विक्रमादित्य : प्राचीन भारतीय राजांनी धारण केलेले एक सन्मान्य बिरुद. विक्रमादित्य या नावाने प्राचीन भारताच्या इतिहासातील अनेक महापराक्रमी राजे ओळखले जातात. विक्रमादित्य−म्हणजे पराक्रमाचा सूर्य−हे गौरवदर्शक विरूदही आहे. प्रत्यक्षात मात्र काही महापराक्रमी राजांची मूळ नावे मागे पडली व ‘विक्रमादित्य’ या बिरूदानेच त्यांचा नामनिर्देश होऊ लागला, असे दिसते.

भारतीय परंपरेनुसार ⇨उज्जैन येथे इ. स. पू. पहिल्या शतकात विक्रमादित्य नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याच्या दरबारात नऊ विद्वान होते व त्यांपैकीच ⇨कालिदास हा एक होता. ह्याच राजाने इ. स. पू. ५८ मध्ये शकांचा उच्छेद करून विक्रम संवत् सुरू केला, असे काही विद्वानांचे मत आहे. परंतु वरील घटनेस इतिहासात निश्चित पुरावा मिळत नाही. त्याच्या नावाने सध्या प्रचलित असलेल्या संवताचा उल्लेख कृत संवत् म्हणून केला जाई. मात्र गुप्त वंशातील दुसरा चंद्रगुप्त (कार. इ. स. सु. ३७६−४१३) याला विक्रमादित्याचे परंपरागत वर्णन बरोबर लागू पडते. त्याचे साम्राज्य जवळजवळ उत्तर भारतभर पसरले होते. त्याने माळवा−काठेवाड प्रदेशांतील शक-क्षत्रपांचा उच्छेद करून उज्जैन येथे आपली राजधानी नेली व ‘विक्रमादित्य’ ही पदवी धारण केली. तो उत्तम कवी, रसिक आणि संस्कृत विद्येचा ज्ञाता व अभिमानी होता. त्याच्या दरबारात विद्वानांस आश्रय होता. त्याने तयार करवून घेतलेल्या नाण्यांवरही विक्रमादित्य या बिरुदाचा निर्देश आढळतो. कालिदासाच्या काव्यनाटकादींत तक्तालीन घटनांचे प्रतिबिंब दिसते. अशा रीतीने कालांतराने या विक्रमादित्याचे नाव पूर्वीच्या ‘कृत’ संवत्सरात पडले असावे, असे बहुतेक भारतीय व पाश्चात्त्य विद्वानांचे मत आहे.

यानंतर अनेक भारतीय राजांनी ‘विक्रमादित्य’ ही पदवी धारण केली. दुसऱ्या चंद्रगुप्ताचा नातू स्कंदगुप्त (कार. इ. स. ४५५−६७) याच्याही नाण्यांवर विक्रमादित्य असा उल्लेख आढळतो. हा मोठा बलाढ्य राजा होता. त्याने मोठ्या शौर्याने उत्तरेकडून आक्रमण करणाऱ्या रानटी ⇨हूणांचा पराभव करून भारताला त्यांच्या टोळधाडीपासून वाचविले. स्कंदगुपाताचे साम्राज्य बंगालपासून काठेवाडपर्यंत पसरले होते. प्रजा मुखी व समृद्ध होती, असे तत्कालीन कोरीव लेखांवरून दिसते.

दक्षिण हिंदुस्थानातील चालुक्य घराण्यात विक्रमादित्य या नावाचे काही राजे होऊन गेले. त्यांपैकी पूर्वकालीन चालुक्य राजे (बादामीचे) पहिला व दुसरा विक्रमादित्य हे विशेष प्रसिद्ध आहेत.

पहिला विक्रमादित्य : (कार. ६५५−८५). हा बदानीच्या चालुक्य घराण्यातील द्वितीय पुलकेशीचा मुलगा. पल्लवांनी पुसकोशीचा पराभव केला आणि सु. १२-१३ वर्षे चालुक्यांच्या प्रदेशात त्यांनी आपला अंमल प्रस्थापित केला. याच काळात विक्रमादित्याने दीर्घ परिश्रमाने सैन्याची जमवाजमव करून पल्लव नृपती परमेश्वरवर्म्याचा (कार. ६७०−७००) पराभव केला. या युद्धात त्याचा पुत्र विनयादित्य (कार. ६८१−९६) याचे त्यास साहाय्य झाले. त्याने पल्लवांचे मांडलिक चोल, पांड्य व चेर ह्या राजांचा पाडाव केला. विनयादित्याचा पुत्र विजयादित्य (कार. ६९६−७३३) याने याच सुमारास राज्यातील इतर अंतर्गत शत्रूंचा बीमोड करून शांतता प्रस्थापित केली. अशा प्रकारे विक्रमादित्याने चालुक्यांची गमावलेली प्रतिष्ठा व सत्ता त्यांना पुन्हा प्राप्त करून दिली.

दुसरा विक्रमादित्य : (कार. ७३३−४५). हा विजयादित्याचा पुत्र असून तो ७३३ मध्ये बादामीच्या चालुक्यांच्या गादीवर आला. त्याच्या कारकार्दीतही चालुक्यांचे पल्लवांशी युद्ध चालूच होते. त्याने पल्लव नृपती नंदिवर्म्याचा पराभव करून सुवर्णरत्नांच्या राशी, हत्ती वगैरे त्याची संपत्ती लुटली. कांचीत (कांचीपुरम्) प्रवेश करून त्याने तेथील देवस्थानांना दाने दिली आणि नंतर पांड्य, चोल, चेर, व कळभ्र राजांचा पराभव करून दक्षिण समुद्रतीकी आपला जयस्तंभ उभारला. त्याच्या कारकीर्दीतच अरबांनी उत्तर भारतातून दक्षिणेकडे आक्रमण केले पण गुजरातमधील त्याचा मांडलिक नातलग अवनिजनाश्रय पुलकेशी याने मोठ्या शौर्यांने नवसारीजवळच्या युद्धात अरबांचा पराभव केला. म्हणून दुसऱ्या विक्रमादित्याने अवनिजनाश्रय पुलकेशीला ‘अनिवर्तनिवर्तयिता’ (दुर्जय शत्रूचा पाडाव करणारा) ही पदवी बहाल केली. विक्रमादित्याने बांधलेले पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिर प्रसिद्ध आहे. पुढे त्याचा पुत्र द्वितीय कीर्तिवर्मा (कार, ७४४−५७) हा गादीवर आला. वादामीच्या चालुक्य घराण्यातील तो शेवटचा राजा असल्याचे शिलालेखांतून उल्लेख आधळतात. राष्ट्रकूट नृपती दंतिदुर्ग आणि त्याचे पुढील नातलग यांच्याशी झालेल्या संघर्षात द्वितीय कीर्तिनर्म्याचा सु. ७४५−५७ दरम्यान पराभव होऊन त्याची सत्ता संपुष्टात आली असावी, असा तर्क आहे.

उत्तरकालीन चालुक्य घराण्यातील (कल्याणीचे) विख्रमादित्य तिसरा, चौथा व पाचवा या राजांची फारशी माहिती उपलब्ध नाही तथापि या घराण्यातील सहाव्या विक्रमादित्याची कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली.

सहावा विक्रमादित्य : (कार. १०७६−११२६). ही पहिल्या सोमेश्वराचा द्वितीय पुत्र होय. कल्याणीच्या चालुक्य वंशातील एक पराक्रमी व कलाप्रमी राजा म्हणून विशेष प्रसिद्ध होता. पहिल्या सोमेश्वरानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र दुसरा सोमेश्वर (कार. १०६८−७६) हा सत्तेवर असताना विक्रमादित्य आपल्या वडील भावाच्यावतीने दक्षिणेच्या प्रदेशावर राज्य करीत होता. पुढे त्या दोघांमध्ये वैमनस्य निर्माण होऊन त्याचे पर्यवसान युद्धात झाले. १०७६ मध्ये विक्रमादित्याने दुसऱ्या सोमेश्वराचा पराभव करून चालुक्यांची गादी बळकाविली. त्याने ‘त्रिभुवनमल्ल’ ही पदवी धारण करून आपल्या नावे तालुक्य विक्रमसंवत् सुरू केला. तो पुढे शंभर वर्षे दक्षिणेत टिकून होता. या विक्रमादित्यासंबंधी तत्कालीन कोरीव लेखांतून तसेच त्याच्या दरबारातील काश्मीरी राजकवी ⇨बिल्हण याने रचलेल्या विक्रमांकदेवचरित या महाकाव्यातून बरीचशी माहिती मिळते. बिल्हणाने या महाकाव्यात विक्रमादित्याच्या विविध स्वाऱ्यांबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. त्यांत नेपाळ, काश्मीर वगैरे दूरदूरच्या प्रदेशांतील तसेच बिहार, बंगाल या प्रदेशांतील विजयांचा उल्लेख आहे. काही यात्रेकरूंच्या प्रवासवर्णनांतही विक्रमादित्याविषयी माहिती आढळते.

राज्यारोहणानंतर सुरुवातीस काही काळ विक्रमादित्याचे आपल्या जयसिंहनामक धाकट्या भावाशी सख्य होते. त्याने त्याला दक्षिणेच्या बऱ्याच मोठ्या प्रदेशाचा अधिपती म्हणून नेमले होते पण १०८३ मध्ये जयसिंहाने आपल्या भावाविरुद्ध बंड केले आणि कृष्णा नदीपर्यंत मोठ्या सैन्यासह चाल केली. काही मांडलिकही त्यास येऊन मिळाले. तेव्हा विक्रमादित्याने जयसिंहाचा पाडाव करून त्याला कैद केले. त्यानंतर विक्रमादित्याने द्वारसमुद्राचे होयसळ, गोव्याचे कदंब, कोकणचे शिलाहार, सेऊणदेशचे यादव यांच्यावर विजय मिळविले. यांदरम्यान चोलांशीही त्याचे युद्ध चालूच होते. चोलनृपती पहिला कुलोत्तुंग याच्याबरोबर वेंगीच्या चालुक्यांच्या गादीसाठी विक्रमादित्याचे अनेक संघर्ष झाले पण त्यांत त्याला फारसे यश प्राप्त झाले नाही. मात्र त्या राज्याचा काही भाग विक्रमादित्याच्या ताब्यात आला असावा कारण त्याच्या संवताचे (इ. स. १११८−२४ पर्यंतचे) काही लेख त्या राज्यात सापडले आहेत. यांशिवाय अनेक लहान राजांना त्याने आपले आधिपत्य स्वीकारण्यास भाग पाडले होते. त्याचे साम्राज्य दक्षिणकडे हसन, तुमकूर, कडप्पा या जिल्ह्यांपासून पूर्वेस गोदावरी व खम्मामेट (खम्मम) ह्या हैदराबादजवळील जिल्ह्यांपर्यंत आणि उत्तरेकडे नर्मदेपर्यंत पसरलेले होते. होयसळ, पांड्य, काकतीय, यादव, कदंब, शिलाहार इ. वंशातील राजे त्याचे मांडलिक होते.


विक्रमादित्यास लक्ष्मीदेवी, केतलदेवी, चंद्रलेखा इ. राण्या होत्या त्यांपैकी चंद्रलेखा ही शिलाहार राजकन्या त्याची पट्टराणी असून तिच्यापासून त्यास तीन मुलगे झाले. त्यांपैकी तृतीय सोमेश्वर हा प्रथम पुत्र त्याच्यानंतर चालुक्यांच्या गादीवर आला विक्रमादित्याने १०८३ मध्ये विजयबाहु या सीलोनच्या (श्रीलंकेच्या) राजाकडे आपला वकील धाडून राजनैतिक संबंध प्रस्थापिले होते. विक्रमादित्य शूर, कलाभिज्ञ व विद्वान असून त्याच्या दरबारात कवी बिल्हण आणि मिताक्षरा या ⇨याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीकाग्रंथाचा कर्ता ⇨विज्ञानेश्वर असे दोन पंडित होते. यांशिवाय या काळात चालुक्यांची कला खूपच भरभराटीस आली होती. विक्रमादित्याने अनेक मंदिरे बांधली. इट्‌टगी येथील महादेवमंदिर आजही प्रसिद्ध आहे.

सहाव्या विक्रमादित्यानंतर त्याचा प्रथम पुत्र तृतीय सोमेश्वर (कार. ११२६−३८) गादीवर आला. त्याच्या नावावर मानसोल्लास अथवा अभिलषितार्थचिंतामणि हा विश्वकोशाच्या धर्तीवर रचलेला बृहद्ग्रंथ असून त्यात राजकारण, रत्नपरीक्षा, पूजन, गायन, नृत्य, वैद्यक इ. विविध विषयांचे विवेचन दिले आहे. तथापि ११२६ नंतरच्या कोरीव लेखात त्याच्याविषयी कोठेही फारशी माहिती आढळत नाही.

यांशिवाय दुसऱ्याही काही प्राचीन भारतीय राजवंशातील राजांनी ‘विक्रमादित्य’ ही पदवी धारण केली होती. जबलपूरजवळच्या त्रिपुरी (सध्याचे तेवर) येथे राज्य करणाऱ्या महाप्रतापी कलचुरी वंशीय गांगेयदेवाने (कार.१०१५−४१) विक्रमादित्य ही पदवी धारण केल्याचे त्याच्या नातवाच्या दानपत्रावरून दिसते.

तमिळनाडूतील अर्काट जिल्ह्याच्या उत्तर भागात बाण वंशीय राजे इ. स. दहाव्या शतकात राज्य करीत होते. त्या वंशातील तीन राजे विक्रमादित्य या नावाने ज्ञात आहेत. त्यांपैकी पहिला विक्रमादित्य याची दुसरी नावे ‘विजयादित्य’ व ‘प्रभुमेरु’ अशी होती.

काही दंतकथांतून काही विक्रमादित्य नावाच्या राजांचे उल्लेख येतात पण त्यांच्याविषयी ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. तथाकथित संवतस्थापक विक्रमादित्याचा उल्लेख आरंभी आला आहेच. काश्मीरी कवी ⇨कल्हणाच्या (बारावे शतक) ⇨राजतरंगिणी या पद्यबद्ध इतिहासवजा ग्रंथात उज्जैनचा शकांतक विक्रमादित्य हर्ष, काश्मीरचा राजा मातृगुप्त तसेच रणादित्यानंतर काश्मीरच्या गादीवर आलेला विक्रमादित्य यांच्य कथा ग्रथित झाल्या आहेत तथापि हे सर्व विक्रमादित्य काल्पनिक वाटतात कारण कल्हणाला त्या काळाविषयी पुरेशी विश्वसनीय माहिती नसावी, असे दिसते.

आजही विक्रमादित्याचे नाव घेतले असता त्याचा जाज्वल्य पराक्रम, बुद्धिचातुर्य, दानशूरपणा, प्रजाहितदक्षता, न्यायदृष्टी हूणशक-क्षत्रपादी आक्रमकांपासून त्याने प्रजाननांचे केलेले रक्षण इ. गुणविशेष दिसून येतात.

पहा : गुप्तकाल चंद्रगुप्त, दुसरा चालुक्य घराणे पल्लव वंश.

संदर्भ : 1. Nilakan’a Sastri, K. A. A History of South India, London, 1958.

           2. Yazdani, G. Ed. The Early History of the Deccan, 2 Vols., Parts I-XI, London, 1960.

           ३. मिराशी, वा. वि. कलचुरिनृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५६.

देशपांडे, सु. र.