शाळिग्राम : आंतर हिमालयात स्पिती शेल हा वैशिष्ट्यपूर्ण शैलसमूह आढळतो. तो सु. १८·५ ते १४ कोटी वर्षांपूर्वीच्या जुरासिक काळातील आहे. स्पिती शेल या काळ्या किंवा निळसर काळ्या खडकात कॅल्शियमी संधिते आढळतात. पुष्कळ संधितांच्या मध्यभागी ॲमोनाइट या प्राण्याचे कवच अथवा इतर जीवाश्म (शिळारूप झालेला जीवावशेष) असतो आणि त्याच्याभोवती मुख्यतः कॅल्शियमचो आवरण तयार होऊन संधित बनलेले असते. सामान्यपणे अशा गुळगुळीत, काळपट गोट्यांना (संधितांना) शाळिग्राम म्हणतात. नेपाळमध्ये मुक्तनाथ येथे गंडकी नदीत असे पुष्कळ शाळिग्राम आढळतात. ही व इतर नद्या शाळिग्राम वाहून आणतात. म्हणून नेपाळमध्ये गंडकी नदीला शाळिग्रामी असेही म्हणतात. मैदानी प्रदेशात तिलाच नारायणी म्हणतात. काही शाळिग्रामांवर पायराइट व लोखंडाच्या स्लफाइडी सोनेरी खनिजांमुळे सोनेरी छटा येते किंवा त्यावर सोनेरी रेषा, पट्टे किंवा इतर खुणा उमटलेल्या दिसतात.

शाळिग्राम हे विष्णूचे प्रतीक मानतात (उदा., पंचायतन पूजेत), याच्यावर तांत्रिक धार्मिक यंत्रे कोरतात व त्याच्या मूर्ती बनवितात. विष्णूच्या गळ्यात शाळिग्रामांची माळ घालतात. माध्व संप्रदायातील वैष्णव विष्णूच्या मूर्तीपेक्षा शाळिग्राम श्रेष्ठ मानतात. कारण त्याच्यात विश्वातील सर्व पवित्र वस्तू समाविष्ट असात, अशी त्यांची श्रद्धा आहे. शाळिग्राम भंग पावला, तरी तो पूज्य समजतात. शाळिग्रामावरील मुखे व चक्रे यांवरून त्याची परीक्षा करतात. याचे ८९ प्रकार असून रंगावरून याच्या प्रकारांना पुढील नावे दिली आहेत : शुभ्र पांढरा –वासुदेव, निळा–हिरण्यगर्भ, काळा –विष्णू, गडद हिरवा–श्रीनारायण, तांबडा –प्रद्युम्न आणि गडद निळा – नरसिंह किंवा वामन. बारा चक्रे असलेल्या शाळिग्रामाला अनंत म्हणतात. सोन्याची परीक्षा करण्यासाठी कसाचा दगड म्हणून आणि कुटण्याचा खल तयार करण्यासाठीही शाळिग्राम वापरतात.

पहा : स्पितीतील शैलसमूह 

ठाकूर. अ. ना.