वैमानिकीय अभियांत्रिकी : ही अभियांत्रिकीची एक शाखा आहे. पृथ्वीच्या वातावरणात किंवा त्यापलीकडील बाह्य अवकाशात उडविण्यात येणाऱ्या वाहनांचा (उदा., विमाने, वाततल्पयान तसेच क्षेपणास्त्रे, अवकाशयाने वगैरेंचा) अभिकल्प (आराखडा), विकास, रचना. परीक्षण व प्रत्यक्ष वापर यांच्याशी या शाखेचा संबंध येतो. वातावरण व त्यापलीकडील अवकाश हे उड्डाण करणाऱ्या वाहनांच्या दृष्टीने एकच क्षेत्र असल्याने अशी व्यापक व्याख्या केली जाते व तिला अवकाश-वैमानिकीय (एअरोस्पेस) अभियांत्रिकी असेही म्हणतात. ⇨वायुयामिकी किंवा ⇨द्रायुयामिकी यांच्यावर मुख्यत्त्वे अवलंबून असलेले उड्डाण क वाहतुकीच्या इतर पद्धती यांच्या खास प्रश्नांशी या शाखेचा मुळात संबंध येतो. विमाने व क्षेपणास्त्रे यांच्या उड्डाणांवर हिच्यात मुख्य भर असतो परंतु वैमानिकीय अभियंते अनेक संबंधित क्षेत्रांतही कामे करतात उदा.,जलपर्णी नौका व वाततल्पयान. जलपर्णी नौकेविषयीच्या पुष्कळ समस्या ह्या विमानाच्या पंखाच्या प्रश्नासारख्या असतात, म्हणून त्यांचा अभ्यास वैमानिकीय अभियंते करतात. तसेच ⇨वाततल्पयान (हॉवरक्राफ्ट) जमिनीच्या वा पाण्याच्या पृष्ठभागापासून अल्प अंतरावरोन तरंगत चालते. यानाच्या तळाभोवतीच्या हवेच्या प्रवाहाचा वाहन उचलले जाण्यास उपयोग होतो आणि ते प्रचालक पंखे किंवा ⇨वायू टरबाइने यांच्या मदतीने पुढे जातो. (प्रस्तुत नोंदीत वैमानिकीय अभियांत्रिकी हा शब्द अवकाश-वैमानिकीय अभियांत्रिकी या अर्थानेही वापरला आहे).

  व्याप्ती : उड्डाणवाहनाचा अभिकल्प वा योजना तयार करण्यासाठी अभियांत्रिकीच्या अनेक शाखांमधील ज्ञानाची आवश्यकता असते. हे सर्व काम एकच माणूस एकहाती करू शकत नाही. यांमुळे वायुगतिकी, प्रचालन प्रणाली, रचना करण्याचा आराखडा, द्रव्यांचे गुणधर्म व सामग्री, वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकी (एव्हिऑनिक्स), तसेच स्थिरता व नियंत्रक प्रणाली या विज्ञानशाखांतील व तंत्रविद्यांमधील खास तज्ञांच्या अभिकल्प तुकड्या विमाने बनविणाऱ्या बहुतेक कंपन्यांमध्ये असतात. यांपैकी कोणत्याही एकाच विषयातील तुकडीवर या सर्व विषयांचा इष्टतम उपयोग होऊ शकत नाही.    

इ. स. १९४० नंतर वैमानिकीय अभियांत्रिकीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली. उड्डाणाचा वेग ताशी काहीशे किमी. होता, तो कृत्रिम उपग्रह व अवकाशयानांच्या वेगाइतका (सेकंदाला १०,६६८ मी.) वाढला. प्रचालकांची (पंख्यांची) जागा टर्बोप्रॉप व टर्बोजेट, रॅमजेट व रॉकेट एंजिनांनी घेतली [ विमानाचे एंजिन]. या बदलांमुळे मूलभूत विज्ञानाचे नवीन उपयोग वैमानिकीय अभियांत्रिकीत होऊ लागले आणि अभिकल्प व परीक्षण यांबाबतीत सैद्धांतिक माहिती व उच्च वेगाचे संगणक यांच्यावर अधिक प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे. कारण बऱ्याचदा केवळ प्रायोगिक पद्धतींवर विसंबून राहता येत नाही.

एखाद्या अभिकल्पाच्या महत्त्वाच्या भागांचे पद्धतशीर एकात्मीकरण करण्याचे काम वैमानिकीय अभियंते वरचेवर करतात. उदा., विमानाच्या नियंत्रण प्रणालीच्या बाबतीत इतर गोष्टींबरोबरच पुढील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात : प्रवाहविषयक आकडेमोड व वातविवर परीक्षणे यांतून मिळणारी वायुयामिकीय माहिती : विमानाचा संरचनात्मक अभिकल्प, खुद्द नियंत्रण प्रणालीचा यांत्रिक अभिकल्प, ⇨सेवा यंत्रणांसारखे विद्युतीय घटक जलप्रेरीत अभिवर्धकासारखे जलीय भाग आणि विमानाच्या नियंत्रणावर परिणाम करणाऱ्या प्रचालन प्रणालीसारख्या इतर प्रणालींबरोबर होणाऱ्या प्रतिक्रिया या सर्व घटकांचे एकत्रितपणे होणारे कार्य सुरळीतपणे होत आहे, याची खातरजमा करण्याची जबाबदारी वैमानिकीय अभियंत्यावर असते.    

दीर्घ पल्ल्याची प्रक्षेपी क्षेपणास्त्रे व अवकाशयाने पुढे आल्याने वैमानिकीय अभियंत्यांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली. त्यांच्या अतिउच्च वेगामुळे जास्त तापनाचे प्रश्न व्यापक झाले. त्यामुळे अवकाशयाने व पृथ्वीवर परत येणारी याने यांच्या संरक्षणाची नवीन द्रव्ये व शीतन प्रणाली विषयक संकल्पना यांची गरज निर्माण झाली. पूर्ण आकारमानाच्या मानवरहित वाहनाच्या प्रतिकृतींची उड्डाणांत नवीन प्रकारच्या द्रव्यांचे परीक्षण करण्यात आले. यातून बनविण्यात आलेल्या उष्णतारोधक कवचांचा उपयोग करून चंद्रावर गेलेले अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले. तसेच प्रक्षेपी क्षेपणास्त्रांची अचूकता टिकवून त्यांच्यावर बसविलेल्या अस्त्रांचे रक्षण करणेही शक्य झाले.

वैमानिकीय अभियंत्यांनी विमानासाठी जी तंत्रे विकसित केली, त्यांचा ⇨वाततल्पयानासारखी साधने विकसित करताना उपयोग झाला. एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर सैन्य उतरविण्याच्या दृष्टीने वाततल्पयानाचा उपयोग होतो. हेलिकॉप्टर व उभ्या दिशेत आरोहण व अवतरण करणारे (VTOL व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग) विमान यांच्या विकासातील वैमानिकीय अभियंत्यांच्या वाटा मोठा आहे. ⇨जलपर्णी नौका मुळात पाण्याखाली पंखांवर उडणारी जहाजे आहेत. हवेच्या तुलनेत पाणी पुष्कळच जड असल्याने जलपर्णी नौकेचे पंख विमानाच्या पंखापेक्षा नेहमी लहान असतात. मात्र यातील तत्व एकच असते. अशा पंखांचे नियंत्रण करणे हे अतिशय नाजूक काम असते. यात वापरलेल्या नियंत्रण प्रणालीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते, नाही तर यात उदभवणाऱ्या उच्च प्रेरणांमुळे पंखांची किंवा खुद्द जहाजाची मोठी हानी होते.

वायुयामिकी हे वैमानिकीय अभियांत्रिकीचे एक महत्त्वाचे साधन आहे. विमानाच्या नियंत्रणाशी असलेल्या त्याच्या संबंधाचा उल्लेख वर आला आहेच. अवतरणासाठी विमान जसे जमिनीजवळ येते, तसा जमीन या प्रतिबंधाचा परिणाम विमानाच्या वायुयामिकीवर होतो. जमिनीखाली दुसरा पंख आरशाच्या प्रतिमेच्या रूपात संगणकीय प्रतिकृतीत अंतर्भूत करून या परिणामाचे ⇨सदृशीकरण करता येतो. यातून मिळणारा प्रवाहाचा आकृतिबंध हा खरा पंख व जमीन यांच्याशी तुल्य असतो. सर्वांत साध्या बाबतीत अशा तऱ्हेची आकडेमोड उच्च वेगाच्या संगणकाच्या मदतीशिवाय करता येत नाही. वातावरणातून पुढे जाताना विमानाभोवती व अवकाशयानाभोवती असलेल्या संपूर्ण प्रवाहक्षेत्रांची (स्थान व काल यांनुसार असलेल्या द्रायूच्या-द्रवाच्या किंवा वायूच्या-वेगाचे व घनतेची) आकडेमोड करणे अशा उच्च वेगाच्या संगणकामुळे शक्य झाले आहे. प्रमाणशीर प्रतिकृतींचे वातविवरातील परीक्षण हेही वायुमिकीविषयक माहिती मिळविण्याचे दुसरे महत्त्वाचे साधन आहे.

विमान व क्षेपणास्त्र याच्या संरचनेविषयीचे काम करणाऱ्या अभियंत्यांनी जटिल संरचनांचे अभिकल्पन करण्याचे तंत्र अतिशय उच्च पातळीवर नेले आहे. उच्च वेगाचे संगणक वापरात येण्याआधी हे काम कधीही शक्य झाले नव्हते. संरचनांचे आता अधिक तपशीलवारपणे विश्लेषण करता येते आणि याची फले थेट संगणकीय मदतीने बनविलेल्या अभिकल्पांच्या सीएडी (कॉम्युटर-एडेड डिझाइन) कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करता येतात. संगणकाचे असे कार्यक्रम आता इतके परिपूर्णावस्थेला पोहोचले आहेत की, काही बाबतींत कागदावरील पेंसिलीच्या आकृत्यांचा (रेखाटनांचा) अजिबात वापर करीत नाहीत. आणि केवळ संगणकाच्या पडद्यावर काम करणाऱ्या अभियंत्याने रचलेल्या अभिकल्पावरून सर्व आरेखने सरळ मुद्रित केली जातात.

बहुतेक देशांत अवकाश-वैमानिकीय उद्योगाचा मोठा ग्राहक शासन असते. बहुसंख्य वैमानिकीय अभियंते लष्करी कामांसाठीच्या वाहनांसाठी असलेल्या योजनांमध्ये काम करतात. हवाई वाहतूक, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, अवकाशयाने व सर्वसाधारण हवाई वाहतूक या उद्योगांतून वैमानिकीय अभियंत्यांना सर्वाधिक मागणी असते. असा सर्वसाधारण अभियंता पदवीधर असतो. परंतु पुष्कळ अभियंते अवकाश-वैमानिकीय अभिकल्प, विकास व परीक्षण यांच्याशी निगडित असलेल्या विविध शाखांतील पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट अथवा यांच्याशी समतुल्य असे पदवीधरही असतात.    

नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस अँडमिनिस्ट्रेशन (NASA नासा अमेरिका) व यूरोपीयन स्पेस एजन्सी (ESA यूरोप) या शासकीय संघटना असून तेथे संशोधन, विकास, परीक्षण व लष्करी वाहनांचे संपादन (प्रापण) या कामांसाठी अनेक वैमानिकीय अभियंते काम करतात. अभियांत्रिकीय समस्यांच्या अध्ययनापासून ते धातूची सामग्री (हत्यारे, उपकरणे, जोडण्या, जोडसाधने इ.) अभिकल्पन व जोडकाम (बनावट) यांच्यापर्यंतचे ठेके शासकीय संघटना देतात आणि त्यांवर लक्ष व नियंत्रण ठेवतात. विद्यापीठांना मुख्यत: विश्लेषणात्मक संशोधनाविषयीच्या सोयींचा विकास व विस्तार करीत आहेत.

इतर ज्ञानक्षेत्रांशी संबंध : वैमानिकीय अभियांत्रिकीसाठी मुख्यत: यांत्रिक अभियंत्यांची व मर्यादित प्रमाणात इतर क्षेत्रांतील तज्ञांची गरज असते. वाहने व वाहतूक, बांधकाम, संदेशवहन, ऊर्जा इ. इतर बहुसंख्य उद्योगांना वैमानिकीय अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांची मदत होते.

जमिनीवरील व पाण्यातील वाहने इष्टतम गतीची व कार्यक्षमतेची असावीत या दृष्टीने त्यांचा अभिकल्प तयार करतात. यामुळे असे अभिकल्प बनविणाऱ्या तुकड्यांत वैमानिकीय अभियंता हा एक प्रमुख्य सदस्य असतो. वाहनाला हवेकडून विरोध होत असतो व या विरोधाच्या निराकरणासाठी वाहनाला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी निम्म्यापर्यंत ऊर्जा खर्च होते. त्यामुळे मोटारगाड्या, आगगाड्या व जहाजे यांच्या बाह्याकाराचा अभिकल्प हा हवेची ओढ कमी करणारा असल्यास वाहन अधिक चांगली गती घेते व इंधनाची बचत होते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात (१९७५-२०००) खनिज तेलाच्या किंमती वाढल्या व अवकाश-वैमानिकीय उद्योगात मंदी आली आणि या काळात मोटारगाडी उद्योगातील वैमानिकीय अभियंते काम करतात. फेडरल एव्हिएशन अँडमिनिस्ट्रेशन (अमेरिका) व इतर शासकीय संघटना अशा विविध कामांसाठी अवकाश-वैमानिकीय अभियंत्यांच्या तांत्रिक तज्ञतेचा वापर करून घेतात.

अवकाश-वैमानिकीय पद्धतिशास्त्र जाणून घेणे व त्याचा आपल्या कार्यात उपयोग करून घेणे या गोष्टी पुष्कळ कंपन्यांना लाभदायक ठरल्या आहेत. उदा., कृत्रिम उपग्रह संदेशवहनाच्या कंपन्यांना पुढील गोष्टी जाणून घेण्याची गरज असते. कक्षीय, यामिकी, प्रवेगकारी प्रेरणा, प्रक्षेपमार्ग (गतिपथ), वायुगतिकीय तापन आणि एकूण अवकाशयान उद्योगाची माहिती या कंपन्या जाणून घेतात. प्रचालक, पवनचक्क्या व टरबाइन एंजिने यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी वातपर्ण व घूर्णक याच्या प्रगत वायुगतिक अभिकल्पाचा उपयोग होतो. यांशिवाय उड्डाण सदृशीकरण, स्वयंचलित नियंत्रण, द्रव्ये, गतिकी, रोबॉटिक्स, वैद्यक व उच्च तंत्रविद्येचा उपयोग करणारी अन्य क्षेत्रे यांच्या संशोधन व विकास कार्यात गुंतलेल्या कंपन्यांमध्येही अवकाश-वैमानिकीय तंत्रविद्येचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

हवाई प्रवासातील लक्षणीय वाढ, पासधारी प्रकारच्या हवाई मार्गावरील सुधारित VTOL विमानांच्या बाबतीतील आशादायक परिस्थिती आणि सैन्याच्या हालचालीसाठी विमानांच्या बाबतीतील आशादायक परिस्थिती आणि सैन्याच्या हालचालीसाठी विमानांचा अधिक वापर करण्याची प्रवृत्ती यांमुळे वैमानिकीय अभियंत्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल असे दिसते आहे. क्षेपणास्त्रांची मागणी स्थिर राहील असे दिसते परंतु ही उणीव अवकाशयान उद्योगाद्वारे भरून निघण्याची शक्यता आहे. यांमुळे सर्वोत्कृष्ट दर्जाच्या वैमानिकीय अभियंत्यांची गरज सतत राहील. १९९० च्या सुमारास अमेरिकेत सर्व उद्योगधंद्यांत असणाऱ्या एकूण अभियंत्यांपैकी २० टक्के अभियंते अवकाश-वैमानिकीय उद्योगांत होते.


वाहननिर्मितीतील टप्पे : एखाद्या उड्डाणवाहनाचा अभिकल्प तयार करणे व त्याचा विकास करणे हे गुंतागुंतीचे व वेळखाऊ काम आहे. वाहननिर्मितीच्या प्रक्रियेची पाच टप्प्यांत विभागणी करता येते आणि बहुतेक अवकाश-वैमानिकीय उत्पादनांच्या बाबतीत हीच विभागणी लागू पडते.

विपणन विश्लेषण या पहिल्या टप्प्यात ग्राहकाला गरजा किंवा विनिर्देश निश्चित करतात. यासाठी वाहनाचा हेतू व गरजा सुस्पष्टपणे माहीत असाव्या लागतात. या टप्प्यात अवकाश-वैमानिकीय अभियंते तांत्रिक, कार्यात्मक (वापराविषयीच्या) किंवा वित्तव्यवस्थेविषयीच्या (आर्थिक) प्रश्नांचे विश्लेषण करतात. अशा प्रकारे ग्राहकाला गरजा निश्चित करून त्या दुसऱ्या

टप्प्यातील संकल्पनात्मक अभिकल्प तुकडीकडे पाठवितात.

संकल्पनात्मक अभिकल्प तुकडी वाहनाचे आकारमान व बाह्याकार निश्चित करण्यासाठी प्रारंभिक आरेखन तयार करण्याचा प्रयत्न करते. वाहनाचे कार्यमान, वजन व प्रचालन प्रणाली यांचा प्रारंभिक हिशोब करण्यात येतो. कार्यमानाशी निगडित असलेल्या पल्ला, गती, ओष, लागणारी शक्ती, अधिभार, तसेच आरोहणाला व अवतरणाला आवश्यक असलेली अंतरे या बदलणाऱ्या राशी विचारात घेतात. इष्टतम अभिकल्प तयार करण्यासाठी या राशींचा विशिष्ट रीतीने अभ्यास करतात. हे करताना बाह्याकाराचे तपशील मात्र बदलतात. प्रमुख प्रकल्पांच्या बाबतीत या टप्याला काही महिन्यांपासून ते अनेक वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो अभिकल्पन अधिक प्रमाणात कलात्मक काम असल्याने त्याला पूर्वानुभव व व्यवहारज्ञान यांची गरज असते. ही प्रक्रिया संगणकीकृत करता येत नाही. परंतु पर्यायी अभिकल्पांचे मूल्यमापन संगणकांमुळे जलदपणे होऊ शकते.

तिसऱ्या प्रारंभिक अभिकल्पाच्या टप्प्यात वाहनाच्या बाह्याकाराचे संगणकाच्या मदतीने विश्लेषण करतात. नंतर वातविवरातील परीक्षणासाठी वाहनाच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे वातविवरात परीक्षण करतात [→ वातविवर]. उड्डाण नियंत्रण अभियंते वाहनाचे गतीकीय स्थैर्य व नियंत्रणविषयक प्रश्न यांचा अभ्यास करतात. एंजिनाची निवड करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती प्रचालन गट पुरवितो. या टप्प्यात एंजिनाचे प्रवेशद्वार व विमानाची चौकट (सांगाडा) यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास करतात. पंख, चौकट व इतर घटक भागांवर येणारे नमन भार, प्रतिबले (दाब) व विचलने यांचे विश्लेषण स्थापत्य, यांत्रिक व अवकाशवैमानिकीय अभियंते करतात. कमी वजनाची व उच्च बल असलेली द्रव्ये निवडण्यासाठी ⇨सामग्रीविज्ञान अभियंते मदत करतात. हे अभियंते द्रव्यांची उड्डाण प्रत्यास्थता (संरचनात्मक दृष्ट्या लवचिक असलेल्या घटकांचे वायुगतिकीय भारांमुळे होणारे विरूपण) व श्रींती (शीण) यांचे परीक्षण करतात. वजन (भार) अभियंते प्रत्येक घटक भागाच्या वजनाविषयी तपशीलवार अंदाज बांधतात. वाहनाच्या अभिकल्पाची वाटचाल बदलण्याऱ्या विशिष्ट राशींवर अवलंबून असते व त्यामुळे प्रारंभिक अभिकल्पक हे बहुधा संकल्पनात्मक अभिकल्पक व विपणन विश्लेषण यांच्याशी संपर्क ठेवून असतात. या टप्प्याला लागणारा कालावधी समस्येच्या गुंतागुंतीनुसार सामान्यपणे ६ ते २४ महिने असतो.

तपशीलवार अभिकल्पाच्या चौथ्या टप्प्यात वाहनाचा मूळ नमुना तयार करतात. याचा प्रत्येक घटक बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या आरेखनांची मांडणी करण्यासाठी यांत्रिक अभियंते, तंत्रज्ञ व प्रारूपकार यांची मदत होते. पुठ्ठा, लाकूड किंवा इतर स्वस्त द्रव्याच्या पूर्णाकृती प्रतिकृती तयार करतात. अभ्यासासाठी वा परीक्षणासाठी अशा प्रतिकृतींचे भाग उघडे असून उपप्रणालीच्या मांडणीसाठी त्यांचा उपयोग होतो. उपप्रणालीतील घटक बनवितात व त्यांचे कार्यशाळेत पूर्ण कार्यविषयक मंच परीक्षण करून वातविवरातील जादा परीक्षणही करतात. या टप्प्याला ते ३ वर्षे लागतात.

मूळ नमुन्याचे उड्डाण परीक्षण हा शेवटचा पाचवा टप्पा असतो. वाहन सुरक्षित असून अपेक्षेनुसार कार्य करते आहे, याची खातरजमा करून घेण्यासाठी अभियंते व परीक्षण वैमानिक एकत्रितपणे काम करतात. मूळ नमुना व्यापारी वाहतुकीच्या विमानाचा असल्यास सरकारे संघटनांनी विनिर्देशित केलेल्या आवश्यक बाबी त्या विमानाने पूर्ण करणे गरचेचे असते. फेडरल एव्हिएशन अँडमिनिस्ट्रेशन (अमेरिका) व सिव्हिल एव्हिएशन अँथॉरिटी (ब्रिटन) या अशा संघटना आहेत. मूळ नमुन्याचे परीक्षण बहुधा एका वर्षात पूर्ण होते परंतु आकस्मित अडचणींमुळे याला अधिक वेळ लागू शकतो. ग्राहकाची मागणी हाती आल्यापासून ते वाहन त्याच्या हाती देईपर्यंत अशा प्रकारे १० ते १५ वर्षांचा कालावधी लागतो.    

उच्च वेगाच्या संगणकांमुळे जटिल अवकाश-वैमानिकीय समस्यांचे निराकरण जलदपणे होऊ शकते. नवीन बाह्यकारांचे अभिकल्पन करण्यासाठी अभियंत्यांना साहाय्यभूत ठरणारे अधिक विस्तृत असे संगणक कार्यक्रम सूत्रबद्ध (तयार) करण्यात येत आहेत व यांपैकी पुष्कळ कार्यक्रम अवकाश-वैमानिकीय अभियंत्यांनी लिहिले आहेत.

शिक्षण : वैमानिकीय अभियांत्रिकीचे शिक्षण सामान्यपणे दोन स्तरांवरचे असते. तंत्रविद्या संस्था अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञांना व आरेखकांना प्रमाणपत्र देतात. महाविद्यालये व विद्यापीठे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीतील पदवी देतात.

भारतात एकूण सहा ठिकाणी वैमानिकीय किंवा अवकाश-वैमानिकीय अभियांत्रिकीच्या पदवी व त्यापुढील शिक्षणाची सोय आहे. १९९२ सालापासून भारत सरकारने एरोस्पेस एंजिनिअरिंगसाठी वायु-अवकाश अभियांत्रिकी हा शब्द स्वीकारला आहे. मुंबई, कानपूर, चेन्नई व खरगपूर येथील इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तसेच अण्णा युनिव्हर्सिटी (चेन्नई) आणि पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज (चंडीगढ) येथे अवकाशवैमानिकीय अभियांत्रिकीचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिवविले जातात. मुंबईला बी.टेक. (४ वर्षे, एम.टेक. (दीड वर्षे), बी.टेक. अधिक एम.टेक. (५ वर्षे) आणि संशोधनाद्वारे पीएच.डी. (३-४ वर्षे) या पदव्या देणारे अभ्यासक्रम शिकविले जातात. अन्य काही संस्थांमध्येही अशाच प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्याची सोय आहे.

भारतात पुढील संस्थांमध्ये अवकाश-वैमानिकीय अभियांत्रिकीविषयीच्या संशोधनाचे व विकासाचे काम चालते : नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी (बंगलोर), एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (बंगलोर) आणि डिफेन्स रिचर्स अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी (हैदराबाद).

पहा : अवकाशविज्ञान उपग्रह, कृत्रिम वातविवर वायुयामिकी विमान विमान उद्योग विमान परीक्षण विमानांचा अभिकल्प व रचना विमानाचे एंजिन वैमानिकी.

संदर्भ : १. Anderson, J. D. Introduction to Flight : Its Engineering and History, १९७८.

            २. Hanle, P. A. Bringing Aerodynamics to America : A History of Aerodynamics Research, १९८२.

            ३. Shevell, R. S. Fundamentals of Flight, London, १९८३.

ठाकूर, अ. ना.