विलापिका : (एलिजी). एक काव्यप्रकार. पाश्चात्त्य वाङ्मयात ‘एलिजी’ या नावाने जो एक शोकानुबद्ध, चिंतनप्रवण काव्यप्रकार रूढ आहे, तोच आधुनिक मराठी काव्यविश्वात ‘विलापिका’ या नावाने संबोधिला जातो. या काव्यप्रकाराला इंग्रजीत ‘एलिजी’ हे जे नाव प्राप्त झाले, त्याचे मूळ ग्रीक भाषेतील ‘लॅमेंट’ या अर्थाच्या शब्दात आहे. प्राचीन ग्रीक साहित्यात शोकांतिका जशी लोकप्रिय होती, तशी विलापिकाही लोकप्रिय होती. इंग्रजी साहित्यात हे दोन्ही लेखनप्रकार प्राचीन ग्रीक साहित्यातून संक्रांत झाले आणि कालांतराने इंग्रजीच्या संपर्कामुळे मराठी साहित्यात हे अंशतः अवतीर्ण झाले.

पाश्चात्य देशांत मृताच्या थडग्यावर जे विलापप्रधान स्मृतिलेख कोरले जातात, त्यांतील काही स्मृतिलेखांतून या ‘विलापिका’त्मक काव्याचे दर्शन घडते, व्यक्तिजीवनातील वा समाजातील मृत्यूसंबद्ध शोकात्म घटनेत व तदानुषंगिक भाव, कल्पना, विचार, चिंतन यांच्या विविध पातळ्यांवरील आविष्कारांत या काव्यप्रकाराचे मूळ आहे.

या काव्यप्रकारात केवलस्वरूपी मृत्यूजन्य आकांताला वा आक्रोशाला महत्त्व नसते. या आकांतातून निर्माण होणारे मृत्यूविषयक विविध भाव, कल्पना, विचार, चिंतनगर्भ स्वरूपात प्रकट व्हावेत अशी अपेक्षा असते. केवळ मृत्यूजन्य आकांत म्हणजे ‘विलापिका’ नव्हे.

एलिजीप्रमाणे ‘डर्ज’ या नावाचाही, मृत्यूजन्य शोकाला प्राधान्य देणारा एक काव्यप्रकार पाश्चिमात्य काव्यसाहित्यात रूढ होता. त्यातील शोकात्मभाव, प्राधान्याने मृत व्यक्तीच्या गौरवावर आधारलेला असे. तो चिंतनशील असलाच पाहिजे, अशी अट नव्हती. पण विलापिकेला मात्र चिंतनशीलतेची अट पाळावीच लागते. विलापिकेचा शेवट मूत्यूच्या विचारशील स्वीकारात तदानुषंगिक सांत्वनात अंतर्मुख होण्यात तसेच जीवनविषयक व्यापक, सखोल, विविधांगी चिंतन – मननात व्हावा, अशी अपेक्षा असते.

यूरोपीय साहित्यात हा काव्यप्रकार आणखी एका दिशेने प्रवाहित झाला आहे, ती दिशा म्हणजे रानावनांतून हिंडणाऱ्या पशुपालांनी वा कृषिवलांनी आपल्या हरवलेल्या वा मृत्यू पावलेल्या प्रिय पशूंवर बासरीवादनातून प्रकट केलेला शोकविलाप. यामुळे भावगीताचे (लिरिक) मूळ नाते जसे वीणेशी (लायर) संबद्ध झाले आहे, तसे विलापिकेचे नाते बासरीशी जोडले जाते. ⇨जॉन मिल्टनने (१६०८ – ७४) आपली लिसिडास (१६३७) ही प्रसिद्ध विलापिका स्वतःकडे मेंढपाळाची भूमिका घेऊनच लिहिली आहे. या प्रकाराच्या विलापिकेत काही वेळा मानवी जीवनविनाशाचे दुःख जसे प्रकट झालेले आढळते, तसे निसर्गविनाशाचे दुःखही सूचित होते.

इंग्रजी साहित्यात मिल्टनलिखित लिसिडास प्रमाणेच ⇨ॲल्फ्रेड टेनिसनने (१८०९–९२) आर्थर हॅलम या आपल्या प्रिय मित्राच्या मृत्यूवर लिहिलेली ‘इन मेमोरियम ए. एच्‌. एच्‌.’ (१८५०) ही विलापिका आणि ⇨शेलीने (१७९२–१८२२) कीट्‌सच्या निधनावर लिहिलेली ‘ॲडोनिस’ (१८२१) ही विलापिकाही याच विषयावर आधारलेली आहे. वरील दोन विलापिकांप्रमाणे ⇨टॉमस ग्रे (१७१६–७१) या कवीने लिहिलेली ‘ॲन एलिजी रिटन्‌ इन अ कंट्री चर्चयार्ड’ (१७५१) ही विलापिकाही विशेष मान्यता पावलेली आहे. ग्रेच्या या विलापिकेचे वैशिष्ट्य असे, की ही विलापिका एखाद्‌- दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूवर आधारलेली नसून ती एकूणच मानवी जीवनाच्या मर्त्यतेवर आधारलेली आहे, यामुळे या विलापिकेला विलापिकेच्या मूळ संकल्पनेपेक्षा एक वेगळे, व्यापक परिणाम प्राप्त झालेले आहे. अमेरिकन कवी ⇨वॉल्ट व्हिटमन (१८१९–९२) याच्या अब्राहम लिंकनच्या वधावर (वधकाळ १८६५) आधारित विलापिका त्यांतील उत्कटतेमुळे विशेष गाजल्या आहेत.

मानवी जीवनात अटळपणे अवतरणारा मृत्यू व तदानुषंगिक शोक- प्रक्षोम ही एक सनातन प्रक्रिया आहे. रामायण, महाभारत यांसारख्या भारतीय आर्ष महाकाव्यांचे शेवट पाहिल्यास ते शोकात्म स्वरूपाचेच आहेत. मात्र ही आर्ष महाकाव्ये वगळल्यास पूर्वकालीन भारतीय साहित्यात, सर्वसामान्यपणे विलापिकेचा अभावच जाणवतो.

मानवी जीवन मर्त्य असले, तरी मानवाचा आत्मा अमर असतो, या भारतीय तत्वविचाराच्या परिणामामुळे असो. किंवा थोरामोठ्यांचे निधन वर्णू नये, असा पूर्वकालीन शिष्टसंकेत असल्यामुळे असो, मध्ययुगीन मराठी साहित्यात शोकात्मिकांचे अस्तित्व आढळत नाही. पांडवप्रताप, रामविजय किंवा हरिविजय लिहिणारा श्रीधरासारखा मध्ययुगातील लोकप्रिय मराठी कवी, या वीरपुरूषांच्या शोकात्म शेवटांचे वर्णन करू नकोस, अशी मला देवांची आज्ञाच आहे, असे सांगतो.

मात्र, पूर्वकालीन मराठी साहित्यात शोकात्म प्रसंगांची वर्णने आढळतात : उदा., मूर्तिप्रकाश (१२८९) या महानुभाव ग्रंथातील नागदेवाचार्यांचा चक्रधरांच्या वियोगावर आधारलेला शोक, नामदेवांचे ज्ञानेश्वरांच्या समाधिप्रसंगावर आधारलेले १२९६ ते १२९७ ह्या काळातील ‘समाधीचे अभंग’, तुकारामांच्या निर्वाणानंतर तुकारामांच्या बंधूनी केलेली शोकप्रधान अभंगरचना (१६५१), वा शाहिरांनी रचलेले पानिपतच्या लढाईवर किंवा सवाई माधवरावांच्या मृत्यूवर (१७९५)आधारलेले पोवाडे ‘विलापिका’ या काव्यप्रकाराला जवळ येणारे आहेत.

अर्वाचीन काळातील गं. रा. मोगरे (१८५७ – १९१५) यांच्या काही कविता, ह. ना. आपटे यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निधनावर लिहिलेला ‘शिष्यजनविलाप’ (१८८२), विठ्ठल भगवंत लेंभे (१८५० – १९२०) यांचे शोकावर्त (१८९९), नारायण वामन टिळक यांचे बापाचे अश्रु (१९०९), गणेश जनार्दन आगाशे यांचे बाष्पांजलि अथवा पितृविलाप (१९१६) हे काव्य तसेच गोविंदाग्रजांचे (१८८५ – १९१९) ‘राजहंस माझा निजला’ (१९१२) हे गीत, कवी माधवांची (१८९२–१९५८) ‘गोकलखां’ ही कविता, भा. रा. तांबे (१८७४ – १९४१) यांचे लो. टिळकांच्या निधनावर आधारलेले ‘लोकमान्यांस’ (१९२०) हे काव्य या साऱ्यांना एक प्रकारे ‘विलापिका’ असे संबोधिता येईल.

परंतु ‘विलापिके’ ची मूळ पाश्चिमात्य चौकट विचारात घेतल्यास वर निर्दिष्ट केलेल्या मराठी कवितांना ‘विलापिका’ असे संबोधणे कठीणच आहे. इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजी शिक्षणातून हा काव्यप्रकार, थोड्याफार प्रमाणात आधुनिक मराठी कवींच्या परिचयाचा झाला होता, काही प्रमाणात मराठीत त्याचे अनुसरण होत होते असे म्हणता येईल.

रविकिरण मंडळातील कवींनी मुख्यतः ‘लिरिक’ (भावगीत), सुनीत, गझल यांसारख्या परभाषांतून वा साहित्यातून आलेल्या काव्यांची तोंडओळख करून घेतली, काहींची नामकरणेही केली. पण ‘गझल’ किंवा ‘सुनीत’ या परकीय भाषांतून आलेल्या काव्यप्रकारांचे जसे अनुसरण केले, तसे वरील काव्यप्रकारांच्या तुलनेने रचनादृष्ट्या सुलभ असूनही आणि विषयदृष्ट्या व्यापक असूनही ‘विलापिका’ या काव्यप्रकाराचे अनुसरण केल्याचे आढळत नाही.

संदर्भ : माडखोलकर, ग. त्र्यं. विलापिका, पुणे, १९२७.

कुलकर्णी, गो. म.