वॉकर, फ्रॅन्सिस ॲमासा : (२ जुलै १८४०-५ जानेवारी १८९७). सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ. मॅसॅचूसेट्स राज्याच्या बॉस्टन शहरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्म. वडील ॲमासा वॉकर हे प्रसिद्ध कारखानदार होते. फ्रॅन्सिसचा जन्म झाल्याच्या वर्षी ॲमासा ह्यांनी कारखानदारी उद्योगातून आपली निवृत्ती जाहीर केली आणि उर्वरित आयुष्य समाजसेवा व अर्थशास्त्रीय अभ्यास यांसाठी वाहून घेतले त्या काळात त्यांना लक्षणीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता लाभली.
फ्रॅन्सिस वॉकर ह्यांनी ॲम्हर्स्ट महाविद्यालयात अध्ययन केले. पदवी संपादन केल्यावर (१८६०) त्यांनी कायद्याच्या अभ्यासास प्रारंभ केला, तथापि यादवी युद्धासाठी त्यांनी कायद्याचा अभ्यास सोडून दिला व ते सैन्यात भरती झाले. यादवी युद्धाच्या ऐन धामधुमीत वॉकर यांचा लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा होता १८६५ मध्ये त्यांना ब्रिगेडिअर जनरलचा वरचा हुद्दा देण्यात आला. यादवी युद्धसमाप्ती नंतर वॉकर यांना वॉशिंग्टनला बोलाविण्यात येऊन कोषागर खात्याच्या (ट्रेझरी डिपार्टमेंट) सांख्यिकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. अतिशय सक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला व परिणामी त्यांना १८७० आणि १८८० अशा दोन अमेरिकी जनगणनांचा मुख्य निरीक्षक म्हणून नेमण्यात आले. या पदावर असताना वॉकर यांनी विशेष प्रावीण्य दाखविले. या कालावधीत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अर्थव्यवस्थेसंबंधीची प्रचंड सांख्यिकीय माहिती व आकडेवारी अवगत करण्याची त्यांना संधी लाभली. या पदावर असताना वॉकर यांनी देशाच्या विकासाचे हुबेहूब चित्र अचूकपणे प्रतिबिंबित होण्यासाठी जनगणनेची व्याप्ती वाढविली. १८७१ मध्ये वॉकर यांनी इंडियनांच्या बाबींसंबंधीचा आयुक्त म्हणून काम पाहिले.
वॉकर ह्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्राचा अभ्यास चालू ठेवला परिणामी येलच्या शेफील्ड शास्त्रीय अध्ययनकेंद्रात अर्थशास्त्र व इतिहास ह्या दोन विषयांच्या अध्यापनाचे काम त्यांना १८७२ मध्ये मिळाले. त्यापुढील एक दशकाचा अवधी म्हणजे वॉकर यांच्या दृष्टीने विलक्षण वैचारिक निर्मितीचा काळ होता. १८७६ मध्ये वॉकर यांचा द वेजिस क्वेश्चन हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १८७८ मध्ये मनी या नावाचे प्रदीर्घ चर्चात्मक पुस्तक प्रकाशित झाले. १८७९ मध्ये मनी इन इट्स रिलेशन्स टू ट्रेड अँड इंडस्ट्री हे एक संक्षिप्त पुस्तक बाहेर पडले. १८८३ मध्ये लँड अँड इट्स रेंट हे पुस्तक आणि पोलिटिकल इकॉनॉमी हे प्रदीर्घ लांबीचे पाठ्यपुस्तक प्रकाशित झाले. याच सुमारास १८८१ मध्ये वॉकर यांची मॅसॅचूसेट्स तंत्रविद्या संस्थेचे (मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर काम करीत असताना एक अतिशय कुशल प्रशासक म्हणून वॉकर ह्यांनी आपले प्रावीण्य सिद्ध केले. नवीन पदाच्या जबाबदारीचे अनेक ताण सहन करूनही, वॉकर ह्यांची अर्थशास्त्र विषयातील रुची कमी न होता, अधिकच वाढू लागली. दीर्घकाळ सुस्थापित असलेल्या अमेरिकन सांख्यिकीय संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी प्रदीर्घकाळ सांभाळली (१८८३-९६) तसेच नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या आणि काही काळ वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमेरिकन अर्थशास्त्रीय संस्थेचे पहिले अध्यक्षपदही त्यांनी पतकरले (१८८६-९२). ह्यांशिवाय वॉकर ह्यांनी विविध सार्वजनिक पदेही सांभाळली. त्यांमध्ये ‘न्यू हॅव्हन शिक्षणमंडळा’ चा सदस्य या पदापासून १८७८ मध्ये पॅरिस येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वित्त परिषदेमध्ये अमेरिकन शासनाचा आयुक्त म्हणून सहभाग, यांसारख्या पदांचा समावेश होता. अनेक सार्वजनिक वाद प्रश्नांबाबत (उदा., संकुचित शाळा, नवीन प्रकारचा आप्रवास-न्यू इमिग्रेशन इ.) त्यांची विरोधी मते होती मात्र सार्वजनिक शाळांमधून धार्मिक पाठांच्या उपक्रमावर बंदी घालण्याच्या बाजूने वॉकर ह्यांनी आपले मत मांडले होते.
स्वरूप व व्याप्ती अशा दोन्ही दृष्टिकोनांतून अर्थशास्त्राला आधुनिक व विस्तृत आकार देणाऱ्या अर्थशास्त्राज्ञांमध्ये वॉकर यांना अग्रस्थान देण्यात येते. वॉकर ह्यांची अर्थशास्त्र विषयातील काही मते पूर्वसूरी अर्थशास्त्रज्ञांच्या आर्थिक विचारांहून बऱ्याच प्रमाणात निराळी होती. त्यांच्या मते अर्थशास्त्र हा कलाविषय नसून ते एक शास्त्र आहे, कारण त्याचा संबंध तत्त्वबोधाशी नसून, तत्त्वांशी असतो. देशी उद्योगांना संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांच्या मताला त्यांनी विरोध केला होता. अनिर्बंध आर्थिक धोरणांबाबत (सरकारचा आर्थिक व्यवहारांमध्ये कमीत कमी सहभाग असावा, या धोरणाबाबत) ते आग्रही वा हटवादी नव्हते उलट अनेक प्रकारच्या आर्थिक संघर्षांमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा, असे त्यांचे प्रतिपादन होते.
सर्वसामान्यतः स्वीकारण्यात आलेल्या मजुरी-निधी सिद्धांतावर कडाडून टीका करणाऱ्यांमध्ये वॉकर ह्यांचा पुढाकार होता. या सिद्धांतानुसार मजुरांना मजुरी देण्यासाठी मालकांनी वा उत्पादकांनी भांडवलाचा जो भाग निधिस्वरूपात बाजूला काढून ठेवलेला असतो, त्यानुसारच एकूण मजुरीची रक्कम पूर्वनिर्धारित करण्यात येते. वॉकर ह्यांनी या सिद्धांताऐवजी आपला स्वतःचा ‘अवशिष्ट मजुरी सिद्धांत’ (रिझिड्युअल क्लेमंट थिअरी ऑफ वेजिस) मांडला. या सिद्धांतानुसार तीन उत्पादन-घटकांना एकूण औद्योगिक उत्पादनामधून आपापला हिस्सा नफा, व्याज व खंड या रूपात मिळाल्यानंतर उर्वरित भाग मजुरीच्या रूपात कामगारांना दिला जातो. मजुरी ही उत्पादनाचे फलन असल्याचे वॉकर यांनी प्रतिपादले आहे.
इंटरनॅशनल बायमेटॅलिझम (१८९६) या ग्रंथात वॉकर ह्यांनी वित्तविषयक विचार प्रभावी रीतीने मांडले आहेत. जगाचा आर्थिक विकास ज्या वेगाने चालू आहे, त्या प्रमाणात सुवर्णाचा पुरवठा पुरेसा पडत नाही अशा स्थितीत चांदीच्या नाण्यांचा आंतरराष्ट्रीय वापर मोठ्या प्रमाणात करण्यात यावा, असे वॉकर ह्यांनी आग्रहाने प्रतिपादिले. डिस्कशन्स इन इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स (द्विखंडीय ग्रंथ) व डिस्कशन्स इन एज्युकेशन हे दोन्ही ग्रंथ वॉकर यांच्या मृत्यूनंतर १८९९ मध्ये प्रकाशित झाले.
सांख्यिकीय क्षेत्रात कोष्टकांबरोबर आलेखांची जोड देण्याचा केलेला प्रयत्न, ही वॉकर यांची प्रवर्तकीय कामगिरी समजली जाते. १८७४ मध्ये द स्टॅटिस्टिकल ॲटलास ऑफ द युनायटेड स्टेट्स ह्या वॉकर यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सांख्यिकीय नकाशा-पुस्तकाच्या रूपाने शासकीय पातळीवरील सांख्यिकीय प्रकाशनांना उच्चतम गुणवत्ता प्राप्त झाली. वॉकर ह्यांचा बौद्धिक जगतावरील प्रभाव तसेच जनगणनेकरिता स्थायी स्वरूपात मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी वॉकर यांनी केलेले अथक प्रयत्न, ह्या दोन गोष्टींमुळे संख्याशास्त्राचा व्यवसायात्मक विशेषीकरण क्षेत्रात वाढता उपयोग होत गेल्याचे दिसून येते. पुरेशा सांख्यिकीय आधारसामग्रीचे महत्त्व वॉकर ह्यांनी जनसामान्यांस पटवून दिले, यावरूनच त्यांचे मोठेपण लक्षात येते, वॉकर ह्यांचे बॉस्टन येथे निधन झाले.
गद्रे, वि. रा.