वर्ण व वर्णमापन : वर्णज्ञान किंवा रंगज्ञान म्हणजे मनुष्यप्राण्याने प्रकाशाच्या साहाय्याने घेतलेला पदार्थाच्या रंगाविषयीचा दृक्‌प्रत्ययी व व्यक्तिसापेक्ष असा अनुभव असतो. पदार्थाच्या गुणधर्माव्यतिरिक्त प्रकाशकिरणांचे गुणधर्म, पाहणाऱ्याची दृक्‌क्षमता व रंगविषयक पूर्वानुभव यांवरदेखील हा अनुभव अवलंबून असतो. म्हणून सम्यक् वर्णज्ञानामध्ये भौतिकीय, शरीरक्रियावैज्ञानिक व मानसशास्त्रीय अंगांचा समावेश होतो.

पदार्थापासून येणाऱ्या प्रकाशकिरणांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे तो पदार्थ विशिष्ट रंगाचा दिसतो. पदार्थ व त्यापासून येणारे प्रकाशकिरण यांमधील आंतरक्रिया व तिचे नियमन करणारे घटक यांचे विश्लेषण (गुणात्मक तसेच परिमाणात्मक) भौतिकीय तत्त्वांच्या आधाराने केले जाते प्रकाशकिरण, डोळे व त्यांमार्फत मेंदूपर्यंत पोचणाऱ्या वर्णविषयक संवेदनांची तेथे होणारी नोंद यांचा अंतर्भाव शरीरक्रियावैज्ञानिक अभ्यासात करतात तर नोंदलेल्या संवेदनांचे मेंदूने केलेले विश्लेषण, त्यांची मेंदूत साठविलेल्या पूर्वानुभवाशी केलेली तुलना आणि त्यावरून आलेले रंगविषयक मानसिक अनुभव यांचा समावेश वर्णाच्या मानसशास्त्रीय अभ्यासात केला जातो. यांपैकी वर्णाच्या भौतिकीय (गुणात्मक व परिमाणात्मक) मापनाविषयीची माहिती प्रामुख्याने या लेखात दिलेली आहे.    

प्रकाश व वर्ण : एकूण ⇨ विद्युत् चुंबकीय प्रारणाच्या वर्णपटातील ४०० नॅनोमीटर ते ७०० नॅनोमीटर [१ नॅनोमीटर (नॅमी.) = १०-९ मीटर] पर्यंत तरंगलांब्यांच्या किरणांच्या भागास दृश्य प्रकाश असे म्हणतात. कारण सामन्यतः सुदृढ दृष्टीच्या व्यक्तिस या भागातील किरणांच्यामुळे दृश्य सृष्टीचे ज्ञान होते. या दृश्य प्रकाशात इंद्रधनुष्यातील तांबड्या (७०० नॅमी.) पासून जांभळ्या (४०० नॅमी.) पर्यंत न्यूटन यांनी १६६६ मध्ये दाखविलेले ‘पांढऱ्या’ प्रकाशातील सात वर्णघटक समाविष्ट असतात. न्यूटन यांच्या पूर्वी सर्व वर्ण पांढरा व काळा यांच्या मिश्रणाने बनले आहेत, या ॲरिस्टॉटल यांनी मांडलेल्या विचाराचा प्रभाव होता. न्यूटन यांनी असेही दाखवून दिले की, विश्वात ‘दिसणाऱ्या’ एकूण वर्णसंख्येपैकी प्रत्येक वर्ण हा एका विशिष्ट तरंगलांबीच्या किरणामुळे किंवा एकाहून अधिक अशा तरंगलांब्यांच्या किरणांच्या आंतरक्रियेमुळेच ‘दिसतो’ अन्यथा नाही. वस्तुतः विद्युत् चुंबकीय किरणाला स्वतःचा वर्ण नसतो. तरंगलांबी कंप्रता (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या) व ऊर्जा हेच किरणांचे गुणधर्म होत. किरणांच्यामुळे निरीक्षकाला होणारे ज्ञान विशिष्ट वर्णाची जाणीव करून देते, हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, म्हणजे मग ‘निळा प्रकाश’ अशी शब्दरचना चुकीची वाटणार नाही. दृश्य वर्णपटातील काही प्रातिनिधिक प्रकाशकिरणांचे वरील गुणधर्म व त्यामुळे ‘दिसणारे’  वर्ण कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहेत.    

कोष्टक क्र. १. दृश्य वर्णपटातील काही प्रातिनिधिक प्रकाश किरणांचे गुणधर्म व त्यामुळे ‘दिसणारे’ वर्ण. 

तरंगलांबी 

(नॅनोमीटर) 

कंप्रता 

(हर्ट्‌झ × १०१४) 

ऊर्जा 

(इलेक्टॉन-व्होल्ट)

दृश्य वर्ण 

७०० 

४.२९ 

१.७७ 

रक्तमर्यादा 

६५० 

४.६२ 

१.९१ 

तांबडा 

६०० 

५.०० 

२.०६ 

नारिंगी 

५८० 

५.१६ 

२.१४ 

पिवळा 

५५० 

५.४५ 

२.२५ 

हिरवा 

५०० 

५.९९ 

२.४८ 

सियान (निळसर हिरवा) 

४५० 

६.६६ 

२.७५ 

निळा 

४०० 

७.५० 

३.१० 

नीलमर्यादा 

कोष्टक क्र. २. नेहमी वापरण्यात येणाऱ्या काही रंगद्रव्यांच्या बाबतीतील 

वर्णछटा दर्शविणारी परिमाणे. 

रंगद्रव्याचे नाव 

प्रमुख प्रकाशतरंगलांबी 

(नॅनोमीटर) 

परावर्तनक्षमता 

(शेकडा प्रमाण) 

सापेक्ष शुद्धता 

किंवा संपृक्तता 

इंग्‍लिश व्हर्मिलीऑन 

६०८.१ 

२२.३ 

५९.९ 

कॅडमियम रेड 

६०४.८ 

२०.८ 

६७.३ 

व्हेनिशियन रेड 

५९९.२ 

१३.१ 

५०.२ 

कॅडमियम ऑरेंज 

५८६.९ 

४२.२ 

८६.९ 

यलो क्रोम 

५८१.६ 

६३.१ 

८१.८ 

यलो झिंक 

५७५.८ 

३२.६ 

७९.७ 

व्हाइट झिंक 

५६९.५ 

९४.९ 

१.५ 

ग्रीन क्रोम 

५५२.४ 

१६.० 

३४.७ 

एमराल्ड ग्रीन

५११.९

३९.१

२२.८

आयव्हरी ब्‍लॅक

४९४.५

२.२

१.७

कोबाल्ट ब्‍ल्यू

४७४.६

१६.८

६५.५

प्रत्येक दृश्य वर्णाचे वैशिष्ट्य दर्शविण्याकरिता वर्णाच्या तीन भौतिकीय गुणधर्मांची परिमाणे वापरली जातात : (१) प्रमुख प्रकाशतरंगलांबी (ह्यू किंवा डॉमिनंट वेव्हलेंग्थ), (२) संपृक्तता (क्रोमा) किंवा सापेक्ष शुद्धता आणि (३) परावर्तनक्षमता किंवा तीव्रता (व्हॅल्यू). प्रमुख प्रकाशतरंगलांबी (उदा., लाल, पिवळा, हिरवा इ.) विशिष्ट वर्णछटा दर्शविते. शुद्ध वर्णछटेत पांढरा रंग कमीअधिक प्रमाणात मिसळल्याने होणारा गडदपणातील बदल रंगाची सापेक्ष ‘शुद्धता’ अगर ‘संपृक्तता’ या परिमाणाने मोजला जातो. विशिष्ट प्रकाशतरंगलांबी व संपृक्तता असलेल्या प्रकाशाची एकूण ऊर्जा त्या वर्णाची परावर्तनक्षमता हे परिमाण नियंत्रित करते. नेहमीच्या वापरातील काही रंगद्रव्यांच्या वर्णछटा दर्शविणारी परिमाणे कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहेत.

एकाच तरंगलांबीच्या प्रकाशकिरणांना ‘एकवार्णिक’ (मोनोक्रोमॅटिक) किरण म्हणतात. अशा किरणामुळे विशिष्ट अशा एकाच संपृक्त वर्णाचे ज्ञान होते. दृश्य वर्णपटातील सात घटक वर्ण व त्यांच्या विविध छटा हे ‘वार्णिक (क्रोमॅटिक) रंग’ म्हणून संबोधले जातात, तर तपकिरी किंवा पिंगट (ब्राउन), मॅजेन्टा व गुलाबी (पिंक) हे ‘अवार्णिक (नॉनक्रोमॅटिक) रंग’ प्रकार आहेत. क्वचित् उदासीन किंवा ‘अपवार्णिक’ (ॲक्रोमँटिक) अशी संज्ञा कृष्ण, करडा व श्वेत या वर्णगटासाठी वापरली जाते. कृष्ण वर्ण हा दृश्य प्रकाशाची संपूर्ण अनुपस्थिती दर्शवितो. कोणत्याही वर्णाची दीप्ती किंवा तेजस्विता पराकोटीची कमी झाली, तर त्याचे कृष्ण वर्णात रूपांतर होईल. याचा अर्थ असा की, जो पृष्ठभाग त्यावर पडणारे सर्व प्रकाशतरंग संपूर्णपणे शोषून घेतो (परावर्तन करीत नाही) तो पृष्ठभाग ‘कृष्ण वर्णीय’ असतो. याउलट जो पृष्ठभाग त्यावर पडलेल्या सर्व ‘वार्णिक’  प्रकाशतरंगांचे संपूर्णपणे परावर्तन करतो तो ‘श्वेत वर्णीय’ पृष्ठभाग होय. सर्व वार्णिक प्रकाशतरंगांचे सम प्रमाणात शोषण होते तेव्हा तो पृष्ठभाग करडा (ग्रे) दिसतो. म्हणजेच श्वेत वर्णाची जसजशी तेजस्विता कमी होते तसतसा तो वर्ण अधिक करडा होत जातो व अखेर त्याचा कृष्ण वर्ण होतो. 


पदार्थ व वर्ण : सूर्यप्रकाश, विजेच्या प्रवाहामुळे प्रकाश देणारी तंतुदीप अनुस्फुरण (फ्ल्युओरेसंट) नळी, निऑन दिवा इ. साधने, तसेच पदार्थाच्या ज्वलनामुळे उजेड देणारी ज्योत (उदा., मेणबत्ती, रॉकेलचा दिवा, समई इ.) ही दृश्य प्रकाश मिळविण्याची साधने किंवा प्रकाश उद्‌गम म्हणून सर्वपरिचित आहेत. यांतील प्रत्येक साधनामध्ये घडणाऱ्या विशिष्ट भौतिकीय रासायनिक प्रक्रियेमध्ये विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर होऊन प्रकाशरूपाने ऊर्जा बाहेर पडत असते. यामुळे प्रत्येक साधनापासून मिळणाऱ्या प्रकाशाचे स्वरूप घटक किरणांची तरंगलांबी, तेजस्विता, शुद्धता, वर्ण इ. बाबतींत वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असते. मानवी दृष्टीला सारखाच पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश, गॅसबत्तीचा प्रकाश किंवा पाऱ्याच्या दिव्याचा प्रकाश यांच्या संघटनात फरक असतो. त्यामुळेच निरनिराळ्या प्रकाशझोतांत पाहिले असता एकाच पदार्थाचा वर्ण वेगवेगळा दिसू शकतो. पदार्थाच्या वर्णाचे सम्यक् ज्ञान करून घेताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रकाश झोताचा उद्‌गम बदलला, तर वर्णाचे दृश्य स्वरूप बदलते. यामुळे एकाच रंगाचे कापड सूर्यप्रकाशात व विजेच्या दिव्याच्या उजेडात वेगवेगळे दिसू शकते. 

प्रकाश उद्‌गमापासून निघून पदार्थावर पडणारे प्रकाशतरंग व तो पदार्थ यांच्यात कमीअधिक प्रमाणात होणाऱ्या अनेक आंतरक्रिया असतात. उदा., परावर्तन, शोषण, अपस्करण, प्रणमन, प्रकीर्णन (विखुरणे) इत्यादी [ ⟶ प्रकाशकी]. या आंतरक्रियांचे स्वरूप पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून असते व त्यांच्यामुळे पदार्थाकडून निघून निरीक्षकाच्या डोळ्यापर्यंत पोचणाऱ्या प्रकाशतरंगांच्या स्वरूपात अनेक बदल होतात. निरीक्षकास दिसणाऱ्या वर्णाचे गुणधर्म या बदलांच्या एकत्रित परिणामावर अवलंबून असतात.

पदार्थ पारदर्शक असेल व त्या पदार्थातून श्वेत प्रकाश सोडला, तर श्वेत प्रकाशातील घटक प्रकाशतरंगलांब्या पदार्थांच्या गुणधर्मांनुसार व त्यातील अणुरेणूंच्या संरचनेनुसार निरनिराळ्या प्रमाणात शोषल्या जातात. या शोषणानंतर बाहेर पडलेल्या विविध प्रकाश तरंगलांब्यांचा मानवी दृक्‌पटलावर (जालपटलावर) होणारा एकत्रित परिणाम पारदर्शक पदार्थाचा दृश्य वर्ण ठरवितो. श्वेत प्रकाशातील घटक प्रकाशतरंगलांब्यांच्या शोषणपूर्व व शोषणोत्तर तेजस्वितेच्या शोषण वर्णपट प्रकाशमापकासारख्या [⟶ प्रकाशमापन] भौतिकीय उपकरणांच्या साहाय्याने केलेल्या मापनांमुळे वर्णशोषक पदार्थाच्या संघटनाचे ज्ञान होण्यास मदत होते.

अपारदर्शक पदार्थाच्या बाबतीत त्याच्या पृष्ठभागावर पडलेल्या प्रकाशतरंगांचे कमीअधिक परावर्तन होत असते. परावर्तित प्रकाशकिरण विविध तरंगलांब्यांचे व तेजस्वितांचे असू शकतात. या सर्व प्रकाशकिरणांच्या आंतरक्रियेचा एकत्रित परिणाम म्हणून पृष्ठभागाची संरचना, स्वरूप, तसेच परस्परांची सापेक्ष स्थाने यांवर अवलंबून असलेला पृष्ठभागाचा विशिष्ट वर्ण आपणास  ‘दिसतो’.

आ. १. न्यूटन यांच्या वर्ण वर्तुळाचे एक स्वरूप.वर्णनिर्मिती : दृश्य वर्णपटलातील सर्व प्रकाशतरंगलांब्यांच्या एकत्रित परिणामामुळे श्वेत वर्ण दिसतो. याचप्रमाणे कोणत्याही दोन किंवा अधिक वार्णिकी प्रकाशतरंगलांब्यांच्या मिश्रणाने वेगळ्या वर्णाचा भास निर्माण करता येतो. या मिश्रण पद्धतीला ‘संयोगीकरण मिश्रण पद्धती’ असे म्हणतात. याउलट प्रकाशकिरणांतील अनेक वर्णांच्यापैकी एका विशिष्ट वर्णाच्या शोषणामुळेही वेगळा वर्ण भासमान करता येतो. या पद्धतीला ‘विलगीकरण मिश्रण पद्धती’ असे म्हणतात. या दोन पद्धतींनी मिळून निर्माण होणाऱ्या सु. १,००,००,००० वर्णांमध्ये मानवी डोळा भेद करू शकतो. संयोगीकरण मिश्रण पद्धतीचा परिणाम न्यूटन यांच्या वर्ण वर्तुळाच्या साहाय्याने सर्वप्रथम दाखविला गेला. वर्णपटलातील कोणताही वर्ण दोन किंवा तीन प्रकारच्या वर्णतरंगलांब्यांनी निर्माण करता येतो. हे जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी अशाच एका तबकडीच्या साहाय्याने दाखवून दिले व या तत्त्वाचा उपयोग डब्ल्यू. डी. राइट व जे. गिल्ड यांनी आपल्या वर्णमापकात १९२८ मध्ये केला. न्यूटन यांच्या वर्ण वर्तुळाचे एक स्वरूप आ. १ मध्ये दिले आहे.

वर्तुळाच्या परिघावर दृश्य वर्णपटीय वर्ण दाखविले असून तांबडा व जांभळा रंग यांच्यामध्ये मॅजेन्टा हा तांबडा आणि जांभळा यांच्या मिश्रणाने बनणारा रंग दाखविला आहे. पांढरा रंग वर्तुळाच्या मध्यावर आहे. वर्तुळाच्या कोणत्याही व्यासाच्या विरुद्ध टोकांवरील दोन वर्णांचे जवळजवळ समान तेजस्वितेचे प्रकाशकिरण मिसळल्याने श्वेतवर्ण दिसतो. हे परस्परांचे ‘पूरक’ वर्ण मानले जातात. उदा., पिवळा व जांभळा, सियान व तांबडा. या परिघावरील दोन जवळच्या वर्णांच्या मिश्रणाने त्या दोहोंमध्ये दर्शविलेला वर्ण मिळतो. उदा., तांबडा व पिवळा यांच्या मिश्रणाने नारिंगी वर्ण मिळतो.

संयोगीकरण मिश्रण पद्धतीत तांबडा, हिरवा व निळा हे तीन प्राथमिक वर्ण मानले गेले आहे. कारण या तीन वर्णांचे कमीअधिक प्रमाणात मिश्रण करून जवळजवळ सर्व इतर वर्ण मिळू शकतात. जसे,

तांबडा + निळा = मॅजेन्टानिळा + हिरवा = सियानहिरवा + तांबडा =पिवळा

तिन्ही प्राथमिक वर्ण सम प्रमाणात मिसळून श्वेत वर्ण तयार होतो.

ही पद्धत चलच्चित्रपटातील आणि दूरचित्रवाणीवरील रंगीत चित्रे दाखविण्यासाठी वापरली जाते.

विलगीकरण मिश्रण पद्धतीत श्वेत वर्णातील निवडक वर्णांचे शोषण करणारी रंगद्रव्ये किंवा गाळण्या वापरल्याने ते वर्ण मूळ वर्णातून नाहीसे होतात व नवीन वर्ण मिळतात. जसे,

श्वेत – तांबडा = सियानश्वेत – निळा = पिवळा    श्वेत – हिरवा = मॅजेन्टा

गडद तांबड्या गाळणीमुळे तांबडा सोडून अन्य सर्व वर्ण शोषले जातात. हिरव्या गाळणीत तांबडा वर्ण शोषला जाऊन हिरवा वर्ण मिळतो. म्हणून या दोन्ही वर्णांच्या गाळण्या एकत्र वापरल्याने सर्वच्या सर्व वर्ण शोषले जातात म्हणजे कृष्ण वर्ण होतो. त्याचप्रमाणे पिवळ्या पृष्ठभागावरून पिवळा, हिरवा व तांबडा या तिन्हींचे परावर्तन होते. हिरवा व तांबडा यांच्या संयोगीकरण मिश्रणामुळे पिवळा वर्ण अधिक गडद होतो, तर निळा व जांभळा हे वर्ण शोषले जातात. निळ्या रंगद्रव्यामुळे प्रामुख्याने पिवळा, नारिंगी आणि तांबडा हे वर्ण शोषले जातात. पिवळ्या व निळ्या रंगद्रव्यांच्या मिश्रणामुळे हिरवा वर्ण मिळतो, कारण हा वर्ण मिश्रणातील दोन्ही द्रव्ये शोषत नाही.

या पद्धतीचा उपयोग रंगीत छायाचित्रांच्या छपाईत करतात.

विलगीकरण मिश्रण पद्धतीत रक्तशोषक (सियान), हरितशोषक (मॅजेन्टा) व नीलशोषक (पिवळा) हे प्राथमिक शोषक वर्ण मानले जातात. या पद्धतीत सियान गाळणी तांबड्या प्रकाशाचे शोषण आणि निळ्या व हिरव्या प्रकाशांचे पारगमन करते मॅजेन्टा गाळणी हिरव्या प्रकाशाचे शोषण आणि निळ्या व तांबड्या प्रकाशांचे पारगमन करते आणि पिवळी गाळणी निळ्या प्रकाशाचे शोषण आणि हिरव्या व तांबड्या प्रकाशांचे पारगमन करते. (पहा : चित्रपत्र क्र. ४४, आ. १). 


वर्णमापन : (वर्णमिती). दृश्य वर्णाचे वैशिष्ट्य निश्चित करणारे जे तीन गुणधर्म (प्रमुख प्रकाशतरंगलांबी, संपृक्तता व तीव्रता) वर दिले आहेत त्यांचे परिमाणात्मक मापन करण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. सामान्यपणे त्यांना ‘वर्णमापन पद्धती’ असे म्हणतात. या गुणधर्मांचे सापेक्ष परंतु वस्तुनिष्ठ मापन करणारी भौतिकीय तंत्रे व विविध उपकरणे विकसित करण्यात आलेली आहेत. दृश्य तुलनादर्शकासारख्या साध्या उपकरणात मानवी दृष्टीच्या संवेदनाक्षमतेचा उपयोग केलेला असतो, तर ‘वर्णपटप्रकाशमापक’ या उपकरण प्रकारात वर्ण प्रकाशाचे विश्लेषण करण्यासाठी प्रकाशविद्युत् घटासारख्या [⟶ प्रकाशविद्युत्] इलेक्ट्रॉनीय संवेदनाक्षम अभिज्ञातकाचा उपयोग करतात. अशा विश्लेषणाचा आलेख काढून देणारी स्वयंचलित वर्णपटमापक उपकरणे उपलब्ध आहेत. अशा उपकरणांनी दिलेले काही प्रकाश उद्‌गमांचे विविध वर्णांच्या ऊर्जा वितरणाचे आलेख चित्रपत्र क्र. ४४ मधील आ. २ मध्ये दिले आहेत. खालील आ. २ मध्ये एमराल्ड ग्रीन या नावाने ओळखण्यात येणाऱ्या कलाकारांच्या रंगद्रव्याच्या वर्णपटीय परावर्तनक्षमता वक्र दाखविला आहे.

  

आ. २. एमराल्ड ग्रीन या रंगद्रव्याचा वर्णपटीय परावर्तनक्षमता वक्र.आधुनिक प्रकारच्या ‘वर्णपटप्रकाशमापक’ उपकरणामुळे वर्णदर्शी प्रकाशतरंगाची लांबी, त्याची ऊर्जा व तीव्रता यांचे मापन केले जाते. मानवी दृष्टीला होणारे वर्णज्ञान म्हणजे वर दिल्याप्रमाणे एकाहून अधिक वर्ण प्रकाशतरंगलांब्यांच्या आंतरक्रियेचा एकत्रित परिणाम असू शकतो. अनेक प्रकाशतरंगलांब्यांच्या मिश्रणाने एक विशिष्ट वर्ण आपल्या डोळ्यांना ‘दिसतो’. त्यामुळे ऊर्जा वितरणाच्या आलेखाने वर्णवैशिष्ट्य स्पष्ट करणे अवघड असते. मानवी वर्णज्ञानावर आधारित मापन परिमाणे वापरूनच वर्णवैशिष्ट्ये दर्शविणे सामान्य माणसाच्या दृष्टीने योग्य व आवश्यक ठरते. त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मापन पद्धतींपैकी ‘त्रिवर्ण मापन’, ‘वर्णवैपुल्य आकृती’ आणि ए. एच्. मन्सेल यांची वर्णमापन पद्धती या तीन प्रचलित वर्णमापन पद्धतींची माहिती संक्षेपाने येथे दिली आहे.

त्रिवर्ण मापन पद्धती : अपारदर्शक पदार्थाच्या वर्णमापनासाठी ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीत तांबडा, हिरवा व निळा अशा तीन प्राथमिक रंगांच्या पृष्ठभागांच्या बरोबर प्रमाणित वातावरणात व सरासरी दर्शकाच्या दृष्टीने इष्ट वर्णाची तुलना केली जाते. या तौलनिक मापनाचे निष्कर्ष क्ष, य आणि झ अशा तीन मूल्यांकांनी दर्शवितात. याकरिता त्यांना ‘त्रिवर्ण मूल्ये’ असे म्हणतात. ही मूल्ये अशा आकडेमोडीने काढलेली असतात की, य हा मूल्यांक त्या रंगीत पृष्ठभागाच्या प्रमाणित परिस्थितीत मोजलेल्या परावर्तनक्षमतेच्या टक्केवारीच्या इतका असतो (सरासरी तीव्रतेच्या दिवसाच्या प्रकाशात, प्रमाणित अशा पांढऱ्या पृष्ठभागाबरोबर सरासरी दृष्टीच्या निरीक्षकाने तुलना करून अंदाजिलेली परावर्तनक्षमता म्हणजे प्रमाणित परिस्थितीत मोजलेली परावर्तनक्षमता होय). त्यामुळे हे तीन मूल्यांक पृष्ठभागाचा वर्णविशेष म्हणजे प्रमुख प्रकाशतरंगलांबी व दृश्यमान परावर्तनक्षमता हे गुणधर्म निश्चित करतात. उदा., एमराल्ड ग्रीन या रंगद्रव्याचे मूल्यांक क्ष = २२.७, य = ३९.१ आणि झ = ३१.० असे आहेत म्हणजे या रंगद्रव्याची परावर्तनक्षमता ३९.१ टक्के इतकी आहे आणि त्याची प्रमुख प्रकाशतरंगलांबी ५११.९ नॅमी. इतकी असते (आ. २ पहा). ही वर्णनिश्चितीची पद्धती आंतरराष्ट्रीय प्रदीपनविषयक आयोगाने (Commission Internationale de 1’ Eclairage इंटरनॅशनल कमिशन ऑन इल्युमिनेशन) १९३१ मध्ये मान्य केली म्हणून तिला सीआयई पद्धती असेही म्हणतात. गडद जांभळा अशासारखे वर्णपटाच्या कडेचे वर्ण निश्चित करण्यासाठी त्या पृष्ठभागावर तांबडा प्रकाश टाकून उत्पन्न होणाऱ्या वर्णाची हिरव्या व निळ्या वर्णांच्या मिश्रणाशी तुलना करतात, म्हणून अशा वर्णाच्या बाबतीत क्ष हा मूल्यांक ऋण असू शकतो. तांबडा, हिरवा व निळा हे प्राथमिक प्रकाशकिरण किती प्रमाणात मिसळले म्हणजे इष्ट वर्ण ‘दिसतो’, हेही त्रिवर्ण मूल्यांकांच्या साहाय्याने काढता येते. प्रकाशमिश्रणावरून वर्णाचे मूल्यांक निश्चित करण्याची मूळ पद्धत राइट व गिल्ड यांनी १९२८ मध्ये शोधून काढली. (मूळ पद्धतीने काढलेले मूल्यांक व मान्यताप्राप्त सीआयई पद्धतीत दिलेले मूल्यांक वेगळे आहेत, हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे).

वर्णवैपुल्य आकृती : त्रिवर्ण मापन पद्धतीने मिळालेली वर्णविषयक माहिती वर्णवैपुल्य आकृतीत आलेखरूपाने दर्शविली जाते. त्यासाठी सीआयई पद्धतीने मोजलेल्या क्ष, य आणि झ या तीन मूल्यांकांचे खालील समीकरणांनी नवीन मूल्यांकांत रूपांतर करतात.

क्ष

क्ष 

,

, =

क्ष + य +झ

क्ष + य + झ

क्ष + य + झ

अर्थात तिन्ही नवीन मूल्यांकांची बेरीज क्ष + + = १ येते, त्यामुळे क्ष आणि या दोन मूल्यांकांवरून झ  हा तिसरा मूल्यांक आपोआप निश्चित होतो. म्हणून क्ष आणि हे दोन वर्णवैपुल्यदर्शक गुणांक मानले जातात. या दोन परस्परावलंबी घटकांचा आलेख म्हणजे वर्णवैपुल्य आकृती होय (आ. ३). या आकृतीत समान वर्णवैपुल्य असलेले गडद आणि फिके वर्ण एकाच बिंदूच्या (क्ष, ) ठिकाणी दाखविलेले असतात. अशा वर्णांच्या या मूल्यांकातील फरकांमुळे हा गडदपणातील फरक स्पष्ट होतो.


आ. ३. वर्णवैपुल्य आकृती : अवार्णिक बिंदू म , एमराल्ड ग्रीन रंगद्रव्य प, तांबडे सफरचंद स, केल्व्हिनमध्ये तापमानाने दर्शविलेला तापदीप्त वक्र आणि सीआयई मानक प्रकाश उद्‌गम अ, आ व इ यांची वर्णवैपुल्य आकृतीवरील स्थाने दर्शविली आहेत.दृश्य वर्णपटातील (४०० ते ७०० नॅमी.) वार्णिक रंगांच्या क्ष व य गुणांकांचा आलेख घोड्याच्या नालाच्या आकाराचा दिसतो (आ. ३). जांभळा व तांबडा यांच्या मिश्रणाचे ‘अपवार्णिक’ रंग ४०० नॅमी. व ७०० नॅमी. या बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषेवर येतात. ही सरळ रेषा व नालाकृती वक्र रेषा यांनी मर्यादित केलेल्या भागांत सर्व दृश्य वर्ण येतात. रेषेवरील बिंदू संपृक्त किंवा ‘शुद्ध’ वर्ण दर्शवितात, तर आकृतीच्या मध्याकडे जावे तसा वर्ण फिकट होत जातो (पहा चित्रपत्र क्र. ४४, आ. ३). मध्यावर (क्ष = /, = /), श्वेत-करडा-कृष्ण व अवार्णिक वर्णांचे स्थान ‘’ या बिंदूने दाखविले आहे. हे वर्ण त्यांच्या परावर्तनक्षमतेच्या (मूल्यांक ) बाबतीत एकमेकांपासून भिन्न असतात. ४०० नॅमी.च्या वर्णाची परावर्तनक्षमता जवळजवळ शून्य असल्यामुळे हा वर्णबिंदू क्ष या भुजेवरच दाखविला आहे. वर्णपटांत नसलेले बहुतेक सर्व वर्ण त्यांच्या त्यांच्या क्ष गुणांकांनुसार या आकृतीत दाखविता येतात. उदा., हा बिंदू (क्ष = ०.२४५, य = ०.४२१) एमराल्ड ग्रीन रंगद्रव्याचा वर्ण दर्शवितो. या श्वेतवर्णाच्या बिंदूपासून पर्यंत सरळ रेषा काढली व पुढे वाढवली असता ती वक्ररेषेला या बिंदूशी छेदते. हा बिंदू हिरव्या वर्णाची प्रमुख तरंगलांबी (५११.९ नॅमी.) दर्शवितो.

  विशिष्ट वर्णाच्या आकृतीतील स्थानावरून त्याची शुद्धता काढता येते. ग या बिंदूशी वर्णाची शुद्धता १००% व म या बिंदूशी ती शून्य मानली, तर मप : मग हे गुणोत्तर प या बिंदूच्या वर्णाची शुद्धता दर्शविते. यावरून एमराल्ड ग्रीन रंगद्रव्याच्या वर्णाची शुद्धता २२.८% इतकी निघते. दोन शुद्ध वर्णांच्या मिश्रणाने कोणता वर्ण दिसेल हेही या आकृतीच्या साहाय्याने काढता येते. त हा बिंदू तांबडा वर्ण दर्शवितो, तर ज हा बिंदू जांभळा वर्ण दाखवितो. या दोन वर्णांच्या निरनिराळ्या प्रमाणातील मिश्रणांतून तयार झालेल्या सर्व वर्णांचे बिंदू तज या तुटक सरळ रेषेवर येतात. हीच गोष्ट कोणत्याही दोन वर्णांच्या बाबतीत आढळून येते. ज्या दोन वर्णांच्या मिश्रणाने श्वेत वर्ण तयार होतो, त्यांना परस्परांचे ‘पूरक’ वर्ण म्हणतात. दोन शुद्ध पूरक वर्णबिंदूंना जोडणारी सरळ रेषा नेहमी म या बिंदूतून जाते. या रीतीने ५८० नॅमी.चा वर्ण ४८० नॅमी.च्या वर्णाचा पूरक वर्ण ठरतो. वर्णवैपुल्य आकृतीवरून अशा पूरक वर्णांच्या जोड्या निश्चित करता येतात.

वर्णतापमान : विजेच्या दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचा वर्ण त्यातील टंगस्टन धातूची तार अधिकाधिक तापते तसतसा लाल, नारिंगी, फिकट पिवळा, श्वेत ते फिकट निळसर पांढरा अशा क्रमाने बदलत जातो. या प्रकाशाचे वर्णवैपुल्य व तापमान दाखविणारी अआइ ही वक्र रेषा (तापदीप्त वक्र) आ. ३ मध्ये दाखविली आहे. रेषेवरील अ, आ आणि इ हे बिंदू सीआयईच्या मानक (प्रमाणभूत) प्रकाश उद्‌गमाचे वर्ण दर्शवितात. १०० वॉट शक्तीच्या विजेच्या तापदीप्त तंतू दिव्यात या बिंदूंच्या जवळपासचे तापमान आणि वर्ण अनुक्रमे २,८५० के. (लालसर), ४,८०० के. (मध्यान्हीचा सूर्यप्रकाश) आणि ६,८०० के. (सरासरी दिनप्रकाश) इतके असते. तापमानावर आधारित वर्णमापनाचा उपयोग अर्थातच मर्यादित राहतो कारण सर्वच पृष्ठभाग ‘कृष्णवर्णी’ नसतात.

वर्ण तक्ते : वर्णवैपुल्य व तेजस्विता मोजून त्यांवरून वर्णनिश्चिती करण्याची वर सांगितलेली पद्धती शास्त्रशुद्ध असली, तरी ती काहीशी क्लिष्ट व वेळखाऊ असल्यामुळे केवळ दृष्टीच्या साहाय्याने पडताळणी करून पदार्थाची वर्णनिश्चिती लगोलग करावयाची असेल तेव्हा बहुधा आल्बर्ट एच्. मन्सेल या चित्रकार शिक्षकांनी १९१५ मध्ये मांडलेल्या तौलनिक पद्धतीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मन्सेल यांच्या या पद्धतीत वर्णसंपृक्तता, वर्णविशेष (प्रमुख प्रकाश छटा) आणि परावर्तनक्षमता या तीन गुणधर्मांना गुणांक देऊन तयार केलेल्या नळकांड्यासारख्या घनाकृतीमध्ये सर्व वर्णछटांचा अंतर्भाव केलेला असतो आणि त्या चित्याकृतीच्या प्रत्येक भागाची विशिष्ट वर्णछटा असते. इष्ट वर्णाची पडताळणी प्रत्येक भागाशी करून त्यावरून वर्णनिश्चिती केली जाते. मन्सेल पद्धतीवर आधारित वर्ण घनाकृतीचा आकार स्थूलमानाने आ. ४ मध्ये दाखविला आहे.

आ. ४. मन्सेल वर्ण घनाकृती : वर्णविशेष, परावर्तनक्षमता व संपृक्तता यांचे सहनिर्देशक दाखविले आहेत.आकृतीच्या मध्यावरील उभा अक्ष परावर्तनक्षमतेचे एकूण ११ टप्पे दर्शवितो. अक्षाच्या बुडाशी शून्य परावर्तनक्षमतेचा कृष्णवर्ण शून्य गुणांकाने दाखविला आहे, तर अक्षाच्या शिरोभागी सर्वाधिक परावर्तनक्षम असा श्वेत वर्ण १० या गुणांकाने दाखविला आहे. मधले १ ते ९ हे टप्पे करड्या वर्णाची वाढती परावर्तनक्षमता दर्शवितात. अक्षाभोवतालच्या वर्तुळाकार पट्टीवर दहा प्रमुख वर्णगट असून त्यांना रंगांची नावे दिलेली आहेत. प्रत्येक वर्णगटाचे दहा भाग (छटा) करून त्यांना १ ते १० असे गुणांक दिलेले आहेत. प्रमुख वर्णगटांत तांबडा, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा या क्रमाने वर्ण आहेत. त्यांच्या दरम्यान पिवळसर लाल, हिरवट पिवळा, निळसर हिरवा, निळसर जांभळा, लालसर जांभळा इ. वर्णछटा येतात, त्या गुणांकांनी दर्शवितात. संपृक्तता म्हणजे वर्णाचा गडदपणा उभ्या अक्षावर कमीत कमी (शून्य गुणांक) असेल. अक्षमध्यापासून वर्तुळाच्या परिघापर्यंत वाढती संपृक्तता वर्णविशेष व परावर्तनक्षमतेनुसार १० ते १८ टप्प्यांत विभागलेली असून त्या टप्प्यांना चढत्या क्रमाने गुणांक दिलेले आहेत. मन्सेल यांच्या वरील वर्णसंकेत पद्धतीच्या आधारे एमराल्ड ग्रीन या रंगद्रव्याचा वर्ण ५ जी ६.७/११.२ अशा गुणांकांनी निश्चित होईल. म्हणजे त्याचा वर्णविशेष ‘५ जी’ असेल, ६.७ ही परावर्तनक्षमता असेल आणि त्याचा संपृक्तता गुणांक ११.२ असेल. याचप्रमाणे पक्व सफरचंदाच्या लाल रंगाचे निश्चितीकरण १० आरपी ४/१० असे होईल (येथे ‘जी’ हे अक्षर ग्रीन-हिरवा, तर ‘आरपी’ हे रेड-पर्पल-लालसर जांभळा-वर्ण दर्शवितात). 


वरील पद्धतीपेक्षा अधिक ढोबळमानाने वर्णनिश्चिती करणे पुरेसे असल्यास त्यासाठी इंटर-सोसायटी कलर कौन्सिल-नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड (आयएससीसी-एनबीएस) यांच्या वर्ण तक्त्यांचा किंवा तत्सम तक्त्यांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये बहुधा विविध वर्णछटा शब्दांत वर्णिलेल्या असतात (उदा., फिकट जांभळा, करडसर निळा). क्वचित त्यांना संकेत क्रमांकही दिलेले असतात [उदा., लाल सफरचंदाचा क्रमांक २५८ (सौम्य जांभळट तांबडा), तर एमराल्ड ग्रीन रंगद्रव्याचा क्रमांक १३९ (भडक हिरवा)]. मन्सेल यांच्या सूचीखेरीज एफ्. डब्ल्यू. ओस्टव्हाल्ट यांचा वर्णतक्तासंग्रह, ए. मीर्झ व एम्. री पॉल यांचा डिक्शनरी ऑफ कलर, आर्. रिजवे यांचा कलर स्टँडर्ड अँड कलर नॉमेनक्लेचर इ. वर्णतक्तासंग्रह प्रचलित आहेत. प्रत्येक संग्रहात तो वापरण्यासंबंधीची माहिती दिलेली असते. 

मन्सेल यांच्या वर्णतक्तासंग्रहात निरनिराळ्या वर्णछटांचे एकूण ३१२ चौकोन आहेत. एका पृष्ठावर एकच ‘वर्णविशेष’ दिलेला आहे. आडव्या रेषेतील चौकोनांची परावर्तनक्षमता समान असते. उभ्या रेषेत एकाखालील एक चौकोनांची संपृक्तता समान असते. विविध चौकोनांच्या वरील गुणधर्माची पडताळणी व तौलनिक मापन वर्णपटप्रकाशमापकाच्या साहाय्याने देखील केलेले असते (चित्रपत्र क्र. ४४, आ. ४).

वर्णमितीय विश्लेषण : काटेकोर व्याख्येप्रमाणे हे विश्लेषण रंगीत विद्रावांचे दृक् अभिज्ञान व तुलना यांसंबंधीच्या तंत्रांशी निगडित आहे परंतु वैश्लेषिक रसायनशास्त्रज्ञांमध्ये सर्वसाधारण वापरात असलेल्या अर्थानुसार रंगीत विद्रावांच्या सर्व प्रकारच्या विश्लेषणांकरिता ही व्यापक संज्ञा म्हणून प्रचलित आहे.   

एखाद्या पदार्थाचे अभिज्ञान त्याच्या विद्रावाच्या वर्णविशेषावरून केल्यास त्यास गुणात्मक विश्लेषण म्हणतात. एखाद्या विद्रावातील त्या पदार्थांची संहती (विद्रावातील प्रमाण) त्याच्या वर्णाच्या तीव्रतेची वर्ण तीव्रता मानकांशी तुलना करून निर्धारित केल्यास त्याला परिमाणात्मक विश्लेषण म्हणतात. मानवी डोळ्याचा अभिज्ञातक म्हणून उपयोग केल्यास परिमाणात्मक वर्णमितीय पद्धतींची अचूकता सापेक्षतः कमी असते. याखेरीज निरनिराळ्या वर्णाच्या बाबतीत डोळ्याचा प्रतिसाद बदलत असल्याने वर्णानुसार अचूकताही बदलते.

बहुतेक दृश्य वर्ण-तुलना पद्धतींत दृश्य वर्णपटातील सर्व तरंगलांब्यांचा समावेश असलेल्या आपाती श्वेत प्रकाशाचा उपयोग करतात. प्रकाश गाळण्यांचा व एकवर्णकारक साधनांचा क्वचितच उपयोग करतात. वर्णमितीय पद्धतींचे प्रमुख फायदे म्हणजे सुलभता, त्वरा व कमी खर्च हे असून त्या कार्यवाहीत आणणाऱ्या व्यक्तींना फारशी कौशल्याची व प्रशिक्षणाची आवश्यकता नसते.

विद्रावांच्या वर्ण तीव्रतांची बहुधा कायमस्वरूपी वर्ण मानक संचाशी तुलना केली जाते. ही मानके त्यासारख्याच वर्णविशेष असलेल्या त्याच पदार्थाच्या विद्रावाच्या किंवा रंगीत काचेच्या स्वरूपात असतात.

नमुना विद्रावाची मानक विद्रावाशी तुलना करण्याचे एक तंत्र म्हणजे सपाट तळ असलेल्या व १०० मिलि.पर्यंत विद्राव मावू शकणाऱ्या लांब परीक्षा नळ्यांचा उपयोग करणे (या नळ्यांना नेस्लर नळ्या म्हणतात). या नळ्यांमध्ये विद्रावाच्या ३०० मिमी. खोलीपर्यंत तुलना करता येतात व या खोलीमुळे विरल विद्रावांच्या वर्ण तीव्रता वाढतात. नमुना विद्रावाचे अंशांकित संहतींच्या मानक विद्रावांच्या मालिकेतील एका विद्रावाशी किंवा दोन विद्रावांच्यामध्ये ठेवून सुजोडीकरण केले जाते. यापेक्षा एक अधिक सुविकसित (पण वर्णपट प्रकाशमापकाच्या उपलब्धतेमुळे बहुतांशी कालबाह्य झालेले) तंत्र एकाच मानक विद्रावाचा उपयोग करणाऱ्या द्युबॉक्स वर्णमापकावर आधारलेले आहे. या उपकरणात नमुना व मानक विद्रावांच्या खोल्या पारदर्शक काचेच्या दट्ट्यांच्या साहाय्याने सतत बदलत्या ठेवता येतात. नमुना विद्रावाच्या वर्ण तीव्रतेचे मानक विद्रावाच्या वर्ण तीव्रतेशी सुजोडीकरण करण्यासाठी विभाजित-क्षेत्र प्रकाशीय प्रणालीचा उपयोग करतात आणि मग नमुना संहती बूगेअर-लँबर्ट-बिअर नियमावर (‘शोषक माध्यमात एकवार्णिक प्रकाश शलाकेची तीव्रता अंतर्गमन अंतरानुसार घातीय प्रमाणात कमी होते’ या नियमावर) आधारलेल्या गणनाने निर्धारित केली जाते.

pH [⟶ पीएच मूल्य], क्लोरीन, अमोनिया, लोह व फॉस्फेट यांच्याकरिता करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विश्लेषणात हेलिगे तुल्यक नावाची साधी प्रयुक्ती वापरली जाते. त्यात फिरविता येणाऱ्या एका तबकडीवर रंगीत काचांच्या मानकांची श्रेणी बसविलेली असते. नमुना विद्रावावर योग्य त्या विक्रियाकारकाचे संस्करण केल्यानंतर त्याचे रंगीत काच मानकाशी सुजोडीकरण केले जाते. एका प्रयुक्तीत नमुना विद्रावाचे लांब नेस्लर नळीतून निरीक्षण केले जाते, तर खिशात ठेवता येण्यासारख्या एका तुल्यकात विद्रावाचे काचेच्या चौरस कोशात आडव्या दिशेने निरीक्षण करतात.

वर्णमापनाचे व्यावहारिक उपयोग : वर्णमापनाच्या उद्देशांचे स्थूलमानाने दोन गट करता येतील : (१) जेव्हा वर्णाची दृश्य गुणवत्ता महत्त्वाची असते व (२) जेव्हा वस्तूचा रंग तिच्यात असलेल्या इतर गुणधर्मांचा दर्शक म्हणून उपयोगात आणावयाचा असतो. वस्त्रे, रंगलेप, सौंदर्यप्रसाधने, लाकूड, चामडे इत्यादींसारख्यांचे शोभादायक वर्ण अर्थात पहिल्या गटात येतात. निसर्गात आढळणारे वर्ण (उदा., फुले, फळे, पक्षी, कीटक इत्यादींचे वर्ण) हेही याच गटात येतात मात्र असे वर्ण सौंदर्यशास्त्र दृष्ट्या मोजण्याबरोबरच वनस्पतीच्या वा प्राण्याच्या वाढीशी व विकासाशीही संबंधित असतात, हे लक्षात घ्यावयास हवे. वाहतूक नियंत्रणातील संकेत दिव्यांच्या काचा, प्रकाश उद्‌गम व सैनिकी मायावरणासाठी वापरावयाची साधनसामग्री, तसेच रंगीत छायाचित्रण व रंगीत दूरचित्रवाणी यांतील यांतील पुनरुत्पादनाची गुणवत्ता यांसारख्या तांत्रिक बाबींचाही पहिल्या गटात समावेश होतो, कारण या प्रत्येकात उत्पादनाच्या दृश्य स्वरूपाला महत्त्वाचे स्थान असते. एखाद्या फळाचा रंग त्याच्या गोडीचा दर्शक म्हणून वापरल्यास ते दुसऱ्या गटातील उदाहरण होईल. ⇨ अनुमापनातील अंत्य बिंदूची कसोटी घेणे, विद्रावाच्या प्रबलतेचा अंदाज करणे, तसेच तेलांच्या वा साखरेच्या परिष्करणाच्या गुणवत्तेच्या कसोट्या घेणे यांसारखे उद्देश दुसऱ्या गटात मोडतात. त्याचप्रमाणे प्रकाश स्थितिस्थापकतेमध्ये [⟶ पदार्थांचे बल] व्यतिकरण पट्टांचे रंग हे नमुन्यातील प्रतिविकृतीचे माप समजण्यात येते, तर पोलादाच्या उष्णता संस्करणात पाणी देण्याची क्रिया योग्य प्रमाणात झालेली आहे की नाही हे समजण्यासाठी त्याच्या रंगावर लक्ष ठेवणे आवश्यक ठरते.

कोणत्या प्रकारचे वर्णमापन करावयाचे अथवा त्याकरिता कोणते उपकरण वापरावयाचे हे त्याच्या उद्देशावर अवलंबून असते. काही उद्दिष्टांकरिता एखाद्या स्वेच्छ मापक्रमावरील विनिर्देश करणे पुरेसे असते, तर काही बाबतींत शक्य तितका जास्तीत जास्त अचूकतेचा मानक विनिर्देश आवश्यक ठरतो. काही मापनांच्या बाबतीत वर्णातील अगदी लहान फरकसुद्धा महत्त्वाचे असतात, तर काहींत केवळ वर्ण गुणवत्ता मोजणे पुरेसे असते. काही विशिष्ट उपयोगांत प्रकाशाचे वर्णपटीय संघटन निर्धारित करणे आवश्यक असते, तर काहींत संकलित वर्ण माहीत असणे पुरेसे होते. या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक वर्णमापनाचा प्रश्न त्याच्या गुणवत्तेनुसारच सोडविणे आवश्यक ठरते.

वर्णमापनाच्या विविध पद्धती रंगद्रव्ये, रंजक द्रव्ये, रंगलेप, रासायनिक विक्रिया दर्शक, प्रदीपन, कृषिविज्ञान व अन्न, कागद व कागदलगदा उद्योग, प्रकाशीय आविष्कारांचे विश्लेषण, वातावरणविज्ञान, ज्योतिषशास्त्र इ. विविध क्षेत्रांत वापरण्यात येतात. 


वर्णनिर्मितीची वैज्ञानिक उपपत्ती : प्रकाशामुळे वर्णज्ञान होते आणि प्रकाश हे ऊर्जेचे एक रूप आहे. ऊर्जेच्या अक्षय्यतेच्या सिद्धांतानुसार विश्वातील ऊर्जा अनादि व अविनाशी [⟶ द्रव्य आणि ऊर्जा यांची अक्षय्यता]. त्यामुळे ऊर्जा निर्माण होत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही पण ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते. एखाद्या पदार्थापासून किंवा प्रकाश उद्‌गमातून प्रकाश बाहेर पडतो तेव्हा पदार्थाचा अणूरेणूंतील ऊर्जेचा विशिष्ट भाग रूपांतरित होऊन ⇨ फोटॉनांच्या (प्रकाश कणांच्या) रूपाने बाहेर फेकला जातो. एखाद्या पदार्थामुळे प्रकाशकिरण शोषले जातात त्या वेळी प्रकाशकिरणांतील फोटॉनांची ऊर्जा रूपांतरित होऊन पदार्थाच्या अणू, रेणू, आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) यांसारख्या सूक्ष्म कणांमध्ये शोषली जाते. अणुरेणूंच्या ऊर्जेमध्ये होणारे बदल हे  ⇨ पुंज सिद्धांताने नियमित केलेल्या विशिष्ट ऊर्जा अवस्थांमध्येच होतात. त्यामुळे प्रकाशऊर्जेचे उत्सर्जन व शोषण या प्रक्रियादेखील विवक्षित अशा ऊर्जा पातळ्यांमध्येच फक्त होऊ शकतात. पदार्थाच्या मूलकणाच्या विवक्षित ऊर्जा पातळ्या, त्यांमध्ये होणारे ऊर्जा संक्रमण व त्यामुळे पदार्थाचा दिसणारा वर्ण यांतील संबंध आ. ५ मध्ये दाखविले आहे. 

माणिक या रत्नाचा विशिष्ट लाल रंग हा ॲल्युमिनियम ऑक्साइडाच्या स्फटिकामध्ये असलेल्या Cr3+ या क्रोमियम आयनांच्या ऊर्जाबदलामुळे दिसतो. आ. ५ मध्ये Cr3+ आयनाच्या 4A2, 2E, 4T2, 4T1 अशा ऊर्जा पातळ्या दाखविल्या आहेत (आयनाचे ऊर्जासंक्रमण फक्त या पातळ्यांमध्येच होऊ शकते). यांपैकी 4A2 ही पातळी आयनाची अंधारातील म्हणजे तल अवस्था दर्शविते. पांढऱ्या प्रकाशातील २.२ eV आणि ३० eV ऊर्जेच्या फोटॉनांचे शोषण होऊन आयनाची ऊर्जा पातळी त्यामुळे अनुक्रमे 4T2 आणि 4T1 इतकी वाढू शकते. पुंज सिद्धांताच्या विशिष्ट मर्यादेमुळे 2E ही पातळी गाठण्याकरिता आवश्यक ते फोटॉनाचे शोषण शक्य नसते. माणकाच्या रत्नस्फटिकातून श्वेत प्रकाशकिरण आरपार जातात, तेव्हा होणारी वरील दोन ऊर्जा संक्रमणे वा स्फटिकांतील अणूंच्या सामान्य तापमानास होणाऱ्या औष्णिक कंपनांमुळे होणारा ऊर्जा संक्रमणाचा विस्तार या दोहोंचा परिपाक म्हणजे वर्णपटातील जांभळा आणि हिरवट पिवळा हे वर्णपट शोषले जातात, तर भडक तांबडा व फिकट निळा या दोन रंगांच्या किरणांचे स्फटिकातून पारगमन होते (बाहेर पडतात). त्यामुळे हा रत्नस्फटिक किंचित निळसर झाक असलेल्या लालभडक अशा विशिष्ट रंगाचा दिसतो.

आ. ५. (अ) माणिक या स्फटिकातील क्रोमियम (Cr3+) आयनाच्या ऊर्जा पातळ्या व ऊर्जा संक्रमणाचे प्रकार : (अ१) ऊर्जा पातळ्या आकृती व त्यांतील अनुमत संक्रमणे, (अ२) निष्पन्न शोषण व अनुस्फुरण वर्णपट (आ) पाचूचे (एमराल्डचे) शोषण व अनुस्फुरण वर्णपट.


वरील प्रकारच्या ऊर्जाशोषणामुळे स्फटिकातील Cr3+ आयनांची ऊर्जा वाढलेली असते. ही अधिकतर ऊर्जा बाहेर टाकून पुन्हा आपल्या मूळ पातळीवर येण्याकरिता आयनांना पुंजसिद्धांताने मर्यादित केलेला विशिष्ट मार्गच पत्करावा लागतो. तो असा 4T2 किंवा 4T1 या ऊर्जा पातळ्यांवरील आयन प्रथम 2E या मधल्या ऊर्जा पातळीवर येतात. त्यामुळे बाहेर पडलेल्या ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होते व स्फटिकाचे तापमान किंचित वाढते. नंतर 2E वरून  4A2 या आपल्या मूळ ऊर्जा पातळीवर येताना आयनांनी टाकलेल्या (या दोन ऊर्जा पातळ्यांतील फरकाइतक्या ऊर्जेच्या) फोटॉनामुळे चकचकीत तांबड्या वर्णाचे अनुस्फुरण स्फटिकातून दिसते. स्फटिकावर जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रारण पाडल्यास हे अनुस्फुरण अंधाऱ्या खोलीत अधिक स्पष्ट दिसू शकते.

स्फटिकात होणाऱ्या वरील प्रक्रिया व त्यांमधील ऊर्जेची रूपांतरे यांमुळे स्फटिकाचे विवक्षित वर्ण दिसू शकतात. वर्णनिर्मितीची ही एक वैज्ञानिक उपपत्ती म्हणता येईल. सामान्यपणे सर्व दृश्य वर्णाचे मूलभूत कारण इलेक्ट्रॉनांमध्ये होणारे ऊर्जा संक्रमणच असते, मग ते वर दिलेल्याप्रमाणे Cr3+  सारख्या आयनातील विशिष्ट पातळीवरचे इलेक्ट्रॉन असतील किंवा रेणूचा घटक असलेल्या विवक्षित अणुगटातील विशिष्ट इलेक्ट्रॉन असू शकतील. वर्णांची उपपत्ती लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही भौतिकीय व रासायनिक प्रक्रिया तत्त्वांचा केवळ नामनिर्देश कोष्टक क्र. ३ मध्ये केलेला आहे.  

कोष्टक क्र. ३. वर्णाच्या उपपत्तीतील काही भौतिकीय/रासायनिक प्रक्रिया तत्त्वे.

वर्ण विशेष

आधारभूत भौतिकीय/रासायनिक प्रक्रिया तत्त्व

तप्त घन पदार्थांचे वर्ण-प्रकाश

औष्णिक ऊर्जा संक्रमण.

वायुरूप पदार्थांचे वर्ण-प्रकाश (उदा., सोडियम बाष्प, निऑन वायू, पाऱ्याचे बाष्प इ. प्रकारचे दिवे).

अणू / आयन पातळीवरील ऊर्जा संक्रमणे.

जलाशयाच्या पाण्याचा व हिमखंडाचा निळसर रंग, स्वयंपाकाच्या गॅसच्या ज्योतीचे रंग,आयोडीन, ब्रोमीन या द्रव्यांचे रंग इत्यादी.

रेणूतील घटक अणूची कंपने व परिभ्रमणे.

अकार्बनी वर्गातील रंगीत धातवीय संयुगे (उदा., रत्‍नस्फटिक, लोह, क्रोमियम, निकेल, मॅंगॅनीज, कोबॉल्ट, तांबे इ. मूलद्रव्यांची रंगीत संयुगे).

स्फटिक क्षेत्र सिद्धांत (किंवा बंधक क्षेत्र सिद्धांत).

कार्बनी वर्गातील रंगीत संयुगे

रेणवीय परिकक्ष सिद्धांत

शुद्ध व मिश्र धातू, अर्धसंवाहक इत्यादी

ऊर्जा पट्ट सिद्धांत

 [वरील भौतिकीय/रासायनिक तत्त्वांसंबंधी वा सिद्धांतांसंबंधीच्या अधिक माहितीसाठी अणु व आणवीय संरचना घन अवस्था भौतिकी पुंजयामिकी पुंज रसायनशास्त्र रेणवीय संरचना वर्णपटविज्ञान वगैरे नोंदी पहाव्यात. ‘प्रकाशकी’ या नोंदीत परावर्तन, प्रणमन, अपस्करण, व्यतिकरण, विवर्तन, प्रकीर्णन इ. प्रकाशकीय आविष्कारांद्वारे निर्माण होणाऱ्या वर्णासंबंधीचे विवरण केलेले आहे.]

वर्णांचे संवेदन किंवा जाणीव :वर्ण परिणाम : जेव्हा एखादी व्यक्ती अपारदर्शक वस्तू पहाते तेव्हा त्या वस्तूपासून विचलित झालेल्या प्रकाशामुळेच डोळा व मेंदू यांतील दृक् प्रक्रिया कार्यान्वित होते. निरनिराळ्या प्रकाश उद्‌गमांचे वर्णपटीय ऊर्जा वितरण निरनिराळे असल्याने (चित्रपत्र ४४ मधील आ. २ पहा) दिलेली वस्तू वा प्रदीपनात निरनिराळे ऊर्जा वितरण परावर्तित करेल. असे असूनसुद्धा डोळा व मेंदू या इतक्या उत्कृष्ट प्रणाली आहेत की, अशा फरकांच्या बाबतीत त्या योग्य ती भरपाई करू शकतात आणि सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या वर्णांचे संवेदन होते. या आविष्काराला वर्ण स्थिरता म्हणतात.

वर्णांत सूक्ष्म फरक असल्यास वर्ण स्थिरता तत्त्व मात्र लागू पडत नाही. उदा., दोन नारिंगी वस्तूंपैकी एक नारिंगी रंगद्रव्याने रंगविलेली असेल आणि दुसरी तांबड्या व पिवळ्या रंगद्रव्यांचा संयोग करुन रंगविलेली असेल, तर त्या दोन वस्तू दिवसाच्या प्रकाशात अचूकपणे सारख्याच रंगाच्या दिसतील पण टंगस्टन दिव्याच्या प्रकाशात एक वस्तू दुसरीपेक्षा जास्त तांबडट दिसेल. या परिणामामुळे एखाद्या नमुन्याच्या वर्णाची वर्णतक्तासंग्रहातील वर्णाशी तुलना करताना प्रदीपनाच्या व निरीक्षण दिशेच्या विनिर्देशित अटींचे अचूकपणे पालन करणे आवश्यक असते. 

     प्रदीपन तीव्रतेचाही वर्णसंवेदनावर परिणाम होतो. तीव्रतर प्रदीपनातील सापेक्ष दीप्तीशी तुलना करता अतिशय कमी प्रमाणातील प्रकाशात निळ्या व हिरव्या वस्तू तांबड्या वस्तूंपेक्षा अधिक दीप्तिमान वाटतात. या परिणामाला जे. ई. पुर्‌किन्ये या शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून पुर्‌किन्ये च्युती म्हणतात. प्रदीपनाच्या उच्चतर पातळ्यांवर अशाच स्वरूपाची वर्णविशेषांतील च्युती आढळून येते आणि तीत प्रदीपनाच्या वाढत्या पातळीबरोबर बहुतेक वर्ण कमी प्रमाणात तांबडे किंवा हिरवे व जास्त प्रमाणात निळे किंवा पिवळे दिसतात. याला डब्ल्यू. फोन बेझोल्ट व ई. डब्ल्यू. फोन ब्र्युक या शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावांवरून बेझोल्ट-ब्र्युक परिणाम म्हणतात.

फिकट निळ्या प्रकाशाने एकसारखे प्रदीपन केलेल्या एखाद्या पडद्यावर पांढऱ्या प्रकाशाचा तेजस्वी ठिपका प्रक्षेपित केला, तर पांढरा प्रकाश फिकट पिवळा व निळा प्रकाश हे दोन्ही (म्हणजे निळा व पांढरा प्रकाश) अलगपणे पहिल्यापेक्षा अधिक करडा दिसतो. याला समकालिक वर्ण-विरोध परिणाम म्हणतात. यात लगतच्या प्रदीपनामुळे पूरक वर्णविशेषाचे प्रवर्तन होते. एखाद्या व्यक्तीने एका वर्णावर टक लावून नंतर दुसऱ्या वर्णाकडे नजर वळविली, तर असाच परिणाम (क्रमागत वर्ण-विरोध) घडून येतो. एखाद्या वर्ण आकृतिबंधावर एखाद्या व्यक्तीने काही काळ टक लावून पाहिले व मग पांढऱ्या क्षेत्राकडे पाहिले, तर आकृतिबंधाच्या पूरक वर्णविशेषांतील ऋण पश्चात प्रतिमा दिसते. या परिणामाला वार्णिक अनुकूलन म्हणतात आणि या परिणामामुळेच एखाद्या व्यक्तीने हिरवे कुरण पाहिले व लगेच तपकिरी वर्ण पाहिल्यास तो त्याला लालसर वाटतो. अशा प्रकारे दिलेल्या वस्तूचा वर्ण मोजला व त्याचे भौतिकीय कारणही ओळखले, तरी दृक् परिणामांमुळे त्या वर्णाचे अचूक संवेदन निर्देशित करण्यास प्रतिबंध होऊ शकतो. यांपैकी काही परिणामांचे स्पष्टीकरण प्रदीपन तीव्रतेत बदल होताना निरनिराळ्या वर्णांना असलेली डोळ्यातील ग्राहींची संवेदनशीलता बदलते, विशिष्ट ग्राहींचा थकवा किंवा ग्राहींची प्रतिबंधकता, असे सुलभतेने देता येईल परंतु इतर परिणामांचे मात्र आकलन झालेले नाही. खरे म्हणजे डोळा व मेंदू यांना ज्या प्रक्रियेने वर्णांची जाणीव होते तिची १९६० नंतरच्या प्रारंभीच्या काळापर्यंत शास्त्रज्ञांना माहिती नव्हती आणि अद्यापही तिचे सर्व तपशील समजलेले नाहीत.   


वर्ण दृष्टी : त्रिवर्णी सिद्धांत हा वर्ण दृष्टीसंबंधीचा एक सर्वांत यशस्वी सिद्धांत १८०१ मध्ये प्रथम टॉमस यंग या इंग्लिश शास्त्रज्ञांनी मांडला. या सिद्धांतात सु. ५० वर्षांनंतर हेर्मान हेल्महोल्ट्स या जर्मन शास्त्रज्ञांनी सुधारणा केल्या. हा सिद्धांत वर्ण सुजोडीकरणाच्या प्रयोगांवर आधारलेला असून त्यामध्ये डोळ्यात तीन प्रकारच्या वर्ण ग्राही कोशिका (पेशी) असतात, असे गृहीत धरण्यात आलेले होते. अशा ग्राही कोशिकांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाला १९६० नंतरच्या दशकाच्या प्रारंभीच्या काळात पुष्टी मिळाली. अशा वर्ण ग्राही कोशिका मानवाबरोबरच ⇨ नरवानर गणातील इतर प्राण्यांत तसेच पक्षी, मासे, सरीसृप (सरपटणारे प्राणी) व कीटक यांच्या काही विशिष्ट जातींत आढळतात. या कोशिकांना त्यांच्या आकारावरून ‘शंकू’ असे म्हणतात. तीन प्रकारांच्या शंकूंची वर्णपटातील निळ्या, हिरव्या व तांबड्या वर्णांना महत्तम संवेदनाक्षमता असून त्यांच्या महत्तम शोषणक्षमता अनुक्रमे ४४५ नॅमी., ५३५ नॅमी. व ५६५ नॅमी. या तरंगलांब्यांच्या जवळपास असतात. शंकूंचे हे तीन संच त्यांच्या लघू, मध्यम व दीर्घ व तरंगलांब्यांना असलेल्या संवेदनाक्षमतेनुसार S, M व L असे निर्देशित करतात. त्रिवर्णी सिद्धांतानुसार S, M व L शंकूंच्या अनुक्रियांच्या सापेक्षा तीव्रतेमुळे वर्ण दृष्टी निष्पन्न होते. या तिन्ही प्रकारांच्या शंकूंच्या समान उद्दीपनामुळे पांढऱ्या वर्णाची जाणीव होते. हा त्रिवर्णी सिद्धांत व त्रिवर्ण (परावर्तनक्षमता) मापन पद्धती यांत अर्थातच निकटचा संबंध आहे. 

त्रिवर्णी सिद्धांताचे एक सामर्थ्य म्हणजे कित्येक प्रकारच्या रंगांधत्वांचे [⟶ डोळा] स्पष्टीकरण एक अगर अधिक शंकू संचांच्या कार्यांचा अभाव असे सहजपणे देता येते. जर एक शंकू संच कार्य करीत नसेल, तर द्विवार्णिकता (दुरंगी दृष्टी) उद्‌भवते. ज्या व्यक्तींत M संचाचा अगर L संचाचा अभाव असेल त्यांना फक्त निळ्या व पिवळ्या वर्णांची जाणीव होते. S संचाचा अभाव पुष्कळच कमी प्रमाणात आढळतो आणि अशा व्यक्तींना फक्त हिरव्या व तांबड्या वर्णांची जाणीव होते. ज्यांच्यात कार्यकारी शंकू प्रणालीच नाही अशा अतिशय विरळा आढळणाऱ्या व्यक्तींत एक वार्णिकता उद्‌भवते व त्यांना फक्त करड्या छटांचीच जाणीव होते.

त्रिवर्णी सिद्धांताद्वारे वर्ण दृष्टीचे बऱ्याच प्रमाणात स्पष्टीकरण देता येत असले, तरीसुद्धा इतर सिद्धांतांनाही  (विशेषतः प्रतिरोधी प्रक्रिया सिद्धांत) पाठिंबा देण्यात आलेला असून त्यांचा अभ्यासही करण्यात आलेला आहे. प्रतिरोधी प्रक्रिया सिद्धांत १८७८ मध्ये प्रथम जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक एव्हास्ट हेरिंग यांनी मांडला. या सिद्धांतामध्ये वर्ण दृष्टीत तीन यंत्रणांचा संबंध येतो आणि प्रत्येक यंत्रणा फिकट-गडद, तांबडा-हिरवा व निळा-पिवळा या विरोधी जोड्यांना अनुक्रिया दर्शविते, असे गृहीत धरले आहे. तो अनेक मानस भौतिक निरीक्षणांवर [⟶ मानसभौतिकी] आधारलेला असून त्यांत जाणीव झालेल्या कोणत्याच वर्णात निळा व पिवळा (तसेच तांबडा व हिरवा) यांचे सह-अस्तित्व नसते म्हणजेच निळसर पिवळा वा लालसर हिरवा असे वर्ण अस्तित्वात नाहीत या निरीक्षणाचाही समावेश आहे. पुष्कळशा विरोधी व पश्चात प्रतिमा परिणामांचे स्पष्टीकरण या सिद्धांताद्वारे सुलभपणे देता येते.

त्रिवर्णी व प्रतिरोधी प्रक्रिया हे सिद्धांत विजोड नाहीत, असे आता मान्य झालेले आहे. त्यांचे अनेक विभागीय सिद्धांतांत एकत्रिकरण करण्यात आलेले आहे. एका विभागात शंकू त्रिवर्णी पद्धतीने कार्य करतात, तर दुसऱ्या विभागात शंकूंकडून येणाऱ्या संकेतांचा तंत्रिका (मज्जा) कोशिकांत संयोग करण्यात येऊन एक उदासीन किंवा अपवार्णिक (श्वेत-कृष्ण) आणि दुसरा वार्णिक (निळा-पिवळा व हिरवा-तांबडा) असे संकेत निर्माण होतात आणि मग त्यांचे मेंदूत अर्थबोधन केले जाते, असे या सिद्धांतांत मानण्यात येते. त्रिवर्णी व प्रतिरोधी प्रक्रिया या वर्ण सिद्धांतांचा समावेश करणारे विभागीय सिद्धांत वर्ण संवेदनासंबंधीच्या अनेक बाबींचे स्पष्टीकरण करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेले असले, तरी काही तपशीलांबाबत अद्याप संशोधन कार्य करणे आवश्यक आहे, हे स्पष्ट आहे.

वर्ण मानसशास्त्र : दैनंदिन जीवनातील वर्णांसंबंधीची कदाचित सर्वांत महत्त्वाच्या बाबीची व्याख्या अगदी कमी काटेकोरपणे केली गेलेली असून ही बाब सर्वांत जलद बदलणारीही आहे. तीत वर्णांच्या सौंदर्यशास्त्रीय व मानसशास्त्रीय अनुक्रियांचा समावेश होतो आणि तिचा कला, फॅशन, व्यापार, तसेच भौतिक व भावनिक वेदना यांवर प्रभाव पडतो. वर्ण व भावना यांतील दुव्याचे एक उदाहरण म्हणजे तांबडा, नारिंगी, पिवळा व तपकिरी हे वर्ण ‘उष्ण’ तर निळा, हिरवा व करडा हे वर्ण ‘थंड’ असल्याची सर्वसाधारणपणे आढळणारी जाणीव. तांबडे, नारिंगी व पिवळे वर्ण उत्तेजन, आनंद व आक्रमकता यांचे, निळे व हिरवे वर्ण सुरक्षितता व शांतता यांचे, तर तपकिरी, करडे व काळे वर्ण दुःख, विषण्णता व खिन्नता यांचे प्रवर्तन करतात, असे म्हटले जाते. अर्थात येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, वर्णाचे मानसशास्त्रीय संवेदन हे व्यक्तिनिष्ठ आहे आणि त्याची विशेष लक्षणे व उपयोग यांसंबंधी केवळ सर्वसाधारण विवेचन करणे शक्य आहे.

वर्ण हे सार्वत्रिक स्वरूपाचे नाहीत. काही भाषांमध्ये हिरवा व निळा किंवा पिवळा व नारिंगी या वर्णांकरिता वेगवेगळे शब्द नाहीत. निरनिराळ्या हिम परिस्थितींच्या संदर्भात एस्किमो लोक श्वेत वर्णासाठी निरनिराळ्या १७ शब्दांचा उपयोग करतात. निरनिराळ्या संस्कृतींमधील वर्णविषयक परिभाषेची तुलना केल्यास विशिष्ट आकृतिबंध आढळून येतात. सर्व भाषांत काळ्या व पांढऱ्या वर्णांकरिता नावे आहेत. जर तिसरा वर्ण वेगळा म्हणून ओळखण्यात येत असला, तर तो तांबडा असतो त्यानंतर पिवळा किंवा हिरवा हे दोन्ही येतात. निळा हा नाव दिलेला सहावा वर्ण आढळतो व तपकिरी सातवा असतो. शेवटी कोणताही विशिष्ट क्रम न ठेवता करडा, नारिंगी, गुलाबी व जांभळा या वर्णांची नावे आढळतात.

वर्ण परिभाषेप्रमाणेच वर्ण सुसंवाद, वर्णासंबंधीच्या आवडीनिवडी, वर्ण प्रतीकात्मकता व वर्णाच्या इतर मानसशास्त्रीय बाबी संस्कृतीने मर्यादित केलेल्या आढळतात. या बाबी स्थळ व ऐतिहासिक कालमान यांनुसार पुष्कळच बदलत जातात. एका पाहणीत असे आढळून आले की, अमेरिकन व जपानी लोकांच्या उष्ण व थंड वर्णासंबंधीच्या संकल्पना मूलतः सारख्याच आहेत परंतु जपानमध्ये निळे व हिरवे वर्ण ‘चांगले’  आणि तांबड्या जांभळ्या श्रेणीतील ‘वाईट’ मानले जातात, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत तांबड्या-पिवळ्या- हिरव्या श्रेणीतील ‘चांगले’ आणि नारिंगी व लाल-जांभळे ‘वाईट’ मानले जातात. पश्चिमी देशांत सुतकाचा वर्ण काळा आहे तथापि इतर संस्कृतींत याकरिता पांढरा, जांभळा किंवा सोनेरी वर्ण वापरले जातात. अनेक भाषांत वर्णाचा रूपकात्मक उपयोग करणारे शब्दप्रयोग आढळतात (उदा., मराठीतील ‘पांढऱ्या पायाचा’, ‘रागाने लालभडक होणे’, ‘हिरवट माणूस’ आणि इंग्रजीतील ‘ब्लॅक रेंज’, ‘फिलिंग ब्ल्यू’, ‘ग्रीन वुइथ एन्व्ही’) आणि ते नेहमीच इतर भाषांत शब्दशः भाषांतरित करता येतील असे नाही, कारण यात वर्णाच्या संबंधित प्रतीकात्मक अर्थ हरवून जाण्याची शक्यता असते. 


वर्णाची प्रतीकात्मकता कला, धर्म, राजकारण व शिष्टाचार यांत तसेच दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. भारताच्या राष्ट्रध्वजातील केशरी वर्ण त्याग व धैर्य, पांढरा वर्ण सत्य व शांतता आणि हिरवा वर्ण प्रेम व विश्वास यांची प्रतीके आहेत. वर्णांच्या तीव्र भावनिक गुणधर्मामुळे वर्ण संवेदनावर परिणाम होऊ शकतो, उदा., नारिंगी कागदाची सफरचंदाच्या वा हृदयाच्या आकाराची आकृती कापलेली असल्यास तिचा वर्ण त्याच कागदापासून कापलेल्या इतर भूमितीय आकृत्यांपेक्षा काहीसा लालसर दिसू शकेल. या आकाराशी संबद्ध असलेला विशिष्ट मानसिक अर्थ हेच याचे कारण आहे. 

भावनिक साहचर्याखेरीज वर्ण संवेदनावर परिणाम होणाऱ्या इतर घटकांमध्ये निरीक्षकाचे वय, त्याची मनःस्थिती व मानसिक आरोग्य यांचा समावेश होतो. ज्या लोकांत एखादा विभिन्न वैयक्तिक गुणविशेष सामाईक आढळतो त्यांच्यातील वर्णाची जाणीव व आवडीनिवडी बहुधा समान असल्याचे दिसून येते उदा., छिन्नमानस ही मानसिक विकृती असलेल्या व्यक्तींमध्ये अपसामान्य वर्ण संवेदन आढळते, असे सांगण्यात येते. वर्णांमधील भिन्नता शिकणारी अगदी लहान मुले सामान्यतः तांबड्या किंवा नारिंगी वर्णाला पसंती दर्शवितात. अनेक मानसशास्त्रज्ञांना असा विश्वास वाटतो की, एखाद्या व्यक्तीने विविध वर्णांचा केलेला उपयोग व त्यांना दर्शविलेल्या अनुक्रिया यांच्या विश्लेषणावरून त्या व्यक्तीच्या शरीरक्रियात्मक व मानसिक अवस्थेसंबंधी माहिती मिळणे शक्य आहे. विशिष्ट वर्णांचा  भौतिक व मानसिक विकलांगतेवर चिकित्सात्मक उपयोग होऊ शकतो, असेही सुचविण्यात आले आहे. [⟶ वर्ण चिकित्सा].

वर्णांच्या वरील वैद्यकीय लाभांविषयी अद्यापि शंका असल्या, तरी मानवात व काही प्राण्यांत वर्णांमुळे निश्चित भौतिक व मानसिक प्रतिक्रिया निर्माण होतात, असे दाखवून देण्यात आलेले आहे. पांढऱ्या वा ‘शीत’ वर्णांच्या फिकट छटांमध्ये असलेल्या खोल्या व वस्तू अतिशय गर्द वा उष्ण वर्णांच्या खोल्यांपेक्षा वा वस्तूंपेक्षा जास्त मोठ्या भासणे शक्य असते. काळ्या वा अतिशय गर्द वर्णाचा होणारा आकुंचन परिणाम अभिकल्पकांना व सजावट करणाऱ्यांना चांगला माहीत आहे. समान उबदारपणाची जाणीव निर्माण करण्यासाठी फिकट निळ्या रंगात सजवलेल्या ‘शीत’ खोलीकरिता, फिकट नारिंगी रंगात रंगविलेल्या उबदार खोलीपेक्षा ⇨ तापनियंत्रकाचे नियोजन उच्चतर पातळीच्या तापमानाला करावे लागते. खास प्रदीपन योजनेद्वारे निर्माण केलेल्या असामान्य वर्णांच्या प्रदर्शनामुळे ते पाहणाऱ्या लोकांना डोकेदुखी व तंत्रिका विकारांचा उपद्रव होणे शक्य आहे. अशा प्रदीपन परिस्थितीत दिलेले रुचकर सात्त्विक खाद्यपदार्थही तिटकारा आणणारे व कदाचित आजारीपणा निर्माण करणारे ठरू शकतात. काही वर्ण निरीक्षकात आनंदाची भावना निर्माण करतात. एखादा कमी आनंददायक वर्ण प्रथम पाहिल्यानंतर दुसरा आनंदी जाणीव देणारा वर्ण पाहिल्यास तो दुसरा वर्ण नुसताच पहिल्यापेक्षा अधिक आनंद निर्माण करतो. परिणामाला प्रभावकारी प्रतिरोध वृद्धी म्हणतात.

वर्णांच्या संयोगांचा निरीक्षकावर होणारा परिणाम एकेकट्या वर्णांच्या परिणामावर तर अवलंबून असतोच पण त्याचबरोबर तो संयोगित वर्णाचा सुसंवाद व आकृतिबंधाची रचना यांवरही अवलंबू असतो. कलावंत व अभिकल्पक यांनी अनेक शतके वर्णांच्या परिणामांचा अभ्यास केलेला आहे आणि वर्णांच्या उपयोगासंबंधी अनेक सिद्धांत विकसित केलेले आहेत. या सिद्धांतांची संख्या व त्यांची विविधता पाहिल्यास कोणतेच सर्वमान्य नियम मांडता येत नाहीत, हे स्पष्ट आहे. शेवटी वर्ण वेदन हे व्यक्तिगत अनुभवावरच अवलंबून असते.

पहा : छायाचित्रण डोळा प्रकाशकी प्रकाशमापन रंग, कलेतील रंगद्रव्ये रंजक व रंजक द्रव्ये रंजन, जैव वर्णपटविज्ञान संवेदन संवेदना तंत्र.

संदर्भ : 1. Burnham, R. W. and others, Color : A Guide to Basic Facts and Concepts, New York, 1963.

           2. Boynton, R. M., Human Color Vision, New York, 1979.

           3. Eastman Kodak Company, Color As Seen and Photographed, Rochester, 1962.

           4. Evans, R. M. An Introduction to Color, New York, 1965.

           5. Hurvich, L. M. Color Vision, 1981.

           6. Judd, D. B. Wyszecki, G. Color in Business, Sciences and Industry, New York, 1975.

           7. Macadam, D. L. Color Measurements : Theme and Variations, 1985.

           8. Stiles, W. S. Mechanisms of Color Vision, New York, 1978.

           9. Wasserman, G. S. Color Vision : An Historical Introduction, New York, 1978.

          10. Wright, W. D. The Measurement of Color, London, 1969.

पाटणकर, भा. वि. खेडेकर, आ. वि. भदे, व. ग.


आ. १. (अ) प्रकाशक्षेपकांवर तांबडी, हिरवी व निळी अशा गाळण्या लावून मिळणारे वर्णांचे संयोगीकरण (आ) वर्णांचे विलगीकरण : आ १- सियान गाळणी, आ २-मॅजेन्टा गाळणी, आ ३-पिवळी गाळणी. आ. २. काही प्रकाश उद्‌गमांचे वर्णपटीय ऊर्जा वितरण आलेख. आ. ३. प्रमाणभूत वर्णवैपुल्य आकृती. आ. ४. मन्सेल वर्णमापन पद्धती : (अ) प्रमुख वर्णविशेष दर्शविणारे वर्तुळ : यातील प्रत्येकाचा गुणांक ५ आहे (आ) ५ पी बी (पर्पल ब्ल्यू किंवा जांभळट निळा) या वर्णाच्या परावर्तनक्षमता व संपृक्तता गुणांकांत होणारे सर्व बदल दर्शविणारा तक्ता (इ) वर्णविशेष, परावर्तनक्षमता व संपृक्तता यांतील त्रिमितीय संबंध दर्शविणारा वर्णवृक्ष.