शिशुगृह : (क्रेश). सामान्यतः जेथे ५ वर्षांपर्यंत वय असलेल्या बालकांना दिवसभर ठेवले जाते व जेथे त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते, अशा प्रकारचे केंद्र. शिशुगृह शासकीय असेल, तर ते आरोग्य अथवा समाजकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. खाजगी संस्था, उद्योगव्यावसायिक किंवा अन्य संस्थाही शिशुगृहे चालवितात. शिशुगृहाची विविध रूपे प्रचलित आहेत. उदा., अंगणवाडी, पाळणाघर, बालवाडी इत्यादी.
लहान मुलांना जगण्याचा व विकासाचा हक्क असतो, या तत्त्वावर या शिशुगृहांची स्थापना झाली. या केंद्रांमधील बालकांचा मानसिक विकास होतो, त्यांचे आरोग्य सुधारते, त्यांच्यामध्ये कौशल्य येते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते. शिशुगृहामागील तात्त्विक भूमिका अशी : विकासाची प्रक्रिया मूल आईच्या उदरात असताना सुरू होत असली, तरी शिकणे ही प्रक्रिया जन्मापासून सुरू होते. लहान मुलांमध्ये व्यक्तिभेद असतात. विकासाचे शारीरिक, मानसिक, भावनिक असे अनेक पैलू असतात. मूल स्वतःच्या विकासामध्ये सहभागी असते आणि विकास व शिकणे या प्रक्रिया, बालकाची भोवतालच्या परिसराशी जी अंतरक्रिया होते, त्यातून घडतात. मुलांच्या विकासाला कुटुंब, समाज, संस्कृती इत्यादींचा संदर्भ असतो. शिशुगृहासारखी संस्था चालविताना या सर्व तात्त्विक बाबींचा विचार केलेला असतो.
शिशुगृह हे घर आणि समाज यांच्यामधील टप्पा असते. तसेच ते घर आणि प्राथमिक शाळा यांना जोडणारा एक आवश्यक दुवा असतो. घरातील प्रेमळपणा, आश्वासन व स्वरक्षण येथे मिळू शकते. त्याचबरोबर शिस्त, आत्मविश्वास, संयम आणि एकाग्रता याही गोष्टी येथे मिळतात. शिशुगृहामध्ये शारिरिक विकास, वैद्यकीय तपासणी, आहार, संस्कार, बौद्धिक विकास, भावनिक विकास, विज्ञान व जीवन शिक्षण इ. गोष्टींकडे लक्ष दिले जाते.
लहान मुलांना शिक्षण द्यावे, त्यांच्यावर संस्कार करावेत, ही कल्पना काही आधुनिक नाही. प्राचीन काळात सॉक्रेटीस, प्लेटो, ऍरिस्टॉटल यांनीही लहान मुलांच्या शिक्षणाचा उल्लेख केला होता. अठराव्या शतकानंतर पेस्टालोत्सी, फ्रबेल, रॉबर्ट ओवेन, ओबर्डीन इत्यादींनी लहान मुलांसाठी शिशुगृहे सुरू केली होती. माँटेसरींनी तर त्यांचा जगभर प्रसार केला. आधुनिक काळातील पहिले शिशुगृह १८०२ साली जर्मनीमध्ये कामगार स्त्रियांच्या मुलांसाठी सुरू झाले. त्यानंतर स्कॉटलंड (१८१६), ऑस्ट्रिया (१८३३), स्पेन (१८५५), रशिया (१८६४) आणि लंडन येथे १९०८–१० या कालखंडात शिशुगृहे सुरू झाली. अमेरिकेत विस्कॉंनसिन येथे १८५६ साली शिशुगृह सुरू करण्यात आले.
सध्या शिशुगृहाचे औपचारिक व अनौपचारिक असे विविध प्रकार आढळतात.
संदर्भ : 1. Auerbatch Aline B. and Sandra Roche, Creativity at Pre-School Center, New York, 1971.
2. Evans Jadith and Others. Early Childhood Counts, Washington, 2000.
3. Hildebrand Verna, Early Childhood Education, New York, 1986.
४. दाते, रजनी, बालमंदिरातील नव्या वाटा-नव्या दिशा, पुणे. १९९३.
गोगटे. श्री. ब.