विमानातील उपकरणे : विमानाचे संचारण योग्य रीतीने करण्यासाठी व ते तसे चालले आहे याची खात्री करून घेण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे वापरतात. ही उपकरणे विमान (प्रणाली) व त्यांचातील उपप्रणाली यांची माहिती वैमानिक व इतर विमान कर्मचाऱ्यांना पुरवितात (विशिष्ट कार्य करण्यासाठी सामग्रीचे अनेक भाग एकत्रित केले जाऊन प्रणाली बनते आणि अशी स्वतःची वैशिष्ट्ये असलेल्या प्रणालीच्या मुख्य भागाला उपप्रणाली म्हणतात). ही उपकरणे परस्परांशी निगडित असतात. विमानातील उपकरणे व नियंत्रक (यंत्रणा) हे माणूस आणि यंत्र (विमान) यांच्यातील दुवा असून त्यांच्यामुळे विमान कर्मचाऱ्यांना नियोजित आराखड्यानुसार (आखणीनुसार) विमान चालविणे शक्य होते. विमान कर्मचारी, हवाई वाहतूक नियंत्रक व विमानाची देखभाल (संधारण) करणारे कर्मचारी यांना या उपकरणांमार्फत उड्डाणाविषयीची, तसेच मार्गनिर्देशन, एंजिनाचे कार्यमान (कार्यक्षमता) आणि विमानातील साहाय्यक सामग्रीचे कार्य यांबद्दलची माहिती मिळते. विशेषतः उड्डाण करताना वैमानिकांना या उपकरणांचा मोठा आधार असतो. संदेशवहनाची सामग्री या उपकरणांत अंतर्भूत करीत नाहीत. मात्र संदेशवहन सामग्रीचा विमानातील उपकरणांशी प्रत्यक्ष व विमानाच्या नियंत्रणाशी अप्रत्यक्ष रीतीने संबंध येतो. शिवाय उड्डाण करताना विमानाभोवती असलेल्या परिस्थितीची कल्पना देणारे हवामानाचे वृत्तांत व हवाई वाहतुकीविषयक सल्ला या गोष्टीही उड्डाणाचे नियोजन व निर्णयप्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी आवश्यक झाल्या आहेत.
मोठ्या आधुनिक विमानाच्या वैमानिक कक्षातील उपकरणांची संख्या व त्यांची विविधता खूपच वाढली आहे. तसेच उड्डाण कालातील विमानाच्या परिस्थितीविषयीची माहिती मिळण्याची गरजही वाढत आहे. यामुळे या सर्व माहितीचे अधिक चांगल्या रीतीने संयोजन करून ती सहजपणे कळेल अशा रीतीने वैमानिकाला चटकन उपलब्ध करून देण्यासाठी संगणक व आधुनिक इलेक्ट्रॉनीय अवगमदर्शन (डिस्प्ले) ही साधने वापरतात (माहितीचे दृश्यरूप वा तशा प्रकारचे साधन म्हणजे अवगमदर्शन होय). विमानातील उपकरणे व नियंत्रक वैमानिक व सहवैमानिक यांच्या समोर उपकरण फलकावर गटागटाने बसविलेली असतात.
मराठी विश्वकोशात उच्चतामापक, कोणादर्श, घूर्णी, दिक्सूचक,मार्गनिर्देशन, वाहतूक नियंत्रण, विमान परीक्षण, विमानांचा अभिकल्प व रचना या विमानातील उपकरणांशी निगडित असलेल्या स्वतंत्र नोंदीही आहेत.
प्रकार : विमानातील उपकरणांचे उड्डाण, मार्गनिर्देशन व शक्ति-संयंत्र (एंजिन) यांच्याशी निगडित असलेले असे तीन मुख्य प्रकार करतात. उड्डाण उपकरणांमुळे वैमानिकाला विमानाचा अपेक्षित रोख (क्षितिज सापेक्ष दिशा) राखण्यास मदत होते. हवासापेक्ष गतिदर्शक (एअर स्पीड इंडिकेटर ASI), चढण त्वरादर्शक, वळण (उदग्र अक्षाभोवतीची वलन त्वरा) व अक्षीय भ्रमण कोनदर्शक आणि घूर्णी क्षितिज ही उड्डाण उपकरणे होत. विमानाच्या अग्रगामी संचारणामुळे निर्माण होणारा हवेचा दाब एका उपकरणाच्या साहाय्याने मोजला जातो. या दाबामुळे विमानाला उत्थान (वर उचलणारी) प्रेरणा मिळत असते. त्यामुळे हा दाब एका किमान मूल्यापेक्षा कमी झाल्यास विमानाच्या गतीमध्ये अस्थैर्य येऊ शकते. हा दाब मोजून विमानाचा बाह्य हवासापेक्ष वेग कळतो. वळताना विमानाच्या वळण घेण्याच्या त्वरेचे मापन करण्यासाठी एक घूर्णी यंत्र योजना असते. आपण कोठे जात आहोत, हे वैमानिकाला जेव्हा दिसत नाही तेव्हा तो उड्डाण उपकरणांच्या मदतीने विमानाचे नियंत्रण करू शकतो. विमानातील मार्गनिर्देशन उपकरणे ही जहाजावरील मार्गनिर्देशन उपकरणांसारखी असतात. मात्र विमानात दाबमापी, रेडिओ व ध्वनी प्रकारची उच्चतामापके असतात. त्यांच्यामुळे वैमानिकाला विमान भूपृष्ठापासून योग्य उंचीवरून आणि नियंत्रक मनोऱ्यावरून मिळणाऱ्या सूचनेप्रमाणे सोयीस्कर अशा सुरक्षित अंतरावरून उडविणे शक्य होते. तसेच भौगोलिक सहनिर्देशकांच्या अथवा जमिनीवरील प्रेषकाच्या ( वा एखाद्या केंद्राच्या) संदर्भातील विमानाचे स्थान मार्गनिर्देशन उपकरणांमुळे समजते. चुंबकीय, घूर्णी इ. प्रकारचे दिक्सूचक, विविध प्रकारच्या दिशा व स्थान शोधक रेडिओ प्रणाली मार्गनिर्देशनासाठी वापरतात. शक्ति-संयंत्र उपकरणे मोटारगाडीतील तशा उपकरणांसारखी असतात. एंजिनाची शक्ती व अवस्था, त्याच्या आत असणारा दाब, एंजिनातील निष्कास वायूचे तापमान, त्यामधील इंधनाची परिस्थिती म्हणजे एंजिनाला होणाऱ्या इंधन पुरवठ्याची त्वरा, संचय टाकीतील इंधनाचा साठा इ. गोष्टींविषयीची माहिती या उपकरणांद्वारे मिळते. विमानाच्या यांत्रिक कार्यातील बिघाडाबद्दल विमानाला आगाऊ पूर्वसूचना देणारी उपकरणेही असतात. अशा प्रकारच्या सावध करणाऱ्या, धोक्याचा इशारा देणाऱ्या व सल्ला पुरविणाऱ्या उपकरणांमुळे उड्डाणाची असाधारण स्थिती अथवा सामग्रीविषयीच्या समस्या यांच्याबाबतीत कर्मचारी सावध होतात. विशेष महत्त्वाच्या यंत्राचे कार्य कसे चालले आहे याबद्दलच्या माहितीचे निर्देशन ऋण किरण दोलनदर्शकावर [⟶ इलेक्ट्रॉनीय मापन] करण्याची सोयही विमानात असते.
विमानाची कार्यक्षमता व विमान कोणत्या परिस्थितीत (उदा., उंची, हवामान, दृश्यमानता इ.) वापरावयाचे आहे यांवर त्यामधील उपकरणांची अचूकता व जटिलता (गुंतागुंत) अवलंबून असते. वजनाला हलक्या विमानातील उपकरणांचा संच हा सर्वांत लहान असतो. यात हवासापेक्ष गतिदर्शक, उच्चतामापक, एंजिन गतिदर्शक (फेरेगणक) व वर उल्लेखिलेली शक्ति-संयंत्र उपकरणे व चुंबकीय दिक्सूचक (होकायंत्र) ही उपकरणे असतात.
आ. १ मध्ये वैमानिकाच्या कक्षातील किमान आवश्यक असलेले नियंत्रक व उपकरणे दाखविले आहेत (यात १, ११, १२ व १३ हे नियंत्रक असून २ ते ९ उड्डाण उपकरणे, १४ शक्ति-संयंत्र उपकरण आणि १० व १५ मार्गनिर्देशन उपकरणे आहेत). अशा उपकरणांचे नियंत्रण ‘चालक तंत्रा’ने करता येते. म्हणजे हवामानाची परिस्थिती व दृश्यमानता वाजवी असल्यास या तंत्रानुसार क्षितिजरेषा प्रत्यक्ष पाहून विमानाचा रोख नियंत्रित करता येतो अथवा नकाशाच्या आधारे खालच्या भूप्रदेशाचे निरीक्षण करून किंवा वैमानिकाला या भूप्रदेशाच्या रचनेची माहिती असल्यास तिच्या आधारे मार्गनिर्देशन करता येते. कमी उंचीवरून आणि ‘चाक्षुष उड्डाण नियमां’नुसार (व्हिज्युअल फ्लाइट रूल्स VFR) विमान चालविताना अतिशय मूलभूत प्रकारची उपकरणे वापरतात. या उपकरणात प्रचलांची (बदलत्या राशींची) माहिती अजमावली जाते व या संवेदक माहितीचे यांत्रिक पद्धतीने सरळ रूपांतर होऊन ती इष्ट त्या वाचनांच्या रूपात उपकरणावर दर्शविली जाते. उदा., विमानाबाहेरील हवेच्या दाबाचे जमिनीपासूनच्या उंचीत रूपांतर होऊन ती उंची उच्चतामापकावर योग्य त्या एककात दर्शविली जाते.
दृश्यमानता कमी असताना ‘उपकरण उड्डाण नियमां’नुसार (इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स IFR) विमान चालविताना हीच माहिती अधिक अचूकपणे मिळणे आवश्यक असते. तसेच तिच्याबरोबर रोख व मार्गनिर्देशन यांचीही माहिती मिळणे गरजेचे असते. बाहेरील दृश्य संदर्भ दिसत नसताना कृत्रिम क्षितिज, वळणातील अक्षीय भ्रमण कोन व वळण सहनिर्देशन यांची रोखनियंत्रणासाठी लागणारी माहिती रोख दिग्दर्शनदर्शक (ॲटिट्यूड-डायरेक्टर इंडिकेटर ADI) या उपकरणाने मिळते. या उपकरणात उदग्र घूर्णी वा उड्डाण दिग्दर्शकाचा अथवा मार्गनिर्देशन प्रणालीचा दूरस्थ एक भाग म्हणून घूर्णी असू शकेल.
गतीचा पल्ला मोठा असताना निरनिराळ्या उंचींवरून विमान चालविणे सोपे व्हावे म्हणून दर्शकावरील हवासापेक्ष गती सुधारून मार्गनिर्देशनासाठी वास्तव गती घेतात तसेच उड्डाण नियंत्रणासाठी व कार्यक्षमतेसाठी रोख दिग्दर्शनदर्शकांवर माख अंकही दर्शवितात. तापमानाच्या व दाबाच्या विद्यमान परिस्थितीत असलेली विमानाची हवासापेक्ष गती व ध्वनीची गती यांच्या गुणोत्तराला ‘माख अंक’ म्हणतात. जेव्हा विमान ध्वनीच्या म्हणजे साधारणपणे ताशी १,१२० किमी. गतीने जाते तेव्हा ते माख-१ गतीने उडत असल्याचे म्हणतात. तथापि माख-१ गतीला ध्वनिकंपनांमुळे विमानाला धक्के बसतात व हे धोक्याचे असते. म्हणून विमान माख-१ पेक्षा कमी किंवा जास्त गतीने नेतात. तत्क्षणिक उदग्र गतिदर्शक (इन्स्टँटेनियस व्हर्टिकल स्पीड इंडिकेअर IVSI) या उपकरणाने विमानाच्या चढणीची (अथवा उतरणीची) त्वरा समजते. दिशानिर्देशक घूर्णीद्वारे किंवा निरूढी संदर्भप्रणालीतून मिळालेल्या माहितीवरून अभिमुख (अगग्रामी) दिशेतील परिस्थितीचा तपशील समजतो. मुख्य उपकरणाची आणि नियंत्रकांची मांडणी थेट वैमानिकासमोरील फलकावर इंग्रजी टी (T) अक्षराप्रमाणे केलेली असते. अनेक वर्षांच्या काळात विमानाची कार्यक्षमता व जटिलता वाढत गेली. तीनुसार उपकरण फलकावरील माहितीचे प्रकार व दर्शकांच्या जागा यांची मांडणी उत्क्रांत होत गेली.
उड्डाण उपकरणे : प्रमुख उड्डाण उपकरणांद्वारे विमानाची उड्डाणस्थिती व आवश्यक असलेल्या नियंत्रक हालचाली यांचे ‘चित्र’ निर्माण होते. या उपकरणांचा गट वैमानिकांसमोर असल्याने ती वापरायला सोयीस्कर असतात. यांपैकी काहींची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.
रोखदर्शक : हे घूर्णी स्वरूपाचे उपकरण असून याच्यामुळे वैमानिकाला बाहेरच्या दृश्याचे चित्र उपलब्ध होते. याची क्षितिज दर्शविणारी एक आडवी रेघ म्हणजे कृत्रिम क्षितिज असते. विमानातून पुष्कळदा प्रत्यक्ष क्षितिज दिसू शकत नाही. म्हणून या उपकरणाद्वारे असे कृत्रिम क्षितिज उपलब्ध करून दिले जाते. या कृत्रिम क्षितिजावर विमानाची एक प्रतिकृती विशिष्ट प्रकारे दर्शवितात. यामुळे विमानाची प्रत्यक्ष क्षितिजाच्या सापेक्ष असलेली स्थिती हुबेहूब दिसते. विमानातील घूर्णी योजनेद्वारे कृत्रिम क्षितिज व प्रत्यक्ष क्षितिज एकमेकांशी नेहमी समांतर राहवीत अशी व्यवस्था केलेली असते. प्रत्यक्ष क्षितिजाच्या संदर्भात विमान जसे हालते, तशी त्याची प्रतिकृति कृत्रिम क्षितिजाच्या संदर्भात अचूकपणे हालते.
रोख दिग्दर्शनदर्शकात परंपरागत रोखदर्शक व विद्युतीय उड्डाण दिग्दर्शन यांची सांगड घातलेली असते. इलेक्ट्रॉनीय रोख दिग्दर्शनदर्शकात (EADI) विमानाचा रोख, जमिनीवरील गती, गतिविचलन, मार्गनिर्देशनाची ठराविक माहिती व इतर माहिती दिसते. अगदी नवीन प्रकारच्या विमानांत हे उपकरण हा इलेक्ट्रॉनीय उड्डाण उपकरण प्रणालीचा एक घटक असतो. प्रचलित रोख दिग्दर्शनदर्शक व क्षैतिज स्थितिदर्शक (हॉरिझाँटल सिच्युएशन इंडिकेटर HSI) यांची जागा ऋण किरण नलिकांच्या (कॅथोड रे ट्यूब्ज CRT) पडद्यांनी घेतली आहे. याकरिता बहुरंगी ऋण किरण नलिकांच्या, प्रत्येक वैमानिकासाठी एक अशा, दोन जोड्या असतात. जोडीतील एक नलिका ही रोख दिग्दर्शनदर्शकाचे, तर दुसरी क्षैतिज स्थितिदर्शकाचे काम करते. या नलिका उड्डाणाच्या सर्व अवस्थांमध्ये विमानाचा रोख व स्थान यांची माहिती देतात. उच्च विभेदनक्षमतेच्या, सूर्यप्रकाशातही वाचता येणाऱ्या, इलेक्ट्रॉनिकी दर्शकावर पूर्वीच्या विद्युत्यांत्रिक उपकरणांवर दाखविता न येणारी पुष्कळ वेचक माहिती किमान फापटपसाऱ्यात दाखविता येते.
वळण व अक्षीय भ्रमण कोनदर्शक : विमान त्याच्या सुकाणू अक्षाभोवती फिरते तेव्हा एका घूर्णीने त्याच्या या भ्रमणाची त्वरा कळते. अक्षीय भ्रमण कोनदर्शकात एका वाकड्या नळीत गोळी असते. विमानाचा पंख समतल पातळीत असतात तेव्हा ही गोळी नळीच्या मध्यभागी असते. मात्र पंख समतल पातळीत नसतो तेव्हा ही गोळी खाली गेलेल्या बाजूला नळीत घरंगळत जाते. अक्षीय भ्रमण कोन योग्य असला की, विमान वळताना गोळी नळीच्या मध्यभागी राहते, तथापि हा कोन अचूक नसतो तेव्हा विमान वळताना हा गोळी खाली गेलेल्या बाजूस घरंगळत जाते.
हवासापेक्ष गतिदर्शक : या उपकरणांद्वारे विमानाचा रोख राखून ठेवण्यासाठी व मार्गनिर्देशनासाठी माहिती मिळते. हा एक प्रकारचा दाबमापक आहे. जिचे उघडे तोड हवेच्या प्रवाहाच्या दिशेत असते अशा गतिनलिकेमुळे (पिटॉट नलिकिंळे) निर्माण होणारा दाब आणि ज्या उंचीवर विमान उडत असते त्या उंचीवरील बाहेरच्या हवेचा म्हणजे स्थितिज दाब यांच्यातील फरक उपकरणातील दर्शक काट्याने दर्शविला जातो. अशा रीतीने विमानाचा पंख हवेतून जाताना त्याला मिळणाऱ्या आधाराने मापन हवासापेक्ष गतिदर्शकाद्वारे होते.
क्षैतिज स्थितिदर्शक : या उपकरणाने अग्रमानी दिशा, नियोजित मार्गापासूनचे विचलन (च्युती), तसेच मार्गनिर्देशनापासूनचा कल व अंतर दर्शविले जाते, अग्रगामी दिशादर्शक, रेडिओ चुंबकीय दर्शक, मार्ग दिशादर्शक व पल्ला (परिक्षेत्र) दर्शक या चार स्वतंत्र उपकरणांची माहिती क्षैतिज स्थितिदर्शकाच्या एकाच अवगमदर्शकावर दर्शविली जाते.
इलेक्ट्रॉनीय क्षैतिज स्थितिदर्शकात (EHSI) एक संकलित नकाशा अवगमदर्शक असतो. या उपकरणाद्वारे विमानतळ व जमिनीवरील रेडिओ मार्गनिर्देशन केंद्र यांच्या संदर्भातील विमानाचे वास्तव स्थान दर्शविणारा रंगीत नकाशा उपलब्ध होतो, तसेच हवामान रडार (वेदर रडार WXR) अवगमदर्शनही उपलब्ध होते. विमानाचा आखलेला मार्ग, वळण प्राक्कथनदर्शक व संकंल्पित उड्डाण पथ यांच्याद्वारे विमानाच्या प्रत्यक्ष स्थानांचा त्याच्या अपेक्षित स्थानाशी असलेला संबंध दर्शविला जातो. मग वैमानिक उड्डाण पथ जलदपणे व अचूकपणे सुधारू शकतो. विद्यमान हवामानविषयत उपलब्ध माहिती वैमानिक या नकाशावर अध्यारोपितही करू शकतो. याशिवाय दिसायला पूर्वीसारखे पण इतर सर्व बाबतींत आधुनिक असे अवगमदर्शकही यात उपलब्ध आहेत. नकाशा व रडार यांचे प्रमाण वैमानिक निवडू शकतो. मात्र ते दोन्हींसाठी एकच असते. विमानाची विद्यमान उंची व स्थान यांनुसार असलेली वाऱ्याची गती व दिशा या गोष्टी निरूढी संदर्भ प्रणालीमार्फत मिळतात व त्या सर्वकाळ दर्शविल्या जातात. विमानाचे क्षैतिज स्थान व नियोजित उदग्र पथापासून झालेले विचलन ही ही याद्वारे उपलब्ध होतात. अशा रीतीने हे उपकरण बहुमितीय स्थितिदर्शकाचे काम करते. नकाशा दर्शकात उड्डाणाची मूळ योजना व तीनुसार असलेला उड्डाण-मार्ग. नियोजित मार्गातील स्थळे, मार्गनिर्देशनाच्या सोयी इ. तपशील दिसतो. उदा., मार्गनिर्देशक केंद्रे, विमानतळ, मार्गावरील स्थळांची उंची, हवामानविषयक रडार संदेश वगैरे माहितीच्या कळी (बटने) दाबून वैमानिक विशिष्ट माहिती दर्शकावर आणू शकतो.
उदग्र गतिदर्शक : (व्हर्टिकल स्पीड इंडिकेटर VSI). याचा विमानाच्या चढणीची वा उतरणीची त्वरा स्थिर व विमानाचा मार्ग समतल राखण्यासाठी वैमानिकाला उपयोग होतो. उच्चतामापकाप्रमाणेच याचे कार्यही वातावरणीय दाबावर चालते. बाहेरच्या हवेच्या दाबात होणारा बदल मोजून त्यावरून उंचीत होणाऱ्या बदलांची त्वरा म्हणजे दर मिनिटात उंचीत किती बदल झाला हे या उपकरणात दर्शविले जाते. अधिक विमानांत इलेक्ट्रॉनीय उदग्र गतिदर्शक (EVSI) वापरतात.
उच्चतामापक : सामान्यपणे विमानाची समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी या उपकरणात वातावरणीय दाबाचा उपयोग होतो. हा एक प्रकारचा दाबमापकच असून यात पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीच्या खुणा मिमी. ऐवजी मी. मध्ये असतात. वाढत्या उंचीनुसार दर ३३० मी. उंचीमागे पाऱ्याच्या स्तंभात दर्शविलेला वातावरणीय दाब २५ मिमी.ने कमी होत जातो. यातील माहिती विविध प्रकारे [उदा., त्रिक्दर्शक, दंडगोल व सूचक यांचे एकत्रित गट किंवा हवा प्रदत्त (माहिती) प्रणालींकडून उंचीचे संकेत मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती] दर्शविली जाते. प्रमाण तापमानापेक्षा कमी तापमानाला हवा संकोच पावते आणि उच्चतामापकाने दाखविलेल्या उंचीपेक्षा प्रत्यक्ष उंची कमी असते. [⟶ उच्चतामापक].
इलेक्ट्रॉनीय उड्डाण उपकरण प्रणाली : उड्डाण व्यवस्थापन प्रभावी होण्यासाठी वैमानिकाला बिनचूक माहिती योग्य वेळी पुरविणे गरजेचे असते. वैमानिकाच्या विविध कामांच्या स्वरूपांनुसार त्याला कोणती माहिती हवी ते कळते. ही माहिती सोयीस्कर स्वरूपात व सर्वात उत्कृष्ट रीतीने पुरविणे चांगले असते. या माहितीचा उपयोग करून घेण्याआधी वैमानिकाला तिच्यावर मोठ्या प्रमाणात संस्करण (उदा., मनातल्या मनात आकडेमोड करणे) करावे लागत नसेल, तर त्याला अधिक माहिती पुरविता येते व बरीचशी माहिती त्याला कमी श्रमात आत्मसात करता येते. यामुळे चुका कमी होतात व वैमानिकाला जास्त प्रशिक्षणाची गरज उरत नाही. याबाबतीत संगणकामार्फत निर्माण होणाऱ्या अवगमदर्शनांमुळे चांगली प्रगती झाली असून अशा सुधारणांना बराच मोठा वाव आहे. उदा., रोख दिग्दर्शनदर्शक व क्षैतिज स्थितिदर्शक यांची जागा अधिक सोयीस्कर अशा ऋण किरण नलिका अवगमदर्शनाने घेतली आहे, तर इलेक्ट्रॉनीय रोख दिग्दर्शनदर्शकाद्वारे बहुरंगी ऋण किरण नलिका अवगमदर्शनाने उपलब्ध होतात. त्यावरून विमानाच्या रोखविषयीची माहिती मिळतेच, शिवाय स्वयंचलित उड्डाण नियंत्रण प्राणालीचे काम कोणत्या प्रकारे होत आहे ते सूचित होते, रेडिओ उच्चतामापकावरील मापन उपलब्ध होते आणि हवासापेक्ष गतिदर्शकाजवळच जमिनीवरील गती अंकीय रीतीने दर्शविली जाते.
अवगमदर्शक : (डिस्प्लेज). आधुनिक उपकरणांद्वारे वैमानिकासमोरच्या अवगमदर्शकांवर माहितीचे अधिकाधिक प्रमाणात एकत्रीकरण केले जाते. यामुळे वैमानिकाला एकाच दृष्टिक्षेपात अधिक माहिती पाहता येते. इलेक्ट्रॉनिकी व संगणक यांच्यातील प्रगतीमुळे उड्डाण मंचाचा (उड्डाणात विशिष्ट विमान चालविण्यासाठी कर्मचारी उंचावरील ज्या कक्षात बसतात त्या कक्षाचा) अभिकल्प (आराखडा) व वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकी यांच्यामध्ये वाढत्या प्रमाणात एकत्रीकरण होत आहे. संकलित (एकत्रित) अंकीय उड्डाण व्यवस्थापन प्रणाली व ऋण किरण नलिका अवगमदर्शक यांच्यामुळे विमानाचे स्थान पूर्वीपेक्षा अधिक परिपूर्ण रीतीने कळू शकते.
उन्नत शीर्ष अवगमदर्शक (हेड्स अप डिस्प्ले HUD) या इलेक्ट्रॉनीय संकलित प्रणालीमुळे बाह्य दृश्यावर आवश्यक त्या मार्गदर्शक माहितीचे वैमानिक अध्यारोपण करू शकतो. यामुळे विमानाची गती व उंची या महत्त्वाच्या गोष्टी वैमानिकाला समोरच्या वातरोधक पारदर्शक पडद्यावर पाहता येतात. ही पद्धती मुख्यत्वे लष्करी संचलनात वापरतात. अर्थात नागरी विमानांसाठी पण तिचे काही उपयोग होऊ शकतील.
मार्गनिर्देशन उपकरणे : विमान चालविताना विविध प्रकारची मार्गनिर्देशन उपकरणे व अवगमदर्शक यंत्रणा वापरतात. त्यांच्यामुळे वैमानिकाला विमान उडविताना त्याच्या नियोजित मार्गाविषयी तर धावपट्टीवर उतरताना पोहोचमार्गविषयक मार्गदर्शन होते. यांपैकी काही प्रणाली पूर्णतया विमानात असतात, तर काहींची आवश्यक सामग्री विमानात आणि जमिनीवर अशी दोन्ही ठिकाणी असते. [⟶ मार्गनिर्देशन].
मार्गनिर्देशन उपकरणांद्वारे पृथ्वीवरील विशिष्ट स्थळाच्या संदर्भातील विमानाचे स्थान ठरविता येते. विमानाच्या मार्गनिर्देशनाला साहाय्यभूत अशी काही उपकरणे व यंत्रणा पुढे दिल्या आहेत.
अति-उच्च कंप्रता सर्वदिशिक रेडिओमापन यंत्रणा (व्हेरी हायफ्रिक्केन्सी ऑम्निडायरेक्शनल रेडिओ रेंजेस VOR) हे उपकरण पृथ्वीच्या विनिर्दिष्ट स्थानावरील मार्गनिर्देशनासाठी ⇨दिगंशविषयक माहिती सर्व दिशांना प्रेषित करते. ही केंद्रे प्रमुख रेडिओ मार्गदर्शक साहाय्यकारी यंत्रणा असते. विमानाच्या मार्गाची निश्चिती व धावपट्टीवरील विमानाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे यांसाठी या केंद्रांचा उपयोग होतो. जमिनीवरील या प्रेषकाचा पल्ला १३० नाविक मैल (१ नाविक मैल = १·८५१ किमी.) असतो. यातील माहिती क्षैतिज स्थितिदर्शकावर व हलत्या काट्याने दर्शविली जाते. अंतरमापक सामग्री (डिस्टन्स मेझरिंग इक्किपमेंट DME) हे उपकरण विमानतळावरच्या अथवा विमानतळालगतच्या साहाय्यक रेडिओ यंत्रणेपर्यतचे अथवा अति-उच्च कंप्रता सर्वदिशिक रेडिओ यंत्रणेपर्यतचे अंतर दर्शविते. स्वयंचलित दिशाशोधकाने (ऑटोमॅटिक डायरेक्शन फाइंडर ADF) साधारणपणे निम्न कंप्रतेच्या रेडिओ केंद्राचा कल (दिगंश) समजतो. लघु-पल्ला रेडिओ उच्चतामापक (लो-रेंज रेडिओ अल्टिमीटर LRRA) हे उपकरण रडारच्या मदतीने कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानाची भूप्रदेशापासूनची उंची निश्चित करते. उपकरणयुक्त अवतरण प्रणाली (इन्स्टुमेंट लँडिंग सिस्टिम ILS)योग्य प्रकारच्या सुविधा असलेल्या धावपट्ट्यांवरील अवतरणाच्या वेळी योग्य मार्गाच्या दिशेत व कोनात रेडिओ संदेश प्रेषित करते व प्रत्यक्ष अवतरण मार्गाचे संदेशाद्वारे आलेल्या मार्गापासून वरखाली व आडव्या दिशेत झालेले विचलन दर्शविते. काही ठराविक उपयोगांसाठी विशेष कार्यक्षमता असलेले संगणक काही प्रकारच्या निरूढी मार्गनिर्देशन प्रणालीत वापरतात. त्यांच्यामुळे विमानाचे अचूक अक्षांश-रेखांश, गती, मार्ग आणि कलयांविषयीची माहिती उपलब्ध होते. या सामग्रीच्या जोडीने युग्मित स्वयंचलित वैमानिक यंत्रणा एकत्रितपणे वापरल्यास स्वयंचलित नियंत्रित उड्डाण व दृश्यमानता कमी (मंद) असतानाचे अवतरण करणे शक्य होते. दाट धुक्याच्या परिस्थितीत अवतरण करावयचे झाल्यास आवर्धित (सुधारित) नियंत्रक व प्रगत अवगमदर्शक यंत्रणा यांच्या मदतीने अखेरीस वैमानिक विमानाने नियंत्रण स्वतःच्या हाती घेतो. तथापि हल्ली स्वहस्ते अवतरण करताना वैमानिकाला बाहेर पहावे लागते अथवा स्वयंचलित अवतरणाचे बोधन संनिरीक्षण करावे लागते.
इलेक्ट्रॉनीय मार्गनिर्देशन प्रणाली : ही प्रणाली वैमानिकाला उड्डाण मार्गाची माहिती अखंडपणे पुरविते. विमानाच्या मार्गदर्शनासाठी अशा अनेक प्रणाली वापरतात. अदिशिक रेडिओ संकेत प्रणाली (नॉनडायरेक्शनल रेडिओ बीकॉन NDB) म्हणजे जमिनीवरील प्रेषक असून त्याचा पल्ला ७५ नाविक मैलांपर्यत असतो. विमानाचा हवाई मार्ग निश्चित करणे, विमानाच्या धावपट्टीवरील प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे, उपकरण प्रवेश मार्गावरील महत्त्वाची स्थाने निश्चित करणे यांसाठी याचा उपयोग होतो. विमानगती (हवाई) स्वयंचलित दिशा सोधकांद्वारे या प्रणालीला दिशा दर्शविली जाते. कलदर्शक काट्याने या प्रणालीची माहिती दर्शविली जाते.
अंतरमापक सामग्रीमध्ये जमिनीवरच्या एका प्रेषकाद्वारे दृष्टिरेषेतील १९९ नाविक मैलांपर्यतचे अंतर कळते. नाविक मैलांतील ही माहिती अंकीय रूपात दिसते.
उपकरणाच्या मदतीने अवतरण प्रणाली ही प्रेषण प्रणाली आहे. धावपट्टीवरील अंतिम प्रवेशाच्या वेळी उतरण व मार्गरेषा या दृष्टींनी मार्गदर्शन करण्याचे काम ही प्रणाली करते. १८ नाविक मैलांचा पल्ला असणारे ‘स्थानकीकारक’ प्रेषकांमार्फत धावपट्टीच्या मध्यरेषेच्या संदर्भात विमानाचे पार्श्वीय दृष्टीने मार्गदर्शन करणारे संदेश पाठविले जातात. विमानाच्या क्षैतिज व विसर्पण पथ यांच्यातील कोन म्हणजे विसर्पण कोन होय. विसर्पण कोन प्रेषकाचा पल्ला १० नाविक मैल असून त्याच्याकडून धावपट्टीपासून तीन अंशांच्या कोनाने शलाका वर प्रेषित होते. स्थानकीकरण मार्ग व विसर्पण कोन हे विमानाच्या रोख दिग्दर्शनदर्शकावर व क्षैतिज स्थितिदर्शकावर दर्शविले जातात. विसर्पण कोन स्थानकीकरणाची मध्यरेषा यांच्यापासून होणारी विचलने रोख दिग्दर्शनदर्शकावरील बाजूच्या व तळावरच्या दर्शक काट्यांनी दर्शविली जातात. उपकरणाच्या मदतीने अवतरण करण्याच्या प्रणालीची माहिती उड्डाण दिग्दर्शन प्रणालीद्वारे रोख दिग्दर्शनदर्शकावरील छेद-तंतूच्या रूपात दर्शविली जाते. सूक्ष्मतरंग अवतरण प्रणालीचा (मायक्रोवेव्ह लँडिग सिस्टिम MLS) पल्ला किमान २० नाविक मैल असून तिच्याद्वारे धावपट्टीवर अचूकपणे प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन होते, तसेच धावपट्टीवरील वक्र वा खंडयुक्त प्रवेशासाठीही हिचे मार्गदर्शन होते. वैमानिकाला निवडता येणाऱ्या तीव्र विसर्पण कोनांना अनुसरूनही हिचे मार्गदर्शन होते. पुष्कळ प्रमाणात हिची माहिती उपकरणांद्वारे अवतरण प्रणालीप्रमाणे प्रदशित होते. ओमेगा (OMEGA) आणि दीर्घ पल्ला मार्गनिर्देशन (लाँग रेंज नेव्हिगेशन LORAN) या रेडिओ मार्गनिर्देशन प्रणालींमध्ये जागतिक पातळीवरील संदेश ग्रहण करण्यासाठी जमिनीवरील केंद्रांचे जाळे वापरतात. या दोन प्रणालींमुळे वैमानिकाने निवडलेल्या उड्डाण पथानुसार उड्डाण करता येते. दीर्घ पल्ला मार्गनिर्देशन पद्धतीमुळे अपरिशुद्ध उपकरण धावपट्टीवरील प्रवेशासाठी वापरतात. रोख दिग्दर्शनदर्शक, क्षैतिज स्थितिदर्शक व इतर उपकरणे, विमानाचे स्थान, जमिनीवरील मार्ग व गती, तसेच उड्डाण मार्ग व अंतर, येण्याची अंदाजित वेळ (एस्टिमेटेड टाइम ऑफ अराइव्हल ETA) ही माहिती निवडक स्थानांसाठी प्रदर्शित करतात. या स्थानांना मार्गनिर्देशनातील संदर्भ स्थाने ( बिंदू ) म्हणतात.
इलेक्ट्रॉनीय तंत्रविद्येत १९६०–८० दरम्यान झालेल्या प्रगतीमुळे मार्गदर्शनाच्या दृष्टीने उपयुक्त अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. उदा., लेसर धूर्णी (प्रकाशकीय तंतूंनी बनलेल्या कड्यांसारख्या मार्गात दोन लेसर शलाका परस्पर विरूद्ध दिशांनी जातात आणि त्यांच्या साहाय्याने अक्षीय परिभ्रमण मोजता येते), पट्ट्याने बांधता येणारी निरूढी संदर्भ प्रणाली, रंगीत ऋण किरण नलिका, द्रवस्फटिक अवगमदर्शन (लिक्किड स्टल क्रिडिस्प्ले LCD), प्रकाश उत्सर्जक द्विप्रस्थ (लाइट एमिटिंग डायोड LED) आणि अंकीय प्रदत्त प्रेषक. १९८०–९० दरम्यान विकसित झालेल्या व्यापारी वाहतुकीच्या झोन विभागामध्ये सुरक्षितता, कार्यमान, अर्थकारण व प्रवासी सेवा यांत सुधारणा करण्यासाठी अंकीय इलेक्ट्रॉनिकीचा उपयोग होऊ लागला. संकलित उड्डाण व्यवस्थापन प्रणालीच्या (फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टिम FMS) या संकल्पनेत विद्यमान व भावी काळातील हवाई वाहतुकीच्या आणि इंधन-बचतीच्या गरजा भागविणे अभिप्रेत आहे. स्वयंचलित उड्डाण नियंत्रण, इलेक्ट्रॉनीय उड्डाण उपकरण अवगमदर्शन, संदेशवहनाचे प्रकार, मार्गनिर्देशन, मार्गदर्शन, कार्यमान व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची सावधानता यांचा या संकल्पनेत अंतर्भाव होतो.
उड्डाण व्यवस्थापन प्रणाली : उड्डाण व्यवस्थापन प्रभावीपणे होण्यासाठी उड्डाणविषयक प्रसंगोचित माहिती सहजगत्या उपलब्ध असावी लागते. तसेच विमानाचे नियंत्रण योग्य कार्यभाराच्या मर्यादेत होण्यासाठी सोयीस्कर साधने वैमानिकाला उपलब्ध असावी लागतात. माहिती संस्करणाची व्यापक व्यवस्था आणि उड्डाण व्यवस्थापन प्राणालीचा एकत्रित अभिकल्प यांच्यामुळे वैमानिकाला समर्पक माहिती तसेच उड्डाणाच्या सर्व अवस्थांमधील नियंत्रणाचे निरनिराळे विकल्प उपलब्ध होतात. संकलित उड्डाण व्यवस्थापन प्रणालीचे घटक आ. २ मध्ये दाखविले आहेत. हिची माहिती क्षैतिज स्थितिदर्शक, रोख दिग्दर्शनदर्शक व नियंत्रक अवगमदर्शक यांवर दर्शविली जाते.
संवेदक, संगणक प्रणाली आणि वैमानिकाच्या कक्षातील नियंत्रण व अवगमदर्शक हे वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीचे तीन भाग आहेत. संवेदक व संगणक उपप्रणाली यांचे कार्य वैमानिकाच्या कक्षातील नियंत्रकांमार्फत चालते आणि त्यांच्याकडून मूळ व संस्कारित माहिती अवगमदर्शकांवर उपलब्ध होते. वैमानिकाच्या कक्षात या प्रणालीचे पुढील घटक असतात : सावधानता – सल्लागारी अवगमदर्शक, रोख दिग्दर्शनदर्शक, क्षैतिज स्थितिदर्शक (यातच नकाशा व हवामान रडार येतात), संवेदक व संगणक उपप्रणाली यांचे नियंत्रक. यांपैकी वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीच्या पुढील प्रणाली उल्लेखनीय आहेत : निरूढी संदर्भ प्रणाली (इनर्शियल रेफरन्स सिस्टिम IRS), उड्डाण व्यवस्थापन संगणक (FMC), इलेक्ट्रॉनीय उड्डाण उपकरण प्रणाली (इलेक्ट्रॉनिक फ्लाइट इन्स्ट्रुमेंट सिस्टिम EFIS) आणि सावधानता व इशारा प्रणाली.
उड्डाण व्यवस्थापन संगणक : (फ्लाइट मॅनेजमेंट काँप्युटर्स FMC). या संगणकांमार्फत मार्गनिर्देशन, मार्गदर्शन आणि कार्यमान यांच्या व्यवस्थापनविषयक कार्याचे एकत्रीकरण (संकलन) केले जाते. विमानाचे विद्यमान स्थान व वेग यांची माहिती कर्मचाऱ्यांना अवगमदर्शकावरून मिळते व तिच्यावरच विमानाचे अचूक पथदिग्दर्शन अवलंबून असते. अति-उच्च कंप्रतेची सर्वदिशिक रेडिओ यंत्रणा व अंतरमापक सामग्री यांच्याकडून, तसेच निरूढी संदर्भ प्रणालीकडून मिळालेल्या माहितीचे एकत्रीकरण करून विमानाचे विद्यमान स्थान व वेग ठरवितात. उड्डाणात विमान पुढे जाताना जमिनीवरील योग्य ती VOR/DME केंद्रे विमानातील रेडिओ ग्राहीशी आपोआप मेलित होतात (लागतात), परंतु गरज भासल्यास वैमानिकही हाताने ती मेलित करू शकतो. नियंत्रण अवगमदर्शक विभाग (कंट्रोल – डिस्प्ले युनिट CDU) हा वैमानिक व उड्डाण व्यवस्थापन संगणक यांच्यातील दुवा असतो. उड्डाण योजना, कार्यमान व सल्लागारी माहिती या विभागाच्या अवगमदर्शक पडद्यावर पहायला सतत उपलब्ध असते. ही माहिती ऋण किरण नलिकेच्या पडद्यावर प्रदर्शित केली जाते व या नियंत्रण अवगमदर्शक विभागाचे नियंत्रण सूक्ष्मप्रक्रियकांमार्फत (मायक्रोप्रोसेसरमार्फत) केले जाते.
निरूढी प्रणाली : निरूढी मार्गनिर्देशन प्रणाली (इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम INS) व निरूढी संदर्भ प्रणाली (IRS) यांमध्ये विमानांतर्गत मार्गदर्शन प्रयुक्त्या वापरतात. तथापि, स्वतःचे अद्ययावत स्थान जाणून घेण्यासाठी या दोन्ही प्रणालींना बाह्य मार्गनिर्देशनांची मदत घेता येते. विमानाची दिशा व वेग यांतील बदल समजण्यासाठी व त्याचा मागोवा घेण्यासाठी निरूढी मार्गनिर्देशन प्रणालीत घूर्णी व प्रवेगमापक वापरतात. विमानाचे आरोहण होताना निरूढी-विचलनाचे संवेदन (जाणीव) होते व त्याचे परिवर्तन स्थानविषयक माहितीत होते.
निरूढी संदर्भ प्रणालीत यांत्रिक घूर्णीऐवजी लेसर घूर्णी वापरतात. लेसर घूर्णीत हलणारा एकच भाग असतो. फिरणारे चाक नसल्याने याची रचना परंपरागत घूर्णीसारखी नसते. लेसर घूर्णीत विभाजित लेसर शलाका वापरतात. शलाकेचे हे दोन भाग बंदिस्त त्रिकोणी मार्गाभोवती परस्परविरुद्ध दिशांनी जातात (आ. ३). कोनीय हालचाल झाली की, लेसरच्या कंप्रतांमधील फरक लक्षात येतो व तो मोजला जातो. यावरून कोनीय त्वरा कळते. निरूढी संदर्भ प्रणालीद्वारे गुरूत्व व पृथ्वीचे अक्षीय परिभ्रमण यांचे आकलन होते. ही प्रणाली मार्गनिर्देशनविषयक माहिती क्षैतिज स्थितिदर्शकाच्या अवगमदर्शकाला व रोखविषयक माहिती रोख दिग्दर्शनदर्शकाला पुरवितो, तसेच निरूढी संदर्भ प्रणाली उड्डाण व्यवस्थापन प्रणालीसाठी माहिती पुरविते.
निरूढी प्रणाली विमानाला (किंवा वाहकाला) जोडण्याचे अथवा पट्ट्याने बांधून ठेवण्याचे तंत्र व लेसर घूर्णी तंत्रविद्या १९७०-८० दरम्यान विकसित झाल्या. त्यांचा निरूढी मार्गनिर्देशनाला फायदा झाला. आधीच्या अतिशय अचूक निरूढी मार्गनिर्देशन प्रणालीमध्ये महागडा व अवजड आधार-फलाट वापरीत. निरूढी व्यूह पट्ट्याने बांधून ठेवण्याच्या तंत्रामुळे या फलाटाची गरज उरली नाही. [⟶ मार्गनिर्देशन].
एंजिन उपकरणे : एंजिनाच्या कार्याच्या मर्यादा व क्षमता निर्दिष्ट करण्यासाठी विशिष्ट उपकरणे लागतात. दट्ट्याच्या एंजिनाच्या बहुमुखी नळीतील वायूचे अंतर्ग्रहण व निष्कासन दाब, सिलिंडर शीर्षकाच्या आतील भागाचे व वंगणाचे (तेलाचे) तापमान, वंगणाचा दाब, एंजिनाची गती (फेरे), पंख्याच्या पात्याचा अंतराल (सूत्रांतर) यांचे निर्देशन या उपकरणांनी केले जाते. झोत एंजिनातील अशी उपकरणे रेटा अथवा दाब-गुणोत्तर (एंजिन प्रेशर रेशो EPR), निष्कास वायूचे तापमान (एक्झॉस्ट गॅस टेंपरेचर EGT), घूर्णकाची फिरण्याची गती, वंगणाचे तापमान व दाब, मोठ्या विमानातील प्रत्येक एंजिनातील इंधनाची गती (किग्रॅ/तास), प्रत्येक टाकीत राहिलेल्या इंधनाची राशी यांचे निर्देशन करतात. दोन्ही प्रकारच्या एंजिनांतील कंरनबोधक यंत्रणामार्फत असंतुलन (अस्थैर्य) व संभाव्य संकट यांची पूर्वसूचना दिली जाते. एंजिन उपकरणे एकमेकांजवळ असतात. मोठ्या विमानांत ती विमानाच्या पुढील भागात दोन्ही वैमानिकांना दिसतील अशा रीतीने त्यांच्यापुढील उपकरणफलकाच्या मध्यभागी बसविलेली असतात. एंजिनाच्या कार्यमानाच्या मर्यादा गणनाद्वारे काढणे व दर्शविणे या कामांसाठी खास हेतूंचे संगणक वापरतात. (विशिष्ट उपयोगांसाठी खास करून कार्यक्षम ठरतीस अशा रीतीने या संगणकांचा अभिकल्प तयार केलेला असतो).
एंजिन-स्थितिदर्शक : प्रचालन प्रचल (प्रचल म्हणजे दिलेल्या परिस्थितीत स्थिर असणारी राशी, मात्र इतर परिस्थितीत ती वेगळी असू शकते) व उपप्रणाली स्थितिदर्शक यांचे अवगमदर्शक, तसेच संपूर्ण सावधानता व इशारा प्रणाली व तिचे स्थितिदर्शक यांचे काळजीपूर्वक एकत्रीकरण करून एंजिन-स्थितिदर्शक व कर्मचारी सावधानता प्रणाली (एंजिन-इंडिकेशन अँड क्रयू-अँलर्टिंग सिस्टिम EICAS) विकसित केली आहे. दोन कर्मचारी असलेल्या विमानांत प्रचालन नियंत्रण व उपप्रणाली बोधन यांसाठीचे अतिरिक्त स्वयंचलन या प्रणालीद्वारे उपलब्ध होते.
एंजिन-स्थितिदर्शक व कर्मचारी सावधानता प्रणाली मध्यवर्ती ऋण किरण नलिका व इतर अवगमदर्शक यांच्यावरील माहिती एकत्रित करते आणि एंजिन व उपप्रणाली यांच्या प्रचलांचे स्वयंचलित रीतीने बोधन करते. नेहमीच्या सर्वसामान्य उड्डाणात अवगमदर्शकावरील केवळ दोन वा तीन प्रमुख रेटी (प्रेरणाविषयक) प्रचल वापरून विमान कर्मचारी हवी असलेली कोणतीही कृती करू शकतात. एखादी समस्या उद्भवल्यास सह्यतासीमेबाहेर गेलेला प्रचल त्याच्याशी निगडित इतर प्रचलांसह अवगमदर्शकावर आपोआप येतो. त्याची समस्येच्या मूल्यमापनास (स्वरूप समजून घेण्यास) मदत होते. उदा., निष्कास वायूचे तापमान वाढल्यास त्याच्याशी निगडित इंधन प्रवाहाचे स्थितिदर्शनही अवगमदर्शकावर येते. वंगणाचा दाब, तापमान किंवा राशी यांविषयीच्या समस्येच्या वेळी हे तिन्ही प्रचल अवगमदर्शकावर येतात. सामान्य स्थितीत प्रचल पांढऱ्या काट्याने व अंकांनी दर्शविले जातात. मात्र सह्यतासीमेपलीकडील प्रचल समस्येच्या तीव्रतेनुसार (स्वरूपानुसार) अंबर (पिवळसर नारिंगी) व लाल रंगांत असल्याने चटकन लक्षात येतात. समस्येचे निराकरण होईपर्यत दर्शकावर आपोआप येणारे हे प्रचल तसेच राहतात. कळ दाबून कर्मचाऱ्यांना ते पुसून टाकता येत नाहीत. तथापि कर्मचारी एंजिनाचे कार्य स्थितिदर्शक प्रचल वरील प्रणालीच्या अवगमदर्शकाच्या निवड फलकामार्फत पाहिजे त्या वेळी पाहण्यासाठी समोर आणू शकतात.
एका ऋण किरण नलिकेचा काही भाग केवळ सावधानता सूचना व इशारा यांसाठी राखीव असतो. हे क्षेत्र दुसऱ्या कोणत्याही कामासाठी (एकाच वेळी) वापरीत नाहीत. अशा रीतीने या क्षेत्रात कोणतीही माहिती दिसली की, कर्मचारी लगेच सावध होतात.
एंजिनाच्या स्थितीचे व देखभालींचे तक्ते हे एंजिन-स्थितिदर्शक व कर्मचारी सावधानता प्रणालीचे एक वैशिष्ट्य आहे. एंजिन-स्थिती तक्त्यावरून विमान उड्डाणयोग्य स्थितीत आहे किंवा नाही याची माहिती मिळते. उदा., द्रवीय राशी व नियंत्रक पृष्ठांची स्थाने, तसेच विमानाच्या उड्डाणावर किंवा प्रवासावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व नादुरूस्त सामग्रीची यादी देखभाल तक्त्यांमध्ये फक्त देखभाल कर्मचाऱ्यांना उपयुक्त अशाच प्रचलांची माहिती असते आणि हा तक्ता उड्डाणाच्या वेळी उपलब्ध नसतो. या तक्त्यात सर्व नादुरूस्त सामग्रीची यादी असते. मग या नादुरुस्त सामग्रीचा विमानाच्या उड्डाणावर परिणाम होवो किंवा न होवो, त्या यादीत नमूद केलेल्या असतात.
साहाय्यक उपकरणे :विमानाची जटिलता व त्यात असलेल्यासुविधा यांनुसार असलेल्या साहाय्यक प्रणालीसाठी सजिशी उपकरणे व नियंत्रकही असतात. वाजवी दाबयुक्त हवा असलेल्या कक्षासाठी त्यांची उंची तेथील व्यवच्छेदक दाब, चढणीची वा उतरणीची त्वरा व तापमान यांची माहिती असणे गरजेचे असते. विद्युतीय, द्रवीय व वायवीय शक्ती व वितरण प्रणाली यांच्याकरिता दुय्यम शक्ति-प्रणाली उपकरणे व नियंत्रक यांची गरज असल्याने तशी व्यवस्था करतात. इंधनाच्या प्रवाहाची त्वरा, विशिष्ट टाक्यांत उरलेले इंधन व उरलेले एकूण इंधन या बाबी इतर दर्शकांवर दर्शवितात. उपकरणफलकावरच्या रेखाकृतीवरील मोक्याच्या जागी वरीलपैकी पुष्कळ प्रणालींची उपकरणे व नियंत्रक यांची स्विचे असतात. त्यांच्यामुळे प्रणालीची धाटणी (विन्यास) व कार्य करण्याची परिस्थिती यांचे सम्यक् ज्ञान होण्यास मदत होते. जमिनीवरची पूरक शक्ती किंवा उड्डाणात आपत्काली लागणारी शक्ती साहाय्यक शक्ती विभागाने (ऑक्झिलरी पॉवर युनिट APU) पुरविली जाते, तेव्हा एंजिन उपकरणांचाही त्यात अंतर्भाव करतात. अवतरण यंत्रणा, उड्डाणात जुळवून घेता येणारा पंखाचा बिजागरीयुक्त भाग म्हणजे झडप, पंखपश्व पडदी (पार्श्वीय नियंत्रणासाठीचे पृष्ठभाग) , पंखाच्या वर असलेला भाग (याने हवेच्या प्रवाहात बदल होऊन ओढ वाढते आणि पार्श्वीय नियंत्रण व कधीकधी गतिरोधन यांसाठी याचा उपयोग होतो), उच्चालक सुकाणू व तोलक प्रयुक्त्या यांसारख्या कार्यकारी सामग्रीची स्थिती दर्शक दर्शवितात. इतर दर्शक विमानाची परिस्थिती दर्शवितात. आगीचे अस्तित्व ओळखून तसा इशारा देणारा दर्शक, प्रवेगबोधक, अतिवेगाने होणारे विचलन दर्शविणाऱ्या प्रयुक्ती, डळमळण्याचा इशारा देणारे दर्शक, धावपट्टीवरील पोच (प्रवेश) गतीतील विचलन दर्शविणारे दर्शक, विन्यासातील व उंचीतील विचलन दर्शविणाऱ्या प्रयुक्ती हे असे दर्शक होत. या प्रयुक्ती गोल तबकडीचा व उभ्या फितीचा दर्शक, धोक्याचा इशारा देणारे दिवे वा श्राव्य संदेश यामार्फत परिस्थिती सूचित करतात. उड्डाणाच्या भिन्न स्थितीत विमान भूप्रदेशापासून धोकादायक उंचीवर असल्यास संगणकाचा वापर करणाऱ्या आधुनिक भूसमीपता इशारा प्रणाली (ग्राउंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग सिस्टिम GPWS) संगणकनिर्मित कृत्रिम वाक्संदेशांद्वारे तसा धोक्याचा इशारा देते.
व्यापारी वाहतुकीच्या मोठ्या विमानांत उड्डाण अभिलेखक, वैमानिक कक्षातील आवाज (संभाषण) अभिलेखक व देखभाल अभिलेखक ही उपकरणेही असतात. अधिक आधुनिक विमानांत खास अंगभूत चाचणी सामग्रीही (बिल्ट- इन-टेस्ट इक्किपमेंट BITE) असते. ही सामग्री जमिनीवर कार्यान्वित केल्यावर पूर्वनियोजित चाचणी घेते व तिला प्राणालीकडून वा घटकाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचे मूल्यमापन करते. यामुळे बदलता येऊ शकणाऱ्या एखाद्या विशिष्ट बाबीच्या [उदा रेखा प्रतिष्ठापन योग्य विभाग (लाइन रिप्लेसेबल युनिट LRU )] समस्या अलग करता येतात.
सावधानता धोकासूचक इशारा व सल्लागारी प्रणाली : जेव्हा विमानाने वा एंजिनाचे कार्य नीटपणे होत नाही, अथवा जेव्हा ते योग्य स्थितीत नसते किंवा योग्य प्रकारे चालत नाही, तेव्हा कर्मचाऱ्यांना दक्ष (सतर्क) करण्यासाठी सावधानतेचे, इशाऱ्याचे वा सल्लागारी स्वरूपाचे संदेश दिले जातात. यांकरिता चाक्षूष, दृश्य, श्राव्य किंवा स्पर्शग्राही संदेशांची साधने वापरतात. तातडीच्या वा निकडीच्या मानानुसार या संदेशांचे प्रकार करतात. महत्वानुसार मांडणी असलेले आणि ठळक वैशिष्ट्ये सूचित करणारे हे संदेश साध्या व सुस्पष्ट भाषेत इलेक्ट्रॉनिकीय अवगमदर्शकांवर दाखविले जातात. उदा., ज्याची दिशा व गती बदलली आहेत, अशा वाऱ्याच्या संपर्कात विमान आल्यावर विमानाची हवासापेक्ष गती झपाट्याने कमी होते. अशा वेळी वारा-कर्तन-अभिज्ञान व सावधानता प्रणालीमार्फत इशाऱ्याचा दिवा लागतो आणि श्राव्य संदेशही दिला जातो. शिवाय विमान पूर्वस्थितीत येण्याकरिता त्याने ज्या सर्वोत्कृष्ट चढण कोनातून वळण घ्यायला हवे असते, तो कोन समजण्यासाठी रोख दिग्दर्शनदर्शकाची मदत होते.
तीन कर्मचारी असणाऱ्या विमानात वापरण्यात येणाऱ्या नमुनेदार सावधानता व इशारा प्रणालीतील आवश्यक अवगमदर्शक घटक आ. ४ मध्ये दाखविले आहेत. सावधानतेचा संदेश बहुरंगी ऋण किरण नलिकेच्या अवगमदर्शकावर दिसतो व तो वैमानिकासमोरील मुख्य उपकरणफलकावर दिसतो, हे संदेश वास्तव अक्षरांकचिन्ह (आल्फान्मुमेरिक) पद्धतीने देतात आणि तिच्याकरिता लाल व नारिंगी पिवळसर हे दोन रंग वापरतात. या पद्धतीत अंक, अक्षर, विराम चिन्हे व इतर चिन्हांच्या रूपातील संदेश संगणकाद्वारे दिला जातो. तातडीने दुरूस्ती किंवा सुधारणा करणे अथवा पूरक कृती करणे आवश्यक असल्याचा धोक्याच्या इशाऱ्याचा संदेश लाल रंगात दिला जातो. ज्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना तत्काळ सावध करण्याची व त्यानुसार नंतर दुरुस्ती वा सुधारणा करण्याची किंवा पूरक कृती करण्याची गरज असते, अशा परिस्थितीत सावधानतेचा (खबरदारीचा) संदेश, तसेच दक्ष राहण्याजोगी परिस्थिती असल्याचा सल्लागारी स्वरूपाचा संदेश नारिंगी पिवळसर रंगात दिला जातो. कर्मचाऱ्यांची दक्षता व जरूर तर त्यांनी कृती करण्याची गरज असलेले सल्लागारी स्वरूपाचे संदेश सावधानतेच्या संदेशाहून वेगळे दिसावेत म्हणून दातेरी कडांचे असतात. सावधानता व इशारा यांचे संदेश सामान्यपणे चाक्षूष वा श्राव्य रूपात असतात. संदेश रद्द करणाऱ्या वा संदेशांचे प्रत्यावाहन करणाऱ्या स्विचांमुळे वैमानिकाला दक्षता संदेश दर्शकावरील माहितीचे प्रमाण नियंत्रित करता येते आणि नेहमी टिकून राहणारे (अनुरूप) सर्व संदेश पुन्हा पाहण्यासाठी दर्शकावर आणता येतात.
पृथक् इशारा अवगमदर्शक हा तांबड्या दिव्यांचा विशिष्ट कामांसाठी असलेला आव्यूह (संच) असतो. त्याचे कार्य ऋण किरण नलिका अवगमदर्शकाला पूरक असते. तसेच विशेषतः जेव्हा केवळ राखीव वीजपुरवठा उपलब्ध असतो तेव्हा हा अवगमदर्शक इशाऱ्याचा संदेश दर्शवितो. पृथक् सावधानता अवगमदर्शकात नानाविध नारिंगी पिवळसर दिवे असतात. हा अवगमदर्शक सर्वसाधारणपणे वैमानिकाच्या पुढ्यातील फलकावर बसविलेला असतो. जेव्हा जेव्हा कोणतीही इशाऱ्याची वा सावधानतेची परिस्थिती उद्भवते, तेव्हा प्रमुख इशारा/प्रमुख सावधानता दाब बटन दिवे प्रकाशित होतात. बटने दाबून दोन्ही दिवे मालविता येतात. प्रमुख इशारा बटन दाबून इशाऱ्याशी निगडित असलेल्या ठराविक श्राव्य दक्षता सूचनाही रद्द होतात.
भावी संशोधनाची दिशा : विमानाचे उड्डाण व्यवस्थापन व कार्यक्षमता यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विमानातील उपकरणांच्या अभिकल्पांचा विचार करण्यात येत आहे. या दृष्टीने पुढील काही क्षेत्रांत संशोधन चालू आहे. एखाद्या बिंदूजवळच्या उड्डाणपथाची स्पर्शरेषा व क्षितिज यांच्यातील कोन म्हणजे उड्डाण-पथकोन होय. उड्डाण-पथकोन अवगमदर्शक हे उपकरण विमानाची उंची व उड्डाण-पथ दर्शविण्यासाठी पुढील पिढीतील विमानांत वापरण्यात येईल.
‘मोड एस’ हा हवाई वाहतूक नियंत्रणासाठी भावी काळात वापरण्यात येणारा माहितीचा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल. माहितीचे स्वयंचलित रीतीने प्रेषण व ग्रहण करणाऱ्या अशा सामग्रीमुळे भावी काळात वैमानिक कक्षाच्या पडद्यावर मुद्रित होणाऱ्या (उमटणाऱ्या) संदेशा मार्फत वैमानिक व हवाई वाहतूक नियंत्रण परस्परांशी संपर्क ठेवू शकतील.
वाहतूक दक्षता टक्कर चुकविणाऱ्या प्रणालीत (ट्रॅफिक ॲलर्ट कोलिजन अव्हॉयडन्स सिस्टिम TCAS) हवाई संचारणाच्या माहितीद्वारे टक्कर होण्याची शक्यता ओळखण्यासाठी व टक्कर टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्यांचा उपयोग करतात. जवळपासच्या विमानांतील कर्मचाऱ्यांना या प्रणालीमार्फत हवाई संचारणाची माहिती पुरविली जाईल तसेच ही प्रणाली धोकासूचक पातळीवरील दक्षतेचा इशारा देईल व आपल्या कर्मचाऱ्यांना एखादे विशिष्ट विमान टाळण्यासाठी कसे संचारण करावे ते सांगेल.
सपाट पृष्ठ अवगमदर्शन क्षेत्रातही चांगले संशोधन होत आहे. विशेषतः रंगीत ऋण किरण नलिका ह्या चांगल्या प्रकारचे अवगमदर्शक असून त्यांना जागा व शक्ती कमी लागते व त्या स्वस्तही आहेत. तेजस्विता, विरोधाभास, विभेदन व रंग पर्याप्त प्रमाणात असणाऱ्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी यांत विविध तऱ्हा वापरतात. (उदा., प्रकाश उत्सर्जक द्विप्रस्थ, द्रव स्फटिक, विद्युत प्रदीप्त प्रयुक्ती). यांच्यात इतर माहितीबरोबर इलेक्ट्रॉनीय रोख दिग्दर्शनदर्शकावरील संगणकनिर्मित धावपट्टीची प्रतिमा दिसेल. त्यामुळे तिच्याकडे पाहून वैमानिक स्वतः नियंत्रित अवतरण करू शकेल. त्यासाठी त्याला विमानाबाहेर पहाण्याची गरज उरणार नाही. याशिवाय इलेक्ट्रॉनीय क्षैतिज स्थितिदर्शकावर प्रसंगोचित वाहतुकीचे चित्र दिसेल. त्यामुळे वैमानिक आपले विमान इतर विमानांपासून सुरक्षित अंतरावर ठेवू शकेल तसेच दुसऱ्या विमानापाठोपाठ जाताना किंवा वळण घेताना लगतच्या विमानापासूनचे आपल्या विमानाचे अंतर योग्य रीतीने नियंत्रित करू शकेल आणि वाजवी वेळेआधीच मार्गात दुरुस्ती करून संभाव्य टक्कर टाळू शकेल.
जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम GPS) ही लष्करी कृत्रिम उपग्रह मार्गनिर्देशन प्रणाली असून तिचे व्याप्तिक्षेत्र संपूर्ण जग आहे. ही प्रणाली नागरी हवाई वाहतुकीच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच २०१० सालापासून दीर्घ पल्ला मार्गनिर्देशन, ओमेगा (जागतिक रेडिओ मार्गनिर्देशन प्रणाली), अति-उच्च कंप्रता सर्वदिशिक रेडिओ यंत्रणा, अंतरमापक सामग्री यांची जागा कृत्रिम उपग्रह प्रणाली घेईल, अशी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) संघटनेची योजना आहे.
उड्डाण स्थितिबोधक (फ्लाइट स्टेटस मॉनिटर FSM) हे हल्लीच्या सावधानता व इशारा प्रणालीचे सुधारित रूप आहे. उड्डाणाच्या असाधारण परिस्थितीत व विमानाचे कार्य नीट होत नसते तेव्हा विमान हाताळताना कर्मचाऱ्यांना या प्रणालीची मदत होईल. कारण आपत्काळी विमानातील इतर सर्व प्रणालीकडील माहिती एकत्र करण्याचे काम ही प्रणाली करील व अशा वेळी कर्मचाऱ्यांनी कोणत्या कृती करायला हव्यात याची माहिती सोप्या भाषेत या प्रणालीमार्फत कर्मचाऱ्यांसमोर सादर होईल. सुधारणा करण्यासाठी सुचविलेल्या कोणत्याही उपायाची परिणामकारकता ही प्रणाली अजमावील व त्याचे मूल्यमापनही करील.
पहा : घूर्णी दिक्सूचक मार्गनिर्देशन वाहतूक नियंत्रण विमान परीक्षण.
संदर्भ : 1. Anderson, E. W. The principles of Navigation, London, 1966.
2. Mondey, D. Trippe, J. Eds., The International Encyclopedia of Aviation, New York, 1977.
3. Shevell, R. S. Fundamentals of flight, Englewood Cliffs, N, J., 1983.
कर्णिक, म. ग. आगाशे, वसंत वा. ठाकूर, अ. ना.
“