लाखकाम : (लॅकवर्क). लाखेचा वापर करून बनविण्यात येणारे कलाकाम. चीन हे लाखेचे मूलस्थान असून जपान, कोरिया, इराण, भारत इ. देशांत तिचे उत्पादन होते.
लाखेत रंग मिसळत असल्याने ती विविधरंगी बनते. चिनी मातीच्या भांड्यांसारखा तिला चकचकीतपणा आणता येतो. लाखेच्या या गुणांमुळे कोरीवकाम, जडावकाम इ. साठी तिचा उपयोग करतात. प्रारंभी वेळूच्या पट्ट्यांवर लिहिण्यासाठी लाखेचा उपयोग केला जाई, असा उल्लेख भिंग काळातील (१३६८–१६४४) चिनी ग्रंथांत आढळतो. ग्रंथलेखनाचे हे प्रारंभिक रूप होते. चाऊ घराण्यात (इ. स. पू. १०२७ इ. स. २५६) काळ्या लाखेपासून तयार केलेल्या भांड्यांचा अन्नपदार्थ शिजविण्यासाठी उपयोग करीत पुढे वाहने व चामड्याची गोपालवस्त्रे (गोंधळ्यांचा पोशाख) यांच्या सुशोभनासाठी लाखेचा वापर होऊ लागला. त्यानंतरच्या हान साम्राज्याच्या काळात (इ. स. पू. २०२ ते ९ वे शतक) भांड्यांवरील आच्छादने लाखेने रंगविलेल्या तांबड्या कागदांची करण्यात येत.
भारतीय लाखकाम : लाकडी आणि कागदी लगद्यांच्या वस्तूंमुळे लाखकाम हे केवळ भारतातच नव्हे, तर परदेशांतही प्रसिद्धी पावले आहे. राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या शतकानुशतके प्रख्यात असून काहींवर नाजुक खोदकाम व सप्तरंगांची उधळण केलेली असते. तर काहींवर लाखेमध्ये लहानलहान खडे, भिंगे बसवून त्यांची शोभा वाढविण्यात येते. आजही चांदीच्या कोंदणात सतेज रत्ने, पाचू, माणिक, लाल, पुष्कराज, हरितमणी बसवून अलंकृत केलेली काश्मीरमधील कंकणे, अंगठ्या, काळ्या वाळ्या व गळसऱ्या आपला प्रभाव दाखवीत आहेत.
लाखेच्या कलाकामाची रचना कलात्मक, सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक असते. लाखेच्या कलाकृतीचे व वस्तुंचे रंग साधे, ठिपकेदार किंवा पट्टेदार असतात. या कामाचे आलंकारिक स्वरूप उल्लेखनीय असते. खरे भारतीय कलाकाम लाखेचे वलनकाम (टर्निंग वर्क) करून तयार होते. लेथवर होणाऱ्या घर्षणाने लाख तापून वितळते आणि वस्तूवर पक्की बसते. यासाठी साधे लेथ व हत्यारे वापरतात. दागिने तयार करण्यासाठी फिकट रंगाचे आणि घनपोताचे लाकूड वापरतात. धातूसारख्या रंगाची लाख तयार करण्यासाठी अभ्रकाची पूड, कथिल, सोने यांचे पातळ पत्रे किंवा पारा, शिसे आणि कथिल यांचे एकजीव केलेले मिश्रण यांचा उपयोग करतात त्यामुळे काम ठिपकेदार दिसते. हे म्हैसुरी कलाकामाचे वैशिष्ट्य आहे. साधे काम कलाकाम जवळजवळ सर्व भारतात होत असले, तरी विशेषत: पाटणा, बीरभूम, मुर्शिदाबाद, बंगाल, आसाम, आग्रा, फतेपूर, लखनौ, मिर्झापूर, बनारस तसेच पंजाब व मद्रासमधील काही भाग, अलवर, बिकानेर, जोधपूर, बंगलोर, महाराष्ट्र इ. अधिक प्रसिद्ध आहेत. या प्रकारांत दिव्यांची आच्छादने, पलंगांचे खांब, पाळणे, गोल डब्या व लेथवरील इतर वस्तू तयार होतात. वस्तू तयार झाल्यावर पॉलिश करून पिवळ्या लाखेचा हात देतात. लेथवरच दुसऱ्या रंगाच्या लाखेने अनेक प्रकारच्या रचना काढतात. त्यांत काळी किनार व मध्यभागी पांढरी लाख भरतात. या प्रकारचे सर्वोत्कृष्ट काम पंजाब आणि गुजरातच्या काही भागांत होते.
कोरीवकाम व नमुन्याचे काम : पिवळ्या, तांबड्या, हिरव्या व काळ्या रंगांच्या लाखेचे एकावर एक थर दिल्यानंतर त्यांच्यावर हवी ती नक्षी कोरतात. जो थर कोरला जाईल, त्याच्या खालचा रंग दिसत असल्याने काळ्या पार्श्वभूमीवर तिरंगी काम होते. उत्तर भारतात काही ठिकाणी तांबडा व तपकिरी रंगच वापरतात, तर कधी हिरव्या पार्श्वभूमीवर कोरीवकाम करतात. या कामात कला आणि धार्मिक प्रवृत्तीप्रमाणे विविधता आलेली दिसते.
घाशीव नक्षीकाम : यात अग्नीचा रसरशीतपणा दाखविण्यासाठी तेलाने चकाकी आल्यावर मूळ रंगावर शिकारीची आणि ग्रामीण दृश्ये काढतात. यासाठी तैलमिश्रित किंवा जलमिश्रित रंगांच्या लाखेच्या कांड्या वापरतात. जेथे तेलाचा हात दिलेला असेल, तेथे पाण्यातील रंग बसत नसल्यामुळे त्यावर तैलरंग लावतात आणि जेथे दुसरा रंग लावायचा असेल, तो भाग घासून काढतात. या पद्धतीने अनेक रंगांचे नक्षीकाम करण्यात येते. ही कामे होशियारपूर आणि जोधपूर येथे होतात.
रंगकाम : वलन व सफाई झाल्यावर जेथे फुले, प्राणी व शिकारीची दृश्ये काढावयाची असतील, तेथे पांढरा रंग लावतात. त्यावर पाणरंगांनी दृश्ये काढतात. हे रंग वाळल्यावर स्पिरिटमध्ये विरघळविलेल्या लाखेच्या रोगणाचा हात देतात व पुन्हा लेथवर लाखकाम करतात. सिंध, हैदराबाद आणि अलवर येथील अशा प्रकारच्या वस्तू उत्तम असतात.
पत्र्याचे कलाकाम : कथिलाचे पत्रे तापविले की त्यांवर ठेवलेली लाख वितळून तिचा रंग पत्र्यावर चढतो. हे पत्रे रंगविण्याचे तंत्र भारतात फार पूर्वीपासून रूढ आहे.
संदर्भ : 1.Feddersen. M. Chinese Decorative Art, New York,1961.
2. Stephen, K. Chinese and Japanese Lackmaleric, Munich, 1962.
3. Strange, E. F. Chinese Lacquer, New York, 1926.
मिसार, म. व्यं.