सर्वजन संकल्प : ( जनरल विल ). समाजाच्या सामूहिक हितासाठी सर्वांची मिळून सर्वांना समान अशी सार्वत्रिक भावना वा इच्छा. ही संकल्पना प्रथम ⇨दनी दीद्रो (१७१३-८४) या फ्रेंच साहित्यिक-तत्त्वज्ञ याने लांसिक्लोपेदी या संकलित विश्वकोशात प्रथम नजरेस आणली. त्यानंतर झां झाक रूसो (१९१२-७८) याने आधीच्या विचारवंतांच्या सिद्धांतांचे परिशीलन करून आपला सामाजिक कराराचा सिद्धांत सर्वजन संकल्प या कल्पनेवर उभा केला आणि या संकल्पनेस विकसित रूप दिले. त्याच्या मते सर्वजन संकल्प ही अमूर्त अशी प्रेरणा आहे. ती केवळ अनेकांच्या अनेक इच्छांची बेरीज नसते. सर्वजन संकल्पाला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते. अर्थात त्या संकल्पात त्या व्यक्तीची इच्छा समाविष्ट असतेच. म्हणूनच रूसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वत:चे स्वत:लाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. कोणतीच व्यक्ती आपले स्वातंत्र्य गमावीत नाही. व्यवहारात रूसोला ही संकल्पना अव्यवहार्य, गूढ व संदिग्ध वाटू लागली. म्हणून त्याने राज्यसंस्थेची अपरिहार्यता व्यक्त केली आणि सर्वजन संकल्पाला जी अनिर्बंध सत्ता दयावयाची ती प्रत्यक्ष राज्यसंस्थेला मिळणे, हे ओघाने आले तथापि राज्यसंस्था आणि सर्वजन संकल्प एक नाहीत. राज्य ही एक त्या संकल्पाने उभी केलेली यंत्रणा असते आणि ती यंत्रणा बदलणे, मोडणे वगैरे सर्व अधिकार सर्वजन संकल्पाला असतात. लोकसत्ताक समाजात नागरिकांच्या सर्वजन संकल्पाचे प्रतिनिधित्व राज्यसंस्था करते आणि राज्यसंस्थेच्या विधिनियमांचे पालन प्रत्येक नागरिक करतो. रूसो समाज म्हणजे राज्यसंस्था मानतो. त्यामुळे प्रत्यक्ष समाजजीवनात ज्या अनेक गुंतागुंती आढळतात, त्याचे समाधानकारक उत्तर रूसोच्या विवेचनात दिसत नाही. एखादी व्यक्ती किंवा गट राज्याविरूद्ध जाण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकेल, असेही त्याच्या विवेचनातून ध्वनित होते. ही संकल्पना रूसोने नगरराज्यातून सिद्घीस नेणे शक्य आहे, असे म्हटले आहे. त्याच्यापुढे प्राचीन ग्रीको-रोमन संस्कृतींतील नगरराज्ये असावीत.

रूसोच्या वेळेपासून या संकल्पनेचे विभिन्न अन्वयार्थ लावण्यात आले. सर्वजन संकल्प ही कल्पना नैतिक मूल्ये आणि राजकीय आकांक्षा यांना एकत्र गोवते. त्यामुळे ही कल्पना मुख्यत्वे राजकीय उपपत्तीवर आधारित आहे. अनेकवेळा सर्वजन संकल्पाचे अस्तित्व समाजाच्या नैतिक कसोटीचे मुख्य कारण मानण्यात येते आणि राजकीय स्थैर्य आणि संयोगिक स्वरूपातच फेरफार सूचित होतात कारण लोकशाहीच्या प्रातिनिधिक शासनात या संकल्पनेचा पुनर्विचार करावा लागतो कारण लेनिनने रूसोकडून ही संकल्पना आत्मसात करून स्वत:च्या कार्यकारणपरंपरेचे प्रमाण विकसित केले. श्रमिकवर्गाची ( प्रोलेटॅरिएट ) हुकूमशाही रशियात प्रस्थापित केली.

कांटपासून या संकल्पनेच्या अन्वयार्थास प्रारंभ झाला. त्याने रूसोच्या सर्वजन संकल्पातून बिनशर्त आज्ञार्थक कल्पना मांडली. ती त्याच्या दृष्टय नैतिकता व वैधता या दोहोंची सर्वोच्च कसोटी होय तर हेगेलने तात्त्विक व ऐतिहासिक तर्कावर राजकीय अन्वयार्थ लावला. टी. एच्. गीन या संकल्पनेविषयी म्हणतो, की ती लोकांच्या आशा-आकांक्षांवर अवलंबून असते. उदार संविधानवादाच्या कार्यकारणपरंपरेत सर्वजन संकल्प ही कल्पना बसविण्याचा प्रांजल व काटेकोर प्रयत्न ⇨ बर्नार्ड बोझांकेट याने केला. पुढे या कल्पनेचे गुंतागुंतीचे पुनर्सूत्रीकरण करण्याचा प्रयत्न लिंडसे व बार्कर यांनी केला. बुद्धीजन्य राज्यसंस्थेत सामाजिक ऐक्यासाठी राजकीय हस्तक्षेप केवळ उपयुक्त नसतो, तर आवश्यक असतो मात्र नेते किंवा राजकीय पक्ष यांनी अतिरेकी कारवायांपासून अलिप्त असावे, असाही एक विचार प्रसृत झाला. सर्वजन संकल्पाची उत्पत्ती आणि विकास यांची मीमांसा करताना या संकल्पनेचा एकच एक अर्थ संभवत नाही, किंवा तिच्या राजकीय उपपत्तीतील सैद्धांतिक भूमिका स्पष्ट होत नाही. थोडक्यात, सर्वजन संकल्प ही संकल्पना मानसशास्त्रीय प्रक्रिया, नैतिक गुणधर्म आणि राजकीय संस्था यांच्या अन्योन्याश्रयावर लक्ष केंद्रित करते.

पहा : रूसो, झां झाक सामाजिक कराराचा सिद्धांत.

संदर्भ : 1. Fralin, R. Rousseau and Representation, New York, 1978.

2. Havens, G. R. Jean Jacques Rousseau, Boston (Mass.), 1978.

गर्गे, स. मा.