विद्युत् अंगे : विद्युत् विसर्जन करणारी इंद्रिये, गोड्या व उष्ण सागरी पाण्यातील माशांच्या सु, ५०० जातींत ही अंगे आढळतात. विद्युत् उत्पादक कोशिकांनी (पेशींना) बनलेल्या या विशेषीकृत अवयवाला स्पर्श झाल्यास माश्याकडून विद्युत् विसर्जन होते. सक्रिय (क्रियाशील) तंत्रिका (मज्जा) किंवा स्नायू यांच्याकडून निर्माण होऊ शकणाऱ्या विद्युत् दाबापेक्षा ही अंगे पुष्कळच उच्च विद्युत् दाब निर्माण करतात. या अंगांमुळे माशाला संरक्षक, आक्रमक व संवेदी (शानग्राहक) यंत्रणाचा लाभ होतो.
परस्परांशी संबंध नसलेल्या माशांच्या सहा भिन्न गटांत विद्युत् अंगे आढळली असून त्यांत अस्थिमत्स्य (ऑस्टेइक्थीज) व उपास्थिमत्स्यही (काँड्रिवनथीज) आहेत. दक्षिण अमेरिकेतील (ब्राझील, गियाना) विद्युत् ईल (इलेक्ट्रोफोरस इलेक्ट्रिकस) आफ्रिकेतील विद्युत् मार्जारमीन (मलाप्टेररस इलेक्ट्रिकस), जगभराच्या महासागरांत विस्तृतपणे आढळणारे टॉपेंडिनिडी कुलातील रे मासे, पश्चिम अंटलाटिकमधील ॲस्ट्रोकोपस ही वरडोळ्याची (स्टारगेझरची) प्रजाती तसेच सौम्य विद्युत् विसर्जन करणाऱ्या अनेक भिन्न असिमस्त्यांना (जिम्नाटिफ ऑरर्मिस, नायफफिश) मोठा गट (दक्षिण अमेरिका), अफ्रिका मॉर्मिरिफॉर्मिस व जिम्नार्किडी कुलातील जिम्नार्कस नायलोटिक ही जाती, जगभर आढळणाऱ्या राजिडी कुलातील पाकट (जपानभोवतीचा समुद्र) व रे माशाच्या अनेक जाती, आफ्रिकेतील हस्तिमुख मासे (उदा., सागरतळातील वरडोळ्या मासे), आफ्रिका नद्या व सरोवरांतील विद्युत् रे इ. मासे या गटांत येतात. माशांच्या अगदी आदिम जीवाश्मांतही (शिळारूप अवशेषांतही) विकसित विद्युत् अंगे आढळली आहेत (उदा., पुराजीव म्हणजे सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपुर्वीच्या काळातील सेफॅलॅस्पिड मासे). यावरून तसेच अगदी भिन्न प्रकारच्या माशांत असलेल्या विद्युत् अंगावरून ही अंगे निरनिराळ्या वेळी व स्वतंत्रपणे क्रमविकसित (उत्क्रांत) झाली असावीत.
विद्युत् अंगांची संरचना व शरीरातील स्थान : थोडे अपवाद वगळता सर्व विद्युत् अंगे ही संकोच पावण्याची क्षमता गमावलेल्या परंतु राहिलेल्या स्नायुतंतूप्रमाणे विद्युत् वर्चस् निर्माण करण्याची क्षमता टिकून राहिलेल्या स्नायुधाग्यांपासून बनलेली असतात. विद्युत् रे (टोर्पेडो) माशात कल्ल्याच्या विशिष्ट स्नायूपासून, वरडोळ्यामध्ये डोळ्याच्या स्नायूंपासून, तर विद्युत् ईल, अतिमस्त्य, मॉर्मिरॉइड व विद्युत् अंगे बनलेली असतात. काही असिमस्त्यांत ही तंत्रिका तंतुपासून (मज्जातंतूपासून) बनली असणे शक्य आहे.
विद्युत् अंगे इलेक्ट्रोप्लेक (विद्युत् कोशिका) नावाच्या कोशिकांची बनलेली असून त्यांच्यात स्नायूकोशिकांच्या (तबकडीसारख्या) असतात. विद्युत् कोशिका स्तंभावर राशीत रचलेल्या असतात. प्रत्येक कोशिकेच्या एकाच बाजूला तंत्रिका उद्दीपण प्राप्त झालेले असते व सर्व कोशिकांच्या ही बाजू एकाच दिशेकडे असते. मॉर्मिइडाच्या चार विद्युत् अंगांमध्ये अशा ६००-३,००० विद्युत् ईलच्या तीन अंगांत ७ लाखपर्यंत व मोठ्या टॉर्पेडोच्या विद्युत् अंगांच्या एका जोडीत ५ लाख कोशिका असतात.
विद्युत् रे माशांमध्ये या कोशिकांचे स्तंभ उभ्या दिशेत, वृक्काकार (मूत्रपिंडाकार), प्रत्येक डोळ्यामागे (असपक्ष-खांद्यातील पर-व डोके यांच्या दरम्यान) असतात. नॉर्सिंन घाझिलिएन्सिस जातीत प्रत्येक प्रमुख विद्युत् अंगांशी निगडीत असे एक छोटे विद्युत् अंगही असते. मॉर्मिरॉइडांमध्ये शेपटीच्या प्रत्येक बाजूला दोन विद्युत् अंगे असतात, तर विद्युत् ईलामध्ये विद्युत् अंगांच्या तीन जोड्या असून त्यांनी शरीराचा सु. ४० टक्के भाग व्यापलेला असतो व त्यांचे वस्तूमान शरीराच्या निम्मे असते. मार्जारनिनातील विद्युत् अंग अधिक पसरलेले असते, मऊ त्वचेखालील व जिलेटवासारख्या या अर्धपारदर्शक पटलाच्या रुपातील विद्युत् अंगाने शरीराचा पुष्कळ मोठा भाग जाकीटाप्रमाणे आच्छादलेला असतो. वरडोळ्याची दोन लहान पण शक्तिशाली विद्युत् अंगे डोळ्यांमागील खळग्यांत जडविल्यासारखी असतात. रे व पाकट यांची कमी शक्तिशाली विद्युत् अंगे चाबकासारख्या शेवटीच्या दोन्ही बाजूंना असतात . (पहा : आकृती).
विद्युत् विसर्जन व निर्माण होणारा विद्युत् दाब : बहुतेक माशांकडून होणारे विद्युत् विसर्जन हे कमी दाबाचे असते आणि ते स्पंदाच्या मालिकेच्या रुपात एकसारखे होत असते. माशाची जाती व क्रियाशीलता यांनुसार स्पंदांची कंप्रता (एका सेकंदाला संख्या) बदलते. उदा., असिमत्य (हायपोपोमस) विश्रांती घेताना दर सेकंदाला १-५ व उत्तेजित स्थितीत सु. २० स्पंद उत्सर्जित करतो. स्टेनार्कस प्रजातीचे मासे सेकंदाला ६५०-१,२०० स्पंद उत्सर्जित करतात. हस्तिमुख व जिम्नार्कस यांसारखे मॉर्मिरॉइड सेकंदाला १-३०० स्पंद उत्सर्जित करतात, मात्र हे विद्युत् विसर्जन अखंडपणे करीत नाहीत.
विद्युत् अंगावरील सर्व कोशिकांकडून जवळजवळ एकाच वेळी विद्युत् विसर्जन होते. कारण केंद्रीय तंत्रिका तंत्राद्वारे तसे नियंत्रण होते. टॉर्पेडोत क्लोम-तंत्रिका यांच्या मार्फत हे नियंत्रण होते. पुष्कळ माशांत स्नायूंमध्ये समन्वय व संतुलन राखण्याचे काम करणारा मेंदूचा निमस्तिष्क (लहान मेंदू) हा भाग चांगला विकसित झालेला असतो. संवेदी कोशिकांकडे येणाऱ्या संकेतांच्या संकलाचे व प्रेरक नियंत्रक केंद्राचे काम तो करतो. प्रत्यक्ष तंत्रिका तंतूमध्येच शरीरक्रियावैज्ञानिक नियंत्रक यंत्रणा असतात. यांच्यामुळे प्रेरक स्पंद सर्व कोशिकांत एकाच वेळी पोहोचतात. ईलचे विद्युत् अंग ९० सेंमी. पेक्षाही अधिक लांब असले, तरी तेथे हे घडते, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
माशाचे आकारमान आणि आरोग्य यांवर त्याच्याकडून विद्युत् विसर्जनाद्वारे निर्माण होणाऱ्या विद्युत् दाबाची व पर्यायाने त्याच्याकडून बसणाऱ्या विजेच्या झटक्याची तीव्रता अवलंबून असते. असिमत्स्य, रे मासे व मॉर्मिरॉइड यांच्यात काही व्होल्ट एवढा विद्युत् दाब निर्माण होतो. मोठ्या विद्युत् ईलमध्ये ५०० वा अधिक व व्होल्ट विद्युत् होतो (जलजीवालयातील प्रयोगांत याच्या विसर्जनाने निऑन विसर्जित दिवा प्रकाशित झाला होता). गोड्या पाण्यातील आफ्रिका मार्जारमिनांत ३५०-४५० व्होल्टपर्यंत आणि नॉर्सिन व टॉर्मेडो प्रजातीच्या माशांस ५०-६० व्होल्ट विद्युत् दाब निर्माण होतो.
टॉर्पेडोचा झटका बाधक, वेदनाकारक व बधिरता अणणारा असतो. विद्युत् ईलाचा झटका जोरदार असून त्यामुळे स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात. याच्यामुळे मासे, उभयचर, (जमिनीवर व पाण्यातही राहणारे) प्राणी व घोड्यासारखे मोठे व सस्तन प्राणी मूर्च्छित होतात किंवा मरतातही. माणसाला हा चक्का जास्त वेळ सहन करता येत नाही. मार्जरमिनाचा झटका अल्पावधीचा व वेदनाकारक असतो.
विद्युत् विसर्जनाने मासा दमतो व त्याच्याकडून वीजनिर्मिती होत नाही. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो परत विद्युत् विसर्जन करू शकतो, उदा., ईल कमी होत जाणाऱ्या शक्तीचे तासभर देऊ शकतो. मात्र पुन्हा तासांच्या विश्रांतीची गरज असते. याचा फायदा घेऊन ॲमेझॉन व ओरिनोको नद्यांजवळ राहणारे इंडियन लोक हे मासे खाण्यासाठी पकडतात. प्रथम ते पाण्यात घोडे फिरवितात. मासा घोड्यांना विजेचे झटके देतो. त्यामुळे त्याची वीजनिर्मितीक्षमता संपते. मग असा दमलेला निरूपद्रवी मासा ते पकडतात.
विद्युत् अंगांचे कार्य कसे चालते हे नीट समजलेले नाही. मात्र त्यांची तीव्र संवेदनशीलता प्रयोगातून सिध्द झाली आहे. उदा., जिम्नार्कस प्रजातीचे मासे सच्छिद्र पात्रात दडविलेली काचेची सळई ओळखू शकतात. स्वतःला इजा होऊ न देता इतर जीवांना मूर्च्छिद करण्याएवढे शक्तिशाली विद्युत् विसर्जन ते कसे करू शकतात, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच या विजेचा उद्गम व त्यात मासा विद्युत् भारित कसा होतो, हेही कळलेले नाही.
विद्युत् अंगांचे उपयोग : भिन्न जातींच्या माशांना विद्युत् अंगांचा निरनिराळ्या प्रकारे उपयोग होतो. विद्युत् विसर्जनाने काही माशांभोवती दुर्बल विद्युत् क्षेत्र निर्माण होते. माशाच्या त्वचेवरील अतिविशेषीकृतक संवेदी कोशिका (विद्युत् आकलक) हे क्षेत्र ओळखू शकतात. पाण्यापेक्षा भिन्न विद्युत् संवाहकता असणारी वस्तू या क्षेत्रात आल्यास त्यात विकृती निर्माण होते. ही विकृती संवेदी कोशिकांना कळते व मासा सावध होतो. अशा रीतीने मार्गनिर्देशनासाठी माशांना विद्युत् अंगांचा उपयोग होतो. म्हणजे मार्गातील अडथळा टाळणे किंवा अरुंद मार्गातून वाट काढणे माशाला शक्य होते. याच रीतीने माशाला अन्न, भक्ष्य वा भक्ष्यक शत्रुची चाहूल लागू शकते आणि भक्ष्यावर हल्ला करणे वा शत्रुपासून दूर जाणे त्याला शक्य होते. संदेशवहनासाठीही (उदा., इशारा देणे) विद्युत् अंगाचा उपयोग होतो. गोड्या पाण्यातील बहुसंख्य विद्युत् माशांचे डोळे पूर्णपणे राहतात. त्यांच्या अश्रु दृष्टीनी भरपाई होण्याच्या दृष्टीने विद्युत् अंगे उपयुक्त ठरतात.
उच्च विद्युत् दाब निर्माण करणारे मासे विद्युत् अंगांचा उपयोग बहुधा भक्ष्याला मूर्च्छित करण्यासाठी करतात. असे भक्ष खाण्याला सोयीचे असते. जोराचा विद्युत् झटका देणारे ईल व कीमान एक रे मासा (नॉर्सिन ब्राझिलिएन्सिस) यांना अधिक कंप्रतेचे विद्युत् विसर्जन होते आणि त्याचा उपयोग मार्गदर्शनासाठी, इशारा देण्यासाठी होत असावा, टोर्पेडो मासाही लहान भक्ष्य वरीलप्रमाणे मूर्च्छित करून खातो. टॉर्पेडोव्यतिरिक्त रे मासे व पाकट मासे अल्प विद्युत् दाब (३-४ व्होल्ट) निर्माण करू शकतात. त्यांना याचा काय उपयोग होतो, हे निश्चित समजलेले नाही. कारण पराकोटीच्या चिथावणामुळेच हा अल्प विद्युत् दाब निर्माण होतो.
पहा : ईल मत्स्य वर्ग रे मासे.
संदर्भ : 1. Harder, W, Anatomy of Fishes, 2. Vols. New Yorkm 1976.
2. Marshall, N. B. Exploration in the life of fishes, Harder, 1971.
3. Scheich, H Ebbesson, S. O. Multimodal Torus in the weakly Electric fish, New York, 1983.
जोशी, अ. कृ. ठाकूर, अ. ना.
“