वेगमापक : चल (हलणाऱ्या) वस्तूचे एकक कालातील विस्थापन म्हणजे तिचा वेग होय आणि वेग मोजणाऱ्या उपकरणाला वेगमापक म्हणतात. उदा., वाहनाचा वेग दर्शविणारे उपकरण हा वेगमापकाचा एक प्रकार आहे. अशा वेगमापकाबरोबर बहुधा आक्रमित अंतरमापक हे उपकरण असते. पुष्कळ वेगमापकांचा फेरेगणक हा एक भाग असतो. म्हणून त्याची माहिती येथे दिली आहे. तसेच माणसाचा चालण्याचा वेग मोजणारे चालमापक किंवा पदांतरमापक याचीही माहिती शेवटी दिली आहे.
मोटारगाडीसारख्या स्वयंचलित वाहनांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगमर्यादा घालावी लागत असल्याने अशा वाहनात वेगमापक असणे आवश्यक असते. शस्त्रास्त्रांच्या परीक्षणात गोळ्यांचा वेग मोजावा लागतो, बहुतेक यंत्रांच्या वा एंजिनांच्या गतीचे नियंत्रण करावे लागते किंवा प्रक्रियांमध्ये गतिनियंत्रण आवश्यक असते. अशा नियंत्रण प्रणालीत वेगमापकाचा उपयोग करतात. संवृत (बंदिस्त) नियंत्रण प्रणालीमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी अथवा विद्युत् संदेशांचे संकलन वा एकात्मीकरण करण्याकरिता वेगमापकाचा उपयोग करतात.
रेषीय वेग मोजताना वस्तूचे विस्थापन व त्याला लागणारा काल मोजतात. विस्थापन भागिले काल या सूत्रावरुन वस्तूचा सरासरी वेग मिळतो. विशिष्ट अंतरावर असलेले दोन बिंदू निश्चित करुन चल वस्तूला ते अंतर कापण्यास लागणारा काल कालमापकाने मोजतात. चल वस्तू स्थिर बिंदूंजवळून जात असताना संदेश देण्याची विविध प्रकारची व्यवस्था केलेली असते. या वस्तूचे लागोपाठच्या कालखंडातीला विस्थापन मोजून विस्थापनकाल आलेख तयार करता येतो. या आलेखाचे आलेखीय किंवा संगणकाने अवकलन केल्यास [→ अवकलन व समाकलन] वेग- काल असा आलेख मिळतो. पुन्हा अवकलन केल्यास प्रवेग-काल असा आलेख मिळतो. प्रवेग- काल आलेखाचे समाकलन केल्यास वेग- काल आलेख मिळतो. गणितातील समाकलन ही क्रिया अवकलन क्रियेपेक्षा अधिक अचूक असल्याने ⇨प्रवेगमापकाचा उपयोग वेग काढण्यासाठी करतात.
हातात धरुन वापरावयाचे फेरेगणक हे यांत्रिक वा विद्युतीय प्रकारचे असतात. ते दंडाच्या फिरत्या टोकाच्या संपर्कात आणतात. त्यामुळे फेरेगणक दंडाच्या गतीने फिरु लागतो. फेरेगणकाच्या दंडाच्या टोकावर शंकूच्या आकाराची अथवा तबकडीसारखी रबरी टोपी बसविलेली असते. ज्या यंत्र- दंडाचा वेग मोजावयाचा असेल, त्यावर शंकूच्या आकाराचे भोक असल्यास शंकूच्या आकाराची टोपी आणि तसे भोक नसल्यास तबकडीसारखी टोपी फेरेगणकावर बसवितात. यंत्र- दंडाच्या टोकावर हातांनी दाबून धरुन फेरेगणक यंत्र-दंडाच्या वेगाने फिरविला जातो. फेरेगणकाची रचना घडयाळाप्रमाणे असल्याने त्याचा दंड फिरु लागल्यावर त्यावरील दर्शक काटा फेऱ्यांच्या संख्येनुसार पुढे सरकू लागतो. फेरेगणक यंत्र- दंडाला जोडण्याची किंवा अलग करण्याची क्रिया आणि थांबते घडयाळ (स्टॉप वॉच इष्ट वेळी चालू करता वा थांबविता येणारे) अनुक्रमे चालू व बंद करण्याची क्रिया एकाच वेळी कराव्या लागतात. फेऱ्यांची संख्या व त्यांना लागलेला काळ मिळाल्यावर वेग काढता येतो. या पध्दतीत अचूकता कमी असल्याने सापेक्षतया कमी गती मोजण्यासाठी ती वापरतात. सर्वांत साधा फेरेगणक आ. १ मध्ये दाखविला आहे.
जेव्हा विस्थापन अल्प असते किंवा अल्प काळातील वेग काढावयाच असतो अथवा कंपनयुक्त गतीचे मापक करावयाचे असते तेव्हा उपयोगी असणाऱ्या रेषीय वेगमापकाचे तत्त्व आ. २ मध्ये दाखविले आहे.
यात चल वस्तूला ॲल्युमिनियमाची पटटी जोडलेली असून तिच्यावर १० मिमी., २५ मिमी. इ. विशिष्ट अंतरावर दोन लोखंडी पिना बसविलेल्या असतात. चिरचुंबकीय प्रयुक्तीचा उद्ग्राहक (पिक-अप) चल वस्तूच्या जवळ ठेवलेला असतो. लोखंडी पिना उद्ग्राहकाच्या जवळून जात असताना चुंबकीय स्रोतात बदल होतो. त्यामुळे विद्युत् वेटोळ्यात निर्माण होणारा विद्युत स्पंद ऋण किरण दोलनदर्शकाच्या [→ इलेक्ट्रॉनीय मापन] पडद्यावर दिसतो. पडद्यावरील काल-अक्ष इयत्तीकृत असल्याने नजीकच्या दोन विद्युत् स्पंदांमधील कालावधी मोजता येतो. पिनांमधील अंतर व विद्युत स्पंदांमधील कालावधी यांवरुन वेग काढता येतो. काही ठिकाणी चिरचुंबकीय प्रयुक्तीऐवजी ⇨प्रकाशविद्युत् प्रयुक्ती वापरतात.
परिभ्रमी (कोनीय) गती मोजण्यासाठी चल वस्तूच्या दंडावर दंतचक्र बसवितात. या चक्रावरील दातांचा उपयोग वरील पिनांप्रमाणे होतो. उदग्राहकाजवळून प्रत्येक दात जात असताना विद्युत् स्पंद निर्माण होतो. प्रत्येक फेऱ्यांमध्ये दातांच्या संख्येइतके स्पंद निर्माण होतात.अतिशय मंद परिभ्रमी गती मोजण्यासाठी दंतचक्रावरील दातांची संख्या वाढवितात. विद्युत् स्पंद हे विद्युत् संदेश म्हणून एका इलेक्ट्रॉनीय उपकरणाला दिले जातात. त्या उपकरणात एका सेकंदात मिळणाऱ्या विद्युत स्पंदांची संख्या मोजली जाते व ती संख्या ४-५ सेकंद एवढा अल्पकाळ दर्शविली जाते. त्यावरुन वेग मिळू शकतो. या उपकरणाला एकक काल घटना मापक असे म्हणतात.
रेषीय वेग मोजण्याच्या काही पध्दतींचे वर्णन मराठी विश्वकोशातील ‘काललेखक’ या नोंदीत आलेले आहे.
दंतचक्र व दंतचक्रपट्टी यांच्या साहाय्याने रेषीय गतीचे परिभ्रमी गतीत रुपांतर करता येते. परिभ्रमी गती एका सेकंदात किंवा एका मिनिटात होणाऱ्या वस्तूच्या फेऱ्यांच्या संख्येने (म्हणजे फेरे/से. वा फेरे/मि.) दर्शवितात. परिभ्रमी गती काढताना फेऱ्यांची संख्या व त्यांना लागणारा वेळ माहीत असावे लागतात. त्याकरिता अनुक्रमे फेरेगणक व थांबते घडयाळ वापरतात.
फेरेगणक : मोटारगाडी, जहाज, विमान यांच्या एंजिनातील भुजादंड अथवा इतर यंत्रसामग्रीचा दंड यांसारख्या फिरणाऱ्या दंडाच्या (अथवा चाकाच्या) परिभ्रमी वेग वा गती दर्शविणाऱ्या उपकरणाला फेरेगणक म्हणतात. या वेगाचे तत्क्षणिक मूल्य दंडाच्या दर मिनिटाला होणाऱ्या फेऱ्यांच्या संख्येने दर्शविले जाते. बहुतेक फेरेगणकांत ही संख्या तबकडीवर फिरणाऱ्या काटयाद्वारे थेट दर्शविली जाते. फेरेगणक मुख्यतः यांत्रिक, विद्युतीय, इलेक्ट्रॉनीय या प्रकारचे असतात.
फिरणाऱ्या द्रव्यमानावर कार्य करणारी केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर लोटणारी) प्रेरणा परिभ्रमणाच्या गतीवर अवलंबून असते आणि तिचा स्प्रिंग ताणण्यासाठी अथवा दाबण्यासाठी उपयोग करता येतो, या तत्त्वाचा उपयोग यांत्रिक फेरेगणकात (व पर्यायाने वेगमापकात) करुन घेतलेला असतो. अशा फेरेगणकात दंडाला (तर्कूला) जोडलेली वजने केंद्रोत्सारी प्रेरणेने स्प्रिंगेच्या ताणाच्या (क्रियेच्या) विरुध्द बाहेरच्या दिशेत खेचली जातात आणि दंतपट्टी व जोडचक्र (लहान दंतचक्र) यांच्याद्वारे दर्शक काटा अंशांकित तबकडीवर फिरविला जातो. दंडावरील रबरी टोपीने फेरेगणक यंत्र-दंडाला जोडता येते. (आ. ३).
जेव्हा फेरेगणक फिरणाऱ्या दंडापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा कंपनपट्टिकांचा (किंवा अनुस्पंदन) फेरेगणक वापरतात. यामध्ये यंत्राच्या वा एंजिनाच्या कंपनांची कंप्रता (दर सेंकदास होणाऱ्या कंपनांची संख्या) दर्शवून त्याचा वेग दर्शविला जातो. यातील धातूच्या पट्टिका कंगव्यातील दातांप्रमाणे व भिन्न लांबीच्या असतात. यंत्राच्या सर्वसाधारण कार्यकारी पल्ल्यामधील कंप्रतेला कंप पावले अशा रीतीने प्रत्येक पट्टी क्रमागत रीत्या मेलित केलेली असते. अशा रीतीने यंत्राच्या परिभ्रमी गतीशी अनुस्पंदित अशा पट्टीच्या दृश्य कंपनाने यंत्राची परिभ्रमी गती दर्शविली जाते. मध्यम उच्च गतीच्या यंत्रांसाठी असा फेरेगणक वापरतात. उदा., वाफ टरबाइने व वाफ एंजिने यांत हा वापरतात. दंडापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या फेरेगणकाच्या इतर काही प्रकारांत (विशेषतः विद्युतीय प्रकारांत) फेरेगणक चालविण्यासाठी पट्टाचालन किंवा दंतचक्रे वापरतात.
विद्युतीय फेरेगणकाचे अनेक प्रकार आहेत. पैकी ओढ वा चुंबकीय प्रकारचे फेरेगणक मोटारगाडीतील वेगमापकांत मोठया प्रमाणात वापरले जातात. एंजिनाच्या भुजादंडाबरोबर फिरणाऱ्या एका चिरचुंबकामुळे आवर्त प्रवाह निर्माण होतात व ते दंडाच्या परिभ्रमी गतीच्या समप्रमाणात असतात. त्यांच्या मापनाद्वारे वेग ठरविता येतो. एका प्रकारात फिरणाऱ्या धात्राने (आर्मेचराने) निर्माण होणारा विद्युत् प्रवाह हा दर मिनिटाला होणाऱ्या फेऱ्यांच्या संख्येच्या रुपात तबकडीवर दर्शविला जातो. असे फेरेगणक हे तत्त्वतः व्होल्टमापक किंवा विद्युत् दाबमापक असून ते दंडाच्या गतीएवढ्या गतीने फिरणाऱ्या एका विद्युत् जनित्राचे (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रुपांतर करणाऱ्या साधनाचे) प्रदान दर्शवितात. विद्युत् जनित्र फेरेगणकात एकदिश (एकाच दिशेत वाहणारा) किंवा प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशांनी वाहणारा) विद्युत् प्रवाह निर्माण होऊन त्यावर त्यांचे कार्य चालते. विद्युतीय फेरेगणक सामान्यपणे विमानात वापरतात. यात एंजिनामार्फत फिरविले जाणारे विद्युत् जनित्र असून ते तारांनी एका व्होल्टमापकाला जोडलेले असते. हे व्होल्टमापक एंजिनाचे दर मिनिटाला होणारे फेरे दर्शविते.
आवृत्तिदर्शकात फिरणाऱ्या वस्तू अशा रीतीने प्रकाशित करतात की, त्या जणू स्थिर असल्यासारख्या भासतात. अशा आवृत्तिदर्शकाचा फेरेगणक म्हणून उपयोग होऊ शकतो. याच्या स्ट्रोबोटॅक या प्रकारात कंप्रता बदलता येणारा व इलेक्ट्रॉनीय रीतीने नियंत्रित होणारा प्रकाशस्रोत (दिवा) यंत्राच्या फिरणाऱ्या भागावर प्रकाश टाकतो. जेव्हा प्रकाशाची चमक यंत्राबरोबर समकालीकृत होते, तेव्हा यंत्र स्थिर असल्यासारखे वाटते. या वेळी अंशांकित तबकडीवर परिभ्रमण गती किंवा कंपानांची कंप्रता दर्शविली जाते.
फेरेगणकाच्या एका प्रकारात दंडाला जोडलेल्या चुंबकीय किंवा यांत्रिक उद्ग्राहकाने आवेगमालिका प्रेषित होते. हे आवेग विद्युतीय घडयाळ्यासारख्या कालमापक प्रयुक्तीने दर मिनिटाला होणाऱ्या दंडाच्या फेऱ्यांची संख्या सरळ पाहता येईल अशा रीतीने संकलित केले जातात. एका दुसऱ्या रचनेत तथाकथित ॲरागो तबकडी असते. चुंबकीय क्षेत्रात फिरताना या धातूच्या तबकडीमुळे परिपीडन निर्माण होते. या परिपीडनाला स्प्रिंगेच्या क्रियेने विरोध होतो. याचा उपयोग दंडाची गती तबकडीवर दर्शविण्यासाठी करुन घेतला जातो. अंकीय फेरेगणकात भुजादंडाच्या प्रत्येक फेऱ्याबरोबर निर्माण होणाऱ्या विद्युत् स्पंदांद्वारे दर मिनिटाला दंडाच्या होणाऱ्या फेऱ्यांची संख्या मोजली जाते. एक मापक दर मिनिटाला होणारे स्पंद मोजते व या स्पंदांची संख्या दर मिनिटाला होणाऱ्या फेऱ्यांच्या संख्येएवढी असते.
गतिमापक : वाहनाचा वेग दर्शविणाऱ्या या उपकरणात वेग ताशी किमी., ताशी मैल किंवा दोन्हींत दर्शविला जातो. याचे यांत्रिक वा चुंबकीय (ओढ), विद्युतीय, इलेक्ट्रॉनीय असे प्रकार आहेत. यांपैकी चुंबकीय प्रकार सर्वांत सामान्यपणे वापरला जातो. मोटारगाडयांची संख्या वाढू लागली तेव्हा १९०६ च्या सुमारास मोटारगाडयांत वेगमापक वापरात आले. चुंबकीय प्रकारच्या वेगमापकांचा पुढे मोठया प्रमाणात वापर होऊ लागला. मात्र असे असले, तरी बदलत्या तंत्रविद्येमुळे मोटारगाडयांतील क्वॉर्ट्झ अनुरुप (सदृश) वेगमापक व अंकीय सूक्ष्मप्रक्रियक वेगमापक यांची संख्या वाढत आहे.
चुंबकीय वेगमापकाचा दंड ज्या दंडाची परिभ्रमी गती मोजावयाची असेल त्या यंत्र-दंडाला लवचिक केबलने जोडतात. मोटारगाडीतील दंतचक्र-पेटीच्या प्रदान दंडाला [→ मोटारगाडी] वेगमापकाचा दंड लवचिक केबलने जोडलेला असतो. वाहन चालू झाल्यावर वेगमापकाच्या दंडावरील चिरचुंबकीय व पोलादी चषक यंत्र-दंडाच्या गतीने फिरत असतात. चिरचुंबक फिरण्यामुळे त्याभोवतीच्या ॲल्युमिनियम या वजनाला हलक्या व चुंबकीय नसलेल्या धातूच्या चषकात आवर्त विद्युत् प्रवाह निर्माण होतात. या प्रवाहांमुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र आणि चिरचुंबकाचे चुंबकीय क्षेत्र यांच्यातील परस्परक्रियेने ॲल्युमिनियम चषकावर परिपीडन (बल) म्हणजे ओढ निर्माण होते. हे परिपीडन वेगमापकाच्या दंडाच्या गतीवर अवलंबून असते. परिपीडनामुळे ॲल्युमिनियम चषक फिरु लागतो व स्प्रिंगेच्या निरुढी परिबलासमान (ताणाइतका) झाल्यावर स्थिर होतो. ॲल्युमिनियम चषकाला जोडलेला असल्याने दर्शक काटा अंशांकित तबकडीवर फिरुन यंत्र-दंडाचा परिभ्रमी वेग दर्शवितो. वाहनाच्या बाबतीत त्याने कापलेले रेषीय अंतर व वेगमापकाच्या दंडाचे फेरे यांच्यातील संबंध काढता येत असल्याने तबकडीवरील वेग ताशी किमी. सारख्या एककात चालकासमोरील फलकावर दर्शविला जातो. वेगमापक विशिष्ट वाहन प्रकारासाठी बनविलेला असतो. त्याचा अभिकल्प (आराखडा) तयार करताना वाहनाच्या टायरचे आकारमान व पश्च-अक्ष गुणोत्तर विचारात घेतात. ठराविक वाहनांत वेगमापकाच्या जोडीने एक प्रयुक्ती असते. यामुळे वाहन एखाद्या निवडक वेगाला ठेवता येते. वाहन थांबले की, स्प्रिंगमुळे दर्शककाटा शून्यावर येतो.
वाहन वापरावयास सुरुवात केल्यापासून चाललेले अंतर दर्शविण्याची व्यवस्था आक्रमित आंतरदर्शकाद्वारे करता येते. यात दंतचक्र गुणोत्तर १,०००:१ असलेल्या दंतचक्र मालिकेने एका दंडगोलाची दर किमी. ला (दर मैलाला) एक फेरी पूर्ण होते. या दंडगोलावर किमी. (किंवा मैल) याच्या एकदशांश भागांचे अंशांकन (खुणा) केलेले असते. सामान्यपणे सहा दंडगोलांची मालिका अशा रीतीने मांडलेली असते की, प्रत्येक दंडगोलावरील अंकांपैकी एक अंक चौकोनी खिडकीत दिसतो. हे दंडगोल अशा रीतीने जोडलेले असतात की, पहिल्याचे दहा फेरे झाले की दुसऱ्याचा एक फेरा होतो, दुसऱ्याचे दहा फेरे झाले की तिसऱ्याचा एक फेरा होतो व असेच पुढील दंडगोलांच्या बाबतीत घडते. अशा रीतीने खिडकीतील अंकांद्वारे वाहनाचा अचूक वेग कळतो. आ. ५ मध्ये धारित्र-विद्युत् वेगमापकाचे तत्त्व दाखविले आहे. वेगमापकाचा दंड आणि यंत्राचा दंड जुळणी करुन वेगमापक-दंड फिरविला जातो. यामधील परिवर्तनीय स्विच प्रत्येक फेऱ्यात दोनदा विद्युत् प्रवाहाची दिशा बदलतो. विद्युत् मंडलातील धारित्र [→ विद्युत् धारित्र] विद्युत् घटमालेमुळे पूर्ण विद्युत् दाबाला भारित होते. तसेच स्विचाचे परिवर्तन झाल्यावर पूर्णपणे विद्युत् विसर्जन होते. त्यामुळे विद्युत् मंडलात स्पंद निर्माण होतात. परिभ्रमी गती मोजण्याची मर्यादा धारित्राच्या काल स्थिरांकावर अवलंबून असते. स्पंदांची संख्या परिभ्रमी गतीच्या प्रमाणात असल्याने वेगमापकाच्या दर्शक तबकडीवर दर मिनिटाला होणाऱ्या फेऱ्यांची संख्या दर्शविली जाते. हा वेगमापक नियंत्रण प्रणालीत वापरल्यास विद्युत् संदेशात व्यत्यय निर्माण होतो. म्हणून परिभ्रमी गती कमी असल्यास या वेगमापकाचा नियंत्रणासाठी उपयोग होतो.
द्विकला प्रवर्तन विद्युत् चलित्राचा [विद्युत् ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रुपांतर करण्याचे काम विद्युत् चलित्र करते → विद्युत् चलित्र] उपयोग वेगमापक म्हणून करता येते. एका विद्युत् कलेला उपलब्ध प्रत्यावर्ती विद्युत् पुरवठा करतात. विद्युत् चलित्राचा दंड ज्या यंत्र-दंडाचा वेग मोजावयाचा असतो त्याला जोडतात. विद्युत् चलित्राचा दंड फिरु लागला की चलित्राच्या दुसऱ्या विद्युत् कलेत परिभ्रमी गतीच्या प्रमाणात विद्युत् दाब निर्माण होतो. ह्या प्रत्यावर्ती विद्युत् दाबाचा उपयोग दाबमापकाद्वारे गती दर्शविण्याकरिता तसेच विविध ⇨ नियंत्रण प्रणालींत वेगमापनाचा अचूक संदेश देण्यासाठी करतात. हा प्रदान संदेश अचूक असावा लागतो व वेगमापक ⇨विद्युत् गोंगाट (व्यत्यय आणणारा अनिष्ट विद्युत् दाब व प्रवाह) निवारणारा असावा लागतो. त्याचप्रमाणे वेगमापकाकडून निर्माण होणाऱ्या ध्वनी, चुंबकीय, विद्युत् आदी अवांछित संदेशांमुळे वेगमापनात तसेच नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊ नये म्हणून वेगमापकाची निर्मिती करताना वापरलेला कच्चा माल व निर्मिती प्रक्रिया काळजीपूर्वक निवडलेल्या असतात. या वेगमापकाचा उपयोग प्रवेग मोजण्यासाठीही होतो. प्रवेगमापक म्हणून वापरताना चलित्राच्या एका विद्युत् कलेला एकदिश विद्युत् पुरवठा जोडावा लागतो. विद्युत् चलित्राचा दंड फिरु लागल्यावर त्याच्या दुसऱ्या विद्युत् कलेमध्ये एकदिश विद्युत् दाब निर्माण होतो. परिभ्रमी गती एकसमान असेपर्यंत प्रदान विद्युत् दाबात फरक होत नाही परंतु प्रवेगामुळे परिभ्रमी गती बदलत असल्यास दुसऱ्या कलेतील प्रदान विद्युत् दाब बदलतो आणि त्याचे प्रमाण प्रवेगावर अवलंबून असते. विद्युत् दाबमापकाचा उपयोग करुन दर्शक तबकडीवर प्रवेग दर्शविणे शक्य असते. नियंत्रण प्रणालीमध्ये ⇨ सेवा-यंत्रणेचे स्थैर्य साधण्यासाठी अशा प्रवेगमापकाचा उपयोग करतात. [→ प्रवेगमापक].
एकदिश विद्युत् जनित्राचा वेगमापक म्हणून उपयोग करता येतो. त्यामध्ये एकदिश विद्युत् पुरवठा करुन किंवा चिरचुंबक वापरुन चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात. जनित्राचा प्रदान विद्युत् दाब परिभ्रमी गतीच्या प्रमाणात असल्याने विद्युत् दाबमापकाचा उपयोग करुन परिभ्रमी गती मोजता येते. नियंत्रण प्रणालीत अशा वेगमापकाकडून मिळणाऱ्या संदेशात विद्युत् गोंगाट असतात, परंतु उपकरणाची निर्मिती काळजीपूर्वक केल्यास विद्युत् गोंगाटांची तीव्रता कमी होऊ शकते. ⇨ इलेक्ट्रॉनीय विवर्धक वापरताना काही अडचणी येत असल्याने एकदिश वेगमापकाचा नियंत्रण प्रणालीमधील उपयोग कमी होत आहे. [→ विद्युत जनित्र].
इलेक्ट्रॉनीय वेगमापक उपकरणात वेग प्रेषित करणारी यंत्रणा, संदेश अनुकूलकारक (दिलेल्या प्रयुक्तीच्या दृष्टीने संदेशाची तऱ्हा वा स्वरुप जुळते अथवा सुबोध करण्याची प्रक्रिया करणारे साधन) आणि इलेक्ट्रॉनीय अंकीय किंवा सदृश दर्शक यंत्रणा (प्रदान माहिती सादर करणारी यंत्रणा) हे भाग असतात. वेग प्रेषित करणारी यंत्रणा ही वाहनाच्या प्रेषण यंत्रणेला जोडलेली असते. गेल्या काही दशकांतील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे, विशेषतः इलेक्ट्रॉनीय, संवेदकीय, सूक्ष्मप्रक्रियकीय व लेसर तंत्राज्ञानातील प्रगतीमुळे अनेक नवीन प्रकारचे वेगमापक उपलब्ध होऊ लागलेले आहेत. त्यांचा वापर करण्यासाठी वेग प्रेषित करणारी यंत्रणा वाहनाच्या प्रेषण यंत्रणेला जोडण्याचीही जरुरी राहिलेली नाही. फेरे अथवा अंतर मापन करणारे संवेदक व कालमापक यांचा उपयोग करुन, निश्चित केलेल्या कालखंडात मापन केलेला वेग विद्युतीय, प्रकाशकीय, चुंबकीय आदी संदेशांद्वारे इष्ट स्थळी पाठवून दृश्य स्वरुपात वेगमापकावर पाहता येतो (आलेखित करता येतो),तसेच तो संदेश ⇨ऊर्जापरिवर्तकाचा व विवर्धकाचा वापर करुन नियंत्रण प्रणालीतही वापरता येतो. संरक्षण क्षेत्रात विमानविरोधी, क्षेपणास्त्रविरोधी इ. यंत्रणेत अशा प्रणाली वापरल्या जातात. अशा प्रणालींचाच वापर करुन क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या चेंडूचा वेग क्षणार्धात दूरदर्शनवर दाखविला जातो.
चालमापक : माणसाने चाललेले अंतर मोजण्यासाठी चालमापक किंवा पदांतरमापक हे छोटे उपकरण वापरतात. घडयाळासारखे दिसणारे हे उपकरण खिशात ठेवतात अथवा कंबरेवरील पट्ट्यात अडकवितात. प्रत्येक पाऊल टाकतान शरीरात होणाऱ्या हालचालीला अथवा शरीराला जाणवणाऱ्या हिसक्याला उपकरण प्रतिसाद देते व एकेक पाऊल मोजून, एकूण टकलेल्या पावलांची संख्या मोजते. अशाच एका उपकरणात पावलांतील सरासरी अंतर काढणारी यंत्रणाही असते. सरासरी अंतर व टाकलेली पावले ह्यांचा गुणाकार चाललेले अंतर दाखवितो. उपकरणातील कालमापकाने मोजलेल्या कालाचा वापर करुन चालण्याचा सरासरी वेग उपकरण दाखविते. व्यायामाच्या आधुनिक उपकरणात एकाच जागेवर चलनपट्ट्याद्वारे चालण्याच्या व्यायामाची सोय उपलब्ध करुन देणाऱ्या साधनात विकसित मापनप्रणाली वापरुन व्यक्तिच्या चालण्याचा वेग नियंत्रित करता येतो. तसेच त्याला जोडलेल्या उपकरणांद्वारे अंतर, काल व वेग यांचेही मापन अंकात अथवा आलेखाच्या स्वरुपात दाखविले जाते.
पहा: गाडीभाडेमापक प्रवेगमापक मोटारगाडी.
संदर्भ : 1. Considine, D. M., (Ed.), Process/Industrial Instruments and Controls Handbook, New York, 1993.
2. Considine, D. M. Ross, S. D.,(Eds.), Handbook of Applied Instrumentation, New York, 1982.
3. Doebelin, Ernest O. Measurement Systems : Application and Design, London, 1966.
4. Toboldt, W. K. Automotive Encyclopedia, 1989.
सप्रे, गो. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..