वैद्यकीय सांख्यिकी : वैद्यकात सांख्यिकीय पद्धती हमखास वापरल्या जातात. १५३२ सालापासून जन्म, मृत्यू इत्यादींची यादी दर आठवड्याला प्रसृत करण्याची प्रथा लंडनमध्ये सुरू झाली. जॉन ग्रांट यांनी त्यांचा अभ्यास करून १६६२ साली नॅचरल अँड पोलिटिकल ऑब्झर्व्हेशन्स… मेड अपॉन द बिल्स ऑफ मॉर्टॅलिटी हे पुस्तक लिहिले. वैद्यकीय सांख्यिकीवरचे हे पहिले पुस्तक असून त्यामध्ये मृत्यु-सारणी दिलेली आहे. त्यानंतर सांख्यिकीचा वैद्यकात उपयोग कसा करून घेता येईल, ह्यावर संशोधन सुरू झाले व ते आजतागायत चालूच आहे.
सार्वजनिक आरोग्य नोंदी : निरनिराळ्या वयांच्या, लिंगांच्या, व्यवसायांच्या व विभागांत राहणाऱ्या लोकांपैकी किती लोक अमुक एका रोगाने पछाडले जाण्याची किंवा मृत्यू पावण्याची शक्यता आहे व त्या रोगाने किती लोक एका ठराविक मुदतीत खरोखरीच आजारी पडले किंवा मृत्यू पावले, याची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य नोंदीत स्थूलमानाने दिलेली असते. अशा प्रकारची आकडेवारी गोळा करण्याचे दोन प्रमुख उद्देश असतात. पहिला म्हणजे कोणत्या व्यवसायातील, कोणत्या ठिकाणी राहणाऱ्या स्त्रियांत व पुरुषांत, कोणत्या वयोगटात, कोणत्या रोगाला बळी पडण्याचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या जास्त आहे, हे समजते. म्हणजेच जनतेच्या आरोग्यविषयक तक्रारी कोणत्या आणि त्यांवर कोठे व कधी उपाययोजना करावयाची, याचे स्थूलमानाने ज्ञान होते. दुसरा उद्देश म्हणजे वरील प्रकारच्या तक्रारींच्या उद्भवाची मूळ कारणे व त्यांपैकी प्रत्येकीच्या गांभीर्याचे स्वरूप समजते आणि त्यामुळे कोणत्या अनिष्ट गोष्टींना मूलत: आळा घालण्यासाठी कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना योजाव्यात, हे ठरविता येते. एवढेच नव्हे तर जनतेत उद्भवू पाहणाऱ्या एखाद्या सांसर्गिक रोगाची वर्दी आरोग्य खात्याला ह्या नोंदीमुळे लगेच मिळू शकते व त्याचा फैलाव टाळण्यासाठी कोणते प्रतिबंध उपाय योजावेत, हेही ठरविता येते. त्याचप्रमाणे छोट्या कालखंडात त्या रोगाचा होणारा चढउतार, ऋतुमानाप्रमाणे होणारी सौम्य-तीव्र स्थिती, प्रामुख्याने एखाद्या ठराविक वयोगटात किंवा व्यावसायिकात त्याचा होणारा प्रादुर्भाव, एखाद्या ठराविक वस्तीत असणारा त्याचा जोर इ. गोष्टींबद्दलही प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळते.
अर्थातच, अशा प्रकारच्या ह्या नोंदी संपूर्णपणे अचूक व विश्वासार्ह नसतात. कारण रोगांच्या निदानामध्ये वस्तुनिष्ठता व अचूकता असतेच असे नाही तसेच साथीच्या काळात वैद्यकीय अधिकारी व जनता दक्ष असल्यामुळे, एरवी त्याची दखलही घेतली गेली नसती, असा सौम्य स्वरूपाचा रोगही लक्षात येवून नोंदविला जातो. परंतु मानवी स्वभावधर्मामुळे पडणाऱ्या या मर्यादा लक्षात ठेवून स्थूलमानाने पाहिले, तर महत्त्वाच्या व चटकन लक्षात येण्याजोगी लक्षणे असलेल्या रोगांसंबंधी आरोग्य खात्याला वेळीच माहिती पुरविणाऱ्या ह्या नोंदींचे महत्त्व लक्षात येईल.
काही रोग चटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही अडचणी उभ्या राहतात. समाजाच्या सर्व सौम्य व तीव्र व्याधींची सार्वजनिक आरोग्य नोंद उपलब्ध नसल्यास फक्त रुग्णालयात दाखल केलेल्या त्या रोगाच्या रुग्णांबद्दलच्या माहितीचाच (रुग्णालयातील नोंदींवरून) आधार उरतो. परंतु ह्या नोंदीचा काहीशा सावधपणेच उपयोग करून घ्यावा लागतो. कारण त्या रोगाने आजारी पडलेले सर्वच रुग्ण काही रुग्णालयात येत नाहीत, फक्त ज्यांची प्रकृती गंभीर झाली आहे, असेच रुग्ण रुग्णालयात येतात. तसेच, रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्या रोगाच्या तीव्रतेप्रमाणेच बदलत्या वैद्यकीय उपचारांवरही अवलंबून असते. उदा., रासायनी चिकित्सेच्या साहाय्याने फुफ्फुसशोथ (न्यूमोनिया) झालेल्या रुग्णांवर घरच्या घरीच उपचार करणे शक्य झाल्यामुळे ह्या रोगाच्या रुग्णांची रुग्णालयात येण्याची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे फक्त रुग्णालयातील रुग्णांबद्दलच्या माहितीवरून त्या रोगाच्या लागणीचे प्रमाण व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण काढले, तर ते प्रातिनिधिक होणार नाही.
सार्वजनिक आरोग्य नोंदीच्या आधारे काढलेल्या मृत्युप्रमाणावरून निरनिराळ्या रोगांच्या व्याप्तीबद्दल निष्कर्ष काढण्यात एक अडचण येते. वैद्यकीय ज्ञानात वेगाने होणारी वाढ आणि रोगाचे निदान करण्याच्या नवनव्या पद्धती यांमुळे नोंदीतील अचूकतेचे प्रमाण जरी वाढत असले, तरी त्यामुळे नोंदीत एखाद्या कारणामुळे होणाऱ्या मृत्युसंख्येत अचानक घट झालेली व दुसऱ्या एखाद्या कारणामुळे होणाऱ्या मृत्युसंख्येत अचानक वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारच्या फरकाचे कारण जसे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती हे आहे तसेच कदाचित न ओळखता येणाऱ्यास कारणांमुळे झालेले मृत्यू हे असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. [→ रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक].
प्रत्यक्ष पाहणी : बालमृत्यूचे किंवा मृत बालकांना जन्म देण्याचे प्रमाण आपल्या विभागात जास्त आहे, असे सार्वजनिक आरोग्य नोंदीवरून एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या लक्षात आले, तर ते मृत्यू अटळ होते की नाही, हे ठरविण्यासाठी तो संबंधित गोष्टींची पाहणी करील. ते अटळ ठरल्यास त्यांची कारणे शोधून पूर्वीच्या प्रतिबंधक उपायांत योग्य ती सुधारणा करील परंतु केवळ बालमृत्यूंची व मृतजात बालकांचीच पाहणी करून काढलेले निष्कर्ष विश्वसनीय ठरणार नाहीत. समजा, त्याने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, मृत बालकांना जन्म देणाऱ्यात स्त्रियांपैकी काही स्त्रियांनी गरोदरपणात कष्टाची कामे केली होती. मग गरोदरपणात कष्टाची कामे करणाऱ्या सर्व स्त्रियांची पाहणी करून त्यांच्यात मृत बालकांना जन्म देण्याचे प्रमाण जास्त आहे का, हे पाहणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे केलेल्या पाहणीस सांख्यिकीत नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात. नवीन वैद्यकीय उपचार खरोखरीच गुणकारी आहेत की नाहीत, हे ठरविण्यासाठीसुद्धा नियंत्रित निरीक्षणाची आवश्यकता असते. [→ सामाजिक सर्वेक्षण पद्धति].
प्रतिबंधक लशींच्या यशस्वीतेची पाहणी : रोगप्रतिबंधक लशींचे यशापयश ठरविण्यासाठी लागणारे ‘नियंत्रित’ स्वरूपाचे गट मिळविण्यात एक अडचण येते. एखाद्या रोगासाठी निर्माण केलेल्या व प्राण्यांवर प्रयोग करून यशस्वी ठरविलेल्या एखाद्या प्रतिबंधक लशीची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी ती लस काही लोकांना टोचून त्यांच्यावर त्या रोगाचा होणारा परिणाम पहावा लागतो त्याचप्रमाणे त्या रोगाच्या उद्भवाच्या काळात काही लोकांना ती लस न टोचता त्यांच्यावर त्या रोगाचा होणारा परिणाम पाहणे सांख्यिकीय दृष्ट्या अत्यावश्यक असते. अर्थात ह्या नियंत्रित निरीक्षणासाठी काही स्वयंसेवक तयार होतीलही. तथापि, ह्या स्वयंसेवकांची इतर लोकांशी तुलना करणे योग्य होणार नाही. कारण हे स्वयंसेवक कदाचित समाजाच्या एखाद्या ठराविक स्तरातूनच आलेले असतील किंवा त्या रोगाचा प्रभावीपणे प्रतिकार करू शकणारे असतील किंवा साथीच्या काळात त्या रोगाचा संसर्ग टाळण्याची दक्षता घेणारे असतील. ह्या अडचणींमुळे समाधानकारक अशी एकच पद्धती उरते, ती म्हणजे काही स्वयंसेवकांना लस टोचावयाची व काही स्वयंसेवकांना ती टोचावयाची नाही आणि ह्या सर्व स्वयंसेवकांवर साथीच्या काळात त्या रोगाचा कोणता परिणाम होतो, ते तुलनात्मक दृष्टीने पहावयाचे परंतु अशा प्रकारच्या पाहणीतून विश्वसनीय निष्कर्ष काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पाहणी करणे आवश्यक असते. म्हणून मानवी समाजासाठी ही पद्धती वापरणे सुलभ होत नाही. [→ लस व अंत:क्रामण].
रोगनिवारक उपचार : वैद्यकीय उपचारांच्या यशापशयाची पाहणी करण्यासाठीसुद्धा नियंत्रित निरीक्षणांची आवश्यकता असते, पण येथे काही नैतिक अडचणी उभ्या राहतात. जरी सांख्यिकीय दृष्ट्या नियंत्रित गटावर कोणतेही उपचार न करणे आवश्यक असले, तरी नैतिक दृष्ट्या रुग्णांवर उपचार करणे हे एक महत्त्वाचे कर्तव्य असते. त्यामुळे मानवी समाजाच्या बाबतीत सक्त नियंत्रण करणे शक्य होत नाही. या पेचप्रसंगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे नियंत्रित गटातील रुग्ण अनुपचारित न ठेवता त्यांवर प्रचलित उपचार करणे व प्रत्यक्ष पाहणीच्या गटातील रुग्णांवर नवा उपचार करून तो कितपत गुणकारी आहे, हे पाहणे. ह्या पद्धतीचा प्रमुख दोष म्हणजे नवा उपचार अतिशय प्रभावी किंवा अतिशय निष्प्रभ असल्याखेरीज थोड्या रुग्णांच्या आधारे ही पाहणी लवकर पूर्ण करता येत नाही.
दुसरी एक पद्धती म्हणजे रुग्णांच्या उपचारपूर्व व उपचारानंतरच्या प्रकृतीची तुलना करणे परंतु रुग्ण उपचारांशिवाय बरा झालाच नसता हे ह्या पद्धतीत गृहीत धरले जाते, हा तिचा एक दोष आहे.
तिसरी पद्धती म्हणजे एखाद्या रुग्णालयातील पूर्वीच्या रुग्णांवर केलेल्या जुन्या उपचारांच्या परिणामांची त्याच रुग्णालयातील सध्याच्या रुग्णांवर केलेल्या नव्या उपचारांच्या परिणामांशी तुलना करणे, ही होय. कोणतेही दोन रुग्ण सर्व दृष्टींनी समान नसतात, ह्या सबबीखाली ह्या पद्धतीला विरोध होऊ नये. कारण मग पूर्वानुभवाच्या आधारे रुग्णांवर उपचार करावेत, हे वैद्यकशास्त्रातील तत्त्वच ढासळून पडेल.
सांख्यिकीय दृष्ट्या जरी नियंत्रित निरीक्षण आवश्यक असले, तरी काही वेळा मात्र अशा निरीक्षणाची गरज नसते. उदा., क्षयरोगजंतुजन्य मस्तिष्कावरणशोथ ह्या रोगाचे जवळजवळ सर्वच रुग्ण मृत्यू पावत असल्यामुळे थोड्या प्रमाणात यशस्वी ठरलेले नवे उपचारही (वरील रोगात स्ट्रेप्टोमायसिनाचा वापर) स्वाभाविकपणे प्रचलित उपचारांपेक्षा सरस ठरतात.
सांख्यिकीय पद्धतींचा वैद्यकात वापर : पूर्वी रक्तदाब, शरीराचे तापमान, नाडीचे ठोके इत्यादींसाठी सरासरी हेच प्रमाण म्हणून वापरले जात असे. सरासरीपासून त्यांचे होणारे विचलन व मापनातील संभवनीय त्रुटी लक्षात घेतल्या जात नसत परंतु आता वैद्यकात सांख्यिकीच्या साहाय्याने ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास चालू असून ह्या क्षेत्राचा विकास होत आहे आणि वैद्यकीय अधिकारीही सांख्यिकीय पद्धतीचा वापर अधिकाधिक प्रमाणात करीत आहेत.
पहा : जनांकिकी जीवसांख्यिकी विमाविषयक सांख्यिकी.
संदर्भ : 1. Hill, A. B. Principles of Medical Statistics, London, 1961.
2. Smart, J. V. Elements of Medical Statistics, 1963.
3. Sokal, R. Rohlf, F. Biometry and Practice of Statistics in Biological Research, New York, 1981.
वर्दे, श. द.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..