वारफोड्या : (रुबेला). हा रुबेला नावाच्या विषाणूमुळे (व्हायरसामुळे) होणारा साथीचा रोग असून (म्हणून रोगाला रुबेला म्हणतात) तसेच खोकताना, हसताना व बोलताना उडणाऱ्या थुंकीच्या तुषारांद्वारे याचा प्रसार होतो. याची लक्षणे काहीशी गोवराप्रमाणेच असली, तरी गोवरापेक्षा हा खूप सौम्य, कमी दिवस टिकणारा (म्हणून काही वेळा त्याला तीन दिवसांचा गोवर असेही म्हणतात) असून याचा प्रसार अगदी सहजपणे होत नाही [⟶ गोवर]. हा बहुधा मोठी मुले, वयात येणारी मुले व तरुण यांच्यात आढळतो. तरुणांत तो जास्त तीव्र असू शकतो. कमी दिवसांचा रोग असल्याने एरवी त्याला फारसे महत्त्व नसते, परंतु तोच रोग स्त्रीस गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत झाल्यास तिला होणाऱ्या मुलात गंभीर जन्मजात विकृती असण्याची शक्यता मोठी असल्याने, काही इतर गंभीर रोगांशी काही बाबतींत साम्य असल्याने व क्वचित होणाऱ्या उपद्रवांमुळे त्यास महत्त्व प्राप्त होते. तो मुख्यतः वसंत व ग्रीष्म ऋतूंत होतो व त्याचा परिपाक काल (व्हायरस शरीरात शिरल्यापासून रोगाची लक्षणे दिसू लागण्यापर्यंतचा काळ) अंदाजे १८ दिवस (गोवरापेक्षा अधिक) असतो. एकदा हा रोग झाल्यास त्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात व बहुधा कायमची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते परंतु तिचा नेहमीच्या गोवराविरुद्ध उपयोग होत नाही. जर्मनीतील १९ व्या शतकातील वारफोड्या रोगाच्या साथींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला होता. त्यावरून याचे ‘ जर्मन गोवर ‘ (मीझल) हे लोकप्रिय नाव पडले आहे.

लक्षणे : लहान मुलांमध्ये आधीची इतर लक्षणे इतकी सौम्य असतात की, सहसा पुरळ येईपर्यंत रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शंकाही येत नाही. पुरळ लाल व फुगीर असून प्रथम कानांमागे व कपाळावर दिसतो. नंतर धड व त्यामागोमाग हातापायांवर त्वरित पसरतो व दोन-तीन दिवस टिकतो. बारीक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, घशातील सूज, डोळे लाल होणे इ. लक्षणेही दिसतात परंतु ती सर्व गोवरापेक्षा सौम्य असतात. गळा व मानेतील (मुख्यतः पाठीमागील भागातील) ⇨ लसीका ग्रंथींची वाढ व वेदना हे लक्षण मुख्यतः आढळते व त्यामुळे मान पाठीमागच्या बाजूस आखडते. काही वेळा लसीका ग्रंथींचे इतर गटही सुजतात. मोठ्या मुलांत व तरुणांत रोगाची सुरुवात जास्त तीव्र असू शकते. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, घसा सुजणे इ. लक्षणे जास्त तीव्र असतात व पुरळ अंगभर येतो, परंतु रोग दोन-तीन दिवसच टिकतो व एकूण सौम्य असतो.

गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत स्त्रिला हा रोग झाल्यास मात्र गर्भावर गंभीर परिणाम होतात. हे पहिले तीन महिने गर्भनिर्मिती व अवयवांच्या विकासाचे असल्याने या काळात मातेस हा रोग झाल्यास गर्भाच्या हृदय, मेंदू, डोळे, कान इ. अवयवांच्या विकासात दोष निर्माण होतात. त्यामुळे या एक किंवा अनेक अवयवांशी संबंधित कमी अधिक तीव्रतेच्या जन्मजात विकृती (उदा., नेत्रदोष, मोतीबिंदू, बहिरेपणा, बुद्धिमांद्य, हृदयातील डावी-उजवी बाजू अलग राखणाऱ्या पडद्यात भोके असणे इ.) नवजात बालकात दिसू शकतात. (गर्भाचा विकास १२ ते १४ आठवड्यांत पूर्ण झाल्यावर मातेस हा रोग झाल्यास या प्रकारचे जन्मजात दोष नवजात बालकात आढळण्याची शक्यता नसते).

उपद्रव : सर्वसाधारणपणे उपद्रव कमी प्रमाणात होतात व नंतर पूर्ण बरे होतात. विशेषतः लहान सांध्यांना ग्रासणारी सांधेदुखी व सूज हा उपद्रव जास्त प्रमाणात आढळतो. मस्तिष्क मज्जारज्‍जुशोथ (मेंदू व मेरुरज्‍जू यांची दाहयुक्त सूज) आणि रक्तातील बिंबाणूंच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील विकृती इ. उपद्रवही होऊ शकतात.

निदान : या रोगाचे गोवराशी खूप साम्य असते परंतु आजाराचा सौम्यपणा, कमी कालावधी, कॉप्लिक ठिपक्यांचा [तोंडातील श्लेष्म कलेवर (बुळबुळीत अस्तरावर) ओठांच्या आतल्या बाजूस वा दाढांच्या समोर लाल उंचवट्यांवर टाचणीच्या डोक्याच्या आकाराच्या पांढरट ठिपक्यांचा हेन्‍री कॉप्लिक या बालरोगतज्ञांनी शोधून काढल्यामुळे पडलेले नाव] अभाव, पुरळाचा विशिष्ट रंग आणि मानेतील लसीका ग्रंथींची वेदनायुक्त वाढ यांवरून तो गोवरापासून वेगळा ओळखता येतो. काही वेळा पुरळाच्या स्वरूपामुळे याचे ⇨लोहितांग ज्वराशीही साम्य भासते. मानेतील लसीका ग्रंथींच्या वेदनायुक्त वाढीमुळे मान आखडते. अशा वेळी ताप, डोकेदुखी इत्यादी इतर लक्षणे व मान आखडणे यामुळे मस्तिष्कावरणशोथाची (मेनिंजायटीस) शंका येते व तो गंभीर रोग असल्याने ती शंका दूर करावी लागते. संसर्गजन्य एककेंद्रकी श्वेतकोशिकाधिक्य (रक्तातील एककेंद्रीक पांढऱ्या पेशींची असाधारण संख्या वाढ) आणि औषधांच्या ॲलर्जीमुळे येणाऱ्या पुरळांचाही विचार निदान करताना करावा लागतो.

उपचार : या रोगावर विशिष्ट असा रामबाण उपाय उपलब्ध नाही. रोगाच्या सौम्य स्वरूपामुळे सहसा उपचारांची जरूरही पडत नाही. गर्भवती स्त्रीस पहिल्या तिमाहीत हा रोग झाल्याची शंका आल्यास मानवी प्रतिरक्षी ग्लोब्युलीन (इम्युनोग्लोब्युलीन) त्वरित दिले जाते, परंतु या रोगाचा गर्भावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यास त्याचा किती उपयोग होतो, हे निश्चित माहीत नाही. त्यामुळे गर्भात जन्मजात विकृती मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका वाटत असल्यास गर्भपाताचा सल्ला दिला जातो. गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत स्त्रीने आहार, मोकळी हवा, योग्य व्यायाम व विशेषतः या रोगाने ग्रस्त असल्याचा संशय असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संसर्ग टाळणे इ. उपायांनी कोणताही व शक्यतो हा रोग होऊ नये हे पाहणे महत्त्वाचे असते [⟶ गर्भारपणा]. या रोगानंतर बहुधा कायमची रोगप्रतिकारक्षमता निर्माण होत असल्याने लहान वयातच हा रोग होऊन जाणे श्रेयस्कर ठरते. तसेच ११ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना या रोगाविरुद्ध विशिष्ट प्रतिबंधक लस टोचण्याचा उपायही सुचवला जातो.

प्रभुणे, रा. प.

आयर्वेदीय वर्णन व चिकित्सा : यावरील आयुर्वेदीय चिकित्सा सफल होऊ शकते. या विकारात प्रथम रक्तधातू व त्याच्या वाहिन्या आणि नंतर मांस, मेद, मज्जा आणि अस्थिधातू ह्या क्रमाने बहुधा विकृती निर्माण होते. ह्याकरि ता ह्या धातूची शुद्धी होईल असे उपचार करणे अत्यावश्यक आहे. म्हणून प्रथम रोगग्रस्त मातेच्या आहाराची तपासणी करून दही, ताक, शेंगदाणे, शिक्रण, मोडाची धान्ये, तेलात तळलेले अधिक तिखट इ. रक्तादि आंबट दुष्टिकर पदार्थ ताबडतोब बंद करावेत.

गर्भिणी स्त्रीने द्राक्षे, आवळकाठी, पिकलेली बोरे, खजूर, मोसंबी, संत्री अशी मल साफ करणारी फळे खाऊन शौचाला साफ होत राहील ह्याची काळजी घ्यावी. रक्तादि धातू बलवान करणारी अशी द्रव्ये आहारात द्यावीत. विशेषतः चांगले तांदूळ, मूग, जोंधळे, गहू, दुधी भोपळा, कोहळा, घोसावळी, ऊस, डाळिंब, आवळा, मनुका, त्रिफळा, तसेच कोंबडा, तित्तिर, शेळी इ. प्राण्यांचे मांसरस मित प्रमाणात द्यावेत. औषधांमध्ये प्रवाळ, अभ्रक, मौक्तिक, कामदुधा, सुवर्णमाक्षिकभस्म, वसंतकुसुमाकर, लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत, सुवर्णमालिनी वसंत, सुवर्ण सूतशेखर, महायोगराज गुग्गुल, कांतलोहभस्म, रौप्यभस्म इ. औषधे त्या स्त्रीच्या प्रकृतीला व विकाराच्या अवस्थेला अनुसरून द्यावीत.

चिंता, संताप, निद्रानाश इ. रक्त दूषक गोष्टींचे नियंत्रण करण्यासाठी निरनिराळ्या मनोहर दृश्यांची चित्रे तिच्या खोलीत लावावीत. विनोदी वाचन करावे आणि प्रकृतीला अनुसरून अत्तरे, सुगंधित तेले, सुगंधित फुले ह्यांचा उपयोग करावा.

थकवा न येईल असा चालण्याचा व्यायाम योग्य प्रमाणात करावा.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भिणीला मासानुमासिक द्रव्यांपैकी प्रत्येक महिन्याच्या द्रव्यांचा त्या त्या महिन्यात चूर्ण, काढा किंवा त्यांनी सिद्ध केलेले दूध बाळंत होईपर्यंत द्यावे.

वरील मासानुमासिक काढ्याबरोबर कडू पडवळ, अनंतमूळ, नागरमोथा, पहाडमूळ व कुटकी या द्रव्यांचा यथायोग्य उपयोग करावा. गर्भामध्ये वैगुण्य उत्पन्न होण्याचा संभव तज्ञ वैद्याला वाटत असल्यास वैगुण्यनाशक द्रव्यांचाही उपयोग करावा. ह्या काढ्याबरोबर सुवर्णमालिनी वसंत किंवा लघुमालिनी वसंत अवश्य द्यावे. कारण ह्या योजनेने होणारे मूल निर्दोष, बलवान, बुद्धि-स्मृति-वर्ण इत्यादींनी युक्त होते असा अनुभव आहे.

सारांश, शरीरातील सर्व भाव वरील चिकित्सेने श्रेष्ठ दर्जाचे होतात. प्रत्येक स्त्रीने जर ह्या दृष्टीने गरोदरपणी हे काढे घेतले, तर वांशिक वैगुण्यविरहीत मुलाचा लाभ होऊ शकतो.

हीच चिकित्सा हा विकार झालेल्या मुलालाही करावयाची असते. मुलगा अंगावर कपडा ठेवीत नसेल, आग होत असेल तर चंदन, अनंतमूळ, कुटकी, बोरीच्या पानांचा फेस, रीठ्याचा फेस ह्यांपैकी योग्य अशा द्रव्याचा अंगाला लावण्याकरिता उपयोग करावा. मुलाच्या उशाजवळ सुगंधित फुले, तेले किंवा अत्तराचे बोळे ठेवावेत. झोपण्याच्या जागेत चंदन वगैरे सुगंधित द्रव्यांची उदबत्ती लावावी.

                                                                   जोशी, वेणीमाधवशास्त्री

संदर्भ : 1. Evans. A. S. Viral Infections of Humans: Epidemiology and Control, New York, 1982.

           2. Friedman. H. Prier. J. E., Eds. Rubella: Proceedings, 1973.