संत, इंदिरा : ( ४ जानेवारी १९१४ – १३ जुलै २०००). प्रसिद्घ मराठी भावकवयित्री. पूर्वाश्रमीचे नाव इंदिरा दीक्षित. जन्म इंडी ( जि. विजापूर ) या गावी. शिक्षण बेळगाव, कोल्हापूर व पुणे येथे बी.ए.बी.टी.पर्यंत. मराठी आणि मानसशास्त्र ह्या विषयांच्या अध्यापिका म्हणून तसेच बेळगाव येथील ‘ मराठी ट्रेनिंग कॉलेज ’च्या प्राचार्या म्हणून त्यांनी काम केले.
बालपणापासून त्यांना लेखनाची आवड होती. कुटुंबातूनच घडलेले स्त्रीगीतांचे व ओव्यांचे संस्कार त्यांच्यातील कवयित्री घडताना उपयुक्त ठरले. १९३२ सालापासून त्या जाणीवपूर्वक लेखन करू लागल्या. लघुनिबंधकार ना. मा.संत ह्यांच्याशी त्यांचा फर्ग्युसन महाविदयालयात शिकत असताना परिचय झाला आणि त्याची परिणती विवाहात झाली. त्यांना प्रकाश व रवीन्द्र ही दोन अपत्ये झाली. ह्या दांपत्याच्या कविता सहवास (१९४१) ह्या नावाने प्रसिद्घ झाल्या. बालकवी, माधव जूलियन्, अनिल आणि अनंत काणेकर ह्यांचा प्रभाव ह्या संगहातील कवितांतून जाणवतो. पुढे पतीच्या अकाली निधनानंतर एकलेपणाची तरल, अंतर्मुख भाववृत्ती घेऊन त्यांची कविता वेगळ्या रूपाने बहरली. शेला (१९५१), मेंदी (१९५५), मृगजळ (१९५७), रंगबावरी (१९६४), बाहुल्या (१९७२), मृण्मयी (१९८१), चित्कळा (१९८९), गर्भरेशमी (१९९०), वंशकुसुम (१९९४), निराकार (२०००) हे त्यांचे काव्यसंगह मृद्गंध(१९८६) हे आत्मकथन मालनगाथा हे स्त्रियांच्या ओव्यांचे संपादन (२ खंड, १९९६, व मरणोत्तर प्रकाशन २००२) कदली (१९५५) व चैतू (१९५७) हे कथासंगह इ. त्यांच्या साहित्यकृती होत. जीवनातील स्वास्थ्यापेक्षा संघर्षावर श्रद्धा असणाऱ्या इंदिराबाईंनी लिहिलेली भावकविता, ही मराठी साहित्याला लाभलेली अनमोल देणगी आहे. स्वानुभवाचा संयत पण रेखीव आविष्कार, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. स्वत:ची सुखदु:खे,प्रक्षोभ,कुंठितावस्थाचित्रित करताना लवलवत्या प्रतिमासृष्टीला आकार देण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत असल्यामुळे, त्यांच्या सर्व संगहांतील कविता भावकाव्याचा निरामय ठसा रसिक मनावर उमटवितात तसेच त्यांतून एका प्रदीर्घ काव्यप्रवासाची भावकहाणीही प्रकटत जाते.
भूतकाळाच्या जाणिवेला सतत वर्तमानकाळात आविष्कृत करणे, हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.स्त्रीसुलभ साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादलय, ही त्यांच्या कवितेची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत. त्यांची स्वत:ची वैशिष्टय्पूर्ण प्रतिमासृष्टी आणि शब्दकळा, पचेंद्रियाधिष्ठित अनुभूतीचे आवर्त, रंग -गंध -नादरूपाचे प्रसादपूर्ण स्पंदन त्यांच्या कवितेला गतिशील बनविते. तसेच मानवी मनाचे आणि विविध भावभावनांचे सर्व ताणतणाव प्रस्फोटित करू शकते. त्यांची कविता हेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या कवितेतून प्रकटणारी आत्मानुभूती हेच त्या कवितेचे सामर्थ्य असून आत्मरत भावात्मकता, ही तिची मर्यादाही आहे. त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अस्तित्वाबद्दलचे निगूढ व सातत्यपूर्ण चिंतन. त्यामुळे कधी कधी ती एकसुरी वाटली, तरी कंटाळवाणी होत नाही.
ओवीसदृश अशी रचनापद्धती स्वाभाविक ढंगाने त्या उपयोजितात. त्यांच्या मुक्तकांनाही अंतर्गत बंदिशीचा व ठसकेबाजपणाचा डौल असतो. त्यामुळे वरवर सोपी दिसणारी, त्यांची कविता अनुकरणाला अवघड जाते. इंदिराबाईंना अनेक मानसन्मान लाभले. रसिकांच्या प्रेमाबरोबर राजमान्यता लाभली. शेला,मेंदी व रंगबावरी या काव्यसंगहांना राज्य शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार लाभले तसेच गर्भरेशमी या काव्यसंगहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला (१९८४). नासिकच्या कुसुमागज प्रतिष्ठानने त्यांना ‘ जनस्थान ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले (१९९५). महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती दिली होती. त्यांची राहणी अगदी साधी होती. अखेरची १४ वर्षे त्यांचे बेळगावमध्ये वास्तव्य होते. वृद्धापकाळाने त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.
संदर्भ : १. गाडगीळ, स. रा. मराठी काव्यांगणातील इंद्रधनू : इंदिरा संत, औरंगाबाद, २००१.
२. जोशी, सुनीता, इंदिरा संत यांची कविता-एक आकलन, पुणे, १९९४.
३. देशपांडे, चित्रा, इंदिरा संत यांच्या भावकवितेचा गर्भरेशमी शेला, १९९४.
४. पाटील, म. सु. इंदिरा संत यांचे काव्यविश्व, अमळनेर, २००१.
५. यादव, स. म. वेदना जपणारी इंदिरा, कोल्हापूर, १९८५.
मेश्राम, केशव