विरूपण : संदेशवहनातील ही एक मूलभूत महत्त्वाची प्रक्रिया आहे. एका तरंगाचे काही प्रचल (ज्यांना परिस्थितीनुसार मूल्ये देता येतात अशा राशी) हे दुसऱ्या तरंगाच्या काही प्रचलांनुसार बदलण्याचे काम ज्या प्रक्रियेने होते त्या प्रक्रियेला अथवा तिच्या परिणामाला विरूपण म्हणतात. विरूपणाने तयार झालेल्या तरंगामधून मूळ संकेत परत मिळविण्याच्या प्रक्रियेला अविरूपण म्हणतात.
मानवी संभाषण व संदेश यांत अंतर्भूत असलेला अवगम (ध्वनी, संगीत इ. माहिती) हा कमी कंप्रतेचा असतो (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांची संख्या म्हणजे कंप्रता). एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रेषण करण्यासाठी संदेशाचे विद्युत् चुंबकीय तरंगात रूपांतर करणे आवश्यक ठरते. कोणत्याही मंडलातून विद्युत् तरंग ऊर्जा प्रेषित करण्याची कार्यक्षमता त्यामधील विद्युत् चुंबकीय तरंगाच्या कंप्रतेच्या घनवर्गाच्या ठराविक प्रमाणात वाढते, असे आढळते. त्यामुळे श्राव्य (ऐकू येणाऱ्या) कंप्रतेचे विद्युत् रूपांतरित संदेश सरळ प्रेषित करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. उच्चारलेल्या शब्दांची कंप्रता काही शेकडे ते कित्येक हजार हर्ट्झ असते (हर्ट्झ हे कंप्रतेचे एकक आहे). विद्युत्चुंबकीय तरंगांची कंप्रता साधारणपणे १५ किलोहर्ट्झ किंवा अधिक असेल, तरच रेडिओ प्रेषण पुरेसे कार्यक्षमपणे होते (१ किलोहर्ट्झ = १,००० हर्ट्झ). याकरिता या तरंगांना रेडिओ तरंग म्हणतात. उच्च कंप्रतेच्या या रेडिओ तरंगांचे श्राव्य संदेशाद्वारे संस्करण म्हणजे विरूपण करतात. कारण या संस्करण क्रियेत मूळच्या उच्च कंप्रता रेडिओ तरंगाच्या रूपामध्ये श्राव्य संदेश तरंगांमुळे बदल घडवून आणला जातो. अशा प्रकारे विरूपणामुळे पाठवावयाच्या संदेशाचे माहितीयुक्त संकेतात परिवर्तन होते. याचा अर्थ या संकेतांद्वारे तो संदेश दर्शविला जातोच, शिवाय हे संकेत प्रेषण माध्यमातून ग्राहीकडे प्रसारित करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असतात. कारण रेडिओ तरंग सेकंदाला सु. ३ लाख किमी. वेगाने प्रसारित होतात. या पद्धतीत प्रत्येक संदेशाच्या प्रेषणाकरिता वापरलेली वाहक कंप्रता भिन्न ठेवल्यास निरनिराळे श्राव्य संदेश एकमेकांत न मिसळता एकाच वेळी प्रेषित करता येतात.
प्रसारित तरंग दूरच्या ठिकाणी असलेल्या ग्राहीपर्यत गेल्यावर त्यातील माहिती ग्राहीला मिळते. नंतर मूळ संदेश किंवा मूळ संदेशातील माहिती इष्ट रूपात उपलब्ध करून दिली जाते. अशा प्रकारे ज्या वेळी व जेथे ही माहिती हवी असते, तेथे ती हव्या त्या वेळी पोहोचती होते. दूरध्वनी हे विरूपणाच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी चांगले उदाहरण आहे (आ. १). शब्द उच्चारल्याने निर्माण होणारे ध्वनीचे अनुतरंग [⟶ तरंग गति] माहितीयुक्त संकेतांचे बनलेले असतात व या संकेतांचे संदेशवहन करावयाचे असते. दूरध्वनीचा प्रेषक विरूपणकारक म्हणून कार्य करतो व ही श्रवणीय वा ध्वनिकीय ऊर्जा विद्युत्ऊर्जेत रूपांतरित करतो. अशी विद्युत् ऊर्जा उच्च वेगाने दर अंतरापर्यत प्रसारित करण्यायोग्य असते. जेथे ही ऊर्जा स्वीकारली जाते, तेथे दूरध्वनीच्या ग्राहीमार्फत अविरूपणाची क्रिया होऊन विद्युत् ऊर्जेचे परत हवेतील दाब तरंगात म्हणजे श्रवणीय ऊर्जेत (ध्वनीत) परिवर्तन होते आणि मूळ शब्द ऐकू येतात.
परमप्रसर (मूळ स्थानापासून होणारे कमाल स्थानांतर) विरूपणाच्या उदाहरणाने विरूपणाची व्याख्या अधिक स्पष्ट होईल. या विरूपणात वाहक तरंग, विरूपणकारी तरंग व विरूपित तरंग या तीन महत्तवाच्या संकल्पनांचा अंतर्भाव असतो (आ. २). विरूपण करावयाच्या तरंगाचे काही प्रचल विरूपणकारी तरंगाने बदलले जातात. विरूपणकारी करंगाने विरूपण करण्यायोग्य तरंग म्हणजे वाहक तरंग होय आणि विरूपित तरंगाचे काही प्रचल विरूपणकारी तरंगानुसार बदललेले असतात. विरूपणातील तरंग या शब्दाने अनेक राशी सूचित होतात. यांत संकेत, विद्युत् दाब, विद्युत् प्रवाह, दाब, विस्थापन वगैरेंसारख्या स्थिर वा बदलणाऱ्या राशी येतात.
अशा रीतीने विरूपणकारी तरंग हा आवाज, संगीत यांसारखा माहितीयुक्त संकेत असतो व याद्वारे वाहक तरंगात बदल होतात. वाहक तरंगावर विरूपणकारी तरंग उमटल्यावर विरूपित तरंग निर्माण होतो. मग विरूपित तरंगाचे प्रेषण करतात आणि तो ग्राहीकडून अविरूपित होतो व मूळ संदेश मिळतो.
मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या आधुनिक संदेशवहनात प्रकाशकीय वाहक तरंग निर्मिण्यासाठी विशिष्ट प्रकारचा लेसर वापरतात. हा तरंग केसाएवढ्या बारीक काचतंतूंमधून उच्च वेगाने जातो. या दूर अंतरापर्यत प्रकाशाची अत्यल्पच हानी होते. द्विप्रस्थ या स्विचासारख्या इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तीतील प्रवाह बदलून प्रकाशाचे नियंत्रण केले जाते. बहुत करून ‘ऑफ’ (बंद) व ‘ऑन’ (चालू) अथवा ० व १ या अंकीय रीतीने हे नियंत्रण साध्य होते. असे अंकीय विरूपण म्हणजे आधुनिक संदेशवहन पद्धती व संगणक यांची भाषा आहे.
अशा तऱ्हेने विरूपणात रेडिओ कंप्रता वाहक तरंगाचा एक वा अनेक प्रचल प्रेषित करावयाच्या संकेतानुसार बदलून त्या तरंगावर ध्वनी, संगीत, चित्र किंवा इतर माहिती अध्यारोपित केली जाते. परमप्रसर, कंप्रता, कला, स्पंदक्रम व स्पंद काल हे वाहक तरंगाचे प्रचल सामान्यपणे बदलले जातात आणि या विशिष्ट प्रचलानुसार विरूपणाचे प्रकार होतात.
परमप्रसर विरूपण : (अँप्लिट्यूड मॉड्यूलेशन AM). यात वाहक तरंगाचा परमप्रसर हा प्रचल विरूपणकारी तरंगाने बदलला जातो. अधिक सीमित व्याख्येनुसार यात वाहक ‘ज्या तरंगां’चा परमप्रसर हा प्रचल विरूपणकारी तरंगाच्या रैखिक प्रमाणात बदलतो [त्रिकोणमितीतील ‘ज्या’ गुणोत्तराच्या वक्राच्या आकारासारख्या असलेल्या तरंगाला ‘ज्या तरंग’ म्हणतात ⟶ तरंग गति त्रिकोणमिति]. पाठवावयाच्या श्राव्य किंवा दृश्य माहितीच्या संकेतांत होणाऱ्या चढ उतारांशी जुळतील असा तऱ्हेने वाहक तरंगाच्या परमप्रसरात बदल केला जातो. अशा रीतीने यात श्राव्य वा दृश्य माहिती वाहक तरंगावर अंकित होते.
आ. २ मधील विरूपित तरंग हा प्रक्षेपित वाहक तरंग आणि वरचा व खालचा उपपट्ट यांचा बनलेला असतो. वाहक कंप्रतेच्या वरती व खाली सर्वोच्च विरूपणकारी कंप्रतेएवढा विस्तार म्हणजे हे उपपट्ट असतात. अशा प्रकारे परमप्रसर विरूपणांमुळे पट्टविस्तार (व्याप) दुप्पट होतो आणि वाहक तरंगाची ५० टक्के ऊर्जा उपपट्टांत रूपांतरित होते.
रेडिओचे कार्यक्रम प्रक्षेपित करण्याची परमप्रसर विरूपण ही सर्वांत जुनी पद्धती आहे. व्यापारी स्वरूपाची परमप्रसर विरूपण केंद्रे ५३७ ते १,६०५ किलोहर्ट्झ यांच्या दरम्यानच्या कंप्रता १० किलोहर्ट्झ अंतर ठेवून वापरतात. या पल्ल्यातील रेडिओ तरंग ⇨ आयनांबराकडून भूपृष्ठाकडे प्रभावीपणे परावर्तित होतात. या तरंगांचे अभिज्ञान (ओळख पटविण्याचे काम) शेकडो किमी. वरील रेडिओ ग्राहींद्वारे होते व तेथील अविरूपणाद्वारे मूळ संदेश उपलब्ध होतो.
आर्. ए. फेसंडेन (१८६६-१९३२) या कॅनडाच्या रेडिओ अभियंत्यांनी रेडिओ तरंगाच्या विरूपणासाठी ध्वनिग्राहक वापरून ध्वनीचे प्रेषण करता येते, हे प्रथम दाखविले. त्यांच्या कंपनीने १९०६ साली आवाजाचे संकेत यशस्वीपणे दूर अंतरापर्यत प्रेषित केले होते.
व्यापारी रेडिओ प्रक्षेपणाशिवाय दूर-अंतर लघुतरंग रेडिओ प्रक्षेपण, दूरचित्रवाणी कार्यक्रमातील दृक् (व्हिडिओ) भाग प्रेषित करण्यासाठीही परमप्रसर विरूपण वापरतात. १९३५ पर्यत रेडिओ प्रक्षेपण, रेडिओ दूरध्वनी, लघुतरंग रेडिओ दूरध्वनी व इतर सर्व रेडिओ संदेशवहन प्रकारांत परमप्रसर विरूपण वापरीत.
कोन विरूपण : (‘ज्याकृती’ कोनीय विरूपण). यात वाहक ‘ज्या तरंगा’ चा कोन हा प्रचल विरूपणकारी तरंगानुसार बदलला जातो. कार्यक्षमतेत सुधारणा करण्याकरिता पट्टविस्तार राखून ठेवण्याऐवजी पट्टविस्ताराचा व्याप मुद्दाम वाढविता येतो. म्हणजे कोन विरूपण हा कंप्रता विस्ताराचा व्यापक वापर करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. कोन विरूपणात वाहक ‘ज्या तरंगा’ चा कोन हा प्रचल विरूपणकारी तरंगाने बदलतो. कंप्रता विरूपण व कला विरूपण हे कोन विरूपणाचे विशिष्ट प्रकार आहेत. पुष्कळदा कोन विरूपणासाठी कंप्रता विरूपण ही पर्यायी संज्ञा वापरतात. कारण तत्क्षणिक कंप्रता ही कोन विरूपणातील मूलभूत बाब आहे (आ. ३)
कंप्रता विरूपण : (फ्रिक्केन्सी मॉड्यूलेशन FM). कोन विरूपणाच्या या पद्धतीत वाहक तरंगाचा परमप्रसर स्थिर ठेवून त्याची (तात्कालिक) कंप्रता पाठवावयाच्या श्राव्य संकेतात होणाऱ्या बदलांनुसार (म्हणजे विरूपणकारी तरंगाच्या तात्कालिक मूल्याच्या प्रमाणात असलेल्या राशीने) बदलली जाते.
कंप्रता विरूपणाची गणितीय सूत्रातील अचूक व्याख्या जॉन आर्. कार्सन यांनी १९२२ च्या सुमारास दिली. याद्वारे त्यांनी संपूर्ण कंप्रता विरूपण प्रक्रियेचे स्पष्टीकरण सर्वप्रथम दिले आणि या पद्धतीत व्यापला जाणारा कंप्रतांचा विस्तृत पट्टा उघड केला. ई. एच्. आर्मस्ट्राँग (१८९०-१९५४) या अमेरिकी विद्युत् अभियंत्यांनी रूंद कंप्रता पट्टा विरूपण विकसित केले. या पद्धतीमुळे खरखर, घरघर अथवा सीत्कारासारख्या गोंगाटाचा व्यत्यय मोठ्या प्रमाणात कमी होतो. अशा रीतीने परमप्रसर विरूपण रेडिओ ग्रहणावर परिणाम करणाऱ्या गोंगाटावर व त्यातून येणाऱ्या व्यत्ययावर मात करण्याच्या प्रयत्नांतून कंप्रता विरूपणाचे तंत्र पुढे आले. कारण या व्यत्ययांचा परमप्रसर विरूपणापेक्षा कंप्रता विरूपणावर अल्प परिणाम होतो.
गडगडाटी वादळे, विश्वकिरण (अवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण) इ. नैसर्गिक, तसेच यंत्रसामग्री (उदा., मोटारगाडीतील प्रज्वलन प्रणाली, विद्युत् चलित्र इ.) व इतर संबंधित स्त्रोतांकडून येणारे यदृच्छ कृत्रिम विद्युत् प्रवाह यांच्यामुळे हे व्यत्यय निर्माण होत असतात. यांचा रेडिओ तरंगाच्या परमप्रसारावर परिणाम होतो, पण त्याच्या कंप्रतेवर परिणाम होत नाही. म्हणून कंप्रता विरूपित संकेत स्थिर राहतात. मूर्त स्वरित ध्वनी (ध्वनीच्या त्रिमितीय निर्मितीशी व ग्रहणाशी निगडित ध्वनी), दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे द्दक्संकेत व सूक्ष्मतरंग रेडिओ रीलेद्वारे करण्यात येणारे दूर अंतरावरील दूरध्वनी संभाषण (बोलावे) इत्यादींच्या प्रेषणासाठी परमप्रसर विरूपणापेक्षा कंप्रता विरूपण अधिक चांगले जुळवून घेता येते. कंप्रता विरूपण व्यापारी रेडिओ प्रक्षेपण केंद्रांना परमप्रसर विरूपण केंद्रापेक्षा अधिक उच्च कंप्रता नेमून दिलेल्या असतात. या कंप्रतांमधील अंतर २०० किलोहर्ट्झ ठेवतात व त्यांचा पल्ला ८८ ते १०८ मेगॅहर्ट्झी (१ मेगॅहर्ट्झ = १० लाख हर्ट्झ) असतो.
कंप्रता विरूपणात प्रत्येक परिवाहासाठी (चॅनलसाठी) अदिक विस्तृत कंप्रतापट्ट वापरावा लागतो. यामुळे परमप्रसर विरूपणापेक्षा कंप्रता विरूपण अधिक क्षेत्र व्यापते. कंप्रता विरूपणात ‘परिवाह बळकाविण्याची क्रिया’ सुद्धा दिसते. म्हणजे दोन कंप्रता विरूपण संकेत उपलब्ध असल्यास त्यांपैकी अधिक तीव्र किंवा प्रबळ संकेताचे ग्रहण होते व दुसरा संकेत जवळजवळ वगळला जातो. यामुळे एकाच कंप्रतेवर चालणारी कमी शक्तीची रेडिओ केंद्रे एकमेकांलगत ठेवता येतात. हा महत्त्वाचा फायदा परमप्रसर विरूपण केंद्राच्या बाबतीत नसतो.
कला विरूपण : (फेज मॉड्युलेशन PM). कोनीय विरूपणाच्या या प्रकारात वाहक ‘ज्या तरंगाची’ कला [आवर्त गतीतील ठराविक संदर्भापासून कोनात मोजली जाणारी गतिविषयक स्थिती ⟶ तरंग गति] ध्वनीच्या स्त्रोतांच्या आंदोलनांना अनुसरून बदलली जाते. कला विरूपण हा कंप्रता विरूपणाचा वेगळा प्रकार मानला जातो, कारण या दोन्हींमध्ये निकटचा संबंध आहे. म्हणजे कंप्रता बदलल्याशिवाय कला बदलता येत नाही अथवा कला बदल्याखेरीज कंप्रता बदलता येत नाही. याचा अर्थ यांपैकी एका राशीत बदल करण्याचा प्रयत्नव केल्यास दुसऱ्या राशीतही बदल होतोच. या अर्थाने ही दोन विरूपणे सारखी आहेत.
कंप्रता विरूपणाप्रमाणेच कला विरूपणानेही ३० मेगॅहर्ट्झपेक्षा कमी कंप्रतांच्या प्रक्षेपणात येणारे व्यत्यय कमीत कमी होतात. सामान्यतः ही दोन्ही तंत्रे एकत्रितपणे वापरतात. प्रक्षेपणात ध्वनीच्या विवर्धनासाठी कंप्रता विरूपण वापरता येत नाही म्हणून त्याऐवजी कला विरूपण वापरतात.
काही सूक्ष्मतरंग रेडिओ रीले (एका रेडिओ संदेशवहन दुव्याकडून मध्यस्थ रेडिओ केंद्राकडून-दुसऱ्या दुव्याकडे संकेत पाठविण्यासाठी वापरण्यात येणारी सूक्ष्मतरंग किंवा इतर रेडिओ प्रणाली) व दूरध्वनी व माहिती संस्कारणाच्या ठराविक पद्धती यांमध्ये कला विरूपण वापरतात. पोलीस व लष्कर वापरीत असलेल्या फिरत्या रेडिओ पथकांदरम्यानच्या संदेशवहनातही कला विरूपण वापरतात व हा उपयोग महत्त्वाचा आहे.
स्पंद विरूपण : यातील वाहक तरंग हा नियंत्रित रीतीने पुनरावृत्त होणाऱ्या स्पंदांची मालिका या रूपात असतो. स्पंद विरूपणात पाठवावयाचा संदेश दर्शविण्यासाठी परमप्रसर, काल, स्थान किंवा पृथक् स्पंदाचे फक्त अस्तित्व यांचे नियमन करता येते. स्पंद विरूपणाच्या या प्रकारांना अनुक्रमे स्पंद परमप्रसर विरूपण (पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन PAM), स्पंद काल विरूपण (पल्स ड्यूरेशन मॉड्यूलेशन PDM) अथवा स्पंद रूंदी विरूपण (पल्स विड्थ मॉड्यूलेशन PWM ), स्पंद स्थान विरूपण (पल्स पोझिशन मॉड्यूलेशन PPM) आणि स्पंद संकेत विरूपण (पल्स कोड मॉड्यूलेशन PCM) म्हणतात. यांपैकी स्पंद परमप्रसर विरूपणाशिवाय इतर सर्व प्रकार गोंगाट कमी होण्यासाठी अतिरिक्त पट्टविस्तार व्यापण्याची देवाणघेवाण करू शकतात.
स्पंद संकेत विरूपण : यामध्ये माहितीयुक्त संकेताने वाहक तरंगाचे स्थिर परमप्रसर स्पंदांच्या मालिकेत रूपांतर करतात व इष्ट माहिती सांकेतिक रूपात राहील अशा रीतीने या स्पंदांमधील अंतर ठरवितात. म्हणजे हे सर्व स्पंद एकाच परमप्रसाराचे व रुंदीचे असून ते समान अंतरावर असतात. आवाज, दूरचित्रवाणी चित्रे, संगणकाचा प्रदत्त (माहिती) यांच्यासारखे अखंड संकेत सामान्यपणे बौडॉट संकेतावलीत (किंवा तिच्या पर्यायी प्रकारांत) परिवर्तित करतात. यामध्ये ५ किंवा ७ ‘ऑन’ आणि ‘ऑफ’ स्पंदांचा आकृतिबंध (रचनागट) असतो. स्पंद संकेत विरूपणामुळे प्रेषणातील हानी किमान होऊन गोंगाट व व्यत्यय हे दोष दूर होतात. कारण ग्रहणाच्या ठिकाणी केवळ साध्या स्पंद-आकृतिबंधाचा शोध घेऊन तो ओळखण्याचे काम करावे लागते. शिवाय प्रेषण मार्गातील पुनःप्रेषण केंद्रांमार्फत कोणतीही विकृती (वा विपर्यास) न होता इलेक्ट्रॉनीय रीतीने या स्पंदांची पुननिर्मिती करता येते. अशा प्रकारे स्पंद संकेत विरूपणामुळे दूर अंतरापर्यत जवळजवळ विनाव्यत्यय माहितीचे प्रेषण करता येते. म्हणून हा स्पंद विरूपणाचा सर्वांत महत्त्वाचा प्रकार आहे.
स्पंद संकेत विरूपणाचा उपयोग दूरध्वनीसाठी व्यापक प्रमाणात करतात व संगणक अग्रांदरम्यान होणाऱ्या अंकीय माहितीच्या विनिमयासाठीही हे तंत्र विशेष उपयुक्त आहे. तसेच रेडिओ प्रेषण, दूरमापन, तारायंत्रविद्या इत्यादींमध्येही याचा उपयोग होतो. सीडी (काँपॅक्ट डिस्क) वरील अंकीय अथवा श्राव्य तपासासाठी यासारखे तंत्र वापरतात. दूरसंदेशवहन करणाऱ्या पुष्कळ संस्था व कंपन्याही स्पंद संकेत विरूपण वापरतात. उदा., COMSAT (कम्युनिकेशन्स सॅटेलाइट कॉर्पोरेशन १९६२ च्या दूरसंदेशवहन उपग्रह अधिनियमातील तरतुदीनुसार निर्माण केलेला सामान्य वाहक तरंग वापरून संदेशवहन उपग्रह सेवा पुरविणारी संस्था) आणि Intelsat (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट वरून आलेले संक्षिप्त रूप हे आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली असलेले उपग्रहांचे जाळे असून ८० हून जास्त देश जागतिक संदेशवहनासाठी याचा वापर करतात) या संघटना तारायंत्रविद्या, दूरध्वनी व दूरचित्रवाणी प्रेषण यांकरिता स्पंद संकेत विरूपणाचा उपयोग करतात.
पी. एम्. रेनी यांनी स्पंद संकेत विरूपणाचे एकस्व (पेटंट) ब्रिटनमध्ये १९२६ सालीच मिळविले होते. मात्र त्यांच्या या कार्याकडे दुर्लक्ष झाले. पुढे १९३९ साली एच्. ए. रीव्ह्झ यांनी अमेरिकेत स्वतंत्रपणे या तंत्राची कल्पना मांडली.
स्पंद काल विरूपण : यामध्ये नियमितपणे पुनरावृत्त होणाऱ्या स्पंदांची लांबी व क्रम यांद्वारे माहिती दर्शविली जाते. आंतरराष्ट्रीय मॉर्स सांकेतिक लिपी हे याचे परिचित उदाहरण आहे (जहाजे ते किनाऱ्यावरील केंद्र, हौशी रेडिओ संदेशवहन व इतर रेडिओ तारायंत्रविद्या प्रकार इ. विशिष्ट क्षेत्रांत याचा उपयोग करतात). तारायंत्रविद्येशिवाय याचा मुख्यतः दूरमापनात उपयोग होतो. अमेरिकन भौतिकीविज्ञ रेमंड ए. हीसिंग यांनी हे तंत्र १९२४ साली शोधून काढले.
अंकीय विरूपण : अंकीय संदेशवहन सूक्ष्मतरंग प्रणालीवर स्थापित करण्याच्या या पद्धतीत मोंडेमचा (विरूपणकारक व अविरूपणकारक अशा संयुक्त प्रयक्त्यांचा) वापर करीत नाहीत. या पद्धतीत अंकीय संकेताने निश्चित केलेल्या कंप्रता अवस्था किंवा पृथक्कला या रूपातील माहिती प्रेषित केली जाते. सुरक्षितता व गुप्तता राखणे, कोंडी होण्यास प्रतिबंध करणे, गोंगाटात बुडून गेलेल्या संकेतांचा वापर करून घेणे वगैंरेंसाठी हे तंत्र वापरता येते.
बहुविध विरूपण : विरूपणाचे व्यावहारिक उपयोग करून घेताना सामान्यतः बहुविध विरूपणाचा उपयोग होतो. बहुविध विरूपणात विरूपणाच्या प्रक्रियांचा एक क्रम असतो. या क्रमाने एका प्रक्रियेतील विरूपित तरंग हा पुढील प्रक्रियेत विरूपणकारी तरंग होतो. उदा., एका पद्धतीत स्थान विरूपित स्पंदांचा उपयोग वाहक ‘ज्या तरंगा’च्या परमप्रसराच्या विरूपणासाठी करतात. या पद्धतीला संक्षिप्तपणे PPMAM (पल्स पोझिशन मॉड्यूलेशन-अँप्लिट्यूड मॉड्यूलेशन) पद्धती म्हणतात. पाठवावयाच्या संदेशाची ज्या क्रमाने विरूपण प्रक्रियांशी गाठ पडत जाते, त्याच क्रमाने त्यांची ही माहिती दिलेली असते.
उपयोग : विरूपणाचे काही उपयोग या आधी आले आहेत. विरूपणाच्या विविध प्रकारांचे मुख्य उपयोग व त्यांचा वापर करणारी काही प्रमुख क्षेत्रे पुढे दिली आहेत : परमप्रसर विरूपणाचा उपयोग कमी झाला असला, तरी त्याचा रेडिओ व दूरचित्रवाणी प्रक्षेपण, दूरमापन, दूर अंतरावरील दूरध्वनी, जमिनीवरील व समुद्रावरील तारायंत्रविद्या, रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणात दोन रंगांचे एकाच वेळी प्रक्षेपण इ. क्षेत्रांत उपयोग होऊ शकतो.
विशेषतः रूंद पट्ट वाहक दूरसंदेशवहन, तसेच सूक्ष्मतरंग रेडिओ रीले प्रणालींवरील दूरचित्रवाणी कार्यक्रम, दूरध्वनी, तारायंत्रविद्या, रेडिओ प्रक्षेपण, दूरमापन, युद्धाच्या व शांततेच्या काळातील लष्करी फिरती संदेशवहन सेवा, मार्गनिर्देशनाच्या व वातावरण वैज्ञानिक कामांत साहाय्य, सागरी संकेत दीप इ. सर्वसामान्य क्षेत्रांतील दूरसंदेशवहनात कोन विरूपणाचा (कंप्रता व कला विरूपणांचा) उपयोग केला जातो.
रेडिओ, रडार, तारायंत्रविद्या, दूरध्वनी, दूरमापन, माहिती संस्करण, संगणक, स्विचिंग प्रणाली (संदेशवहन प्रणालीतील केंद्रे इष्ट रीतीने जोडणारी प्रणाली), सूक्ष्मतरंग रेडिओ रीले प्रणाली, दूरचित्रवाणी, प्रेषण व स्विचिंग संयुक्त प्रणाली इत्यादींमध्ये स्पंद विरूपणाचे स्पंद परमप्रसर, स्पंद काल, स्पंद स्थान व स्पंद संकेत हे प्रकार वापरले जातात.
उपग्रह व जमिनीवरच्या परिवाहांवरील आवाज, प्रदत्त व व्हिडिओ यांमध्ये अंकीय विरूपणाचा उपयोग होतो. बहुविध विरूपण हे सर्वांत साधे प्रेषक व ग्राही वगळता सर्व प्रेषक व ग्राही यांचे वैशिष्ट्य आहे.
पहा : तारायंत्रविद्या दूरध्वनिविद्या रेडिओ प्रेषण रेडिओ संदेशवहन प्रणाली विद्युत् स्पंद तंत्रे संदेशवहन अभियांत्रिकी.
संदर्भ : 1. Freeman, R. Manual f Reference or Telecommunications, New York, 1993.
2. Proakis, J. G. Digital Communications, New York, 1995.
3. Schwartz, M. Information, Transmission, Modulation and Noise, New York, 1990.
4. Van Valkenburg., M. E. Reference Data for Engineers : Radio, Electronics, Computer and communications, New York, 1992.
5. Zimmer, R. E. Tranter, W. H. Fanin, D. R. Signals and Systems : Continuous and Discrete, New York, 1992.
जोशी, के. ल. ठाकूर, अ. ना.
“