लाइपसिक विद्यापीठ : जर्मन लोकशाही प्रजासत्ताकातील (पूर्व जर्मनीतील) एक प्रख्यात व सर्वांत मोठे विद्यापीठ सांप्रतचे नाव कार्ल मार्क्स लाइपसिक विद्यापीठ. बोहीमियाचा राजा चौथा वेन्सस्लॉस याने प्राग विद्यापीठात धर्मसुधारणावादी यान ह्यूस (१३७२/७३-१४१५) याला रेक्टर म्हणून नियुक्त केले. हसाइट संघर्षामुळे व ह्यूसचा निषेध म्हणून प्राग विद्यापीठातून बरेच प्राध्यापक व जर्मन विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यांनी संयुक्तपणे मीसेनचा पहिला फ्रेडरिक व त्याचा भाऊ व्हिल्हेल्म यांच्या निमंत्रणावरून लाइपसिक शहरात १४०९ मध्ये याच नावाचे, परंतु प्राग विद्यापीठाच्या धर्तीवर एक नवीन विद्यापीठ स्थापन केले. इतर यूरोपीय विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या विद्यार्थिसंघटनांच्या पद्धतीनुसार लाइपसिक विद्यापीठातही विद्यार्थीसंघटना मीसेन, सॅक्सनी, बव्हेरिया व पोलंड अशा चार देशांनुसार बनविण्यात आल्या.
बोलोन्या व पॅरिस विद्यापीठांमधील प्रचलित पद्धतीनुसार लाइपसिक विद्यापीठातही व्याख्याने त्या त्या विद्याशाखेच्या प्रमुख प्राध्यापकांच्या घरीच देण्यात येत असत. विद्यापीठाच्या प्रारंभीच्या काळात मानवतावादाचा पुरस्कार करण्यात आला, तथापि नंतरच्या काळात मात्र जर्मन धर्मसुधारणा आंदोलनांचा विद्यापीठाच्या कार्यावर बराच प्रभाव पडला. विद्यापीठाने संपादिलेली गुणवत्ता व दर्जा १५५९ च्या कायद्यान्वये झाकोळून गेला कारण या कायद्यामुळे विद्यापीठातील धर्मसुधारणा आंदोलन दडपण्यात आले. याच्या परिणामी विद्यापीठातील अनेक प्राध्यापक व विद्यार्थी यांनी विद्यापीठ सोडण्याचा निर्णय घेतला. यापुढील शंभर वर्षात विद्यापीठाचे नाव व ख्याती रसातळाला जाऊन पोहोचल्याचे दिसते. ६ फेब्रुवारी १८३० रोजी सॅक्सनीचा फ्रेडरिक ऑगस्ट याने विद्यापीठाची पुनर्रचना घोषित केली. तीनुसार विद्याशाखेची मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली ग्रंथालयाचा विस्तार करण्यात आला धर्मसुधारणेची तत्त्वे स्वीकारण्यात आली आणि विद्यापीठाची हरवलेली प्रतिष्ठा त्याला पुन्हा प्राप्त झाली.
या विद्यापीठात खालील प्रसिद्ध व्यक्तींचा प्राध्यापक व विद्यार्थी या नात्याने संबंध आला : क्रिस्त्यान ऑगस्ट क्रूसियस (१७१५-७५)-तत्त्ववेत्ता आणि धर्मशास्त्रवेत्ता कार्ल फ्रीड्रिख व्हिल्हेल्म फोन गर्बर (१८२३-९१)-विधिवेत्ता व मुत्सद्दी गोटफ्रीट लायप्निपट्स (१६४६-१७१६)- महान गणिती आणि तत्त्वज्ञ योहान गोट्शेट (१७००-६६)-वाङ्मयीन समीक्षक योहान गोटलीप फिक्टे (१७६२-१८१४)-तत्त्ववेत्ता झां, पाउल रिक्टर (१७६३-१८२५)-कादंबरीकार क्रिस्त्यान फ्यूर्शेटगोट गेलर्ट (१७१५-६९)-कवी योझेफ फ्रीड्रिख व्हिल्हेल्म फोन शेलिंग (१७७५-१८५४)-तत्त्वज्ञ महाकवी गटे (१७६५-६८) व प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर (१८४१-४४) यांनी विद्यापीठात संस्कृत भाषेचे अध्ययन केले. याच विद्यापीठात १७२३ मध्ये योहान झेबास्टिआन बाख (१६८५-१७५०) या श्रेष्ठ जर्मन संगीतकाराने संगीतविभाग सुरू केला व त्याच्याच प्रयत्नांमुळे या विद्यापीठात एक ख्यातनाम संगीतविषयक संरक्षिका नावारूपास आली.
तेराव्या शतकात युनिव्हर्सिटी चर्च बांधण्यात आले व नंतर १८९७-९९ या काळात त्याची पुनर्रचना करण्यात आली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात विद्यापीठाच्या पहिल्या इमारती बांधण्यात आल्या १८९४-९६ या काळात त्यांची पुनर्रचना करण्यात आली. विद्यापीठाच्या सभागृहात माक्स क्लिंगर ( १८५७-१९२० ) हा जर्मन उत्कीर्णक, चित्रकार व वास्तुशास्त्रज्ञ याने काढलेली भित्तिचित्रे ग्रीक संस्कृतीचे उदात्तीकरण व्यक्त करतात.
विद्यापीठात खालील विद्याशाखा आहेत : (१) अर्थशास्त्र व विधी (२) तत्त्वज्ञान व इतिहास (३) संस्कृती, भाषा व शिक्षण (४) गणित व निसर्गविज्ञाने (५) वैद्यक (६) कृषी (७) धर्मशास्त्र. विद्यापीठात एकूण ३,००० अध्यापक असून त्यांपैकी सु. ३५० प्राध्यापक आहेत. विद्यार्थिसंख्या सरासरीने १५,००० पर्यंत असते. विद्यापीठाच्या ग्रंथालयात (स्था. १५४३) सु. ३०,५०,००० ग्रंथ आहेत (१९८८-८९).
गद्रे, वि. रा.