विद्युत् भट्टी : ज्या भट्टीत उष्णता उत्पन्न करण्यासाठी विजेचा उपयोग केलेला असतो, अशा भट्टीला विद्युत् भट्टी म्हणतात. या भट्टीत अतिशय उच्च व अचूक तापमान मिळू शकते. विद्युत् भट्टी ही शंभर टन क्षमता व काढता-घालता येणारे झाकण असलेली उच्चतापसह (न वितळता उच्च तापमानाला टिकून राहणाऱ्या) पदार्थाची टाकी, अखंडपणे चालणारा वाहकपट्टा असणारे व निरोधित केलेले लांबच लांब दालन, उच्चतापसह पदार्थांची मूस इ. स्वरूपांत असते. भट्टीतील उष्णता झिरपून वाया जाऊ नये, तसेच भट्टीचे बाहेरील संरक्षक पोलादी आवरण आतील उष्णतेने जास्त तापून खराब होऊ नये म्हणून पोलादी आवरणाच्या आतील बाजूस उच्चतापसह पदार्थाचे जाड आणि मजबूनत अस्तर बसविलेले असते. कधीकधी या अस्तराभोवती उष्णतानिरोधक द्रव्याचे आवरण असते.
(१) विद्युत् प्रज्योत भट्टी, (२) विद्युत् प्रवर्तन भट्टी, (३) विद्युत् रोधक भट्टी व (४) विद्युत् अपारक भट्टी हे विद्युत् भट्ट्यांचे प्रमुख प्रकार आहेत. यांपैकी प्रज्योत व प्रवर्तन विद्युत् भट्ट्याच अधिक वापरात आहेत. विद्युत् भट्टीत विजेचा धातूवर कोणताही विद्युत् रासायनिक परिणाम होत नाही, तर फक्त धातूचे तापमान वाढते. तथापि विद्युत् वैश्लेषिक भट्टीत धातूंच्या वितळलेल्या लवणांत विद्युत् प्रवाहामुळे आयनांचे (विद्युत् भारित अणू, रेणू अथवा अणुगटांचे) स्थानांतरण होते. मात्र येथे लवणे वितळविण्यासाठी उच्च तापमानाची गरज असते. ॲल्युमिनियम, लिथियम, सोडियम इ. धातूंच्या लवणांपासून परिष्कृत (अधिक शुद्ध केलेली) धातू मिळविण्यासाठी विद्युत् वैश्लेषिक भट्टी वापरतात [⟶ विद्युत् धातुवितज्ञान].
मराठी विश्वकोषात ‘विद्युत् तापन’ व ‘विद्युत् धातुविज्ञान’ या नोंदींमध्ये विद्युत् भट्टीशी संबंधित काही माहिती आली आहे. तसेच ‘ओतकाम’ व ‘पोलाद’ या नोंदीत प्रर्वतन भट्टीची व ‘पोलाद’ या नोंदींत प्रज्योत भट्टीचीही माहिती आलेली आहे. शिवाय ‘भट्टी’ अशी स्वतंत्र नोंद असून तिच्यात भट्ट्यांचा इतिहास, रचना, त्यांसाठी लागणारी सामग्री वगैरेंची माहिती आलेली आहे.
उपयोग व फायदे : विद्युत् भट्टीत मिळणाऱ्या अतिउच्च तापमानामुळे धातू वितळविणे, मिश्रधातू बनविणे इत्यादींकरिता या भट्ट्या वापरतात. अगंज (स्टेनलेस), बांधकामाचे व हत्यारांचे पोलाद, तसेच यांत्रिक हत्यारे, मोटारगाडी, विमान, रासायनिक, अन्नप्रक्रिया व वाहतूक या उद्योगांत आवश्यक असणाऱ्या खास प्रकारच्या मिश्रधातू मुख्यत्वे विद्युत् भट्टीच्या साहाय्याने तयार करतात. पोलाद निर्मितीसाठी उघड्या चुल्याची भट्टी विद्युत् भट्टीपेक्षा अधिक फायदेशीर आहे. मात्र उघड्या चुल्याची भट्टी सुरू करायला जास्त वेळ लागतो. त्यामानाने विद्युत् भट्टी लवकर सुरू होते. म्हणून पोलादाची मागणी तातडीने भागविण्यासाठी विद्युत् भट्टी वापरतात. विद्युत् भट्टीतील उष्णतेचा स्त्रोत रासायनिक स्वरूपाचा नसल्याने नेमक्या संघटनांच्या मिश्रधातू वितळविण्यासाठी विद्युत् भट्टी ही योग्य अशी भट्टी आहे. धातू मिळविण्यासाठी धातुके (कच्च्या रूपातील धातू) वितळविणे आणि धातूचे वा मिश्रधातूचे परिष्करण यांसाठी विद्युत् भट्टी वापरतात. वितळबिंदूपेक्षा कमी अशा निश्चित तापमानापर्यंत तापवून व मग थंड करून काच व पोलाद यांचा ठिसूळपणा कमी करणे तसेच खास प्रकारचे रबर, प्लॅस्टिक व इतर द्रव्ये सुकविणे अथवा भाजणे यांकरिताही विद्युत् भट्टी वापरतात. विद्युत् भट्ट्या बंदिस्त करता येतात. म्हणून त्या नियंत्रित किंवा अक्रिय वातावरणाची गरज असणाऱ्या क्रियांसाठी वापरता येतात (उदा., स्फटिकांची वाढ करणे). झिरपबंद व निर्वातित केलेल्या विद्युत् भट्ट्या धातूंच्या निर्वायवीकरणासाठी (वायू काढून टाकण्यासाठी) वापरतात. यांशिवाय विद्युत् भट्ट्यांचे आणखी उपयोग पुढील वर्णनात आलेले आहेत.
इतर भट्ट्यांशी तुलना करता विद्युत् भट्टीचे पुढील फायदे आहेत.
(१) विद्युत् भट्टीत ज्वलन ही क्रिया नसते म्हणून तीमधून कोणत्याही प्रकारचा धूर, राख, धूळ वगैरेसारखे पदार्थ बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तापविण्याचे पदार्थ व भट्टीच्या सभोवतालचे वातावरण नेहमीच स्वच्छ राहते व कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाचा धोका रहात नाही. (२) विद्युत् भट्टीत तापमान कायम ठेवणे अथवा वेळोवेळी त्यात हवा तो बदल करणे म्हणजेच तापमानाचे हवे तसे अचूक नियमन करणे फारच सहजपणे व सुलभ रीत्या करता येते. अगदी विशिष्ट प्रकारच्या उष्णता संस्करणांमध्ये तापन व शीतन क्रिया एकापाठोपाठ कराव्या लागतात. या क्रियांचे नियमन विद्युत् भट्टीत उत्तम प्रकारे करता येते आणि ते भट्टीलगतच्या फलकावरील सामग्रीच्या साहाय्याने होते. (३) बऱ्याच उष्णता स्त्रोतांच्या बाबतीत असे दिसून येते की, तापविण्याच्या पदार्थांचे तापमान उष्णता पुरविणाऱ्या स्त्रोताजवळ जास्तीत जास्त असते व त्यापासून लांब जावे तसे ते कमी कमी होत जाते परंतु विद्युत् भट्टीमध्ये मात्र पदार्थाचे तापमान सर्वत्र एकसारखे ठेवता येते. (४) या भट्टीत देखभाल व दुरुस्ती यांचा खर्चही त्यामानाने फारच अल्प असतो. फक्त सुरुवातीचा खर्च बऱ्याच वेळा जास्त असू शकतो. तसेच ती वापरण्याचा खर्च स्थानिक वीज दरावर अवलंबून असतो.
विद्युत् रोधक भट्टी : भट्टीच्या सर्वच भागांत समप्रमाणात उष्णता उत्पन्न होईल अशा रीतीने हिच्यात रोधकांची मांडणी करता येते. रोधकांना आधार देणारे निरोधक भाग हे तापसह मातीच्या विटांचे बनविलेले असतात. कधीकधी रोधक घटक भट्टीभोवती असतो. काही ठिकाणी भट्टीचे तापमान फारच जास्त असल्यास याच्याभोवती रॉकवुल अथवा ॲस्बेस्टसाचे तंतू यांसारख्या पदार्थांचे दुसरे एक उष्णता निरोधक आवरण आवश्यक असते. उत्पन्न करावयाच्या तापमानानुसार उष्णता पुरविणारे रोधक म्हणून वेगवेगळ्या मिश्रधातूंचा उपयोग करतात. साधराणपणे वापरातील भट्टीत ४००० से. पर्यंत निकेल-तांबे, ९५०० से. पर्यंत निकेल-क्रोमियम-लोखंड, १,१५०० से. पर्यंत निकेल-क्रोमियम, १,२०००से. पर्यंत लोखंड-क्रोमियम-ॲल्युमिनियम या मिश्रधातू व १,५००० से. हून जास्त तापमानासाठी सिलिकॉन कार्बाइड वापरण्याचा प्रघात आहे.
सिलिकॉन कार्बाइडे व ॲल्युमिनियम यांच्या निर्मितीसाठी विद्युत् रोधक भट्टी वापरतात. या ठिकाणी तापवावयाचा पदार्थ हाच रोधक घटकाचे काम करतो. रोधक भट्ट्यांचा उपयोग बेकरीमध्ये पाव व बिस्किटे भाजणे, ओतकामात लागणारे वाळूचे गाभे भाजून काढणे, धातूवरील रंगलेप, सरस व कृत्रिम मुलामे वाळविणे तसेच वेगवेगळ्या धातूंच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या पृष्ठभागावर कमी तापमानाचे उष्णता संस्करण करणे, मंद शीतलन इ. विविध कामांसाठी होतो.
प्रयोगशाळेत उपयोगी पडणाऱ्या रोधक भट्ट्यांमध्ये ॲल्युमिन्यासारख्या उच्चतापसह पदार्थापासून बनविलेली एक नळी असते तिच्याभोवती रोधक संवाहकाची मुख्य तार गुंडाळलेली असते. या रोधक तारेभोवती निरोधक मातीचा थर देतात व त्याभोवती धातूचे संरक्षण कवच असते. कारखान्यात वापरावयाच्या रोधक भट्ट्या मात्र विशिष्ट काम व तापमान यांच्या गरजेनुसार विविध प्रकारांच्या व विविध आकारमानांच्या असतात. या सर्वच प्रकारांत रोधक हा भट्टीच्या प्रमुख दालनात उष्णता निरोधकाच्या आधाराने बसविलेला असतो आणि रोधकाची उष्णता भिंतीवरील उच्चतापसह अस्तरामार्फत व सरळ अशा दोन्ही प्रकारे तापविण्याच्या वस्तूवर जाते.
अशा भट्टीमध्ये तापविण्याचा माल भट्टीत ठेवण्यासटी व पक्का माल भट्टीतून बाहेर काढण्यासठी समोरच्या बाजूसच एक दरवाजा बसविलेला असतो आणि विजेचा स्विच, तापमापक, योग्य वेळी भट्टी आपोआप बंद वा चालू करणे व अशा रीतीने भट्टीचे तापमान हवे त्याप्रमाणे कायम राखणे वा बदलणे यांसाठीची उपकरणे भट्टीच्या पुढील दरवाजावरही बसविता येतात वा शेजारी एका फलकावर उभारतात. अशा तऱ्हेच्या भट्टीचा उपयोग प्रामुख्याने पितळ, शिसे, जस्त यांसारख्या धातू व मिश्रधातू मुशीत वितळविण्यासटी करतात. तसेच काही उपकरणांची उष्णता सहनशक्ती परीक्षा करण्यासाठीही होतो. प्रत्यक्ष तापविण्याच्या रोधक भट्टीत तापविण्याची वस्तू एका लांबट दालनात भरून ठेवतात. या दालनाच्या दोन्ही टोकांस दोन विद्युत् अग्रे बसविलेली असतात. या अग्रांना विद्युत् दाब दिला असता निर्माण होणारा विद्युत् प्रवाह भट्टीत तापविण्यासाठी ठेवलेल्या वस्तूंमधूनही जातो आणि ही तापविण्याची वस्तूच भट्टीचे तापमान वाढविणाऱ्या विद्युत् रोधकाचे काम करते. विद्युत् दाब योग्य प्रमाणात वाढवून हवे ते तापमान मिळविता येते. अशा भट्ट्यांचे नियमन त्यामानाने अवघड असते. अशा भट्ट्या सिलिकॉन कार्बाइडासारखी द्रव्ये बनविण्यासाठी उपयोगात आणतात.
विद्युत् प्रज्योत भट्टी : सर विल्यम सीमेन्स यांनी १८७९ साली विद्युत् प्रज्योत भट्टी पॅरिस येथील प्रदर्शनात ठेवली होती. तिच्याद्वारे त्यांनी मुशीत लोखंड वितळवून दाखविले होते. विद्युत् प्रज्योतीचा (वायूतून होणाऱ्या विद्युत् विसर्जनाचा) उपयोग करणाऱ्या भट्टायांचे अनेक प्रकार आहेत. त्यांतील बऱ्याचशा भट्ट्या दोन अग्रे असलेल्या व एककला प्रवाहाच्या असतात पण जास्त तापमान हवे असेल अथवा तापविण्याची वस्तू बरीच जास्त असेल, तर त्या ठिकाणी तीन अग्रे असलेल्या आणि त्रिकला विद्युत् प्रवाहावर चालणाऱ्या मोठमोठ्या भट्ट्याही (उदा., पोलादनिर्मितीच्या) असतात. धातुक वितळविणे, धातूंचे वा मिश्रधातूंचे परिष्करण करणे यांकरिता विद्युत् प्रज्योत भट्टी वापरता येते. प्रज्योतीचे तापमान ३,३००० से. पेक्षाही जास्त असते. मात्र अस्तराचा वितळबिंदू यापेक्षा कमी असल्याने भट्टीचे तापमान १,६००० से. पर्यंत ठेवता येते. अशा भट्ट्यांचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
उघड्या प्रज्योतीची भट्टी : हिच्यात विद्युत् अग्रे तापविण्याच्या पदार्थापासून दूर काही अंतरावर ठेवलेली असतात. या दोन अग्रांमध्ये विद्युत् दाब देण्याची वेळी ठराविक अंतर ठेवलेले असते व या दोन अग्रांमधील विद्युत् दाब त्यांमधील अंतरानुसार विवक्षित मर्यादेहून जास्त केला, तर त्या दोन अग्रांमध्ये विद्युत् प्रज्योत निर्माण होते व तिच्यातून खूपच मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडू लागते. यामुळेच विद्युत् भट्टीचे तापमान वाढू लागते. अशा भट्टीत बरीचशी उष्णता सरळ तापविण्याच्या पदार्थावरच येते पण काही उष्णता भट्टीची भिंतीवरून परावर्तित होऊन परत पदार्थाकडे येते. भट्टीची र्सवसाधारण रचना आ. २ (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे असून भट्टीचे वरचे झाकण वरचेवर उचलून घेता येते. तसेच आतील वितळलेला पदार्थ ओतून घेण्यासाठी संपूर्ण भट्टी एका अक्षाभोवती तिरकी करून तिच्यातील द्रव दुसऱ्या एखाद्या पात्रात अथवा परस्पर वेगवेगळ्या साच्यांत ओतता येतो. हिच्यातील विद्युत् अग्रे सर्वसाधारणपणे उभी न ठेवता आडवी ठेवलेली असतात. ही अग्रे साधारणपणे कार्बनाची अथवा ग्रॅफाइटाची असतात. काही वेळा पातळ पोलादी पत्र्याच्या नळीमध्ये कार्बनासारखा पदार्थ ठासून भरूनही अशी अग्रे तयार करतात. यामुळे त्यांची झीज बरीच कमी होते. नाही तर प्रज्योत निर्माण होत असता ही अग्रे तापून लाल भडक होतात व त्या तापमानास प्रज्योत अग्रापाशी हळूहळू जळून जातात. त्यामुळे दोन अग्रांमधील अंतर कायम राखण्यासाठी अग्रे पुढे पुढे सरकवावी लागतात. आणि काही दिवसांनी त्यांची लांबी फार कमी होताच ती पूर्णपणे बदलावी लागतात. अशा प्रकारच्या उघड्या प्रज्योतीच्या भट्टायांचा उपयोग साधारणपणे ॲल्यूमिनियम, पितळ, तांबे वगैरेंसारख्या लोहेतर धातू, मिश्रधातू वितळविण्यासाठी करतात. विद्युत् दाबात बदल करून किंवा अग्रांमधील अंतर कमीजास्त करूनही भट्टीच्या तापमानात बदल करता येतो.
प्रत्यक्ष प्रज्योतीची भट्टी : या दुसऱ्या प्रकारच्या प्रज्योत भट्टीमध्ये दोनही विद्युत् अग्रे तापविण्याच्या पदार्थांकडे तोंड करून त्यापासून अगदी थोड्या अंतरावर ठेवलेली असतात. त्यामुळे या प्रकारात दोन अग्रांजवळ दोन स्वतंत्र प्रज्योती निर्माण होतात व त्या तापविण्याच्या वस्तूमधूनच आपले मंडल पूर्ण करतात. या प्रकारात प्रज्योत पदार्थ जवळ असून त्यामुळे जास्त तापमान मिळू शकते व उष्णता वाया जाण्याचे प्रमाणही बरेच कमी होऊन विजेचा खर्चही बराच कमी होतो [ आ. २ (आ)]. आधुनिक एरू भट्टी ही या प्रकारच्या भट्टीचे उदाहरण आहे.
विद्युत् प्रवर्तन भट्टी : जास्त तापमानाची गरज असेल तेथे या प्रकारच्या भट्ट्या वापरतात. ओतकामाच्या वेळी धातू व मिश्रधातू वितळविणे, नेमक्या संघटनांच्या मिश्रधातू बनविणे इत्यादींसाठी या भट्ट्या वापरतात. या भट्टीत तापवावयाच्या पदार्थाशी विद्युत् अग्रांचा विद्युतीय संपर्क होत नाही. यांचेही दोन प्रमुख प्रकार आहेत.
गाभा असलेली प्रवर्तन भट्टी : या भट्टीत प्राथमिक गुंडाळीमधून प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशांत वाहणारा) प्रवाह पाठविला असता धातूचा वितळलेला भाग (आ. ३ मधील ३ -३ हा भाग) रोहित्राची एक वेढ्याची दुय्यम गुंडाळी म्हणून काम करतो आणि त्यामध्ये बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होणाऱ्या आवर्त विद्युत् प्रवाहामुळे धातूमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते पण यासाठी ही भट्टी सततच चालू ठेवावी लागते तसेच हिच्या दुय्यम मंडलात खंड पडू नये म्हणून वितळत्या धातूचा भाग पूर्णपणे काढून घेता येत नाही, तर आ. ३ मधील ३ -३ या भागांत वितळलेल्या धातूचा पूर्ण वेढा शिल्लक राहील इतपत वितळलेली धातू मागे ठेवून उरलेली धातूच वरच्या वर ओतून घेऊन वितळविण्याचा नवीन कच्चा माल आत टाकतात. अशा भट्टीत एका वेळी सु. ३०० किग्रॅ. पर्यंत नवीन कच्चा माल वितळविण्यासाठी घालता येतो. अशा भट्टायंचा उपयोग मुख्यतः ॲल्युमिनियम, तांबे, पितळ इ. लोहेतर व शक्यतो विद्युत् संवाहक धातू, मिश्रधातू वितळविण्यासाठी होतो. अजॅक्स वॅट भठ्टी ही अशीच भट्टी आहे.
गाभा नसलेली प्रवर्तन भट्टी : हिचा उपयोग अगंज पोलाद किंवा हत्यारासाठीचे पोलाद बनविण्यासाठी करतात. या भट्टीचा (आ. ४) धातू वितळविण्याचा भाग (मूस) निरोधक पदार्थापासून बनवितात. तो पेल्याच्या आकाराचा असतो.त्याच्याभोवती थोडीशी जागा सोडून तांब्याच्या तारेची एक प्राथमिक गुंडाळी बसविलेली असते ही गुंडाळी भट्टीच्या उष्णतेने तापून खराब होऊ नये म्हणून गुंडाळीचा संवाहक भाग हा तांब्याच्या नळीचा बनविलेला असतो. नळीच्या तांब्याच्या भागामधून विद्युत् प्रवाह जात असताना ही नळी थंड रहावी म्हणून नळीमधून थंड पाणी खेळविलेले असते. धातू वितळविण्याची जागा आणि प्राथमिक गुंडाळी यांच्यामध्ये असलेल्या जागेत कार्बनाचे चूर्ण वा काजळी ठासून भरलेली असते. हे द्रव्य उष्णतानिरोधक म्हणून काम करते. या भट्टीच्या प्राथमिक गुंडाळीमधून विद्युत् प्रवाह सुरू झाला म्हणजे त्याच्यामुळे मुशीत प्रत्यावर्ती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व मुशीतील वस्तूत आवर्त प्रवाह निर्माण होऊन त्या गुंतागुंतीच्या प्रवाहांमुळे वस्तू गरम होऊ लागते. या भट्ट्या प्रामुख्याने विशेष प्रकारचे पोलाद बनविण्यासाठी वापरतात आणि यात त्या त्या वेळच्या गरजेनुसार भट्टीच्या अस्तराचा भाग अम्लीय, क्षारीय अथवा उदासीन अशा विशिष्ट प्रकारच्या विटांपासून बनवितात. उदा., मँगॅनिजाचे प्रमाण जास्त असलेल्या मिश्रधातू वितळविण्यास किंवा गंधक, फॉस्फरस, कार्बन इ. पदार्थ पोलादातून बाहेर काढण्यासाठी मॅग्नेसाइट वा डोलोमाइटासारख्या क्षारीय विटांचे अस्तर वापरतात तर टिटॅनियम ऑक्साइड, टंगस्टन कार्बाइड यांसारख्या निरोधक पदार्थांच्या भुकट्या २,६००० से.तापमानापर्यंत अथवा त्याहून जास्त तापमानापर्यंत नेण्यासाठी ग्रॅफाइटाची मूस वापरतात. [⟶ उच्चतापसह पदार्थ].
यात प्रत्यावर्ती प्रवाहाचा वापर केल्यामुळे मंडलाचा एकूण शक्तीगुणक (प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह मंडलाची सरासरी क्रियाशील-शक्ती व भासमान शक्ती यांचे गुणोत्तर) फारच कमी असतो. हा शक्तिगुणक सुधारून एकच्या सुमारास आणण्यासाठी मंडलातील विद्युत् धारित्राची (विद्युत् ऊर्जा साठविणाऱ्या प्रयुक्तींची) संख्या वाढवावी लागते. या भट्ट्या साधारणपणे नेहमीच्या ५० हर्ट्झ कंप्रतेच्या (दर सेकंदास होणाऱ्या आवर्तनांच्या संख्येला कंप्रता म्हणतात) विद्युत् पुरवठ्यावरच काम करतात पण साधारणतः एक टन व अधिक माल वितळविण्यास भट्टीत ३०० हर्ट्झ कंप्रतेचा वापर करतात. तसेच ३ ते १० टन माल वितळविण्याच्या भट्टीसाठी ५०० हर्ट्झपर्यत कंप्रताही वापरावी लागते. तसेच काही वेळा प्रयोगशाळेतील अगदी लहान भट्टीत सुद्धा १ ते १२ मेगॅहर्ट्झ कंप्रता वापरण्यात येते. अशा तऱ्हेच्या उच्च कंप्रतेचा स्त्रोत मिळविण्यासाठी १५,००० व्होल्ट विद्युत् दाबावर काम करणारे निर्वात नलिका आंदोलक किंवा नवीन पद्धतींचे धन आंदोलक वापरतात [⟶ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय]. अशा तऱ्हेच्या छोट्या छोट्या भट्ट्यांचा उपयोग धातूवर उष्णता संस्करण करण्यासाठी तसेच पत्र्यांच्या डब्यांना डाख लावण्यासाठीही होतो. प्रवर्तन भट्टीतील प्रवाह कंप्रता ही वितळविण्याच्या वस्तूच्या एकूण वजनावर तसेच या वस्तूच्या तुकड्यांच्या आकारमानावरही अवलंबून असते.
विद्युत् अपारक भट्टी : विद्युत् अपारक (निरोधक) पदार्थांच्या दोन विरुद्ध बाजूंस जास्त कंप्रतेचा व मोठा विद्युत् दाब लावल्यास अपारक पदार्थांमध्ये कंप्रता व विद्युत् दाब यांच्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या तत्वाचा उपयोग करून कोठलेही अपारक पदार्थ तापविण्यासाठी भट्ट्या बनवितात. यांसाठी साधारणपणे १० ते १५ मेगॅहर्ट्झ कंप्रता व ३,००० ते २०,००० व्होल्ट एवढा विद्युत् दाब वापरतात. [⟶ विद्युत् अपारक पदार्थ].
अशा तऱ्हेच्या भट्ट्यांचा उपयोग कोठल्याही पदार्थातील आर्द्रता कमी करणे वा पूर्णपणे काढून टाकणे, धातूच्या पदार्थावरील रंगांचेपातळ थर एकसारखे वाळविणे वा भाजून काढणे, प्लॅस्टिकचे तुकडे एकमेकांस जोडणे, पिशव्यांची तोंडे बंद करणे, प्लायवुड बनविण्यासाठी लाकडाचे अनेक पातळ थर एकमेकांना चिकटविणे, मोठ्या प्रमाणावर कापड तसेच खास प्रकारचे रबर वाळविणे खाद्यपदार्थ वा तंबाखू यांसारख्या वस्तू बाष्परहित करणे वा त्यांचे निर्जंतुकीकरण करणे यांसारख्या बरयाच कामांसाठी केला जातो.
पहा : उच्चतापसह पदार्थ पोलाद भट्टी विद्युत् अपारक पदार्थ विद्युत् तापन विद्युत् धातुविज्ञान.
संदर्भ : 1. Garside, J. P. Process and Physical Metallurgy, 1957.
2. Trinks, W. Mawninney, M. H. Industrial Furnaces, 2 Vols., New York, 1967.
३. खानगावकर, प. रा. मिश्रा, वि. ना. लोखंड व पोलादाचे उत्पादन, नागपूर, १९७४.
४. देशमुख, य. वि. इंधने, भट्ट्या आणि उत्तपमापके, पुणे, १९७३.
ओक, वा. रा.
“