सन-यत्-सेन : (१२ नोव्हेंबर १८६६-१२ मार्च १९२५). चीनचा क्रांतिकारक नेता आणि आधुनिक चीनचा शिल्पकार. द. चीनमधील ग्वांगटुंग प्रांतात कँटनजवळ एका शेतकरी कुटुंबात जन्म. सुरूवातीचे शिक्षण घेऊन तो आपल्या सन-मेई या मोठया भावाकडे हवाई ( जपान ) येथे गेला. तिथे त्याने होनोलूलूच्या अँग्लिकन बॉइज स्कूलमध्ये शिक्षण घेतले (१८७९-८२). त्याचा लू म्यू-चेन (१८६७-१९५२) या युवतीबरोबर विवाह झाला (१८८५). पुढे त्याने हाँगकाँगमधील वैदयकीय विदयालयातून पदवी संपादन केली (१८९२). हाँगकाँगच्या वास्तव्यात त्याने क्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. त्याने नंतर वैदयकीय व्यवसाय सुरू केला. अचानक वैदयकीय व्यवसाय सोडून तो तिन्त्सिन गावी पोहोचला. त्याने लू ह्यूंग -चँग या चिनी अधिकाऱ्याच्या मदतीने काही सुधारणा करण्याचा अयशस्वी प्रयोग केला. प्रथमपासून तो मांचू राज्यकर्त्यांविरूद्ध होता, म्हणून त्याने क्रांतिकारक मार्ग निवडला. त्याने चीनचे पुनरूज्जीवन करणारी त्सिंग चुंग-ह्यूई ही संस्था स्थापन केली (१८९४). हीच संस्था पुढे क्रांतिकारकांचे केंद्र ठरली. या संस्थेचे सभासद मुख्यत्वे सामान्य कामगार, कारागीर, कारकून व शेतकरी होते. तिची एक शाखा हाँगकाँगमध्ये १८९५ मध्ये कार्यरत होती. तिच्या सहकार्याने त्याने बंड करण्याचा निष्फळ प्रयत्न केला ( ऑक्टोबर १८९५). परिणामत: त्याला सोळा वर्षांची हद्दपारीची शिक्षा झाली. शिक्षाकाळात त्याने इतर देशांत आपल्या क्रांतिकारक चळवळीला सहानुभूती व आर्थिक साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर देशांतील चिनी लोकांना एकत्र करून त्यांची सहानुभूती मिळविली.

सन-यत्‌-सेन

इंग्लंडमध्ये असताना चिनी वकिलातीच्या कचाटयात सापडून त्याला काही दिवस कोठडीत काढावे लागले. पुढे त्याने ब्रिटिशांच्या मदतीने सुटका करून घेतली. या घटनेमुळे त्याला प्रसिद्घी मिळाली. इंग्लंडमध्ये त्याने भरपूर वाचन केले. तो जपानला गेला असताना (१८९७) मांचू राजवटीने त्याला पळविण्याचा प्रयत्न केला होता. परदेशातील चिनी विदयार्थ्यांच्या मदतीने टोकिओत त्याने क्रांतिकारक संघटना ( तुंग-यंग -हुई ) स्थापन केली (१९०५). याच वर्षी त्याने आपल्या क्रांतीची तीन तत्त्वे प्रसृत केली. ती म्हणजे राष्ट्रवाद, लोकशाही आणि उपजीविकेची साधने प्राप्त करणे. या तीन तत्त्वांसाठी चिनी लोकांनी संघर्ष केला पाहिजे, असे त्याचे आवाहन होते. पुढे १९११ पर्यंत सेनने सु. दहा वेळा बंड घडवून आणले पण त्यांत अपयश आले. अखेर वूचांगमध्ये १० ऑक्टोबर १९११ रोजी अचानक मोठा लोकक्षोभ झाला. क्रांतिकारकांनी अनेक प्रांतांत बंड केले. परिणामी चीनमधील राजेशाही नष्ट होऊन नव्या चिनी प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. तेव्हा सेन लंडन व पॅरिसकडे क्रांतिकारकांच्यावतीने बाजू मांडण्यासाठी गेला आणि डिसेंबर १९११ मध्ये तो चीनला तुताऱ्यांच्या निनादात परतला. त्याची चीनच्या प्रजासत्ताक राज्याचा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याने १ जानेवारी १९१२ रोजी नानकिंग येथे अधिकार सूत्रे स्वीकारली पण उत्तरेचा भाग युआन शृखायीच्या ताब्यात होता. त्याच्याशी यादवी युद्ध टाळण्यासाठी सेनने राजीनामा दिला व लष्करी नेत्याच्या हातात सूत्रे आली.

मांचू राजवटीचे उच्चटन हे चिनी राष्ट्रवादयांचे उद्दिष्ट १९११ च्या क्रांतीने साध्य केले परंतु लोकशाही शासन, आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि परकीय आकमणांपासून संरक्षण ही महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक होते. हे काम लोकशाहीविरोधी लष्करशाहा युआन शृखायीकडून होणार नाही, याची लवकरच प्रचिती आली कारण त्याने विरोधी क्वोमिंतांग पक्ष बरखास्त करून स्वत:च राष्ट्राध्यक्षपद बळकावले पण लवकरच त्याचे निधन झाले आणि उपाध्यक्ष ली युआनहूंग अध्यक्ष झाला. यावेळी निरनिराळ्या प्रांतांत लष्करी राज्य होते. या लष्करशाहांच्या आपापसांतील संघर्षांमुळे देशात यादवी युद्ध सुरू झाले. तेव्हा सन -यत् -सेन पुन्हा राजकारणात सक्रिय झाला. त्याने जपानच्या सहकार्याने क्वोमिंतांगचे पुनर्संघटन करून ही संघटना स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवली. पुढे द. चीनमध्ये कँटनला त्याच्या नेतृत्वाखाली दुसरे राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यात आले. या शासनाने उत्तरेकडील लष्करी राजवटींना मान्यता दिली नाही. त्यामुळे सन – यत् – सेनचे कँटन येथील राष्ट्रीय शासन व लष्करशाहीच्या तंत्राने चालणारे बिजिंगचे शासन यांच्यातील संघर्ष चालूच राहिला. चीनचे एकीकरण करण्यासाठी त्याने अमेरिका, कॅनडा आदी देशांकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाल्यावर त्याने रशियाकडे धाव घेतली. रशियाने अडॉल्यव्ह यॉव्हे व नंतर म्यिखएल बरडयेन व मानवेंद्रनाथ रॉय यांना चीनमध्ये पाठविले. अनेक रशियन लष्करी व मुलकी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार चिनी शासनाची व क्वोमिंतांग पक्षाची पुनर्रचना करण्यात आली. रशियात लष्करी प्रशिक्षण घेतेलेल्या ⇨ चँग-कै-शेक ची व्हांपोआ लष्करी अकादमीचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. क्वोमिंतांग पक्षही केवळ विचारवंतांचा न राहता शेतकरी, कामकरी, कारागीर इत्यादींचा झाला तथापि देशाची एकता प्रस्थापित झाल्याशिवाय प्रगती होणार नाही, हे जाणून सन – यत् – सेनने आपले प्रयत्न जारी राखले.

सन – यत् – सेनने प्रथम पत्नीशी घटस्फोट न घेता १९१४ मध्ये आपली स्वीय साहाय्यक सुंग चिंग-लिंग हिच्याशी विवाह केला. त्यामुळे थोडी खळखळही उडाली. आधुनिक चीनच्या इतिहासात सेन याचे कार्य महत्त्वाचे ठरले. कारण राजेशाही व लष्करशाही यांच्याशी संघर्ष करीत त्याने चीनमध्ये लोकशाही प्रजासत्ताक स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही. त्याचे नेतृत्व, देशभक्ती, साहस आणि कार्यपद्धती यांमुळे चिनी जनतेने त्याला आधुनिक चीनचा निर्माता मानून त्याच्यावर प्रेम केले.

पहा : चीन ( इतिहास ).

संदर्भ : 1. Hansen, William P. Haney, John Ed. Sun-Yat-Sen, New York, 1978.

2. Sharman, Lyon, Sun-Yat-Sen : His Life and Its Meaning, London,1973.

3. Wilbur, M. C. Sun-Yat-Sen, Frustate and Patriot, New York, 1977.

देशपांडे, सु. र.