सदाशिवगड – २ : महाराष्ट्रातील छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक डोंगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या ईशान्येस सु. ६ किमी.वर कराड-विजापूर मार्गावर तो आहे. येथे गडाच्या तटबंदीचे अवशेष आढळतात. त्यावरून भिंतींची उंची सु. २·५ मीटर असावी. उत्तरेकडे खोल दरी असून त्या बाजूला प्रवेशद्वार होते पण ते खचलेले आहे. किल्ल्यावर चार भक्कम बुरूज होते. तेही अवशेष रूपात आढळतात. किल्ल्यावरील प्रशस्त पठार सु. ९ हेक्टर असून पाण्याची टाकी व तळी कोरडी पडली आहेत. किल्ल्यावर महादेवाचे एक मंदिर असून दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी (शेवटच्या) तेथे छोटी यात्रा भरते. पायथ्याशी त्याच नावाचे खेडे असून तेथे समाजमंदिर आहे.
देशपांडे, सु. र.