लाव्हरां, शार्ल ल्वी आल्फाँस : (१८ जून १८४५-१८ मे १९२२ ). फ्रेंच वैद्य, विकृतिवैज्ञानिक व परजीवीवैज्ञानिक (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या सजीवासंबंधीच्या विज्ञानाचे तज्ञ). त्यांनी माणसातील ⇨हिवतापाला (मलेरियाला) कारणीभूत असणाऱ्या परजीवीचा शोध लावला. या व प्रजीवांमुळे (प्रोटोझोआंमुळे) होणाऱ्या इतर रोगांसंबंधी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना १९०७ सालच्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
लाव्हरां यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण स्ट्रॅस्बर्ग येथे झाले. १८७०-७१ मध्ये झालेल्या फ्रँको-प्रशियन युद्धात त्यांनी लष्करी वैद्य म्हणून काम केले. १८७४ मध्ये एकोल द्यू व्हाल द ग्रेस या लष्करी संस्थेत त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. १८७८-८३ या काळात त्यांनी अल्जीरियात लष्करामध्ये काम केले आणि तेथे त्यांनी हिवतापासंबंधी संशोधन करून १८८० मध्ये त्याच्या जिवंत कारकाचा शोध लावला. त्यानंतर पूर्वीच्याच संस्थेत लष्करी आरोग्याचे प्राध्यापक (१८८४-९४) म्हणून व काही काळ प्रशासकीय पदांवर काम केल्यानंतर त्यांनी १८९७ मध्ये लष्करी नोकरी सोडली आणि पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये ते दाखल झाले.
लाव्हरां यांनी १८९७ पासून माणूस व प्राणी यांतील रक्ताच्या परजीवीजन्य रोगांवर संशोधन केले. उष्ण कटिबंधीय वैद्यकातील संशोधनाच्या विकासावर त्यांचा फार मोठा प्रभाव पडलेला होता. ⇨निद्रारोग, लिशमॅनिया प्रजातीतील प्रजीवांपासून होणारे रोग व इतर प्रजीवजन्य रोग यांसंबंधीचे त्यांचे कार्य मूलभूत महत्त्वाचे ठरले. हिवतापाच्या प्रचारात डासांचा सहभाग असावा, असा त्यांनी तर्क केला होता पण त्याचा नंतर त्यांनी पाठपुरावा केला नाही.
नोबेल पारितोषिकाची मिळालेली रक्कम त्यांनी उष्ण कटिबंधीय रोगांवरील संशोधनासाठी पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये एक प्रयोगशाळा स्थापन करण्याकरता खर्च केली. त्यांनी सोसायटी द पॅथॉलॉजी एक्झॉटिक ही संस्था १९०८ मध्ये स्थापन केली व ते बारा वर्षे तिचे अध्यक्ष होते. फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसने त्यांना १८८९ मध्ये पारितोषिक देऊन १९०१ मध्ये सदस्य म्हणून निवडले. ते ॲकॅडेमी ऑफ मेडिसीनचे १८९३ पासून सदस्य व पुढे अध्यक्ष होते. त्यांनी आपले संशोधन कार्य टिपणे व संस्मरणिका तसेच विपुल प्रबंधिका यांच्या रूपात प्रसिद्ध केले. त्यांत Trypanosomes et trypanosomiasis (फेलीक्स मेस्नील यांच्या समवेत, १९०४), Trait des fievres Palustres avec la description des microbes du paludisme (१८८४) आणि Trait des maladies et Epidemies des armees (१८७५) या ग्रंथांचा समावेश आहे. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.