व्यवसाय व्यवस्थापन : (बिझ्निस् मॅनेजमेंट). व्यवसाय-संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तींचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजिलेली सुविहित यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादनघटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते. थिओ हेमन या प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञाने प्रोफेशनल मॅनेजमेंट थिअरी अँड प्रॅक्टिस या ग्रंथात व्यवस्थापन या शब्दाचे तीन अर्थ सांगितले आहेत : कोणत्याही संघटनेत उच्च पदावर कार्य करणाऱ्या अधिकारीवर्गाला उद्देशून व्यवस्थापन ही संज्ञा वापरली जाते. दुसरा अर्थ म्हणजे व्यवस्थापन ही एक ज्ञानशाखा असून ते एक शास्त्रही आहे. या ज्ञानशाखेत व्यवस्थापनाचे सिद्धांत, कार्यपद्धती इत्यादींबाबत अभ्यास केला जातो. व्यवस्थापनाच्या तिसऱ्या अर्थानुसार व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून तीत व्यवसायाचे नियोजन, संघटन, निदेशन वा संचालन, अभिप्रेरणा, समन्वय व नियंत्रण इ. कार्यांचा समावेश होतो. व्यवस्थापन म्हणजे प्रामुख्याने निदेशन असे म्हणता येईल.
व्यवसाय व्यवस्थापनात कर्मचारी-निवड, प्रशिक्षण, निरीक्षण आणि मनुष्यबळविकास यांचाही अंतर्भाव होतो. व्यवसाय प्रशासन ही वेगळी संकल्पना असून तो व्यवस्थापनाचाच एक भाग मानला जातो परंतु काही व्यवस्थापनतज्ज्ञांच्या मते व्यवस्थापन व प्रशासन या संकल्पनांमध्ये निश्चित फरक आहे. ऑलिव्हर शेल्डन या ब्रिटिश व्यवस्थापनतज्ज्ञाच्या मते उद्योगामध्ये प्रशासनाचे कार्य व्यवसाय संघटनेची धोरणे निश्चित करणे वित्त, उत्पादन व वितरण यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे संघटनेचे क्षेत्र निश्चित करणे आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता निर्माण केलेल्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे हे असते. (द फिलॉसॉफी ऑफ मॅनेजमेंट, १९२३). व्यवस्थापनाचे कार्य प्रशासनाने ठरवून दिलेल्या धोरणांची त्यांतील मर्यादांच्या आधीन राहून अंमलबजावणी करणे व विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटना राबविणे हे असते. [→ व्यवसाय प्रशासन].
व्यवसाय संघटनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते : (१) उत्पादनकाऱ्यात किंवा कारखान्यात प्रत्यक्षपणे भाग घेणारे कर्मचारी (२) कर्मचाऱ्यांना निश्चित कामे सोपवून त्यांच्याकडून ती नियोजित कामे करवून घेणारे अधिकारी. दुसऱ्या प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश व्यवस्थापनामध्ये होत असतो. उद्योगव्यवसायाच्या प्रमुख व्यवस्थापकापासून ते साध्या मुकादमापर्यंत अनेक अधिकाऱ्यांचा या वर्गात समावेश होतो. या सर्व अधिकाऱ्यांना काऱ्याची योजना तयार करणे, आवश्यक ती संघटना उभारणे, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक ते आदेश देणे, संदेशवहनाची सुयोग्य व्यवस्था करणे, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या कामात समन्वय साधणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अशी अनेक कार्ये करावी लागतात. व्यवसायाचा आकार जेवढा मोठा आणि कामगारांची संख्या जेवढी जास्त, त्या प्रमाणात व्यवस्थापकीय कार्य करणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असते. व्यवस्थापकीय क्रिया करणाऱ्या व्यक्ती विविध स्तरांवर त्यांना सोपविलेली कार्ये पार पाडीत असतात. साधारण आकाराच्या व्यवसाय संघटनेत उच्च स्तरीय व्यवस्थापन, मध्यम स्तरीय व्यवस्थापन व निम्न स्तरीय व्यवस्थापन असे तीन स्तर असल्याचे आढळून येते.
उच्चस्तरीय व्यवस्थापन : (टॉप मॅनेजमेंट). संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवस्थापक ह्या व्यक्तींचा प्रामुख्याने उच्च स्तरीय व्यवस्थापनात समावेश होतो. कंपनीच्या चिटणीसाला व्यापक स्वरूपाचे अधिकार दिले जात असल्याने त्याचाही समावेश त्यात होऊ शकतो. निर्णय घेणे, योजना तयार करणे, धोरणे निर्धारित करणे व धोरणांचे मूल्यमापन करणे ही प्रमुख कार्ये उच्च स्तरीय व्यवस्थापनाला करावी लागत असल्याने त्याची भूमिका एकूण व्यवसाय-व्यवस्थापनात फार महत्त्वाची ठरते.
मध्यमस्तरीय व्यवस्थापन : उच्चस्तरीय व्यवस्थापनानंतर मध्यम स्तरीय व्यवस्थापनाचे स्थान असते. मध्यम स्तरीय व्यवस्थापनामध्ये कारखान्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा, तसेच त्यांच्या सल्लागार विशेषज्ञांचा समावेश होतो. या स्तरावरील प्रमुख व्यवस्थापकांचे मुख्य कार्य म्हणजे उच्च स्तरीय व्यवस्थापकाकडून आलेले आदेश संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करणे आणि ह्या आदेशानुसार होणाऱ्या कामकाजावर देखरेख ठेवणे हे असते. मध्यम स्तर हा उच्च व निम्न स्तरीय व्यवस्थापनामधील दुवा असतो. त्यामुळे प्रशासनाची धोरणे अमलात आणण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.
निम्नस्तरीय व्यवस्थापन : कारखान्यामधील विविध विभागांत काम करणाऱ्या कामगारांकडून विशिष्ट योजनेनुसार काम करून घेण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींची असते, अशा सर्व व्यक्तींचा निम्न स्तरीय व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. मध्यम स्तरीय व्यवस्थापकाकडून मिळालेल्या आदेशानुसार कामगारांकडून ठराविक कार्य करून घेणे, हे या स्तरावरील व्यक्तींचे कार्य असते. निम्नस्तरीय व्यवस्थापकांमध्ये प्रामुख्याने पर्यवेक्षक, मुकादम व कार्यालयीन प्रबंधक यांचा समावेश होतो. उत्पादन करणारे कामगार किंवा कार्यालयीन कर्मचारी निम्न स्तरीय व्यवस्थापकांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली व नियंत्रणाखाली कार्य करीत असतात.
व्यवस्थापनाची कार्ये : नियोजन, संघटन, कर्मचारी-नियुक्ती, संचालन, समन्वय, अभिप्रेरणा व नियंत्रण ही व्यवस्थापनाची कार्ये परस्परसंबद्ध व परस्परावलंबी असतात. व्यवस्थापनाचे कोणतेही कार्य स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कोणतेही एक कार्य करताना इतर कार्येही करावी लागतात. म्हणून परस्परसंबद्ध प्रक्रियाकारक संरचना असे व्यवस्थापनाचे स्वरूप असते.
नियोजन : व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या कार्याचे नियोजन करावे लागते. म्हणजेच भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय. नियोजनात व्यवसायातील विविध विभागांसाठी लक्ष्य निश्चित केले जाते व ते साध्य करण्याकरिता परिणामकारक पद्धती शोधून काढल्या जातात.
संघटन : कार्याची सविस्तर योजना तयार झाल्यानंतर ती योजना अमलात आणण्यासाठी एक व्यापक, परंतु कार्यक्षम यंत्रणा आवश्यक असते. ह्या यंत्रणेलाच संघटन (ऑर्गनायझेशन) म्हणतात. संघटन म्हणजे व्यवस्थापनाची चौकट होय. उत्पादनकाऱ्याचे विविध विभागांत विभाजन करणे, उत्पादन-प्रक्रिया निर्धारित करणे, विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांचे संघटनांतर्गत संबंध निश्चित करणे, अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचे क्षेत्र ठरविणे, प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्याला आवश्यक ते अधिकार प्रदान करणे ही संघटनकार्ये होत.
कर्मचारी-नियुक्ती : व्यवसायात अनेक प्रकारच्या सेवकांची व अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागते. प्रत्येक विभागात पदे व कर्मचारी यांचे स्वरूप व संख्या निश्चित करावी लागते. कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक त्या प्रमाणात व पात्रतेनुसार करावी लागते. संघटनेच्या गरजेनुसार त्यांना योग्य ते प्रशिक्षणही द्यावे लागते.
संचालन : संघटनेतील विविध स्तरांवर मार्गदर्शनाचे वा निर्देशनाचे काम केले जाते. संघटनेच्या प्रत्येक घटकाला त्याने कोणते कार्य करावयाचे आहे ह्याबाबत निश्चित आदेश देणे, हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य असते. प्रत्येकाला एकाच वरिष्ठाकडून सर्व आदेश प्राप्त व्हायला हवेत. निदेशन काऱ्याचे यश बऱ्याच प्रमाणात प्रभावी नेतृत्वावर अवलंबून असते.
समन्वय : व्यवसायात अनेक व्यक्ती व विभाग काम करीत असतात. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र, कार्य करण्याची पद्धती आणि क्षमता भिन्नभिन्न असते. सर्व विभागांची कार्ये जरी वेगळी असली, तरी त्यांचा उद्देश एकच असतो. या सर्व प्रक्रियेत एकसूत्रीपणा आणण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना समन्वय असे म्हणतात. समन्वयाचा अभाव असल्यास संघटनेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
अभिप्रेरणा : (मोटिव्हेशन). व्यवस्थापन-कार्यात श्रमशक्ती हा महत्त्वाचा घटक असतो. संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणे म्हणजे अभिप्रेरणा होय. अभिप्रेरणा प्रामुख्याने आर्थिक व आर्थिकेतर अशा दोन प्रकारच्या असतात. जी प्रेरणा कामगारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी साहाय्यक ठरते, अशा प्रेरणेला आर्थिक प्रेरणा असे म्हणतात. आर्थिकेतर प्रेरणेमुळे (उदा., नोकरीची सुरक्षितता, प्रगतीसाठी वाव इ.) कामगारांमध्ये कर्तव्यतत्परता, कष्टाळूपणा, निष्ठा इ. गुण जोपासले जाऊ शकतात.
नियंत्रण : नियोजनानुसार प्रत्यक्षात कार्य होते आहे किंवा नाही, हे पडताळून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिचे कार्य योजना आखल्यापासून सुरू होते. संस्थेचे प्रत्यक्ष कार्य आणि अपेक्षित कार्य यांच्यात तफावत आढळून आल्यास याची कारणे शोधणे व ती दूर करणे, ही नियंत्रणकार्याची महत्त्वाची जबाबदारी असते.
व्यवस्थापन-तत्त्वांचे महत्त्व : कोणत्याही व्यवसायाचे व्यवस्थापन यशस्वीपणे आणि कार्यक्षमतेने होण्याकरिता काही तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असते. आंरी फेयॉल (१८४१–१९२५) या फ्रेंच व्यवस्थापन-तत्त्वज्ञाने व्यवस्थापनाची खालील चौदा मूलभूत तत्त्वे विशाद केली आहेत. कूंट्झ व ऑडॉनेल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट (१९५९) या ग्रंथात या तत्त्वांसंबंधीचे विवेचन आढळते.
(१) श्रमविभागणी : कार्याचे योग्य विभाजन करून प्रत्येक कृती एका किंवा अनेक कर्मचाऱ्यांकडे सोपविल्यामुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत बरीच वाढ होते. कार्याचे विभाजन केल्यामुळे विशेषीकरणाला वाव मिळतो व उत्पादकता वाढते.
(२) अधिकार व जबाबदारी : संघटनेत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला अधिकार दान करणे आवश्यक असते. आवश्यक त्या अधिकाराशिवाय कोणालाही जबाबदारी पार पाडणे शक्य नाही. अधिकार व जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्यात संतुलन टिकवून ठेवणे, हे व्यवस्थापनाचे काम असते.
(३) शिस्त : व्यवस्थापनकाऱ्यात सर्व कर्मचार्याकडून शिस्तबद्ध आचरणाची अपेक्षा असते. शिस्तबद्ध संघटना चांगले काम करू शकते. संघटनेत शिस्त जोपासणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते.
(४) आदेशातील एकवाक्यता : संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्यावर सोपविलेले काम पार पाडण्यासाठी आवश्यक ते आदेश एकाच अधिकार्याकडून मिळाले पाहिजेत. आदेशांची एकवाक्यता नसल्यास संघटनेत शिस्त राहत नाही व त्याचा स्थैयावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
(५) मार्गदर्शनातील एकवाक्यता : समान उद्देश असलेल्या आणि समान कार्य करणाऱ्या व्यक्तिसमूहाचा खातेप्रमुख एक असावा आणि त्याला एकच योजना असावी. त्यामुळे मार्गदर्शनात एकवाक्यता व सुसूत्रता येते.
(६) सर्वसामान्य हिताला प्राधान्य : संघटनेत व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असते. कोणताही निर्णय घेताना संघटनेचे हित महत्त्वाचे आहे, हे व्यवस्थापनाने नजरेआड करून चालणार नाही. व्यक्तिगत हिताला प्राधान्य दिल्यास कामगारांत मतभेद निर्माण होऊ शकतात.
(७) वेतन : कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला व कर्मचाऱ्यांचे समाधान, कार्यक्षमता व उत्पादकता यांच्यामध्ये जवळचा संबंध असल्याने प्रत्येकाला त्याच्या कामाचा योग्य मोबदला व्यवस्थापनाने दिला पाहिजे.
(८) केंद्रीकरण : आंरी फेयॉलच्या मते संघटनेत योग्य स्तरावर अधिकाराचे केंद्रीकरण केल्यामुळे व्यवस्थापनाच्या क्षमतेचा महत्तम उपयोग करून घेता येतो. किती प्रमाणात अधिकाराचे केंद्रीकरण या विकेंद्रीकरण करावे, हे संघटनेचा आकार, स्वरूप व अधिकाऱ्यांची क्षमता यांवर अवलंबून असते.
(९) अधिकार-साखळी : (स्केलर चेन). व्यवस्थापनात वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकार्यापर्यंतचे संबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने अधिकार-साखळी निर्माण करणे आवश्यक असते. या साखळीमुळे अधिकारकक्षा निश्चित होतात व कोणी कोणास जबाबदार राहावे हे निश्चित होते. अधिकार-साखळीमुळे व्यक्तींमधील परस्परसंबंध व संप्रेषण सुनिश्चित व सुलभ होते आणि कार्यपूर्ततेतील गतिमानता वाढते.
(१०) क्रम : (ऑर्डर). संघटनेत प्रत्येक व्यक्तीला, तसेच प्रत्येक वस्तूला जसा क्रम योजून दिलेला असतो त्यानुसार तिचे निश्चित स्थान असते. फेयॉलने त्याची विभागणी वस्तुक्रम (मटेरियल ऑर्डर) व सामाजिक क्रम (सोशल ऑर्डर) अशी केली आहे. ‘प्रत्येक वस्तूला (व्यक्तीला) तिचे असे निश्चित स्थान आणि प्रत्येक वस्तू (व्यक्ती) तिच्या योग्य स्थानी’ हे सूत्र या क्रमव्यवस्थेत अवलंबले जाते. या तत्त्वामुळे योग्य माणसे योग्य कामाकरिता नेमली जाऊ शकतात व कार्यक्षमता वाढू शकते.
(११) समानता : कामगारांमध्ये भेदभाव न करता जर त्यांना समानतेने वागवले, तर कामगार व व्यवस्थापन यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि कामे यशस्वीपणे पार पडू शकतात.
(१२) नोकरीतील स्थैर्य : संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला नोकरीचे स्थैर्य असेल, तर तो आपले कार्य अधिक रस घेऊन कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अस्थिर कामगारवर्ग हे व्यवस्थापनाचे अपयश मानले जाते.
(१३) पुढाकाराची भावना : कामगारांना स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रोत्साहन देणे व त्यांच्यामध्ये पुढाकाराची इच्छा जागृत करणे, हे व्यवस्थापनाचे काम असते. व्यवस्थापनाने जर योग्य त्या प्रेरणा दिल्या, तर कर्मचारी आपल्या सुप्त शक्तीचा उपयोग करून उत्पादनाचे प्रमाण वाढवू शकतात.
(१४) एकी हेच बळ : (संघभाव). सर्व कामगारांत जर एकीची भावना असेल, तरच उत्पादकता व उत्पादन वाढू शकते. व्यवस्थापनकार्य हे सामूहिक व संघटित प्रयत्नांचे फळ असते. यावर फेयॉलने भर दिला आहे.
अंतर्गत संघटना : कोणत्याही उद्योगव्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे अनेक व्यक्ती कार्य करीत असतात. या सर्वांचे काम मूळ उद्दिष्टांशी सुसंगत अशा रीतीने होणे आवश्यक असते. ज्या चौकटीत व्यक्तींना त्यांची कामे करावी लागतात त्या चौकटीला वा संरचनेला अंतर्गत संघटना असे म्हणतात. तिचे स्वरूप व्यवसायाचा आकार, उद्दिष्ट व कार्यप्रणाली ह्या गोष्टींवर अवलंबून असते. संघटनेच्या प्रचलित स्वरूपात खालील प्रकारांचा अंतर्भाव होतो.
रेखा किंवा सरळ उतरंड संघटना : हा संघटनेचा सर्वसाधारण प्रकार असून तो लष्करी संघटनेच्या धर्तीवर राबविण्यात येतो. या प्रकारात व्यवसायाची कार्यप्रणाली विविध विभागांमध्ये विभागली जाते व प्रत्येक विभागाचा एक प्रमुख व्यवस्थापक असतो. त्याला त्याचे अधिकार वरिष्ठ व्यवस्थापकाकडून किंवा सरव्यवस्थापकाकडून मिळतात. सरव्यवस्थापन > विभागीय व्यवस्थापक > मुकादम > कामगार अशी ही जबाबदारीच श्रेणी असते. हा संघटनेचा प्रकार सोपा व सुलभ असला, तरी विशेषीकरणाचा लाभ व विशेषज्ञांचा सल्ला या गोष्टींपासून ही संघटना वंचित राहते. त्यामुळे एकूण कार्यक्षमतेवर मऱ्यादा येतात.
कार्यात्मक संघटना : अमेरिकन व्यवस्थापनतज्ज्ञ ⇨ फ्रेडरिक विन्झ्लो टेलर (१८५६–१९१५) हा या संघटनाप्रकाराचा जनक होय. या प्रकारात सर्व पातळ्यांवर विशेषीकरण व श्रमविभाजन यांना महत्त्व दिलेले असते. या पद्धतीमध्ये आठ कार्यात्मक अधिकारी किंवा मुकादम नेमलेले असून त्यांना त्यांच्या विशेष गुणवत्तेनुसार कामे वाटून दिलेली असतात. प्रत्येक कर्मचारी या आठ मुकादमांना जबाबदार असतो व त्या सर्वांकडून कामाच्या संदर्भात त्याला सूचना मिळत असतात. विशेषज्ञांच्या सेवेचा चांगला उपयोग व विशेषीकरण हे फायदे या प्रकारात मिळत असले, तरी विशेषज्ञांच्या आदेशात संघर्ष होण्याची शक्यता व वरिष्ठ पातळीवर संयोजन करण्यात निर्माण होणारे अडथळे, हे या पद्धतीचे दोष म्हणता येतील.
रेखा तथा कार्यात्मक संघटना : रेखा व कार्यात्मक संघटना या दोन्ही प्रकारांतील फायदे मिळावेत, या हेतूने हा प्रकार विकसित करण्यात आला. विशेषतः मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या संघटनेत रेखा-अधिकारी अंमलबजावणीकडे लक्ष देतात, तर तज्ज्ञ अधिकारी संशोधन व नियोजन विभाग सांभाळतात. तज्ज्ञ अधिकारी निर्णय घेतात व अंमलबजावणीचे काम साखळी-अधिकारी पाहतात. या संघटनेचे यश रेखा-अधिकारी व काऱ्यात्मक अधिकारी यांच्यातील परस्पर-सामंजस्यावर व सहकाऱ्यावर अवलंबून असते.
समिति-संघटना : एखाद्या संघटनेपुढे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडक व्यक्तींचा गट अथवा समूह म्हणजे समिती होय. समिती-संघटना ही काऱ्यात्मक संघटनेचीच सुधारित आवृत्ती होय. समितीतील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचे व निर्णयाचे एकत्रित फायदे व्यवसायाला होऊ शकतात.
पहा : व्यवसाय व्यवसाय संघटना व्यवस्थापनशास्त्र.
संदर्भ : 1. Ghosal, S. N. Management Principles in Indian Perspective, Calcutta, 1966. 2. Saksena, S. C. Business Administration and Management, Agra, 1977. 3. Shubin, Johan A. Business Management, New York, 1970.
चौधरी, जयवंत
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..