वू छंग-अन : (सु. १५००–सु. १५८२). चीनमधील मिंग राजवंशाच्या कारकीर्दीत होऊन गेलेल्या लेखकांपैकी एक. त्याचा जन्म शन-यांग (किआंगसू प्रांत) येथे झाला. चीनमधील पारंपरिक पध्दतीचे शिक्षण त्याने घेतले. सुरूवातीपासूनच त्याला लोककथांचे मोठे आकर्षण होते. Hsi – yu chi (१५९२, इं. भा. मंकी, १९४२) ही त्याची कादंबरी लिहीत असताना लोककथांचा त्याने बराच आधार घेतला आहे. शंभर प्रकरणांच्या ह्या कादंबरीत एका बौध्द धर्मगुरूबरोबर भारतयात्रेला गेलेल्या एका चतुर माकडाची साहसे वर्णिली आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकात भारतात आलेल्या ⇨इत्सिंग ह्या चिनी प्रवाशाची भारतयात्रा वू छंग-अन याच्या डोळ्यांसमोर असावी. त्या काळी चीनमध्ये प्रतिष्ठित असलेल्या विशिष्ट वाङ्मयीन शैलीत ही कादंबरी लिहिलेली नसल्यामुळे ती अनामिकपणे प्रसिध्द करण्यात आली होती. वू छंग-अन याचे काही साहित्य चीनमधील शाही प्रासादांत सापदले. १९३० मध्ये ते प्रसिध्द करण्यात आले. मंकी हे उपर्युक्त भाषांतर मात्र Hsi – yu chi चे केवळ पूर्ण भाषांतर नसून त्या कादंबरीच्या काही भागाचा अनुवादच त्यात अंतर्भूत आहे. किआंगसू प्रांतातच त्याचे निधन झाले.