सलाम, अब्दुस : (२९ जानेवारी १९२६-२१ नोव्हेंबर १९९६). पाकिस्तानी अणुकेंद्रीय सैद्धांतिक भौतिकीविज्ञ. विद्युत् चुंबकीय परस्परकिया ( प्रेरणा ) आणि दुर्बल अणुकेंद्रीय परस्परकिया या मूलभूत परस्परकियांची एकीकृत क्षेत्र सिद्धांतामध्ये व्यवस्थित मांडणी केल्याबद्दल सलाम, ⇨ स्टीव्हन वाइनबर्ग आणि शेल्डन ली ग्लासहौ यांना १९७९ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले [⟶ पुंज क्षेत्रसिद्धांत]. नोबेल पारितोषिक मिळालेले सलाम हे पहिले पाकिस्तानी शास्त्रज्ञ होत.
सलाम यांचा जन्म पंजाबमधील झांग येथे झाला. त्यांचे शिक्षण गव्हर्न्मेंट कॉलेज ( लाहोर ), सेंट जॉन्स कॉलेज ( केंब्रिज ) आणि कॅव्हेंडिश लॅबोरेटरी ( केंब्रिज ) या ठिकाणी झाले. त्यांनी लाहोर विदयापीठाची एम्.ए. (१९४६) आणि केंब्रिज विदयापीठाची पीएच्.डी. (१९५२) या पदव्या संपादन केल्या. ते लाहोर येथील गव्हर्न्मेंट कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक (१९५१-५४) आणि केंब्रिज विदयापीठात गणिताचे व्याख्याते (१९५४-५६) होते. १९५७ मध्ये ते लंडन येथील इंपिरिअल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या महाविदयालयात सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक झाले. १९६४ मध्ये त्यांनी ट्रीएस्ट ( इटली ) येथे इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरेटिकल फिजिक्स या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. ही संस्था विकसनशील देशांतील भौतिकीविज्ञांना मदत करण्यासाठी स्थापन झाली.
दुर्बल अणुकेंद्रीय परस्परकिया ही विश्वातील मूलभूत परस्परकिया आहे. या परस्परकियेकरिता समाधानकारक मीमांसा ग्लासहौ, वाइनबर्ग व सलाम यांनी दिली. ग्लासहौ-सलाम-वाइनबर्ग मीमांसा व पुंजवर्णगतिकी या दोन सिद्धांतांचा उपयोग करून मूलकण व तत्संबंधित परस्परक्रियांचे मोठया प्रमाणात विशदीकरण देता येते [⟶ प्रेरणा]. या तिघांनी दुर्बल निर्विद्युत् प्रवाहाच्या शक्यतेचे भाकीत केले. १९७३ मध्ये यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (CERN ) या जिनीव्हा येथील संस्थेत या प्रवाहाचा शोध लागला. तसेच त्यांनी दुसरे भाकीत असे केले होते की, बीटा क्षय या दुर्बल परस्परकियेत भारी द्रव्यमान असलेले मध्यस्थ सदिश बोसॉन हे क्षेत्र पुंजकण असले पाहिजेत. जिनीव्हाजवळील यूरोपियन लॅबोरेटरी फॉर पार्टिकल फिजिक्स या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोन गटांनी (१८० शास्त्रज्ञांनी ) जानेवारी व एप्रिल १९८३ मध्ये बोसॉन या क्षेत्र पुंजकणाचा शोध लावला. प्रोटॉनाला शाश्वत स्वरूप नसून त्याचे पायॉन व न्यूट्रिनोमध्ये विघटन व्हावे असे भाकीत सलाम, ग्लासहौ व एच्. गीऑर्गी यांनी केले आहे. हा परिणाम शोधून काढण्याकरिता जगातील विविध प्रयोगशाळांत प्रयोग चालू आहेत. [⟶ मूलकण].
सलाम पाकिस्तान अणुऊर्जा आयोग (१९५८-७४) आणि पाकिस्तान विज्ञान परिषद (१९६३-७५) या संस्थांचे सदस्य होते. ते लंडन रॉयल सोसायटीचे फेलो होते (१९५९). त्यांना केंब्रिज विदयापीठाचे हॉपकिन्स (१९५८) व ॲडम्स (१९५८) हे पुरस्कार आणि लंडनच्या फिजिकल सोसायटीचे मॅक्सवेल पदक (१९६१) मिळाले. तसेच त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीची ह्युजेस (१९६४), रॉयल (१९७८) व कॉप्ली (१९९०) ही पदके मिळाली. त्यांना ३० विदयापीठांकडून सन्माननीय डी.एस्सी. पदवी मिळाली.
सलाम यांनी पुढील पुस्तकांचे लेखन वा संपादन केले : सिमेट्री कन्सेप्ट्स इन मॉडर्न फिजिक्स (१९६६), अस्पेक्ट्स ऑफ क्वांटम फिजिक्स (१९७२ ई. पी. विग्नर यांच्याबरोबर संपादन ), आयडिअल्स अँड रिॲलिटीज : सिलेक्टेड एसेज ऑफ अब्दुस सलाम (१९८४), सुपरगॅव्हिटी इन डायव्हर्स डायमेन्शन्स (खंड १ व २ १९८७), फॉम ए लाइफ ऑफ फिजिक्स ( संपादन, १९८९). त्यांनी मूलकण भौतिकीवरील सु. २५० संशोधनपर निबंध लिहिले.
ऑक्सफर्ड ( इंग्लंड ) येथे त्यांचे निधन झाले.
सूर्यवंशी, वि. ल.