लेअव्हि-चीव्हिता, तूल्यो : (२९ मार्च १८७३-२९ डिसेंबर १९४१). इटालियन गणितज्ञ. अवकलन [⇒ अवकलन व समाकलन] व ⇒ सापेक्षता सिद्धांत या विषयांतील कार्याकरिता विशेष प्रसिद्ध.

लेअव्हि-चीव्हिता यांचा जन्म पॅड्युआ येथे झाला. पॅड्युआ विद्यापीठात गणिताचे शिक्षण घेऊन त्यांनी १८९४ मध्ये पदविका मिळविली. पॅव्हिआ येथील विज्ञान शाखेला जोडलेल्या शिक्षकांच्या महाविद्यालयात १८९५ मध्ये ते निवासी प्राध्यापक झाले. नंतर पॅड्युआ विद्यापीठात १८९८ मध्ये ते निदेशक व पुढे १९०२ मध्ये यामिकीचे (वस्तूंवरील प्रेरणांची क्रिया व त्यामुळे निर्माण होणाऱ्या गती यांच्या विषयीच्या शास्त्राचे) प्राध्यापक झाले. त्यांनी १९१८ ते १९३८ पर्यंत रोम विद्यापीठात अध्यापन केले परंतु मूलतः ज्यू असलयाने फॅसिस्ट कायद्यान्वये त्यांना प्राध्यापकपदावरून काढून टाकण्यात आले.

पॅड्युआ विद्यापीठात ⇒ ग्रेगॉऱ्यो रीत्वी-कूर्बास्त्रो हे त्यांचे एक प्राध्यापक होते. केवल अवकलनशास्त्राचा [याला आता प्रदिश विश्र्लेषण असे म्हणतात ⇒ प्रदिश] पाया घालण्यात लेअव्हि-चीव्हिता यांनी त्यांच्याशी सहकार्य केले. १९०० साली त्यांनी रीत्वी यांच्या समवेत Methodes de calcul differential absolu et leurs applications हा प्रदिश कलनशास्त्रावरील आद्य प्रवर्तक ग्रंथ लिहिला. व्यापक वक्र अवकाशातील समांतर स्थानांतर ही त्यांची या गणितीय शाखेतील सर्वांत महत्त्वाची संकल्पना १९१७ साली त्यांनी मांडली. लवकरच या संकल्पनेचे अनेक उपयोग असल्याचे दिसून आले. सापेक्षता सिद्धांतात विद्युत् चुंबकीय व गुरुत्वीय क्षेत्रांचे एकीकृत निदर्शन करण्यासाठी ही संकल्पना पायाभूत आहे. ही संकल्पना ⇒ संस्थितिविज्ञानातील व्यापकीकृत अवकाशांच्या आधुनिक अवकल सिद्धांताच्या विकासासही कारणीभूत ठरली आहे.

शुद्ध व अनुप्रयुक्त गणितातील त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सु. २०० संस्मरणिका वैश्र्लेषिक यामिकी, ⇒ खगोलीय यामिकी, द्रायुगतिकी (वायू व द्रव यांना लावलेल्या प्रेरणांमुळे त्यांत निर्माण होणाऱ्या गतीचा अभ्यास करणारे शास्त्र), स्थितिस्थापकता (लवचिकता), विद्युत चुंबकत्व व आणणीय भौतिकी या विषयांशी संबंधित होत्या. १८९३ ते १९२८ या काळात त्यांनी लिहिलेल्या संस्मरणिका व टिपणे एकत्रित रीत्या Opera mathematiche, Memorie e note (४ खंड, १९५४-६०) या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आल्या, खगोलीय यामिकीतील त्रि-पिंड व्यूहाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी पुष्कळ प्रगती केली होती. अभिजात व सापेक्षीय यामिकीतील समस्यांसंबंधीचा Questioni di meccanica classica e relativistica (१९२४) आणि केवल अवकलनशास्त्रावरील Lezioni di calcolo differential assoluto (१९२५) हे त्यांचे ग्रंथ प्रमाणभूत मानले जातात. याखेरीज Lezioni di meccanica rezionale (२ खंड, १९२६-२७) हा उगो अमाल्डी यांच्याबरोबर लिहिलेला ग्रंथ तसेच Fondamenti di meccanica relativistica (१९२८) हा ग्रंथ हेही अभिजात महत्त्वाचे आहेत. ते रोम येथे मुत्यू पावले.

ओक, स. ज.