विज्ञानकथा : (सायन्स फिक्शन). विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य आधिष्ठान आहे, अशा साहित्यकृतींचा समावेश ‘सायन्स फिक्शन’ (लघुरूप-एस्एफ्) ह्या इंग्रजी संज्ञेने निर्दिष्ट केल्या जाणाऱ्या साहित्यात होतो. ‘सायन्स फिक्शन’ या संज्ञेचा मराठी पर्याय म्हणून ‘विज्ञानकथा’ ही संज्ञा रूढ झालेली आहे. या संज्ञेत ‘कथा’ हा शब्द असला, तरी ही संज्ञा केवळ ‘कथा’ ह्या साहित्यप्रकारापुरती मर्यादित नसून तिच्या कक्षेत कथेप्रमाणेच कादंबरी, नाटक इ. अन्य ललित साहित्यप्रकारांतील कृतीही अंतर्भूत आहेत. मात्र ‘विज्ञानकथा’ म्हणून झालेले लेखन पाहिले, तर त्यात मुख्यत्वे कथा कादंबऱ्याच आढळतात.

विज्ञानाला अधिष्ठांनी ठेवून जाणीवपूर्वक विज्ञानकथा लिहिली जाऊ लागली, ती विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात. १९२६ मध्ये ह्यूगो गर्न् झबॅक ह्या अमेरिकन संशोधकाने अमेझिंग स्टोरीज नावाचे एक मासिक काढून त्यात विज्ञानावर आधारलेल्या कथा प्रसिद्ध करावयास सुरूवात केली. विज्ञानकथेला त्याने ‘सांयटिफिक्शन’ असे नावही दिले. एक स्वतंत्र लेखनप्रकार म्हणून विज्ञानकथेला निश्चित स्थान देण्याचे बरेचसे श्रेय त्याला दिले जाते. गर्नझ् बॅकच्या नावाने दर वर्षी, उत्कृष्ट विज्ञानकथेसाठी ‘ह्यूगो अवॉर्ड’ दिले जाते. तथापि विज्ञानकथेशी पूर्वसूरीपणाचे नाते सांगणारे लेखन अमेझिंग स्टोरीजमधील कथा प्रसिद्ध होण्यापूर्वीही झालेले आहे. उदा., विख्यात फ्रेंच विचारवंत ⇨ व्हॉल्तेअर ह्याने निहिलेल्या ‘Micromegas’ (१९७२) ह्या कथेत सायरिअस नावाच्या एका ग्रहावरचा रहिवासी शनी ह्या ग्रहावरच्या एका रहिवाशाला सोबत घेऊन पृथ्वीला भेट देतो, असे दाखविले आहे. ह्या दोघांच्या ह्या भेटीच्या निमित्ताने विश्वामध्ये पृथ्वी आणि मानवजात ही किती नगण्य आहे, हे व्हॉल्तेअरने दाखविले आहे. एका ग्रहावरील रहिवाशाला दुसऱ्या ग्रहावर जाणे शक्य आहे, हे ह्या कथेत गृहीत धरलेले आहे आणि अवकाशप्रवासाची कल्पनाही येथे आलेली आहे. विख्यात स्वच्छंदतावादी कवी शेली ह्याची पत्नी मेरी शेली (१७९७-१८५१) हिने लिहिलेल्या ‘फ्रँकेन् स्टाइन’ (१८१८) या कथेत अचेतन द्रव्याला सजीव करण्याची कल्पना आधाराला घेतलेली आहे. फ्रँकेन् स्टाइन नावाचा वैज्ञानिक मानवी हाडे गोळा करून त्यांतून प्रचंड सामर्थ्य असलेला एक राक्षसी प्राणी निर्माण करतो, परंतु ह्या प्राण्याला पाहिल्याबरोबर इतरांच्या मनांत घृणा निर्माण होत असल्यामुळे त्या प्राण्याच्या वाट्याला दु:ख व एकाकीपण येते. त्यामुळे आपल्याला जन्माला घालणाऱ्या शास्त्रज्ञाचा तो तिरस्कार करू लागतो. त्या वैज्ञानिकाच्या भावाला आणि त्या भावाच्या वधूला तो ठार मारतो. वैज्ञानिक त्या प्राण्याला ठार मारण्यासाठी त्याचा पाठलाग अर्क्टिक प्रदेशापर्यंत करतो, परंतु अखेरीस तो ह्या प्राण्याकडूनच मारला जातो, अशी ही कथा. फ्रेंच लेखक ⇨ झ्यूल व्हेर्न  (१८२८–१९०५) ह्याच्या ‘द ॲडव्हेंचर्स ऑफ कॅप्टन हॅटेरस’ (१८६६, इं. शी.) मध्ये उत्तर ध्रुवावर जाण्याच्या मोहिमेचे वर्णन आहे. प्रत्यक्षात रॉबर्ट पेअरी हा संशोधक १९०९ साली पहिल्यांदा उत्तर ध्रुवावर पोहोचला. फ्रॉम द अर्थ टू द मून (१८६५, इं. भा. १८७३), ट्‌वेंटी थाउजंड लीग् ज अंडर द सी (१८७०, इं. भा. १८७३) अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज (१८७३, इ.भा. १८७३) ह्या त्यांच्या कांदबऱ्याही निर्देशनीय आहेत. पृथ्वीवरून चंद्रावर जाणे, ऐंशी दिवसांत पृथ्वीप्रदिक्षणा करणे ह्या गोष्टी त्या काळात दुर्घट वा अशक्य समजल्या जात होत्या.⇨एच्. जी. वेल्स (१८६६–१९४६) ह्याच्या द टाइम मशीन (१८९५) ह्या कादंबरीत ‘काळ’ हे चौथे परिमाण मानलेले आहे. येथे एक संशोधक कालयंत्राच्या आधारे दूरच्या भविष्यकाळात जाऊ शकतो. तो.इ.स. ८,०२,७०१ ह्या वर्षात जाऊन पोहचतो. ह्या काळात निसर्गावर विजय मिळविलेली आणि निसर्गाचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे आळशी, सुखासीन झालेली अशी माणसे एका बाजूला दिसतात आणि त्यांना मारून खाणारे भयंकर लोकही दिसतात. काही लक्ष वर्षे ओलांडून गेल्यावर त्याला पृथ्वीची गती थांबलेली दिसते, आणखी काही लक्ष वर्षे पुढे गेल्यावर त्याला पृथ्वीचा थंडगार झालेला गोळा आणि मरण पंथाला लागलेला सूर्य दिसतो. पृथ्वीचे आणि माणसाच्या भविष्यकाळाचे हे एक निराशाजनक चित्र आहे. त्याच्या द वॉर ऑफ द वर्ल्ड् स (१८९८) या कादंबरीमध्ये मंगळावरून येणारे काही आक्रमक इंग्लंड विशेषत: लंडन शहर–उद्ध्वस्त करतात असे दाखविले आहे. मंगळावर जीवसृष्टी आहे असा अभ्युपगम मांडला गेला होता, तसेच मंगळ हा सूर्यापासून दूर जात असून त्यामुळे तेथील वातावरण अधिकाधिक थंड होत चालले आहे, अशा उपपत्तीला ज्योतिर्विदांची मान्यता मिळत होती. अशी परिस्थिती मंगळावर असल्यास मंगळावरील लोक जरा उबदार वातावरण प्राप्त करून घेण्यासाठी पृथ्वीसारख्या ग्रहावर येऊ शकतात, अशा गृहीतावर वेल्सने ह्या कादंबरीची रचना केली. द फर्स्ट मेन इन टू मून (१९०१) ह्या त्याच्या कादंबरीत त्याचे चंद्रावरच्या दृश्यांचे वर्णन कल्पनाशक्तीच्या आधारे केलेले होते. पुढे माणूस चंद्रावर पोहोचला आणि चंद्रावरच्या दृश्यांची जी छायाचित्रे घेतली गेली, त्यांतून वेल्सच्या पूर्वकथनक्षमतेचा प्रत्यय आला. झ्यूल व्हेर्नच्या फ्रॉम द अर्थ टू द मून मधले अवकाशयानाचे व अवकाशप्रवासाचे वर्णन नंतर मानवाने केलेल्या पहिल्यावहिल्या चंद्रमोहिमेशी जुळणारे आहे.

विख्यात अमेरिकन साहित्यिक मार्क ट् वेन आणि नथॅन्यल हॉथॉर्न ह्यांनीही विज्ञानकथेचे पूर्वसूरी वाटेल असे कथालेखन केलेले आहे. (अनुक्रमे, ‘द मिस्टीरिअस स्ट्रेंजर’ आणि ‘रापाचीनीज डॉटर’).

विज्ञानकथेचे वेगळेपण दाखवून देण्याचा पहिला प्रयत्न करणाऱ्या गर्न् झबॅकने विज्ञानकथा कशी असली पाहिजे, ह्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले आहेत. विज्ञानाला अधिष्ठांनी ठेवून आपण आपले साहित्य निर्माण करीत आहोत असा आव आणून प्रत्यक्षात जे निव्वळ कल्पनारंजित साहित्यकृती निर्माण करतील त्यांच्या त्या साहित्याला विज्ञानकथा म्हणून मान्यता देण्याची चूक होऊ नये, ही खबरदारी घेण्याचा गर्न् झबॅकचा हेतू होता. त्याच्या मते विज्ञानकथेला वैज्ञानिक सत्यांचे अधिष्ठान तर हवेच, परंतु विज्ञानकथाकाराला कल्पनेच्या आधारे भविष्यकालाचा वेधही घेता आला पाहिजे, म्हणजेच भविष्यकालातील नव्या वैज्ञानिक शोधांचे सूचन करणारी पूर्वकथनक्षमताही विज्ञानकथा काराच्या ठायी असली पाहिजे. विज्ञानकथाकार ज्या भविष्यकालीन नव्या शोधांचे–आज काल्पनिक वाटणारे–चित्रण आपल्या लेखनातून करील, ते शोध भविष्यकाळात प्रत्यक्ष साकार होणे मुळीच अशक्य नाही, असेही गर्न  झबॅकने नमूद केले आहे. विज्ञानकथा ही वाचकाच्या मनाची पकड घेणारी तर असलीच पाहिजे, परंतु ती बोधप्रदही असली पाहिजे, विज्ञानकथा रोचक स्वरूपात ज्ञान देत असते, असेही गर्न् झबॅकचे प्रतिपादन होते. विज्ञानकथेचे स्वरूप नष्ट करीत असताना आपल्यासमोर झ्यूल व्हेर्न, एच्.जी. वेल्स अशा काही साहित्यिकांचे लेखन होते, असे गर्न् झबॅकने नमूद केले आहे.

गर्न्झबॅकनंतर अमेरिकन विज्ञानकथाकार जॉन कँबेल (१९१०-७१) ह्याने विज्ञानकथेसंबंधीची आपली भूमिका मांडली त्याच्या मते विज्ञानकथा हे प्रत्यक्ष विज्ञानाशीच निकटचे नाते असलेले एक माध्यम होय. विज्ञानाच्या पद्धतीनुसार प्रस्थापित झालेली वैज्ञानिक प्रणाली ज्ञात घटनांचे स्पष्टीकरण तर देतेच, परंतु काही नव्या, असंशोधित अशा घटनांचे पूर्वसूचनही करते. विज्ञानकथेने विज्ञानाच्या नव्या आविष्कारांची सुबोध, प्रसादिक भाषेत उकल करीत असतानाच त्या आविष्कारांचे यंत्रसृष्टीवर आणि मानवी समाजावर होणारे संभाव्य परिणाम काय असू शकतील ह्यांचे दर्शन घडविले पाहिजे. विज्ञानकथेसाठी आज जी ‘सायन्स फिक्शन’ ही संज्ञा वापरतात, ती कँबेलनेच रूढ केली . कँबेल हा स्वत: एक विज्ञानकथाकार होता आणि संगणकाचे चित्रण करणाऱ्या अगदी आरंभीच्या कथांमध्ये त्याच्या ‘व्हेन द ॲटम्स फेल्ड’ (१९३०) ह्या कथेचा अंतर्भाव होतो. १९३७ साली त्याने अस्टाउंडिंग स्टोरीज ह्या १९३० साली निघालेल्या मासिकाच्या संपादनास आरंभ केला (ह्या मासिकाचे नाव पुढे अस्टाउंडिंग सायन्स फिक्शन आणि त्यानंतर अनॅलॉग सायन्स फॅक्ट अँड फिक्शन असे ठेवण्यात आले). कँबेलच्या प्रयत्नांमुळे ज्या विज्ञानकथाकारांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला, त्यांत आयझॅक असिमॉह, थीओडोर स्टर्जन, रॉबर्ट हाइनलाइन, ए.ई. व्हान  व्हॉग्ट, क्लीव्ह कार्टमिल, आर्थर.सी क्लार्क अशा काही लेखकांचा समावेश होता. क्लीव्ह कार्टमिल ह्याने लिहिलेली ‘डेडलाइन’ नावाची कथा कँबेलच्या मासिकातून प्रसिद्ध झाली होती. अणुबाँब हा तिचा विषय होता. ‘मॅनहॅटन प्रॉजेक्ट’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अणुबाँब-प्रकल्पाची काही माहिती ह्या लेखकास आहे काय, अशी पृच्छा एफ् बीआय् कडून त्यावेळी कँबेल आणि कार्टमिल ह्यांच्याकडे करण्यात आली होती. वस्तुत: ह्या कथेत अणुबाँबचे केवळ पूर्वसूचन होते. उपग्रहांमार्फत होणारे जगभरचे दळणवळण,  अंतराळसंचार करण्यासाठी तसेच तेथे वस्ती करण्यासाठी योग्य अशा अवकाशयानांची सविस्तर वर्णने आर्थर सी. क्लार्क ह्यांच्या विज्ञानकथात आढळतात. 


 विज्ञानकथेच्या प्रभावातून ऑल्ड्स हक्सली, सी. एस. लेविस आणि कुर्ट व्हॉनेगुट ह्यांच्यासारख्या साहित्यिकांनीही विज्ञानकथा लिहिल्या व त्यामुळे विज्ञानकथेला एक वेगळी प्रतिष्ठाही प्राप्त झाली.

गर्न् झबॅक आणि कँबेल ह्यांनी विज्ञानकथेच्या स्वरूपाबद्दल जे विचार व्यक्त केले, त्यात हा लेखनप्रकार आशय, घाट आणि आवाका ह्या तिन्ही संदर्भात समकालीन लेखनप्रकारांहून अधिक गतिमान व्हावा, अशीच अपेक्षा अनुस्यूत होती. अनेक विज्ञानकथाकारांनी ह्या अपेक्षेला पोषक असे लेखन केले. परंतु विज्ञानकथेच्या गर्न् झबँक–कँबेल–प्रणीत संकल्पनेच्या चौकटीपलीकडे जाऊन स्वातंत्र्य घेण्याची, विज्ञानकथेत नवीन प्रयोग करण्याची, नव्या वाटा चोखाळण्याची प्रवृत्तीही वाढीला लागली. असे झाल्यामुळे विज्ञानकथेत साचेबंदपणा न येता ती अधिक समृद्ध आणि समावेशक झाली हे खरे असले, तरी काहींनी ही मूळ संकल्पना खूपच ताणल्याचे दिसून येते. थीओडोर स्टर्जन ह्याने मांडलेले विज्ञानकथेविषयीचे विचार ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. त्याच्या मते विज्ञानकथा ही मानवी जीवचे व समस्या ह्यांच्याभोवती गुंफलेली असते. विज्ञानकथेत मांडलेली मानवी समस्या सोडविण्यासाठी मानवी मार्गच पत्कारलेला असतो, परंतु त्या विज्ञानकथेत विज्ञानाचा घटक इतका आवश्यक आणि अपरिहार्य असला पाहिजे, की तो नसता तर संबंधित समस्या सुटूच शकली नसती, किंवा निर्माणच झाली नसती असे दिसले पाहिजे. कल्पनाशक्ती आणि भावनात्मकता ह्यांच्याशी तर्कनिष्ठ विज्ञानाचा सांधा जोडून हे दोन्ही घटक विज्ञानकथेत एकात्म करण्याचा मार्ग स्टर्जनने खुला केला. परंतु त्या मार्गाने जाणाऱ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला विज्ञानाचा लगाम घालण्याचे भान अनेकदा ठेवले नाही. त्यामुळे विज्ञानकथेविषयी जी एक नवी धारणा निर्माण झाली ती अशी : विज्ञानकथा हा कथनात्मक लेखनाचा एक गद्य प्रकार असून, तीत आपल्याला ज्ञात असलेल्या जगात उद्‌भवण्याची शक्यता नसलेली, परंतु विज्ञान/तंत्रज्ञानाच्या एखाद्या नव्या आविष्काराच्या आधारे गृहीतकाप्रमाणे स्वीकारता येण्याजोगी परिस्थिती मांडलेली असते. इतकेच नव्हे, तर अशा गृहीतकासाठी व्याज (स्यूडो)–विज्ञानाचा वा व्याज–तंत्रज्ञानाचा आधारही घ्यावयास हरकत नाही. असा आधार मानवी किंवा अतिपार्थिवही (एक्स्ट्रा-टेरेस्ट्रिअल) असू शकेल. परिणामतः विज्ञानकथेतील आशयात व्याज–विज्ञान व व्याज–तंत्रज्ञान ह्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. प्रस्थापित विज्ञानाशी असलेली त्याची नाळ तुटण्याइतपत ताणली गेली. पश्चिमी  जगातील इंग्रजी विज्ञानकथांत ही प्रवृत्ती ठळकपणे दिसून येते. इंग्रजी  विज्ञानकथांचा आदर्श समोर ठेवणाऱ्या भारतीय विज्ञानकथाकारांतही ही प्रवृत्ती दिसते.

दुसऱ्या महायुद्धात विज्ञानाची विनाशक शक्ती जगाला दिसली. हिरोशिमा व नागासाकी ह्या शाहारांवर अणुबाँब टाकले गेले आणि प्रचंड मानवसंहार घडवून आणण्यात आला. मानवी समाज आणि मानवी मूल्ये ह्यांच्यावर विज्ञान किती भयंकर आघात करू शकते, ह्याची अनेकांना जाणीव झाली. परिणामतः मानवी सहानुभूतीचे क्षेत्र विस्तारले. राष्ट्र,वंशादी सीमांच्या पलीकडे ते गेले. ह्याचा परिणाम विज्ञानकथेवरही अपरिहार्यपणे झाला. विज्ञानकथेत सामाजिक समस्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचा एकंदर मानवी समाजावर काय परिणाम होऊ शकेल, ह्याचा विचार विज्ञानकथेत होऊ लागला. त्यामुळे विज्ञानकथा आणि सामाजिक वास्तव ह्यांत एक जिव्हाळ्याचे नाते उत्पन्न झाले आणि ह्यातून विज्ञानकथेचा वाचकवर्गही वाढला.

प्रसिद्ध मराठी विज्ञानकथाकार आणि विज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. बाळ फोंडके यांनी विज्ञानकथेच्या आजवरच्या वाटचालीचे चार टप्पे दर्शविले आहेत. ते असे : पहिल्या टप्प्यातील विज्ञानकथा ही साहसावर भर देणारी आणि अनेकदा परीकथेचे रूप धारण करणारी. मेरी शेलीची ‘फ्रँकेन् स्टाइन’ ही कथा ह्या टप्प्यातली. तिच्यात साहसाचा अंतःप्रवाह स्पष्ट दिसतो. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या दशकापर्यंत साहसाधिष्ठित विज्ञानकथा लिहिल्या जात होत्या. त्यानंतरच्या टप्प्यावरील विज्ञानकथेवर गर्न् झबॅक–कँबेल ह्यांच्या विज्ञानकथांविषयीच्या धारणांचा प्रभाव होता. प्रस्थापित विज्ञान आणि काल्पनिकता ह्यांचा तोल साधण्यासाठी विज्ञानकथाकारांना ह्या काळात तारेवरची कसरत करावी लागत होती. विज्ञानकथेचा तिसरा टप्पा दुसऱ्या महायुद्धानंतरचा. ह्या टप्प्यावरील विज्ञानकथा प्रस्तापित विज्ञानाशी नाते संभाळून असली, तरी ती भविष्याचा वेध घेताना सामाजिक प्रश्नांबद्दल विशेष आस्था बाळगू लागली. वैज्ञानिक-तांत्रिक विकासाचे एकंदर मानवी समाजावर होणारे परिणाम ती चित्रित करू लागली. ह्यानंतरच्या चौथ्या टप्प्यातली विज्ञानकथा आशयापेक्षा घाट आणि शैली ह्यांना अधिक महत्त्व देऊ लागली आहे, असे डॉ. फोंडके यांचे मत आहे.

विज्ञानकथा ही एक ललित साहित्यकृतीच असते. त्यामुळे तिला विज्ञानाचे अधिष्ठान असलेच पाहिजे हे मान्य केल्यानंतर, तिचे मूल्यमापन करताना कथा–कादंबरी–नाटक यांसारख्या साहित्यकृतींच्या मूल्यमापनासाठी समीक्षेचे जे निकष वापरले जातात, तेच इथेही लावले पाहिजेत असेही होऊ शकेल, की विज्ञानाचे आवश्यक आधिष्ठान दुबळे अपुरे असल्यामुळे एखादी साहित्यकृती विज्ञानकथा म्हणून दर्जेदार ठरणार नाही, पण एक साहित्यकृती म्हणून श्रेष्ठ ठरेल. ह्याच्या उलटही घडू शकेल. एखाद्या साहित्यकृतीतील विज्ञानाचा घटक अस्सल असूनही एक साहित्यकृती म्हणून ती कनिष्ठ दर्जाची ठरू शकेल.

विज्ञानकथा ही रंजनात्मक असावी की उद्‍बोधक ? तिच्यात शास्त्रीय विवेयनाचा भाग किती असावा ? असे काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. विज्ञानकथा ही एक साहित्यकृतीच असल्यामुळे विविध विज्ञानकथाकारांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोणांचा प्रभाव त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांवर होऊ शकतो. त्यामुळे विज्ञानकथा ह्या रंजनात्मक, उद्‍बोधक किंवा रंजन-उद्‍बोधनापलीकडे जाणाऱ्याही असू शकतात. मात्र वैज्ञानिक विषयांचे विवेचन करणे हा तिचा हेतू मानल्यास तिच्या साहित्यिक स्वरूपाला बाधा येऊ शकते.

अस्सल विज्ञानकथा आणि विज्ञानकथेचा आभास निर्माण करणारे लेखन ह्यांत फरक केला पाहिजे. असेही मत व्यक्त केले जाते. उदा., एखाद्या वैज्ञानिक सिद्धांताचे ललित साहित्याच्या अंगाने विवेचन करण्याचा अथवा एखादा शोध कसा लावण्यात आला ह्यासंबंधीची ऐतिहासिक माहिती कथा-कादंबरीच्या वा नाटकाच्या माध्यमातून सांगण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्या लेखकाची ती साहित्यकृती विज्ञानकथेत समाविष्ट करता येणार नाही, असे डॉ. बाळ फोंडके ह्यांच्यासारख्या विज्ञानकथाकारांना वाटते.


 वैज्ञानिक शोध आणि त्यांचे तंत्रज्ञानात झालेले रूपांतर मानवसमाजास कोणीकडे खेचीत आहे, ह्याची जाणीव सामान्य माणसात निर्माण करण्याची जबाबदारी मूलत: वैज्ञानिकांवर आहे वैज्ञानिक दृष्टिकोण हा वैज्ञानिक संशोधानाच्या मुळाशी असला, तरी तो जीवनात इतरत्रही लागू पडत असल्यामुळे तो जनसामान्यांपर्यंत पोचविणे हे वैज्ञानिकांचे काम आहे ह्यासाठी विज्ञानकथेचा बराच उपयोग होऊ शकतो, असे मराठीत विज्ञानकथा/कादंबरीलेखनास प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे विज्ञानकथाकार डॉ. जयंत नारळीकर ह्यांचे मत आहे. तसेच विज्ञानकथा ही निव्वळ भयकथा असू नये भयकथेत मांडलेले विज्ञानाचे अधोरी स्वरूप विज्ञानिक दृष्टिकोण जनसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्दिष्टाला बाधक ठरते, असेही डॉ. नारळीकर ह्यांना वाटते. यक्षाची देणगी (१९८४) ह्या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाच्या प्रास्ताविकात त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे.

सुमारे १९३० नंतर विज्ञानकथेबद्दलचे आकर्षण पश्चिमी जगात वाढत चालले. विज्ञानकथेला वाहिलेली नियतकालिके निघू लागली. मॅगझिन ऑफ फँटसी अँड सायन्स फिक्शन (१९४९) आणि गॅलॅक्सी सायन्स फिक्शन (१९५०) ही दोन विशेष उल्लेखनीय नियतकालिके. परिषदा, परिसंवाद ह्यांतून विज्ञानकथेवर चर्चा होऊ लागल्या. दर वर्षी भरणाऱ्या ‘द वर्ल्ड सायन्स फिक्शन कन्व्हेन्शन’ मध्ये उत्कृष्ट विज्ञानकथेसाठी ‘ह्यूगो’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘द सायन्स फिक्शन रायटर्स ऑफ अमेरिका’ ह्या संघटनेतर्फे ‘नेव्यूला’ पुरस्कार देण्यात येतो. ही संघटना विज्ञानकथांचे संग्रह प्रकाशित करते.

ग्रॉफ कॉक्लिन ह्याने संपादिलेल्या द बेस्ट ऑफ सायन्स फिक्शन (१९४६) आणि रेमंड हीली व जे. फ्रॅन्सिस मॅक्कोमस ह्यांनी संपादिलेल्या ॲडव्हेंचर्स इन टाइम अँड स्पेस (१९४६) ह्या दोन विज्ञानकथासंग्रहांना मोठा वाचकवर्ग लाभला. १९५० पर्यंत असे अनेक विज्ञानकथासंग्रह निघाले.

इंग्रजीतील विज्ञानकथाकारांच्या पहिल्या पिढीतील (गर्न् झबॅक-कँबेल युगातील) महत्त्वाच्या लेखकांमध्ये रॉबर्ट ॲन्सन हाइनलाइन (१९०७-१९८८), हेन्री क्यूटनर (१९१४-१९५८), आर्थर सी. क्लार्क (१९१७-        ) आणि आयझॅक आसिमॉव्ह  (१९२०-१९९२) ह्यांचा समावेश होतो. हाइनलाइन हा अमेरिकन. ‘लाइफलाइन’ ही त्याची पहिली कथा अस्टाउंडिग सायन्स फिक्शन ह्या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्याने बऱ्याच कथा कादंबऱ्या लिहिल्या. वैज्ञानिक–तांत्रिक प्रगतीचे सामाजिक आणि मानसिक परिणाम हा त्याच्या विज्ञानकथांचा प्रमुख विषय. द ग्रीन हिल्स ऑफ अर्थ (१९५१), डबल स्टार (१९५६), द डोअर इंटू समर (१९५७), सिटिझन ऑफ द गॅलॅक्सी (१९५७) ही त्याची काही उल्लेखनीय पुस्तके. स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंज लँड (१९६१) ह्या त्याच्या कादंबरीने त्याला फार मोठी कीर्ती प्राप्त करून दिली. मंगळावर वाढालेला एक माणूस भविष्यकालीन पृथ्वीवर मंगळावरची  संस्कृती आणतो, असे ह्या कादंबरीत दाखविले आहे. धर्म, नैतिकता, लैंगिकता, ह्या विषयांवरील वादग्रस्त कल्पना ह्या कादंबरीत आलेल्या आहेत. हेन्री क्यूटनर आणि त्याची पत्नी कॅथरिन मूर ह्यांनी तंत्रविज्ञानाधिष्ठित जीवनाच्या ताणाखाली राहणाऱ्या माणसांचे प्रभावी चित्रण आपल्या कथा– कादंबरिकांमधून केले. रोबोज हॅव नो टेल्स, नो बाउंडरीज, फ्यूरी ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके. आर्थर सी. क्लार्क ह्या ब्रिटिश विज्ञानकथाकाराला २००१ : ए स्पेस ओडिसी (१९६८) ह्या चित्रपटाकरिता त्याने (दिग्दर्शक स्टॅन् ली क्यूब्रिक ह्याच्या सहकार्याने) लिहिलेल्या पटकथेमुळे फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. उपग्रहावरून दूदरदर्शन प्रक्षेपणाची कल्पना क्लार्क ह्याने अनेक वर्षापूर्वी आपल्या लेखनातून मांडली होती. हा उपग्रह पृथ्वीच्या विशिष्ट भागावर तरंगत राहील अशा तऱ्हेने सोडण्याची कल्पना त्यात होती. ती आज प्रत्यक्ष साकार झालेली दिसते. आपल्या विज्ञानकथांतील वैज्ञानिक तपशील अचूकपणे देण्याकडे क्लार्कचा कटाक्ष दिसतो. आयलंड्स इन द स्काय (१९५२), अर्थलाइट (१९५५), द सिटी अँड द स्टार्स (१९५६), द फाउंटन्स फॉर पॅरडाइस (१९७९), २०१०–ओडिसी टू (१९८२) ह्या त्याच्या काही विज्ञानकथा होत. रशियात जन्मलेल्या आणि वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अमेरिकेत वास्तव्य असलेल्या आयझॅक असिमॉव्ह  ह्याची  पेबल इन द स्काय ही पहिली कांदबरी १९५० मध्ये प्रसिद्ध झाली. असिमॉव्हच्या अनेक कथा-कादंबऱ्यांतून रोबो-म्हणजे यंत्रमानव–येतात. रोबोंच्या संदर्भातल्या संकल्पना त्याने आपल्या विज्ञानकथांतून मांडल्या. उदा रोबोची वागणूक कशी असावी हे निर्धारित करणारे तीन नियम त्याने प्रथम उद् घृत केले. रोबोंविषयक कथालेखन करणाऱ्या जवळजवळ सर्वच लेखकांनी ते प्रमाणभूत मानले आहेत. आय्, रोबो (१९५०), द केव्ह् ज ऑफ स्टील (१९५४), द नेकिड सन (१९५६) आणि द रेस्ट ऑफ द रोबोज (१९६४) हे असिमॉव्हच्या रोबो-कथांचे निर्देशनीय संग्रह. फाउंडेशन (१९५१), फाउंडेशन अँड एपायर (१९५२), सेकंड फाउंडेशन (१९५३), फाउंडेशन्स एज (१९८२), फाउंडेशन अँड अर्थ (१९८६) आणि प्रेल्यूड टू फाउंडेशन (१९८८) ह्या कादंबरीमालिकेत त्याने भविष्यकालीन विश्वातील साम्राज्याचे चित्रण केलेले आहे. ह्या कांदबरीमालिकेतले तीन भाग प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला १९६६ साली ‘ह्यूगो सायन्स फिक्शन अवॉर्ड’ देण्यात आले. द गॉड्स देमसेल्व्ह् ज (१९७२) ह्या त्याच्या पुस्तकाला ह्यूगो पुरस्कार आणि नेव्यूला पुरस्कार असे दोन सन्मान प्राप्त झाले.

 फ्रेडरिक पोल (१९१९-   ), डेमन नाइट (१९२२-    ), पाऊल अँडरसन (१९२६-    ), आणि रॉबर्ट  शेल्की (१९३०-   ), हे १९५० ते १९६० च्या दरम्यान ख्याती पावलेले काही विज्ञानकथाकार होत.

अमेरिकन विज्ञानकथाकार फ्रेडरिक पोल ह्याने सी. एम्. कॉर्न् व्यूथच्या साहाय्याने लिहिलेल्या द स्पेस मर्चंट्स (१९५३) ह्या साहित्यकृतीत  भविष्यकालीन जाहिरात-व्यवसायावर उपरोधप्रचुर भाष्य केले आहे. आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी सरकार विज्ञानाचा आणि जाहिरात-व्यवसायिकांचा कसा उपयोग करून घेते, हे त्यांनी प्रभावीपणे दाखविले आहे. विज्ञानकथा हीसुद्धा एक साहित्यकृतीच असून साहित्यसमीक्षेचे आणि मूल्यमापनाचे निकष तिलाही लागू होतात, हे सांगणारा डेमन नाइट (अमेरिकन) हा पहिला विज्ञानकथाकार होय. एक परिपक्व लेखनप्रकार म्हणून विज्ञान कथेचा विकास कसा होत गेला, ह्याचे दर्शन त्याच्या इन सर्च ऑफ वंडर ह्या समीक्षापर ग्रंथातील लेखांतून घडते. इन डीप, ऑफ–सेंटर , फार आउट हे त्याचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ. ए फॉर एनिथिंग ही त्याची कादंबरी निर्देशनीय आहे. पाउल अँडरसन (अमेरिकन) ह्याच्या विज्ञानकथांत अवकाश-संशोधन आणि दूरस्थ तारामंडलातील जीवसृष्टीची शक्यता हे विषय परिणामकारकपणे हाताळलेले आहेत. वी हॅव फेड फेड अवर सीज, द मॅन हू काउंट्स आणि ताऊ झीरो ही त्याची काही विज्ञानकथात्मक पुस्तके. रॉबर्ट शेल्की (अमेरिकन) ह्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याने आपल्या विज्ञानकथांमधून  विनोदाचा उपयोग प्रभावीपणे करून घेतलेला आहे.


 ज्या अन्य उल्लेखनीय साहित्यिकांनी ह्या दशकात (१९५०-६०) विज्ञानकथेत महत्त्वाची भर घातली, ते असे : फिलिप क्लास (‘विल्यमटेन’ ह्या नावाने लेखन), ए.जे. वड्रीस फिलिप डिक, ॲल्फ्रेड वेस्टर, रे ब्रेडबरी (सर्व अमेरिकन). रे ब्रेडबरी (१९२०-    ) ह्याच्या विज्ञानकाथांत विज्ञान आणि अद् भूतिका (फँटसी) ह्यांचे काव्यात्म मिश्रण आढळते. माणसाचे विसाव्या शतकातले जीवन ही एक प्रत्यक्ष घडलेली विज्ञानकथाच आहे, असे रे ब्रेडबरीला वाटते. शंभर वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांना आपले आजचे जीवन म्हणजे एक विज्ञानकथा वाटली असती, असे त्याने म्हटले आहे. मार्शन क्रॉनिकल्स (१९५०) हा त्याचा विख्यात कथासंग्रह. फारेनहाइट ४५१ (१९५३) या कादंबरीमध्ये त्याने एक भविष्यकालीन समाज चित्रित केला असून, तेथे वाचनास बंदी असल्याचे दाखविले आहे. ह्या समाजात पुस्तके जाळून टाकली जातात. ब्रँडबरीच्या विज्ञानकथालेखनातून विज्ञानाच्या सर्जनशीलतेबद्दलची जाणीव दिसून येत असली, तरी विज्ञान/तंत्रज्ञानाबद्दल त्याची दृष्टी टीकेची आहे. वैज्ञानिक/तांत्रिक दृष्ट्या प्रगत झालेल्या संस्कृतीत समाज आणि व्यक्ती ह्यांच्यात निर्माण होणारा संघर्ष, तणाव हा ब्रँडबरीच्या लेखनात पुन्हा पुन्हा येणारा विषय आहे.⇨फ्रेड हॉईल (१९१५-) ह्याच्या द ब्लॅक क्लाउड (१९५७) ह्या पहिल्या विज्ञान-कादंबरीत अंतराळातील ताऱ्यांच्या दरम्यानच्या विस्तीर्ण प्रदेशात जिवंत कृष्णमेघ असल्याची कल्पना होती. गेल्या काही वर्षात अशा प्रदेशात जीवनाचे मूलघटक समजले जाणारे रासायनिक रेणू सापडत आहेत.

१९६० च्या दशकात स्तानिस्लाव्ह लेन (पोलिश,१९२१- ), जेम्स जी. बॅलर्ड (ब्रिट्रिश, १९२३- ) ब्रायन ॲल्डिस (ब्रिटिश,१९२५- ), रॉबर्ट सिल्व्हरवर्ग (१९३५- ) ह्या विज्ञानकथाकारांनी  विज्ञानकथेला  उल्लेखनीय योगदान दिले.

स्तानिस्लाव्ह लेन ह्याच्या कथांतून रोबो, विचार करणारी यंत्रे, कृत्रिम मानव इ. येतात. ह्या कथांचा सूर तात्त्विकतेचा असून मनुष्याच्या स्वभावातील सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचे दर्शन त्यांतून घडते. टेल्स ऑफ पिकर्स द पायलट हा कथासंग्रह आणि द फिलॉसफी ऑफ ॲक्सिडेंट ही कादंबरी ही त्याची काही प्रसिद्ध पुस्तके. जेम्स जी.बॅलर्डच्या कादंबऱ्यांतून विज्ञान आणि समकालीन राजकारण ह्यांचा मेळ घालण्यात आलेला दिसतो. द क्रिस्टल वर्ल्ड, यू आणि कोमा ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. द डार्क लाइट यीअर्स, यू कॅन रिप्लेस अ मॅन? आणि वेअरफूट इन द हेड ह्या ब्रायन ॲल्डिसच्या काही कादंबऱ्या. रॉबर्ट सिल्व्हरवर्ग ह्याच्या द बुक ऑफ स्केल्स, डाईंग इनसाइट द सेंकड ट्रिप ह्या कादंबऱ्याही उल्लेखनीय आहेत. वाङ् मयीन शैली आणि तंत्र ह्यांकडे सिल्व्हरबर्गने विशेष लक्ष पुरवलेले दिसते.

मराठी विज्ञानकथा : स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः १९५० च्या दशकात, भा.रा. भागवत ह्यांनी यूरोपीय विज्ञानकथांच्या केलेल्या दर्जेदार रूपांतरांमुळे मराठीतील विज्ञानकथेला चालना मिळाली. झ्युल व्हेर्नच्या फ्रॉम द अर्थ टू द मून (चंद्रावर स्वारी, १९७२),अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज (झपाटलेला प्रवाशी, १९६३), ट्‌वेंटीथाउजंट लीग्ज अंडर द सी (समुद्र सैतान,२ भाग, १९५७,१९५८), तसेच एच्. जी. वेल्स ह्याच्या द इनिव्हिजिबल मॅन (अदृश्य माणूस,१९७२), ह्यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी रूपांतरांसाठी निवडल्या. भागवतांच्या अशा काही रुपांतरित कादंबऱ्या बालमित्र ह्या लहान मुलांच्या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध झाल्या. भागवतांनी काही विज्ञानकथाही लिहिल्या. उडती छबकडी (१९६६) ह्या कथासंग्रहात त्या अंतर्भूत आहेत. भागवतांचे हे लेखन बालांप्रमाणेच प्रौढांनाही आकर्षित करणारे होते. तथापि त्यातील बरेचसे लहान मुलांच्या मासिकातून प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांच्या विज्ञानकथा हे ‘बालसाहित्य’ असल्याचा समज दृढ झाला. ह्यामुळे भा.रा.भागवतांप्रमाणे नारायण धारप, द. पां खांबेटे, दि.वा. मोकाशी ह्यांसारखे जे साहित्यिक विज्ञानकथेकडे वळले होते, त्यांना विज्ञानकथाकार म्हणून मान्यता मिळू शकली नाही. ह्याचा प्रतिकूल परिणाम मराठीतील विज्ञानकथेवर होऊन ती काहीशी मागे पडू लागली. तथापि हंस, मोहिनी आणि नवल ह्या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर आणि पुढे त्यांचे पुत्र आनंद अंतरकर ह्यांनी विशेषत: आपल्या नवलमधून विज्ञानकथांना भरपूर वाव दिल्यामुळे तिच्या भविष्यकालीन विकासासाठी एक दालन खुले राहिले. सत्तरीच्या दशकाच्या मध्याला विज्ञानकथेच्या दृष्टीने विशेष अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. माध्यमिक शिक्षणात विज्ञानाला मिळालेले महत्त्व, हे  ह्या अनुकूल परिस्थितीचे एक कारण होते. दूरचित्रवाणीसारख्या इलेक्ट्रॉनिकी माध्यमाचा आणि त्यावरील विज्ञानकथात्मक कार्यक्रमांच्या लोकप्रियतेचाही ह्या संदर्भात उल्लेख करता येईल. मराठी विज्ञान परिषेदेने दर वर्षी विज्ञानकथालेखनाची स्पर्धा सुरू केली हेही एक महत्त्वाचे कारण. जयंत नारळीकर ह्यांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलीय भौतिकीविज्ञ विज्ञानकथा लिहू लागल्यामुळे ह्या लेखन प्रकाराला  मराठीत  एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. जयंत नारळीकर ह्यांच्यासह आता बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजण घाटे, सुबोध जावडेकर, डी. व्ही. जहागीरदार, विश्वेश्वर सावदेकर, शुभदा गोगटे, अरूण मांडे, जी. के. जोशी असे अनेक विज्ञानकथाकार विज्ञानकथा लिहीत आहेत.

द. पां. खांबेटे ह्यांच्या माझे नाव रमाकांत बालावलकर (१९५८) ह्या विज्ञानकथासंग्रहात रमाकांत बालावलकर आणि त्यांचे गुरू ह्यांच्या साहसाच्या कथा आहेत. रमाकांत बालावलकरांसंबंधीच्या खांबेटे ह्याच्या काही कथा चंद्रावरचा खून ह्या कथासंग्रहात समाविष्ट आहेत. नारायण धारप ह्यांनी गोग्रॅमचा चितार (१९६८), गोग्रॅमचे पुनरागमन (१९७३), पारंब्याचे जग (१९७५), नेमचिन, युगपुरूष (१९७०), जिद्द (१९७४) अशा कादंबऱ्या लिहिल्या. ह्या कादंबऱ्यांपैकी नेमचिनमध्ये चंद्रावरचा समाज आणि संस्कृती रंगविली आहे. विश्वसंहार (१९७६) आणि चंद्रमोहिनी (१९६६) ही गजानन क्षीरसागर ह्यांची निर्देशनीय पुस्तके. यक्षाची देणगी (१९८४) हा जयंत नारळीकर ह्यांचा कथासंग्रह. प्रेषित (१९८३), वामन परत न आला (१९८६), व्हायरस (१९९६), ह्या त्यांच्या कादंबऱ्या.

बाळ फोंडके ह्यांनी कथालेखनच केले आहे. यूरेका (१९८५), अमानुप (१९८५), चिरंजीव (१९८६), गुड बाय अर्थ (१९८९), गोलमाल (१९९३), व अखेरचा प्रयोग (१९९४) हे त्यांचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. अन्य देशांतील आणि भाषांतील श्रेष्ठ विज्ञानकथांचा परिचयही त्यांनी मराठी वाचकांना करून दिला.

लक्ष्मण लोंढे ह्यांनी विज्ञानकथांबरोबरच विज्ञानकथांवर आधारलेली नभोनाट्ये आणि दूरदर्शन नाट्ये लिहिली आहेत. विज्ञानकथेवर आधारलेले एक नाटकही त्यांनी लिहिले आहे. २२ जुलै १९९५ (१९८४) आणि दुसरा आइन्स्टाइन (१९८९) हे त्यांचे कथासंग्रह. शिवाय चिंतामणी देशमुख ह्यांच्या सहकार्याने त्यांनी देवांसी जीवे मारिले (१९८३) ही कादंबरीही लिहिली. गिनिपिग (१९८४) ही त्यांची आणखी एक विज्ञानकादंबरी.

निरंजण घाटे ह्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या असल्या तरी त्यांनी मुख्यत: कथालेखन केले आहे. यंत्रमानव , अंतराळप्रवास, ह्यांसारखे विषय त्यांनी आपल्या लेखनातून हाताळलेले आहेत. झू (१९८५), भविष्यवेध (१९८९) हे त्यांचे काही कथासंग्रह. रामचे आगमन (१९७४), कालयंत्राची करामत (१९७४), स्पेस जॅक (१९८४) आणि वारस (१९८४) अशा काही कादंबऱ्यांही त्यांनी लिहिल्या आहेत.

सुबोध जावडेकर ह्यांच्या लेखनात अचूक वैज्ञानिक माहिती आणि प्रभावी कल्पनाशक्ती ह्यांचा उत्तम मेळ घातलेला दिसून येतो. ‘माणसाची भाषा’, ‘अंधारयात्रा’, ‘ललाटरेखा’ ह्यांसारख्या उत्कृष्ट कथा त्यांनी लिहिल्या आहेत. गुगली (१९९१) आणि वामनाचे चौथे पाउल (१९९४) हे त्यांचे कथासंग्रह भोपाळच्या वायुदुर्घटनेवर आधारलेली त्यांची आकांत (१९८८) ही कादंबरीही ख्याती पावली.

मराठीतील अन्य काही विज्ञानकथाकार असे : यशवंत रांजणकर (शेवटचा दिस–१९८२), डी. व्ही. तथा डॉ. दत्तात्रय व्यंकटेश जहागीरदार (राधिका–१९८७), अरूण साधू (विप्लवा–१९८५), भालबा केळकर (विज्ञानाला पंख कल्पनेचे–१९७८), सुरेश मथुरे (ज्ञानवृक्षाच्या पारंब्या–१९८०), शुभदा गोगटे (मार्जिनल्स–१९८५, ह्या कथासंग्रहाखेरीज त्यांनी यंत्रायणी–१९८१ ही कादंबरीही  लिहिली आहे.), जी.आर्.सरदेसाई (त्रिपुरारी). शिवाय जी. के.जोशी, सरोज जोशी, विश्वेश्वर सावदेकर, मंदाकिनी गोगटे, सी. आर्.तळपदे, नंदिनी थत्ते, अरूण मांडे, मेघश्री दळवी, ही काही उल्लेखनीय नावे. तळपदे ह्यांनी काही रशियन विज्ञानकथा मराठीत अनुवादिल्या आहेत, तर सावदेकरांनी मराठीतील विज्ञानकथेवर प्रबंध लिहून पीएच्.डी. मिळविली आहे.


 अन्य भारतीय भाषांतील विज्ञानकथा : मराठीप्रमाणेच उडिया, उर्दू, कन्नड, तेलगू, बंगाली अशा काही अन्य भारतीय भाषांमध्येही विज्ञानकथालेखन झालेले आहे. उडिया भाषेतील विज्ञानकथेचा आरंभ गोकुलानंद महापात्र (१९२३–   ) ह्यांच्या ‘पृथ्वीबाहेरील मनुष्य’ (१९५४, म.शी.) ह्या पुस्तकाने झाला, असे म्हटले जाते. काही समीक्षकांच्या मते, महापात्रांचे हे पुस्तक म्हणजे केवळ उडिया भाषेतील नव्हे, तर अन्य भारतीय भाषांतीलही पहिली विज्ञानकथा होय. महापात्रांच्या अन्य कादंबऱ्यात स्पूटनिक (१९५८), ‘मध्यान्हीचा अंधःकार’ (१९५९, म. शी.), ‘उडती तबकडी’ (१९६३, म. शी.), ‘चंद्राचा मृत्यू’ (१९६६, म. शी.), ‘सोनेरी ओरिसा’ (१९७३, म. शी.) ह्यांचा समावेश होतो. विज्ञानाचा मानवी जीवनावर आणि संस्कृतीवर होणारा परिणाम त्यांनी प्रासादिक शैलीत आपल्या लेखनातून दाखविला आहे. नृसिंहचरण पंडा, अमूल्यकृष्ण मिस्त्रॉ, देवकांत मिश्रा, देवव्रत दाश हे अन्य उल्लेखनीय विज्ञानकथाकार होत. इझार असर हे उर्दूतील एक नामवंत विज्ञानकथाकार होत. आधी जिंदगी (१९५५) ह्या त्यांच्या कादंबरीत त्यांनी यांत्रिक बुद्धिमत्तेचा-रोबोंचा-विषय हाताळला होता. मात्र ह्या कादंबरीतील रोबो कोणतेही अनैतिक काम करण्यास नकार देतो. अवकाशातील प्रवास हा त्यांच्या शोलों के इन्सानचा विषय आहे. बीस साल बादमध्ये अन्य ग्रहावरचा एक वैज्ञानिक मरणपंथाला लागलेल्या एका वंशाचा इतिहास नोंदण्यासाठी एक अत्यंत तल्लख मेंदू कसा तयार करतो, हे त्यांनी दाखविले आहे. असर ह्यांनी आपल्या कादंबऱ्यांतील विज्ञान सर्वसामान्य माणसाला सहज समजेल, अशा प्रकारे मांडलेले आहे. प्रो. दिवाकर, डॉ. रामन अशा टोपणनावांनीही असर ह्यांनी विज्ञानकथालेखन केले आहे. असर ह्यांनी वैज्ञानिक आशय असलेल्या कविताही लिहिल्या असून त्यांत विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिमांचा प्रभावी उपयोग करून घेतलेला आहे. कन्नड भाषेत गोपाल कृष्ण अडिग ह्यांनी झ्यूल व्हेर्नच्या काही कादंबऱ्या अनुवादिल्या आहेत. ‘राभू’ ह्या नावाने ओळखले जाणारे राजशेखर भूसनूरमथ हे कन्नडमधील विज्ञानकथेचे प्रवर्तक होत. कन्नडमधील विज्ञानकथालेखनात त्यांच्या मोठा वाटा आहे. त्यांच्या काही साहित्यकृती अद्‌भुतिकेच्या (फँटसी) अंगाने लिहिलेल्या असून, काहींत भविष्यकालीन जगाची अस्वस्थ करणारी चित्रे सशब्द केली आहेत. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांतील सिद्धांतांचा त्यांनी आपल्या विज्ञानकथालेखनासाठी सहजपणे उपयोग करून घेतलेला आहे. राभू ह्यांनी बालांसाठीही विज्ञानकथा लिहिल्या आहेत. ‘काउन्सिल ऑफ सायन्स फिक्शन ऑथर्स ऑफ इंडिया’ (सीएस्‌एफ्‌एआय्‌) ह्या संघटनेच्या माध्यमातून राभू हे भारतातील विज्ञानकथालेखकांना एकत्र आणीत आहेत. ह्या संघटनेमार्फत ‘इंडियन सायन्स फिक्शन’ नावाने एक त्रैमासिक काढण्याची योजना आहे. जयंत नारळीकर, बाळ फोंडके आणि राभू हे भारतीय विज्ञानकथाकारांच्या लेखनाचा एक प्रातिनिधिक संग्रह प्रसिद्ध करीत आहेत. तेलुगू भाषेत विज्ञानकथालेखनात हे काहीसे नवे आहे. रावुरी भारद्वाज ह्यांच्या ‘चंद्रमंडल यात्रा’ ह्या कथेत रशियनांबरोबर केलेल्या चंद्रावरील प्रवासाचा वृत्तांत कथेचा नायक देतो, असे दाखविले आहे. बोल्लीमुंता नागेश्वर राव ह्यांच्या ग्रहांतर जात्रिकुलू (इं. शी. ट्रान्सप्लॅनेटरी ट्रॅव्हलर्स) ह्या कादंबरीत अन्य ग्रहांवरील काही लोक पृथ्वीवर येतात व ह्या ग्रहावरील माणसांच्या जीवनमानांतील विलक्षण तफावत पाहून थक्क होतात. यंडामुरी वीरेंद्रनाथ ह्यांच्या युगांतम्‌ ह्या कादंबरीत एक उल्काभ आणि पृथ्वी ह्यांची टक्कर होऊन युगांत (विनाशाचा दिवस) कसा येतो ह्याचे चित्र उभे केले आहे. रेंतल नागेश्वर राव ह्यांची ‘स्त्रीलोकम्’ ही कथा विषयाच्या दृष्टीने वेगळी आहे. ह्या कथेत स्त्री ही पिता होण्याची शक्यता शास्त्रीय दृष्टीने अजमावली आहे. बंगाली साहित्यातील सुकुमार रे (१८८७-१९३२) ह्यांनी लिहिलेली हेशोराम हंशीयारेर डायरी (१९२२) ही कादंबरी उल्लेखनीय ठरते. डार्विनच्या ऑरिजिन ऑफ द स्पीशीज (१८५९) वर आधारलेली आर्थर कॉनन डॉइलकृत द लॉस्ट वर्ल्ड (१९१२) ही कादंबरी हेशोराम…..लिहिताना सुकुमार रे ह्यांच्या पुढे होती. हेमेंद्रकुमार रॉय ह्यांनी एच्‌. जी. वेल्सच्या द इनव्हिजिबल मॅनचे बंगाली भाषांतर अदृश्य भानुप केले. कांचेर कॉफिन ( म. शी. काचेचे खफन), मेघदूतेर मर्त्ये आगमन (म. शी. मेघदूताचे पृथ्वीवर आगमन) ह्या त्यांच्या स्वतंत्र कादंबऱ्या. मेघदूतेर….मध्ये मंगळावर जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत येण्याची साहसकथा सांगितली आहे. प्रेमेंद्र मित्र (१९०४-८८) ह्यांनी लिहिलेल्या ‘घानादा’ च्या कथाही उल्लेखनीय होत. घानादा हा कथाकथक. त्याच्या कथांत वर वर अविश्वसनीय वाटणारे, परंतु वैज्ञानिक दृष्ट्या संभाव्य असे अनेक अनुभव येतात. विज्ञान, गुन्हेगारी आणि साहस ह्यांचे विलक्षण मिश्रण त्यांच्या कथांत आढळते. आकाशेर आतंक (म. शी. आकाशाचे भय), दुःस्वप्नेर द्वीप (म. शी. दुःस्वप्नाचे बेट) ह्या त्यांच्या विज्ञानकथांपैकी काही होत. क्षितींद्रनारायण भट्टाचार्य हे प्रेमेंद्र मित्रांचे समकालीन लेखक. त्यांनी  ‘अश्वत्थामार पा ’ (म.शी. अश्वत्थाम्याची पावले) आणि ‘घुमंत पुरी ’(म.शी. निद्रिस्त शहर) ह्या विज्ञानाच्या काही समस्यांवर आधारलेल्या कथा लिहिल्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपटकार ⇨ सत्यजीत रे (१९२१-९२) हे बंगालीतील, अलीकडच्या काळातील एक श्रेष्ठ विज्ञानकथाकार होत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राध्यापक म्हणून ‘प्रा. त्रिलोचन शंकू’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या विज्ञानकथांत येते. प्रा. शंकू ह्यांना मानवी संस्कृतीच्या सुरक्षिततेची आणि मानवाच्या भविष्याची चिंता आहे. ते अत्यंत बुद्धिमान आणि कल्पक आहेत. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या विविध शाखांतील तपशिलांचे निर्देश ह्या कथांतून येतात. ‘मन्रो द्वीपेर रहस्य’ (म. शी. मन्रो द्वीपाचे रहस्य), ‘शंकु ओ आदिम मानुष ’ (म. शी. शंकु आणि आदिम माणूस) ह्या त्यांच्या शंकुकथांपैकी काही विशेष उल्लेखनीय कथा होत. आधुनिक बंगालीतील नामवंत कवी आणि कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय (१९३४-     ) ह्यांनी काही विज्ञानकथा लिहिल्या आहेत. पृथ्वीपलीकडल्या ग्रहांशी संबंध व त्यांचे परिणाम, ‘अँटी-मॅटर’ (प्रतिद्रव्य) असे विषय त्यांच्या काही विज्ञानकथांतून त्यांनी हाताळलेले आहेत.


 सुनील गंगोपाध्याय ह्यांचे समकालीन असलेले शीर्षेदू मुखोपाध्याय ह्यांच्या विज्ञानकथांपैकी ‘पगला गणेश’ आणि ‘बॉनी ’ ह्या विशेष उल्लेखनीय होत. ‘पगला गणेश’ ह्या कथेत ३५८९ सालातील मानवी संस्कृतीचे चित्र उभे केले असून, ही संस्कृती अनेक संदर्भात-उदा., ललितकला-आपली संवेदनशीलता कशी गमावून बसते, हे दाखविले आहे. ‘बॉनी’ च्या कथेत बॉनी गर्भावस्थेत असतानाच त्याच्या मेंदूत मायक्रोचिप-प्रत्यारोपण कसे केले जाते आणि त्यामुळे गंभीर परिणाम कसे होतात, हे दर्शविले आहे. शीर्षेदूंच्या विज्ञानकथांमध्ये मानवातील अंगभूत अशा सत्‌शक्ती अनेक धोक्यांवर मात करताना दिसतात, हे त्यांच्या विज्ञानकथांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संगणक विज्ञानाच्या आधारेही शीर्षेदूंनी काही विज्ञानकथालेखन केले आहे. सय्यद मुस्तफा सिराज ह्यांच्या विज्ञानकथांतून येणारी आणि आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने अनेक गूढांचा वैज्ञानिक अर्थ लावणारी ‘कर्नल नीलाद्री सरकार’ ही व्यक्तिरेखा संस्मरणीय आहे. बंगालीतील अन्य काही विज्ञानकथालेखक असे : विमल कार, अद्रिश वर्धन, संकर्षण रे, समरजित कार, अनिज देव, किन्नर रॉय, सिद्धार्थ घोष, निरंजन सिंह इत्यादी.

भारतीय भाषांमधील साहित्यात विज्ञानकथा ही कमी-अधिक प्रमाणात रूजलेली असून, मराठी व बंगाली ह्यांसारख्या काही भाषांच्या साहित्यांत तिने चांगला जोम धरला आहे. इट हॅपन्ड टूमॉरो (१९९३) हा भारतीय विज्ञानकथांचा प्रातिनिधिक संग्रह, बाळ फोंडके ह्यांच्या विज्ञानकथेसंबंधीच्या दीर्घ प्रस्तावनेसह ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ ने प्रकाशित केलेला आहे.

विज्ञानकथांवर आधारलेले चित्रपट फ्रेंच चित्रपटकार झॉर्झ मेल्ये ह्याच्या द लॅबोरेटरी ऑफ मेफिस्टोफीलीझ (१८९७) ह्या चित्रपटापासून निघू लागले ते अद्याप निघतच आहेत. काही निर्देशनीय चित्रपट असे : ट्‌वेंटी थाउजंड लीग्ज अंडर द सी (१९१६), फ्रॉम द अर्थ टू द मून (१९५८), अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज (१९५८), जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (९१५९) आणि २००१ : ए स्पेस ओडीसी (१९६८). दूरदर्शनचे माध्यम प्रभावी झाल्यानंतर त्यावरही विज्ञानकथांवरील चित्रपट, मालिका दाखविल्या जात आहेत.

संदर्भ : 1. Bova, Ben, Ed. Science Fiction Hall of Fame, Vol. II. New York, 1973.

            2. Ellison, Harlan, Ed. Again, Dangerous Visions, New York, 1971.

            3. Franklin, H. Bruce, Future Perfec, Oxford, 1968.

           4. Knight, Damon, In Search of Wonder, Chicago, 1967.

           5. Lundwall, Sam, Science Fiction, 1971.

           6. Silverberg, Robert, Ed. Science Fiction Hall of Fame, Vol. I, New York, 1970.

कुलकर्णी, अ. र. फोंडके, बाळ