सर्वक्षमा : ( ॲम्नेस्टी ). एखादा राजा किंवा सरकारविरूद्ध केलेले गुन्हे क्षमापित करणे, हा सर्वक्षमा देण्याचा अर्थ आहे. ‘ ॲम्नेस्टी ’ हा इंग्रजी शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ न आठवणे, विसरून जाणे असा आहे. दुसरा चार्ल्स् पुन्हा अधिकारावर आला, तेव्हा राज्याविरूद्ध झालेल्या गुन्ह्याबद्दल सर्वक्षमा देण्यात आली होती. भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर इंग्रज राजवटीत राजद्रोह किंवा राजकीय चळवळीबद्दलचे स्वातंत्र्यसैनिकांवर जे गुन्हे दाखल झाले होते अगर ज्यांची चौकशी चालू होती, अशा सर्व प्रकरणांत नव्या सरकारने सर्वक्षमा दिली. एखादया राजवटीबद्दल विरोध असणाऱ्यांनी केलेले अपराध क्षमापित करणे, हा तणावांचे मूळ कारण नष्ट करण्याचा एक उपाय असतो.
राजा किंवा राजसत्ता यांना गुन्ह्याबद्दल दया दाखवण्याचे जे अधिकार आहेत, त्यांपैकी सर्वक्षमा हा एक आहे. झालेली शिक्षा कमी करणे, गुन्हेगाराला त्या गुन्ह्याबद्दल पूर्ण क्षमा करणे आणि ज्यांची अदयाप चौकशी चालू आहे अगर ज्यांचे खटले चालू आहेत किंवा ज्याबद्दल खटले होण्याचा संभव आहे, अशा सर्व गुन्ह्यांना व असू शकणाऱ्या गुन्हेगारांना सार्वत्रिक माफी देणे हे तीनही वेगवेगळे अधिकार आहेत आणि ते परस्परांपासून भिन्न आहेत. भारताच्या राष्ट्रपतींना केंद्र सरकारच्या सल्ल्या-नुसार आणि राज्याच्या राज्यपालांना राज्यमंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ( किमिनल प्रोसिजर कोड ) कलम ४०१ व ४०२ कलमांन्वये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १६१ प्रमाणे संपूर्ण गुन्ह्यालाच माफी देण्याचा अधिकार आहे. अशी माफी मिळाल्यावर गुन्हेगाराच्या चारित्र्यावरील गुन्हेगार असल्याचा कलंकसुद्धा नाहीसा झाल्याचे कायदयात समजण्यात येते.
सर्वक्षमा हा सामान्यत: अपवादात्मक परिस्थितीत वापरावयाचा अधिकार आहे. राजकीय हेतूने केलेले गुन्हे सामुदायिकपणे क्षमापित करण्याचा हा मार्ग आहे. यात ज्या गुन्ह्यांची चौकशी सुरू झाली नाही, अशा गुन्ह्यांपासून ज्यांची न्यायालयात सुनावणी चालू आहे, असे सर्व गुन्हे क्षमापित करता येतात. कोणते गुन्हे घडले आणि गुन्हेगार कोण, याची अशा आदेशात निश्चिती करण्याची किंवा नोंद करण्याची आवश्यकता नसते.
चपळगावकर, नरेंद्र