विधीसंज्ञा : कोणताही कायदा तयार करताना किंवा एखाद्या कराराचा मसुदा किंवा मृत्युपत्र तयार करताना त्याची भाषा शक्यतितकी स्पष्ट आणि नेमका अर्थ दर्शविणारी असावी लागते. विधीच्या मसुद्यामध्ये जर संदिग्धता असेल आणि त्यातील शब्द हे एकापेक्षा अनेक अर्थांनी वापरले गेले असण्याची शक्यता असेल, तर त्या विधीच्या तरतुदींबद्दल वाद निर्माण होतात. शिवाय त्यांचा अन्वयार्थ, तो मसुदा करणाऱ्यांना अपेक्षित नसलेला असाही होण्याची शक्यता असते म्हणून विधीची भाषारचना करताना त्यातील मजकूर हा जास्तीत जास्त स्पष्ट असावा, अशी खबरदारी तो मसुदा करणाऱ्यांना घ्यावी लागते. विधीतील काही संज्ञा या सर्वमान्य अशा असून त्यांचे विवक्षित अर्थानीच होत असतात आणि त्या अर्थानीच त्या वापरल्या जातात. या सर्व संज्ञा वा संकल्पना आणि त्यांचे अर्थ १८९७ च्या सर्वसाधारण परिभाषा-अधिनियम (जनरल क्लॉझेस ॲक्ट) यात सांगितलेल्या आहेत. ज्या संज्ञांचा वापर कोणत्याही विधीत नेहमी होत असतो, त्यांच्या व्याख्या वरील कायद्यात दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या विधीत अशी विधीसंज्ञा वापरलेली असेल, की जिची स्वतंत्रपणे वेगळी व्याख्या त्या विधीत केलेली नसेल. अशा वेळी सर्वसाधारण परिभाषा-अधिनियमात दिलेलीच व्याख्या तेथे लागू पडते. सर्वसाधारण परिभाषा-अधिनियमाच्या कलम ३ मध्ये अबेट, ॲक्ट, ॲफिडेव्हिट, चॅप्टर, वॅरिस्टर, ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश पझेशन, सेंट्रल ॲक्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट, सिव्हिल कोर्ट, कलेक्टर कॉलनी, यांसारख्या अनेक शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट), अधिकारक्षेत्र (जुरिस्डिक्शन) यांसारख्या शब्दांच्या व्याख्या दिवाणी व फौजदारी ⇨प्रक्रिया विधीमध्ये दिलेल्या आहेत.
सर्वसाधारण परिभाषा-अधिनियमामध्ये जशा शब्दांच्या व्याख्या आहेत, तसेच काही प्रक्रियांचे किंवा घटनांचे विधीत होणारे परिणामही सांगितलेले आहेत. याचा फायदा असा, की या परिणामांची वाच्यता प्रत्येक विधीत करावी लागत नाही. उदा., प्रत्येक विधीत अशी एक तरतूद असते, की तो विधी कार्यवाहीत केव्हा येईल, कसा येईल, त्यानंतर काय होईल (उदा., पूर्वी असलेला विधी रद्द होईल किंवा पूर्वी आलेल्या व्यवहारापुरता कार्यवाहीत राहील) यासंबंधीची सूचना त्या तरतुदीमुळे मिळते. ‘या विधीच्या प्रारंभापासून’ (फ्रॉम द कमेन्स्मेट ऑफ धिस ॲक्ट) असे शब्द असतात. म्हणजे ‘ज्या दिवशी तो विधी अमलात येतो, त्या दिवसापासून’ तो लागू झाला असे सांगितलेले असते. तथापि एखादा कायदा केव्हा अमलात यावयाचा, हे शासनाने राजपत्राद्वारे सूचित करावयाचे असते. याकरिता ‘नोटिफिकेशन इन द ऑफिशल गॅझेट’ असे शब्द वापरण्यात येतात. अशी तरतूद जवळजवळ प्रत्येक विधीत आढळते. त्याचप्रमाणे एखादा विधी रद्द (रिपील) झाला म्हणजे काय होते, त्याचे परिणाम काय होतात, हेदेखील त्या विधीत सांगितले जाते. विधीमध्ये ‘ॲक्ट’, ‘रूल्स’ हे शब्द नेहमी येतात. प्रत्येक विधीखाली नियम (रूल्स) करण्याचा अधिकार शासनाला किंवा विधीने निर्माण केलेल्या इतर संस्थांना देण्यात येतो. याबाबतचे सर्वसाधारण नियम विधीत सांगितलेले असतात. विधीमंडळाने प्रदान केलेल्या क्षमतेच्या मर्यादेत शासन किंवा इतर विधीनिर्मित संस्थेने केलेले नियम म्हणजे कनिष्ठ विधीप्रक्रिया (सबॉर्डिनट लेजिस्लेशन) होय. रूल्स हा शब्द कनिष्ठ विधीप्रक्रियेनुसार केलेल्या नियमांना संबोधण्याकरिताच सर्व साधारणपणे वापरला जातो. या नियमांना अनेक नावे आहेत. उदा., रूल्स, रेग्युलेशन्स, बायलॉज, ऑर्डर्स, स्कीम्स इत्यादी. यांपैकी प्रत्येकाला एक विशिष्ट असा अर्थ असतो. संसदेने किंवा विधानसभेने केलेल्या कायद्याला ‘रूल्स’ म्हणून संबोधिले जात नाही त्यांच्या संदर्भात ‘ॲक्ट’ हाच शब्द वापरण्यात येतो. विधेयक (बिल) हे संसदेत किंवा विधानसभेत मांडले जाते. ते सभेत होऊन त्यावर राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची स्वाक्षरी होऊन शिक्कामोर्तब झाले, की त्याचे विधीत (ॲक्टमध्ये) रूपांतर होते.
याशिवाय विधीमध्ये अनेक संज्ञा येत असतात. प्रत्येक विधीत व्याख्या देणारे एक कलम असते आणि त्यात विधीविषयक शब्दांच्या व्याख्या दिलेल्या असतात. त्या शब्दांचे अर्थ लावताना न्यायालये त्या व्याख्यांचा उपयोग करतात. शिवाय न्यायालये अनेक शब्दांचे अन्वयार्थ करीत असतातच. काही शब्दांचे अर्थ संकल्पनात्मक असतात. उदा., एखादा करार रद्दबातल असणे म्हणजे ‘व्हॉइड’ असणे व रद्द होऊ शकणारा असणे म्हणजे ‘व्हॉइडेबल’ असणे. विवाहाचे असेच दोन प्रकार असतात. जर हिंदू पुरुषाची पहिली पत्नी जिवंत असेल आणि त्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला, तर तो विवाह अवैध वा शून्य असतो. परंतु जर तो पुरुष नपुंसक असेल, तर तो विवाह अवैधकारक म्हणजेच शून्यनीय असतो. याचा अर्थ असा, की ज्या अटी विवाह करण्यास आवश्यक आहेत त्या न पाळल्या, किंवा त्यांचा भंग करून विवाह केला, तर तो विवाह रद्दबातल म्हणजे कधीच अस्तित्वात न आलेला, असा धरला जातो. मात्र वैवाहिक जीवनास आवश्यक अशी परंतु विवाहाच्या सारभूत वैधतेस आवश्यक नसणारी अट जर पाळली गेली नाही, तर तो विवाह रद्द करून घ्यावा लागतो. अशा रद्द करवून घ्याव्या लागणाऱ्किंवा रद्द करवून घेता येणाऱ्या विवाहास अवैधकारक किंवा शून्यनीय विवाह असे म्हणतात.
काही शब्दांचे अन्वयार्थ न्यायालयांनी केलेले आहेत. त्यांपैकी काही संकल्पनात्मक आहेत. उदा., संविदा कायद्यात (कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट) ‘कन्सिडरेशन’ हा शब्द असा आहे, की ज्याची व्याख्या जरी संविदा कायद्यात समाविष्ट असली, तरी संकल्पना म्हणून तिचा आविष्कार न्यायालयीन निर्णयांमधून झालेला आहे. [⟶संविदा कायदे]. उत्तरदायित्वाच्या (लायबिलिटी) कायद्यात ⇨हयगय वा निष्काळजीपणा (निग्लिजन्स) हा शब्द अनेकवेळा येतो. या शब्दाची व्याख्याकोणत्याच कायद्यात नाही. ‘निग्लिजन्स’चा अर्थ ज्या निष्काळजीपमामुळे उत्तरदायित्व लादले जाते, तो निष्काळजीपणा असा केला गेला आहे. निष्काळजीपणा हेतुपुरस्सर असायला हवा काय? त्याने दुसऱ्याजस अपाय व्हायला हवा काय? किती काळजी न घेतल्याने ती कृती निष्काळजी या सदरात मोडते ? काळजी घेणाऱ्याव्यक्तीची विशेष क्षमता ही काळजीच्या दर्जाशी संबंधित आहे काय ? उदा., डॉक्टरने जर प्राणवायूचा सिलिंडर शस्त्रक्रियेपूर्वी तयार ठेवला नाही आणि त्यामुळे रोगी दगावला, तर तो निष्काळजीपणा ठरेल काय ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे ही न्यायालयीन निर्णयांमधून देण्यात आली आहेत आणि त्या सर्व निर्णयांमधून ‘निष्काळजीपणा’ ही संकल्पना व तिचे कायदेशीर परिणाम यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. ज्या ज्या वेळी निष्काळजीपणा हा शब्द वापरण्यात येईल, त्यावेळी त्याचा वरील निर्णयांनी जो अन्वयार्थ दिला आहे, तोच लागू होईल.
दंडशास्त्रात एखाद्या आरोपीने जर अचानक आणि गंभीर प्रक्षोभामुळे एखादा गुन्हा केला असेल, तर त्याच्या शिक्षेत कपात केली जाते. याला इंग्रजीत ‘डिमिनिश्ड रिस्पॉन्सिबिलिटी’ असे म्हणतात. ‘अचानक आणि गंभीर प्रक्षोभ’ यांस इंग्रजीत ‘सडन अँड ग्रेव्ह प्रॉव्होकेशन’ अशी शब्दयोजना केलेली असून, त्याचे स्पष्टीकरण न्यायालयीन निर्णयांमधूनच मिळवावे लागते. तथापि प्रेक्षोभ झाल्यावर बर्यारच वेळेनंतर जर गुन्हा घडला असला, तर तो प्रक्षोभामुळे झाला असे म्हणता येणार नाही. वेडाच्या भरात गुन्हा झाला, तर त्याचे उत्तरदायित्व त्या आरोपीवर नसते पण वेड (इन्सॅनिटी) कशाला म्हणायचे याही शब्दाची व्याख्या विधीत दिलेली नसून न्यायालयांनीच ती ठरविली आहे. नव्याने विकसित होणारे मानसशास्त्रीय ज्ञान व कसोट्या विचारात घेता कायद्यातील ‘वेड’ या संज्ञेची व्याख्या वा आशय यात बदल होत असतो. [⟶वेड].
विधीमधील अनेक शब्दांचे अर्थ न्यायालयीन निर्णयांनुसार ठरलेले आहेत. उदा., ‘शल’ हा इंग्रजी शब्द वापरला असेल, तर जी कृती सांगितली असेल ती करण्याची त्या व्यक्तीवर किंवा अधिकाऱ्यावर सक्ती असेल आणि ‘मे’ (may) असा शब्द वापरला असेल, तर ती कृती स्वैच्छिक असेल, मात्र काही बाबतींत ‘मे’चाही अर्थ ‘शॅल’ असा घेतला जाऊ शकतो. म्हणजे ते त्या शब्दाच्या संदर्भावर अवलंबून असेल. कायद्यामध्ये ‘रीझनेबल’ हा शब्द अनेकदा येतो. उदा. जर एखाद्या अधिकाऱ्यास वाजवी कारणास्तव एखादे वास्तव अमुक आहे असे वाटले, तर त्याचे ते ‘वाटणे’ योग्य की अयोग्य, हे न्यायालय ठरविते. सामान्यपणे सर्वसाधारण बुद्विमत्तेच्या माणसाला त्या परिस्थिती तसे वाटू शकेल किंवा नाही, याचा विचार करूनच न्यायालये हा निर्णय घेतात. ‘रीझनेबल’चा विधीमधील अर्थ सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट ‘वाजवी असणे’असा आहे.
संविधानाचा अन्वयार्थ करताना न्यायालये जास्त व्यापक अर्थाने त्यातील शब्दांना अर्थ देतात. त्यांतही काही शब्दांचे अर्थ कसे असावेत, त्याबद्दलच्या व्याख्या किंवा स्पष्टीकरणे दिलेली आहेत. उदा., अनुच्छेद १३ मध्ये सांगितले आहे, की शासनाने मूलभूत अधिकारांचा संकोच करणारा कोणताही कायदा करता कामा नये. शासन म्हणजे काय हे अनुच्छेद १२ मध्ये सांगितले आहे. त्या व्याख्येत केंद्रातील संसद व केंद्रशासन, राज्यांची विधानमंडळे व शासने, इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचा उल्लेख असून, त्यापुढे ‘आणि इतर अधिकारी’ (अँड अदर ऑथॉरिटीज) असेही शब्द आहेत. या शब्दांचा न्यायालयांनी अन्वयार्थ करून त्यांत सर्व कायद्यांनी स्थापन केलेल्या- शासनाच्या वतीने किंवा कारकत्व करणाऱ्या-शासनसम संस्थांचा समावेश केला आहे. तसेच विधीची व्याख्या अनुच्छेद १३ मधील उपकलम ३ (अ) मध्ये दिलेली आहे. यांशिवाय अनेक
शब्दांचे अर्थ उदा., ‘कायद्यापुढे समान वागणूक’किंवा ‘कायद्याचे समान संरक्षण’, ‘व्यक्तिस्वातंत्र्य’, ‘कायद्याच्या योग्य प्रक्रियेखेरीज’ (विदाउट प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ) या शब्दांना केवळ शाब्दिक अर्थ देता येत नाहीत, तर त्यांचे अर्थ न्यायालयीन अन्वयार्थातून प्राप्त झाले आहेत.
साठे, सत्यरंजन
विधीविषयक लेखनात तसेच न्यायालयीन कामकाजात वारंवार वापरात येणाऱ्या काही महत्त्वाच्या निवडक विधीसंज्ञांचे अर्थ पुढे दिले आहेत. सर्व संज्ञा स्थलाभावी अंतर्भूत करणे शक्य नसल्याने सामान्यपणे व्यवहारात नेहमी वापरात येणाऱ्या संज्ञाच येथे दिल्या आहेत. त्यांपैकी बहुतेक संज्ञांवर स्वतंत्र नोंदी असून त्या बाणांकनाने दर्शविल्या आहेत.
⇨अंतराळ कायदा : सामान्यपणे अंतराळातील दळणवळणा संबंधीचे निर्बंध, परवाने, नुकसानभरपाई इत्यादींबाबत सार्वभौम राष्ट्राने केलेला कायदा.
⇨अतिक्रमण: दुसऱ्याच्या न्याय्य हक्कावरील आक्रमण म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावर, तसेच स्थावर वा जंगम मालमत्ता यांवर- प्रत्यक्ष व बलपूर्वक केलेले आक्रमण वा इजा.
अधिकारपिता : (जुरुस्डिक्शन). न्यायनिवाडा करण्यासाठी भौगोलिक, आर्थिक व वादविषय यांवरून ठरविण्यात येणारे न्यायालयाचे क्षेत्र वा कक्षा.
⇨अधिग्रहण : (रेक्किझिशन). सार्वजनिक प्रयोजनार्थ खाजगी मालकीची स्थावर संपत्ती मालकाचा उत्तराधिकार कायम ठेऊन विशिष्ट काळापर्यंत विधीवत् ताब्यात घेण्याबाबत शासनाने केलेली कृती.
⇨अधिपत्र : (वॉरंट). सामान्यपणे एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याने वा न्यायालयीन अधिकाऱ्याने एखाद्या गुन्हेगार व्यक्तीस अटक करून कायदेशीर चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्याबाबत निदेशित केलेला लेखी अधिकार.
⇨अधिवास : (डॉमिसाइल). एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने निवडलेल, किंवा जन्मतः कायद्याच्या नियमाने प्राप्त झालेले कायमस्वरूपी वास्तव्याचे ठिकाण.
⇨अध्यादेश : (ऑर्डिनन्स). सर्वसाधारणपणे संसद व राज्य विधीमंडळ यांचे कामकाज चालू नसताना तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रपती अथवा राज्यपाल यांनी आवश्यकतेनुसार काढलेले विधीवत् हुकूम अथवा तत्सदृश नियम.
⇨अपकृत्य : (टॉर्ट). सर्वासाधारणपणे व्यक्तींचे स्वातंत्र्य, मालमत्ता, लौकिक प्रतिष्ठा इत्यादींचा भंग करणारा दिवाणी स्वरूपाचा गुन्हा.
⇨अपप्रेरक : (अबेटर). गुन्हा करण्याकरिता साह्य, उत्तेजन व प्रेरणा देणारी व्यक्ती.
⇨अपहरण : (ॲबडक्शन). अवैध मार्गांने एखाद्या व्यक्तीस फसवून किंवा तशा प्रकारे प्रवृत्त करून वा मारहाण करून बळजबरीने तिचे स्थानांतर करणे किंवा लपवून ठेवणे.
⇨अपील : कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरूद्ध योग्य अशा वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी केलेला अर्ज.
⇨अफरातफर : दुसऱ्याची जंगम संपत्ती ताब्यात असलेल्या व्यक्तीने अशी संपत्ती स्वतःसाठी अप्रामाणिकपणे व अल्पकाळासाठीसुद्धा वापरणे किंवा तसा प्रयत्न करणे.
⇨अब्रुनुकसानी : सामान्यपणे पुरेशा कायदेशीरपणे आधाराशिवाय एखाद्याची तोंडी, लेखी तसेच हावभाव, चित्र, आकृती इ. कोणत्याही साधनाद्वारे बदनामी करणे.
⇨अभियोक्ता : (प्रॉसिक्यूटर). फौजदारी किंवा दंडाधिकारी न्यायालयात आरोपीविरूद्ध सरकारतर्फे काम चालविणारा वकील वा सरकारी अधिकारी.
⇨अभ्यवेक्षण : (सेन्सॉरशिप). सार्वजनिक रीत्या बोललेला, लिहिलेला वा मुद्रित झालेला शब्द किंवा शब्दसंहती त्याचप्रमाणे सार्वजनिक चित्र, प्रयोग वा अभिव्यक्ती यांचा समाजाचे संरक्षण, धोरण, सदभिरुची, धर्म किंवा नीती या गोष्टींवर होणारा परिणाम विचारात घेऊन करण्यात येणारी प्रसिद्विपूर्व वा प्रसिद्धिपश्चात तपासणी.
⇨अज्ञान : विधीप्रमाणे सज्ञान ठरली जाण्याइतपत किमान वयोमर्यादा जिने गाठली नाही अशी व्यक्ती.
⇨उत्तराधिकार : मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या निरुपाधिक संपत्तीचे त्याच्या नातेवाईकाकडे कायद्याच्या प्रक्रियेने होणारे अनुक्रमण.
⇨उपद्रव : दुसऱ्याच्या शरीरास, मालमत्तेस अगर उपभोगाच्या हक्कास फौजदारी वा दिवाणी स्वरूपाची इजा वा अपाय पोहोचविणारे कृत्य.
⇨कट : दोन किंवा अधिक व्यक्तींनी अवैध कृत्य करण्याकरिता वा करविण्याकरिता, किंवा अवैध नसलेले कृत्य अवैध मार्गाने करण्याकरिता वा करविण्याकरिता सहभागी होणे.
⇨कपट : फसविण्याच्या इच्छेने केलेले कोणतेही दिवाणी वा फौजदारी स्वरूपाचे कृत्य.
⇨कबुलीजबाब: गुन्हाकबुलीस आरोपीने दिलेली मान्यता.
⇨कार्योत्तर विधी: (एक्स पोस्ट् फॅक्टो लॉ). कृतिकालीन विधीनुसार गुन्हा नसलेली कृती गुन्हा व दंडनीय ठरविणारा नंतरचा संविधा.
सक्षम विधीमंडळास एखादा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट) लागू करता येतो. भारतात संविधानाने फौजदारी कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, असे बंधन घातले आहे. हा अपवाद वगळता, अन्य सर्व कायदे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतात.
⇨कीर्तिस्व: (गुडविल). सामान्यपणे कोणत्याही व्यवसायाने वा व्यापारी संस्थेने धंद्यात मिळविलेले चांगले नाव वा कौशल्य.
⇨कोरोनर: अपघात, मारामारी, संशयास्पद मृत्यू किंवा तत्समान अनैसर्गिक कारणांनी मरण पावलेल्यांची चौकशी करण्याचा हुकूम देणारा अधिकारी.
⇨गणपूर्ती: (क्कोअरम). संघांच्या व संस्थांच्या सभा आणि त्यांत घेतलेले निर्णय वैध ठरविण्यासाठी संघांच्या व संस्थांच्या घटनांमध्ये अथवा नियमावलींमध्ये उपस्थित सदस्यांची विहित केलेली किमान संख्या.
⇨गहाण : कर्जफेडीच्या शाश्वतीसाठी एखाद्या विशिष्ट मिळकतीवरील (स्थावर अथवा जंगम) तारण ठेवलेला हक्क.
⇨गुमास्ता अधिनियम : दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतिगृहे, नाट्य-चित्रपटगृहे, सार्वजनिक करमणुकीची वा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणाऱ्यार सेवकांसंबंधी व त्यांच्या कामासंबंधी शासनाने संमत केलेला अधिनियम.
⇨घटस्फोट: पति-पत्नींचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीर रीत्या तोडणे.
⇨चाचेगिरी : खुल्या समुद्रावरून हक्कदारांच्या ताब्यातून गलबते किंवा त्यांतील माल पळवून नेऊन केलेली लूट.
⇨चिरभोग : (प्रिस्क्रिप्शन). सामान्यपणे दीर्घकाळ, सतत, उघड आणि विना अडथळा एखाद्या मिळकतीचा उपभोग घेताना कब्जेदारास कायद्याने प्रस्थापित होणारा मालकी हक्क.
⇨चोरी : कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यातून जंगम मालमत्ता त्याच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे काढून नेणे अथवा हलविणे.
⇨जप्ती: न्यायालयाने एखादी स्थावर वा जंगम मिळकत आदेशिकेद्वारे आपल्या ताब्यात घेणे.
⇨जामीन: सामान्यपणे एखाद्याने न्यायिक अभिरक्षेतून (कस्टडी) मुक्तताकरण्याची वा दिलेल्या वचनाची परिपूर्ती किंवा दायित्वाची फेड करण्याची स्वीकारलेली जबाबदारी वा हमी.
⇨तोतयोगिरी: दुसऱ्यास नुकसान वा त्रास देण्याच्या उद्देशाने केलेली कपटपूर्वक खोटी बतावणी वा फसवणूक.
⇨दत्तक: जम्नाने तिऱ्हाईत असणाऱ्या व्यक्तीस समाजाने किंवा कायद्याने मान्य केलेल्या संलग्नीकरणाच्या पद्धतीने औरस पुत्रास किंवा कन्येचा दर्जा व अधिकार देणे.
⇨दस्तऐवज: साधारणपणे कायद्यान्वये पुरावा म्हणून उपयोगात येणारे अथवा उपयोगात येऊ शकेल असे कोणतेही अक्षर, आकृती वा चिन्ह इत्यादींच्या योगाने कशावरही अभिव्यक्त किंवा विशद केलेला विषय.
⇨दान: सामान्यपणे दात्याने आपल्या संपत्तीचे विनामोबदला, स्वेच्छेने इतर कोणाही व्यक्तीस केलेले विधवत् हस्तांतरण.
⇨दिवाळखोरी: ऋणकोची कर्ज फेडण्याची असमर्थता.
⇨दुराशय: फौजदारी कायद्यान्वये अपराध करण्याचा हेतू वा आशय.
⇨नादारी: दारिद्र्य वा कंगालपणा यांमुळे दाव्याचा पुरेसा खर्च वा न्यायालय शुल्क भरू न शकणाऱ्यावादी किंवा अर्जदाराकडून आगाऊ शुल्क न घेता न्यायालयात दावा चालविण्यास न्यायालयाने दिलेली परवानगी.
⇨निखातनिधी: (ट्रोझर ट्रोव्ह). अज्ञात मालकाची जमिनीत पुरलेली मूल्यवान चीजवस्तू.
⇨निर्णयविधी:न्यायालयांनी दिलेल्या न्यायनिर्णयांमधून निर्माण झालेला कायदा.
⇨निर्वचन:(इंटरप्रिटेशन). कायद्यातील कठीण, संदिग्ध वा बव्हर्थी शब्द किंवा संज्ञा किंवा संविधी यांची अर्थनिश्चिती करणे.
⇨नुकसानभरपाई: साधारणपणे दुसऱ्याच्या कृतीमुळे किंवा अकृतीमुळे शरीराला, संपत्तीला, लौकिकाला वा अधिकाराला झालेल्या हानीबद्दल अथवा इजेबद्दल कायद्याने दिली जाणारी भरपाई.
⇨नैसर्गिक कायदा: ज्या तत्त्वाने माणसाच्या भौतिक जीवनाचे नियमन होते ज्याची प्रेरणा विवेकवादी व नैसर्गिक असते आणि ज्याचा आधार सत्य, नीती वज्ञान हे असतात, ही तत्त्वे व त्यांपासून उगम पावणारे नियम.
⇨नोंदणी: मालमत्तेच्या व इतर महत्त्वाच्या हक्कांची शासनाच्या नोंदवहीत अथवा योग्य त्या ठिकाणी अधिकृत रीत्या केलेली नोंद.
⇨न्यायचौकशी: दिवाणी तसेच फौजदारी कार्यवाहींच्या न्यायाधिकरणाकडून होणारी परीक्षा अथवा तपासणी.
⇨न्यायनिर्णय: (जजमेंट). सर्वसाधारणपणे दाव्याची अथवा खटल्याची कार्यवाही संपल्यानंतर न्यायालयाने बनविलेल्या आपल्या मतांची कारणासह अभिव्यक्ती.
⇨न्यायलेख: (रिट). सामान्यपणे राजाच्या, अध्यक्षाच्या किंवा शासनाच्या नावाने न्यायालयाकडून शिक्क्यानिशी पत्रस्वरूपात काढण्यात येणारा लेखी आदेश.
⇨न्यायालयाची बेअदबी: न्यायालयाच्या आज्ञेचा जाणूनबुजून केलेला अवमान अथवा त्या प्रकारची कृती.
⇨न्यायिक पुनर्विलोकन: (ज्यूडिशल रिव्ह्यू). संविधी किंवा प्रशासकीय अधिनियम किंवा कृती यांच्या ग्राह्यतेबद्दल निर्णय देण्याची न्यायांगाची शक्ती.
⇨पॅरोल: कैद्याची विशिष्ट मुदतीकरिता केलेली सशर्त मुक्तता.
⇨पुरावा: एखादे तथ्य सिद्ध करण्यासाठी किंवा निष्कर्षाच्या समर्थनासाठी उपयोजलेले तोंडी अथवा लिखित स्वरूपाचे साधन किंवा दुवा.
⇨प्रक्रिया विधी: (प्रोसीज्यरल लॉ). दिवाणी दावे तसेच फौजदारी खटले निर्णित करणे व त्याची अंमलबजावणी करणे यांविषयी कायद्यान्वये अनुसरण्यात येणारे विहित न्यायिक प्रक्रियाविषयक अथवा कार्यवाहीविषयक नियम.
⇨प्रतिबंधक स्थानबद्धता:एखाद्या व्यक्तीकडून गैरकृत्य होण्याची शक्यता आहे, किंवा राष्ट्राची सुरशिक्षतता धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीला गैरकृत्य करण्यास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने केलेली अटक.
⇨प्रतिज्ञालेख:(ॲफिडेव्हट). एखाद्या वस्तुस्थितीबद्दल शपथेवर केलेली लेखी निवेदन वा प्रतिज्ञापत्र.
⇨प्रत्यर्पण: (एक्स्ट्रडिशन). गुन्हा करून दुसऱ्या देशात पळून जाणाऱ्या न्यायालीन चौकशीसाठी किंवा शिक्षेसाठी गुन्हा घडलेल्या देशाच्या स्वाधीन करणे.
⇨प्राङ्न्याय: (रेस ज्युडिकेटा). सामान्यपणे पूर्वी निर्णित झालेला दावा न्यायालयाने पुन्हा विचारात न घेण्याचे विधीन्यायशास्त्रातील एक तत्त्व.
⇨फौजदारी विधी: गुन्ह्यामध्ये कोणत्या दुष्कृतींचा (राँग्ज) समावेश होतो हे सांगणारा, सदरहू गुन्हयांचे अन्वेषण व तत्संबंधी कार्यवाही करण्याची तरतूद करणारा व शिक्षा वा अन्य उपायांनी गुन्ह्यांचे पारिपत्य, परिमार्जन वा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणारा कायदा.
⇨बेनामी व्यवहार: मिळकतीसंबंधीचे कोणतेही व्यवहार-व्यापार, सावकारी वा अन्य व्यवहार-स्वतःच्या नावाने न करता दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करणे.
⇨बोजा: एखाद्यारकमेच्या वसुलीकरिता हमी म्हणून व्यक्ती किंवा कायद्याने एखादी स्थावर मिळकत तारण ठेवण्याचा व्यवहार.
⇨भागीदारी: दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही किफायतशीर व्यापार-उद्योग करण्यासाठी आपली संपत्ती, अंगमेहनत अगर कसब एकत्र करून त्या व्यापार-उद्योगात होणारा नफा मान्य प्रमाणात वाटून घेण्याचा केलेला करार.
⇨मरणान्वेषण: (इन्क्वेस्ट). संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याचा पोलिसांना व न्यायालयास असलेला अधिकार.
⇨महाभियोग: (इंपीचमेंट). शासनातील उच्चरपदस्थ व्यक्ती तसेच अधिकारी यांनी केलेला गुन्हा, गैरवर्तणूक, संविधान भंग किंवा कर्तव्यपालनातील अक्षम्य हेळसांड यांबद्दल रीतसर आरोप ठेवून विधीनमंडळाने चालविलेला खटला.
⇨माफी: गुन्हा कबुलीकरिता न्यायालयाने सह-अपराधीस शिक्षेत दिलेली सशर्त माफी अथवा क्षमेचे अभिवचन.
⇨मृत्यूपत्र:कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या मिळकतीसंबंधी आपल्या मृत्यूनंतर अंमलात यावे या हेतूने स्वतःच्या इच्छेने केलेले प्रकटीकरण.
⇨राजद्रोह: (सिडिशन). कायद्याने प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरविणे किंवा तसा प्रयत्न करणे.
⇨ राष्ट्रद्रोह: (ट्रीझन). एखाद्या देशाच्या शासनाविरुद्ध त्याच देशातील व्यक्तीने वा गटाने युद्ध करणे अथवा युद्धास मदत करणे अथवा तशा प्रकारचा कट करणे.
⇨लवाद: दोन किंवा दोहोंपेक्षा अधिक व्यक्तींमधील दिवाणी स्वरूपाचा वाद उभयपक्षांनी नेहमीच्या न्यायालयीन पद्धतीऐवजी, परंतु त्यासारख्याच पद्धतीने न्यायालयाच्या बाहेर राहून किंवा न्यायालयाची काहीशी मदत घेऊन सन्मान्य अशा त्रयस्थ व्यक्ती निवडून त्यांमार्फत निवाडा (अवॉर्ड) करून घेण्याची पद्धती.
⇨लिलाव: कमाल किंमत येईपर्यंत चढाओढीने बोली बोलून मालमत्तेची जाहीर विक्री करण्याची पद्धत.
⇨लेखप्रमाण: (नोटरी,पब्लिक).कायदेविषयक दस्तऐवज, संविदा इत्यादींची शपथेवर नोंदकरून त्या अधिप्रमाणित (ऑथिंटिकेट) करणारा शासननियुक्त परवाना-अधिकारी.
⇨लेखाधिकार: (कॉपीराइट). आपली लेखनकृती किंवा कलाकृती सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने संबंधित लेखकाला किंवा कलावंताला कायद्याने प्राप्त झालेला हक्क.
⇨वाटणी: संयुक्त किंवा समाईक हिस्सेदार यांच्या एकत्रित किंवा समाईक मालमत्तेचे प्रत्येकाच्या हिश्श्याप्रमाणे विभाजन करून त्या हिश्श्यांचा प्रत्यक्ष कबजा त्यांना देणे.
⇨वादकारण: (कॉझ ऑफ ॲक्शन). न्यायालयात उपस्थित केलेल्या दाव्याचा अथवा खटल्याचा वादविषय.
⇨वादक्रय: (चॅम्पटी). दिवाणी दाव्यातील मिळकतीमध्ये काही हिस्सा मिळविण्यासाठी दाव्याच्या वादविषयक कोणत्याही प्रकारचा हितसंबंध नसलेल्या तिऱ्हाईत व्यक्तीने दाव्यातील पक्षकाराबरोबर पैशाची अगर अन्य स्वरूपाची मदत करण्याचा केलेला करार.
⇨विद्वेष, कायद्यातील: (मॅलिस इन लॉ). कोणतेही योग्य अथवा संभवनीय कारण नसताना एखाद्याच्या विरुद्ध कृती करताना वापरलेली वाईट अथवा दुष्ट बुद्धी.
⇨विधी: (लॉ). कोठल्याही देशातील सक्षम/अधिकृत विधीमंडळाने केलेले नियम किंवा न्यायालयांनी निर्णयाद्वारे मांडलेले सिद्धांत किंवा न्यायालय अथवा विधीमंडळांनी स्वीकारलेल्या रूढी, परंपरा यांमार्फत प्रस्थापित झालेले नियम किंवा आंतरराष्ट्रीय करारानुसार केलेले नियम आणि वरील नियमांनी ज्यांना क्षमता दिली आहे अशा कनिष्ठ शासकीय संस्थांनी केलेले नियम, की ज्यांचे उल्लंघन केल्यास न्यायालयात ते दंडनीय ठरतात.
⇨विधी-अधिसत्ता: (रुल ऑफ लॉ). ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे स्वातंत्र्य कायद्यानुसार आणि कायद्याच्या प्रक्रियेनेच हिरावले जाऊ शकते, ज्यामध्ये व्यक्तीचे उत्तरदायित्व आणि अधिकार कायद्याच्या प्रक्रियेनुसारच ठरविले जातात आणि ज्यामध्ये कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान मानल्या जातात व सर्वांना कायद्याचे समान संरक्षण दिले जाते अशी व्यवस्था.
⇨विधिकल्पित: (लीगल फिक्शन). कायद्याच्या कार्यवाहीत वास्तवात झालेले बदल समाविष्ट करण्याकरिता जे कल्पित गृहीत धरले जाते, त्यास ‘विधीकल्पित’म्हणतात.
⇨विधिविरोध: (कॉनफ्लिक्ट ऑफ लॉज). सामान्यपणे दोन कायद्यातील संघर्ष वा विधीसंवाद.
⇨विधिव्यवसाय: (लीगल प्रोफेशन). सामान्यपणे दोन अगर अधिक व्यक्ती अगर व्यक्तिसमूहांमधील वाद अथवा भांडण त्या व्यक्तींच्या वतीने अधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात दाखल करून व चालवून योग्य पुराव्यानिशी निर्णय करण्याची प्रक्रिया.
⇨विधिसूत्रे:(मॅक्झिम्स ऑफ लॉ).सामान्यपणे न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाच्या बाबी विशद वा स्पष्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्याकायद्यातील विशिष्ट प्रकारच्य परिभाषेतील संक्षिप्त म्हणी वा सूत्रे.
⇨विलग्नवास:(क्वॉरन्टीन).सामान्यपणेगंभीर स्वरूपाचे साथीचे रोग ज्या व्यक्तींच्या संसर्गामुळे पसरतात, अशा संसर्गजन्य व्यक्तींना समाजातील इतर व्यक्तींपासून काही काळ अलग वा वेगळे ठेवण्याची पद्धती.
⇨विवाद: (लिटिगेशन). न्यायालयातील विधीमान्य दावा अथवा वाद.
⇨विवादप्रतिपादन: (प्लीडिंग). न्यायालयात वादी व प्रतिवादी अशा दोन्ही बाजूंकडून आपापले लिखित स्वरूपात सादर केलेले म्हणणे.
⇨विशेषाधिकार: व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांत कायद्याने प्रदान केलेला विशेष्टअधिकार.
⇨विश्वासघात: सामान्यपणे व्यवहारात विश्वासाने सोपविलेली दुसऱ्याची मालमत्ता फसवणूक करून प्रत्यक्षात तिचा अपहार करणे व ती स्वतःच उपभोगणे.
⇨वेड: सामान्यपणे सारासार विवेकबुद्धी वा मानसिक समतोलपणा नसल्यामुळे कायद्याने कोणतेही करार करण्यास अपात्र ठरविण्यात आलेल्या व्यक्तीची मनाची स्थिती.
⇨व्यपहरण: (किडनॅपिंग). सामान्यपणे कोणाही व्यक्तीस तिच्या संमतीविरूद्ध अथवा तिच्यातर्फे कायदेशीर रीत्या संमती देण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीच्या संमतीविरुद्ध पळवून नेणे वा पळवून नेण्यास फूस लावणे.
⇨व्यादेश: (इन्जक्शन). एखादी विविक्षित कृती करण्याबद्दल वा न करण्याबद्दल न्यायालयाने दिलेला विशिष्ट आदेश.
⇨शक्तिबाह्य: (अल्ट्रा व्हायरस). एखाद्या निगमास, कंपनीस वा वैधानिक मंडळास प्रदान केलेल्या कायेदेशीर शक्तीच्या अथवा अधिकारितेच्या बाहेर जाऊन त्या निगमाने, कंपनीने वा वैधानिक मंडळाने वा त्यांतील अधिकाऱ्यांनी केलेल्या अवैध कृती.
⇨शांतताभंग: सार्वजननिक शांततेत व सुरक्षिततेतबाधा आणणारी वा एखाद्याआदेशाचा भंग करणारी किंवा तशा प्रकारचे कृत्य करण्यास उत्तेजन देणारी कृती करणे.
⇨हुकूमनामा: (डिक्री). न्यायालयापुढे आलेल्या वादात न्यायालयाने दिलेल्या निर्णयपत्रावरून बनविलेला अंतिम हुकूमनामा.
जोशी, वैजयंती संकपाळ, ज, बा.
“