शिंपी पक्षी : हा छोटा पक्षी सिल्व्हिइडी पक्षिकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस आहे. हिंदीत तो दर्जी या नावाने ओळखला जातो. तो भारत, श्रीलंका व म्यानमार येथे आढळतो. भारतात तो सगळीकडे आढळतो. हिमालयात १,५२५ मी. उंचीपर्यंत आणि दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशात १,२२० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. झुडपांच्या जंगलात, कुंपणांच्या झुडपांत, घराभोवतालच्या बागेत, वेलींमध्ये तो नेहमी असतो. दाट जंगले व रखरखीत प्रदेश येथे मात्र तो आढळत नाही.
शिंपी पक्षी चिमणीपेक्षा लहान असून सु. १२ सेंमी. लांब असतो. शरीराच्या वरच्या बाजूचा रंग पिवळसर हिरवा, खालची बाजू पांढरट, कपाळ व माथा तांबूस विटकरी, पंख व शेपटी तपकिरी, शेपटीची मधली पिसे लांब व टोकदार असून शेपटी नेहमी उभारलेली असते. चोच लांब, अणकुचीदार, काळपट डोळे तांबूस – पिवळे, पाय पिवळे किंवा तांबूस पिवळे असतात. प्रजोत्पादनाच्या काळात नराच्या शेपटीतील मधली लांब पिसे जास्त लांब होतात (सु. ५ सेंमी.)
हा पक्षी अतिशय चळवळ्या आहे. एका झुडपातून दुसऱ्या झुडपात किंवा जमिनीवर टुणटुण उड्या मारीत सारखा भटकत असतो. तो अतिशय धीट असल्यामुळे पुष्कळदा घराच्या व्हरांड्यातही येतो. तो सर्व प्रकारचे लहान किडे, त्यांची अंडी, सुरवंट, अळ्या इ. खातो. शेवरी, पांगारा वगैरे झाडांच्या फुलांतील मधुरस तो शोषून घेतो. झुडपांमधून भटकत असताना तो टुविट SS टुविट किंवा पिट् SS पिट् असा आवाज काढत असतो.
याच्या प्रजोत्पादनाचा काळ एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत असतो. त्याचे घरटे झुडपांमध्ये किंवा वेलींवर जमिनीपासून ९० ते १२० सेंमी. उंचीवर असते. पाने शिवून ते तयार केलेले असते. पाने शिवण्यासाठी तो चोचीचा सुईप्रमाणे आणि कोळ्याच्या जाळ्यांचा किंवा वनस्पतीच्या तंतूचा दोऱ्याप्रमाणे उपयोग करतो. एक किंवा दोन पाने शिवून तो त्याची आधी पुंगळी बनवितो. ती खालच्या बाजूने शिवून बंद करतो. या पिशवीत कापूस किंवा इतर मऊ पदार्थ घालून तो घरटे तयार करतो. वड, पिंपळ यांच्या पानांपासून तो घरटे तयार करतो. तो पक्ष्यांमधील अतिशय कुशल वास्तुकार आहे. अंड्याचे व त्यावर बसणाऱ्या पक्ष्याचे वजन सहन करण्याइतके घरटे मजबूत करण्याची तो काळजी घेतो. नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. तांबूस अथवा निळसर पांढऱ्या रंगाची ३-४ अंडी मादी घालते. त्यांच्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात.
कर्वे, ज. नी.