विमान परीक्षण : प्रत्यक्ष उड्डाणाच्या अथवा सदृशीकृत (कृत्रिम रीतीने निर्मिलेल्या प्रत्यक्षातल्यासारख्या) परिस्थितीमध्ये विमान किंवा त्याचे घटक भाग वापरून पाहून विमान परीक्षण करतात. असे करताना विमानाची किंवा त्याच्या घटक भागांची वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या अनुरूप अशा भौतिक आविष्कारांचे मापन आणि अभिलेखन (नोंद) करतात. विमानाचा अभिकल्प (आराखडा), विकास व निर्मिती यांविषयीची मानके आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्था ठरवितात. नवी प्रकारच्या विमानाचा अभिकल्प तयार करणे, त्याच्यासाठी वापरण्यात येणारी विविध द्रव्ये, कारागिरी तसेच विमानाचे कार्यमान यांविषयीच्या अशा मान्यताप्राप्त मानकांची पूर्तता करावी लागते आणि विमानाच्या विक्रीआधी अशी पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. यामुळे कोणत्याही नविन विमानाचा अभिकल्प, त्याचा विकास व निर्मिती आणि स्वीकृती यांच्यासाठी त्याचे परीक्षण करणे आवश्यक असते. विमान परीक्षणाची सीमा निश्चित करताना बऱ्याचदा प्रणाली परीक्षण अशी संज्ञा वापरतात. विमानाचे परीक्षण आणि विमानाचा परिणानकारक रीतीने उपयोग होण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या आनुषंगिक उपप्रणालींचे परीक्षण या दोन्ही परीक्षणांवर प्रणाली परीक्षणात समान भर देतात.

वैमानिकीच्या क्षेत्रात मोठी प्रगती झालेली असली, तरी विमानाचे उड्डाणातील परीक्षण करणाऱ्या शास्त्राचे स्वरूप अनुभवसिद्धच राहिले आहे. म्हणजे विमानाच्या प्रत्यक्ष उड्डाणात येणाऱ्या अनुभवांवरच ते आधारलेले आहे आणि विमानाची मान्यता अखेरीस उड्डाण परीक्षणावर अवलंबून असते. अर्थात खरे पाहता उड्डाण परीक्षणामध्ये झालेल्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यामुळे उड्डाण परीक्षणाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवू लागली.

विमान परीक्षणाची व्याप्ती : विमानाच्या घटक भागांचे परीक्षण, हे भाग एकमेकांवर जोडल्यावर त्यांच्यात घडणाऱ्या परस्परक्रियांचे परीक्षण आणि परिसरप्रभावाखाली करण्यात येणारे विमानाचे परीक्षण करण्यामागे पुढील स्थूल उद्दिष्टे असतात : (१) विमानाचे उड्डाणातील कार्यमान (कार्यक्षमता) जास्तीत जास्त वाढविणे (२) अभिकल्पामागील सिद्धांत (तत्त्वे) व गृहीते पडताळून पाहणे (३) पुरेशी सैंद्धातिक माहिती उपलब्ध नसलेल्या क्षेत्रांमधील अनुभवाधिष्ठित माहिती मिळविणे (४) उड्डाणातील सुरक्षितता आणि कार्यमान विनिर्देशित (ठरवून दिलेल्या) उड्डाण परिसीमेत आहेत, हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून देणे आणि (५) विनिर्देशित कार्यमानाच्या हमीला मान्यता असल्याचे सिद्ध करणे. विमान परीक्षणाची सुरूवात प्रयोगशाळेतील अभिकल्पाविषयीच्या नवीन कल्पनांच्या मूलमापनापासून होते, मग विमानाचे घटक भाग, उपप्रणाली व त्यांच्या जोडण्या यांची परीक्षणे करतात आणि अखेरीस ज्या संकल्पित परिस्थितीला अनुसरून विमानाचा अभिकल्प बनविलेला असतो त्या परिस्थितीत विमान प्रत्यक्ष उडवून त्याचे परीक्षण करतात.

विमानाचा अभिकल्प व परीक्षण : मोठ्या प्रमाणावरील उत्पादन सुरू करण्याआधी अनेक वर्षे अभिकल्प व अभियंते विमानाच्या नवीन एंजिनाची योजना तयार करून त्याचे परिक्षण करतात. विमान कंपन्यांसाठी लागणाऱ्या नवीन विमानाला व त्यातील एंजिनाला याकरिता किमान ८ ते १० वर्षे लागतात. विमान कोणत्या कामासाठी वापरावयाचे आहे, त्यावर मुख्यतः विमानाचा अभिकल्प अवलंबून असतो. उदा., मालवाहतुकीसाठीची विमाने शक्य तेवढे कमी इंधन वापरून मोठा भार बऱ्याच दूर अंतरापर्यंत वाहून नेऊ शकणारी असावी लागतात. वजनाला हलकी असणारी विमाने कमी लांबीच्या धावपट्टीवर सहजपणे संचलन व अवतरण करू शकणारी असावी लागतात. कमी गतीला मोठी उच्चालक (उचलणारी) प्रेरणा व उच्च गतीला कमी ओढ निर्माण करणारा पंख सर्व विमानांसाठी हवा असतो. हवाई दलासाठीचे लढाऊ विमान ध्वनीच्या गतीच्या २ वा ३ पट इतक्या अतिजलद गतीने जाऊ शकणारे, तसेच ते अतिशय कमी व अतिशय जास्त उंचीवर उडू शकणारे असावे लागते.

अभियंते विमानासाठी वापरावयाच्या धातू, मिश्रधातू, प्लॅस्टिके, लाकूड इ. द्रव्यांचे काळजीपूर्वक परीक्षण करतात. ही सर्व द्रव्ये हवेच्या अतिप्रचंड दाबाला आणि हवामानाच्या टोकाच्या परिस्थितींत टिकून राहणारी असावी लागतात. उदा., विमानाचा पंख गुरूत्वाच्या चार ते सहापट प्रेरणेला टिकावा लागतो. निरनिराळ्या गतींना व भिन्नभन्न उंचींवर विमानावरून वाहणाऱ्या हवेच्या परिणामांचे परीक्षण करण्यासाठी ⇨वातविवर वापरता येतो. तथापि, सध्या पुष्कळ विमानांच्या अभिकल्पांचे परीक्षण वातविवरांएवजी संगणकाच्या मदतीने करतात. यांशिवाय अखेरीस वापरावयाची धातू, प्लॅस्टिक, लाकूड इ. द्रव्ये वापरून विमानाची पूर्णाकार प्रतिकृती त्याच्यातील सर्व तपशीलांसह बनवितात व तिचे वातविवरात परीक्षण करतात. तिच्यावर कधीकधी आसने मांडलेली असतात आणि उपकरणांसह इतर सामग्रीही बसविलेले असते. या परीक्षणांमुळे प्रत्यक्ष अंतिम विमान विविध उड्डाण परिस्थितींमध्ये कसे टिकून राहील, ते कळते.

अनेक वर्षांचे नियोजन व संशोधन यांतून विमानाच्या मूळ नमुना तयार होतो. या नमुन्याचे जमिनीवर उच्च वेगाला एंजिने चालवून व धावपट्टीवर शक्य तेवढ्या जास्त गतीला चालवून सांगोपांग परीक्षण करतात. बहुधा असे अनेक मूळ नमुने बनवितात व त्यांच्यासाठी महोत्पादनातील विमानांसाठी वापरावयाची द्रव्ये व घटक भागच वापरतात. अनेक मूळ नमुन्यांमध्ये विमानाच्या होऊ शकणाऱ्या झिजेचा अंदाज बांधता येतो. तसेच विमानातील निरनिराळ्या प्रणालींचे परीक्षण करता येते. मूळ नमुन्यातील एंजिने व हलणारे भाग निकामी होईपर्यंत चालवून पाहतात. नंतर प्रायोगिक विमानांचे प्रत्यक्ष उड्डाणात परीक्षण करतात. विविध मानके ठरविणाऱ्या वर उल्लेख केलेल्या संस्था विमानाचा अभिकल्प, रचना (बांधणी) व परीक्षण यांतील सर्व बाबींचे पुनर्विलोकन करतात. विमानांची सर्व मानकांच्या गरजांची पूर्तता केलेली असल्यास उत्पादकाला त्या प्रकारच्या विमानाचे प्रमाणपत्र दिले जाते. असे प्रमाणपत्र मिळाल्यावर विमान विक्रीयोग्य व वापरण्यायोग्य होते.


प्रयोगशाळेतील परीक्षण : पर्यावरणाच्या व कार्यमानाच्या काळजीपूर्वक रीतीने केलेल्या परिस्थितीत विमानाच्या प्रतिकृतींच्या उपकरणांच्या साहाय्याने परीक्षण करतात. या परीक्षणाचा विमानाचा नवीन अभिकल्प विकसित करताना मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतात. कारण आर्थिक व सुरक्षितता या दृष्टींनी हे सोयीस्कर आहे. शिवाय या रीतीने प्रत्यक्ष उड्डाणातील धोक्यांना थेट सामोरे जाण्याची जोखीम न उचलता अभिकल्पाच्या कार्यमानाने मूल्यमापन करता येते. अशा प्रत्येक प्रकारच्या परीक्षणाने उड्डाणयोग्य व कार्यक्षम विमानाच्या विकासात निश्चित भर पडते.

विमानाच्या अभिकल्पाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या प्रतिकृतींचे परीक्षण करणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. प्रतिकृती प्रत्यक्ष उडवूनही परीक्षण करतात. कधीकधी प्रतिकृतीचा एखादा भाग विमानावर बसवून ते उडवितात आणि उपकरणांच्या मदतीने ते परीक्षण करतात. मात्र हे परीक्षण समाधानकारक नसते. प्रतिकृतीला उपकरणे जोडून व ती रॉकेटचे उच्च वेगाने उडवूनही दूरमापक एषणीच्या साहाय्याने परीक्षण करतात. तथापि हे परीक्षण खर्चिक आहे. कारण प्रत्यक्ष परीक्षणात नवीन प्रतिकृती व उपकरणे वापरावी लागतात.

वातविवरातील परीक्षण : वातवीवर हा बोगद्यासारखा मार्ग असून त्यात ठेवलेल्या विमानाच्या प्रतिकृतींवरून हवेचा नियंत्रित प्रवाह जाऊ देतात आणि या प्रवाहाचे प्रतिकृतीवर होणारे परिणाम निर्धारित करता येतात. हे परिणाम मोजण्यासाठी विशेष प्रकारच्या यांत्रिक, विद्युतीय व प्रकाशीय प्रयुक्त्या (साधने) वापरतात. शिवाय बहुतेक वातविवरात दाब, तापमान, संक्षोभ (खळबळ) व प्रवाहाची दिशा मोजण्यासाठी उपकरणे असतात. प्रतिकृतीवरील प्रेरणा व तिच्या पृष्ठभागावरील दाब, तिच्यामुळे हवेच्या प्रवाहात होणारे बदल, स्थानिक तापमान इत्यादींद्वारे आवश्यक ती माहिती मिळते. उदा., प्रतिकृतीवरील अनेक बिंदूपाशी असलेला हवेचा दाब व इतर वैशिष्ट्यपूर्ण राशीचे मापन करून हवेच्या झोताच्या एकूण भाराची संपूर्ण प्रतिकृतीवर कशी वाटणी झाली आहे, याची माहिती वातविवरातील परीक्षणात मिळते.

सामान्यपणे वातविवरात विमानाऐवजी त्याच्या प्रतिकृतींवर प्रयोग करतात. कारण विमानाऐवजी प्रतिकृती बनविण्यास बराच कमी खर्च येतो व प्रतिकृतीत सहजपणे सुधारणा करता येतात. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणात धोकादायक ठरू शकणाऱ्या, तसेच प्रत्यक्ष उड्डाणात शक्य नसणाऱ्या परिस्थितीचे सदृशीकरण वातविवरात करता येते. विमान चौकटीपासून विमानाच्या सर्व भागांचे परीक्षण वातविवरात करता येते. अर्थात वातविवरातील परिस्थिती ही विमानाच्या प्रत्यक्ष उड्डाणातील परिस्थितीशी जवळजवळ जुळणारी अशी असते. तथापि प्रतिकृतीला आधार देणारी वातविवरातील संरचना व वातविवराच्या भिंती यांचा मिळणाऱ्या माहितीवर अनिष्ट परिणाम होतो, हे लक्षात घ्यावे लागते. विमानांच्या प्रकारांनुसार परीक्षण करणाऱ्या वातविवरांचे विविध प्रकार असतात. [⟶ वातविवर].

संगणकाच्या वापरामुळे वातविवर वापरण्याच्या पद्धतीत झपाट्याने बदल होत आहेत. कारण ⇨वायुगतिकीच्या नियमांवर आधारलेल्या विमान उड्डाणांचे निरनिराळ्या परिस्थितींसाठी संगणकांवर सुलभ रीतीने सदृशीकरण करता येते. यामुळे मोठ्या, खर्चिक व गुंतागुंतीच्या वातविवरांत प्रयोग करण्याऐवजी अशा सदृशीकरणांचा विमान परीक्षणात वाढत्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात येत आहे. [⟶ सदृशीकरण].

सदृशीकरण परीक्षण : एखाद्या प्रणालीच्या काही व संपूर्ण वर्तनाची दुसऱ्या असमान, वेगळ्या प्रणालीद्वारे, विशेषतः संगणक, प्रतिकृती अथवा इतर सामग्रीच्या मदतीने, नक्कल करणे म्हणजे सदृशीकरण होय. उदा., विमानासारख्या गतिमान स्थितीतील प्रणालीच्या वर्तनाच्या मूल्यमापनास मदत करण्यासाठी त्याच्या प्रतिकृतींचा वापर सदृशीकरणात करतात. माणूस-यंत्र परस्परसंबंध, हार्डवेअरचे (मूर्त, भौतिक व कायमच्या घटकभागांचे ) परीक्षण, पूर्णाकृती प्रतिकृती किंवा गणितीय निदर्शन यांचा सदृशीकरणात अंतर्भाव असतो. सदृशीकरण परीक्षणात संगणक वापरतात किंवा कधीकधी वापरीत नाहीत. विमानासारख्या वाढत्या गुंतागुंतीच्या प्रणाली हाताळण्याच्या सदृशीकरण परीक्षण हा एक उपाय आहे. स्पर्धात्मक स्थितीत उच्च दर्जाचे कार्यमान, कमी खर्च व चुकीला अवसर नसलेले निश्चित वेळापत्रक यांची निश्चित हमी या परीक्षणांतून मिळते. तसेच सदृशीकरण परीक्षणामुळे अभिकल्पांच्या (विकासाच्या आधीच्या) टप्प्यातच प्रणालीचे मूल्यमापनही करणे शक्य होते. तसेच अभिकल्पाच्या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळातच पर्याप्तीकरण साध्य होण्यासाठी या प्रणालीतील पुष्कळ फेरफारांचे मूल्यमापनही सदृशीकरणाने साध्य होते. मूळ नमुने बनवून परीक्षणाद्वारे त्यांचे मूल्यमापन करण्यापेक्षा सदृशीकरण परीक्षण स्वस्त आहे.

विमानाच्या बहुतेक सदृशीकरण परीक्षणांमघ्ये एक मुख्य घटक म्हणून संगणक वापरतात. प्रणाली विश्लेषणासारख्या पृथक्‌ सदृशीकरणासाठी सदृश संगणक वापरतात. या संगणकात राशी भौतिकी चलांनी दर्शवितात, त्यामुळे सदृशीकरणाची अचूकता व पुनरावृत्तिक्षमता यांत चांगलीच सुधारणा झाली आहे. संमिश्र (हायब्रिड) संगणक हा विमानाच्या सदृशीकरण परीक्षणाच्या प्रगतीमधील पुढचा टप्पा आहे. यात समस्या सोडविण्यासाठी एकाच वेळी सदृश व अंकीय संगणकांचा वापर करतात (अंकीय संगणकात पृथक्‌ प्रदत्तावर अंकगणितीय व तार्किक क्रिंयाद्वारे प्रक्रिया केली जाते). येथे प्रत्येक संगणक हा त्याच्या विशिष्ट क्षमतेला सर्वांत अनुरूप असलेले काम (प्रक्रिया) करतो. एका स्थिर अथवा हलत्या आधारफलाटावर वैमानिकाच्या कक्षाचे निदर्शन (प्रातिनिधिक रूप), दृक्‌ संदर्शन व कार्य करणारी उपकरणे यांची तरतूद करून विमान कर्मचारी असणाऱ्या सदृशीकरण परीक्षणात वास्तवता आणतात. [⟶ संगणक सदृशीकरण].

एकत्रीकरण परीक्षण : कार्यकारी घटकभाग त्यांच्या संकल्पित भौमितिक जागी ठेवून त्यांची जोडणी (एकत्रीकरण) करतात. या जोडणीच्या मदतीने आंतरपृष्ठविषयक (सामाईक सीमा-पृष्ठांविषयीचे) प्रश्न सोडविता येतात. घटक एकत्र जोडून उपप्रणाली बनतात उपप्रणालींच्या एकत्रीकरणाने (जोडणीने) प्रणालीचे घटक बनतात आणि हे घटक संकलित करून कार्यकारी करून कार्यकारी प्रणाली तयार होते. नंतर या प्रणालीच्या कार्यकारी व कार्यात्मक क्षमता परीक्षणांद्वारे निश्चित करतात. शिवाय समग्र प्रणालीच्या अनुरूपता, कार्यकारीक्षमता, देखभालक्षमता, सुरक्षितता, विश्वासार्हता व पर्याप्त कार्यमान या गुणांचे मूल्यमापन या परीक्षणात करतात.

नियंत्रण प्रणाली व वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय (एव्हिऑनिक्स) प्रणाली ही एकत्रीकरण परीक्षणाची नमुनेदार उदाहरणे आहेत. नियंत्रण प्रणालीच्या अशा परीक्षणात ‘आयर्न बर्ड’ या नावाच्या संरचनात्मक चौकटीवर प्रत्यक्ष विमानात असते त्यासारख्या भूमितीय मांडणीप्रमाणे पूर्ण सुसज्ज अशी प्राथमिक नियंत्रण प्रणाली इष्ट जागेवर स्थापन करतात. यामुळे घर्षण प्रेरणेची जाणीव, शिणवटा झीज व प्रतिसाद यांसारख्या कार्याची अर्थपूर्ण परीक्षणे शक्य होतात. हे करताना प्रत्यक्ष उड्डाणात प्रणालीवर हवेचा जेवढा भार पडणार आहे, तेवढा भार लावतात. अनुरूपता तपासून पाहण्यासाठी स्वयंचलित उड्डाण नियंत्रण प्रणाली अंतर्भूत करतात तर परीक्षणांची महत्त्वपूर्ण फले मिळविण्यासाठी वैमानिकाचा अंतर्भाव करतात. वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय प्रणालीची परीक्षणे अगदी साधी म्हणजे ग्राहीबरोबरचा आकाशक तपासून पाहण्याइतकी साधी असू शकतात. अथवा विद्युत्‌शक्ती, संदेशवहन व मार्गनिर्देशनाची सर्व सामग्री आणि वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकी असणाऱ्या संपूर्ण प्रणालीच्या एकत्रीकरणाएवढी ही परीक्षणे जटिल (गुंतागुंतीची) असू शकतात.


जमिनीवरची गतिकीय परीक्षणे : उच्च कार्यमान असलेल्या विमानातील व्यक्ति-उत्क्षेपक सुटका प्रणालींच्या कार्यात्मक परीक्षणासाठी रॉकेट-घसरगाडी परीक्षण मोठ्या प्रमाणात वापरतात. रॉकेट-घसरगाडी परीक्षणांमध्ये उच्च प्रवेगात किंवा प्रति-प्रवेगात, तसेच नियंत्रित परिस्थितीमधील वायुगतिकीय प्रवाह आविष्कारांमध्ये रचना व प्रयुक्त्या वापरून पाहतात. यांमध्ये परीक्षण करावयाच्या गोष्टी (उदा., कर्मचाऱ्यांचे कक्ष, उत्क्षेपण सामग्री असलेला विमानाच्या धडाचा भाग) घसरगाडीच्या तळगाड्यावर बसवितात आणि ती पोलादाच्या पक्क्या रूळांवरून रॉकेटांनी चालवितात (सरकवितात). त्याला रॉकेटाने प्रवेग तर जलपात्राद्वारे प्रतिप्रवेग देतात. परीक्षणात उत्क्षेपण प्रणालीला इष्ट गती मिळाल्यावर तिचे कार्य आपोआप सुरू होते आणि उत्क्षेपक रॉकेटे सुरू होऊन धडापासून मुक्त असलेली विमान कर्मचाऱ्यांची साधनसिद्ध नकली आसने प्रचलित होतात. तसेच त्यांचा मुक्त गतिमार्ग मर्यादित करणाऱ्या हवाई छत्र्या कार्यान्वित होतात. यामुळे ती जमिनीवर सुरक्षितपणे उतरू शकतात. हा सर्व घटनात्मक उच्च वेगाच्या छायाचित्रणाने चित्रित करतात व त्याची फले अभ्यासतात. यांद्वारे सदर सर्व यंत्रणेचे कार्य व्यवस्थित होत असल्याची खात्री होते. यांमध्ये उत्पन्न होणारे प्रवेग व प्रेरणा ही माणसाच्या सहनशक्तीच्या मर्यादेत आहेत याची खातरजमा करतात. या रॉकेट-घसरगाडी परीक्षण तंत्रामुळे अचूकपणे नियंत्रित केलेली परीक्षणाची स्थिती उपलब्ध होते, तसेच यात उत्कृष्ट छायाचित्रण करता येते.

विमानाच्या इंधन प्रणालीची गतिवर्धक व स्थगन परीक्षणे ही गतिकीय परीक्षणाची अन्य उदाहरणे आहेत. यांमध्ये इंधनाचे निर्गमन, स्थानांतरण व वितरण यांचे प्रत्यक्ष उड्डाणातील प्रेरणांखाली अनुवृत्तींखाली असतानाचे मूल्यमापन करतात. अतिशय साधनसिद्ध अशा जमिनीवरील परीक्षणतळांवर एंजिने चालवून पाहतात. शीतन, कंपने (धक्के) व स्थापित एंजिनाचे कार्यमान समाधानकारक असल्याचे सिद्ध करण्यासाठी नंतरची परीक्षणे करतात.

नवीन प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण होण्याआधी विद्युत्‌चुंबकीय उद्दीपकाने प्रवर्तित केलेल्या कंपनांच्या अंमलाखाली संपूर्ण विमान वापरून पाहतात. विमानाच्या संरचनांकडून त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादांचे विशिष्ट प्रकारे विश्लेषण करतात. विमानाची पुच्छ-जोडणी व धड या संरचना एंजिने आणि यंत्रसामग्री चालू असताना निर्माण होणाऱ्या कंपनांना उड्डाणत अपेक्षित असलेल्या सोसाट्याच्या हवेच्या भारांमध्ये दाद देत नाहीत, याची खात्री करून घेण्यासाठी जमिनीवरील कंपन परीक्षणे करतात.

स्थितिक भारण परीक्षणे : प्रत्यक्ष विमानाची अभेद्य भार परीक्षणे प्रथम बांधलेल्या एक वा अनेक विमान चौकटीवर करतात. ही चौकट प्रयोगशाळेतील छिद्रपाटावर बसवितात व तिच्यावर हजारो प्रतिविकृतिमापके घट्ट बसविलेली असतात. या मापकांचे प्रदान अभिलेखन प्रणालीवर नोंदले जातात. विमान चौकटीच्या घटक भागांवर हवेचा व निरूढीचा (जडत्वाचा) सदृशीकृत भार लावण्यात येतात. या परीक्षणांचे निष्कर्ष पाहून गरज भासल्यास महत्त्वाच्या घटक भागांचे अभिकल्प परत तयार करता येतात. हे घटकभाग आवश्यक त्या भारांना टिकतील आणि अशा तऱ्हेने त्यांचा सेवा देण्याचा काळ (आयुष्य) समाधानकारक असेल, याची खात्री होते.

पर्यावरणीय परीक्षणे : प्रणालीचे घटकभाग व उपप्रणाली यांच्यावर तापमान, आर्द्रता वा कंपने यांच्या टोकाच्या परिस्थितीत पडू शकणारे विविध अपेक्षित भार लावून पाहतात. याद्वारे प्रणालीचे सेवा-आयुष्य ठरविता येते. सुटका प्रणाली पाण्याखाली चालवून तिचे कार्य तपासून पाहतात. प्रेषणाचे कार्य पडताळून पाहण्याकरिता संदेशवहन आकाशक असलेल्या प्रमाणशीर प्रतिकृतींचे प्रारण गुणधर्मासाठी परीक्षण करतात. अधिष्ठापने विद्युत् चुंबकीय व्यत्ययापासून मुक्त असल्याची खात्री करून घेण्यासाठी विद्युतीय व वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय घटकांच्या प्रत्यक्ष अधिष्ठापनांचे सदृशीकरण करणाऱ्या प्रायोगिक प्रतिकृती भाराखाली चालवून पाहतात. पावसाचे पाणी काढून टाकणे, हिमनिरास व हिमरोधी यंत्रणेचे कार्य तपासून पाहण्यासाठी पर्यावरणीय कक्षांचा वापर करतात.

उड्डाण परीक्षणे : १९४० पूर्वी उड्डाण परीक्षणाची तंत्रे जवळजवळ अस्तित्वातच नव्हती. यामुळे उड्डाणाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होत असे आणि या उणिवांसहित वैमानिकाला उड्डाण करावे लागे. उड्डाण परीक्षण हा विमान परीक्षणाचा खास प्रकार आहे. याद्वारे अखेरीस नवीन प्रकारचे विमान तयार केले जाते आणि ते आपले संकल्पित अंगीकृत कार्य करण्यायोग्य असल्याचे सिद्ध होते. हवेत उड्डाण करणाऱ्या आद्य प्रवर्तकांनीच सर्वप्रथम या नवीन विज्ञानशाखेचा वापर प्रत्यक्षात यशस्वीपणे केला, असे म्हणता येईल. संशोधन विकास प्रात्यक्षिक निर्देशन, कार्यकारी मूल्यमापन वगैरे उड्डाण परीक्षणांचे प्रकार करता येतात. उड्डाणातील प्रणाली परीक्षण हा उड्डाण परीक्षणाचा त्याच्याएवढाच महत्त्वाचा टप्पा असतो. कधीकधी उड्डाणातील प्रणाली परीक्षणाचे महत्त्व विमान परीक्षणाएवढे असते.

उड्डाण परीक्षणांच्या सुविधांसाठी शेकडो हेक्टर जमीन, हजारो माणसे आणि अब्जावधी रूपयांची गुंतवणूक यांची गरज असते. तथापि सर्व उड्डाण परीक्षणांची उद्दिष्टे सारखीच असतात. विमानाचे कार्य हे त्याच्या अभिकल्पानुसार अपेक्षित असलेल्या कार्यासारखे होते की नाही ते ठरविणे, विमानाच्या भावी काळातील विकासासाठी वापरता येईल अशी माहिती मिळविणे, विमानाचा प्रभावी रीतीने वापर करण्याच्या पद्धती विकसित करणे आणि सर्वसाधारण संशोधनाला उपयुक्त अशी माहिती मिळविणे ही उड्डाण परीक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उड्डाण परीक्षणाच्या विमानाचे कार्यमान, स्थैर्य कार्यकारी तंत्रे, कार्यात्मक विकास इ. क्षेत्रांत प्रयत्न करतात.

उड्डाण परीक्षणांतून पुढीलसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला जातो : विमान त्याच्या नियंत्रण प्रणालीला चांगला प्रतिसाद देते का? विमानाच्या पंखाखालील हवेचा प्रवाह अचानकपणे थांबून व वेग कमी होऊन विमान डळमळू लागल्यास काय घडते?(डळमळण्यामुळे उच्चालक प्रेरणा कमी होऊन ओढ वाढते व विमानाचे नियंत्रण करणे अवघड होते). परिवलनात असलेल्या विमानाचे नियंत्रण करता येते का? सोसाट्याच्या वाऱ्याने क्षुब्ध झालेले विमान परत नेहमीसारखे उड्डाण करू लागेल का? विमानातील कोणते घटक असफल ठरू शकतील? लागोपाठच्या दोन सर्वथा परीक्षणांच्या दरम्यान एंजिने किती काळ चालू शकतील? विमानाला कोणत्या साहाय्यभूत गोष्टींची गरज आहे? नवीन विमान चालविण्याच्या दृष्टीने कोणते प्रशिक्षण व्हायला हवे? विमान चालविण्यासाठी काय खर्च येईल? जमिनीवरील उपलब्ध सुविधांच्या मदतीने नवीन विमान कार्यक्षमपणे वापरता येईल का? प्रवासी व त्यांचे सामान यांची हाताळणी करणारी सर्वाधिक उपयुक्त पद्धती कोणती आहे? वगैरे. केवळ काळाच्या ओघात उघड होऊ शकतील अशा त्रुटी या परीक्षणांतून उघड होतात. मात्र हे न संपणारे काम आहे. कारण विमानात त्याच्या आयुष्यभर सुधारणा होत असतात आणि अशा प्रत्येक सुधारणेचे परीक्षण व्हावे लागते.


केवळ विमानचौकटीऐवजी संपूर्ण विमान व त्याच्याशी निगडित सामग्री विकसित करण्याची संकल्पना पुढे आली. हिचा उड्डाण परीक्षणावर मोठा परिणाम झाला. विमानातील जटिलता व विशेषीकरण वाढत गेल्याने विमानाबरोबर त्याच्या देखभालीचा तळ, ओढ वाहने इत्यादींचाही विचार होऊ लागला. यामुळे विमान चालविण्यास आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीचे परीक्षण होते व त्रुटी दुरूस्त करतात. परिणामी ग्राहकाला असा संपूर्ण संच पुरविता येतो.

वातविवरातील परीक्षणात मोठी प्रगती झाली असली, तरी अतिउच्च गती व उंची यांचा विमानाच्या स्थैर्यावर व नियंत्रणावर होणारा परिणाम, वायुगतिकीय तापनाचा परिणाम इ. गोष्टी चांगल्या प्रकारे निश्चित करण्यासाठी उड्डाण परीक्षणच उपयुक्त असते. उड्डाण परीक्षणांतून नवीन समस्या लक्षात येतात, तसेच वातविवरात समस्या म्हणून पुढे आलेल्या बाबी या समस्याच नसल्याचे अथवा त्या तेवढ्या महत्त्वाच्या नसल्याचे उड्डाण परीक्षणात उघड होत.

विमानातील गुंतागुंत खूप वाढल्याने त्यांच्या परीक्षणासाठी नवीन प्रकारच्या परीक्षण वैमानिकांची म्हणजे चालक अभियंत्यांची गरज भासू लागली. अशा वैमानिकाची उड्डाणक्षमता नेहमीपेक्षा वेगळी असावी लागते व त्याला अभियांत्रिकीमधील चांगली पार्श्वभूमी असणे गरजेचे असते. यामुळे अनेक देशांमध्ये परीक्षण वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी खास विद्यालये काढण्यात आली आहेत.

मानवरहित विमाने, क्षेपणास्त्रे, रॉकेटचालित प्रायोगिक विमाने ही वातावरणाच्या सर्वोच्च सीमेपर्यंत चालविता येतात. या वाहनांमार्फत उड्डाण परीक्षणविषयक पुष्कळ माहिती गोळा होते. विमाने, क्षेपणास्त्रे व अवकाशात ये-जा करणारी अवकाश विमाने यांच्या कार्यक्रमांत या माहितीचा उपयोग होतो. समानव अवकाश उड्डाणामुळे वातावरणापलीकडील उड्डाण परीक्षणही शक्य झाले आहे. मात्र यातील समस्या पुष्कळच अधिक गुंतागुंतीच्या आहेत. कारण अशा वाहनांचे कार्यमान अधिक उच्च असते. मानवरहित वाहनांच्या बाबतीत उड्डाणाच्या वेळी नोंदलेली माहिती परत मिळवावी लागते व त्यासाठी जमिनीवर पुष्कळ सुविकसित उपकरणे वापरावी लागतात. तसेच या वाहनांकडून दूरमापन व रेडिओ संकेतांच्या रूपातील माहितीची जमिनीवर नोंद करण्यासाठी सुयोग्य उपकरणांची गरज असते. अशा तऱ्हेने उड्डाण परीक्षणाची व्याप्ती वाढत असली, तरी त्याची उद्दिष्टे तीच राहिली. आहेत.

अन्वेषक विमान : ज्या उड्डाणविषयक क्षेत्रात अभिकल्पाविषयीची पुरेशी सैद्धांतिक माहिती सूत्रबद्ध झालेली नसते, अशा क्षेत्रांत अनुभवसिद्ध माहिती वापरतात. अभिकल्पासंबंधीच्या नवीन सिद्धांताचे मूल्यमापन करणे व सिद्धांत तयार करणाऱ्यांचे ज्ञान व्यापक करणे यांसाठी उड्डाण परीक्षण करतात. वैश्लेषिक प्रक्रियेने अथवा प्रयोगशाळेतील सुटू न शकणाऱ्या प्रश्नांच्या निराकरणासाठीही उड्डाण परीक्षणाची मदत होते. उड्डाण परीक्षणासाठी कधीकधी खास प्रकारची विमाने तयार करतात उदा., एक्स-१५ सारखे रॉकेटप्रचालित उच्चवेगी अन्वेषक विमान. पुढील मुद्यांविषयीची अनुभवसिद्ध माहिती मिळविण्यासाठी एक्स-१५ विमान वापरतात : विमानाचे स्थैर्य व नियंत्रण, उच्चालक प्रेरणा व ओढ, गतिक उड्डाण प्रत्यास्थ परिणाम म्हणजे फडफड व कंपने (धक्के), जास्त उंचीवर उच्च स्वनातीत गतीला असणारे कार्यमान इत्यादी. शिवाय इतर अन्वेषक विमानांच्या मदतीने संशोधकांनी पुढील बाबींचे समन्वेषण केले आहे : स्थैर्य व नियंत्रण यांविषयीचे प्रश्न, पुनराभिसरण परिणाम, उच्च उच्चालक प्रयुक्ती, नियंत्रक शक्ती तसेच व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (व्हीटीओएल) व शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग (एसटी ओएल) या प्रकारच्या विमानांशी निगडित कमी गतीच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेली प्रतिसादाची त्वरा वगैरे.

विकास परीक्षणे : नवीन विमानाच्या उड्डाण परीक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्याला विकास परीक्षण म्हणतात. या टप्प्याने सुरुवातीला अपयशी ठरलेले घटक भाग व मंडले वगळतात. तसेच विमानातील दोष काढून टाकता येतात. विमान जमिनीवर चालवून सामान्यपणे या परीक्षणाची सुरूवात होते. यांत नियंत्रणाची वैशिष्ट्ये व एकूण कार्य यांचे मूल्यमापन करून वैमानिक विमान सुरक्षित असल्याची व त्यात उड्डाणाशी निगडित त्रुटी नसल्याची खात्री करून घेतो. उड्डाणाच्या मूलभूत गुणवत्तेविषयीची अनुमाने पडताळून पाहताना या प्रारंभीच्या उड्डाणांत अभिकल्पाच्या मर्यादांमध्येच विमानाचे संचलन करतात. यानंतर परीक्षणाचे तपशीलवार कार्यक्रम सुरू होतात. जसजशा त्रुटी व निकृष्ट गुणवत्तासूचक वैशिष्ट्ये निश्चितपणे लक्षात येतात, तसतशा पुनर्मुल्यमापन करावयाच्या अडचणी अभिकल्पक निश्चित करतो. अशा तऱ्हेने विकास पावणाऱ्या या परीक्षणाला विकास परीक्षण हे नाव पडले आहे.

नवीन अभिकल्पाच्या विमानाच्या उड्डाण परीक्षणात अनेक परीक्षण विमाने वापरतात. यांतील प्रत्येक विमान खास प्रकारची परीक्षण कार्ये करते. उदा., स्थैर्य व नियंत्रण, एंजिनाचे परीक्षणातील कार्यमान, हवेचा भार, फडफड व कंपने, वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय परीक्षणे, कार्यकारी मूल्यमापन वगैरे. विमानाची जुळणी करतानाच त्यांवर योग्य ठिकाणी परीक्षणाची सामग्री व उपकरणे बसवितात. नंतर एकाच वेळी सर्व परीक्षण विमाने वापरून सर्व परीक्षणे करतात. यामुळे परीक्षणाची गती वाढते. परीक्षणांच्या फलांमधून अभिकल्पात करावयाचे बदल लक्षात येतात आणि ते नंतर उत्पादनांत अंतर्भूत करतात. गरज भासल्यास या बदलांचे परीक्षण विमानांवर पुनर्मुल्यांकन करतात.

उड्डाण परीक्षणानंतर विमान नियंत्रण करता येण्याजोगे असल्याचे दिसून आल्यावर त्याची संचालन परीक्षणे करतात. या परीक्षणांद्वारे संरचनात्मक एकात्मता ही अभिकल्पाच्या मर्यादेनुसार असल्याचे सिद्ध होते. संरचनात्मक दृष्टीने प्रत्यास्थ (स्थितिस्थापक) असलेल्या वस्तूंवर वायुगतिकीय भारांचा परिणाम होऊन त्या विरूपित होतात. या गुणधर्माला उड्डाण प्रत्यास्थता (लवचिकता) म्हणतात. उड्डाण प्रत्यास्थ स्थैर्यासाठीच्या विकास उड्डाण परीक्षणामध्ये स्थिरवत (काहीशा स्थिर) व गतिक या दोन्ही बाजू विचारात घेतात.

कार्यमान परीक्षण : अभिकल्प निश्चित झाल्यावर विमानाचे आणखी परीक्षण करतात यामुळे पुढील गोष्टींची अचूकपणे पडताळणी होते : अवतरणाची व आरोहणाची वैशिष्ट्ये, कमाल गती व उंची, चढणीची त्वरा व चढणीच्या महत्तम त्वरेची गती, अभिकल्पातील गती व उंचीच्या पल्ल्यात असलेली विमानावरील ओढ, चढणीसाठी लागणारा काळ, कमाल पातळीवरील उड्डाण गती,मर्यादा गती व समतल उड्डाणातील कार्यमान. या परीक्षणांतून मिळणाऱ्या अनुभवसिद्ध माहितीच्या मदतीने अभिकल्पाविषयीच्या सिद्धांतांचे मूल्यमापन करता येते व त्यात सुधारणा करणे शक्य होते. या परीक्षणाद्वारे स्थापित एंजिनाच्या कार्यमापनाचे मूल्यमापन करता येते. वैमानिकाच्या कार्यकारी नियम-पुस्तिकेसाठी कार्यमानाची माहिती यांतून उपलब्ध होते आणि ग्राहंकासाठीचे विनिर्देशन व हमी यांची पूर्तता झाल्याचीही पडताळणी यामुळे होते. विमानाच्या वाढत्या गतींमुळे ही मापने गुंतागुंतीची व खर्चिक झाली आहेत.


वैमानिकीय इलोक्ट्रॉनीय परीक्षण : यात विमानात वापरण्यायोग्य अशा विद्युतीय व इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींचे परीक्षण करतात. विशेषकरून सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकी, अंकीय संगणक व पर्याप्त छानन तंत्रे [⟶ छानक, विद्युत्‌] या इलेक्ट्रॉनिकीच्या क्षेत्रांतील प्रगतीमुळे गुंतागुंतीच्या प्रणाली अगदी लहान आकारमानाच्या अगदी लहान आकारमानाच्या व वजनाला हलक्या बनविता येऊ लागल्या. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात विमानासारख्या हवाई वाहनांत वापरता येऊ लागल्या. संदेश वहन, अभिज्ञान (ओळख पटविणे), मार्गनिर्देशन, मार्गदर्शन व नियंत्रण, माहिती संस्करण, उपकरणयोजना इ. कामांसाठी अशा वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय प्रणाली वापरतात. अनेक उपप्रणालींच्या एकत्रीकरणाने अशी प्रणाली बनवितात व बहुधा प्रत्येक प्रणाली विशिष्ट कामांसाठी असते. निश्चित स्वरूपाच्या कार्यकारी गरजा भागविणारी प्रणाली विकसित करणे आणि अशा प्रणालींच्या एकत्रीकरणातून एक प्रभावशाली विद्युतीय व इलेक्ट्रॉनीय हवाई (उड्डाणातील) सुविधा तयार करणे ही या परीक्षणांची अंतिम उद्दिष्टे असतात.

कार्य व सर्वसाधारण अनुरूपता पडताळून पाहण्यासाठी अशी परीक्षणे प्रयोगशाळेत किंवा उड्डाणात करतात. या प्रारंभिक परीक्षणानंतर कार्य व कार्यमान यांविषयीचा कोणताही प्रश्न निश्चित करण्यासाठी व अचूकता आणण्यासाठी वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीच्या प्रत्येक उपप्रणालीचे मूल्यमापन करतात. या परीक्षणांच्या अखेरीस कार्यमानाच्या विशिष्ट बाबींचे प्रात्यक्षिक दाखवितात.

 ज्यांच्यात वापरावयाच्या आहेत त्या सर्वांत टोकाच्या परिस्थितींमध्ये वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय आस्थापनांभोवतीचे तापमान, कंपने, आर्द्रता व विद्युत् चुंबकीय वातावरण समाधानकारक आहे, हे पडताळून पहाण्यासाठी परीक्षण करतात. कार्य, अचूकता व परिणामकारकता यांची कमाल मर्यादा प्रणाली परीक्षणांद्वारे निश्चित होते.

कार्यकारी परीक्षण : सर्व साधने, सामाग्री यांनी पूर्णपणे सुसज्ज असलेले विमान त्याचे अपेक्षित सेवाकार्य करू शकते की नाही, याचे मूल्यमापन या परीक्षणात करतात. येथे ग्राहकांचा संबंध येतो. विमानाची विश्वासार्हता ठरविणे, देखभालीच्या गरजा निश्चित करणे आणि खास प्रकारच्या साहाय्यक सामग्रीचे मूल्यमापन करणे यांकरिता हे परीक्षण करतात. लष्करी विमानाच्या कार्यकारी परीक्षणात अस्त्र सोडण्याची अचूक तंत्रे ठरवितात. तसेच लक्ष्य भेदण्याची, सर्व प्रकारच्या हवामानांत सेवा पुरविण्याची आणि सदृशीकृत रणभूमीच्या परिस्थितीतील कार्यात्मक क्षमता तपासण्यासाठीही लष्करी विमानांचे कार्यकारी परीक्षण करतात. व्यापारी विमानांची कार्यकारी परीक्षणे यांसारखीच असतात. उदा., दृश्यमानता कमी असल्याने उपकरणांच्या मदतीने अवतरण करण्याच्या पद्धतीचे, तसेच प्रसाधनगृहे, पाकगृह, प्रवासी सामान व माल चढविणे, सुखसोयी, गोंगाटाची पातळी, सुरक्षिततेच्या तरतुदी इ. प्रवाशांसाठी असलेल्या सेवांचे मूल्यमापन करणे, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे सदृशीकारक, निदेशपुस्तिका आणि कार्यपद्धती यांचे ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने मूल्यमापन करणे इ. गोष्टी व्यापारी विमानांच्या कार्यकारी परीक्षणात येतात. विमानाच्या अपेक्षित संपूर्ण कार्यकालात त्याचे कार्यमान हे ग्राहकाला दिलेल्या हमीनुसार समाधानकारक रीतीने टिकून राहील आणि विमानाचे कार्य चांगले राहील, हे ताडून पाहण्यासाठी वरील प्रकारचे मूल्यमापन करतात.

खास हेतूने केलेल्या परीक्षणासाठी लागणारी सामग्री : काही वेळा खास हेतूने परीक्षणे करतात व त्यासाठी विशिष्ट प्रकारची सामग्री लागते. परीक्षण करावयाच्या विमानाच्या मर्यादांनुसार या सामग्रीचा अभिकल्प, रचना व निर्मिती केलेली नसते. परीक्षणाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उड्डाण परीक्षणात विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी अशी सामग्री वापरतात. विमानातील संरचनांची हालचाल, माहिती-दर्शन व इतर परीक्षण आविष्कार नोंदून ठेवण्यासाठी चलच्चित्रण तंत्र व दूरचित्रवाणी कॅमेरे वापरतात. कृत्रिम रीतीने पावसाळी व हिमनिर्मितीचे पर्यावरण निर्माण करून त्यात परीक्षण विमान उडवितात. याकरिता जेथे हिमनिर्मिती होऊ शकते अशा उंचीवरच्या शीत हवामानात पाण्याच्या टाकीच्या (टँकर) विमानातून पाणी सोडतात व त्या पाण्याच्या मार्गात विमान उडवत नेऊन हे परीक्षण करतात. परीक्षणाच्या परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी खास हेतूंनी जमिनीवर केलेल्या अनेक चाचण्यांतील साधनांचा (उदा., रडार, परावर्तक व उत्सर्जक, अस्त्रांची लक्ष्ये) उपयोग होतो.

माहिती संपादनाच्या पद्धती : भौतिकी आविष्कारांचे मापन करणारी उपकरणे व पुढे करावयाच्या विश्लेषणाकरिता ही मापने सांभाळून ठेवणारी अभिलेखन (नोंदवून ठेवणाऱ्या) पद्धती यांचा विमान परीक्षणांत होणारा उपयोग महत्त्वाचा आहे. अतिशय काटेकोरपणा, लागणारी जागा व कार्य करण्याच्या गरजा यांच्यामुळे अतिसूक्ष्मीकृत संवेदन प्रयुक्त्या बनविण्यात आल्या. स्वयंचलित रीतीने प्रदत्त (माहिती) प्रतिदर्शन व अभिलेखन करणाऱ्या पद्धतींबरोबर या प्रयुक्त्या वापरतात.

ऊर्जापरिवर्तक : (ट्रॅन्सड्यूसर). आदानापेक्षा वेगळा परंतु त्याच्या प्रमाणात प्रदान पुरविणारी आणि भौतिक आविष्कारांना प्रतिसाद देणारी प्रयुक्ती म्हणजे ⇨ऊर्जापरिवर्तक होय. विमानातील बहुतेक ऊर्जापरिवर्तकांमध्ये संवेदकावर कार्य करणाऱ्या उत्तेजकाच्या प्रमाणात विद्युत् प्रवाह किंवा विद्युत् दाब प्रदान अथवा त्यांच्या विद्युत्‌संरोधात बदल होतो. प्रवेगमापक, वर्चस्‌मापक, उच्चता, घूर्णी, त्वरा घूर्णी, तपयुग्म व तापमापक हे सामान्य प्रकारचे विद्युतीय उर्जापरिवर्तक आहेत. एकूणच ही उपकरणे विद्युत्-यांत्रिक प्रकारच्या प्रयुक्त्या असून त्यांची प्रतिसाद देण्याची त्वरा उच्च प्रकारची असते. विमानाची हवेच्या सापेक्ष गती, त्याची उंची, एंजिनांतील दाब, हवेच्या प्रवाहाचा पृष्ठभागावरील दाब, एंजिनाच्या बाह्य आवरणाचे तापमान, मोकळ्या हवेचे तापमान, विमानाला मिळणारा प्रवेग व त्यावर पडणारा भार इ. भौतिक राशी मोजण्यासाठी ही उपकरणे वापरतात. [⟶ विमानातील उपकरणे].

बहुतेक विद्युतीय ऊर्जापरिवर्तकांमध्ये विद्युतीय सेतूचे [⟶ व्हीट्‌स्टन सेतु] तत्त्व वापरलेले असते. ऊर्जापरिवर्तकांमार्फत सदृश किंवा अंकीय प्रकारचा विद्युतीय प्रदान मिळतो. सदृश प्रदानात एक संकेत असून तो काल व परमप्रसर (कमाल विस्थापन) यांच्या दृष्टीने अखंड असतो. अंकीय प्रकारचा प्रदान ही पृथक् संकेतांची मालिका असून दोन संकेतांमधील परमप्रसरात निश्चित फरक असतो. विमानाच्या बाबतीत लागणारी जागा व वजन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामुळे उड्डाण परीक्षणात वापरले जाणारे ऊर्जापरिवर्तक सूक्ष्मीकृत प्रकारचे असतात. [⟶ ऊर्जापरिवर्तक].

 दत्त अभिलेखक : ऊर्जापरिवर्तकांकडून मिळणारे प्रदत्त (माहितीचे) निर्देश हे कालाचे फलन [⟶ फलन] या रूपात नोंदले जातात. छायाचित्रीय अभिलेखन, दोलनलेखक, सदृश फीतमुद्रक व अंकीय चुंबकीय फीतमुद्रक हे प्रदत्त अभिलेखन पद्धतींचे सामान्य प्रकार आहेत.

छायाचित्रीय अभिलेखकांसाठी विमानात उभारलेल्या परीक्षण चित्रचौकटी वापरतात. अशा प्रकाशित चित्रचौकटींचे छायाचित्रण चलच्चित्रण कॅमेऱ्याने करतात. परीक्षण अभियंते प्रत्यक्ष उड्डाणात ही निरीक्षणे करतात. छायाचित्रीय फिल्मच्या विकाशनानंतर (चित्र-प्रकटीकरणानंतर प्रत्येक चित्रचौकटीचे प्रक्षेपण करतात व हे अभियंते प्रदत्त विश्लेषणासाठी लागणारे निर्देश नोंदतात. जेव्हा मोजावयाचे आविष्कार हे काहीसे स्थिर स्वरूपाचे असतात, तेव्हा प्रकाश-अभिलेखक सोयीस्कर असतात.

अभिलेखन दोलनलेखक ही स्वयंचलित प्रयुक्ती आहे. हिच्यात प्रकाशसंवेदी कागदावर अथवा फितीवर माहिती व काल यांची नोंद (अभिलेखन) होते. दोलनलेखकांच्या मदतीने भिन्न प्रकारच्या ५० पर्यंत संकेतांची नोंद करता येते. एका मोठ्या परीक्षण विमानात नऊपर्यंत अभिलेखन दोलनलेखक बसविता येतात. [⟶ इलेक्ट्रॉनीय मापन].


चुंबकीय फीतमुद्रक अभिलेखक : हा प्रयोगशाळेत व परीक्षण विमानात वापरतात. यात ऊर्जापरिवर्तकांकडून आलेल्या आदान संकेतांचा कालाचे फलन या रूपात चुंबकीय फीत उद्दीपित करण्यासाठी उपयोग होतो. चुंबकीय सामग्रीद्वारे संकेतांचे विसंकेतन होऊन दृश्यरूप लेखन (दर्शन) होते अथवा अंकीय संगणक व खास प्रकारचे विश्लेषक वापरून फितीवरील प्रदत्तावर स्वयंचलित रीतीने उच्च गतीने संस्करण करता येते.

प्रयोगशाळेत व परीक्षण विमानात सदृश चुंबकीय फीतमुद्रण पद्धती मोठ्या प्रमाणात वापरतात. पुष्कळदा जमिनीवरील व उड्डाणातील पद्धती एकाच वेळी वापरतात. यामुळे वेळेची बचत होते. सरळ सदृश, कंप्रता विरूपण, स्पंदकाल विरूपण व स्पंदसंकेत विरूपण या चार वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांच्या रूपांत प्रदत्ताचे अभिलेखन होते. [⟶ विरूपण].

विमान परीक्षणाच्या माहितीवरील संस्करण : विमान परीक्षणात मिळालेल्या पुष्कळ अंकीय प्रदत्तावर सर्वसाधारण हेतूंसाठी असणाऱ्या अंकीय संगणकांद्वारे स्वयंचलित रीतीने संस्करण होऊन त्यांचे विश्लेषण केले जाते. संगणकात भरावयासाठी प्रदत्त तयार करणे हे विमान परीक्षणाच्या प्रयत्नांमधील सर्वांत महत्त्वाचे काम असते. दोलनलेखकांकडून मिळणाऱ्या माहितीचे प्रतिलेखन करण्यासाठी अर्धस्वयंचलित साधने वापरता येतात. या प्रयुक्ती सर्वसाधारणपणे सदृश वाचन प्रयुक्ती, सदृश ते अंकीय परिवर्तक आणि कार्ड वा कागदाचा फीतछिद्रक यांच्या बनलेल्या असतात.

पूर्ण स्वयंचलित फीतमुद्रण पद्धतीचा वेग हा सर्वांत महत्त्वाचा फायदा असून या पद्धतीमुळे प्रदत्त संक्षेपण व संस्करण यांसाठी खूप कमी खर्च येतो. स्वयंचलित माहिती संस्करणासाठी प्रगत ऋण नलिकाही वापरतात. या पद्धतीमुळेही प्रदत्ताच्या अंतिम विश्लेषणासाठी लागणारा एकूण वेळ पुष्कळ कमी होतो. ही अशा माहिती संस्करणाची वेगवान पद्धती आहे. [⟶ माहिती संस्करण].

पहा : विमान विमानांचा अभिकल्प व रचना.

एकबोटे, म. श्री. ठाकूर, अ. ना.