ल्यौ जुंग-युआन : (७७३-८१९). चिनी साहित्यिक. शान्सी प्रांतातील तुंगा-ग्वान) येथे जन्मला. बराच काळ त्याने सरकारी सेवक म्हणून व्यतीत केला. राजद्रोही म्हणून देहान्ताची सजा झालेल्या एका नेत्याच्या गटाशी संबंध असल्याच्या आरोपवरून त्याला पदावनत करण्यात आले आणि दक्षिण चीनमधील वेगवेगळ्या एकाकी ठिकाणी त्याला हद्दपार करण्याचे धोरण अवलंबिले गेले.

ल्यौ जुंग-युआन हा हान यू ह्या चिनी साहित्यश्रेष्ठीचा समकालीन. चिनी साहित्यात अभिजात साहित्यशैलीचे पुनरुज्जीवन व्हावे आणि फ्यन-वन ह्या नावाने प्रचलित असलेल्या कृत्रिम आणि अवघडल्या भाषाशैलीला विरोध करावा, ह्या हान यूच्या भूमिकेला त्याने पाठिंबा दिला. अभिजात गद्यशैलीतला साधेपणा आणि लवचिकपणा त्यालाही विलोभनीय वाटत होता. त्याच्या उपरोधप्रचुर निबंधांसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. ‘बायॉग्रफी ऑफ फू-फान’ (इं. शी.) हा त्याचा निबंध निर्देशनीय आहे. फू-फान हे एका कीटकाचे नाव. ह्या कीटकाच्या प्रतीकाआडून ल्यौ जुंग-युआनने लोभीपणावर टीका केली आहे. तथापि निसर्गवर्णनाला वाव असलेले त्याचे निबंध उत्कृष्ट आहेत. ग्वांगसे प्रांतातील ल्यौ-जाव येथे तो निघन पावला.

थान जुंग (इ.)  कुलकर्णी, अ. र. (म.)