व्हिटल, सर फ्रँक : (१ जून १९०७–८ ऑगस्ट १९९६). ब्रिटिश वैमानिकीय अभियंते व संशोधक. त्यांनी टर्बोजेट इंजीन तयार केले आणि ब्रिटनमध्ये विमानाच्या ⇨ झोत प्रचालन विषयक काऱ्याची सुरुवात केली.
फ्रँक यांचे वडील संशोधक वृत्तीचे तंत्रज्ञ होते. फ्रँक यांनी लीमिंग्टन महाविद्यालयातून पदवी संपादन केली (१९२३). नंतर ब्रिटनच्या शाही हवाई दलात ते शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झाले व लवकरच वैमानिक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. १९२८ साली ते लढाऊ विमानांच्या एका तुकडीत दाखल झाले. पुढे फेलीक्सस्टो येथील मरीन एअरक्राफ्ट एक्सपेरिमेंटल एस्टॅब्लिशमेंटमध्ये ‘परीक्षण वैमानिक’ म्हणून त्यांनी काम केले (१९३१-३२). नंतर त्यांनी शाही हवाई दलाचे अभियांत्रिकी प्रशाला व केंब्रिज विद्यापीठ येथे यांत्रिक विज्ञांशाखांमधील विषयांचे अधिक अध्ययन केले(१९३४ – ३७). फ्रँक यांनी टर्बोजेट इंजीन बनविले व १९३० साली त्याचे पहिले एकस्वही (पेटंटही) मिळविले. तथापि सुरुवातीला हवाई वाहतूक मंत्रालयाने झोत इंजिनाविषयीच्या त्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षच केले. मात्र त्यांच्या काऱ्याचे महत्त्व इतर अभियंत्यांना कळले होते. यातूनच ते व त्यांचे सहकारी यांनी मिळून पॉवर जेट्स ही कंपनी १९३६ साली स्थापन केली. शासनही या कंपनीत सहभागी झाले. पॉवर जेट्स लिमिटेड या कंपनीशी निगडित असलेल्या शाही हवाई दलाच्या विशेष कार्यकारी अधिकारपदांच्या यादीमध्ये व्हिटल यांचे नाव समाविष्ट करण्यात आले (१९३७). १९४१ साली त्यांनी बनविलेले झोत इंजीन ग्लॉस्टर ई २८/३९ या विमानाच्या चौकटीवर बसविण्यात आले. या विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण १५ मे १९४१ रोजी करण्यात आले. १९४४ सालापर्यंत हे इंजीन शाही हवाई दलाच्या सेवेत होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर शासनाने व्हिटल इंजिनाच्या विकासाला आर्थिक व अन्य प्रकारची मदत केली. एक लाख पौंडांचा करमुक्त असा निधी त्यांना देण्यात आला.
एअर कमोडर या पदावर असताना व्हिटल १९४८ साली निवृत्त झाले. त्याच वर्षी त्यांना नाइट हा किताब (सर ही उपाधी) देण्यात आला. १९४६ साली त्यांची यू. एस. लीजन ऑफ मेरिटमध्ये कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९७७ साली ते यू. एस. नेव्हल ॲकॅडमी (ॲन्नापोलीस, मेरिलंड) येथे संशोधन प्राध्यापक झाले. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. जेट : द स्टोरी ऑफ ए पायोनियर हे त्यांचे आत्मचरित्र १९५३ साली प्रसिद्ध झाले.
बॉल्टिमोर येथे त्यांचे निधन झाले.
कुलकर्णी, सतीश वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..