वैज्ञानिक पारितोषिके : विज्ञानाच्या अथवा तंत्रविद्येच्या क्षेत्रात भरीव व मोलाची कामगिरी किंवा संशोधन करणाऱ्या व्यक्तींना व कधीकधी संस्थांनाही पारितोषिके, पुरस्कार, पदके, सन्मानपत्रे इ. देऊन त्यांचा राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो. मराठी विश्वकोशात ‘नोबेल पारितोषिके’, धन्वंतरी पुरस्कार’ यांसारखे वैज्ञानिक पारितोषिकांची माहिती व उल्लेख आलेले आहेत. सदर नोंदीत सुरूवातीला भारतातील काही पारितोषिकांची माहिती दिली असून नंतर परदेशी व आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे.

भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांचे नागरी पुरस्कार (भारतरत्न, पद्यविभूषण, पद्यभूषण व पद्मश्री इ.), शौर्य पुरस्कार, विशिष्ट सेवा पुरस्कार व अर्जुन पुरस्कार असे चार स्थूल गट केले जातात. यांच्यात वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक पुरस्कारही अंतर्भूत आहेत. यांखेरीज देशातील घटक राज्य शासनांमार्फत आणि विविध संस्था प्रतिष्ठानांमार्फत वैज्ञानिक पारितोषिके देण्यास येतात.    

हरी ओम आश्रम ट्रस्ट विज्ञान पुरस्कार : १९७४ सालापासून हे पुरस्कार देण्यात येतात. १९७५ साली ते प्रथम नामवंत शास्त्रज्ञांना बहाल करण्यात आले. पुरस्काराची रक्कम रोख रु. १०,०००/- होती. हे पुरस्कार पुढील चार प्रकारचे आहेत. : (१) भौतिक विज्ञानातील उल्लेखनीय प्रायोगिक संशोधनाबद्दल सी. व्ही. रामन पुरस्कार, (२) भौतिकीय धातुविज्ञानासाठी होमी जहांगिर भाभा पुरस्कार, (३) जीवनविषयक विज्ञानाच्या क्षेत्रातील योजनाबद्दल जगदीशचंद्र बोस पुरस्कार, (४) सैद्धांतिक घन अवस्था भौतिकीसाठी मेघनाद साहा पुरस्कार. खेरीज इलेक्ट्रिनिकी व दूरसंदेशवहन, ग्रहसंस्था, अवकाशविज्ञान, वातावरणीय भौतिकी व जलविज्ञान, विश्लेषण पद्धती व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप असून राष्ट्रीय पातळीवरील तज्ञांच्या समितीच्या शिफारशींवरून ती देण्यात येतात.    

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ॲवॉर्ड : या संस्थेमार्फत १९६८पासून पारितोषिके देण्यात येतात. व्यक्ती आणि संस्था यांची यासाठी निवड केली जाते. अन्य क्षेत्रांखेरीज विज्ञान व तंत्रविद्या आणि कृषी या क्षेत्रांतेल मौलिक कार्याबद्दल ती दिली जातात.

इंडियन कौन्सिल ऑफ अँग्रिकल्चरल रिसर्च ॲवॉर्ड: या संस्थेतर्फे पुढील तीन महत्त्वाचे पुरस्कार देण्यात येतात : (१) रफी अहमद किडवाई स्मृती पारितोषिक. हे १९५६ साली सुरू झाले. पदक व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप आहे. कृषी, पशुसंवर्धन व अन्य संबंधित विषयांतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते देण्यात येते. (२) डॉ. बी. पी. सरकार एन्डाउमेंट पारितोषिक व (३) कृषिविज्ञानातील पदव्युत्तर संशोधनासाठी तरुण शास्त्रज्ञांना जवाहरलाल नेहरू पारितोषिक देण्यात येते. पदक व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप आहे.

इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ॲवॉर्ड: वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल ती दिली जातात. (१) बसंती देवी अमीरचंद पारितोषिक हे जीववैद्यकासाठी आहे. (२) डॉ. पी. एन. राजू ओरेशन ॲवॉर्डहे दुर्बल घटकांच्या पुनर्वसन कार्याबद्दल दिले जाते. (३) सांडूझ ओरेशन ॲवॉर्डहे कर्करोगावरील संशोधनाबद्दल दिले जाते. (४) शकुंतला अमीरचंद पारितोषिके ही चार परकारची आहेत.  (५) हे प्रत्येक वर्षी ४० वर्षांखालील भारतीय शास्त्रज्ञांना पोषणविषयक ज्ञानात अधिक भर घातल्याबद्दल दिले जाते आणि (६) सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाबाबत डॉ. वाय. एस. नारायण राव ओरेशन ॲवॉर्डदिले जाते.

इंडियन नॅशनल सायन्स अँकॅडेमी ॲवॉर्ड: गणित, अभियांत्रिकी, जीवविज्ञान, रसायनशास्त्र इ. विषयांतील शास्त्रज्ञांना मौलिक योगदानाबद्दल ही दिली जातात. त्यांमध्ये (१) मेघनाद साहा पदक, (२) शांतिस्वरूप भटनागर पदक, (३) श्रीनिवास रामानुजन पदक व (४) सुंदरलाल व्होरा स्मृती पदक यांचा समावेश आहे. यांतील सुंदरलाल व्होरा स्मृती पदक या अँकॅडेमीतर्फे १९६१ सालापासून देण्यात येत आहे. जीवविज्ञान व वैद्यक या क्षेत्रांतील कामगिरीबद्दल ते दोन वर्षांतून एकदा देण्यात येते.

इन्व्हेन्शन प्रमोशन बोर्ड प्राइझ : स्तुत्य संशोधनाबद्दल १९७३ पर्यंत हे मंडळ विविध स्वरूपांची पारितोषिके देत आले. विशेषत: स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या सुमारास त्यांची घोषणा होई, परंतु आता या मंडळाचे भारत सरकार अंगीकृत नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये विलीनीकरण झाले आहे. त्यामुळॆ पारितोषिकांची योजना आता हे मंडळ राबविते. इंडियन सोसायटी फॉर उत्कृष्ट संशोधनपर लेखांबद्दल शास्त्रज्ञांना जे. जे. चिनॉय गोल्ड मेडल दिले जाते.

कोठारी सायंटिफिक अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अँवॉर्ड्स : ही संस्था इंडियन नॅशनल सायन्स अँकॅडेमीच्या शिफारशीवरून ३० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीबाबत व नैपुण्याबाबत प्रत्येक वर्षी कास्य पदक व रोख रक्कम देऊन गौरव करते.

धन्वंतरी पुरस्कार : वैद्यकीय व्यवसायाच्या अमूल्य सेवेबद्दल व विशेष कार्य वा संशोधन करून वैद्यकीय ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्वंतरी फाउंडेशन (मुंबई) तर्फे १९७३ पासून हे पुरस्कार देण्यात येतात. सामान्यत: धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) समारंभाच्या वेळीच हा पुरस्कार देण्यात येतो. भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेचे कास्य पदक वा प्रतिकृती, सुवर्ण पदक व मानपत्र असे याचे स्वरूप [→ धन्वंतरी पुरस्कार].

अन्य काही पुरस्कार : वैद्यकीय विषयांवरील उत्कृष्ट निबंधाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिकेही राज्यांच्या अखत्यारीतील इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल लि. तर्फे १९७४ पासून दिली जातात. पाच वर्षांचा अनुभव असलेलेया वैद्यकीय पदवीधरांना ती दिली जातात. भारतातील वैद्यकीय शिक्षणातील प्रश्नांची बांधिलकी व मूलभूत विचारसरणी निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू आहे. ताम्रपट व रोख रक्कम या स्वरूपातील ही तीन प्रकारची पारितोषिके आहेत.

धातुविज्ञानातील उल्लेखनीय कामगिरीबाबत केंद्रीय पोलाद व खाण विभागातर्फे दरवर्षी धातुशास्त्रज्ञांची त्या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली जात आहे. रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ⇨कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिचर्स या संस्थेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त १९७३ साली तीन शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.


पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नॅशनल एन्व्हायरन्मेंट एक्सलन्स ॲवॉर्ड(दिल्ली) हा पुरस्कार दिला जातो. १९९९ साली पोखरण अणुस्फोट, पृथ्वी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील शास्त्रज्ञांना वैज्ञानिक विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही ‘राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये आहे.

मुंबईच्या इंडियन फिजिक्स अँसोसिएशनतर्फे भौतिकी शास्त्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना आर. डी. बिर्ला स्मृती पुरस्कार दिला जातो. रोख ५० हजार रुपये, मानचिन्ह व सुवर्ण पदक असे याचे स्वरुप आहे. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना याच अँसोसिएशनचा मुरली एम. चुगाणी पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार रोख एक लाख रुपये, मानचिन्ह व सुवर्ण पदक असे याचे स्वरुप आहे.

बिर्ला इंस्टिटूट ऑफ अँस्ट्रॉनॉमी अँड प्लॅनेटेरियम सायन्सेसतर्फे एम. पी. बिर्ला स्मृती पारितोषिक देण्यात येते. रोख एक लाख रुपये व मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. तसेच हैद्राबादच्या बी. एम. बिर्ला विज्ञान केंद्रातर्फे गणित, भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांतील विशेष कामगिरीबद्दल बी. एम. बिर्ला विज्ञान पुरस्कार दिले जातात. रोख ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.    

देशाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या क्षेत्रातील विकासात संशोधन कामगिरी करणाऱ्या तीन प्रसिद्ध शास्त्रज्ञांना कायनेटिक उद्योगसमूहाच्या वतीने दर वर्षी ‘एच. के. फिरोदिया पुरस्कार’ देण्यात येतात. पहिले दोन पुरस्कार दोन लाख रुपयांचे असून तिसरा एक लाख रुपयांचा आहे.

कै. श्री. नी. रानडे स्मृतीप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या शोभना श्रीकृष्ण रानडॆ मेमोरियल ट्रस्ट (पुणे) तर्फे कृषिशास्त्रज्ञांना पारितोषिके देण्यात येतात. ही पारितोषिके देण्यात येतात. ही पारितोषिके प्रामुख्याने सूक्ष्मपोषकद्रव्ये (मायक्रोन्यूट्रियंट) व पिकांचा संतुलित आहार या विषयात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिली जातात. एक लाख एक हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कार व कनिष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कारही देण्यात येतात. ते अनुक्रमे ५१ हजार १रुपये व ३१ हजार १ रुपये प्रशस्तिपत्र अशा स्वरूपाचे आहेत या पारितोषिकांचा वितरण समारंभ केला जात नाही, हे विशेष होय.    

विज्ञान आणि तंत्रविद्या या क्षेत्रांत बहुमोल कामगिरी केल्याबद्दल प्रसिद्ध वैज्ञानिक-शास्त्रज्ञ जी. पी. चटर्जी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जी. पी. चटर्जी स्मृती पुरस्कार देण्यात येतो. भारतीय विज्ञान परिषदेतर्फे या पुरस्कारासाठी शास्त्रज्ञाची निवड केली जाते. कोचीन विज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठातर्फे एम. व्ही. पायली शिक्षणतज्ञ पुरस्कार दिला जातो. रोख दोन लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.    

दि इंडियन एन्व्हायरन्मेंटल सोसायटीतर्फे १९८०पासून पर्यावरण विज्ञानातील आस्थेवाईक कामाबद्दल राम देव पुरस्कार देण्यात येतो.

       

कलिंग पारितोषिके : विज्ञानासंबंधी सर्वसामान्य जनतेत आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने ओरिसाचे माजी मुख्यमंत्री आणि एक मोठे उद्योगपती बिजू पटनाईक यांनी १,००० पौंडांचे कलिंग पारितोषिक प्रतिवर्षी यूनेस्कोमार्फत देण्यास १९५२ पासून सुरूवात केली. हे पारितोषिक विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या अग्रेसर लेखकांना देण्यात येत असून सर्व राष्ट्रांतील शास्त्रज्ञ आणि भारत यांच्यामधील संबंध घनिष्ठ व्हावेत असाही या पारितोषिकाचा उद्देश आहे. [→ कलिंग पारितोषिके].    

फाय फाउंडेशन पुरस्कार : इचलकरंजीचे उद्योगपती पंडितराव कुलकर्णी यांनी स्थापिलेल्या फाय प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना रोख रकमेचे ‘फाय पुरस्कार’ दिले जातात. यांमध्ये शास्त्रज्ञांचाही समावेश असतो. [→ प्रतिष्ठान].    

नेहरू पुरस्कार : विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रविद्या या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार देण्यात येतो. एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जागतिक व अन्य देशांतील पारितोषिके :नोबेल पारितोषिके : आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञांच्या नावे दरवर्षी देण्यात येणारी ही पारितोषिके आहेत. ही पारितोषिके जगात अत्युच्च सन्मानदर्शक मानली जातात. आल्फ्रेड नोबेल यांच्या पाचव्या पुण्ततिथीपासून (१० डिसेंबर १९०१) ही पारितोषिके देण्यास सुरूवात झाली असून साहित्य, शांतता व अर्थशास्त्र या अन्य विषयांखेरीज भौतिकी, रसायनशास्त्र शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक या विषयांतील क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दरवर्षी दिली जातात. [→ नोबेल पारितोषिके].

रॉयल सोसायटी पदके : ग्रेट ब्रिटनमधील ही सर्वात जुनी वैज्ञानिक संस्था असून यूरोपातील जुन्या वैज्ञानिक संस्थांपैकी एक आहे. दरवर्षी संस्थेतर्फे विज्ञानात वा तंत्रविद्येत लक्षणीय महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पदके देण्यात येतात [→ रॉयल सोसायटी]. जागतिक कला व शास्त्र अकदामीतर्फे सिगल पुरस्कार दिला जातो. दहा हजार अमेरिकन डॉलर व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विज्ञानाच्या विशेष प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना ‘ऑलिंपिया’ पारितोषिक प्रत्येक वर्षी देण्यात येते. हे पारितोषिक रोख एक लाख डॉलरचे असून ते ग्रीसच्या अलेक्झांडर ओनॅसीस पब्लिक बेनेफिट फाउंडेशनतर्फे देण्यात येते.

लास्कर पुरस्कार : अल्बर्ट लास्कर पुरस्कार हेही विज्ञानातील विशेष कामगिरीबद्दल दिले जातात. प्रत्येक वर्षी सहा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. निदानीय वैद्यक संशोधन, मूलभूत विज्ञाने, सार्वजनिक सेवा या क्षेत्रांतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल तो दिला जातो. हा पुरस्कार रोख पंधरा हजार डॉलरचा असून १९४४ साली त्याची सुरूवात झाली. लास्कर विज्येत्यांना पुढे नोबेल पारितोषिके मिळण्याचा ४२वेळा योग आल्याचे दिसते.

क्रॅफर्ड पारितोषिके : रॉयल स्वीडिश अँकॅडेमी ऑफ सायन्सेसतर्फे१९८० पासून प्रत्येक वर्षी क्रॅफर्ड पारितोषिके दिली जातात. नोबेल पारितोषिकांप्रमाणे यांना दर्जा असून ज्या विषयांसाठी नोबेल पारितोषिके दिली जात नाहीत, अशा गणित, ज्योतिषशास्त्र, जीवविज्ञान व भूविज्ञान या विषयांतील मूलभूत संशोधनासाठी ती दिली जातात. रोख दहा लाख क्रोनरचा हा पुरस्कार असून सन्मानित शास्त्रज्ञांसाठी क्रॅफर्ड फाउंडेशनतर्फे ६,२५,००० क्रोनरचे अनुदान समस्थानिक भूविज्ञानातील संशोधनासाठी देण्यात येते.    

यांखेरीज विविध देशांत विविध प्रकारची पारितोषिके देण्यात येतात. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. यूनेस्को (पॅरिस) मार्फत देण्यात येणारी यूनेस्को विज्ञान पारितोषिके विशेष उल्लेखनीय आहेत.

पहा : कलिंग पारितोषिके तंत्रविद्या धन्वंतरी पुरस्कार नोबेल पारितोषिके विज्ञान वैज्ञानिक संशोधन वैज्ञानिक संस्था व संघटना.

संदर्भ : 1. Europa Publication Limitied, World Dictionary of Awards and Prizes, London, 1979.           २. जोशी, मोहन, असे पुरस्कार अशी पारितोषिके, कोल्हापूर, १९९९.                                        

कुलकर्णी, सतीश वि.