शिवाजी विद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. स्थापना कोल्हापूर येथे १९६२ साली. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती व तेथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना प्रथम मांडली. महाराष्ट्र शासनाने १९६२ साली ‘विद्यापीठ कायदा’ मंजूर करून या विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘ग्रामीण युवकांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार’ आणि ‘विज्ञान व मानव्यविद्या या क्षेत्रांतील पायाभूत व उपयोजित संशोधनावर आधारित ग्रामीण समाजाची प्रगती’ ही त्याची उद्दिष्टे होती. ‘ज्ञानमेवामृतम्’ हे बोधवाक्य आणि ‘विद्यापीठ लोकाप्रत’ हे ध्येयाचे प्रमुख सूत्र विद्यापीठाच्या वाटचालीसाठी स्वीकारले गेले. स्थापनेच्या वेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी असे ५ जिल्हे व त्यांतील ३४ संलग्न महाविद्यालये, ५ पद्व्युत्तर अधिविभाग व १४,००० विद्यार्थी यांचा समावेश होता. पुढे रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठात जोडला गेला. तसेच सोलापूर जिल्हा सोलापूर बिद्यापीठात समाविष्ट करण्यात आला. (२००४). २००१-२००२ या वर्षात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या २७५ होती व त्यांमध्ये दोन लाख विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र, शिक्षणशास्त्र, विधी, वैद्यक, आयुर्वेद वैद्यक, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि ललितकला अशा एकूण १० प्रमुख विद्याशाखा असून पद्व्युत्तर शिक्षण देणारे एकूण ३४ अधिविभाग (सोलापूर केंद्रासह एकूण ४०) कार्यरत होते. मराठ्यांच्या इतिहासाच्या कागदपत्रांचे संशोधन व प्रकाशन, तसेच ‘कमवा व शिका’ यांसारखे उपक्रम सुरुवातीच्या काळातच विद्यापीठात सुरू झाले. विज्ञान विद्याशाखेतील आधुनिक विषयांबरोबरच औद्योगिक रसायनशास्त्र, अवकाशविज्ञान, पर्यावरणशास्त्र, जैविक रसायनशास्त्र, रेशीमशास्त्र, बहुवारिक रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इ. अत्याधुनिक विषयांत विद्यापीठाने काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांशी सहकार्याचे करार केले आहेत. उदा., भौतिक विज्ञानातील संशोधनासाठी विद्यापीठाने ‘भाभा अणुशक्ती केंद्राशी’ एक करार केला आहे. अशाच स्वरुपाचा एक करार ‘भारतीय भूचुंबकत्व संस्था, मुंबई’ यांच्याशी झाला आहे. विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागांतर्गत अवकाशविज्ञान व भूचुंबकत्व विज्ञान या शाखांच्या सहकार्याने सूर्यकिरणांच्या पृथ्वीवरील वातावरणावर होणाऱ्या विविध परिणामांचे संशोधन चालू आहे. विद्यापीठाच्या अनेक अधिविभागांत स्वावलंबी तत्त्वावर नवनवीन विशेषीकरणे सुरू केलेली आहेत. अर्थशास्त्र व पदार्थविज्ञान या अधिविभागांतील विद्यापीठ अनुदान मंडळाकडून ‘विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत’ खास अनुदान मिळाले आहे.
विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना’ सुरू केली असून दरवर्षी ५०० हून अधिक शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात.
विद्यापीठाचा एक भाग म्हणून कार्य करणाऱ्या ‘शाहू संशोधन केंद्राने’ आतापर्यंत राजर्षी शाहू छत्रपतींच्या कारकीर्दीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे ८ खंड प्रकाशित केले आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीशी संबंधित असणाऱ्या अनेक दुर्मिळ नियतकालिकांच्या संचिका या केंद्रात जतन करून ठेवल्या आहेत. येथेच शाहू लोकजीवन संग्रहालय उभारण्याचे काम चालू आहे. विद्यापीठाच्या प्रकाशन विभागाने आतापर्यंत ५३ ग्रंथ आणि नियतकालिके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये संस्कृत व प्राकृत साहित्य, ज्ञानेश्वरी, विज्ञान, मराठ्यांचा इतिहास, विविध व्याख्यानमालांतील व्याख्याने इ. विषयांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात एकूण २,१३,५०० ग्रंथ आहेत. ग्रंथालयांतर्गत असणाऱ्या पुरालेखागार विभागात ५,००० हून अधिक हस्तलिखित ग्रंथ (पोथ्या) व १०,००० हून अधिक दुर्मिळ ग्रंथ आहेत. त्यांमध्ये ज्ञानेश्वरीची शके १४९० ची हस्तलिखित प्रत आहे. विद्यापीठाकडून एकूण २१ व्याख्यानमाला चालविल्या जातात. याशिवाय विद्यापीठात ‘कमवा व शिका’ योजना, प्रौढ व निरंतर शिक्षण योजना, लोकविकास केंद्र, स्त्री–अभ्यास केंद्र, विद्यापीठ उद्योग सुसंवाद कक्ष, गांधी–अभ्यास केंद्र इ. योजना व प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. ग्रामीण व्यवस्थापन अभ्यास केंद्र, जैविक संशोधन केंद्र, माहिती-तंत्रज्ञान केंद्र यांसारखे प्रकल्प विद्यापीठाच्या विचाराधीन आहेत.
पवार, जयसिंगराव