विद्यावेतने व शिष्यवृत्त्या : निरनिराळ्या विद्याशाखांतील उच्च शिक्षण, संशोधन अशा हेतूंच्या पूर्ततेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना विशिष्ट कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस ‘विद्यावेतन’ (फेलोशिप) असे म्हणतात. शिष्यवृती (स्कॉलरशिप) हा गुणवंत विद्यातर्थ्यांना आर्थिक स्वरूपात दिला जाणारा पुरस्कार (अवॉर्ड)  आहे. गुणवत्तेची स्पष्ट अपेक्षा असल्यामुळे ‘विद्यावेतन’ आणि ‘शिष्यवृत्ती’ हे दोन्ही शब्द अनेकदा एकमेकांच्या जागी वापरले जातात ‘अभ्यासवृत्ती’, ‘अधिछात्रवृत्ती’ अशा पर्यायी संज्ञाही या संदर्भात वापरल्या जातात. परंतु सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की पदवीधरांना अथवा पदव्युत्तर अध्ययन करू इच्छिणाऱ्यांना दिली जातात ती विद्यावेतने आणि शालेय वा महाविद्यालयीन पदवीपूर्व शिक्षण घेत असलेल्यांना देण्यात येतात त्या शिष्यवृत्या होत.

विद्यावेतने आणि शिष्यवृत्या या शासन, शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ.), प्रतिष्ठाने व तत्सम काम करणाऱ्या संघटना, धर्मादाय संस्था इत्यादींकडून दिल्या जातात. काही विशिष्ट व्यक्तींच्या नावानेही विद्यावेतने व शिष्यवृत्या दिल्या जातात. उदा., शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला पूर्वी दिली जाणारी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृती. विद्यावेतन देण्यामध्ये काही प्रतिष्ठानांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे.  उदा., अमेरिकेतील ‘द रॉकफेलर फाउंडेशन’, ‘द जॉन सायमन  गुगेनहाइम मिमॉरिअर फाउंडेशन’, ‘द डॅनफोर्थ फाउंडेशन’, द फोर्ड फाउंडेशन काही राष्ट्रांतील शासनसंस्था आणि अन्य काही संस्था आपल्या देशातील  विद्यार्थ्यांप्रमाणेच परदेशांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही विद्यावेतने, शिष्यवृत्या ह्यांच्या द्वारे आर्थिक मदत वा पुरस्कार देत असतात. अशा राष्ट्रांत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, धाना, हाँगकाँग , जमेका, मलेशिया, न्यूझीलंड, नायजेरिया, श्रीलंका इत्यादींचा समावेश होतो.त्यांनी वकिलातीशी संपर्क साधल्यास मिळू शकतो.  अशा शिष्यवृत्यांतून आंतरराष्ट्रीय संबंधांतील सद्भाव आणि सांस्कृतिक संवाद वाढीला लागू शकतो.

विविध विद्यावेतनांची आणि शिष्यवृत्यांची तपशीलवार माहिती देणाऱ्या दर्शिका (डिरेक्टरीज) उपलब्ध होऊ शकतात. विद्यावेतने आणि शिष्यवृत्या देण्याबाबतच्या विविध संस्थांच्या अटी, विद्यावेतनांच्या व शिष्यवृत्यांच्या रकमा, कालावधी ह्यांच्यात विविधता आढळून येते आणि त्यांत वेळोवेळी बदलही होत असतात. त्यामुळे ह्या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी त्या त्या वेळी अद्ययावत असणाऱ्या दर्शिका पाहणेच सोयीचे ठरते.

ज्यांना सांकेतिक व औपचारिक अर्थाने ‘विद्यार्थी’ म्हणता येणार नाही, त्यांनाही काही विशिष्ट विषयाच्या संशोधनासाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते. उदा., विख्यात मराठी साहित्यिक ⇨विजय तेंडुलकर ह्यांना भारतीय समाजातील हिंसाचार ह्या विषयावरील संशोधनार्थ जवाहरलाल नेहरू अभ्यासवृत्ती (फेलोशिप) देण्यात आली होती ( १९७४-७५). त्याचप्रमाणे नामवंत मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटकाकार ⇨चि.त्र्यं. खानोलकर ह्यांना त्यांचे लेखनसंकल्प पूर्ण करण्यासाठी ‘रायटर्स सेंटर’ ह्या संस्थेतर्फे सहा महिन्यांची अभ्यासवृत्ती ( स्टडीग्रांट) देण्यात आली होती (१९६४) . पुढे दशावतारी नाटके ह्या लोकनाट्यप्रकाराच्या अभ्यासासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉमिंग आर्टस’ ह्या संस्थेतर्फे त्यांना दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती देण्यात आली होती (१९७२– ७४). ख्यातनाम मराठी कवी ⇨दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांना ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ तर्फे इंदिरा गांधी स्मृती अभ्यासवृत्ती दोन वर्षासाठी जाहीर झाली असून (१९९६) ह्या अभ्यासवृत्तीचे चित्रे हे पहिले मानकरी होत. शिक्षणाच्या क्षेत्रात देण्यात येणारी विद्यावेतन आणि अशा नामवंतांना दिल्या जाणाऱ्या ह्या अभ्यासवृत्ती वा शिष्यवृत्त्या ह्यांचे एक प्रकारचे नाते आहे, असे म्हणता येईल.

भारत सरकारतर्फे गुणवंत विद्यार्थ्यां त्यांनी निवडलेल्या विविध विद्याशाखांत अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात. ⇨विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विद्यावेतने दिली जातात, ती दरमहाही दिली जातात. ‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’ परीक्षेतून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात, त्यांच्या पदवी व पदव्युतून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात, त्यांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची आर्थिक जबाबदारी केंद्र शासनाकडून घेतली जाते. शासकीय विद्यानिकेतनांतून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना, त्यांच्या शालान्त परीक्षेनंतरच्या शिक्षणाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट शासनातर्फे शिष्यवृत्या दिल्या जातात.

परदेशात अध्ययन करण्यासाठी आपल्या देशातील ज्या विविध संस्थांच्या वतीने विद्यावेतने दिली जातात, त्यांत ‘अतुर फाउंडेशन’,’इंडिया फाउंडेशन’, ‘मार्शल एज्युकेशनल ट्रस्ट’, ‘यूनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन’, ‘माक्स म्यूलर भवन’(सर्व पुण्याच्या) तसेच ए. एच. वाडिया ट्रस्ट, बिर्ला इंडस्ट्रीज ग्रुप, हिंदुजा फाउंडेशन, जमनालाल बजाज फाउंडेशन, नेस वाडिया फाउंडेशन, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, लोटस ट्रस्ट, महिंद्र फाउंडेशन, एन.एम.वाडिया चॅरिटीज, सर रतन टाटा ट्रस्ट, जे. एन.टाटा इंडाउमेंट, आर.डी.सेटना ट्रस्ट , वालचंद इंडस्ट्रीज चॅरिटेबल ट्रस्ट, ए.जी.साठ्ये टेक्निकल फाउंडेशन ऑफ इंडिया (दिल्ली), फाय फाउंडेशन (इचलकरंजी) इत्यादींचा समावेश होतो.

डॉ. होमी भाभा फेलोशिप्स काउन्सिल (स्थापना १९६६)  तर्फे डॉ. होमी भाभा ह्यांच्या स्मृत्यर्थ १९६७ सालापासून ‘होमी भाभा फेलोशिप्स’ दिल्या जाऊ लागल्या. ही विद्यावेतने मिळविणाऱ्यांत चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, नट व नाटककार ⇨गिरीश कार्नाड, प्रसिद्ध पत्रकार अरुण शौरी ह्यांच्यासारख्या नामवंतांचा अंतर्भाव होतो.

केंब्रिज येथील शिक्षणसंस्थांमधून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनांत ‘केंब्रिज नेहरू फेलोशिप’ , ‘प्रेस फेलोशिप’ ह्यांचा उल्लेख करता येईल.

भारतातील ब्रिटिश काउन्सिलतर्फेही अनेक विषयांच्या अभ्यासासाठी विद्यावेतने दिली जातात. अमेरिकेतील ‘यू. एस.फाउंडेशन’ तर्फे व्यवसाय व्यवस्थापन, संगणक, मानवशास्त्र, सामाजिक शास्त्रे इ. विषयांतील शिष्यवृत्या ठेवण्यात आलेल्या आहेत. कॉमनवेल्थ राष्ट संकुलापैकी ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ. राष्ट्रांतर्फेही विविध शिष्यवृत्या दिल्या जातात.

कधीकधी व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपातही भारतीय पदवीधरांना देशात वा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाह्य दिले जाते. त्यांना कर्ज-अनुदान (लोन ग्रांट्‌स) असे म्हणतात.  उदा., पुण्याच्या ‘इंडिया फाउंडेशन’ तर्फे अशी मदत दिली जाते.

निखळ गुणवत्तेवर आधारलेली विद्यावेतने व शिष्यवृत्या आणि आर्थिक निकषांवर वा अन्य काही निकषांवर दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि आर्थिक साहाय्य ह्यांच्यात फरक आहे. उदा., विशिष्ट वार्षिक उत्पन्नाखाली उत्पन्न असणाऱ्यांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या सवलती स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलामुलींना सर्व स्तरांवरील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती अनुसूचित जाति-जमातींच्या मुलामुलींना दिल्या जाणाऱ्या सवलती इत्यादी.

गावडे, प्र. ल.