व्हेन, जॉन रॉबर्ट : (२९ मार्च १९२७– ). इंग्रज जीवरसायनशास्त्रज्ञ. १९८२ सालच्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. हे पारितोषिक व्हेन, सून बर्गस्ट्रॉम आणि ⇨ बेंग्ट इंगेमार सॅम्युएलसन या तिघांना ⇨ प्रोस्टाग्लँडिने व संबंधित जीवरासायनिक क्रियाशील द्रव्ये यांविषयीच्या शोधांबद्दल विभागून देण्यात आले.
व्हेन यांचा जन्म इंग्लंडमधील टार्डिबिग (वुस्टरशर) येथे झाला. त्यांनी रसायनशास्त्र व औषधिक्रियाविज्ञान यांतील पदव्या घेतल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी. एस्सी पदवी संपादन केली (१९७०). १९४६– ७३ या काळात त्यांनी विविध संस्थांमध्ये विविध पदांवर अध्यापनाचे काम केले. त्यानंतर ते वेलकम फाउंडेशन लिमिटेडच्या (बेकनहॅम) संशोधन व विकास गटाचे संचालक झाले.
प्रोस्टाग्लँडिने व संबंधित द्रव्ये प्रामुख्याने ॲरॅचिडॉनिक या असंतृप्त ⇨ वसाम्लापासून तयार होतात. ॲरॅचिडॉनिक अम्ल कोशिकेच्या (पेशीच्या) पटलात असते आणि त्यात प्रोस्टाग्लँडीन तयार करण्याची ⇨ एंझाइमासारखी क्षमता असते. ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहाचे) कार्य अभिघात, रोग किंवा ताणतणाव यांच्यामुळे विक्षोभित झाले म्हणजे या संयुगांचे स्रवण होते व त्यामुळे शरीराचे प्राकृतिक कार्य पुन्हा प्रस्थापित होते. स्थिर प्रोस्टाग्लँडिने, तसेच थ्राँबोक्सेन व प्रोस्टासायक्लिन ही स्थानिक ऊतक ⇨ हॉर्मोने समजता येतील. आकस्मिक बदल झालेल्या कोशिकेच्या संरक्षार्थ ही हॉर्मोने कार्य करतात. ल्युकोट्राएने ही प्रोस्टाग्लँडीन गटातील असून त्यांची निर्मिती मुख्यतः फुफ्फुसे व रक्तातील श्वेतकोशिकांमध्येच होते. ल्युकोट्राएनांची अधिहृषता (ॲलर्जी) प्रतिक्रिया आणि शोथामध्ये (दाहयुक्त सूच आल्यावर) निर्मिती होणे हे त्या रोगांच्या लक्षणांना बहुधा कारणीभूत असावे.
निदानीय वैद्यकात विशेष करून स्त्रीरोगविज्ञान व प्रसूतिविज्ञान यांमध्ये प्रोस्टाग्लँडिनांचा भरपूर वापर केला जातो. रक्तदाब, शरीराचे तापमान, अधिहृषता ⇨ पचनज व्रण व इतर शरीरक्रियावैज्ञानिक आविष्कार यांवर प्रोस्टाग्लँडिनांचा उपचार करतात. ऋतुस्राव, पित्ताश्मरी व वृक्काश्मरी यांमुळे होणाऱ्या वेदना प्रोस्टाग्लँडिनांच्या निर्मितीस विरोध करणारी संयुगे परिणामकारकपणे कमी करतात. वेदना, ताप व शोथ यांच्याशी संबंधित प्रोस्टाग्लँडिनांच्या निर्मितीस ॲस्पिरीन विरोध करते, हे व्हेन यांनी दाखवून दिले व या औषधाच्या परिणामकारकतेची क्रियावैज्ञानिक कारणमीमांसा केली.
व्हेन लंडनच्या रॉयल सोसायटीचे अधिछात्र (फेलो) आणि अनेक देशी व विदेशी शास्त्रीय संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत.
जमदाडे, ज. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..