वस्त्रकला : वस्त्रप्रावरण हे मानवाच्या आवश्यक गरजांचे अविभाज्य अंग आहे. तयार कपडे उद्योगाने तर आजच्या काळात भरीव प्रगती केलेली आहे. जाडेभरडे कपडे किंवा तलम कपडे वापरणे हा मानवाच्या नैसर्गिक आवडी-निवडीचा भाग बनला आहे. सांप्रत कापडाच्या लोकप्रिय प्रकारांपैकी बहुतांश कपडे एकरंगी, बहुरंगी, अलंकरणयुक्त असे विविध प्रकारचे असल्यामुळे माणसाला ते आकर्षून घेतात. रंगांच्या आकर्षणामुळे एकरंगी किंवा बहुरंगी कापडाची मानवाला अधिक भुरळ पडते. परिणामतः सुंदरता, आलंकारिक रचना आणि रंगसंगती या दृष्टींनी मानवाच्या वेशभूषेत विविधता आढळते.
कापडनिर्मिती आणि तिच्या इतिहासाशी मानवाचा घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेला दिसतो. त्याचे मूळ नवाश्मयुगापर्यंत पोहोचते. प्राचीन काळी मानव झाडांची वल्कले, प्राण्यांची कातडी इत्यादींचा ‘वस्त्र’ म्हणून वापर करीत असल्याचा उल्लेख निरनिराळ्या ग्रंथांत आढळतो. कालांतराने मानवी संस्कृती, राजकारण, धर्म यांच्या स्थित्यंतरामुळे कापडाच्या उपयोगावर आणि प्रसारावरही परिणाम झालेला दिसतो. आधुनिक काळात सुती, रेशमी, टेरिकॉट, टेरिलीन इ. विविध प्रकारच्या कापडांनी वस्त्रप्रावरणात आमूलाग्र क्रांती घडून आलेली आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे कापडनिर्मितीत दिवसेंदिवस बदल होत असून तीमध्ये विविधता व अद्ययावतता दिसून येत आहे.
विणलेले कापड म्हणजे वस्त्र, असे परंपरागत अर्थाने म्हटले जाते. टसर ह्या लॅटिन शब्दाचा ‘विणणे’, असा अर्थ होतो. सूत विणून त्यापासून मागावर कापड तयार करतात. विविध कापडांचा वस्त्रात अंतर्भाव केला जातो. विणकाम केलेले कापड, फेल्ट, जाळीदार कापड, जाळ्या इ. प्रकार त्यांत मोडतात. तंतू व सूत यांचा कापड तयार करण्यासाठी होत असलेल्या प्रक्रियेस ‘कापड उद्योग’ अशी संज्ञा दिली जाते.
कापडगिरण्यांतून निर्माण करण्यात येणाऱ्या विविध आकर्षक कापडात मुलायम सुती कापड, लोकरीचे कापड, नायलॉन, टेरिलीन, टेरिकॉट इत्यादींचा समावेश होतो. हे कापड-उत्पादन विविध रंगांत व मुबलक प्रमाणात केले जाते. कापड-उत्पादनाचा बहुतांश भाग तयार कपड्यांनी व्यापलेला आढळतो. उर्वरित भागाचे श्रेय वेशभूषा, ब्लँकेट, चादरी, टॉवेल इत्यादींच्या उत्पादनाकडे जाते.
कापडाचा विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी उपयोग होतो. यांत प्रामुख्याने विविध खेळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या जाळ्या, जहाजांची शिडे, ग्रंथवेष्टने, पताका, रोधक पट्ट्या, टपालवाहतुकीच्या पिशव्या, पॅराशूट, टंकलेखन यंत्रांच्या फिती, छत्र्या इत्यादींचा समावेश होतो. स्वयंचलित यंत्रांचे कारखानदार गालिचे, खुर्च्या, गाद्या यांचे पडदे यांसाठी, तर दवाखान्यांत बॅंडेजपट्ट्या, शल्यचिकित्सेसाठी लागणारा दोरा व चिकटपट्ट्या यांसाठी कापडाचा उपयोग करतात. प्राचीन काळी रेशमी कापडाचा क्वचितच वापर केला जाई. रेशमी कापडाऐवजी सुती कापडच त्याच्या ऐतिहासिक पुराव्याची ग्वाही देते. याउलट काही देशांत लोकरीच्या कापडनिर्मितीचा, त्यांच्या अर्थव्यवस्थांत मोठ्या प्रमाणावर समावेश झालेला दिसतो. कापड नाशवंत असल्याने, किंबहुना किड्यांनी ते नाशवंत होत असल्याने त्यांचे प्राचीन पुरावेदेखील इतिहासजमा झालेले आढळतात.
अश्मयुगीन संस्कृतीमधील लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास केल्यास वस्त्रकलेच्या विकासाची साक्ष पटते. ईजिप्त व पेरू यांच्यात अर्वाचीन संस्कृतींनी कापडतंतूंचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. ६,००० ते ७,००० वर्षांपूर्वीचे लिनन कापड ईजिप्तमध्ये सापडले असून इ. स. पू. पंधराव्या शतकातील चित्रजवनिकेचे नमुने मिळतात. भारतात सु. इ. स. पू. २००० वर्षांपासून अतिशय तलम जवळजवळ पारदर्शक सुती कापड विणले जात असे व ग्रीस देशापर्यंत निर्यात होत असे. ग्रीक लोक त्यास ‘नेब्युला व्हँतो’ म्हणजे ‘विणलेला वारा’ असे संबोधित. चीनमध्ये सु. ५०० वर्षांपूर्वी रेशीमकापड तयार होत असल्याचा अंदाज आहे.
रोमन साम्राज्याच्या काळात व हान साम्राज्याच्या काळात (इ. स. पू. २०० ते इ. स. २००) वस्त्रकलेचे काही नमुने उपलब्ध असले, तरी त्यात दोन शतकांत झपाट्याने प्रसार झालेल्या रेशीमउत्पादनाची बरीच आकडेवारी आढळते. सिरियामधील पामीर येथून आशियापलीकडे निघालेला रेशीममार्ग सायबीरियातील नॉइन उलापर्यंत पोहोचलेला आढळतो. इ. स. पू. पहिल्या शतकात रेशमी उत्पादनासाठी मागाचा महत्तम उपयोग होत असल्याचे तो दर्शवितो. रेशमाला हिऱ्यांसारखा दर्जा लाभल्याने ते पौर्वात्य देशांतून रोमन साम्राज्याच्या काळापासून आयात करण्यात येई. झां बातीस्त कॉलबेअर याच्या रेशीमउत्पादनाच्या विचारधारेला फ्रेंच अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान लाभले.
प्राचीन काळी जागतिक उत्पादनात ख्यातनाम झालेले कॉप्टिक कापड ईजिप्तमधील थडग्यांत आढळले आहे. ईजिप्तमधील ख्रिस्ती वस्त्रप्रकार ‘कॉप्टस’ नावाने ओळखला जाई. या देशातील काही कापडांचे नमुने हातमागावर विणलेले असून त्यांचे विणकाम सिरियामध्ये झाल्याचे विश्वसनीय रीत्या विशद करण्यात येते. पहिल्या ते सातव्या शतकांतील वस्त्रप्रकारांचे पूर्ण व खंडप्राय नमुने जगातील विविध संग्रहालयांत जतन केलेले आढळतात. जपानमधील नारा येथील शोसोईन संग्रहालयातील कापड आजच्या दर्जेदार कापडाशी तुल्यबळ ठरते. ह्या संग्रहालयात थांग काळातील (इ. स. ६१८-७६)विविध प्रकारांचे चिनी रेशमी कापड अंतर्भूत आहे. त्यानंतरच्या कापड-उत्पादनावर बायझंटिनकालीन रेशमी कापड-उत्पादनाचे प्रतीक म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या सॅसॅनिडी आकृतिबंधाचा प्रभाव आढळतो. आठव्या शतकातील बायझंटिन रेशमी कापडाचा दर्जा दहाव्या ते बाराव्या शतकांतील रेशमी कापडाच्या तुलनेत कमी प्रतीचा आढळतो. ह्याच काळात बगदाद तसेच सिरिया, इराण, ईजिप्त, स्पेन इ. देशांत ख्याती पावलेले इस्लामकालीन रेशमी कापडाचे उत्पादन झाले. अकराव्या शतकात सिसिली ताब्यात जाण्यापूर्वी ते इस्लाम काळातील रेशमी कापड-उत्पादनाचे प्रसिद्ध केंद्र होते. सु. २०० वर्षांपासून तेथे रेशीमकिड्यांची पैदास व त्यांपासून काढण्यात येणाऱ्या धाग्यापासून विणकाम होत असून त्या कापड उत्पादनास मुसलमान व बायझंटिन साम्राज्यांचा काळ विशेष अनुकूल ठरला. बाराव्या शतकातील सिसिलीमध्ये भरतकाम केलेले रेशमी कापड आजही जतन करून ठेवलेले आढळते. तेराव्या शतकातील मोगल राजांनी सु. ६०० वर्षांपासून मुसलमानी राजांच्या काळात ऱ्हास पावलेले रेशीमकापड-उत्पादन पुन्हा सुरू केले. चिनी रेशमी कापडावर प्रारंभी सारखा आकार नसलेले रोमनेस्क कलेतील प्राण्यांचे भडक आकृतिबंध काढण्यात आले. नंतर गॉथिक शैलीचा त्यांवर प्रभाव पडून अप्सरांच्या कथांमधील चित्रांना तो बहुमान प्राप्त झाला. म्हणूनच यूरोपीय देशांतील बाजारपेठांत चिनी कापड आकृतिबंधातील महत्तम स्थित्यंतर, दर्जा व गुणवत्ता यांमुळे विख्यात ठरले.
यूरोपियन वस्त्रकलेतील रंगीत चित्रे, धर्मोपदेशकांचे पोषाख, बदलते दर्शनी भाग तसेच चर्च इ. ख्रिस्ती धर्माचा प्रभाव दर्शवितात. मध्ययुगीन काळात इटली व स्पेन ही रेशमी कापडनिर्मितीची प्रमुख केंद्रे होती. पंधराव्या शतकातील वस्त्रांवर आकृतिबंध प्रामुख्याने डाळिंबी आकाराचे असून ईजिप्तमधील कमळाच्या कलाकृतींची ती प्रतिकृती आढळते. ह्याचा उगम चिनी व इराणी वस्त्रकलांतूनच झालेला आहे. मखमलीसारखे रेशमी कापड यासाठी वापरण्यात येते. उत्तर यूरोपमधील वस्त्रकलेत लोकरीवर चित्रजवनिका माध्यमाचा वापर करण्यात आला. तत्कालीन लिनन कापडाचे तुकडे आजही उपलब्ध आहेत. निळ्या सुती कापडावर गॉथिक आकृतिबंधाचा वापर केलेले टॉवेलदेखील प्रख्यात आहेत.
चीन आणि भारत यांमधून अनुक्रमे रेशमी व सुती कापड यांच्या आयातीमुळे २०० वर्षे खंडित झालेले यूरोपमधील कापड-उत्पादन पुन्हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. १६ व १७ ही दोन शतके म्हणजे इराणी कापड-उत्पादनाचे सुवर्णयुग मानली जातात. निम्ननप्रतीच्या पॉलिक्रोम रेशमापासून व मखमलीपासून गाठीचे सुबक रंग तयार होऊ लागले. मनुष्यांच्या व प्राण्यांच्या प्रतिकृती त्यांमधील आकृतिबंधांत चितारण्यात आल्या. एके काळी बर्सा येथील मखमल इराणी मखमलीच्या तुलनेत कमी प्रतीची असतानाही तिच्या उत्पादनास दर्जा प्राप्त होऊन ऑटोमन साम्राज्याने मखमल-उत्पादनात प्रगतीचा उच्चांक गाठला. सतराव्या शतकात हा कापड-उत्पादनाचा दर्जा ढासळला. ह्याच शतकातील यूरोपीय कापड-उत्पादन शृंगारवस्तूंच्या उत्पादनाप्रमाणे वृद्धिंगत होऊन त्यास गुणवत्ता व दर्जा प्राप्त झाला. सिसिली येथील मखमल-उत्पादनास सोळाव्या शतकात हा लाभ मिळून त्याने १०० वर्षांपूर्वीचा प्रगतीचा उच्चांक गाठला.
इटली हे सतराव्या शतकाच्या सुमारास रेशीमउत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले. यानंतर फ्रान्समधील रेशीमउत्पादनास उतरती कळा प्राप्त होऊन अन्य उत्पादनांचा उदय झाला. याचे श्रेय झां बातीस्त कॉलबेअर यास दिले जाते. बऱ्याच यूरोपीय देशांनी रेशमी कापडवापरावर बंदी आणली ‘एडिक्ट्स ऑफ नॅन्ट्स’ ही सनद रद्द केल्याने बहुसंख्य फ्रेंच प्रॉटेस्टंट विणकरांना त्यांचे नागरी हक्क व धर्मस्वातंत्र्य यांस मुकावे लागून त्यांना इंग्लंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. पुढे अठराव्या शतकात घरगुती उद्योगधंद्यांच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊन त्यांनी विदेशी मालाशी स्पर्धा करावी, असे धोरण ठरविण्यात आले. त्यास इंग्लंड व फ्रान्स या देशांनी संमती दिली. औद्योगिक क्रांतीमुळे सूतकताई, विणकाम व कापडछपाई यांच्या साधनांत सुधारणा घडून आल्या. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी वस्त्रकलेच्या इतिहासात झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे हातमागास जॅक जोडण्यात आल्याने यांत्रिक पद्धतीने विविध कलाकुसरयुक्त कापडाचे उत्पादन करणे शक्य झाले.
विल्यम मॉरिस (१८३४-९६) ह्या इंग्रज कलाकाराने पडद्याचे कापड व छपाईचे कापड यांवर नवमध्ययुगीन आकृतिबंध काढून पूर्वीच्या सहयोगी संबंधाची तफावत नष्ट केली, तसेच कलाकार व व्यावसायिक यांचा समन्वय घडवून आणला. हिख्तार गुइमार ह्या फ्रान्समधील कलाकाराने अठराव्या शतकास आगळेच वळण दिले. त्याने भरतकाम व त्याचे उपविभाग दर्शविणारी आकर्षक व स्वतंत्र शैली ह्या शतकाच्या सुरुवातीस प्रसारित केली. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात कापड-उत्पादन शैलीने कालांतराने प्रगतीचे शिखर गाठले. याच शतकाच्या मध्यास हातमागनिर्मित कापड-उत्पादन वास्तुकला, शिल्पकला व चित्रकला यांना स्फूर्तिदायक, तर यंत्रशक्तीस आव्हान देणारे ठरले. कापडउद्योगाचे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय फ्रान्समधील लीआँ येथे असून वॉशिंग्टन डी. सी. येथे दुसऱ्या क्रमांकाचे संग्रहालय आहे.
तयार कापड : सुताचे दोन संच वापरून कापड विणले जाते. उभ्या सुताच्या संचाने उभी वीण, तर आडव्या सुताच्या संचाने जाळीची वीण घालतात. साधी वीण घालण्यास सुलभ व साध्या कलाकृतीची गरज असते. सळईदार कापडाची वीण उभ्या-तिरक्या रेषांची, तर छापील कापडाची वीण १२ सुतांचे संच वापरून विणली जाते.
जाळीदार कापड : एक किंवा अनेक दोऱ्यांचे संच वापरून जाळीदार कापड तयार करतात. हे कापड तयार करण्याचे यंत्र सुईच्या साहाय्याने कापड व दोरा यांत अंतर राखून जाळी तयार करते. जाळीदार कापड विणलेल्या साध्या कापडाच्या तुलनेत अधिक लवचिक असते. जाळीची वीण असलेल्या कापडाचा उपयोग तयार कपडे, अंतर्वस्त्रे व स्वेटर तयार करण्यासाठी केला जातो. ट्रायकॉट विणीचे कापड वजनाने हलके असून त्यापासून चादरी, पोलकी व स्त्रियांसाठी पोषाख तयार करतात. रशेल विणीचे कापडदेखील जाड असून त्यापासून विविध प्रकारांचे कपडे तयार करण्यात येतात. त्यात ब्लँकेट, गालिचे, पुरुषांचे पोषाख, पोहताना घालावयाचे पोषाख इत्यादींचा अंतर्भाव होतो. अन्य कापडांत गुच्छ, जाळी, लेस, वेणी, फेल्ट इ. विणी समाविष्ट असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत गुच्छ विणीचे ९०% कापड गालिचे तयार करण्यासाठी वापरतात.
माग किंवा विणकाम यंत्रावर प्रत्यक्ष तयार होणाऱ्या कापडास निकृष्ट कापड (अंतिम स्वरूपात तयार नसलेले) म्हणतात. कापडाच्या रंगाशी ही संज्ञा निगडित नाही. सुबक दिसण्यासाठी त्यावर पुन्हा क्रिया करावी लागते. घाण, ओंगण व इतर नकोसा द्रव निघून जाण्यासाठी कापड धुतले जाते. बरेचसे कापड अधिक शुभ्र दिसावे किंवा रंगविण्यास अथवा छपाईस सुलभ व्हावे, म्हणून ते विरंजक चूर्णाने धुऊन काढतात. सुती कापडास रंग देण्यापूर्वी ते सोड्याने धुतले जाते. यामुळे सुती कापड अधिक घट्ट होऊन ते बळकट व तजेले बनते.
काही कापड रंगीत सुतापासून तयार करतात. अशा कापडाचे रंग तजेले दिसतात व त्यावर मोठे आकृतिबंध काढलेले असतात. सुताचे कापडात रूपांतर झाल्यावर त्याला बहुतांशी एकच रंग दिला जातो. रंग देणारे यंत्र दाबाच्या साहाय्याने कापडास रंगाच्या भांड्यात ओढते किंवा दाबाच्या साहाय्याने रंग कापडावर पसरून ते रंगीत बनते. [⟶ कापड छपाई].
कापडास रंग दिल्यावर किंवा त्यावर छपाई केल्यावर ते यंत्रावर ताणले जाते. उष्ण तंतूंपासून तयार झालेले कापड आकसू नये अथवा गुंडाळले जाऊ नये, म्हणून याच पद्धतीने सुकविले जाते. या पद्धतीस ‘सॅन्फरायझिंग’ म्हणतात. कापड अधिक सुबक दिसण्यासाठी करण्यात येणाऱ्या क्रियेमुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढून जीवजंतू, झीज, पतंग, भुरी, हलवाहलव, स्थित्यंतर, पाणी इत्यादींपासून त्याचे संरक्षण होते. कापड तयार करण्याच्या अवस्थेतील शेवटची पायरी म्हणजे जड रुळाच्या साहाय्याने त्यास घड्या घालणे. या क्रियेस इस्तरीकरण (कॅलेंडरिंग) म्हणतात. नंतर कापडावर छाप घालून ते विक्रीसाठी रवाना केले जाते.
साधारणतः प्रत्येक देशातून कापड-उद्योग चालतो. जपानमध्ये व यूरोपीय देशांत कापड-उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण व केंद्रीकरण झालेले आढळते. उदा., इंग्लंड, इटली, स्वित्झर्लंड व पश्चिम जर्मनी हे देश कापड-उत्पादनासाठी लागणारी यंत्रे व तयार कापड या उद्योगांत अग्रेसर गणले जातात. कापड-उत्पादनाचे पश्चिम जर्मनी, पोलंड, रशिया या देशांत तसेच अन्य पौर्वात्य देशांत यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
औद्योगिक क्रांती : मध्ययुगीन काळानंतर कापड-उत्पादनात महत्त्वाचे बदल घडून आले. इंग्रज धर्मगुरू विल्यम ली याने १५८९ मध्ये तयार कपडे करणाऱ्या यंत्राचा शोध लावला. नेदर्लंड्समधील कापड-कामगारांनी १६०० मध्ये कापडास रंग देण्याची पद्धत व उत्पादित कापड सुबक बनविण्याची नवीन पद्धती यांमध्ये सुधारणा घडवून आणल्या. औद्योगिक क्रांतीच्या काळात कापड-उत्पादनात इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. इंग्लंडमधील नवीन संशोधनाने कापड-उत्पादनाची मोठ्या प्रमाणात उत्क्रांती घडवून सूत व कापड यांचे उत्पादन वृद्धिंगत झाले.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत न्यू इंग्लंड हे कापड-उद्योगाचे केंद्रच बनले. १७९० मध्ये सॅम्युएल स्लॅटर (१७६८-१८३५) या मुळच्या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या व पुढे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत स्थायिक झालेल्या इंग्रज विणकराने विजेवर चालणारे आणि सूतकताई करणारे यंत्र तयार केले. १८९३ मध्ये एली व्हिटनी (१७६५-१८२५) या अमेरिकन संशोधकाने कापसाच्या सरकी यंत्राचे विस्तारसंशोधन केले व परिणामी सुती कापडाचे उत्पादन न्यू इंग्लंडमध्ये द्रुतगतीने वाढू लागले.
आधुनिक कापडउद्योग : ल्वी-मारी हिलरी शार्दॉने (१८३९-१९२४) ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने १८८४ मध्ये तंतूंपासून कापड विणण्याचा पहिला शोध लावला. हे कापड आज ‘रेयॉन’ म्हणून प्रसिद्ध असून १९१० मध्ये ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ‘कृत्रिम रेशीम’ या नावाने प्रारंभी तयार करण्यात आले. वॉलिस ह्यूम कॉरदार्स या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील रसायनशास्त्रज्ञास नायलॉन उत्पादनाचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते. १९४० व १९५० मध्ये अन्य कारखानदारांनी पॉलिएस्टर व ॲक्रिलिक कापडाचे उत्पादन केले. १९६० मध्ये विश्लेषित पॉलिएस्टर धाग्याने दुहेरी विणीचे कापड तयार करण्यास कंपन्यांनी सुरुवात केली. हे कापड वजनाने हलके व तलम असल्याने अधिक लोकप्रिय ठरले.
आज कापड-उद्योगात नवीन प्रक्रिया व साधने यांची भर पडल्याने त्याला सर्वांत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आढळते. गणक यंत्रांद्वारे नियंत्रण होणारे विणकामाचे यंत्र उपलब्ध झाल्याने आज विविध आकृतिबंधांचे कापड द्रुतगतीने तयार करणे शक्य झाले आहे. अनेक धोटे (शटल) असलेल्या यंत्रमागांचा विविध कंपन्या वापर करीत असल्याने प्रत्येक मिनिटाला १,००० वेळा हलणाऱ्या आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रांचा कापडउद्योगात होत असलेला वापर त्याच्या प्रगतीचे गमक आहे.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील कापड-उद्योगात सु. ५,५०० कापडगिरण्या कार्यरत असून त्या सु. ७,००० संच कार्यान्वित करतात. यांपैकी बहुतेक कंपन्या सुतापासून कापड तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रियांपासून कापड-उत्पादन करतात. काही कारखानदार यांपैकी एका प्रक्रियेचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कापड-उत्पादन प्रतिवर्षी ११ महापद्म पौंड कापड-उत्पादन करतात. प्रत्येक वर्षी या व्यवसायात ३६ महापद्म पौंडांची उलाढाल होते. त्यात प्रामुख्याने बर्लिंग्टन इंडस्ट्रीज इन्कॉर्पोरेटेड, वेस्ट पॉईंट पेपरिल इन्कॉर्पोरेटेड आणि स्प्रिंग्ज मिल्स इन्कॉर्पोरेटेड यांचा समावेश होतो. कॅनडामध्ये कापड-उत्पादन करणाऱ्या सु. १,१८० कंपन्या ३ महापद्म पौंडांची प्रतिवर्षी उलाढाल करतात. या उद्योगात तसेच तयार कपडे उद्योगात प्रत्येकी सु. १,००,००० लोक गुंतलेले आहेत.
भारतासारख्या विकसनशील देशांत हजारो कामगार घरगुती उद्योगांतील रेशमी कापड-उत्पादनात व नैसर्गिक तंतूंपासून केल्या जाणाऱ्या कापड-उत्पादनात गुंतलेले आढळतात. विकसनशील देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी तेथे कापडउद्योगाला प्राधान्य असल्याने त्याचे यांत्रिकीकरण होणे अगत्याचे ठरते. हा उद्योग लोकांना कापडपुरवठा करीत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यास महत्त्वाचे स्थान आहे. रेशमी व सुती वस्त्रांची तलम वीण, सोन्या-रूप्यांचे भरतकाम वा सुंदर आकृतिबंधाचे रंगकाम ही भारतीय वस्त्रकलेची परंपरागत वैशिष्ट्ये होत. वाराणसीचे ‘किनखाब’, महाराष्ट्राची ‘पैठणी’, गुजरात-राजस्थानचा ‘पाटोळा’तसेच खडीकाम केलेली महाराष्ट्राची ‘चंद्रकळा’, गुजरात-राजस्थान व सौराष्ट्राची ‘बांधणी’ हे प्रकार उत्कृष्ट समजले जातात. बंगाली ‘कंथा’, चंबाचा ‘चंबा रुमाल’, पंजाबची ‘फुलकरी’, ‘बाग’ लखनौची ‘चिकनकारी’, काश्मीरी ‘शाली’ इ. वस्त्रप्रकार ही भारताची गौरवपूर्ण कलानिर्मिती होय.
पहा : कापडउद्योग तयार कपडे रेशीमकाम लिनन.
संदर्भ : 1. Clark, J. Craftsman in Textiles, New York, 1968.
2. Cowan, M. L. Introduction to Textiles, New York, 1962.
3. Hunter, G. L. Decorative Textiles, Philadelphia, 1918.
4. Labarth, J. Textiles : Origins to Usage, New York, 1964.
5. Moss, A. J. E. Textiles and Fabrics : Their Care and Preservation, New York, 1961.
6. Weibel, A. C. Two Thousand Years of Textiles, New York, 1952.
मिसार, म. व्यं.
“