वाङ्मयेतिहास : एका विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मयकृतींचा आणि वाङ्मयीन घडामोडींचा एक विशिष्ट दृष्टिकोण घेऊन केलेला ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मयेतिहास. वाङ्मयेतिहास ही वाङ्मयाच्या अभ्यासाची एक पद्धती आहे आणि ती वाङ्मयसिद्धान्त आणि वाङ्मयीन टीका या वाङ्मयाभ्यासाच्या इतर दोन पद्धतींहून पूर्णपणे वेगळी आहे. वाङ्मयनिर्मितीच्या प्रेरणा-प्रवृत्तींची आणि प्रभाव-परिणामांची कालसंगत अशी जाणीव प्रस्थापित करणे, हे वाङ्मयेतिहासाचे कार्य असते. वाङ्मयनिर्मिती ही अखेरतः मानवी कृती आहे. त्यामुळे एखाद्या मानवसमूहाचा त्याच्या स्वतःच्या वाङ्मयाद्वारे झालेला विशिष्ट कालखंडातील आविष्कार टिपणे आणि स्पष्ट करणे असेही वाङ्मयेतिहासाचे कार्य सांगता येते. या अर्थाने वाङ्मयेतिहास हा त्या विशिष्ट समाजाच्या विशिष्ट कालखंडातील संवेदनशीलतेचा इतिहास असतो. वाङ्मयकृती आणि वाङ्मयीन वातावरण यांची मिळून जी वाङ्मयव्यवस्था निर्माण होते, तिचे विशिष्ट तिचे देशकालपरिस्थितिनुसार आकलन करून घेणे हे वाङ्मयेतिहासाचे ध्येय असते. मुद्रणपूर्व काळातील हस्तलिखिते आणि तदनंतरचे मुद्रित वाङ्मय ही वाङ्मयेतिहासलेखनाची मुख्य सामग्री होय. परंतु या वाङ्मयकृतींमागील वाङ्मयीन वातावरणाचाही परामर्श वाङ्मयेतिहासलेखकाला घ्यावा लागतो. लेखकांची वाङ्मयीन चरित्रे, प्रकाशनसंस्था, साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्था, वाचकवर्ग आणि त्याची अभिरुची, वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथमाला इ. वाङ्मयप्रसाराची विविध माध्यमे, वाङ्मयाशी अनुबंध असणाऱ्या नाट्यादी ललित कला, वाङ्मयीन चळवळी, चर्चासत्रे, परिसंवाद आणि सभासंमेलने, विविध स्वरूपांचे वाङ्मयीन पुरस्कार, पारितोषिके, अनुदाने व शिष्यवृत्ती, शालेय व विद्यापीठीय पातळीवरील वाङ्मयाचे अध्ययन-अध्यापन अशा अनेकविध गोष्टी वाङ्मयीन वातावरण घडवीत असतात. त्यामुळे या सामग्रीचाही विचार वाङ्मयेतिहासलेखकाला करावा लागतो. वाङ्मयकृती व वाङ्मयीन वातावरण यांवर समाजातील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, इ. घडामोडींचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम असतो. त्यामुळे त्यांचे यथोचित भान वाङ्मयेतिहासलेखकाला ठेवावे लागते. वाङ्मयेतिहास हा अशा रीतीने समाजाच्या वाङ्मयीन संचिताचाच ऐतिहासिक शोध घेण्याचा एक प्रयत्न असतो.
वाङ्मयेतिहास म्हणजे वाङ्मयीन टीकेचा एक उपशाखा आहे, असे परवापरवापर्यंत मानले जात होते परंतु यूरोप–अमेरिकेतील अलीकडील वाङ्मयेतिहास अभ्यासकांच्या प्रयत्नांमुळे ‘वाङ्मयेतिहास’ ही वाङ्मयीन अभ्यासाची (‘लिटररी स्टडीज’ची) स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून मान्यता पावल्याचे दिसते. याचे एक कारण म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मय, विविध वाङ्मयसिद्धान्त (थिअरीज ऑफ लिटरेचर) आणि वाङ्मयीन टीका या सर्वांची एक सुसंगत व्यवस्था लावून दाखविण्याची शक्यता वाङ्मयेतिहासविद्यावेत्ते बोलून दाखविताना दिसतात. इंग्लिश लिटररी हिस्टरी आणि न्यू लिटररी हिस्टरी यांसारख्या केवळ वाङ्मयेतिहासाच्या तत्त्वविचाराला वाहिलेल्या आणि दीर्घकाळ चाललेल्या पत्रिका (जर्नल्स) वाङ्मयेतिहास ही स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून मान्यता पावल्याच्याच द्योतक होत. २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट १९६१ या कालावधीत न्यूयॉर्क विद्यापीठात भरलेली ‘नाइन्थ कॉंग्रेस इंटरनॅशनल फेडरेशन फॉर मॉडर्न लँग्वेजीस अँड लिटरेचर’ ही आंतरराष्ट्रीय परिषद केवळ वाङ्मयेतिहासाचाच विचार करण्यासाठी निमंत्रित केली गेली होती. या सर्व गोष्टी वाङ्मयेतिहास ही वाङ्मयीन अभ्यासाची स्वतंत्र अभ्यासशाखा आहे, हेच सिद्ध करतात.
इतिहास आणि वाङ्मयेतिहास या दोन स्वतंत्र अभ्यासशाखा आहेत. एका व्यापक परिप्रेक्ष्यात वाङ्मयेतिहासलेखनात जरी इतिहासाने घालून दिलेली पद्धती वापरली जात असली, तरीही अन्य इतिहासलेखनांपेक्षा वाङ्मयेतिहासाचे लेखन स्वरूपतः आणि व्यूहाच्या दृष्टीनेही वेगळेच राहते. याचे मुख्य कारण म्हणजे इतिहासाचे द्रव्य (मटेरियल) आणि वाङ्मयेतिहासाचे द्रव्य यांमध्ये मूलतः फरक आहे. वाङ्मयेतिहासलेखन कोणत्याही भौतिक विज्ञानेतिहासाच्या लेखनासारखे असणार नाही हे तर स्पष्टच आहे पण राजकीय, सामाजिक, आर्थिक, इ. प्रकारच्या मानव्यविद्या शाखांच्या इतिहासलेखनासारखेही ते असणार नाही. कारण सामाजिक इतिहासकारासमोरील ऐतिहासिक घटितांपेक्षा (हिस्टॉरिकल इव्हेन्ट्स) वाङ्मयेतिहासकारासमोरील वाङ्मयीन घटिते (लिटररी इव्हेन्ट्स) स्वरूपतः भिन्न असतात. वाङ्मयीन घटिते ही सदैव जिवंत, सदैव आस्वाद्ययोग्य असल्याने त्यांची भूतकालिकता (पास्टनेस) मानवी जीवनातील इतर घटितांच्या भूतकालिकतेपेक्षा वेगळी असते. तथापि वाङ्मयेतिहास हा अन्य प्रकारच्या इतिहासांपेक्षा वेगळा ठरण्याचे हे एवढे एकच कारण आहे असे नव्हे. प्रत्यक्ष वाङ्मयव्यवस्थेतच अशी काही स्वायत्त आणि आंतरिक तत्त्वे असतात, की त्यामुळे प्रत्यक्ष वाङ्मयाची अभ्यासकांकडून काही एका आगळ्यावेगळ्या दृष्टिकोणाची मागणी असते. वाङ्मयाच्या या स्वायत्त स्वरूपामुळेही वाङ्मयेतिहास इतर प्रकारच्या इतिहासांपासून वेगळा ठरतो.
वाङ्मयेतिहास-संकल्पनेची वाटचाल केवळ दोन शतकांची आहे. टॉमस वॉर्ट्न् (१७२८–९० ) यांचा द हिस्टरी ऑफ इंग्लिश पोएट्री (तीन खंड, १७७४–८१) हा ग्रंथ वाङ्मयेतिहास-संकल्पनेचा आरंभबिंदू म्हणता येईल. गतकालीन वाङ्मयाकडे का आणि कोणत्या दृष्टीने पाहावयाचे यासंबंधाने वॉर्ट्न यांनी येथे एक प्राथमिक मत व्यक्त केलेले आहे. वाङ्मयेतिहास ही संज्ञा मूळ धरण्यास आणि मुख्य म्हणजे वाङ्मयाच्या ऐतिहासिक विचाराचे भान निर्माण करण्यास या त्यांच्या प्रयत्नाने मदत झाली. यानंतर वाङ्मयेतिहासविचाराला शास्त्रीय आणि व्यापक बैठक प्राप्त करून देणारा महत्त्वाचा प्रयत्न ⇨इपॉलिन आदॉल्फ तॅन (१८२८–९३) यांनी केला. त्यांनी आपल्या इस्त्वार द् ला लितेरात्यूर आंग्लॅझ (४ खंड, १८६३–६४ एच्. व्हान लॉनकृत इं. भा. हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर, १८७१) या ग्रंथाला जोडलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत वाङ्मयेतिहासाच्या रचनेसंबंधाने आपला स्वतंत्र तात्त्विक व्यूह मांडलेला आहे. वाङ्मयकृती ही अलौकिक किंवा आपोआप अवतरणारी यादृच्छिक अशी घटना तर नाहीच नाही पण तिच्यामागे तिच्या कर्त्याची तेवढी प्रतिभा असते हेही मानणे बरोबर होणार नाही, ही दृष्टी तॅन सर्वप्रथम बिंबवू इच्छितात. त्यामुळेच वाङ्मयकृतीच्या कर्त्याचे म्हणजे लेखकाचे चरित्र पाहणे व लेखकाच्या मनोभूमीत त्या वाङ्मयकृतीची पाळेमुळे शोधणे या ⇨ सँत–बव्ह (१८०४–६९) यांनी प्रतिपादिलेल्या त्रोटक वाङ्मयविचारावर तॅन समाधानी राहू शकत नव्हते.
उलट लेखक आणि त्याचे मन यांवर पूर्वकालीन व स्वकालीन अशा अनेक गोष्टींचा वा घडामोडींचा फार मोठा प्रभाव असतो, असे तॅन यांचे चिंतन आहे. हे चिंतन त्यांनी आपल्या ‘वंश’ (रेस), ‘परिस्थिती’ (मिल्यू) आणि ‘क्षण’ (मोमेंट) या प्रसिद्ध त्रिसूत्रीच्या आधारे मांडले. या त्रिसूत्रीच्या आधारे वाङ्मयाचा इतिहास लिहिता येतो, हेच तॅन यांचे गृहीतक आहे. वंश या सूत्राद्वारे तॅन विशिष्ट मानवसमूहाचे नियत असे स्वभावधर्म निर्देशित करतात. शरीराच्या ठेवणीसारखाच मनाची ठेवण हा वांशिक गुण तॅन मानताना दिसतात. विशिष्ट वंशातील मानवसमूह विशिष्ट कार्य करण्याचे कौशल्य उपजतच संपादून असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर जसा होतो, तसाच भाषा, साहित्य, कला इ. संस्कृतिविशेषांवरही होतो. परिणामी एकाच वंशातील व्यक्तींमध्ये काही उपजत अशा समान प्रवृत्ती असतात आणि त्यांचा धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींबरोबर त्यांच्या वाङ्मयातदेखील अविष्कार होतो, असा वंश या सूत्रासंबंधीचा तॅन यांचा निष्कर्ष आहे. असे असले, तरी एकाच वंशातील पण भिन्नभिन्न प्रदेशांत राहणाऱ्या मानवसमूहांमध्ये अविष्काराची ही समानता आढळत नाही. असे का, या प्रश्नाचे उत्तर तॅन ‘परिस्थिती’ या आपल्या दुसऱ्या सूत्राच्या आधारे देतात. उपजत वृत्तिप्रवृत्ती अवतीभोवतीच्या भौगोलिक, नैसर्गिक इ. परिस्थितीमुळे बदलतात आणि हळूहळू परिवर्तित प्रवृत्ती स्थिर होतात. परिस्थितीचा मानवसमूहावर जो परिणाम होतो, तो त्याच्या वाङ्मयादी कलांमध्येही अवतरतो, असा तॅन यांच्या या दुसऱ्या सूत्राचा अन्वयार्थ आहे. ‘क्षण’ या सूत्राद्वारे ते एखाद्या घटनेमागील तत्कालीन परिस्थिती आणि पार्श्वभूमी यांचा निर्देश करतात आणि त्या परिस्थिती-पार्श्वभूमींचा वाङ्मयकृतीवर असणारा प्रभाव विचारात घेण्याचे महत्त्व् प्रतिपादितात. म्हणूनच काहीजण ‘मोमेंट’चे भाषांतर ‘युगधर्म’ असेही करतात. वंश-परिस्थिती-क्षण या त्रिसूत्रीच्या आधारे वाङ्मयेतिहासाचे लेखन पुरस्कारणाऱ्या तॅन यांच्या सिद्धान्तामुळे वाङ्मय ही यादृच्छिक घटना नाही, वाङ्मयाच्या आकलन-आस्वादन-मूल्यमापनासाठी लेखकचरित्र पुरेसे नाही, या गोष्टी ध्यानात आल्या त्याचबरोबर वाङ्मयाची सामाजिक, सांस्कृतिक व प्रदेशजन्य मीमांसा करण्यासाठी आधारभूमी मिळाली. तथापि या सिद्धान्ताची मर्यादा म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष वाङ्मयापेक्षा वाङ्मयनिर्मितीमागील कारणांनाच जास्त महत्त्व दिल्यासारखे झाले आहे. वाङ्मयाचा इतिहास मार्क्सवादी दृष्टी केंद्रस्थानी ठेवून लिहिला जावा, असे ⇨ ड्यर्डी ल्युकाक्स (१८८५–१९७१) यांनी व नंतरच्या इतर अनेक मार्क्सवादी टीकाकारांनी सूचित केले आहे. ल्यूकाक्स यांचे नोट्स ऑन द थिअरी ऑफ लिटररी हिस्टरी (१९१०) हे लेखन मार्क्सवादी वाङ्मयेतिहासविचाराचा आरंभबिंदू म्हणता येईल. सर्वच विचारक्षेत्रांत मार्क्सवादाचा प्रभाव असणाऱ्या चालू शतकामध्ये वाङ्मयाचा समग्रलक्ष्यी इतिहास फक्त मार्क्सवादी दृष्टीने लिहिता येतो, असे आग्रहाने पुरस्कारले गेले आणि त्या दृष्टीने अधिकाधिक दिग्दर्शनही केले गेले. उदाहरण म्हणून जॉन फ्रो यांच्या मार्क्सिझम ॲड लिटररी हिस्टरी (१९८६) या ग्रंथाचा निर्देश करता येईल. मात्र एवढा ऊहापोह होऊनही जगातील कोणत्याही भाषेतील वाङ्मयाचा असा समग्रलक्ष्यी वाङ्मयेतिहास लिहिला गेलेला नाही. मार्क्सवादी वाङ्मयेतिहासपद्धतीचा एक त्रोटक नमुना म्हणून ल्युकाक्स यांच्या द हिस्टॉरिकल नॉव्हेल (१९६२, हॅन व स्टॅन्ली मिचेलकृत इं. भा. १९६२) या ग्रंथाकडे तेवढा अंगुलिनिर्देश करता येतो. वाङ्मयेतिहासाचे लेखन समाजशास्त्रीय साहित्यविचाराच्या अंगाने केले जावे, असेही सूचित केले गेले आहे. या पद्धतीत समाज-संघटना आणि वाङ्मयनिर्मिती यांच्या नात्याचा विचार केंद्रस्थानी ठेवलेला असतो आणि या दोहोंचा परस्परपरिणाम जोखण्याचा येथे हेतू असतो. परंतु या प्रक्रियेत वाङ्मयाचा वापर एक साधन (टूल) म्हणून केला जाण्याचा आणि परिणामी वाङ्मयेतिहासाला समाजेतिहासाचेच स्वरूप येण्याचा धोका संभवतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीच्या राष्ट्रवाद या संकल्पनेचा अपरिहार्य परिणाम म्हणून की काय, काझाम्यां (१८७७–१९६५) प्रभृतींनी वाङ्मयेतिहासाकडे राष्ट्राचे स्पंदन म्हणून पाहण्याची उपपत्ती मांडू पाहिली. परंतु ती अल्पकाळ लक्ष वेधून घेऊन अस्तंगत झाली. आर्. एस्. क्रेन (१८८६–१९६७) यांनी वाङ्मय हेच केंद्रस्थान मानून वाङ्मयतिहास कसा लिहिता येईल, यासंबंधाने आपली उपपत्ती क्रिटिकल अँड हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स ऑफ लिटररी हिस्टरी (१९६७) या आपल्या ग्रंथात मांडली आहे. त्यात क्रेन यांनी वाङ्मयाचा इतिहास म्हणजे वाङ्मयीन रूपबंधांच्या स्वायत्त विकासाचा इतिहास अशी भूमिका घेतली आहे. वाङ्मयनिर्मिती करताना लेखकाची रूपे (फॉर्म), द्रव्य (मटेरियल) आणि तंत्र (टेक्निक) या तीन घटकांशी आंतरक्रिया होत असते या तीन घटकांना आपापल्या परंपरा असतात आणि वाङ्मयनिर्मिती ही सजीव, सर्जनशील असल्याने निर्मितिप्रक्रियेत लेखक या तीन घटकांच्या संदर्भात आपल्या आंतरिक गरजेनुसार नवता घडवून आणतो. या प्रक्रियेत साहित्याच्या एकूण व्यवस्थेत जे रूपलक्ष्यी स्थित्यंतर घडते, त्याचाच तेवढा इतिहास संभवतो, असा क्रेन यांचा विचारव्यूह आहे. अशा रितीने वाङ्मयेतिहास म्हणजे वाङ्मयीन रूप, द्रव्य व तंत्र यांमध्ये होणाऱ्या परिवर्तनांचा आलेख, अशी स्वायत्ततावादी भूमिका क्रेन घेतात. परंतू ही भूमिका वरकरणी स्वायत्ततावादी भासली, तरी मुळात तशी नाही. कारण स्थित्यंतराच्या मूल्यमापनासाठी क्रेन दोन किंवा अधिक कलाकृतींमधील अनुबंध लक्षात घेतातच. शिवाय ते रूपादींची का होईना परंपराही पाहतात. त्यामुळे क्रेन यांची वाङ्मयेतिहासविषयक उपपत्ती पूर्णपणे रूपवादी आहे, असे म्हणता येत नाही. यानंतर वाङ्मयेतिहासाच्या संकल्पनेत महत्त्वाची भर घालणारी व्यक्ती म्हणजे हॅन्स रॉबर्ट जॉस. त्यांनी ‘लिटररी हिस्टरी ॲज अ चॅलेंज टू लिटररी थिअरी’(१९७०) या आपल्या दीर्घ निबंधात (टोवर्ड्स ॲन एस्थेटिक्स ऑफ रिसेप्शन, १९८२ या जॉसच्याच ग्रंथात अंतर्भूत) यथोचित स्वरूपाचा वाङ्मयेतिहास लिहिण्यासाठी सात सूत्रे सांगितली आहेत. त्यात त्यांनी वाचकाच्या वाङ्मयीन प्रतिसादाला (लिटररी रिसेप्शनला) वाङ्मयीन निर्मितीच्या (लिटररी प्रॉडक्शनच्या) संदर्भात अग्रमान दिला जावा, हे महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. विशिष्ट कालखंडाच्या संदर्भचौकटीबरोबरच वाचकप्रतिसादाच्या संदर्भचौकटीचा कालिक तत्त्वानुसार असा इतिहास लिहिला जावा, अशा स्वरूपाची योजना जॉस सुचविताना दिसतात. अर्थात वाचक-प्रतिसादाची सामग्री कशी प्राप्त करून घ्यावयाची, त्याचे मोजमाप कसे करावयाचे आणि त्याची ऐतिहासिक अनुबंधात्मक मांडणी कशी करावयाची, हे प्रश्न येथे उद्भवतातच. तथापि जॉस यांनी आपली उपपत्ती इतकी आखीव-रेखीव मांडली आहे, की आज तरी यूरोपिय वाङ्मय-क्षेत्रात ती चर्चाविषय झालेली आहे. पूर्वकालीन जॉर्ज सेंट्सबरी (१८४५–१९३३) प्रभृतींनी आणि अलीकडे बेट्सन, पाउल द मान, मॅन्फ्रेड नाऊमान इ. अनेक विचारवंतांनी आपापले विचारव्यूह मांडून वाङ्मयेतिहास-संकल्पना विकसित केलेली आहेच.
एका बाजूने वाङ्मयेतिहास-संकल्पना अशा रीतीने विकसित होत असतानाच तिच्या विरोधातही विचार मांडला जात होता. वाङ्मयेतिहास-सकंल्पनेविरुद्ध स्पष्ट भूमिका घेणाऱ्यांमध्ये ⇨ टी. एस्. एलियट (१८८८–१९६५) व डब्ल्यू. पी. केर (१८५५–१९२३) हे दोघे प्रमुख आहेत. हे दोघेही वाङ्मयेतिहासाची संभवनीयताच नाकारतात. त्यांच्या या नकारात्मक भूमिकेमागे वाङ्मयाच्या स्वायत्ततेचे तत्त्व कार्यरत असल्याचे दिसते. एलियट हे होमरपासून अगदी अलीकडच्या अशा सर्व यूरोपीय वाङ्मयकृतींची एकत्रित अशी एक व्यवस्था (ऑर्डर) कल्पितात आणि सर्व कलाकृतींना एकसमयावच्छेदेकरून (सायमल्टेनियस) अस्तित्व आहे, असे म्हणतात. अर्थातच सर्व वाङ्मयकृती अशा रीतीने कालातीत किंवा अ-कालिक गणल्या गेल्याने त्यांचा इतिहास संभवत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या कल्पित व्यवस्थेत का होईना सुट्या सुट्या किंवा स्वायत्त वाङ्मयकृती एकत्र कशा येतात, या प्रश्नाचे उत्तर एलियट ‘परंपरा’ असे देतात. अशा रीतीने ते अर्थातच स्वायत्ततेचा अक्ष सोडताना दिसतात. एलियट यांच्या भूमिकेवरचा एक आक्षेप म्हणजे, ही भूमिका मांडताना त्यांनी फक्त काव्यनिर्मितीचाच विचार केला आहे आणि हा विचारही त्यांनी केवळ कलावंताच्या अंगाने केलेला आहे. कथा, कादबंरी इ. स्वरूपाचे गद्य निवेदनात्मक साहित्य आणि वाचक-प्रतिसाद एलियट यांच्या या उपपत्तीत ध्यानात घेतले गेले नाहीत. गद्य निवेदनप्रधान वाङ्मयकृती या त्यांच्यातील घटनाप्रधानतेमुळे देशकालपरिस्थितीशी अनुबंध राखून असतात. त्यामुळे एलियट मानतात तशी एकसंध, अ-कालीक व्यवस्था अशा वाङ्मयासंबंधाने कल्पिता येईल की नाही याबाबत शंका उरते. एलियट यांच्या भूमिकेच्या या मर्यादा लक्षणीय होत. वाङ्मय हे सतत विद्यमान आणि शाश्वत असल्याने त्याच्या इतिहासलेखनाची गरजच नाही, असे डब्ल्यू. पी. केर म्हणतात. वाङ्मयकृती मृत नसल्याने किंवा ती सदैव आस्वाद्य असल्याने तिला भूतकालिकता नसते. इतर मानवी कृतींच्या तुलनेत वाङ्मयीन कृती ही अशी वेगळी ठरते. त्यामुळे इतर मानवी कृती ह्या ‘ऐतिहासिक घटित’ ठरतात पण वाङ्मयकृती मानवनिर्मित असूनही ‘ऐतिहासिक’ ठरत नाही, असा हा विचारव्यूह आहे. पण हा विचारव्यूह म्हणजे अर्धसत्य होय. पूर्वकालात निर्माण झालेली वाङ्मयकृती आजही चैतन्यमय, आस्वाद्य वगैरे असते हे खरे पण भूतकाळातील ज्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वातावरणात ती निर्माण झालेली असते, त्यांचे प्रभाव-परिणाम तिच्यात स्थित असतात हेही खरे आहे. म्हणूनच वाङ्मयकृतीलाही भूतकालिकता असतेच. वाङ्मयेतिहास-संकल्पनेची चर्चाचिकित्सा परिणत अवस्थेला पोहोचण्याच्या आजच्या काळात एलियट, केर आदींच्या भूमिकांचा आग्रह धरला जात नाही, हे मुद्दाम सांगायला नकोच.
वाङ्मयेतिहासलेखनाचे काही प्रकार पडताना दिसतात. हे प्रकार वाङ्मयेतिहासकारांवरून तसेच वाङ्मयेतिहासलेखनावरून पडतात. सर्वप्रथम एका लेखकाने लिहिलेला वाङ्मयेतिहास आणि अनेक लेखकांनी मिळून लिहिलेला वाङ्मयेतिहास असे दोन प्रकार वाङ्मयेतिहासकारांवरून पडलेले दिसतात. वाङ्मयेतिहासलेखनाची व्यापकता लक्षात घेता आणि एका व्यक्तीची साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत अवगाहन करण्याची शक्यता क्वचितच असते, हे अनुभवसूत्र लक्षात घेता एका लेखकाने वाङ्मयेतिहासलेखन करण्यात अनेक मर्यादा येणार, हे ध्यानात येते. याउलट अनेक लेखक मिळून जेव्हा वाङ्मयेतिहास लिहू इच्छितात, तेव्हा त्यांच्या दृष्टिकोणांत समानता कशी येणार? व्यक्तिगत क्षमतेतील फरकामुळे स्वीकृत समान सूत्रे ते कोठवर सांभाळू शकणार? लेखनशैलीतील विषमता कशी टाळणार? सर्वांचे लेखन एकत्र संपादून कसे घेणार? इ. प्रश्न उभे राहतात. अशा रीतीने एकलेखकी वाङ्मयेतिहास आणि अनेकलेखकी वाङ्मयेतिहास या दोन्ही प्रकारांमध्ये अडचणी ह्या आहेतच. तरीही वाङ्मयाची आणि वाङ्मयीन मूल्यमापनाची व्यामिश्रता लक्षात घेता आजच्या युगाचा कल अनेकलेखकी वाङ्मयेतिहास या प्रकाराकडेच आहे, असे दिसते.
वाङ्मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात. वाङ्मयीन परंपराशोधनाचे किमान सूत्रही अशा वाङ्मयेतिहासामध्ये बाळगलेले नसते. वाङ्मयेतिहासकाराने आपली बहुतेक शक्ती सामग्रीचे संशोधन-संपादन आणि तिची कालनिश्चिती यांमध्येच खर्च केलेली असते. बहुतेक भाषांतील आरंभकालीन वाङ्मयेतिहास या प्रकारात मोडतात. (२) यापुढील पायरी म्हणजे लेखक व त्यांच्या वाङ्मयकृती यांचा आणि वाङ्मयीन/सामाजिक घडामोडींचा काहीएक अनुबंध शोधण्याचा प्रयत्न असणारा वाङ्मयेतिहास. अशा अनुबंधशोधातही निश्चित दृष्टिकोण किंवा गृहीतके आणि त्यांच्या आधारे करावयाची चिकित्सा किंवा मूल्यमापन यांची अनुपस्थितीच असते. सामान्यतः विद्यापीठीय अभ्यासक्रमांना धरून लिहिलेले इतिहास या स्वरूपाचे असतात. अनेक लेखकांनी एका संपादकाच्या आधिपत्याखाली येऊन लिहिलेले वाङ्मयेतिहास याच प्रकारात मोडतात. अशा वाङ्मयेतिहासांना अनुबंधलक्ष्यी वाङ्मयेतिहास किंवा तार्किक प्रत्यक्षार्थवादी (पॉझिटिव्हिस्ट) वाङ्मयेतिहास असे संबोधिले जाते. (३) वाङ्मयमूल्य हेच एक मूल्य केंद्रस्थानी ठेवून लिहावयाच्या वाङ्मयेतिहासाला कलालक्ष्यी किंवा सौंदर्यलक्ष्यी वाङ्मयेतिहास (एस्थेटिक लिटररी हिस्टरी) म्हणतात. अगोदर निर्देशित केलेल्या आर्. एस्. क्रेन यांची भूमिका अशा इतिहासामागे आहे. (४) वाङ्मयाच्या निर्मितीला प्रत्यक्षाप्रत्यक्ष कारणीभूत होणाऱ्या समग्र सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय-आर्थिक इ. प्रेरणा-परंपरा-परिस्थितींचा विचार करून आणि एकूण समाजात उपलब्ध असणारी ‘व्यवस्था’ यांचा आणि वाङ्मयनिर्मितीचा मेळ घालून लिहिलेल्या वाङ्मयेतिहासाला समग्रलक्ष्यी (ऑर्गॅनिक) वाङ्मयेतिहास म्हणतात. सामान्यतः मार्क्सवादी व समाजवादी विचारसरणींचे विद्वान या प्रकारच्या वाङ्मयेतिहासलेखनाचा आग्रह धरताना दिसतात.
वाङ्मयेतिहासाचे स्वरूप आपण वाङ्मय या संज्ञेची कोणती व्याप्ती स्वीकारू यावर अवलंबून असते.त्यामुळेच वाङ्मयेतिहासाच्या संदर्भात सर्वप्रथम ‘वाङ्मय’म्हणजे फक्त ललित वाङ्मय की ललित, तात्त्विक, वैचारिक, वैज्ञानिक, माहितीपर इ. सर्व प्रकारचे वाङ्मय हा प्रश्न उद्भवतो. वाङ्मयेतिहास हा काही विचारांचा इतिहास किंवा समाजोपयोगी ज्ञानव्यूहांचा इतिहास नव्हे, असा मुद्दा उपस्थित करून वैचारिक इ. वाङ्मय दूर ठेवले जाते आणि फक्त ललित वाङ्मय एवढीच वाङ्मयेतिहासाची आधारभूमी असावी, असे प्रतिपादिले जाते. मात्र तात्त्विक-वैचारिक वाङ्मयाचा वाङ्मयनिर्मितीवर प्रत्यक्ष परिणाम होतो, त्यामुळे त्याचा विचार पार्श्वभूमी म्हणून का होईना खुद्द वाङ्मयेतिहासमध्ये अवश्य केला जावा, एवढी तडजोड स्वीकारली जाताना दिसते.
वाङ्मयेतिहासाचे लेखन– (१) वाङ्मयप्रकारांनुसार, (२) लेखकांनुसार करता येते किंवा ते (३) वृत्तिप्रवृत्तींनुसार करता येते. कविता, कथा, कादंबरी इ. वाङ्मयप्रकारानुरूप वाङ्मयेतिहासलेखन करण्यातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे सर्व वाङ्मयप्रकारांचा विकास एकसमयावच्छेदेकरून होत नाही. त्यामुळे स्वीकृत कालसीमांची ओढाताण होत राहते. आणखी अडचण म्हणजे अशा वाङ्मयेतिहासात एकाच वेळी अनेक वाङ्मयप्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकाच्या एकूण वाङ्मयीन योगदानाचे यथार्थ मूल्यमापन होत नाही. त्यामुळेच वाङ्मयेतिहासाचे वाङ्मयप्रकारनिष्ठ लेखन न करता लेखकनिष्ठ लेखन करावे असा एक पक्ष आहे. परंतु तेथे उलट प्रकारची म्हणजे वाङ्मयप्रकारांचा विकास जोखता न येण्याची अडचण येते. पण लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहासलेखनातील आणखी वेगळी अडचण म्हणजे लेखकांचे आयुष्यकाल (आणि प्रत्यक्ष लेखनक्षम असण्याचे कालावधी) क्रमाने एका पाठोपाठ एक याप्रमाणेच सदैव येतील असे नाही. परिणामी त्यांचा ऐतिहासिक क्रम लावणे आणि त्यांचे एकमेकांवरील/पुढीलांवरील प्रभाव-परिणाम तपासणे अडचणीचे होते. वाङ्मयप्रकारनिष्ठ व लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहासांपेक्षा वृत्तिप्रवृत्तींना केंद्रस्थानी ठेवून वाङ्मयेतिहास लिहिण्यात कमी अडचणी दिसतात. कारण वाङ्मयाच्या प्रवाहातील मुख्य धारा (मेन स्ट्रीम) येथे महत्त्व धारण करते. या मुख्य धारेच्या विचारात आणि तिला पूरक, समांतर आणि/किंवा विरोधी असणाऱ्या धारांच्या विचारात लेखक, वाङ्मयप्रकार, वाङ्मयीन घटिते (उदा., नियतकालिके, चळवळी, वाङ्मयीन वादविवाद, पारितोषिके इत्यादी) या सर्वांचीच व्यवस्था लावता येते. अशा वाङ्मयेतिहासात वाङ्मयकृतींच्या पार्श्वभागी असणाऱ्या सांस्कृतिक, राजकीय इ. सूत्रांनाही गुंफून घेता येते.
एका विशिष्ट भाषेतील वाङ्मयाचा आरंभापासून विद्यमान स्थितीपर्यंतचा (किंवा वाङ्मयपरंपरा खंडित होइपर्यंतचा) सलग इतिहास लिहिता येतो. अशा वाङ्मयेतिहासाला समग्र वाङ्मयेतिहास किंवा बृहद्वाङ्मयेतिहास असे म्हणता येईल. परंतु वाङ्मयीन आंतरिक कारणांमुळे किंवा अन्य उद्देशांमुळे त्या भाषेतील कोणत्याही एका विशिष्ट कालखंडातील वाङ्मयाचा इतिहास लिहिला जातो. अशा वाङ्मयेतिहासाला कालखंडलक्ष्यी वाङ्मयेतिहास म्हणता येईल. [उदा., ह. श्री. शेणोलीकरकृत प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप (१९५६, ६ वी आवृ. १९८७) किंवा वंदना अकोलकरकृत मराठी कवितेचा उषःकाल (१९७८) हे मराठीतील वाङ्मयेतिहास–ग्रंथ]. एका वाङ्मयप्रकाराचा आरंभापासून अद्ययावत असा किंवा एखाद्या विशिष्ट कालखंडाचा असा वाङ्मयेतिहास लिहिला जातो [उदा., कुसूमावती देशपांडेकृत मराठी कादंबरी : पहिले शतक (भाग एक–१९५३, भाग दोन–१९५४ दुसरी आवृ. १९७५)]. अशा प्रकाराला वाङ्मयप्रकारलक्ष्यी वाङ्मयेतिहास म्हणता येते. यातही पुन्हा कालखंडनिष्ठ, वाङ्मयप्रकारलक्ष्यी, वृत्तिप्रवृत्तींनुसार अशा तीनही प्रकारांचा संकर असू शकतो. उदाहरणादाखल १८५७ ते १९५० या कालखंडातील मराठी कादंबरीतील स्त्रीचित्रणाच्या बदलत्या रूपांचा वाङ्मयेतिहास कसा लिहिता येईल, याचे डॉ. अंजली सोमण यांनी ‘मराठी कादंबरीतील स्त्री : एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप’ (दत्तात्रय पुंडे संपादित वाङ्मयेतिहासाची संकल्पना, १९८६ पु. १२५–१५५) या लेखात केलेले दिग्दर्शन पाहता येईल. वाङ्मयेतिहासलेखनाचा आणखीही एक उपप्रकार आढळतो. तो म्हणजे एकूण वाङ्मयीन भूगोलापैकी (लिटररी जिऑग्रफी) विशिष्ट सीमित प्रवेश निवडून फक्त त्यातील वाङ्मयाचा तेवढा इतिहास लिहावयाचा [उदा., कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांचे मध्यभारतीय मराठी वाङ्मय (१८६१–१९३६)–प्रकाशन वर्ष : १९३९ किंवा चिंतामण नीलकंठ जोशी यांचे मराठवाड्यातील अर्वाचीन मराठी वाङ्मय, पद्य विभाग ( सन १८३८ ते सन १९३८) –प्रकाशन वर्ष : १९३९].
वाङ्मयेतिहासासाठी लागणाऱ्या सामग्रीचा उल्लेख प्रारंभी आलेला आहे. त्या सामग्रीचे संशोधन, संपादन, परिशीलन केलेले असणे ही वाङ्मयेतिहासलेखनाची पूर्वअट आहे. उपलब्ध सामग्रीच्या पसाऱ्यातून सामग्रीची निवड करणे ही जबाबदारी वाङ्मयेतिहासकारावर असते. केवळ सामग्रीची जुळवाजुळव आणि तिचे गणन-वर्गीकरण एवढ्याने वाङ्मयेतिहासकाराचे आव्हान संपुष्टात येत नसते. या प्राथमिक पायऱ्या पूर्ण झाल्यावर पूर्वनिश्चित केलेल्या एखाद्या सूत्राच्या आधारे किंवा पूर्वस्वीकृत दृष्टिकोणातून सामग्रीची निवड करणे आणि तिची संगति-विसंगती तपासून व्यवस्था लावणे हे वाङ्मयेतिहासकारासमोरील खरे आव्हान असते. अन्यथा त्याचा वाङ्मयेतिहास हा सामग्रीच्या पडताळ्यापाशीच (कोलेशन ऑफ फॅक्ट्सपाशीच) थांबेल. यासाठीच वाङ्मयेतिहासकाराकडे स्वतःचा असा पूर्वनिश्चित दृष्टिकोण असणे आवश्यक असते. वाङ्मयेतिहासकार कोणता विशिष्ट दृष्टिकोण स्वीकारतो? तो कसा ठरतो? तो वाङ्मयीन असतो, अर्धवाङ्मयीन असतो, की अ-वाङ्मयीन असतो? –असे विविध प्रश्न वाङ्मयेतिहासकाराने स्वीकारावयाच्या दृष्टिकोणासंबंधाने निर्माण होतात. स्वतः वाङ्मयेतिहासकाराच्या आणि तो ज्या समाजासाठी वाङ्मयेतिहास लिहिणार असतो त्या समाजाच्या आंतरिक आणि वास्तविक गरजा असा दृष्टिकोण निश्चित करतात. स्वकालीन उपलब्ध ज्ञान, सामाजिक/वाङ्मयीन परिस्थिती आणि मूल्यविचार यांच्या आधारे वाङ्मयेतिहासकार आपला दृष्टिकोण निश्चित करू शकतो. आजच्या व्यामिश्र जीवनपद्धतीत समाजाच्या वाङ्मयासंबंधाने विविध धारणा आहेत आणि अपेक्षाही आहेत. त्याही असा दृष्टिकोण निश्चित होताना कार्यरत असतात. वाङ्मयेतिहासकाराने स्वीकारलेला दृष्टिकोण कोणताही असो, त्याचे ध्येय मात्र समग्रलक्ष्यी वाङ्मयेतिहासलेखनाचे असावे. कारण समग्रलक्ष्यी ध्येय ठेवले तरच एकूण वाङ्मयव्यूहासंबंधाने तो ऐतिहासिक निदान करू शकेल.
वाङ्मयाचा प्रवाह सलग असला, तरी वाङ्मयेतिहासलेखनासाठी त्याचे कालखंड कल्पावे/पाडावे लागतात. राजकीय-सामाजिक इतिहासांच्या प्रभावामुळे बहुतांश आरंभकालीन वाङ्मयेतिहासांमध्ये राजकीय-सामाजिक स्थित्यंतरांनाच अनुलक्षून कालखंड कल्पिले गेले एवढेच नव्हे तर त्यांना तशी नावेही दिली गेली. उदा., ‘व्हिक्टोरियन एज’ किंवा ‘यादवकालीन मराठी वाङ्मय’ इत्यादी. राजकीय-सामाजिक स्थित्यंतरे अनेकदा वाङ्मयेनिर्मितीवर, वाङ्मयप्रवाहांवर परिणाम करतात हे खरे पण ती स्थित्यंतरे आणि वाङ्मयीन स्थित्यंतरे ही समांतर असतातच असे नाही. लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहासात प्रभाव गाजवणाऱ्या लेखकांनुसार कालखंड कल्पिले जातात आणि त्यांना तशीच नावे दिली जातात. उदा., ‘शेक्सपीरियन एज’, ‘चिपळूणकर पर्व’ इत्यादी. मुळात लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहास हा प्रकार बाद करण्याच्या योग्यतेचा आहे, हे पूर्वी आलेले आहेच. शिवाय एका किंवा दोन लेखकांचा प्रभाव समग्र वाङ्मयावर असण्याची संभवनीयताही कमीच. त्यामुळे राजकीय-सामाजिक स्थित्यंतरांनुसार किंवा महत्त्वाच्या लेखकानुसार कालखंड कल्पिणे रास्त नव्हे. वाङ्मयेतिहासाचे लक्ष वाङ्मयीन स्थित्यंतराकडे असल्याने वाङ्मयेतिहासकाराने आपले कालखंड महत्त्वपूर्ण वाङ्मयीन परिवर्तनांच्या टप्प्यांवर मानणे रास्त ठरेल. त्यांचे नामकरणही अर्थात तसेच करायला हवे. परंपरा व नवता यांचा संघर्ष वाढत वाढत विकोपाला जातो आणि पंरपरा क्षीण होऊन नवता तिची जागा घेते आणि वाङ्मयीन परिवर्तन दृग्गोचर होते. हे परिवर्तन वाङ्मयनिर्मिती, त्याची रचना, आशय, शैली, वाङ्मयप्रकार इ. अनेक घटकांमध्ये स्पष्टपणे दिसून येते आणि मग अशा वेळी वाङ्मयीन टीकाही अपरिहार्यपणे आपला व्यूह व दृष्टी बदलते. अशा रीतीने एकूण वाङ्मयप्रवाहालाच ढळ पोहोचतो व स्थित्यंतर अवतरते. अशा तीन टप्प्यावर कालखंड कल्पिता येतात.
स्थित्यंतराच्या किंवा परिवर्तनाच्या या मुद्यालाच जोडून इतिहासातील प्रगती (प्रोग्रेस) आणि उत्क्रांती (इव्होल्यूशन) या तत्त्वांचा वाङ्मयेतिहासाच्या संदर्भात असणारा विशिष्ट अर्थ स्पष्ट करता येईल. भौतिक प्रगती ही भौतिक ज्ञानाच्या प्रगतीवर आधारलेली असल्याने तिचा उन्नत आलेख स्पष्ट दिसतो. वाङ्मयामध्ये कालच्या वाङ्मयापेक्षा आजचे वाङ्मय जास्त चांगले, अधिक श्रेष्ठ इ. प्रकारचे सरळ उन्नत आलेख संभवत नाहीत. काही वाङ्मयीन परंपरा कालौघात अस्तंगत होताना दिसतात व त्यांची जागा नव्या परंपरांनी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे वाङ्मयीन प्रगतीचे सरळ एकदिक् चित्र संभवत नाही. वाङ्मयीन प्रगतीचे एकमात्र मोजमाप म्हणजे समाजाची संवेदनशीलता हे होय. लेखक, रसिक व एकूण समाज यांची संवेदनशीलता एवढ्याच संदर्भ वाङ्मयीन प्रगतीचा कदाचित आलेख काढता येईल. डार्विनचा उत्क्रांतिवादाचा नियमही वाङ्मयास तंतोतंत लागू पडत नाही, हे वाङ्मयप्रकारांच्या विकास-ऱ्हासांकडे पाहिले की कळते. वाङ्मयेतिहास हा इतर प्रकारच्या इतिहासांपासून याही कारणाकरिता वेगळा ठरतो.
वाङ्मयेतिहासकाराने समग्र वाङ्मयाचे अवलोकन करावे, या अपेक्षेतून वाङ्मयीन भूगोल (लिटररी जिऑग्राफी) ही कल्पना पुढे आली आहे. सामान्यतः प्रत्येक भाषेत, प्रत्येक कालखंडात वाङ्मयनिर्मितीची दोनचार केंद्रे प्रभावी असतात. त्यामुळे त्या केंद्राभोवतीच्या वाङ्मयाचा इतिहास तेवढा लिहिला जातो व अन्य केंद्रातील वाङ्मय दुर्लक्षिले जाते. वाङ्मयीन भूगोलाची कल्पना राबवण्याने ही अव्याप्ती टळेल.
वाङ्मयेतिहासकाराने समग्र वाङ्मयाचे अवलोकन करावे अशी जरी अपेक्षा असली, तरी सर्व वाङ्मयकृतींना व सर्व लेखकांना वाङ्मयेतिहासामध्ये स्थान देणे शक्यही नसते व रास्तही नसते. वाङ्मयेतिहासकाराने भरड वाङ्मयकृतींची दखल घ्यायची नसते पण लोकप्रिय साहित्य हे वाङ्मयीन मूल्य असणारे साहित्य व भरड साहित्य यांना सीमावर्ती असते, त्यामुळे लोकप्रिय वाङ्मयाची दखल निदान प्रवाहाच्या अंगाने का होईना वाङ्मयेतिहासकाराने घेणे इष्ट ठरते. त्यामुळे वाङ्मयीन चलनवलनाचे समग्र चित्र उभे करू शकतो.
वाङ्मय ही एकाकी घटना नाही. वाङ्मयाला समग्र सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इत्यादींची पार्श्वभूमी असते. या सर्व घटकांचे यथायोग्य व कालसंगत आकलन करून घेता यावे म्हणून कालपटाची कल्पना पुढे आली आहे. वाङ्मयीन घटना ज्या काळी घडली त्या काळी सांस्कृतिक, सामाजिक इ. अन्य क्षेत्रांत कोणकोणत्या घटना घडल्या यांचा सनवार तक्ता म्हणजे कालपट. अशा कालपटाच्या अवलोकन-निरीक्षणातून वाङ्मयीन घटनांचे अन्य घटनांशी असणारे नाते उमगण्यात मदत होते. मराठीच्या संदर्भात असा कालपट तयार करून त्याच्या आधारे आपली निरीक्षणे नोंदविण्याचा पहिला प्रयत्न प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास (खंड सहावा, भाग पहिला, १९८८) या ग्रंथात केलेला आहे.
वाङ्मयासंबंधीचे नवे संशोधन प्रकाशात येत असते. वाङ्मयसिद्धान्तांची नवी मांडणी, पुनर्मांडणी होत असते. वाङ्मयीन टीकेचे नवनवीन व्यूह समोर येत असतात. तसेच वाङ्मयाकडे पाहण्याचे समाजाचे दृष्टिकोणही बदलत असतात. या सर्व गोष्टींमुळे वाङ्मयेतिहासाचे सातत्याने पुनर्लेखन होण्याची गरज असते.
वाङ्मयेतिहास कोणासाठी,म्हणजे वाङ्मयेतिहासाचा वाचक कोण, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आजवर सगळीकडे सामान्यतः विद्यापीठीय विद्यार्थी आणि वाङ्मयाचे अभ्यासक एवढेच काय ते वाङ्मयेतिहासाचे वाचक अशी स्थिती होती. त्यामुळे बहुतेक भाषांतील वाङ्मयेतिहासलेखन हे विद्यापीठीय किंवा अभ्यासविषयक गरज भागवणारे म्हणूनच झाले आहे. परंतु वाङ्मय हे समाजातील सर्वांसाठी असल्याने वाङ्मयेतिहासही अशा सर्वांसाठी, निदान जिज्ञासू सामान्य वाचकांसाठी, सिद्ध व्हायला हवा. कारण वाङ्मयकृतीच्या यथार्थ आस्वादासाठी/आकलनासाठी एकूण वाङ्मयीन परंपरा माहिती असणे आवश्यक असते. परभाषक मंडळींच्या जिज्ञासापूर्तीसाठी अन्य भाषांतून वाङ्मयेतिहास लिहिले जाण्याची गरजही आज निर्माण झालेली आहे. परभाषकांसाठी लिहिलेल्या वाङ्मयेतिहासाचे स्वरूप अर्थातच वेगळे, सामान्यतः जिज्ञासापूर्तीपुरते म्हणजे परिचयप्रधान, वर्णनात्मक असे राहील, हे उघडच आहे. वाङ्मयेतिहासाचा वाचक अशा निरनिराळ्या अपेक्षा ठेवणारा असल्याने एकाच वेळी एकाच भाषेतील वाङ्मयाचे विविध प्रकारचे वाङ्मयेतिहास लिहिले जाणे आवश्यक ठरते.
बहुभाषिक राष्ट्रामध्ये आणखीही एका वेगळ्या प्रकारच्या वाङ्मयेतिहासाची आवश्यकता असते. अशा राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील वाङ्मय आपापल्या देशी संवेदना (नेटिव्हिस्टिक सेन्सिबिलिटी) जपून असते. पण त्याच वेळी ते राष्ट्रीय एकात्म संवेदनशीही इमान राखून असते. त्यामुळे अशा सर्व वाङ्मयांचा राष्ट्रीय पातळीवरील एकात्म इतिहास लिहिण्याची गरज असते. त्यामुळे बहुभाषिक राष्ट्रात त्या राष्ट्रांतील सर्व भाषांतील वाङ्मयांचा एकत्रित, सर्वसमावेशक आणि सर्वसमन्वयक असा तौलनिक वाङ्मयेतिहास लिहिला जाणे आवश्यक असते. उदा., भारतीय वाङ्मयेतिहासकारांसमोर असा वाङ्मयेतिहास सिद्ध करण्याची जबाबदारी उभी आहे. इतर बहुभाषिक राष्ट्रे आणि भारत यांमध्ये पुन्हा एक भेद आहे. तो म्हणजे भारतामध्ये एकाच वेळी आर्य भाषाकुल आणि द्रविड भाषाकुल या जगातल्या दोन मोठ्या भाषाकुलांतील अनेक भाषा आपापल्या दीर्घ वाङ्मयीन परंपरांसह नांदत आहेत. त्यांचा मेळ कसा घालायचा? सर्वांना समान ठरेल अशी पूर्वकालीन कोणती वाङ्मयपरंपरा स्वीकारायची? विविध प्रांतांतील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन वाङ्मयांच्या विकासरेषा असमांतर राहिल्याने एकत्रित वाङ्मयेतिहासलेखनामध्ये त्यांची कालसंगती कशी राखायची?–असे तात्त्विक प्रश्न तर उद्भवतातच पण सर्वांत मोठा व्यावहारिक प्रश्न म्हणजे सर्व भाषांतील वाङ्मयपंरपरा, वाङ्मयकृती, वाङ्मयीन वातावरण इ. माहितीची जुळवाजुळव कशी करायची, हा आहे. कारण भारतीय वाङ्मयेतिहास लिहिणाऱ्या लेखकाला किंवा लेखकगटाला सर्वच्या सर्व भारतीय भाषांमध्ये गती नसणार आणि भाषांतर पद्धती वापरायची म्हटले तर एक तर ते वेगळे प्रचंड कार्य निर्माण होईल. शिवाय भाषांतरित कृतींच्या मूल्यमापनाला मर्यादा असतात.
भारतीय वाङ्मयेतिहास हीच एक स्वतंत्र अभ्यासशाखा मानून डॉ. सुजित मुखर्जी यांनी टोवर्ड्स अ लिटररी हिस्टरी ऑफ इंडिया (१९७५) आणि सम पोझिशन्स ऑफ अ लिटररी हिस्टरी ऑफ इंडिया (१९८१) असे दोन तात्त्विक ग्रंथच सिद्ध केलेले आहेत. हे ग्रंथ सिद्ध करून डॉ. मुखर्जी यांनी विशिष्ट परिस्थितीतील बहुभाषिक राष्ट्रातील वाङ्मयेतिहासलेखन कसे असावे, यासंबंधीच्या विचाराचे योगदान वाङ्मयेतिहास या अभ्यासशाखेला दिले आहे आणि एका रीतीने ती अभ्यासशाखा समृद्ध केली आहे.
मराठीतील वाङ्मयेतिहासविचाराला गेल्या शंभर एक वर्षांची परंपरा असूनही तो बव्हंशी स्फुट लेखांच्या स्वरूपात झाल्याने त्याचे असे स्वतंत्र शास्त्र निर्माण होऊ शकले नाही. भारतातील अतःएव मराठीतील आधुनिक इतिहासविचार हाच मुळात मेकॉलेप्रभृतींना उत्तर देण्याच्या ऊर्मीतून जन्म पावला. त्याचा आरंभकाळातील वाङ्मयेतिहासलेखन आणि वाङ्मयेतिहासविचार यांवर बरावाईट परिणाम झालेला दिसतो. मराठीतील वाङ्मयेतिहासविचाराचे तीन टप्पे दिसतात. पहिला टप्पा १९४५ पर्यंतचा ठरतो. त्यात वर निर्देशित केलेल्या ऊर्मीवर आधारित विचारमंथन येते. पण या कालखंडात महत्त्वाचे योगदान ⇨वि. का. राजवाडे (१८६४–१९२६) यांचेच ठरते. त्यांनी आपल्या ‘महाराष्ट्रातील प्राकृतिक भाषांचा व वाङ्मयाचा इतिहास’ (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित राजवाडे लेख संग्रह : पृ. ९६ ते १०९ ) या लेखात ‘सारस्वताचा ऊर्फ विदग्ध वाङ्मयाचा इतिहास हा वाङ्मयेतिहासाचा एक अंश आहे’, अशी भूमिका घेऊन ‘वाङ्मय’ या संज्ञेची व्याप्ती वाढविली आहे. ‘गणन, कार्यकारणसंबंध-दर्शन व वर्गीकरण ह्या दृष्टीने वाङ्मयाची स्थित्यंतरे सांगणे म्हणजे वाङ्मयाचा शास्त्रीय इतिहास रचणे’ इतकी ते वाङ्मयेतिहासाची प्रगत व्याख्या त्या काळात देतात. मराठी वाङ्मयेतिहासविचाराचा दुसरा टप्पा १९४५ ते १९६० असा मानता येतो. यांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने अंगीकृत केलेल्या वाङ्मयेतिहासयोजनेसंबंधीचा १९५२ ते ५४ या काळात झालेला वाद येतो. हा वाद ‘माटे-बेडेकर वाद’ या नावाने ओळखला जातो. या वादाचे फलित म्हणजे वाङ्मयेतिहासाच्या संकल्पनेसंबंधाने आणि मराठी वाङ्मयेतिहासाच्या मांडणीच्या संबंधाने मराठीमध्ये अनेक विद्वानांकडून भरपूर विचारमंथन झाले. अखेरीस ⇨ श्री. म. माटे (१८८६–१९५७) यांनी सिद्ध केलेली लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहासाची योजना सोडून सामाजिक स्थित्यंतराची पार्श्वभूमी स्वीकारणारी वेगळी योजना तज्ञांकरवी तयार करण्यात आली व या वादावर पडदा पडला. मराठीतील वाङ्मयेतिहासविचाराचा तिसरा टप्पा म्हणजे १९६० नंतरचा कालखंड. मराठवाडा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, इ. प्रादेशिक विद्यापीठांच्या स्थापनांमुळे मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाला चालना मिळाली आणि अध्यापनासंबंधानेच तात्त्विक व व्यावहारिक प्रश्न निर्माण झाले. त्यातून मुंबई विद्यापीठाने १९७१ मध्ये मुंबई व गोवा येथे आणि मराठवाडा विद्यापीठाने १९७२-७३ मध्ये औरंगाबाद येथे वाङ्मयेतिहासाच्या अध्यापनासंबंधाने चर्चासत्रे घेतली. त्यामुळे मराठीत वाङ्मयेतिहासाच्या विचाराला चालना मिळाली. प्रा. गो. म. कुलकर्णी, डॉ. व. दि. कुलकर्णी व डॉ. दत्तात्रय पुंडे या तिघांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी १९८१ मध्ये ‘वाङ्मयेतिहासाची संकल्पना’ या विषयावर आणि त्याचा पाठपुरावा करणारे १९८२ मध्ये ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची मांडणी’ या विषयावर अशी दोन चर्चासत्रे घेतली. वाङ्मयेतिहासाची संकल्पना हा संपादित ग्रंथ हे या चर्चासत्राचे फलित होय. मराठीत वाङ्मयेतिहासाची सशास्त्र चर्चाचिकित्सा होण्यास या ग्रंथाने चालना दिली आहे.
पहा : साहित्य साहित्यप्रकार साहित्यसमीक्षा.
संदर्भ : 1. Cohen, Ralph, Ed, New Directions in Literary History, London, 1974.
2. Crane, R. S. Critical and Historical Principles of Literary History, Chicago, 1967.
3. Mukherjee, Sujit, Some Positions on a Literary History of India, Mysore, 1981.
4. Mukherjee, Sujit, Towards a Literary History of India, Simla, 1975.
5. Taino, H. A. Trans. Van Laun, H. ‘Introduction’, History of English Literature (New Ed.), London, 1892.
६. कुलकर्णी व. दि. संपा. साहित्यचिंतन मुंबई, १९८३.
७. पुंडे दत्तात्रेय संपा., वाङ्मयेतिहासाची संकल्पना, पुणे, १९८६.
पुंडे, दत्तात्रय
“