विनायक : (१८७३-१९०९). आधुनिक ऐतिहासिक व राष्ट्रीय कवितेचे जनक मानले गेलेले मराठी कवी. संपूर्ण नाव विनायक जनार्दन करंदीकर. जन्म धुळ्याचा. धुळ्यालाच स्कूल फायनलपर्यंत शिक्षण झाले (स्कूल फायनलची परीक्षा अनुत्तीर्ण). आरंभी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली. पुढे अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्या. त्यांचा जीवनक्रम अत्यंत अस्थिर होता. १८९० पासून त्यांनी काव्यरचना केली. भूतकाळाबद्दल त्यांना विलक्षण अभिमान होता. ‘‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल, बोध हाच, इतिहासाचा सदा सर्वकाल’’ ह्या त्यांच्या ओळी प्रसिद्ध आहेत. तथापि भविष्यकाळाबद्दल ते फारसे आशावादी नव्हते. भूतकाळातील शिवाजी, रामदास, पहिले बाजीराव, नाना फडणवीस ह्यांच्या तोडीची थोर माणसे भविष्यकाळात दिसतील, अशी आशा त्यांना फारशी वाटत नव्हती. ‘‘ऐश्वर्य लयाला गेले, जडले दारिद्र्य कपाळी’’ अशा शब्दांत ते तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा निर्देश करतात. अहिल्या, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा, कृष्णाकुमारी ह्यांच्या जीवनांवर कथाकाव्ये त्यांनी लिहिली. विनायकांची दृष्टी बोधवादी होती. ती त्यांच्या कवितेत ठकळपणे प्रत्ययास येते. ‘अधुनिक कविपंचका’त त्यांचा समावेश करण्यात येतो. तथापि त्यांची कविता आधुनिकापेक्षा जुन्या निवेदनरूप कवितेला अधिक जवळची होती. त्यांच्या काही कविता (उदा., ‘प्रीती निमाली तर’, ‘सुवास’, ‘स्त्री आणि पुरूष’) मात्र केशवसुती, अर्वाचीन वळणाच्या आहेत. त्यांची भाषाशैली सुबोध, प्रसादपूर्ण आणि नादमधुर होती. मेळ्यांसाठी विनायकांनी अनेक पदे रचली होती. प्रभावती हे नाटक ही त्यांनी लिहिले. हेच नाटक बसविले जात असताना ते पुण्यात आले होते. तेव्हा प्लेगने त्यांचा अकाली मृत्यू झाला.
जोग, रा. श्री.
“