लेडरमन, ली ऑन मॅक्स : (१५ जुलै १९२२- ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. म्यूऑनीय न्यूट्रिनोचा शोध व उच्च ऊर्जायुक्त न्यूट्रिनोंच्या शलाकांची निर्मिती या कार्याकरिता लेडरमन यांना ⇨ मेल्व्हिन इव्हार्त्स व ⇨ जॅक स्टाइनबर्गर यांच्याबरोबर १९८८ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान विभागून मिळाला. (प्रस्तुत नोंदीतील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘कण अभिज्ञातक’, ‘कणवेगवर्धक’, ‘न्यूट्रिनो’व ‘मूलकण’या नोंदी पहाव्यात).
लेडरमन यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. न्यूयॉर्क येथील सिटी कॉलेजमधून बी.एस. पदवी १९४३ मध्ये मिळविल्यावर त्यांनी अमेरिकेच्या लष्करी संदेश दलात तीन वर्ष नोकरी केली. पुढे कोलंबिया विद्यापीठाच्या ए.एम्. (१९४८) व पीएच्.डी. (१९५१) या पदव्या संपादन केल्यावर त्याच विद्यापीठात ते अध्यापन करू लागले. १९५८ मध्ये त्या विद्यापीठात प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व १९७३ मध्ये ते भौतिकीचे यूनिज हिगिन्स प्राध्यापक झाले. १९६० मध्ये नेव्हिस लॅबोरेटरीजच्या संचालकपदावरही त्यांची नेमणूक झाली व १९७९ मध्ये ते फेर्मी नॅशनल ॲक्सिलरेटर लॅबोरेटरीचे (फेर्मी लॅबचे) संचालक झाले.
लेडनमन यांनी मूलकणांचे गुणधर्म व त्यांच्या परस्परक्रिया यांसंबंधी करण्यात आलेल्या कित्येक महत्त्वाच्या प्रयोगांत सहकार्य केले. कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी असताना नेव्हिस लॅबोरेटरीजमधील सायक्लोट्रॉनाचा उपयोग करून पाय-मेसॉनांची (पायॉनांची) शलाका प्रथमच मिळविण्यात तसेच या शलाकेचा उपयोग करून पायॉनांचे गुणधर्म व परस्परक्रिया यांचा अभ्यास करण्याच्या प्रयोगांत त्यांचा सहभाग होता. १९५६ व १९५७ मध्ये त्यांनी ब्रुकहॅवन नॅशनल लॅबोरेटरीतील कणवेगवर्धकाच्या साहाय्याने करण्यात आलेल्या प्रयोगात भाग घेतला. या प्रयोगातून पुढे दीर्घायुषी, विद्युत् भारहीन के-मेसॉन (केऑन) या कणाचा शोध लागला. १९५७ मध्ये समता अक्षय्यता तत्त्वाच्या [⟶समता] उल्लंघनाच्या भाकिताच्या चाचणीकरिता करावयाच्या टी.डी.ली. व सी.एन्. यांग यांनी सुचविलेल्या एका प्रयोगात लेडरमन सहभागी झाले होते. १९६१ व १९६२ मध्ये लेडरमन, श्व्हार्त्स, स्टाइनबर्गर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रुकहॅवन येथील आल्टरनेटिंग ग्रेडिअंट सिंक्रोट्रॉन या कणवेगवर्धकातून मिळालेल्या उच्च ऊर्जायुक्त प्रोटॉनांचा बेरिलियम लक्ष्यावर भडिमार केला. यामुळे प्रोटॉन, न्यूट्रॉन व पायॉन यांचा वर्षाव उत्पन्न झाला. लक्ष्यापासून दूर जात असताना पायॉनांचे म्यू-मेसॉन (म्यूऑन) व न्यूट्रिनो यांत विघटन झाले. या शास्त्रज्ञांनी मग ही शलाका १३.५ मी. जाडीच्या पोलादी लाद्यांच्या भिंतीतून नेल्यावर न्यूट्रिनोंखेरीज इतर सर्व कण गाळले गेले. नंतर न्यूट्रिनो एका १० टन वजनाच्या स्फुल्लिंग कोठी अभिज्ञातकात शिरले. एकूण आठ महिन्यांच्या प्रयोगकाळात या अभिज्ञातकात शिरलेल्या कोट्यावधी न्यूट्रिनोंपैकी फक्त सु. ५० न्यूट्रिनोंची पुरेशी परस्परक्रिया होऊन त्यांचे समाधानकारकपणे अभिज्ञान करणे (अस्तित्व ओळखणे) शक्य झाले (आता फेर्मी ट्रेव्हॅट्रॉन या वेगवर्धकातून मिळणाऱ्या संख्येने तितक्याच पण १००० GeV ऊर्जा असलेल्या प्रोटॉनांद्वारे सु. दहा लाख न्यूट्रिनो घटना मिळू शकतात). पूर्वीच्या संशोधनावरून द्रव्याशी परस्परक्रिया होताना निर्माण होणाऱ्या न्यूट्रिनोंशी इलेक्ट्रॉन किंवा म्यूऑन संलग्न असू शकतात, हे माहीत होते परंतु पायॉन विघटनातून तयार झालेल्या न्यूट्रिनोंबरोबर फक्त म्यूऑन निर्माण झाले, असे अभिज्ञातकात दिसून आले. यावरून इलेक्ट्रॉनाशी संलग्न असलेला एक (इलेक्ट्रॉनीय न्यूट्रिनो) व म्यूऑनाशी संलग्न असलेला एक (म्यूऑनीय न्यूट्रिनो) असे एकूण दोन वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिनो असतात, याची खात्री झाली. या त्यांच्या शोधामुळे सर्व मूलकणांचे परस्परांमधील संबंध दर्शविणाऱ्या प्रचलित प्रतिमानाचा (मॉडेलचा) विकास होण्यास व दुर्बल अणुकेंद्रीय प्रेरणेसंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्यास मोठी मदत झाली. याखेरीज मूलकणांच्या अभ्यासाकरिता न्यूट्रिनो शलाका हे एक प्रमाणभूत साधन उपलब्ध झाले. १९६५ मध्ये लेडरमन यांनी क्वार्क कणांचा शोध लावण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असलेल्या व भारी द्रव्यमानाच्या कणांच्या तलासाकरिता आखलेल्या प्रयोगाचे एस्.सी.सी.टिंग यांच्याबरोबर नेतृत्व केले. १९६७ पासून ते प्रोटॉन-न्यूक्लिऑन यांच्या परस्पर आघातांत निर्माण होणाऱ्या लेप्टॉन युग्मांच्या अभ्यासाकरिता योजलेल्या प्रयोगमालेचे प्रमुख होते. त्यानंतरही त्यांनी फेर्मी लॅब, सर्न (जिनीव्हा) वगैरे अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या मूलकणांविषयीच्या प्रयोगांत सहकार्य केले.
लेडरमन यांना नोबेल पारितोषिकाखेरीज राष्ट्रीय विज्ञान पदक (१९६५), टाउनझेंड हॅरिस पदक (१९७३) व एलियट क्रिसन पदक (१९७६) हे सन्मान मिळाले. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन फिजिकल सोसायटी व अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ आर्ट्स अँड सायन्स या मान्यवर संस्थांचे ते सदस्य आहेत. मूलकणांविषयी त्यांचे सु. १०० निबंध विविध भौतिकी नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. कॉमेंट्स ऑन न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स या नियतकालिकाचे १९६७-७२ या काळात ते संपादक होते.
भदे, व. ग.