे कार्य.  वित्तविषयक व्यवहार.

टाटा न्यास : (१) जे. एन्, टाटा इन्डाउमेंट फॉर हायर एज्युकेशन : स्थापना १८९२. कार्य : समाजातील अतिशय हुषार परंतु गरजू विद्यार्थ्यांना अतिशय कमी व्याजाने द्रव्यसाहाय्य करून मानव्यविद्या, विधी, वैद्यक व अभियांत्रिकी या विषयांत विशेष प्रावीण्य संपादण्यासाठी इंग्लंड, अमेरिका इ. देशांना पाठविणे. पूर्वी आय्. सी. एस्. सारख्या स्पर्धात्मक परीक्षांना बसण्यासाठीही हुषार विद्यार्थ्यांना इंग्लंडला पाठविण्यात येत असे. आता विशेषतः विज्ञान व तंत्रविद्या यांवर जास्त भर देण्यात येतो. स्थापनेपासून आतापर्यंत या न्यासामुळे ९०० च्या वर विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचा लाभ मिळाला असून त्याकरिता सु. एक कोटी रुपयांवर रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.

(२) सर रतन टाटा ट्रस्ट : स्थापना १९१८. कार्य : स्थापनेपासून आतापर्यंत २·८८ कोटी रु. विविध समाजोपयोगी कार्यासाठी खर्चण्यात आले. त्यांमध्ये शिक्षण, वैद्यकीय साहाय्य, नैसर्गिक आपद्ग्रस्तांसाठी साहाय्य, सामाजिक व औद्योगिक कल्याणकार्य, लोकोपयोगी सेवाउद्योगांस साहाय्य इत्यादींचा समावेश होतो. जमशेटपूरच्या राष्ट्रीय धातुविज्ञान प्रयोगशाळेच्या स्थापनेकरिता मोठे साहाय्य.

(३) लेडी मेहेरबाई डी. टाटा एज्युकेशन ट्रस्ट : स्थापना १९३२. कार्य : सर दोराबजी टाटांनी आपली पत्नी लेडी मेहेरबाई टाटा हिच्या स्मरणार्थ स्थापन केलेला न्यास. पदवीप्राप्त महिलांना परदेशांत जाऊन सामाजिक कार्याचा अभ्यास करता यावा म्हणून न्यासातर्फे शिष्यवृत्त्या देण्यात येतात. न्यासाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ६१ पदवीप्राप्त महिलांना एकूण ४·२० लक्ष रु. रकमेच्या शिष्यवृत्त्या देण्यात आल्या.

(४) लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट : स्थापना १९३२. कार्य : सर दोराबजी टाटांनी आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला न्यास. या न्यासातून रक्तार्बुदविषयक संशोधनार्थ आंतरराष्ट्रीय व भारतीय संशोधकांना पुरस्कार देण्यात येतात. एकूण रकमेपैकी २० टक्के द्रव्य भारतीय संशोधकांना दिले जाते. स्थापनेपासून न्यासाने २९·११ लक्ष रु. आतंरराष्ट्रीय व ८·२८ लक्ष रु. भारतीय पुरस्कारांकरिता दिले आहेत.

(५) सर दोराबजी टाटा ट्रस्ट : स्थापना १९३२. कार्य : नैसर्गिक आपत्ती व अरिष्टे यांपासून संरक्षण, ज्ञानाच्या सर्व शाखांतील, विशेषतः वैद्यकीय व औद्योगिक-विज्ञानविषयक शाखांतील संशोधनास साहाय्य आणि शिक्षणसंस्थांना मदत व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, असे या न्यासाचे प्रधान हेतू आहेत. न्यासाचे साहाय्य जात, धर्म, पंथ, प्रांतनिरपेक्ष असे असते. हा न्यास सर्व टाटा न्यासांमध्ये मोठा असून, राष्ट्रीय महत्त्वाच्या नव्या संस्थांची स्थापना करणे व काही एक काळानंतर त्या संस्था राष्ट्राला अर्पण करणे, हे पहिल्यापासून चालत आलेले तत्त्व ह्या न्यासानेही पाळले आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या नासाने सु. ६·२८ कोटी रुपयांचा विनियोग केला आहे. या न्यासाने खालील संस्था उभारल्या : (१) टाटा मेमोरियल सेंटर : यामध्ये ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ व ‘भारतीय कर्करोग संशोधन केंद्र’ या दोन संस्था येतात. कर्करोगावरील संशोधन आणि उपचार यांसाठी १९४१ मध्ये ३० लक्ष रु. खर्चून मुंबई येथे हॉस्पिटल उभारण्यात आले. १९५७ मध्ये हे हॉस्पिटल राष्ट्राला अर्पण करण्यात आले असले, तरी त्याच्या व्यवस्थापनामध्ये या न्यासाचे सहकार्य असते. कर्करोगावरील पदव्युत्तर अध्यापन व संशोधन करण्यासाठी भारत सरकारच्या सहयोगाने भारतीय संशोधन केंद्र १९५२ मध्ये उभारण्यात आले. ते १९६६ मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जोडण्यात आले. १९६९ मध्ये टाटा मेमोरियल सेंटरचे नाव ‘कर्करोग संशोधनकेंद्र’ (कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट) असे बदलण्यात आले. (२) टाटा सामाजिक विज्ञान संस्था : (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) : सामाजिक कार्यकर्त्यांना प्रगत प्रशिक्षण देणारी भारतातील एक प्रवर्तक संस्था. स्थापना १९३६. कामगार कल्याण व औद्योगिक संबंध, आदिवासी कल्याण आणि नागरी समूह विकास यांसारख्या सामाजिक विज्ञानांतर्गत उपशाखांचे शिक्षण देत असतानाच, विद्यार्थ्यांना संस्थेने चालविलेल्या ग्रामीण व नागरी कल्याणकेंद्रांमध्ये क्षेत्राभ्यास करण्याची संधी मिळते. संस्थेला विद्यापीठीय दर्जा असून तीमध्ये २०२ विद्यार्थी शिकत आहेत. (३) टाटा मौलिक संशोधन संस्था : (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च). १९४५ मध्ये मुंबई सरकारच्या सहकार्याने भौतिकी, गणित आणि आनुषंगिक विज्ञाने यांच्या प्रगत अभ्यासाकरिता स्थापण्यात आलेली संस्था. १९५६ मध्ये भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या त्रिपक्षीय करारानुसार, अणुकेंद्रीय विज्ञान व गणित यांच्या प्रगत अभ्यासाचे व मौलिक संशोधनाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून ही संस्था ओळखली जाऊ लागली. (४) टाटा ब्लड बँक ॲड ट्रॅन्स्फूजन सर्व्हिस : जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे सर दोराबजी व सर रतन टाटा ट्रस्ट हे दोन न्यास व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या सहकार्याने मुंबई शहरासाठी रक्तपेढी सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. (५) ग्रामीण कल्याण मंडळ : (रूरल वेल्फेअर बोर्ड). महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील निवडक खेडेगावांमधून कल्याण व विकासविषयक योजनांची कार्यवाही. मंडळाने आतापर्यंत देशाच्या विविध भागांत २५ दवाखाने उघडले आहेत.

(६) नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्‌स, मुंबई : स्थापना १९६६. कार्य : अभिजात, पारंपरिक व समकालीन कलांचे शास्त्रीय संशोधन केंद्र. हे साध्य करण्यासाठी शाळा, प्रेक्षागृहे, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, कलामंदिरे वगैरे स्थापन करणे हे उद्दिष्ट. मूळ टाटा ट्रस्टमधून यासाठी ५० लक्ष रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

(७) होमी भाभा फेलोशिप्स कौन्सिल : स्थापना १९६७. कार्य : होमी जे. भाभा यांच्या स्मरणार्थ टाटा ट्रस्ट्स व फोर्ड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नांतून स्थापना. होमी भाभा अधिछात्रवृत्त्या विविध शास्त्रे आणि मानव्यविद्या यांसाठी उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञ, अभियंते, वास्तुशिल्पज्ञ, शिक्षणवेत्ते, लेखक, कलाकार वगैरे समाजाच्या सर्व स्तरांतील उत्कृष्ट उमेदवारांना या अधिछात्रवृत्त्या दिल्या जातात. स्थापनेपासून आतापर्यंत २६ जणांना अधिछात्रवृत्त्या मिळाल्या आहेत.

संदर्भ : Harris, F. R. Jamsetji Nusserwanji Tata : A Chronicle of His Life, London, 1958.

गद्रे, वि. रा.