लाव् श : (३ फेब्रुवारी १८९९ – ? ऑक्टोबर १९६६ ). चिनी कथा-कादंबरीकार. पीकिंग येथे मांचू कुटुंबात जन्म. मूळ नाव शू र्जिगछन. शिक्षण येनर्जिग विद्यापीठात. काही काळ अभ्यासक म्हणून काम केल्यानंतर १९२५ साली तो इंग्लंडला गेला. इंग्रजी भाषेचे आपले ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने तेथे तो इंग्रजी कादंबऱ्यांचे वाचन करू लागला. चार्लस् डिकिन्झच्या कादंबऱ्यांचा त्याच्यावर विशेष प्रभाव पडला. ‘द फिलॉसफी ऑफ लावू जांग’ (इं. शी.) ही त्याची कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. चीनमधल्या ‘ शॉर्ट स्टोरी मॅगझिन’ (इं. शी.) मधून ही कादंबरी जुलै १९२६ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली. आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यात त्याने लिहिलेल्या ‘द टू माज’ (इं. शी.) ह्या कादंबरीचा विषय अँग्लो-चायनीज संबंध हा आहे. लाव् शची लेखनशैली विनोदी आणि उपरोधप्रचुर अशी आहे. १९३१ साली तो चीनला परतला, तेव्हा एक यशस्वी कादंबरीकार म्हणून त्याचा चीनमध्ये बोलबाला झाला होता.
‘द लाइफ ऑफ न्यउ थ्वन् ज’ (इं. शी.) ही त्याची कादंबरी १९३४ साली प्रसिद्ध झाली. आपल्या सामाजिक आसमंताशी एखाद्या व्यक्तीने संघर्ष करण्यातला निष्फळपणा हा ह्या कादंबरीचा विषय. ‘स्यांग-ज द कॅमल’ (१९३६, इं. शी.) ह्या त्याच्या कादंबरीत हाच विषय अधिक प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडलेला आढळतो.
चीन-जपान युद्धाच्या काळात (१९३७-४५) ‘ऑल चायना अँटी जॅपनीय रायटर्स फेडरेशन’ चा लाव् श हा प्रमुख होता. युद्धाच्या काळात त्याने नाटके, कखा, कादंबऱ्या असे बरेच लेखन केले. त्यातून त्याच्या देशभक्तीचा प्रत्यय येत असला, तरी त्या लेखनाचा प्रचारकीपणा त्याच्या गुणवत्तेला बाधक ठरल्याचे दिसते. एक सांस्कृतिक दौरा म्हणून त्याने एक वर्ष अमेरिकेत व्यतीत केले (१९४६-४७). नंतर त्याने विविध सांस्कृतिक चळवळींत भाग घेतला. विविध वाङ्मयीन समित्यांवर काम केले. लेखनही तो करीत राहिला. ‘द ड्रेगन-बिअर्ड डिच’ (१९५१, इं. शी.) ह्या त्याच्या नाट्यकृतीतून साम्यवादी सत्तेखाली चीनमध्ये होत जाणारे परिवर्तन दाखविले आहे. ‘सांस्कृतिक क्रांति’ काळात त्याचा छळाने मृत्यू झाला.