वॉशिंग्टन, जॉर्ज : (२२ फेब्रुवारी १७३२- १४ डिसेंबर १७९९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला राष्ट्राध्यक्ष व स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख सेनापती. त्याचा जन्म सुसंस्कृत-सधन कुटुंबात ऑगस्टीन व मेरी बॉल या दांपत्याच्या पोटी वेस्टमोरलंड परगण्यातील (व्हर्जिनिया) पोप्सक्रीक वा ब्रिजेसक्रीक (वेकफील्ड) बागवाडीत झाला. ऑगस्टीनचा शेतीव्यतिरिक्त लोखंडी भट्टीचाही व्यवसाय होता. त्याला जेन बटलर या पहिल्या पत्नीपासून झालेली चार मुले व मेरी बॉलपासून झालेली सहा मुले असा मोठा परिवार होता. जॉर्जचे शिक्षण खासगी शिक्षक ठेवून सुरुवातीस घरीच झाले. नंतर जॉर्जने एका खासगी शाळेत गणित, भूमिती या विषयांचा अभ्यासक केला. तो अकरा वर्षांचा असताना त्याच्या वडिलाचे निधन झाले (१७४३). त्या काळात शेतीवाडीची व्यवस्था आई मेरी पाहत असे आणि जॉर्ज तिला मदत करीत असे. लॉरेन्स ह्या जॉर्जच्या सावत्र भावाने इंग्लंडहून शिक्षण घेऊन आल्यावर ब्रिटिश लष्करात नोकरी धरली त्याचा आदर्श जॉर्जसमोर होता. ऑगस्टीनने मृत्युपत्रात संपत्तीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावलेली होती. जॉर्जने काही काळ दुय्यम भूमापन अधिकारी म्हणून काम केले (१७४९). पुढे लॉरेन्स क्षयाने आजारी पडून त्यातच निवर्तला. मृत्यूनंतर लॉरेन्सची संपत्ती मृत्युपत्राद्वारे पत्नीकडे मुलीची अज्ञानपालक म्हणून गेली. त्यानंतर जॉर्जची पुतणी आणि वहिनी काही वर्षांतच मृत्यू पावल्या. त्यामुळे तीही संपत्ती जॉर्जकडेच आली (१७५३). परिणामतः माउंट व्हेरनॉन येथेच त्याचे कायमचे निवासस्थान झाले. जॉर्ज वॉशिंग्टनने मार्था डॅन्ड्रिज कस्टिस या विधवेशी विवाह केला (१७५९). तिला पहिल्या पतीपासून जॉन (मुलगा) व पॅट्सी (मुलगी) अशी दोन अपत्ये होती मात्र मार्थापासून वॉशिंग्टनला संतती झाली नाही. त्यामुळे या दोन मुलांनाचा दत्तक घेऊन त्यांचा त्याने सांभाळ केला.
जॉर्जला रॉयल कमिशन मिळवून ब्रिटिश लष्करात जावयाचे होते पण लॉरेन्सच्या मृत्यूनंतर स्वीय साहाय्यकाचे जुजबी काम त्याला मिळाले. नंतर तो ब्रिटिश नागरी शिबंदीत रुजू झाला. यावेळी फ्रेंच व ब्रिटिश यांत संघर्ष निर्माण होऊन दोन्ही पक्ष तेथील रेड इंडियन लोकांचा एकमेकींविरुद्ध उपयोग करून घेत. नंतर व्हर्जिनियाचा हंगामी गव्हर्नर डिन्वीडी याने त्यास ओहायओ नदी खोऱ्यात मोहिमेवर पाठविले. या प्रवासात त्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्यानंतर सु. पाच वर्षे (१७५३-५८) त्याची फ्रेंचांबरोबरच्या संघर्षात गेली. लेफ्टनंट कर्नल, कर्नल व सेनापती अशी विविध पदे त्याने भूषविली. जनरल एडवर्ड ब्रॅडकच्या हाताखाली त्याला लष्करी हालचालींचा अनुभव मिळाला. ब्रॅडकच्या मृत्यूनंतर डिन्वीडीने त्याच्याकडे सीमा भागातील सर्व अधिकार देऊन दूकेन किल्ला घेण्यासाठी धाडले. परंतु फ्रेंचांनी किल्ला जाळून उद्ध्वस्त केल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याच सुमारास त्याची व्हर्जिनियाच्या प्रतिनिधी मंडळावर निवड झाली (१७५८). निवृत्तीनंतर त्याने आपले सर्व लक्ष माउंट व्हेर्नॉन येथील शेतीवाडीत केंद्रीभूत केले.
वॉशिंग्टनने कृषिशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास करून शेतीत अनेक नवीन प्रयोग केले. त्यामुळे धान्योत्पादन वाढविण्यात व फळबागा फुलविण्यात तो यशस्वी ठरला. १७७३ मध्ये त्याच्याकडे सु. १६,००० हे. स्वतःच्या मालकीची जमीन होती. शेतीव्यवसायाबरोबरच पिठाच्या गिरण्याही त्याने काढल्या. तो व्हर्जिनियाच्या विधिमंडळावर सलग १५ वर्षे निवडून आला. या काळात त्याचा परिचय ⇨टॉमस जेफर्सन, पॅट्रिक हेन्री आणि इतर तत्कालीन मान्यवर राजकीय व्यक्तींबरोबर झाला. एक प्रगतशील शेतकरी, उद्योगपती, संसदपटू, चर्चचा सेवानिष्ठ वॉर्डन व जस्टिस ऑफ द पीस म्हणून सर्व परगण्यात त्याची ख्याती झाली. नृत्य, शिकार, मासे पकडणे, विविध खेळ इ. त्याचे आवडते छंद होते. पोटोमॅक नदीवर त्याने मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारले. १७७३ पर्यंत आपल्या खाजगी संपत्तीची देखभाल करीत त्याने विविध क्षेत्रांत नावलौकिक कमावला.
या सुमारास अमेरिकेतील ब्रिटिशांच्या तेरा वसाहतींत ब्रिटिश शासनव्यवस्थेबद्दल असंतोष फैलावू लागला होता. इंग्लंडच्या संसदेत संमत झालेल्या कायद्याचे अधिराज्य आपल्यावर अन्यायाचे आहे, हा विचार हळूहळू वसाहतींत प्रसृत झाला. वसाहतवाल्यांनी चहा, कागद आदी वस्तूंवरील जकात कर रद्द करण्याची चळवळ उभी केली. साहजिकच या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. ‘बॉस्टन टी पार्टी’ (१७६८) हे तिचे द्योतक होते. त्यामुळे काही कर रद्द झाले, तरी वसाहतींची चळवळ शमली नाही, उलट तिला संघटित रूप प्राप्त झाले आणि १७७४ च्या सप्टेंबरमध्ये बारा वसाहतींतील पुढाऱ्यांनी फिलाडेल्फिया शहरात स्वातंत्र्याची चळवळ तीव्रतर करण्यासाठी काँटिनेंटेल काँग्रेसची स्थापना केली. मायदेशाविरुद्ध युद्ध अटळ आहे अशी जाणीव झाल्यामुळे दुसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात (१५ जून १७७५) जॉर्ज वॉशिंग्टनची स्वातंत्र्यसेनेच्या सेनापतीपदी एकमुखाने नियुक्ती करण्यात आली. तो काँटिनेंटल लष्कर, फ्रेंच सेना आणि वसाहतींची नागरी शिबंदी अशा संयुक्त दलाचा सरसेनापती झाला. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध १७८३ पर्यंत रेंगाळले, तरीसुद्धा १९ ऑक्टोबर १७८१ रोजी कॉर्नवॉलिसच्या शरणागतीने ते निर्णायक ठरले आणि पुढे पॅरिस तहाने (१७८३) त्याची समाप्ती झाली. या स्वातंत्र्ययुद्धात वॉशिंग्टनने अत्यंत संयमाने शस्त्रास्त्रांची उणीव आणि अननुभवी सैनिक या अडचणींशी सामना करीत नेटाने ब्रिटिशांशी मुकाबला केला. खडतर हवामानाशी झुंज देत काही पराभव पचवून त्याचे महत्त्वाच्या लढाया जिंकल्या. तत्कालीन वसाहतींचा तो प्रमुख कार्यकारी सत्ताधारी बनला. सुमारे सात वर्षे (१५ जून १७७५ ते २३ डिसेंबर १७८३) चाललेल्या या संग्रामाचा पूर्वार्ध अमेरिकेच्या दृष्टीने निराशाजनक ठरला, तरीसुद्धा अखेर अमेरिकेला विजय व स्वातंत्र्य दोन्ही मिळाले. ब्रँडीवाइन, जर्मनटाउन, मॉनमथ अशा काही लढायांतून त्याचे नेतृत्व आणि लष्करी बाणा दिसून येतो. फिलाडेल्फिया येथे भरलेल्या मे १७८७ च्या परिषदेत व्हर्जिनियाचा प्रतिनिधी म्हणून त्याची निवड झाली. याच परिषदेत त्याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. फिलाडेल्फिया परिषदेने नवीन संविधनाचा मसुदा तयार केला (१७८७). त्याला वसाहतींची मान्यता मिळविण्याच्या कामी वॉशिंग्टनच्या प्रतिष्ठेचा उपयोग झाला. नवीन संविधान स्वीकारल्यावर फेडरल काँग्रेसने एकमताने वॉशिंग्टनला अध्यक्ष म्हणून निवडले (१७८९). प्रमुख शासनकर्ता या नात्याने तो सार्वजनिक धोरणाच्या बाबतीत आपल्या मंत्रिमंडळाशी विचारविनिमय करीत असे.
स्वातंत्र्ययुद्धानंतर वॉशिंग्टनने देशात न्यायव्यवस्था, चलनव्यवस्था, भूसुधारणा, लष्कर, सीमाशुल्क इ. खाती स्थापन करून युद्धातून उद्भवलेली कर्जे फेडण्याची व्यवस्था केली. तसेच त्याने देशात व देशाबाहेर शासनाची प्रतिष्ठा वाढविली. पहिली बँक (बँक ऑफ द युनायटेड स्टेट्स) काढली. याच सुमारास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत राजकीय पक्ष विकसित होत होते जेफर्सन व हॅमिल्टन या दोघांतील मतभेदांतून डेमॉक्रॅटिक व रिपब्लिकन हे पक्ष उदयाला आले तरीसुद्धा सर्व लोकांनी वॉशिंग्टनची राष्ट्राध्यक्षपदाची चार वर्षांची मुदत संपली असतानाही पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी त्याचीच निवड केली (१७९३). पुढील चार वर्षात त्याने अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणावर लक्ष केंद्रित करून नवनिर्मित फ्रान्सशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. शेजारी देशांबरोबर मतभेद संपुष्टात आणून ‘पिंकनी’ तह कार्यवाहीत आणला. त्यावेळी मिसिसिपी, फ्लॉरिडा या भावी राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या आणि इंग्लंडबरोबरचे शांततेचे संबंधही प्रस्थापित झाले. त्याच्या एकूण सु. आठ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अमेरिकेची एकसंघीय राज्य म्हणून भक्कम पायावर उभारणी केली. तिसऱ्या वेळी मात्र तो निवडणुकीस उभा राहिला नाही. उर्वरित जीवन त्याने माउंट व्हेर्नॉन येथेच व्यतीत केले. घटसर्पाने तो मरण पावला.
अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीचा नेता, सरसेनापती व अखेरीस राष्ट्रपिता म्हणून वॉशिंग्टनचे नाव अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या तसेच जगाच्या इतिहासात अजरामर झाले आहे. अमेरिकेच्या भवितव्याची त्याने व्यावहारिक दृष्ट्या जडणघडण केली. कृषी, व्यापार, युद्धतंत्र, परराष्ट्रीय धोरण आदी क्षेत्रांत त्याने भरीव कामगिरी करून अमेरिकेला जगात मानाचे स्थान मिळवून दिले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे ऐक्य व प्रबळ केंद्रसत्ता यांचा त्याने आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत पाठपुरावा करून तशी अंमलबजावणी केली. नव्या संविधानानुसार त्याने अमेरिकेच्या लोकशाही राजकारणाची भक्कम पायाभरणी केली. त्याच्या स्मरणार्थ अमेरिकेत भव्य स्मारक उभारण्यात आले असून राजधानीसही वॉशिंग्टन असे नाव देण्यात आले. वॉशिंग्टनचे स्वतंत्र असे लेखन नसले, तरी त्याची पत्रे व निरोपाचे भाषण पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले.
पहा : अमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध.
संदर्भ : 1. Cunliffe, Marcus F. George Washington: Man and Monument, New York, 1982.
2. Fitzgerald, John C. George Washington Himself, Westport (Conn.), 1975.
3. Flexner, James, T. George Washington: The Indispensable Man, New York, 1974.
4. Freeman, Douglas S. George Washington, 7 Vols., London, 1975.
5. Graff, Henry, Ed. The Presidents, New York, 1984.
6. Wall Charles C. George Washington, New York, 1980.
७. अग्निहोत्री, अं. शं. अनु. जॉर्ज वॉशिंग्टन: व्यक्ति आणि विभूति, मुंबई १९६०.
देशपांडे, सु. र.
“