व्हिएटनाम : सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम. आग्नेय आशियातील इंडोचायना द्वीपकल्पावरील एक देश. क्षेत्रफळ ३,३२,३३८ चौ.किमी. लोकसंख्या ८,०५,५०,००० (२००० अंदाज). राजधानी हानोई (लोकसंख्या १०,७३,७६०-१९९२). इंडोचायना द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या देशाच्या पश्चिमेस कंबोडिया (ख्मेर प्रजासत्ताक), लाओस, उत्तरेस चीन, पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चिनी समुद्र, पूर्वेस उत्तर भागात टाँकिनचे आखात तर नैर्ऋत्येस थायलंडचे आखात आहे. चीनपासून दक्षिणेस पसरलेल्या या देशाचा आकार लांबट, अरुंद परंतु इंग्रजी ‘एस’ या अक्षरासारखा आहे. देशाची उत्तर-दक्षिण कमाल लांबी १,६५० किमी. तर पूर्व-पश्चिम कमाल रुंदी उत्तर भागात ६०० किमी. आणि दक्षिण भागात ३४० किमी. आहे. मध्य व्हिएटनाममधील रुंदी सर्वांत कमी म्हणजे केवळ ५० किमी. आहे. याचा विस्तार ८० ३०’ ते २३० २२’ उत्तर अक्षांश व १०२० १०’ ते १०९० ३०’ पूर्व रेखांश यांदरम्यान आहे. समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी २,३०९ किमी. आहे. १९७६ पूर्वी व्हिएटनामचे उत्तर व्हिएटनाम (डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम – डीआरव्ही) व दक्षिण व्हिएटनाम (रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम – आरव्हीएन) असे दोन भाग होते. १७० उत्तर अक्षवृत्ताला अनुसरून हे दोन भाग करण्यात आलेले होते. २ जुलै १९७६ रोजी ह्या दोन्ही भागांचे विलीनीकरण होऊन सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला.
व्हिएटनामी लोक काही वेळा आपल्या देशाचे वर्णन ‘तांदळाच्या दोन टोपल्या’ (कंट्री ॲज टू राइस बास्केट्स) असे करतात. त्यांपैकी उत्तरेकडील रेड नदीचा त्रिभुज प्रदेश म्हणजे एक व दक्षिणेकडील मेकाँगो नदीचा त्रिभुज प्रदेश ही दुसरी टोपली, असे मानले जाते.
भूवर्णन : प्राकृतिकदृष्ट्या व्हिएटनामचे पुढीलप्रमाणे पाच प्रमुख विभाग पडतात : १) उत्तरेकडील उच्च भूमी, २) रेड (हाँग) नदीचा त्रिभुज प्रदेश, ३) ॲनामितिक पर्वतश्रेणी, ४) किनारपट्टीचे सखल प्रदेश, ५) मेकाँग नदीचा त्रिभुज प्रदेश.
उत्तरेकडील ‘उच्च भूमी’ हा पर्वतीय प्रदेश व्हिएटनामच्या वायव्य भागात आहे. याची सरासरी उंची ९०० ते २,४०० मी.च्या दरम्यान आहे. व्हिएटनाममधील सर्वोच्च शिखर फँ-सी-पँ (उंची ३,१४३ मी.) हे याच प्रदेशात आहे. येथील बहुतांश भाग वनाच्छादित असून लोकसंख्या विरळ आहे.
रेड नदीचा त्रिभुज प्रदेश उत्तरेकडील उच्च भूमीपासून टाँकिनच्या आखातापर्यंत आहे. रेड नदी नैर्ऋत्य चीनमधील युनान पठारावरील उगमस्थानापासून वायव्य-अग्नेय दिशेत उत्तर व्हिएटनाममध्ये येते व टाँकिनच्या आखाताला मिळते. व्हिएटनाममधील तिची लांबी (ब्लॅक व क्लिअर उपनद्या वगळता) १,१७५ किमी. आहे. त्रिभुज प्रदेशातील तिच्या अनेक शाखांमुळे तेथे २,९०० किमी. लांबीचे बांध निर्माण झाले आहेत. बहुतांश त्रिभुज प्रदेशाची सस. पासूनची उंची ३ मी. किंवा त्यापेक्षा कमी आहे. रेड व तिच्या उपनद्यांना जून ते सप्टेंबर या काळात वारंवार हानिकारक पूर येतात. विशेषतः भाताच्या पिकाची फार मोठी हानी होते. हा त्रिभुज प्रदेश देशाचे प्रमुख कृषिक्षेत्र आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. जलसिंचन व जलवाहतूक यांसाठीही रेड व तिच्या उपनद्या उपयुक्त आहेत. येथे लोकसंख्येची घनता अधिक आहे.
व्हिएटनामच्या पश्चिम-मध्य भागात ॲनामितिक ही पर्वतश्रेण्यांची साखळी आहे. तिचा दक्षिणोत्तर विस्तार ८० किमी. आहे. ॲनामितिक पर्वतरांगेच्या उत्तरेस रेड नदीचा त्रिभुज प्रदेश व उच्च भूमीचा प्रदेश, दक्षिणेस मेकाँगचा त्रिभुज प्रदेश, तर पूर्वेस किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आहे. चीनमधील युनान पठाराचाच हा विस्तारित भाग आहे. या श्रेणीचा पूर्व भाग बराच ओबडधोबड असल्याने किनारी प्रदेशापासूनची अंतर्गत भागातील वाहतूक जिकिरीची ठरते. ॲनामितिक पर्वतश्रेण्यांच्या उत्तरेकडील उच्च भूमीच्या प्रदेशात ग्रॅनाइटी टेकड्या आढळतात (उदा., ट्रान्निंग पठार). मधल्या भागात चुनखडी व वालुकाश्मयुक्त पर्वतरांगा तर दक्षिणेकडील मॉई पठाराचा भाग प्राचीन बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. बहुतेक पर्वतश्रेण्या वनाच्छादित आहेत. या भागातही लोकवस्ती विरळ आहे.
रेड व मेकाँग या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान, दक्षिण चिनी समुद्राच्या किनाऱ्यावर, व्हिएटनामच्या पूर्व-मध्य भागात अरुंद व लांबट असा किनारपट्टीचा सखल प्रदेश आहे. याची लांबी सु. १,००० किमी. असून त्याचा उतार दक्षिण कुनी समुद्राकडे आहे. त्यामुळे या प्रदेशात उच्च भूमीचे जलवहन करून येणाऱ्या लहानलहान नदीप्रवाहांनी छोटे छोटे पण सुपीक असे त्रिभुज तयार केले आहेत. त्यांत भाताची शेती केली जाते. शेतीमुळे येथील मूळ वनस्पतिजीवन नष्ट झाले आहे. किनाऱ्यावरील अनेक लोक मासेमारी करतात. या प्रदेशात दाट लोकवस्ती आहे.
देशाच्या दक्षिणेकडे मेकाँग नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. तो रेड नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या जवळजवळ चौपट मोठा आहे. त्याची उंची सस.पासून ३ मी. किंवा त्यापेक्षा कमी आहे. तिबेटच्या पठारावर उगम पावणारी मेकाँग नदी दक्षिण व्हिएटनाममधून वेगवेगळ्या पाच ठिकाणी दक्षिण चिनी समुद्राला मिळते. उगमापासून मुखापर्यंतची तिची लांबी ४,१८० किमी. असून आग्नेय आशियातील ही सर्वांत लांब नदी आहे. सुपीक जमीन, मुबलक पर्जन्यमान व जलसिंचन-सुविधा यांमुळे जगातील समृद्ध तांदूळ उत्पादक प्रदेशांपैकी हा एक आहे. तांदळाशिवाय ऊस, केळी, नारळ ही उत्पादनेही येथे होतात. मानवनिर्मित कालव्यांसह मेकाँगचा व्हिएटनाममधील १,६०० किमी. लांबीचा प्रवाह जलवाहतुकीस उपयुक्त ठरतो. मेकाँगचे अतिरिक्त पाणी कंबोडियातील टॉनले सॅप या विशाल सरोवराकडे उलट दिशेने जात असल्याने मेकाँगला व्हिएतनाममध्ये सहसा मोठे पूर येत नाहीत. दक्षिण व्हिएतनाममधील निम्म्यापेक्षा अधिक लोक या त्रिभुज प्रदेशात राहतात.
हवामान : व्हिएटनामचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. उष्ण व आर्द्र उन्हाळे आणि सौम्य व कोरडे हिवाळे अशी हवामानाची वैशिष्ट्ये असली तरी त्यात प्रादेशिक भिन्नता आढळते. दक्षिणेकडे हिवाळे उबदार, तर उत्तरकडे ते थंड असतात. उच्च भूमीच्या प्रदेशातील हिवाळे कोरडे असून तेथील हवामान वर्षभर थंड असते. दक्षिणेकडील हो-चि-मिन्ह नगर (पूर्वीचे सायगाव) येथे उन्हाळ्यातील सरासरी तापमान २९० से. तर हिवाळ्यातील सरासरी तापमान २६० से. असते. याउलट उत्तरेकडील हानोई येथे उन्हाळ्याचे सरासरी तापमान २९० से. तर हिवाळ्यातील सरासरी तापमान १७० असते. सखल भागातील पीक वाढीचा काळ वर्षभर असतो. क्वचित प्रसंगी उत्तरेकडून येणार्याळ थंड वायुझोतांमुळे हा काळ कमी होतो.
उन्हाळी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून एप्रिल ते ऑक्टोबर या काळात देशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तर हिवाळी ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून बेताचा पाऊस पडतो. वार्षिक सरासरी वृष्टीमान १५० ते २०० सें.मी. आहे. दर वर्षीच्या मोसमी पर्जन्यमानात व वितरणात भिन्नता आढळते. ॲनामितिक पर्वतश्रेण्यांच्या प्रदेशात वार्षिक सरासरी ४०६ सेंमी.पेक्षाही अधिक पाऊस पडतो. दक्षिण व्हिएतनाममध्ये वर्षभर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. ईशान्येकडे तोंड असणाऱ्या त्रिभुज प्रदेशात बहुतांश पाऊस हिवाळ्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. हे वारे दक्षिण चिनी समुद्रावरून वाहत असताना बरेच बाष्प ग्रहण करतात. त्यामुळेच या भागातील ह्रे येथे वर्षभरात पडणाऱ्या सु. २९५ सेंमी. पर्जन्यापैकी बहुतांश पर्जन्य हिवाळ्यात पडतो. मध्य व्हिएटनाममध्ये मात्र देशातील सर्वांत कोरडे व सर्वांत आर्द्र असे दोन्ही प्रकारचे प्रदेश आढळतात. पूर्व किनारपट्टीवरील उत्तर व उत्तर-मध्य प्रदेशाला वारंवार ⇨ टायफूनचा तडाखा बसतो.
वनस्पती व प्राणी : व्हिएटनाममधील एकूण भूक्षेत्रापैकी दोन पंचमांश क्षेत्र उष्णकटिबंधीय सदाहरित व उपोष्ण कटिबंधीय पानझडी वनांनी व्यापलेले आहे. उत्तरेकडील उच्च भूमी व ॲनामितिक पर्वतीय प्रदेशांत उष्णकटिबंधीय वर्षारण्ये व मोसमी अरण्ये आढळतात. दक्षिण भागात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यांचे प्रमाण अधिक आहे. ओक, बीच, चेस्टनट, पाइन, साग, एबनी, बांबू इ. वृक्षप्रकार अधिक प्रमाणात आढळतात. किनाऱ्यावरील भरती प्रदेशात कच्छ वनश्री, तर नैर्ऋत्य भागातील उच्च भूमी व पठारी प्रदेशात सॅव्हाना प्रकारचे गवत व झुडपे आढळतात. झाडे तोडून व जाळून केली जाणारी स्थलांतरित शेती, तसेच दीर्घकालीन व्हिएटनाम युद्धात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या फौजांनी केलेला बाँबवर्षाव व वनस्पतीनाशकांचा वापर इत्यादींमुळे व्हिएटनाममधील वनस्पतिजीवन फार मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले. देशातील सु. एक चतुर्थांश भूक्षेत्र लागवडीखाली आहे.
वाघ, हत्ती, गेंडा, हरीण, माकडे, मगरी व सुसरी इ. प्राणी येथे आढळत असत परंतु युद्धाची झळ प्राणिजीवनालाही पोहोचून त्यांची संख्या कमी झाली आहे. पर्वतीय प्रदेशात हरीण व रानबैल आढळतात. अनेक जातीचे पक्षी व कीटक पहावयास मिळतात.
खनिजे : उत्तर व्हिएटनाम विविध खनिज संपत्तीच्या बाबतीत समृद्ध आहे. अँथ्रॅसाइट व लिग्नाइट प्रकारचा कोळसा ही त्यांपैकी प्रमुख खनिजे होत. लोह, जस्त, शिसे, बॉक्साइट, तांबे, क्रोमियम, टंगस्टन व कथिल ही इतर खनिजे आहेत. दक्षिणेकडील किनाऱ्यावरील अपतट भागात खनिज तेलाचे साठे आढळले आहेत.
इतिहास व राजकीय स्थिती : प्राचीन काळी उत्तर व्हिएटनाममध्ये व्हिएटनामी ह्या वांशिक गटाच्या लोकांचे वास्तव्य होते. इ.स.पू. सु. २०० मध्ये चिनी जनरल झाओ तुओ (त्रिवूदा) याने व्हिएटनामचा हा प्रदेश व आग्नेय चीनचा काही प्रदेश मिळून नाम व्हिएट ह्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. इ.स.पू. १११ मध्ये चीनने हे राज्य जिंकून त्याला इआओ झी (जिआओ ची) असे नाव दिले. इ.स. ६७९ मध्ये चीनने याचे अनाम (शांततामय दक्षिण–पॅसिफाइड साउथ) असे नामकरण केले. इ.स. पहिल्या शतकाच्या अखेरीस सध्याच्या दक्षिण व दक्षिण-मध्य व्हिएटनाम प्रदेशात फूनान व चंपा ही दोन राज्ये उदयास आली. फूनान राज्यावर भारताचा विशेष प्रभाव होता. चंपा राज्याचा विस्तार जिआओ ची (अनाम) व फूनान यांदरम्यानच्या मध्य व्हिएटनाममध्ये होता. पाचव्या व सहाव्या शतकात चंपाच्या पश्चिम भागात राहणाऱ्या ख्मेर लोकांमी फूनान राज्य जिंकून घेतले.
इ.स. ९३९ मध्ये चीनने अनामवरील ताबा सोडला. तेव्हा व्हिएटनामी लोकांनी आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. व्हिएटनामी राज्यकर्त्यांनी या राज्याला दाई को व्हिएट (मोठे व्हिएट राज्य) असे नाव दिले. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीचा वीस वर्षांचा चिनी अंमल वगळता, सु. ९०० वर्षे ह्या राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. इ.स. १००९ मध्ये ली घराणे सत्तेवर आले. त्यांनी २०० वर्षे राज्य केले. ली राज्यकर्त्यांनी आपल्या लष्कराची ताकद वाढविली. त्यामुळे चंपा, चीन व ख्मेर साम्राज्य यांचे वारंवार झालेले लष्करी हल्ले परतवून लावता आले. हा काळ म्हणजे या राज्याच्या विस्ताराचा, समृद्धीचा व सांस्कृतिक वैभवाचा काळ ठरला. १२२५ मध्ये ली घराण्याकडून ट्रान घराण्याने सत्ता बळकावली. त्यांनी इ.स. १४०० पर्यंत राज्य केले. या काळात दाई को व्हिएटने मंगोल सैन्याचे वारंवार झालेले हल्ले परतवून लावले. चंपा सत्तेशीही सतत झगडे होत राहिले. पुढे १४०७ ते १४२७ या काळात येथे चीनची सत्ता होती. त्यानंतर ली घराण्याची सत्ता आली. ली राजवटीत दाई व्हिएटची बरीच भरभराट झाली. या घराण्यातील ली तान टॉन याने चंपा जिंकून घेतले (१४७१). परंतु त्याच्या नंतर दाई व्हिएटमध्ये यादवी युद्ध सुरू झाले. उत्तरेकडील ट्रान घराणे व दक्षिणेकडील नगिएन घराणे यांच्यातील ही यादवी होती. हे यादवी युद्ध १६७३ मध्ये संपले. त्यानंतर पुढील शंभर वर्षे दाई व्हिएटमध्ये शांतता राहिली. या कालावधीत एन्गायेन राजवटीने ख्मेर साम्राज्यातील काही भाग काबीज करून आपल्या प्रदेशाचा विस्तार केला. इ.स. १७५७ मध्ये देशाची विभागणी दोन भागांत करण्यात आली. १८०२ पर्यंत त्यांचे एकत्रीकरण होऊ शकले नाही. १७७० च्या दशकाच्या सुरुवातीलाच मध्य दाई व्हिएटमधील तीन बंधूंनी एन्गायेन घराण्याच्या विरोधात बंड उभारले. हे तीन बंधू स्वतःला टे सन असे म्हणवून घेत. टे सन यांनी ली राज्यकर्त्यांना अखेर सत्तेवरून खाली खेचले. पुढे पराजित एन्गायेन राजघराण्यातील जनरल ए न्गायेन आन याने दक्षिण दाई व्हिएटवर कब्जा मिळविला. त्याने १८०२ मध्ये टे सन राज्यकर्त्यांचा पराभव करून गीआ लाँग या नावाने अखंड दाई व्हिएटचा सम्राट म्हणून स्वतःला घोषित केले. ह्या प्रदेशाला पुढे त्यानेच व्हिएटनाम असे नाव दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत याच घराण्याकडे सम्राटपद होते.
सोळाव्या शतकात फ्रान्समधून रोमन कॅथलिक मिशनरी दाई व्हिएटमध्ये येऊ लागले होते. त्यांनी हजारो व्हिएटनामी लोकांचे धर्मांतर घडवून आणले. परिणामतः व्हिएटनामी राज्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या विरोधात पावले उचलली. व्हिएटनामी सत्तेकडून मिशनऱ्यांचा होणारा छळ थांबविणे, तसेच व्हिएटनाममध्ये सत्ता प्रस्थापित करणे, अशा दुहेरी उद्देशाने फ्रेंच सैन्याने दक्षिण व्हिएटनामच्या काही प्रदेशांवर हल्ला करण्यास सुरुवात केली ( १८५८). १८६१ मध्ये फ्रान्सने सायगाव हे शहर, तर १८६७ मध्ये दक्षिणेकडील उर्वरित प्रदेश काबीज केला. १८८३ मध्ये त्यांनी उत्तर व्हिएटनामवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याच वर्षी संपूर्ण व्हिएटनामवरील फ्रेंच सत्तेला मान्यता देण्याविषयी करार करण्यास फ्रान्सने एन्गायेन राज्यकर्त्यांना भाग पाडले. फ्रान्सने देशाची पुढील तीन प्रदेशांत विभागणी केली : (१) कोचीन चायना (दक्षिण व्हिएटनाम) (२) अनाम (मध्य व्हिएटनाम) व (३) टाँकिन (उत्तर व्हिएटनाम). या वेगवेगळ्या प्रदेशांचा फ्रेंच इंडोचायनांतर्गत परंतु स्वतंत्र कारभार चालत असे. तत्कालीन फ्रेंच इंडोचायनामध्ये व्हिएटनामबरोबरच कंबोडिया व लाओस यांचाही समावेश होत असे.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला (१९४०). जर्मनीचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानने लगलीच फ्रेंच इंडोचायनाचा ताबा घेतला. जपानने फ्रेंच अधिकाऱ्यांना व्हिएटनाममध्ये राहण्याची परवानगी दिली. परंतु त्यांच्यावर जपानच्या इच्छेनुसार राज्यकारभार करण्याचे बंधन घातले. मार्च १९४५ मध्ये जपानने सर्व फ्रेंच अधिकाऱ्यांना अटक केली आणि फ्रान्सपासून अनाम व टाँकिन स्वतंत्र झाल्याची घोषणा करण्याची, सम्राट बाओ दाईवर सक्ती केली. ऑगस्ट १९४५ मध्ये जपानचा पाडाव होईपर्यंत व्हिएटनामवर जपानी सत्ता होती.
जपानच्या पराभवानंतर व्हिएटनामी कम्युनिस्ट नेता हो-चि-मिन्ह चीनमधून व्हिएटनाममध्ये परतला. व्हिएटनामच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्थापन केलेल्या रेव्होल्यूशरी लीगचा, म्हणजेच सामान्यपणे व्हिएटमिन्ह नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघटनेचा, हो-चि-मिन्ह प्रमुख होता. व्हिएटमिन्हने मोठ्या प्रदेशावर, विशेषतः उत्तरेकडील प्रदेशावर, अतिशय जलदगतीने ताबा मिळविला. सम्राट बाओ दाईला हळूहळू हो-चि-मिन्हला पाठिंबा देणे भाग पडले. सप्टेंबर १९४५ मध्ये हो-चि-मिन्हने व्हिएटनाम स्वतंत्र झाल्याचे जाहीर करून डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम (डीआरव्ही) च्या निर्मितीची घोषणा केली. कम्युनिस्ट व्हिएटमिन्हचे शासन सत्तेवर येऊन त्या नव्या शासनाचाही हो-चि-मिन्ह प्रमुख बनला. देशात पुन्हा फ्रेंच वसाहतीची सत्ता येऊ नये, असे वाटणाऱ्या अनेक कम्युनिस्टेतर परंतु राष्ट्रवादी व्यक्तींनी या सरकारला पाठिंबा दिला. काही आठवड्यांतच जपानने हक्क सोडावा, म्हणून ब्रिटिश व चिनी फौजा व्हिएटनाममध्ये दाखल झाल्या. फ्रेंचांनी कोचीन चायनावर पुन्हा ताबा मिळविला. परंतु त्यांना आपले सर्व अडथळे दूर करणे शक्य झाले नाही. व्हिएटमिन्ह व फ्रान्स यांच्यातील संबंध बरेच बिघडले. १९ डिसेंबर १९४६ रोजी व्हिएटमिन्ह फौजांनी हानोई येथे फ्रेंच सैन्यावर हल्ला केला. यातूनच इंडोचायना युद्धाला, म्हणजेच व्हिएटमिन्ह युद्धाला सुरुवात झाली. १९४९ च्या मध्यात व्हिएटमिन्हला विरोध करण्यासाठी फ्रेंचांनी स्टेट ऑफ व्हिएटनामची स्थापना केली. स्टेट ऑफ व्हिएटनामवर बाओ दाईच्या नेतृत्वाखाली व्हिएटनामी राष्ट्रवादी नागरिकांचे शासन प्रस्थापित झाले. व्हिएटमिन्हवरील कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणाऱ्या अनेक देशाभिमानी व्यक्तींनी नवीन शासनाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. फ्रान्सच्या पश्चिमी मित्र राष्ट्रांनी स्टेट ऑफ व्हिएटनामला, तर कम्युनिस्ट राष्ट्रांनी हो-चि-मिन्हच्या डीआरव्ही शासनाला पाठिंबा दिला. दोन्ही शासनांनी संपूर्ण व्हिएटनामवर आपला ताबा सांगितला. १९५३ मध्ये कम्युनिस्टांनी उत्तर व्हिएटनाममधील कृषिप्रदेशावर ताबा मिळविण्यास सुरुवात केली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी वाटणाऱ्या जमीनदारांना ठार केले किंवा तुरुंगात डांबले. तसेच सर्व शेतकऱ्यांना उत्पादनाचा वाटा ठरवून दिला.
व्हिएटनाममध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एप्रिल १९५४ मध्ये डीआरव्ही स्टेट ऑफ व्हिएटनाम, कंबोडिया, लाओस, चीन, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, सोव्हिएट संघ व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्या प्रतिनिधींची परिषद स्विझर्लंडमधील जिनिव्हा येथे झाली. व्हिएटनाममधील स्वामित्वासाठी झालेल्या द्येन ब्येन फू येथील युद्धात व्हिएटमिन्हने फ्रेंचांचा पराभव केला व मे १९५४ मध्ये व्हिएटनाम-फ्रान्समधील युद्ध समाप्त झाले. १७० उ. अक्षवृत्ताला अनुसरून व्हिएटनामची कम्युनिस्ट उत्तर व्हिएटनाम व कम्युनिस्टेतर दक्षिण व्हिएटनाम अशी दोन भागांत तात्पुरती विभागणी करण्याचा निर्णय जिनिव्हा परिषदेत घेण्यात आला. यांतील उत्तरेकडील अर्ध्या भागाला सोव्हिएट संघाचा तर दक्षिणेकडील अर्ध्या भागाला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पाठिंबा होता. एका शासनाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण व्हिएटनाम आणण्यासाठी १९५६ मध्ये निवडणुका घेण्यात याव्यात, अशी सूचनाही या परिषदेने केली. हो-चि-मिन्ह हे उत्तर व्हिएटनामचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर दक्षिण व्हिएटनामच्या प्रमुखपदी बाओ दाई यांची निवड झाली. १९५५ मध्ये दक्षिण व्हिएटनामी लोकांनी आपल्या नेतेपदी एन्गो दिन द्येम यांची निवड केली. द्येमने व्हिएटनाम प्रजासत्ताकाची स्थापना करून स्वतःकडे राष्ट्राध्यक्षपद घेतले. कम्युनिस्टांकडून खुल्या वातावरणात निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत, असा आक्षेप घेऊन १९५६ मधील निवडणुका एकत्रित घेण्याचे द्येमने नाकारले. परिणामतः व्हिएटनाम विभक्तच राहिला
राष्ट्राध्यक्ष द्येम यांनी १९५६ मध्ये नवीन संविधानास मंजुरी दिली. त्यानुसार प्रजासत्ताक म्हणून दक्षिण व्हिएटनामची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात सत्ता द्येम व त्याच्या कुटुंबीयांच्याच ताब्यात होती. द्येम शासनाला लोकांचा विरोध वाढत जाऊन त्यातूनच देशात यादवी सुरू झाली. या यादवीतूनच व्हिएटनाम युद्ध भडकले. यालाच ‘इंडोचायना युद्ध’ किंवा ‘दुसरे इंडोचायना युद्ध’ असेही संबोधले जाते. हे युद्ध १९५७ ते १९७५ या काळात झाले. अमेरिकेचा सहभाग असलेले आणि जगातील सर्वांत दीर्घ काळ चाललेले असे हे युद्ध ठरले. या युद्धात व्हिएटनामची फार मोठी प्राणहानी व वित्तहानी झाली.
दक्षिण व्हिएटनामधील व्हिएटमिन्हच्या सभासदांनी १९५७ मध्ये द्येम शासनाविरुद्ध बंड उभारण्यास सुरुवात केली. हे बंडखोर ‘व्हिएटकाँग’ या नावाने ओळखले जाऊ लागले. १९५९ मध्ये उत्तर व्हिएटनामने या बंडखोरीला उघडपणे पाठिंबा जाहीर करावा, असा आदेशही उत्तर व्हिएटनामने दिला. या लढ्याचे सामर्थ्य वाढविण्याच्या हेतूने १९६० मध्ये व्हिएटकाँगचे सदस्य ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट’मध्ये संघटित झाले. हळूहळू युद्धाचा विस्तार व तीव्रता वाढू लागली. व्हिएटकाँगचे दक्षिण व्हिएटनामवरील हल्ले वाढले. १९६२ मध्ये द्येमने देशात आणीबाणी जारी केली. १ नोव्हेंबर १९६३ रोजी डुआँग व्हान मिन्हच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या एका गटाने दक्षिण व्हिएटनाममधील सत्ता ताब्यात घेतली. द्येमला ठार मारण्यात आले. संयुक्त संस्थानांनी दक्षिण व्हिएटनामच्या मदतीसाठी व्हिएटनामकडे भूदल तुकड्या पाठविण्यास, तसेच उत्तर व्हिएटनामवर बाँबहल्ले करण्यास सुरुवात केली (१९६५). या युद्धातील अमेरिकेचा सहभाग १९७३ पर्यंत चालू राहिला. चीन व सोव्हिएट संघानेही उत्तर व्हिएटनाम व व्हिएटकाँगच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे व इतर साधनसामग्री पाठविली. १९६७ मध्ये एंगायेन व्हान तीऊ या भूदल सेनापतीची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान युद्ध अधिकच भडकले. उत्तर व्हिएटनामच्या राष्ट्राध्यक्षपदावर हो-चि-मिन्ह हेच मृत्यूपर्यंत म्हणजे १९६९ पर्यंत राहिले.
इ. स. १९६५ नंतर कम्युनिस्टांशी लढताना दक्षिण व्हिएटनाम प्रामुख्याने अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून होता. मात्र अमेरिकेच्या व्हिएटनाम युद्धातील वाढत्या सहभागाबद्दल अमेरिकन जनतेत नाराजी निर्माण होऊ लागली. १९७३ मध्ये दक्षिण व्हिएटनाम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कम्युनिस्ट पक्ष यांच्यात युद्धबंदी करारावर सह्या झाल्या. त्यामुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी व्हिएटनाममधून आपले सैन्य काढून घेतले परंतु कम्युनिस्टांनी दक्षिण व्हिटनामवर पुन्हा हल्ला चढविला. एप्रिल १९७५ मध्ये दक्षिण व्हिएटनामच्या राजधानीचे ठिकाण असलेले सायगाव कम्युनिस्टांच्या ताब्यात आले. २ जुलै १९७६ रोजी कम्युनिस्टांनी उत्तर व दक्षिण व्हिएटनामचे ‘सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम’ या नावाने एकत्रीकरण घडवून आणले. उत्तरेकडील कम्युनिस्ट अधिकाऱ्यांनीच एकत्रित व्हिएटनाम शासनाचा ताबा घेतला. त्यांनी सायगावचे नाव हो-चि-मिन्ह सिटी असे बदलले. व्हिएटनाम युद्ध समाप्तीनंतर व्हिएटनामला फार मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. देशाचे कमालीचे दारिद्र्य, शासनाच्या काही योजनांबद्दलचे असमाधान यांमुळे फार मोठ्या संख्येने लोक देश सोडून परदेशात गेले.
व्हिएटनाम युद्धानंतरही व्हिएटनामचे काही शेजारील राष्ट्रांबरोबर संघर्ष निर्माण झाले. १९७८ मध्ये व्हिएटनामने कंबोडियावर आक्रमण केले. त्यावर ताबाही मिळविला. १९७९ मध्ये चिनी सैन्याने व्हिएटनामच्या उत्तर सरहद्दीजवळच्या प्रदेशाचा ताबा घेतला. साधारण महिनाभर हा ताबा होता. व्हिएटनामच्या कंबोडियावरील आक्रमणाचा बदला घेण्याच्या उद्देशाने चीनने हे आक्रमण केले होते. १९९१ मध्ये कंबोडियाबरोबरील युद्ध थांबले. त्यानंतर टप्प्याप्प्याने व्हिएटनामने कंबोडियातील आपले सैन्य काढून घेतले.
व्हिएटनाम कम्युनिस्ट पार्टी (स्थापना १९३०) हा देशातील प्रमुख राजकीय पक्ष असून, १५ सदस्य असलेल्या पॉलिटब्यूरोच्या हातात पक्षाची सत्ता असते. देशाच्या शासनव्यवस्थेत पॉलिटब्यूरोला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्हिएटनामच्या नॅशनल असेंब्लीने नव्या संविधानाला १५ एप्रिल १९९२ रोजी मान्यता दिली. या संविधानानुसार व्हिएटनाम कम्युनिस्ट पक्षाला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये ४५० सदस्य असून त्यांची निवड सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धतीने पाच वर्षांसाठी केली जाते. वैधानिक सत्ता नॅशनल असेंब्लीकडे असते. असेंब्लीकडून राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाते. राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची नियुक्ती करतो. जुलै १९९७ मध्ये झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत ‘फादरलँड फ्रंट’ (व्हीव्हीएफ) पक्षाने ४४७ जागा जिंकल्या. त्यांपैकी ३८४ सदस्य कम्युनिस्ट पक्षाचे होते.
व्हिएटनामचे सशस्त्र दल मोठे असून ‘पीपल्स आर्मी ऑफ व्हिएटनाम’ (पीएव्हीएन) या नावाने ते ओळखले जाते. स्त्री-पुरुष दोघांनाही दोन वर्षांची लष्करी सेवा सक्तीची आहे. निमलष्करी सेनेपैकी नागरी भागातील ‘पीपल्स सेल्फ डिफेन्स फोर्स’ व ग्रामीण भागातील ‘पीपल्स मिलिशिया’ ही दले महत्त्वाची आहेत.
आर्थिक स्थिती : व्हिएटनाम हा गरीब देशांपैकी एक आहे. तेथील राहणीमान अद्याप निर्वाह पातळीवरच आहे. मोठ्या प्रमाणावरील परकीय मदतीवरच त्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. वसाहतपूर्व काळात व्हिएटनामची अर्थव्यवस्था कृषिप्रधान होती. भातशेती महत्त्वाची होती. लहान प्रमाणावर व्यापार व कारखानदारी होती. विदेशी व्यापारही थोडासाच होता. परंतु वसाहतकार येथे आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलत गेले. फ्रेंचांनी येथे रबर, चहा व तांदूळ यांच्या निऱ्यायोग्य उत्पादनात वाढ घडवून आणली. तसेच त्यांनी हा देश आपल्या मालाची बाजारपेठ बनविली. परिमाणात: वसाहतकाळात व्हिएटनाममध्ये कापड, कागद, खाद्यपदार्थ व सिमेंट ह्यांचे अल्पसे उत्पादन वगळता इतर कारखानदारीचा विकास होऊ शकला नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही उद्भवलेल्या युद्ध परिस्थितीमुळे देशाची मोठीच आर्थिक कोंडी झाली. दीर्घ काळ चाललेले व्हिएटनाम युद्ध १९७५ मध्ये समाप्त झाल्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेले दक्षिण व्हिएटनाम आणि समाजवादी अर्थव्यवस्था असलेले उत्तर व्हिएटनाम यांचा योग्य मेळ घालावयाचा तसेच अर्थव्यवस्थेची पुन:स्थापना करून देशाचा आर्थिक विकास घडवून आणावयाचा, ही फार मोठी आव्हाने देशापुढे होती. युद्धामुळे शहरांची, कारखान्यांची व वाहतूक साधनांची अपरिमित हानी झाली होती. जमिनीवर लढले गेलेले युद्ध आणि रासायनिक नाशकांची हवाई फवारणी यांमुळे शेतजमिनीचेही नुकसान झाले. त्यामुळे युद्धकाळात लाखो शेतकऱ्यांनी खेड्यातून पळ काढला होता. १९७५ मध्ये सायगाव शहराची लोकसंख्या वाढून एकदम ३५ लाखांवर पोहोचली. उत्तेजन आणि सक्ती या दोहोंचा एकत्रित अवलंब करून युद्धकालीन निर्वासितांचे शेतीमध्येच पुनर्वसन करण्याचा शासनातर्फे प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे अनेकांनी शहरे सोडून आपल्या मूळ वसत्यांकडे स्थलांतर केले.
उत्तर व दक्षिण व्हिएटनामचे राजकीयदृष्ट्या एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रित आर्थिक विकास करण्याची निकड निर्माण झाली. १९५४ पर्यंत या दोन्ही प्रदेशांचे विकासांचे वेगवेगळे मार्ग होते. १९७० च्या दशकात उत्तर व्हिएटनाममध्ये शेती सामान्यपणे खाजगी मालकीची होती आणि कारखानदारी व वितरण व्यवस्था प्रामुख्याने हजारो लहान लहान कुटुंबांच्या ताब्यात होती. दक्षिण व्हिएटनामची अर्थव्यवस्था मुख्यत: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मदतीवर अवलंबून होती. ही मदत १९७५ साली बंद झाली.
आर्थिक विकासात एकात्मता आणण्याचे प्रयत्न १९७० च्या दशकाच्या अखेरीस शासनातर्फे करण्यात येऊ लागले. त्या दृष्टीने संपूर्ण व्हिएटनाममध्ये औद्योगिकीकरण व समाजवादी अर्थव्यवस्था दृढ करणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आल्या. मात्र त्यासाठी भांडवल व कुशल मजुरांचा तुटवडा भासू लागला. तसेच अकार्यक्षम व भ्रष्टाचारी नोकरशाहीमुळेही पुनर्रचना कार्यक्रमात अनेक अडथळे निर्माण झाले. देशाची अर्थव्यवस्था कुंठित झाली परंतु त्याच वेळी लोकसंख्या वेगाने वाढली. १९७८ मध्ये आलेल्या महापुरामुळे ३० लक्ष टन तांदळाची नासधूस झाली. १० लक्ष हेक्टर पिकांखालील क्षेत्र पाण्याखाली गेले व पूरग्रस्त क्षेत्रातील एकूण गुरांपैकी २० टक्के गुरे मृत्युमुखी पडली. १९७८ मध्येच व्हिएटनामने कंबोडियावर आक्रमण केले, त्यामुळे १९७९ मध्ये व्हिएटनामला चीनशी युद्ध करावे लागले. चीनकडून तसेच ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांकडून मिळणारी मदत बंद झाली. या सर्वांमुळे व्हिएटनामची अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडली. १९७९ मध्ये शासनाने आर्थिक पुनर्रचना योजना हाती घेतली. त्या अंतर्गत शासनाचे नियंत्रण कमी करून २० पेक्षा कमी कामगार असणारे उद्योग-व्यवसाय खाजगी कुटुंबांना करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे काही खाजगी उपक्रमांना व स्पर्धेला चालना मिळाली. त्याचा अनुकूल परिणाम देशाच्या आर्थिक विकासात दिसू लागला.
शेती : देशातील एकूण कामकरी लोकसंख्येपैकी सु. ७० टक्के लोक शेतकरी आहेत. देशातील १५ टक्के भूमी शेतीसाठी वापरली जाते. शेतीच्या दृष्टीने सखल प्रदेश व रेड, मेकाँग आणि इतर नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष महत्त्वाचे आहेत. ओली भातशेती विशेष महत्त्वाची आहे. निम्म्या भातक्षेत्रातून वर्षाला दोन पिके घेतली जातात. शक्य तेथे वर्षातून तीन पिकेही घेतली जातात. तांदळाशिवाय कसाव्हा, ज्वारी, मका, सोयाबीन, रताळी, फळे, भाजीपाला, भुईमूग ही कृषिउत्पादने महत्त्वाची आहेत. कॉफी, चहा, रबर, ऊस, तंबाखू, कापूस, नारळ, ताग ह्या नगदी पिकांचे उत्पादनही घेतले जाते. रबर हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख उत्पादन आहे. सामूहिक व सहकारी स्वरूपाच्या शेतीपद्धतीचा बराच विस्तार करण्यात आला आहे. तरीही देशात अन्नधान्याचा तुटवडा भासतो. त्या वेळी शासनाकडून नवीन कृषी सहकारी-संस्थेतील सभासदांना त्यांच्या जमिनीतून वैयक्तिकरीत्या उत्पादन घेण्यास, तसेच लहान कृषि-क्षेत्रधारकांस आपले जास्तीचे उत्पादन खुल्या बाजारात विकण्यास परवानगी देण्यात आली. जलसिंचन सुविधांत वाढ, अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या जातींची पैदास व खतांचा वापर वाढवून कृषिउत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. १९९३ मध्ये देशात पुढीलप्रमाणे उत्पादने झाली (उत्पादन हजार टनांत) : कॉफी १३५, चहा ३५, रबर ७६, नारळ १,२०६ (१९९४), तांदूळ २४,५०० शेतीबरोबरच डुकरे, म्हशी व गुरे पाळली जातात. एकूण मांसोत्पादनात सु. दोन तृतीयांश वराहमांस असते. देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते : गुरे ३.७ द.ल., डुकरे १६.९० द.ल. (१९९६), म्हशी ३ द.ल. शेळ्या ३,०५,००० कोंबडया ८५ द.ल., बदके ४३ द.ल. (१९९५). मांसोत्पादन ११,२६,००० टन व अंडी उत्पादन १,१५,००० टन झाले (१९९३).
मासेमारी : अन्नाची गरज भागविण्यासाठी, तसेच निर्यातीच्या दृष्टीनेही मासेमारीला महत्त्व आहे. अंतर्गत जलाशयांत व दक्षिण चिनी समुद्रात मासे व कालव पकडले जातात. किनारी प्रदेशात राहणाऱ्या अनेक लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. १९९२ मध्ये ३२ मासेमारी बोटी होत्या. १९९५ मध्ये एकूण १२ लक्ष टन इतके मत्स्योत्पादन झाले. लॉब्स्टर, कोळंबी, स्क्विड असे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले पन्नासपेक्षा अधिक जातींचे मासे येथे पकडले जातात. मासेमारी व्यवसायाचे सामूहिकीकरण करण्यात आले असून, बहुतांश मासेमारी-बोटींचे राष्ट्रीयीकरण केले आहे. निर्वासितांनी मोठ्या प्रमाणावर बोटी पळविल्यामुळे, तसेच इंधन टंचाईमुळे मासेमारी व्यवसायाची बरीच हानी झाली आहे.
व्हिएतनाममध्ये वनोद्योगाचा विकास विशेष झालेला नाही. बांबू, रेझिन, रबर, लाख, कोयनेल, दालचिनी, पाइनतेल, टर्पेंटाइन, डांबर इ. अरण्योत्पादने मिळविली जातात, अरण्योत्पादनांत मंदगतीने वाढ होत आहे. देशातील ९१ लक्ष हेक्टर किंवा एकूण भूक्षेत्राच्या २८ टक्के क्षेत्र अरण्यांखाली होते (१९९५). दर वर्षी २ लक्ष हेक्टर क्षेत्र अरण्याखाली आणण्याची योजना आहे. १९९५ मध्ये ३,४९,१३,००० घ.मी. एवढे लाकडाचे उत्पादन झाले.
खाणकाम : खनिज संपत्तीच्या दृष्टीनेही उत्तर व्हिएतनाम महत्त्वाचा आहे. अँथ्रासाईट कोळसा देशातील सर्वांत महत्त्वपूर्ण खनिज होय. बहुतेक सर्व साठे उत्तर व्हिएतनाममध्येच केंद्रित झाले आहेत. हायफाँगजवळील हाँगाई येथील कोळसा-खाणी आग्नेय आशियात प्रसिद्ध आहेत. कोळशाचे १९९२ मध्ये ४८ लक्ष टन उत्पादन झाले. कोळशाशिवाय बॉक्साईट, क्रोमाईट, लोहखनिज, तांबे, टंगस्टन, अँटिमनी, जस्त, शिसे, निकेल, ग्रॅफाइट, अभ्रक, अपेटाइट, फॉस्फेट, खनिज तेल, सैंधव, मँगनीज, टिटॅनियम, कथिल, सोने, संगमरवर यांचे साठे देशात आहेत.
कारखानदारी : देशातील औद्योगिक क्षेत्र फारच मर्यादित आहे. खाणकाम व कारखानदारी व्यवसायांतून देशाच्या एकूण उत्पादनापैकी सु. एक तृतीयांश उत्पादन मिळते मात्र त्यातील रोजगार कमीच आहे. बहुतांश अवजड व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचे केंद्रीकरण उत्तरकडे झालेले आहे, तर लघुउद्योग हे दक्षिणेचे वैशिष्ट्य आहे. व्हिएतनाम युद्धकाळात उत्तर व्हिएतनाममधील सु. ७० टक्के उद्योगांचा विनाश झाला. १९७६ नंतरच्या पुनर्रचना कार्यक्रमांतर्गत सिमेंट, पोलाद, कापड व विद्युतशक्ती इ. उत्पादनांवर भर देण्यात आला. पोलादाचा उपयोग कृषि अवजारे, सायकली व कागदाचा लगदा, रसायने, अन्नप्रक्रिया, बीर निर्मिती इ. उद्योगधंदे चालतात. लघुउद्योगांतून स्थानिक उपयोगासाठी कापड, साखर व सिगारेटी ही उत्पादने घेतली जातात. १९८२ पर्यंत बऱ्याचशा उद्योगांची पुनर्रचना करण्यात आली. १९९२ मध्ये देशात पुढीलप्रमाणे औद्योगिक उत्पादने झाली (उत्पादन हजार टनांत) : कच्चे पोलाद १७५·२, सिमेंट ३,७२७, खते ५०७, गंधकाम्ल ८, रंजक द्रव्ये ४·३, काच व काचसामान ३२·३, कापडाचा धागा ४२·५, साखर ३०४, चहा २०.१ व प्रक्रिया केलेले मासे ६२७·४. देशात सु. ४० द.ल. कामगार होते (१९९५). महिला कामगारांचे प्रमाण ३० टक्के होते (१९९३). एकूण कामकरी लोकांपैकी ५८ टक्के सहकारी क्षेत्रात, ३१ टक्के खाजगी क्षेत्रात, ११ टक्के शासकीय क्षेत्रात होते (१९९१). १९९६ मध्ये १६,०७,००० परदेशी पर्यटकांनी व्हिएतनामला भेट दिली. त्यापासून देशाला ८७ द.ल. अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळाले.
व्हिएतनाममध्ये जलविद्युतशक्ती निर्मितीचा विशेष विकास झालेला नाही. तसेच जे काही जलविद्युत निर्मिती प्रकल्प होते, त्यांची व्हिएतनाम युद्धात हानी झाली. ह्वाबिन येथे २० लक्ष किवॉ. क्षमतेचे जलविद्युत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे (१९९४). कोळशावर आधारित औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून मुख्यत: वीजपुरवठा होतो परंतु देशाच्या गरजेच्या मानाने हे उत्पादन पुरेसे नाही. १९९४ मध्ये देशात १२,४७३ द.ल. किवॉ. तास वीज निर्माण झाली. खनिज तेल उत्पादनांसाठी देश आयातीवरच अवलंबून आहे. खनिज तेलाचे १९९५ मधील अंदाजे उत्पादन ७७ लक्ष टन होते.
व्यापार : हानोई व हो-चि-मिन्ह नगर ही देशातील दोन प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. १९७८ मध्ये दक्षिणेतील सु. ३०,००० खाजगी दुकानांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. परंतु १९७९ च्या अखेरीस बऱ्या च दुकानांना पुन्हा मुक्त व्यापाराची परवानगी देण्यात आली. त्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम दिसून आले. निर्यातीपेक्षा आयात बरीच अधिक आहे. प्रतिकूल व्यापार संतुलनामुळे रशिया, फ्रान्स, जर्मनी व इतर देशांकडून मिळणार्या् अनुदान व कर्जावरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. खनिज तेल, औषधे, यंत्रसामग्री, लष्करी साधनसामग्री, वाहने, कृत्रिम खते व अन्नधान्याची आयात केली जाते. कोळसा, कृषी, प्राणिज, व सागरी उत्पादने, भुईमूग-शेंग, रबर, चहा, बांबू व वेतापासून तयार केलेल्या वस्तूंची येथून निऱ्या होते. व्हिएतनामचा ६५ टक्के विदेशी व्यापार आशियाई देशांशी चालतो. रशियाशी, तसेच पूर्वी सोव्हिएट संघामध्ये समाविष्ट असणाऱ्या परंतु आता स्वतंत्र झालेल्या देशांशी सर्वाधिक व्यापार चालतो. याशिवाय जपान, हाँगकाँग, सिंगापूर, द. कोरिया, तैवान यांच्याशीही व्यापारी संबंध आहेत. १९९५ मधील देशाचे एकूण निऱ्यामूल्य ५·३ महापद्म अमेरिकी डॉलर होते तर १९९४ मधील एकूण आयातमूल्य ५ महापद्म अमेरिकी डॉलर एवढे होते.
व्हिएतनामवर १९,६०० द.ल. अमेरिकी डॉलर एवढ्या विदेशी कर्जाचा बोजा होता (१९९४). देशातील एकूण परकीय गुंतवणूक १९,९२५ द.ल. अमेरिकी डॉलर एवढी होती (१९९६). डाँग हे देशाचे चलन आहे.
वाहतूक व संदेशवहन : व्हिएटनाममध्ये रस्ते व लोहमार्ग यांद्वारे वाहतुकीचा विस्तार बऱ्या पैकी झालेला आढळतो. परंतु व्हिएटनाम युद्धात त्यांचे बरेच नुकसान झाले. देशातील रस्त्यांची एकूण लांबी १,०५,००० किमी. (१९९७), तर लोहमार्गांची लांबी २,६०० किमी. आहे. सायकल हे व्हिएटनाममधील खाजगी वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. स्कूटरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. एक टक्क्यापेक्षा कमी लोकांकडे मोटारगाड्या आहेत. देशात ३·१० लक्ष मोटारसायकली होत्या (१९९५). रेड व मैकाँग नद्या, त्यांच्या उपनद्या हे देशातील जलवाहतुकीचे प्रमुख मार्ग आहेत. हायफाँग, हो-चि-मिन्ह नगर व दानांग ही प्रमुख सागरी बंदरे आहेत. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, कंबोडिया व जपान यांच्याशी नियमित वाहतूक चालते. हानोई व हो-चि-मिन्ह नगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
देशातून सु. ३५० वृत्तपत्रे व नियतकालिके प्रकाशित होतात. १९६० व ७० च्या दशकांत दक्षिण व्हिएटनाममध्ये मोठ्या प्रमाणावर रेडिओचा व थोड्याफार प्रमाणात दूरचित्रवाणीचा वापर वाढला. तुलनेने उत्तर व्हिएटनाममध्ये रेडिओ किंवा दूरचित्रवाणी संच कमी लोकांकडे आढळतात. बहुतांश दूरचित्रवाणी संच सामूहिक शेती करणारे, कामगार संघटना व तत्सम संस्थांच्या सार्वजनिक मालकीचे आहेत. देशात एकूण ७८ लक्ष रेडिओ संच व ३२ लक्ष दूरचित्रवाणी संच होते (१९९५). दर एक हजार लोकसंख्येमागे दहा दूरचित्रवाणी संच असे प्रमाण होते (१९९७). मोबाइल, दूरध्वनी, फॅक्स व इंटरनेट या संदेशवहन साधनांचाही वापर केला जातो. नभोवाणी व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे नियंत्रण ‘व्हिएटनाम रेडिओ अँड टेलिव्हिजन कमिटी’ करते.
लोक व समाजजीवन : हजारो वर्षांपूर्वी उत्तरेकडून, तसेच दक्षिणेकडील बेटांकडून अनेक लोकांनी व्हिएटनाममध्ये स्थलांतर केले. या स्थलांतरित लोकांपासूनच ‘व्हिएटनामी’ (किन्ह) हा वांशिक गट बनला आहे. व्हिएटनामी हे मूळ मंगोलॉइड वंशाचे आहेत. व्हिएतनामींना पूर्वी ॲनामाईट्स किंवा अनामी असे म्हटले जाई. हे चिनी आणि थाई वांशिक गटांतील लोकांचे मिश्रण असून इ.स.पू. चौथ्या ते दुसर्याम शतकांत मध्य चीनमधून त्यांनी टाँकिन (उत्तर व्हिएटनाम) प्रदेशात स्थलांतर केले. व्हिएटनामी लोकांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण सु. ९० टक्के आहे. मेकाँग व रेड नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात, तसेच किनारी मैदानी प्रदेशात बहुसंख्य व्हिएटनामी लोक राहात असून, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. व्हिएटनामी लोकांव्यतिरिक्त देशात इतर अल्पसंख्य गटांचे लोक राहतात. त्यांत टे, थाई, चिनी, ख्मेर, म्वाँग, नुड, मिआऊ या लोकांचे प्रमाण अधिक आहे. टे व थाई लोक मुख्यत: उत्तरेकडील प्रांतात राहतात. थाई लोकांचे आधिक्य थायलंड सरहद्दीच्या बाजूला अधिक आहे. नैर्ऋत्य व्हिएटनाममध्ये, कंबोडियाच्या बाजूला ख्मेर लोकांचे आधिक्य असून ते प्रामुख्याने शेती करतात. चिनी लोक प्रामुख्याने शहरांत राहतात.
ताओ हा येथील परंपरागत धर्म असला, तरी बौद्ध धर्मीयांची संख्या मोठी आहे. देशात ३८२ लक्ष (१९९२) लोक बौद्ध धर्मीय व ६० लक्ष (१९९७) लोक रोमन कॅथलिक होते. होआ हाओ व काओ दाई हे दोन लहान धार्मिक गट असून ते १९२० पासून दक्षिण भागात वाढले आहेत. होआ हाओ धर्माची बौद्ध धर्माशी जवळीक आहे. काओ दाई धर्मात ताओ व बौद्ध धर्मातील तसेच इतर काही परंपरांचे मिश्रण आढळते. याशिवाय काही प्रमाणात मुस्लीम व प्रॉटेस्टंट पंथीयही आहेत. सर्व धार्मिक आचरणांवर कम्युनिस्ट प्रणालींचे निर्बंध आहेत.
व्हिएटनाममधील नागरी लोकसंख्येचे प्रमाण १९·४ टक्के होते (१९९५). एकूण लोकसंख्येत सु. ५१ टक्के स्त्रिया आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ.किमी. ला २०९ इतकी होती (१९९८ अंदाज). दर हजारी जन्मप्रमाण २७ व मृत्युप्रमाण ७·५ होते (१९९५). १९९०-९५ या कालावधीतील आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ६२·९ वर्षे व स्त्रियांच्या बाबतीत ६७·३ वर्षे होते. याच कालावधीतील वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर शेकडा २·४ व बालमृत्युप्रमाण हजारी ४२ होते. स्त्रियांचे सरासरी प्रसूतिमान ३·४ आहे.
अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत व्हिएटनामी लोकांच्या जीवनपद्धतीत विशेष बदल झालेले नव्हते. कुटुंबसंस्था बळकट होती. एकत्र कुटुंबपद्धती प्रचलीत होती. सर्वांत ज्येष्ठ पुरुष कुंटुबप्रमुख असे व त्याचा सर्वांत मोठा मुलगा ही कुटुंबातील दुसरी प्रमुख व्यक्ती असे. अठराव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी व्हिएटनामवर ताबा मिळविला. फ्रेंचांनी येथे कारखाने सुरू केले. त्यामुळे अनेक लोक शेती सोडून नव्याने उभारलेल्या कारखान्यांत काम करण्यासाठी शहरांत आले. फ्रेंचांच्या आधिपत्याखालील श्रीमंत जमीनदारवर्ग अस्तित्वात आला. कम्युनिस्ट सत्ता आल्यानंतर व्हिएटनामी लोकांच्या जीवनपद्धतीत बदल घडून आले. व्हिएटनाम युद्धाने त्यात आणखी बदल होत गेले. १९५४ मध्ये व्हिएटनामचे विभाजन झाले त्या वेळी दक्षिणेकडून उत्तरेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे असे फार मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे स्थलांतर झाले. व्हिएटनाम युद्धकाळात लोकांनी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे फार मोठ्या संख्येने स्थलांतर केले. दक्षिण भागात हे प्रमाण अधिक होते. १९८० च्या दशकाच्या मध्यात एकूण लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोक शहरात राहत होते. देशाच्या ग्रामीण भागात, विशेषत: दक्षिणेकडे, नवीन औद्योगिक प्रदेश निर्माण करून शहरातील सु. शंभर लक्ष लोकांचे तेथे पुनर्वसन करण्याची योजना शासनाने आखली (१९७६). १९७६-८६ या काळात सु. चाळीस लक्ष लोक अशा नव्याने स्थापन केलेल्या औद्योगिक प्रदेशात स्थायिक झाले.
व्हिएटनाममधील बहुसंख्यक लोक सुती कपडे वापरतात. उत्तर आणि दक्षिण व्हिएटनाममधील लोकांच्या पेहेरावात तफावत आढळते. हवामानातील भिन्नतेमुळे उत्तरेकडील व दक्षिणेकडील ग्रामीण भागातील घरांच्या प्रकारातही भिन्नता दिसून येते. उत्तरेकडील थंड हवामानामुळे तेथे लाकूड वा बांबूपासून बांधलेली कौलारू छतांची परंपरागत साधी घरे आढळतात. दक्षिणेकडील उबदार हवामान असलेल्या प्रदेशात घराच्या भिंती व छते ताडाच्या झावळ्या किंवा पानांपासून तयार केलेली असतात. अलीकडे मात्र छतासाठी धातूच्या किंवा प्लास्टिकच्या पत्र्यांचा वापर केला जातो. शहरांत व नगरांत घरांसाठी सामान्यपणे लाकूड, विटा व कौलांचा वापर केला जातो. भात, मासे व भाजीपाला हा बहुतांश लोकांचा आहार आहे.
दुसऱ्या महायुद्धापूर्वी व्हिएटनाममधील आरोग्य सुविधा अपुऱ्या व अव्यवस्थित होत्या. परंतु १९४६ नंतर आरोग्य क्षेत्रात बरीच प्रगती करण्यात आली. व्हिएटनाम युद्धकाळात दवाखाने, रुग्णालये, आरोग्य केंद्रे यांचे फार मोठे नुकसान झाले. युद्ध समाप्तीनंतर मलेरिया, प्लेग, क्षय, कुष्ठरोग, गरमी यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव बराच वाढला. दोन्ही व्हिएटनामच्या एकत्रिकरणानंतर आरोग्य सुविधांत भरीव वाढ करण्यात आली. त्यामुळे वेगवेगळे रोग आटोक्यात आणले गेले. परिणामत: १९५७ मध्ये दर हजारी मृत्युप्रमाण १२·२ इतके होते ते १९८० मध्ये ७ पर्यंत खाली आले. त्यामुळे लोकांचे आयुर्मानही वाढले. देशात १२,५०० रुग्णालये, २९,७०० डॉक्टर (१९९८) ५३,७०० परिचारिका, १२,००० प्रसाविका व ६,५०० औषध निर्माते होते (१९९३).
वसाहतपूर्व काळात येथील शिक्षणपद्धती चीनमधील शिक्षणपद्धतीच्या धर्तीवर होती परंतु वसाहत काळात येथे फ्रेंच शिक्षणपद्धतीचा प्रसार झाला. व्हिएटनामचे १९५४ मध्ये उत्तर व दक्षिण व्हिएटनाम असे विभाजन झाल्यानंतर दोन्ही देशांनी आपल्या शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. परंतु व्हिएटनाम युद्धात युद्धखर्च खूप वाढल्यामुळे शिक्षणासाठी निधी कमी पडू लागला, त्यामुळे शिक्षणाची दुर्दशा झाली. युद्ध संपले, तेव्हा अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली होती. त्यामुळे शासनाला शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे अशक्य झाले. शिक्षणावर शासनाचे पूर्ण नियंत्रण आहे. १९७५ मध्ये दक्षिणेकडील साक्षरतेचे प्रमाण सु. ६५ टक्के होते, तर उत्तरेकडे हे प्रमाण ८५ टक्के होते. १९९५ मधील साक्षरतेचे प्रमाण ९३·७ टक्के असून त्यात पुरुषांचे प्रमाण ९३·५ टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण ९१·२ टक्के आहे. प्राथमिक शिक्षण पूर्वी १२ वर्षांचे होते, ते कमी म्हणजे १० वर्षांचे केले असून, त्याची विभागणी ४, ३ व ३ अशा तीन स्तरांत केली आहे. देशातील १०,१३७ प्राथमिक शाळांत ९७,८२,९०० विद्यार्थी व २,७८,००० शिक्षक (१९९३-९४) माध्यमिक शाळांत ५३,३२,४०० विद्यार्थी व १,९३,८१४ शिक्षक होते (१९९५-९६). याशिवाय देशात ७ विद्यापीठे, २ मुक्त विद्यापीठे व ९ विशेष विद्यापीठे आहेत. विशेष विद्यापीठांमध्ये ३ कृषी विद्यापीठे, २ अर्थशास्त्रविषयक विद्यापीठे, ३ तंत्रशिक्षण विद्यापीठे व एका जलसंपत्तीविषयक विद्यापीठाचा समावेश होतो (१९९५-९६).
दीर्घकालीन चिनी सत्तेमुळे व्हिएटनाममधील भाषा, साहित्य, संगीत, इतर कला इत्यादींवर प्रामुख्याने चीनचाच प्रभाव आढळतो. व्हिएटनामी ही देशातील अधिकृत भाषा असून, तिचे ख्मेर, थाई व चिनी भाषांशी साम्य आहे. फ्रेंच, चिनी, इंग्लिश, ख्मेर व रशियन या भाषाही देशात बोलल्या जातात. येथील भाषेत अनेक चिनी शब्द व वाक्प्रचार रूढ झाले होते. तसेच आधुनिक काळापर्यंत येथील लिपीसुद्धा चिनी लिपीवर आधारित होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस व्हिएटनामी तज्ज्ञांनी रोमन पद्धतीची आपली स्वतंत्र वर्णमाला व लिपी विकसित केली. संगीत, चित्रकला, वास्तुशिल्प, साहित्य, कविता, वाड्मय, नाट्य, निबंधलेखन याबाबतींतील चिनी पद्धतीची जागा पश्चिमात्य, विशेषत: फ्रेंच शैलीने घेतली. १८५४ नंतरही पाश्चिमात्य संस्कृतीची लोकप्रियता तशीच टिकून राहिली. काही प्रदेशांत–विशेषत: तरुण वर्गात व शहरी भागात–साहित्य इत्यादींमधून स्वदेशाभिमान व त्याग या बाबी प्रतिबिंबित होत असत. कविता हा व्हिएटनाममधील विशेष लोकप्रिय व प्रभावी साहित्यप्रकार आहे. किम व्हान किएउ हे ३,००० पेक्षा अधिक ओळी असलेले काव्य एंगायेन दू (१९६५-१८२०) या प्रसिद्ध कवीने लिहिलेले आहे. फ्रेंच राजवटीत येथे कादंबरीही विशेष लोकप्रिय झाली. दक्षिणेकडे ही लोकप्रियता टिकून राहिली. व्हिएटनाममधील चित्रकलेवर प्राचीन चिनी व आधुनिक फ्रेंच कलेचा प्रभाव आढळतो. परंपरागत व्हिएटनामी वास्तुशिल्पाचे नमुने प्रामुख्याने पॅगोडे, थडगी व जुन्या राजवाड्यांमधून आढळतात.
महत्त्वाची स्थळे : हो-चि-मिन्ह नगर (लोकसंख्या ४५,४९,००० – १९९९), हानोई (१०,८८.८६२), हायफाँग (४,५६,०४९), दानांग (३,७०,६७०), लाउंगसुयेन (२,१७,१७१), न्या त्रांग (२,१३,६८७), ह्मे (२,११,०८५), कन्तो (२,०८,३२६) ही देशातील प्रमुख शहरे आहेत. हो-चि-मिन्ह नगर म्हणजेच पूर्वीचे सायगाव हे व्हिएटनाममधील सर्वांत मोठे शहर असून, हानोई हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी उत्तर व्हिएटनाममध्ये अत्यंत आकर्षक अशी काही सौंदर्यस्थळे होती. हा लाँग उपसागराचे सौंदर्य तर अप्रतिम आहे. येथील किनाऱ्यांवर अनेक सुंदर गुंफा (गुहा) तसेच समुद्रातून सरळ वर आलेल्या दगडी जिह्ना ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. हानोई येथील ऐतिहासिक स्मारके, सरोवरे, पॅगोडे विशेष प्रेक्षणीय आहेत. १९६५ पूर्वी पूर्व युरोपीय देशांतून अनेक पर्यटक व्हिएटनाममध्ये येत असत परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर त्यात खंड पडला. १९७८ मध्ये पर्यटन विभागाची स्थापना करण्यात आली. सर्व प्रवाशांना आगाऊ प्रवेशपत्र घेणे आवश्यक असते.
चौधरी, वसंत