शिवसमुद्रम् : भारताच्या कर्नाटक राज्यातील कावेरी नदीवरील एक प्रसिध्द धबधबा. दक्षिण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात हा धबधबा आहे. म्हैसूर पठारावरून कावेरी नदी ईशान्य दिशेस खाली उतरताना तिच्या पात्रात द्रुतवाह शृंखला व तुटलेले सोपानी प्रपात निर्माण झाले आहेत. याच भागात कावेरी नदीच्या पात्रात शिवसमुद्रम् (शिवसागर) बेट निर्माण झाले आहे. पूर्वी हे बेट मध्यरंग किंवा हेगुरा नावाने ओळखले जाई. त्यामुळे नदी दोन शाखांनी वाहू लागते. त्यांपैकी पश्चिमेकडील शाखा गगनचुक्की व पूर्वेकडील शाखा भारचुक्की नावाने ओळखली जाते. या दोन्ही शाखा येथील कड्यावरून ९७ मी. खोल दरीत कोसळतात. हाच प्रेक्षणीय व प्रसिध्द शिवसमुद्रम् धबधबा होय. प्रत्यक्षात धबधब्याचेही गगनचुक्की व भारचुक्की असे दोन फाटे दिसतात. एटिकूर या छोट्याशा बेटामुळे गगनचुक्की धबधबा दोन मार्गांनी खाली कोसळतो. गगनचुक्कीचे पाणी एकदम सरळ खाली न कोसळता, मधल्या खडकांवर आपटत आपटत जाते. त्यामुळे गरजल्यासारखा मोठा आवाज होऊन तेथे धुके निर्माण झालेले दिसते. भारचुक्की प्रवाह मोठा आहे.

शिवसमुद्रम् धबधब्याजवळच १९०२ मध्ये भारतातील, धबधब्यांवरील पहिला जलविद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. तो देशातील या प्रकारच्या सर्वांत मोठ्या जलविद्युतनिर्मिती प्रकल्पांपैकी एक आहे. येथून निर्माण होणारी वीज म्हैसूर, बंगलोर व कोलार या शहरांना, कोलार येथील सोन्याच्या खाणक्षेत्राला तसेच शेतीला पुरविली जाते. याची वीजनिर्माण क्षमता ४२,००० किवॅा. आहे. वीजनिर्मिती प्रकल्पामुळे येथे वसाहतही निर्माण झाली आहे. येथील बेटावर जाण्यासाठी १८३० ते १८३२ या काळात ४८१·५८ मी. लांबीचा स्थानिक पध्दतीने दगडी पूल बांधण्यात आला होता. १९२४ मध्ये आलेल्या पुरात तो वाहून गेला. त्यामुळे शासनाने या पुलाच्या उत्तरेस दुसरा पूल बांधला. धबधब्यानंतरचा एकत्रित प्रवाह एका अरुंद घळईत वाहत जाऊन पुढे तमिळनाडू राज्यात प्रवेश करतो.

चौधरी, वसंत